सामान्य आलोचन

प्रकरण पहिले

अस्पृश्यता हि एक पुरातन सामाजिक जागतिक संस्था आहे.  तिचा व्याप सर्व जुने जग भरून, निदान आशिया खंड धरून तरी, असल्याचे पुरावे प्राचीन इतिहासात, व हल्लीच्या काळातही, वर्तमान असलेले आढळतात.  पूर्वेकडे चीनात व जपानात अस्पृश्यता अद्यापि रेंगाळते.  ब्रह्मदेशात तर मी स्वतः शोधून स्पष्ट पाहिली आहे.  पश्चिमेकडे सामान्यतः भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील प्राचीन राष्ट्रांत, विशेषतः इस्त्रायल लोकांत, ही संस्था होती.  जेथे जेथे देवपूजकांची व पुरोहितांची एक निराळी जात आणि वृत्ती स्थापित झाली आणि अशा वार्तिकांच्या प्रेरणेने राजकर्त्यांच्या व त्यांच्या प्रभावळीतल्या उच्चवर्णीयांच्या रक्ताला जेथे जेथे सोवळेपणा आला, तेथे तेथे ही संस्था जुन्या-नव्या जगाच्या इतिहासात उदयास आली आहे.  म्हणून ही संस्था आर्यांचेच अगर कोणा एका विशिष्ट मानववंशाचे एक विशेष कृत्य आहे, असे मानण्याचे कारण नाही.  तथापि, इतके मात्र निर्विवाद आहे की, आपल्या भरतखंडात, विशेषतः दक्षिणेकडील द्राविड देशांत, ह्या सामाजिक तोडग्याचा प्रयोग आर्य अथवा द्राविड म्हणविणारांकडून जितक्या पद्धतशील रीतीने अगदी ह्या घडीपर्यंत करण्यात आला आहे, आणि ह्या प्रयोगाला येथे जे यश आले आहे, तो प्रयोग, ती पद्धत आणि ते यश इतरत्र कोठेच - निदान येथील प्रमाणात तरी - आढळणार नाही.  म्हणून अस्पृश्यता ही भारतीय सामाजिक संस्कृतीचे एक विशिष्ट आणि मुख्य लक्षण आहे, असे म्हणणे इतिहासज्ञाला भाग पडेल, असे मला वाटते.

व्याख्या

प्रस्तुत विषयासाठी अस्पृश्यतेची थोडक्यात एक कामचलाऊ व्याख्या करणे अवश्य आहे.  सोयेर, सुतक, रजोदर्शन, सांसर्गिक रोग, इत्यादी वैयक्तिक, कौटुंबिक आणि प्रासंगिक बाबींसंबंधी अस्पृश्यता हल्लीदेखील हिंदुस्थानात, तशीच बाहेरील राष्ट्रांतही पाळलेली पुष्कळ ठिकाणी आढळते.  फरक इतकाच की पहिल्या तीन बाबी जंगली लोकांत व चौथी सुधारलेल्या देशांतील रुग्णालयांतच आढळते.  पण ही नैमित्तिक अस्पृश्यता ह्या निबंधाचा विषय नव्हे.  नित्य अस्पृश्यता हीच केवळ ह्या निबंधाचा विषय आहे; आणि ह्या निबंधाच्या हेतूपुरती, ह्या अस्पृश्यतेची कामचलाऊ व्याख्या मी करीत आहे.

विवक्षित जातीच्या जाती ऊर्फ राष्ट्रे वंशपरंपरेने अस्पृश्य मानणे, त्या जाती अशा अस्पृश्य राहाव्यात म्हणून त्यांना अगदी गावाबाहेर, पण फार दूर नाही, अशा निराळ्या वस्तींत डांबणे, व जर कोणी स्पृश्यांनी किंवा अस्पृश्यांनी हा बहिष्काराचा नियम मोडला तर त्या दोघांवरही प्रचलित धार्मिक आणि राजकीय कायद्यांची अंमलबजावणी करणे, ह्या तीन्ही गोष्टी भारतीय अस्पृश्यतेची मुख्य लक्षणे आहेत.  म्हणजे ही अस्पृश्यता केवळ स्थानिक अथवा धार्मिक नसून ती जातीय ऊर्फ राष्ट्रीय आणि नित्य स्वरूपाची आहे.  एखाद्या मानीव अस्पृश्याने आपला धर्म बदलला, किंबहुना, प्रचलित राजसत्तेनेही आपला धर्म बदलला, तरी भारतीय रूढी आणि ह्या देशात वेळोवेळी स्थापित होणार्‍या राजसत्तेच्या कायद्यांनी तिला दिलेली मान्यता कायम असेपर्यंत, अस्पृश्यता ही कायमच असावी अशी भारतीय अस्पृश्यतेची उपपत्ती आहे.  मुसलमान भंगी, मजबी, शीख आणि मद्रासकडील रोमन कॅथॉलिक ख्रिस्ती धर्मात घेतलेले पारिया, हे हल्ली हिंदू नसूनही अस्पृश्यच आहेत.  केवळ अस्पृश्यच नव्हे तर ग्रामबाह्यही आहेत.  हल्लीचे हिंदुस्थान सरकार स्वतः ख्रिस्ती म्हणवीत असले तरी त्याने आपला कायदा, रूढी आणि तिर्‍हाईतपणा ह्या दोन विक्षिप्‍त आणि लवचिक तत्त्वांवर स्थापिला असल्यामुळे, ह्या कायद्याचा आश्रय अस्पृश्यांना उपपत्तीच्या दृष्टीनेही मिळणे शक्य नाही; मग व्यवहारात त्याची अंमलबजावणी उलटच होत असल्यास त्यात आश्चर्य काय ?  इ.स.१८४३त हिंदुस्थान सरकारने कायदा करून येथील गुलामगिरी बेकायदेशीर केली; पण अस्पृश्यता अद्यापि कायदेशीरच आहे !  हल्लीची राउंड टेबल परिषद संपली, किंबहुना गेल्या सप्टेंबर महिन्यात महात्मा गांधींनी केलेल्या प्रायोपवेशनामुळे घडलेला अस्पृश्यासंबंधाचा 'पुण्याचा करार' राजमान्य झाला, तरी अस्पृश्यता ही अवदसा कायमच राहील, अशी चिन्हे दिसत आहेत.  जातीय अस्पृश्यता, सार्वत्रिक बहिष्कार आणि कायद्याच्या दृष्टीने सार्वकालिक निराश्रितपणा ही भारतीय अस्पृश्यतेची तीन लक्षणे आजतागायत तरी कायम आहेत.  मुसलमानी अमदानीत धर्मांतराने ही अस्पृश्यता नष्ट होत असे.  कारण, मुसलमानी कायदा हिंदू रूढीला मुळीच जुमानीत नसे.  पण ब्रिटिश हिंदी सरकार ह्या बाबतीत अधिक भित्रे आणि कावेबाज आहे.  आणि ख्रिस्ती धर्मही महंमदी धर्मापेक्षा अधिक लवचिक आहे.  ख्रिस्ती झालेल्यांची अस्पृश्यता नष्ट होत नसून केवळ बेपत्ता होते.  म्हणजे तिचा नीट, नेमका पत्ता न लागल्यामुळे बहिष्काराची कुर्‍हाड तिच्यावर नेमकी उगारणे कठीण जाते पण जर का पत्ता लागला तर ह्या कुर्‍हाडीच्या उलट आश्रय देण्याचे सामर्थ्य प्रचलित ब्रिटिश कायद्यातही नाही, ख्रिस्ती धर्मात तर नाहीच नाही हे उघड आहे.  पुण्याच्या शेजारच्याच अहमदनगर जिल्ह्यात-अहमदनगर शहराला लागूनही-ख्रिस्ती झालेल्यांचे महारवाडे व मांगवाडे ख्रिस्ती न झालेल्यांच्याप्रमाणेच बहिष्कृत स्थितीत आहेत.  ज्यांना ह्या विधानाविषयी शंका येत असेल त्यांनी मद्रास इलाख्यातील मागासलेल्या ख्रिस्ती समाजाची आणि मुंबई इलाख्यांतील अहमदनगर, गुजराथ काठेवाडकडील ख्रिस्ती अस्पृश्यांची स्थिति किती ग्रामबाह्य आणि हलाखीची आहे हे जाऊन पाहावे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे !  नित्य विटाळ मानणें, गावाबाहेर राहावयास लावणें व कायद्याच्या दृष्टीने निराश्रित असणें, ह्या तीन लक्षणांनी अन्वित एक राष्ट्रीय संस्था अशी आमची व्याख्या तयार झाली; आणि ह्या व्याख्येने ओळखली जाणारी अस्पृश्यता केवळ आमच्या भरतखंडांत आणि शेजारच्या ब्रह्मदेशांतच आढळून येणारी आहे.

उदय

अस्पृश्यता ही एक स्वतंत्र मानवी संस्था आहे.  हिचा उदय मानवी जातीच्या अगदी प्राथमिक स्थितींतच झाला असला पाहिजे.  भूत, प्रेत, पिशाच इत्यादि कल्पना मानवी जातीच्या प्राथमिक म्हणजे अगदी रानटी स्थितींत सर्वत्र पसरलेल्या होत्या.  तौलनिक धर्मशास्त्रांत ह्या कल्पनासमुच्चयाला 'भूतवाद' (Animism) असें नांव आहे.  हा भूतवाद व ह्याप्रमाणेंच इतर प्राथमिक धर्माच्या अडाणी कल्पना व त्यांवरून बनलेल्या जादूटोणा, थातुरमातुर इत्यादिकांना मी पुढे 'अपधर्म' असें नांव दिलें आहे.  ज्या धर्माचा पाया मानवी प्रज्ञा आहे, तो जरी पुढे निष्काळजीपणामुळें विकृत झाला तरी त्याला मी 'अपधर्म' हें नांव देणार नाही.  रागावलेल्या भूतांना संतुष्ट करणें किंवा एखाद्या भूताला लालूच दाखवून किंवा भेवडावून त्याच्याकडून आपल्याला इष्ट असा अर्थ किंवा अनर्थ घडवून आणणें शक्य आहे, अशी प्राथमिक मानवाची समजूत असे.  ह्या समजुतीप्रमाणें जादू, टोणा, मंत्र, तंत्र, यंत्र वगैरे जे अपधर्माचे अनेक प्रकार असत, त्याला 'अभिचार' (Magic) असें एक सामान्य नागर नांव देतां येईल.  ह्याचे 'कृष्ण अभिचार' (Black Magic) आणि 'भेषज' (Medicinal) अथवा 'शुक्ल अभिचार' (White Magic) असे दोन मुख्य प्रकार सुधारलेल्या वैदिक काळांतही होते.  पहिला प्रकार विशेषतः अथर्ववेदांत आणि दुसरा ॠग्वेदादि वेदत्रयींत विपुल आढळतो.  दोन्ही प्रकारचा अपधर्म प्राचीन काळीं सर्व प्राथमिक जगांत होता, इतकेंच नव्हे, तर हल्लीच्या रानटी जातींत आणि पुष्कळ ठिकाणीं सुधारलेल्या पाश्चात्य राष्ट्रांतूनही अद्यापि आढळतो.  तो मी स्वतः रोमन कॅथॉलिक चर्चमध्यें सौम्य रूपांत आढळणारा पाहिला आहे.  जन्म, मृत्यु, साथीचे रोग व इतर आकस्मिक आपत्ति ह्यांचा संबंध प्राथमिक जगांत भुतांखेतांकडे आणि क्रुद्ध देवतांकडे लावण्यांत येत असे.  त्यांचे निवारण करण्यांत निष्णात असे पंचाक्षरी अथवा वैदू (Medicine Men) होते, तेच पूर्वकाळचे ॠषि आणि पुरोहित असत.  त्यांच्या बर्‍यावाईट क्रियांना जादू किंवा अभिचार म्हणतां येईल.  ह्याप्रमाणें ह्या जादूचा प्राचीन धर्मांत समावेश झाला, तो अद्यापि पुष्कळ ठिकाणीं सामान्य जनतेंत प्रचलित आहे.  ह्या अपधर्मांतच अस्पृश्यतेचा उगम आहे.
