१८९८ सालचा रोजनिशीतील उतारा

(महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुण्यास शिकत असताना त्यांनी लिहिलेल्या डायरीतील एक उतारा पुढे दिला आहे.  या काळातही अस्पृश्यांसंबंधी काही एक कार्य करण्याची त्यांची तळमळ दिसून येते.)

२२ मे १८९८

आज आमच्या बिऱ्हाडी बारामतीचे रा. रा. कळसकर, तेथील 'महाराष्ट्र व्हिलेज एज्युकेशन सोसायटी' चे स्थापक आले आहेत.  त्यांचे साहस, उद्योग व स्वार्थत्याग ऐकतच होतो. ह्यांचे स्वतःचे भाषण ऐकून तर ह्यांनी म्हार, मांग ह्या अतिनीच जातींविषयी किती किती कळकळ दाखविली, त्यांनी काय काय केले; पण आणखी कितीतरी करण्यासारखे आहे हे सर्व मनात येऊन मला स्वतःची मनःपूर्वक लाज वाटली व तिटकारा आला.

-------------------------------------------------------------------------------
*महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनिशी, पृ. २८.
-------------------------------------------------------------------------------