अस्पृश्यांचे राजकारण

सद्यस्थितीत या विषयावर मी माझे विचार प्रकट करणे जरूर आहे असे समजून माझ्या काही मित्रांनी व सहकाऱ्यांनी आग्रह धरला.  इतक्यात वसंत व्याख्यानमालेकडूनही व्याख्यानाविषयी विनंती करण्यात आली, म्हणून मी माझे विचार व अनुभव सांगण्यास आज तयार झालो आहे.  आजच्या व्याख्यानात कोणत्याही प्रकारचे सिध्दांत ठरवावयाचे नाहीत अगर गाजवावयाचे नाहीत, म्हणून आज कोणी अध्यक्ष नको अशी मालाकारांजवळ विनंती केली, कारण माझे भाषण केवळ प्रवचन आहे.  त्याला निर्णयाची जरूर नाही.  पण वहिवाटीच्या सबबीवर मालाकारांनी माझी विनंती मान्य केली नाही.  टीकाकारांनी माझ्या भाषणावर वाटेल अशी टीका करावी, पण अध्यक्षांनी निर्णय देण्याची तसदी घेऊ नये अशी माझी विनंती आहे.  राजकारणात काही पक्षोपपक्ष असतात; पण मी आतापर्यंत राजकारणाच्या कोणत्याही पक्षात सामील झालेलो नाही.  अस्पृश्यांतही आज असे पक्ष जोराने दंड थोपटून उभे आहेत.  त्यांच्यांतही मध्यस्थी करून राजकारणाचे जागतिक असे जे उच्च कार्य असते, ते करण्यास मी केव्हावी तयार आहे.  श्रोत्यांनीही अशाच निर्विकार व उदात्त भावनेने माझे चार अल्पबोल ऐकावेत.  खवळलेल्या सद्यस्थितीत पक्षाच्या लाटांवर वाहून जाण्याचा प्रयत्न मीही करीन, आपणही सर्व कराल अशी आशा आहे.

----------------------------------------------------------------------------
* पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत दिलेले भाषण
----------------------------------------------------------------------------

अस्पृश्यांच्या कारणावर बोलण्यापूर्वी राजकारणाचाच अर्थ पाहू.  त्यामुळे प्रवचनाच्या अर्ध्याअधिक भागाचा खुलासा सहज होऊन या क्लिष्ट प्रश्नाचा मार्ग सोपा होईल.  राजकारणाचा अर्थ अर्थकारण (Economics) म्हणजे अर्थाच्या आधारे समाजशास्त्राची धारणा एवढाच आहे.  समाजाची धारणा व्हावी म्हणून अर्थशास्त्रासारखे शासनशास्त्राचेही तत्त्व राजकारणात समाविष्ट होते, पण हे दुसरे तत्त्व शक्यतोवर गौण असावयास पाहिजे.  प्राचीन काळी जेव्हा जीवनकलह इतका तीव्र नव्हता, तेव्हा राजकारणात अर्थशास्त्राचेच प्राधान्य होते.  पण पुढे जसजसे कनक आणि कांता या लोभनीय वस्तूंविषयी मारामारी सुरू झाली; तसे राजकारणात अर्थशास्त्रापेक्षा शासनशास्त्राचे प्राबल्य वाढले.  पण अलीकडे इतर भावनामय अवांतर गोष्टींपेक्षा पोटापाण्याचाच प्रश्नाला प्राधान्य येऊ लागल्यामुळे आजकालच्या राजकारणात अर्थशास्त्रालाच पूर्ववत प्राबल्य येऊ लागले आहे.  कनक हे मुख्य साध्य आणि त्यासाठी शासनाची हाव हे केवळ साधन होऊन बसले आहे.

