अस्पृश्यांचा गैरसमज*

(महर्षी शिंदे यांचे एक अनावृत पत्र)

'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी'च्या धोरणासंबंधी अलीकडे अस्पृश्यवर्गातील काही तरुण व्यक्तींनी आपला गैरसमज करून घेऊन निषेध रूपाने इतरांचाही करण्याचा प्रयत्न चालविला आहे.  विशेषतः ह्या तरुण व्यक्तींचे शिक्षण ह्या मंडळीच्या साह्याने झालेले पाहून ह्या मंडळीला आणि तिच्या मित्रांना ह्या व्यक्तीचा असा विरोध पाहून वाईट वाटणे साहजिकच आहे.  मंडळीच्या काही चालकांनी वर्तमानपत्रांतून ह्या विरोधाला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.  विरोधनिवारक असे प्रयत्न करणे मला स्वतःला आवडत नाही.   कारण आमची मंडळी म्हणजे एक परोपकारी संस्था आहे.  तिने काही ध्येये आणि पध्दती ठरवून घेतल्या आहेत.  त्या ध्येयांना आणि पध्दतींना धोरण हे नाव देणेच मुळी चुकीचे आहे.  मंडळीने जी उदात्त सेवा पत्करली आहे, तिला कसल्याही धोरणाची मुळीच गरज नाही.  केवळ प्रेरणेची आहे.  त्या प्रेरणेचा झरा कायम असेपर्यंत असल्या तरुणांच्या - किंबहुना अस्पृश्यवर्गाची दिशाभूल होऊन त्यातील काही व्यक्तींना मदत करण्याचे सामर्थ्य मंडळामध्ये उरणार नाही.  अशा विचाराने मी ह्या विरोधाकडे दुर्लक्ष केले होते.  ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, सुबोधपत्रिका, जागृती, जागरूक ह्या आणि इतर वृत्तपत्रांनी वरील तरुण व्यक्तींस चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या.  पण त्यात त्यांनाही यश आलेले नाही, हे पाहून वरील विरोधाकडे मी दुर्लक्ष केले, यात चुकी केली नाही असे मला अद्यापि वाटत आहे.  इतकेच नव्हे; तर अस्पृश्यवर्गातील काही जबाबदार आणि वृध्द अशी जी काही माझी मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडून वरील विरोधासंबंधी पूर्ण निषेध आणि तिटकारा दर्शविणारी पत्रे माण्याकडे आली आहेत; आणि अशा मित्रांनी जाहीर रीतीने हा निषेध प्रकट केल्याचे माझ्या ऐकिवात आहे.  ह्या गोष्टीवरून आमच्या मंडळीला म्हणण्यासारखा धोका नाही.  इतकेच नव्हे तर थोडासा विरोध झाल्याबरोबर आमच्या मंडळीने आपले धैर्य आणि शांती यांचा भंग होऊ देणे यातच धोका आहे, अशी माझी अल्प समजूत आहे.  असे असता मी हे पत्र लिहिण्याचे कारण इतकेच की, रा. रा. 'जागरूक' पत्राच्या संपादकांनी आपल्या पत्राच्या ता. १५ माहे 'मे' च्या अंकामध्ये ह्या वरील विरोधाचा उल्लेख करून मी ह्या संबंधी खुलासा करावा, अशी जाहीर विनंतीही केली आहे.  जागरूककारांनी आपला लेख सरळ आणि सहानुभूतीपर लिहिला आहे.  सर्वच गोष्टींत त्यांची आणि माझी मते जुळत नसतानाही त्यांनी हा जो थोरपणा दाखविला आहे, त्याला उतराई म्हणूनच मी हे पत्र किंचित नाखुषीने लिहीत आहे.

------------------------------------------------------------
*सुबोधपत्रिका, ३० मे १९२०
------------------------------------------------------------
वर म्हटल्याप्रमाणे मिशनला धोरण असे मुळीच नाही, मग त्यांच्या खुलाशाचा प्रश्नच उरत नाही.  मिशनची ध्येये, पध्दती, कामे आणि अडचणी ही मिशनच्या रिपोर्टांतून आणि इतर वाङमयांतून वेळावेळी प्रसिध्द झालेलीच आहेत.  अस्पृश्यवर्गाच्या उच्च शिक्षणाच्या आड आमची मंडळी येत आहे, अशा आक्षेपाला उत्तर देणे म्हणजे हा आक्षेप जबाबदार मनुष्यांचा खरा वाटत आहे, असा भ्रम करून घेऊन मंडळीने आत्मविश्वासाला मुकण्यासारखे आहे.  ज्या थोडया व्यक्तींनी विरोधाची चळवळ चालविली आहे, त्यांतील बहुतेकांना मंडळीकडून प्राथमिक आणि औद्यागिक शिक्षणाच्या बाबतीतच नव्हे, तर त्याहून वरिष्ठ दर्जाच्या शिक्षणासाठीदेखील शक्य ती मदत देण्यात आली आहे.  असे असून त्यांनी आपले शिक्षणाचे कर्तव्य अवेळी टाकून देऊन उलट मंडळीविषयी गैरसमज पसरविण्याला तयार होणे, हा एक हल्लीच्या काळाचा अपूर्व महिमा आहे.  अशा तात्कालिक आपत्तीकउे आमच्या मंडळीतील सेवकांनी पाहून स्वीकृत कार्यात क्षणमात्रही खोळंबा होऊ देऊ नये, अशी माझी त्यांना विनंती आहे.  विशेषतः मंडळीच्या ध्येयाचे आणि कार्याचे समर्थन वर निर्दिष्ट केलेल्या वर्तमानपत्रकारांनी आणि इतर थोर गृहस्थांनी केले असताना मंडळीतील सेवकांनी स्वसमर्थनासाठी पुढे यावे, हे मला बरे दिसत नाही. म्हणून जागरूककारांनी जो खुलासा केला आहे तोच आमच्या मंडळीचा खुलासा आहे असे त्यांनी समजल्यास वावगे होणार नाही, हे मी त्यांस नम्रपणे कळवितो; आणि ज्या इतर वृत्तपत्रकारांनी आणि मित्रांनी मिशनची अशी पाठीराखी केलेली आहे, ती सर्व जरी माझ्या पाहण्यात आलेली नाही तरी त्या सर्वांचे अत्यंत आभार मानणे, माझे कर्तव्य समजतो आणि पुन्हा ह्या शुष्क विषयासंबंधी लिहिण्याची पाळी मजवर न येवो, अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो.