पूर्व बंगाल्यातील अस्पृश्यवर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगती *

'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळा'ची स्थापना झाल्यावर मला आपल्या ब्राह्म समाजाच्या सफरीवर बंगाल्यात सन १९०८ चे सुमारास एकदा जावे लागले.  अर्थात मला तेथे ठिकठिकाणी 'अस्पृश्यांच्या' आपत्तीबद्दल व्याख्याने द्यावी लागली.  तेथील ब्राह्मसमाजातील काही सभासदांनी लगेच इकडील आपल्या मिशनच्या धर्तीवर तिकडे शाळा काढल्या.  प्रथम प्रथम ह्या कामाचा आमच्या मिशनशी संबंध होता.  पण तिकडील कार्याचा अंतर्भाव लवकरच ब्राह्मसमाजाच्या इतर सामाजिक कामात करावा लागला; त्यामुळे आमच्या ह्या अखिल भारतीय मंडळाशी त्या कामाचा दप्तरी संबंध आम्हाला तोडावा लागला.  तरी पण मी जेव्हा जेव्हा बंगाल्यात जाई, तेव्हा तेव्हा ते काम मुद्दाम पाहून येई.  इ.स. १९२३ साली मी बंगाल्यात गेल्यावेळी जेसोर आणि खुलना जिल्ह्यांतील आमच्या काही हायस्कुलांत राहून ती नीट तपासून आलो होतो.  गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात साधारण ब्राह्मसमाजाने, 'ब्राह्मसमाज हिंदुस्थानात स्थापन होऊन शंभर वर्षे पूर्ण झाली' म्हणून बंगाल्यात, विशेषतः कलकत्त्यात, एक अपूर्व महोत्सव केला.  त्या निमित्ताने पूर्व आणि उत्तर बंगाल्यात एक मोठे प्रचारक दळ काढण्यात आले होते.  ते काम मजकडे आले म्हणून मी विशेषतः ज्या खेडयांतून 'नामशूद्र' नावाच्या अस्पृश्यवर्गाच्या शाळा व इतर प्रागतिक कामे चालली होती तेथे हे दळ नेले.  त्या वेळी आज सुमारे वीस वर्षे चाललेल्या ह्या शिक्षणविषयक कामाची प्रगती झाली आहे, हे मला प्रत्यक्ष पहावयास मिळाले.

----------------------
* म. शिंदे यांच्या कागदपत्रातील हस्तलिखित लेख
----------------------