सर्व राजकारणाची जर ही मीमांसा तर हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या राजकारणाला पोटापाण्याचे महत्त्व यावे यात काय नवल आहे ?  'अस्पृश्य' हे अल्पसंख्याक, हतवीर्य, हतबल व पददलित आहेत.  त्यांना दुसऱ्यावर शासन चालविण्याची हाव अद्यापि तरी नाही.  कशी असणार ?  मात्र दुसऱ्याची त्यांच्यावर मिरविण्याची हाव अद्यापि तिळमात्रही कमी झाली नाही.  मग हे क्षत्रिय असतो, ब्राह्मण असोत, शूद्र असोत, स्वकीय असोत, की परकीय असोत, प्रागतिक असोत की स्थितिनिविष्ठ असोत !  जोपर्यंत हे होईजड वर्ग आपल्या इज्जतीखातर अस्पृश्यांच्या योगक्षेमात आणि स्वयंनिर्णयात ढवळाढवळ करू पाहतात; तो 'अस्पृश्य' आजकाल करू देण्यास तयार नाहीत; एवढाच त्यांच्या राजकारणाचा अर्थ आतापर्यंत माझ्या अनुभवास आला आहे.  पुढे काय होईल त्याविषयी भविष्यवाद करण्याचे हे स्थळ नव्हे.  अस्पृश्यांची आजची भूक एवढी थोडी असताना त्यांच्या स्पृश्य शत्रूमित्रांना काय वाटते ते पाहा.  'अस्पृश्य' स्पृश्यांच्या दाव्यातून सुटल्यावर लवकरच ते सूड उगविण्याच्या मार्गाला लागतील आणि स्पृश्यांवर आज जे जुलूम करणारे परकीय आहेत, त्यांच्याशी एकजीव होतील (जणू परकीय तसे होऊ देतीलच) आणि परकीयांच्या साह्याने स्पृश्यांवर जुलूम करू लागतील वगैरे वगैरे अनेक नीतीचे काहूर आम्हा स्पृश्यांमध्ये माजले आहे.  ह्या काहुराला नीतीचे आणि न्यायाचे किती पाठबळ आहे, हे मला स्पष्ट सांगण्याची इच्छा नाही.  ही सांगण्याची इच्छा ऐकणाऱ्यांच्या तयारीवर अवलंबून राहणार.

अस्पृश्यांचे राजकारण अस्पृश्यतेइतकेच प्राचीन आहे आणि ते सांगण्यासाठी अस्पृश्यतेचा उदय कसा झाला हे सांगू गेल्यास प्रवचनाचा व्याप मर्यादेपलीकडे वाढेल.  पुढेमागे हाच विषय निराळया ग्रंथाद्वारे प्रसिध्द होत असल्यामुळे अत्यंत संक्षेपाने हा मुद्दा सांगणे जरूर आहे.  मानववंशाचे पृथक भाग प्राचीन काळी एकमेकांशी लढत असत.  परस्परांच्या संस्कृतीबद्दल अभिनिवेश उत्पन्न होऊन वंशद्वेष मनुष्यजातीत रूढ झाला.  याच वंशद्वेषाला जादूटोणा, मंत्र, विटाळचंडाळ, सोवळे-ओवळे आणि शेवटी रूढधर्म यांचेही पाठबळ मिळून काही विशिष्ट वंश इतर मानववंशांनी आपल्यापासून दूर ठेवले.  याप्रकारे सामाजिक अस्पृश्यतेचा पाया घालण्यात आला.  एका वंशाने दुसऱ्या वंशास जित केल्यावर जेत्यांनी जिताला गुलामगिरीत ठेवल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत.  अशा गुलामांना 'अस्पृश्य' मानण्याची उदाहरणे प्राचीन काही पश्चिम आशियातील सेमेटिक, मध्य आशियातील हिंदू आणि पूर्व आशियातील ब्रह्मदेश, जपान इत्यादी राष्ट्रांत आढळतात.  'अस्पृश्य' मानलेले वंश सारे संस्कृतिहीनच होते असे मूळीच नाही.  ब्रह्मदेशोत 'तुव्हायाजा' (अशुभ राजा), फयाचून वगैरे जे अस्पृश्य वंश आढळत आहेत, ते जिंकले जाण्यापूर्वी राजवंश होते.  हेच तर काय हल्लीच्या सुधारलेल्या काळीदेखील द. आफ्रिकेसारख्या ठिकाणी हिंदूंसारख्या काह्या वंशाला तेथील गोरे वसाहतकार अस्पृश्याप्रमाणेच ग्रामबाह्य ठरवितात.  यावरून अस्पृश्यतेला संस्कृती अथवा संस्कृतीचा अभाव हे कारण ठरत नाही.  जेत्यांनी जितांशी चालविलेले राजकारण, हेच ह्या जातिविशिष्ट अस्पृश्यतेचे हेतू होत, हे सिध्द होते.