प्रथम प्रथम ही अस्पृश्यता वैयक्तिक व प्रासंगिक उर्फ नैमित्तिक होती.  बाळंतीण व तिची खोली, मृतांची जागा व आप्‍त, विशिष्ट रोगी, झपाटलेलीं माणसें, विक्षिप्‍त झाडें, खुनासारख्या अपघाताचीं ठिकाणें वगैरे बाबी अस्पृश्य आणि वर्जनीय ठरल्या.  जादू करणारे जादूगार आणि पुरोहित हे देखील सोंवळे म्हणजे एक प्रकारें अस्पृश्यच असत.  देवपूजा करणार्‍या ब्राह्मणाला आणि यज्ञपरिषद चालू असे तोंपर्यंत सर्व ॠत्विजांना आणि इतर याज्ञिकांना नेहमी सोवळ्यांत म्हणजे अस्पृश्य अथवा अलग स्थितींतच राहावें लागे.  कर्नाटकांत मादिग (मातंग) जातीचे ढकलगार म्हणून जे धर्मगुरु आहेत त्यांना स्वतः त्यांचे अनुयायी मादिगही शिवत नाहीत, इतकेंच नव्हे, तर त्यांना आपल्या पाणवठ्यांनाही शिवूं देत नाहीत, हें मी प्रत्यक्ष पाहिलें आहे.  कर्नाटकांत गदग तालुक्यांत डॉ. कुर्तकोटींच्या बंधूंनी मला हा प्रकार दाखविला.  अशा अपधर्माला उत्तरोत्तर जसजसें गूढ आणि दृढ स्वरूप प्राप्‍त होऊन पुरोहितांच्या द्वारें त्याची परंपरा आणि घटना बनत चालली तसतशी ह्या अस्पृश्यतेच्या वैयक्तिक आणि स्थानिक स्वरूपाची परिणति जातीय आणि सार्वत्रिक ऊर्फ नित्य स्वरूपांत होऊं लागली.  निरनिराळ्या मानव जातींत आणि वंशांत पूर्वी अभेद्य शत्रुत्वच असणें साहजिक होतें.  मित्रत्व केवळ अपवादच.  एका जातीचीं पूजेचीं स्थानें आणि उपकरणें परक्या जातीला अगम्य आणि अस्पृश्य असत.  सुधारलेल्या वैदिक काळांतदेखील ही परस्पर अस्पृश्यता फार जोरांत होती.  इराणी आर्य व हिंदी आर्य हे झरथुष्ट्राच्या काळानंतर विभक्त झाले.  त्यानंतर इराणी आपल्यास 'असुरयज्ञ' म्हणजे असुराची पूजा करणारे आणि हिंदी आपणास 'देवयज्ञ' म्हणजे देवांची पूजा करणारे म्हणवूं लागले.  हे असुरयाजी व देवयाजी परस्परांना परस्परांच्या यज्ञस्थानांच्या वार्‍यालाही उभे राहूं देत नसत व तीं स्थानेंही स्वतः अस्पृश्य समजत.  म्हणजे परकीयांचें यज्ञस्थान स्वतःला अस्पृश्य आणि त्याज्य व स्वकीयांचें यज्ञस्थान स्वतःलाही सोंवळें (अगम्य) अशी वहिवाट असे.  एकाचा धर्म तो दुसर्‍याचा अपधर्म आणि दुसर्‍याचा धर्म तो पहिल्याचा अपधर्म अशी समजूत बळावून जातिद्वेष माजत असे.  आणि अस्पृश्यतेचें मूळ कारण हा जो अभिचारमूलक अपधर्म; तो जरी पुढे लुप्‍त होऊन विस्मृत झाला तरी, जातीय अस्पृश्यता शिल्लक उरलीच.  यहुदी लोक शेजारच्या सुमेरिया देशांतील लोकांना अस्पृश्य मानीत असत, हें बायबलांतील भल्या सम्यारिटनच्या गोष्टींतील तात्पर्यावरून आजमावितां येतें.  येशू ख्रिस्ताला तहान लागली असतां त्याने एका सुमेरियन बाईजवळ पाणी मागितलें; तेव्हा ती म्हणते, ''तूं ज्यू असून कसें मला पाणी मागतोस ?  कारण ज्यूंचा सुमेरियन लोकांशीं कोणत्याही प्रकारें व्यवहार घडत नाही.''  (सेंट जॉनकृत शुभवर्तमान, अध्याय ४, श्लोक ९ पहा.) अशीं दुसरींही अनेक उदाहरणें सामाजिक इतिहासांतून देतां येतील.