ह्याच वंशद्वेषाला पुढे पुढे रूढ धर्माचे पाठबळ मिळाल्यामुळे ह्या भरतखंडात पूर्वी अल्प असलेल्या अस्पृश्यांची संख्या कालवशात इतकी अवाढव्य झाली आहे.  समाज सुसंपन्न आणि सुसंस्कृत स्थितीत असला तर दहा वर्षात त्याची दुप्पट वाढ होते, असा एक सामान्य लोकसंख्याशास्त्राचा अजमास आहे.  ह्या अजमासाप्रमाणे अस्पृश्यांची संख्या वाढलेली असणे शक्य नाही.  कारण हे दुर्दैवी मानववंश एकदा अस्पृश्य आणि ग्रामबाह्य ठरल्यावर त्यांच्यांत संपन्नता आणि संस्कृती कोठून उरणार ?  असे असूनही त्यांची संख्या जी इतकी प्रचंड वाढलेली आहे त्याला काही विपरीत कारणेच असली पाहिजेत.  ती कारणे म्हणजे ह्या प्रचंड खंडवजा देशात धर्माच्या आणि धर्मपंथाच्या नावावर ज्या क्रांत्या आणि जुलूम झालेले आहेत, तेच होत.  बौध्द, शैव, वैष्णव, शाक्त इत्यादी पंथांच्या मारामाऱ्या दक्षिणेत द्राविडांमध्ये व उत्तरेत आर्यांमध्ये झाल्यामुळे पूर्वी स्पृश्य असलेले जातिसमूह अस्पृश्यांत ढकलण्यात आले.  अशाविषयी ऐतिहासिक दाखले कर्नल अलकॉटसारखे परकीय धर्मप्रचारक आणि महामहोपाध्याय हरप्रसादशास्त्री यांच्यासारखे पुराणमतवादी संशोधक यांच्या ग्रंथांत आढळतात.

थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अस्पृश्यता म्हणजे स्पृश्यांच्या दूषित राजकारणाचे एक दृढमूल झालेले जाळे आहे.  अस्पृश्यांमध्ये जो आता हीनपणा आलेला आहे; त्यामुळेच अस्पृश्यता उदय पावली असे म्हणण्याने कार्यकारणांचा विपर्यास हल्लीच्या काळीसुध्दा जाणत्या लोकांकडून होत आहे, ही एक करमणुकीची गोष्ट.  समाजशास्त्राचे निरपेक्ष अवलोकन केल्यावर जातीय अस्पृश्यता ही हीनतेचे कार्य नसून उलट ती दीनतेचे कारण आहे असे दिसून येते; आणि ब्रह्मदेशातील अस्पृश्य लोकांचा इतिहास पाहिल्यास हा कार्यकारणभाव सिध्द होतो.  काही असो, अस्पृश्यतेची व अस्पृश्यांसंबंधी स्पृश्यांच्या राजकारणाची ही मीमांसा साधारण लोकांच्या गळी सहज उतरेल अशी माझी तरी अपेक्षा नाही.  तथापि प्रस्तुत विषय माझ्या अपेक्षा असा नसून अस्पृश्यासंबंधी माझे निरीक्षण, अध्ययन, संशोधन व अनुवाद हीच होत.

अस्पृश्यांच्या विषयी पूर्ण आणि निष्काम सहानुभूती वाटल्यावरून 'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी' या नावाने अखिल भारतातील अस्पृश्यांच्या सेवेसाठी आणि शुश्रूषेसाठी एक विधायक धर्मकार्य उघड स्थापण्यात आले.  पण त्यापूर्वी बरीच वर्षे त्यांचया स्थितीचे अध्ययन चाललेच होते.  हे कार्य निघाल्याबरोबर अनुकूल व प्रतिकूल टीकांचा गहजब उडाला, सहानुभूतीइतकाच विरोधाचा वर्षाव झाला.  बाहेरील सहकाऱ्यांइतकाच अंतःकलह माजला.  या मंडळीच्या विधायक कार्यामुळे मंडळीच्या बाहेरही विक्षोभक चळवळ प्रचंड माजली.  राष्ट्रीय सभेच्या केवळ राजकारणाच्या रणांगणात अस्पृश्यांच्या नावावर रणशिंग वाजू लागले.  पक्षात्मक राजकारणात भाग न घेता मंडळीने उच्च आणि मूलभूत राजकारणात अस्पृश्यांच्याही वतीने भाग घेण्यास माघार घेतली नाही.  मात्र हे सर्व काम मंडळीने गाजावाजा न करता केले.  त्यांचा प्रयत्न विधायक असल्यामुळे तो अद्यापि चालू आहेच.  हा प्रयत्न चालू असता मडळीवर प्रतिकूल टीकास्त्रांचा जो वर्षाव झाला त्यांतील काही मासल्यांचा उल्लेख करणे विषयाला धरून आहे.  हे उल्लेख मंडळीच्या संरक्षणासाठी नसून विषयाच्या परिपूर्ततेसाठी आहेत.

या मंडळीचे हे कार्य अस्पृश्यांच्या उध्दारासाठी नसून ब्राह्मणादी उच्च वर्गांना खाली ओढण्यासाठी आहे; अशी नुसती सुटी सुटी विधानेच करून न राहता या जाडया जाडया विद्वारांनी सुसंबध्द व्याख्याने दिली आहेत.  ती मला आज चांगली आठवतात.  मंडळीच्या कार्याची घटना सर्व देशभर होऊन त्याचा परिणाम जाणवू लागल्यावर १९२३ सालच्या जानेवारीच्या अंकात 'अस्पृश्योध्दार' या मथळयाखाली रा. रा. महादेव राजाराम बोडस या लेखकाने 'चित्रमय जगतासारख्या' सन्मान्य मासिकात एक मननीय लेख लिहिलेला आहे.  त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा व्यक्तीविषयकता बाजूस ठेवून आजच्या विषयासाठी विचारात घेणे जरूर आहे.