व्याप्‍ति

वैयक्तिक आणि जातीय अस्पृश्यतेची व्युत्पत्ति वर सामान्यतः सांगितली.  असली अस्पृश्यता प्राचीन आर्यांतच होती असें नसून बर्‍याच प्राथमिक राष्ट्रांत, विशेषतः सुधारलेल्या संराष्ट्रांत होती.  अस्पृश्यतेचा विकास वैयक्तिक स्वरूपांतून जातीय स्वरूपांत होण्यापूर्वी राज्यांचा विकास साम्राज्यांत झाला असे असणें समाजवर्धनशास्त्राच्या दृष्टीने आवश्यक आहे.  जी जात अथवा राष्ट्र दुसर्‍या सबंध जातीला किंवा राष्ट्राला ज्या काळीं कायमचें अस्पृश्य मानितें व तें राष्ट्र मानून घेतें, ती विजयी जात त्या काळीं सम्राट स्थितीला पोचली असावी लागते.  अशा विजयी जातीने दहा-पांच इतर मागासलेल्या जातींचा पराजय केल्यावर अशाच एका पराजित जातीला कायमचें हस्तगत करून आपल्या शुश्रूषेस ठेवण्याच्या कल्पनेचा त्या विजयी जातीमध्यें उदय होतो.  म्हणजेच साम्राज्याचा उदय होणें होय.  आणि तेव्हाच जातीय गुलामगिरीचा उर्फ अस्पृश्यतेचा उदय होणें शक्य असतें.  जातीय अस्पृश्यता हा एक गुलामगिरीचाच प्रकार - अर्थात अत्यंत कठोर प्रकार-होय.  असा प्रकार असीरिया, बाबिलोनिया इत्यादि द्राविड, इस्त्रायल, आरब वगैरे सेमिटिक; इराणी, मीड इत्यादि आर्य; चीन, जपान वगैरे मोंगल अशा अनेक वंशांच्या अनेक देशांत आढळून येत होता.

ताबू उर्फ विटाळ

वर ज्या अस्पृश्यतेचा उदय आणि व्याप्‍ति सामान्यत्वेंकरून निर्दिष्ट केली, ती कालतः दोन प्रकारची म्हणजे नैमित्तिक आणि नित्य अशा दोन स्वरूपांची आहे हें वर सांगितलें आहेच.  ह्याशिवाय वरील अस्पृश्यतेचे आणखी दोन प्रकार आहेत, ते असे :  एक तिरस्करणीय व दुसरा आदरणीय.  लौकिक मराठी भाषेंत एकीला विटाळ व दुसरीला सोवळें अशीं नांवें आहेत.  ह्या दोन्ही प्रकारांची व्याप्‍ति हिंदुस्थानच्या बाहेरही होती व आहे.  ज्याला मराठींत सोवळें असें नांव आहे त्याला इंग्रजींत ताबू (Taboo) असें म्हणतात.  अद्यापि जंगली जातींत, विशेषतः आग्नेय आशियांतील बेटांतून राहाणार्‍या जंगली जातीच्या लोकांत, ह्या अस्पृश्यत्वाचा व तद्दर्शक शब्दांचा प्रचार जास्त आहे.  ह्या शब्दांत जरी तिरस्करणीय आणि माननीय ह्या दोन्ही अर्थांच्या अस्पृश्यत्वाचा समावेश होतो; तरी दुसर्‍या म्हणजे सोवळेपणाच्या प्रकाराचा प्रचार इंग्रजी शब्दाने जास्त दाखविण्यांत येतो.  ह्या विचित्र शब्दाची उत्पत्ति मी बरींच वर्षे शोधीत आहें.  इंग्रजी कोशांतून, ह्या शब्दाचें मूळ पॉलिनेशियन जंगली भाषांत आहे, ह्यापेक्षा जास्त खुलासा सांपडत नाही.  परलोकवासी टिळकांचा एक इंग्रजी निबंध "Khaldian and Indian Vedas" (खाल्डियन आणि भारतीय वेद) हा डॉ. सर रामकृष्ण भांडारकर ह्यांच्या स्मरणार्थ लिहिलेल्या निबंधसमूहांत मी वाचला.  त्यांत टिळकांनी अथर्ववेदांतील ॠचेचा उतारा दिला आहे.  ती ॠचा ही :