वरील लेखात पान ४५ वर खालील उतारा वरील मंडळीच्या कार्यासंबंधानेच नव्हे, तर साधारण हितासंबंधीही महत्त्वाचा आहे :

''आपली सामाजिक व धार्मिक सुधारणांची तट्टे चोहीकडे नाचविण्याकरताच निराश्रितांचा कैवार घेण्याऱ्यांचे हातून त्यांचा उध्दार कधीही व्हावयाचा नाही.  कारण त्यांच्या प्रामाणिकपणावर लोकांचा विश्वास बसत नाही.  कोणतीही चळवळ एकनिष्ठ असल्याशिवाय यशस्वी होत नाही.  एका कामात दुसरी दहा खेकटी घुसडली की, सर्वच कामे बिघडतात.  अस्पृश्यतेच्या प्रश्नाला रोटीबेटीव्यवहार आणि सनातन धर्माची टवाळी चिकटविल्याने निराश्रित शिखंडींना पुढे करून सबगोलंकार करण्याचा या मंडळीचा बेत आहे; अशी साधारण लोकांची समजूत झाली व त्यामुळे कारण नसता सर्व जातींचा या चळवळीला विरोध होऊ लागला.  पण तेच सन १९१८ साली लो. टिळकांनी सहानुभूती दाखविल्याबरोबर १९२० साली महात्मा गांधींनी हा प्रश्न हाती घेतला व १९२१ साली अहमदाबादच्या काँग्रेसमध्ये राजकीय व राष्ट्रीय करून टाकला.  विठ्ठलराव शिंद्यांना १२ वर्षांत जे कार्य करता आले नसते, ते गांधींनीं दोन दिवसांत केले, म्हणजे शिंद्यांच्या कामाचे महत्त्व कमी होते असे नाही.  उलट असेही म्हणता येईल की, शिंद्यांच्या १२ वर्षे नांगरणीमुळे गांधींना बीजारोपण करता आले.  परंतु एकाच कार्याविषयी उभयतांचा दृष्टिकोण आणि कार्यपध्दती यांतील भेद दाखविण्याकरताच ही तुलना केली.  शिंदे निराश्रितांना व्यक्तिशः सुखी करण्याकरिता झटत असल्यामुळे समाजाला विशेष कळकळ वाटत नव्हती.  समाजात सुखी व दुःखी दोन्ही प्रकारचे लोक असल्यामुळे समाजातील वैयक्तिक सुखाविषयी लोकांना फारशी आशा वाटत नाही.  पण राष्ट्राच्या भवितव्यतेचा प्रश्न आला की, सर्व समाज खडबडून जागा होतो.  पाचसहा कोटी निराश्रितांचा उध्दार करावयाचा तो त्यांनी अधिक सुखात व ऐषआरामात राहावे म्हणून नव्हे तर तीस कोटी हिंदी राष्ट्र एकजीव होऊन स्वराज्य मिळवण्यास लायक व्हावे म्हणून.  लोकमान्य टिळकांनी निराश्रितांविषयी नुसती शाब्दिक कळकळ दाखविली म्हणून त्यांची टवाळी करणारांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही, की ज्यांच्या हातांत निराश्रितांची चळवळ आहे, त्यांची जास्त योग्यताच नाही.  टिळक-गांधींसारख्यांकडून मदत मिळवावयाची असेल तर त्यांच्याप्रमाणेच राष्ट्रकार्याला कंबर बांधली पाहिजे.  साहेबलोकांना खूष ठेवावयाचे, मिशनऱ्यांच्या मागे लागावयाचे, पैशाकरता श्रीमंत लोकांच्या दारोदार हिंडावयाचे, मग लोकमान्य टिळकांनी असल्या भिक्षेकऱ्यांना नुसत्या शब्दांची भीक घातली तर नवल काय ?  "You Cannot serve both God and mamon at the same time" अशी एक इंग्रजीत म्हण आहे.  निराश्रितांना केवळ ऐहिक सुखे देणेच ज्यांचे ध्येय त्यांनी सर्व ऐहिक सुखावर पाणी सोडलेल्या टिळक-गांधींसारख्यांकडून मदतीची अपेखा करू नये, हेच उत्तम.  कारण त्यांचे ध्येय निराळे, मार्ग निराळा व दृष्टिकोणही निराळा !''