ताबुवं न ताबुवं न घे त्वमसि ताबुवम् ।  ताबुवेना रसं विषम् ॥
--------------------------------------------------------------------

अथर्व संहिता, ५. ३. १०.

प्रो. ब्लूमफील्डने Sacred Books of the East Series, Vol.XLII, Page २८ वर पुढीलप्रमाणें तिचें भाषांतर केलें आहे : "Tabuvam (or) not Tabuvam, thou (० serpent) art not Tabuvam.  Through Tabuvam the poison in bereft of force."
-------------------------------------------------------------------------

अर्थ :- 'ताबुव असो वा अताबुव असो.  (रे सर्पा) तू ताबुव नाहीस.  ताबुवामुळें तुझ्या विषाचा जोर नाहीसा होतो.'  अथर्ववेदांतील हा ताबुव शब्द आणि इंग्रजी कोशांतील Taboo हा शब्द एकच असावेत अशी मला जबर शंका येऊं लागली आहे.  तिला खालील कारणें आहेत.  ताबुव शब्दांत मूळ रूप 'ताबू' इतकेंच असावें. 'व' हा केवळ आदेश आहे.  तो आर्य आणि अनार्य उकारान्त शब्दांना विभक्तींच्या पूर्वी लागणें साहजिक आहे.  'एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका' आणि 'हेस्टिंग्स एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अ‍ॅन्ड एथिक्स' ह्या दोन कोशांतून अशी माहिती मिळते की, ताबू हा शब्द प्रथम कॅपटन कुक ह्यास पॉलिनेशिआंतील टोंगा नांवाच्या बेटांत इ.स. १७७७ सालीं आढळला.  त्यापूर्वी युरोपीय भाषांतून ह्याचा प्रचार नसे.  पश्चिम मादागास्करमध्यें 'फादी', मलाया द्वीपकल्पांत 'पंमाल्ली', मलानेसियामध्यें 'ताबु, तापु' वगैरे ह्याच अर्थाचे निराळे शब्द आहेत.  एकंदरींत ही ताबूची संस्था हिंदुस्थानांतील सोवळें आणि विटाळ ह्याच स्वरूपाची तंतोतंत आहे.  वरील शब्दांपैकी पंमाल्ली हा शब्द द्राविड भाषेंतील 'पंबाडा' ह्या शब्दाशीं संबद्ध असावा.  दक्षिणेंतील मल्याळी, तामीळ व तेलगु भाषांतून अस्पृश्य पारिया जातीच्या पुरोहितांना 'पंबाडा' असें म्हणतात, हें पुष्कळ ठिकाणीं मी पाहिलें आहे.  आणि दक्षिण महासागरांतील बेटांतून ताबू ह्या संस्थेचे जनक तिकडील जंगली जातींचे पुरोहित व नाईक हेच असत.  ते सोवळेपणा इतका पाळतात कीं, त्यांना नुसतें पाहाणेंही धोक्याचें असतें असें सांगतात.  कर्नाटकांतील मादिग जातीचे पुरोहित ढकलगार हे आपल्या शिष्य मातंगांतही अस्पृश्य असतात हें मी वर सांगितलें आहेच.  ते नेहमी एकांतवासांत असतात.  त्यांतील एका ढकलगारांला मी एक रुपया देऊं लागलों.  तो त्याने जमिनीवर ठेवण्यास सांगितला.  हा सोवळेपणाचा मासला ढकलगारांतच नसून हिंदुस्थानांतील वरिष्ठ वर्गांत, म्हणजे ब्राह्मण पुरोहितांत नैमित्तिकपणें व ब्राह्मणांच्या जुन्या वळणाच्या बायकांत नित्यपणानेच नांदत आहे.  हे सर्व प्रकार तंतोतंत ताबू ह्या संस्थेचेच होत.  हे प्रकार उत्तरेपेक्षा दक्षिण हिंदुस्थानांत, विशेषतः द्राविड देशांत आणि त्यांतल्या त्यांत मलबारांत फारच आढळतात हें विशेष ध्यानांत ठेवण्यासारखें आहे.  कारण फार प्राचीन काळीं मलबार, मादागास्कर बेट व दक्षिण आफ्रिकेचा किनारा ह्यांना जोडणारें 'लिमूरिया' नांवाचे एक खंड होतें.  तें आता आरबी समुद्राखाली बुडालेलें आहे असें प्राचीन भूगोलशात्र्यांचें मत आहे.

ताबू ह्याचें मूळ रूप तापू असून त्यांत ता=खूण करणें अशी धातु असून 'पु' हें एक अतिशयत्वबोधक क्रियाविशेषण असावें असा एनसायक्लोपीडियांतील लेखकाचा कयास आहे.  मला वाटतें कानडी भाषेंत तप्पु=चूक, दोष, असा एक शब्द आहे त्याच्याशीं ताबू या शब्दाचा संबंध असावा.  भाषाशास्त्राअन्वयें तप्पूचें तापू=वू=बू अशीं रूपें होण्यास हरकत नाही असें मला वाटतें.  वरील अथर्ववेदांतील जो उतारा दिला आहे त्याशिवाय इतरत्र कोठेही व विक्षिप्‍त शब्द आढळत नाही.  असे विक्षिप्‍त शब्द व चाली अथर्ववेदांत पुष्कळ आढळतात, त्यावरून हा वेद आर्येतरांचा असून तो ॠग्वेदाच्याही पूर्वीचा असावा असा कित्येक विद्वानांचा कयास आहे.

हिंदी अस्पृश्यतेचें संशोधन

असो.  आपण येथवर ह्या सामान्य संस्थेचा जगांत कसा उदय आणि विकास झाला ह्याचा निर्देश केला.  शिवाय प्रस्तुत निबंधापुरती आमच्या विषयाची विशिष्ट व्याख्याही वर दिली.  आता ह्यापुढे आमच्या हिंदुस्थानांत वरील तीन लक्षणांनी युक्त अशी अस्पृश्यता केव्हा रूढ झाली ह्या गोष्टीचा छडा लावण्याचा आपण प्रयत्‍न करूं या.  हें काम सोपें नाही.  कारण ह्या संस्थेविषयीं ग्रांथिक अथवा शिलालेखीय पुरावा मिळणें अशक्य आहे.  तथापि ही संस्था पुरावा नसतांही आमच्या देशांत अगदी अनादि कालापासून होतीच असेंही मानण्याचें कारण नाही.  पुढील भागांत शक्य तितका प्रयत्‍न करून ह्यासंबंधीं जितके ग्रांथिक संदर्भ मिळतील तितके संकलित केले आहेत.  इतकेंच नव्हे, तर ज्या काळामागे असे संदर्भ सापडत नाहीत त्या काळांत, पुढे अस्पृश्य व तिरस्करणीय ठरलेल्या कांही प्राचीन जातींच्या नांवाचा जो केवळ विरळ विरळ उल्लेख आढळतो, तो हुडकून त्या जातींचा सामाजिक दर्जा काय होता तोही पुढे निर्दिष्ट केला आहे.

ऐतिहासिक व प्रागैतिहासिक कालविभाग

वेदपूर्वकालीन भारतीय इतिहासाचे पुरावे लेखी मिळणें तूर्त तरी असंभवनीय आहे.  आर्यांपूर्वी भारतवर्षांत द्राविड अथवा मिसरी (मित्री) इजिप्शियन लोक आले.  तेही बाहेरूनच आले होते.  त्यांचें तत्कालीन भारतीय वाङ्‌मय अद्यापि उपलब्ध नाही.  इजिप्‍त (मित्र-मिस्त्र-मिसर), असिरियाकडे जें उपलब्ध असेल त्याचा संबंध भारताशीं नाही.  आर्यांच्या आगमनानंतरही पुष्कळ शतकें अखिल भरतखंडांत द्राविड भाषा पसरली होती.  पैशाची, बलूची उर्फ ब्राहुवी, सिंधी, बंगाली वगैरे प्राचीन व अर्वाचीन राष्ट्रें किंवा भाषाही मुळात द्राविडी होत्या.  बलुचिस्थानांतील हल्लीची ब्राहुवी भाषा वगळली तर बाकीच्या प्राचीन द्राविडी भाषा उत्तर हिंदुस्थानांतील अर्वाचीन देशी भाषांत निरुक्तरूपाने व दक्षिण भारतांत उघड रूपाने अद्यापि विद्यमान आहेत.  पण ह्या भाषांतील वाङ्‌मयावरूनही अस्पृश्यतेच्या उत्क्रमाविषयीं नीट पुरावा मिळविणें अद्यापि सुगम झालें नाही.  त्यानंतरच्या इतर सांताळादि भाषांची तीच स्थिति.  ह्यापुढच्या पाली आणि प्राकृत भाषांचें कांही ग्रंथ रोमन लिपींत आणि सिंहली लिपींत असल्यामुळें त्यांच्यांतूनही हा पुरावा शोधीत बसणें फार मुष्किलीचें आहे.  म्हणून तूर्त येऊन जाऊन संस्कृत वाङ्‌मयावरच विसंबून राहणें भाग आहे.  त्याचा आता विचार करूं.

'आर्य' ह्या नांवाचा एक विशिष्ट मानववंश नव्हता.  युरोप आणि आशियांत राहणार्‍या कांही मानववंशांमध्यें एक सामान्य भाषा रूढ होती असा गेल्या शतकांत शोध लागल्यावरून त्या भाषेच्या सर्व शाखांना 'आर्य' हें नांव पाश्चात्य भाषापंडितांनी दिलें.  त्या शाखांचा मूळ संबंध हल्ली ज्या ज्या आशियांतील व युरोपांतील जातींशीं पोहोचतो; त्या सर्व जातींना देखील 'आर्य' हेंच नांव कांही पाश्चात्य मानववंशशास्त्री दडपून देतात.  पण हें नामाभिधान चुकीचें आहे.  हिंदुस्थानांतील ह्या भाषेला संस्कृत असें जें नांव पडलें आहे तें तर अगदी अलीकडचें, पतंजलीच्या नंतरचें; म्हणजे फार तर दोन हजर वर्षांपूर्वीचें आहे.  त्यापूर्वी तिला वेद आणि अवेस्ता ह्या ग्रंथसमूहाची भाषा किंवा 'छांदस' ऊर्फ 'झेंद' भाषा असें नांव असे.  ह्या प्राचीन आर्य किंवा छांदस भाषेंत जें वाङ्‌मय आज उपलब्ध आहे, त्या वैदिक आणि अवेस्तिक अशीं नांवें आहेत.  ह्या वैदिक वाङ्‌मयांत संहिता, ब्राह्मण, आरण्यकें, उपनिषदें, सूत्रें इतक्यांचाच समावेश होतो.  ह्यांच्या काळाला प्राचीन अथवा प्रागैतिहासिक काळ असें म्हणतां येईल.  ह्यापुढे श्रीगौतमबुद्धाचा उदय (इ.स.पूर्वी ५६७ मध्यें) झाला.  तेथून ऐतिहासिक काळ चालू झाला.