मुंबईकडील आणि बंगालकडील कामात हा एक विशेष फरक आहे की, मुंबईकडे आमची सर्व कामे ह्या मिशनकडूनच प्रत्यक्ष होतात.  पुणे शाखेतच मात्र कमिटीत व प्रत्यक्ष काम करणाऱ्यांत 'अस्पृश्य' वर्गाच्या सभासदांची बहुसंख्या आहे.  अलीकडे तर त्यांचीच सत्ताही चालू आहे.  तरी अद्यापि इकडील मिशनमध्ये प्रत्यक्ष 'अस्पृश्य' वर्गांच्या होतकरू पुढाऱ्यांनी म्हणण्यासारखे लक्ष पोचविलेले किंवा अंग मोडून काम करीत असल्याचे दिसत नाही.  बंगाल्यात उलटा प्रकार ओढळतो.  पूर्वीपासूनच तिकडील सर्व शाळा (आणि इतर कामेही) 'अस्पृश्य' वर्गांनीच काढल्या व चालविल्या आणि ब्राह्मसमाजाने त्यांना तसे करण्यास प्रेरणा व साह्य केले.  ह्या फरकाचे कारण हेच की, तिकडील नामशूद्रांची स्थिती इकडील मांगांहून पूर्वीपासूनच पुष्कळच उच्च दर्जाची होती.  डोम, पोड, होर वगैरे इतर खरोखरीच अवनत वर्गांची स्थिती नामशूद्रांपेक्षाच नव्हे; तर आमच्या महार-मांगांहून अद्यापि कितीतरी अधिक खालावलेली आहे.  दक्षिण हिंदुस्थानात बिल्लव, तिय्या, एजवा नावाच्या अस्पृश्यांची स्थिती ज्याप्रमाणे इतर 'अस्पृश्यांहून' पुष्कळ सुधारलेली आहे, त्याचप्रमाणे बंगालच्या नामशूद्रांचा प्रकार आहे.  दक्षिणत बिल्लव, तिय्या, परय्या चिरुमा, वगैरेंना जसे अद्यापि शिंवून घेत नाहीत व इतर वरिष्ठ वर्गाप्रमाणेच ह्या गरिबांना निर्दयपणानेच वागवितात, त्याचप्रमाणे नामशूद्रही हा भेद पाळतात.  फार काय, आम्ही मुंबई इलाख्यात जेव्हा प्रथम कामाला सुरुवात केली, तेव्हा चांभार, ढोर, वगैरेंनी स्वतः वरिष्ठ समजून आमच्या मिशनचा फायदा घेण्यास बरेच आढेवेढे घेतले.  बहुतेक महारच शाळांतून व बोर्डिंगातून येत.  आणि तेही मांग, भंगी ह्यांच्याशी समानतेने वागण्यास कां कू करीत.  अजून तरी मिशनकडे सर्व 'अस्पृश्यांचे' पूर्ण लक्ष न लागण्याच्या अनेक कारणांपैकी ह्या अस्पृश्यवर्गातील आपसांतील जातिभेदच एक मुख्य कारण आहे, हे मिशनबाहेर राहून नीट ध्यानात धरणे शक्य नाही.  असो. हा प्रांतिक जातिभेदाचा फरक कसाही असो, बंगाल्यात, विशेषतः पूर्व बंगाल्यात, आज नामशूद्रांच्या उच्च शिक्षणाची जी झपाटयाने प्रगती चालली आहे, त्याची दुसरी कारणे म्हणजे बंगाल प्रांताचे शिक्षणखाते व कलकत्ता युनिव्हर्सिटीचे लोकसत्तावादी धोरण ही दोन मुख्य होत.  शिक्षणाच्या दृष्टीने, मग ते प्राथमिक असो वा उच्च असो, बंगाल आणि मद्रास हे दोन्ही प्रांत मुंबईच्या कितीतरी पुढे आहेत.  त्यातल्या त्यात मुंबई युनिव्हर्सिटी ही स्त्री-शूद्रांच्या बाबतीत तरी फार ओढग्रस्त आणि मागासलेली आहे.  उच्च शिक्षण महाग आणि दुर्मिळ करण्यात तिचा हातखंडा !  अस्पृश्यांना व स्त्रियांनाच काय पण जंगली जाती, गुन्हेगारी जाती, किंबहुना आंधळे, बहिरे, मुके ह्यांनाही ब्राह्मणादी कुशाग्र बुध्दीच्या पुरुषांबरोबर एकाच जात्यात भरडण्याची ह्या युनिव्हर्सिटीला खोड लागली आहे.  ती जाईपर्यंत 'अस्पृश्यांची' निराळी हायस्कुले इकडे निघणे शक्य नाही. मद्रासमध्ये स्त्रियांकरिता वेगळी कॉलेजे आहेत.  काही तर स्त्रियांनीच चालविली आहेत.  मद्रासकडे पडदा नाही, तसेच बंगाल्यात जातिभेद तीव्र नाही.  पूर्वी बौध्द धर्म आणि आता वैष्णव व अलीकडे ब्राह्मसमाजाचा जोराचा परिणाम तेथे झाला असल्यामुळे दक्षिणेकडील भयानक अस्पृश्यतेच्या गोष्टी बंगाल्यातील नामशूद्रांनाही अरेबिअन नाईट्सप्रमाणे सहज विश्वासार्ह वाटत नाहीत.  अशा अनेक कारणांमुळे, विशेषतः पूर्व बंगाल्यातील नामशूद्रांनी, आता शिक्षणातच नव्हे तर इतर बाबतींतही आपले पाऊल सारखे पुढे चालविले आहे.  तशात नामशूद्र हाच तिकडील कुणबी वर्ग.  मुसलमानांच्या पूर्वी आणि मुसलमान रियासतीतही त्यांची लष्करात फार भरती होत असे.  आताही हिंदु-मुसलमानांच्या मारामारीत नेभळे आणि चळवळे हे दोन्ही प्रकारचे बंगाली नामशूद्रांनाच शरण येतात.   मुसलमान तर ह्यांच्या कधीच वाटेला जात नाहीत.  हे नामशूद्र थोडयाच शतकांपूर्वी बौध्द क्षत्रिय होते.  ही सर्व पूर्वपीठिका आठविल्यास खालील कोष्टकातील आकडे पाहून आश्चर्य वाटण्याचे कारण उरणार नाही.


पूर्व बंगाल्यातील नामशूद्रांचे उच्च शिक्षण (हायस्कूल)(PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

 
ह्या आकडयांत मुलींची संख्या दिलेली नाही.  शिवाय सचीदाहा शाळेत फ्री बोर्डिंग ४० मुलांचे आहे.  तसे सर्वत्र नसले तरी ह्या सर्व खेडयांतून जेवण-राहण्याची सोय जवळच असते. ह्या तेरा हायस्कुलांची माहिती केवळ पूर्व बंगाल्यातील चार जिल्ह्यांतील आहे.  ह्याहून अधिक शाळा व मिडल स्कूल्स कितीतरी आहेत.  ही सर्व निव्वळ नामशूद्रांनी आपल्या हिमतीवरच चालविली आहेत !  पैकी चार ठिकाणी तर मी स्वतः जाऊन राहिलो आहे.  अर्थात यांना आमच्याकडे 'हायस्कुले' म्हणजे उंच शाळा कोणीच म्हणणार नाही.  वावरातून पत्र्यांची एक पडळ बांधली आणि सुमारे शंभर मुले जमविली की झाली हायस्कुलची तयारी !  ३० पासून ६०-७० पर्यंत पगारावर ८-१० मास्तर स्वजातीयातून सहज मिळतात.  त्यांत तीन-चार तरी ग्रॅज्युएट असतातच.  एल.एल.बी.चा अभ्यास करणारा एखादा पोक्त अनुभवी हेडमास्तर होतो.  ५-१० खेडयांतून आसपासची अर्धवट इंग्रजी शिकलेली मुले जमतात.  कोणी जागा, कोणी पत्रा, कोणी लाकडे, कोणी ढेकळे देऊन कमिटीचे सभासद होतात.  सल्लामसलत, पैशांची जुजबी मदत आणि देखरेख करण्यास ब्राह्मसमाज तयार आहेत.  मॅट्रिकची परीक्षा पास झाली की, त्याला प्रवेश द्यावा; ह्यापेक्षा युनिव्हर्सिटी अगर विद्याखाते उगीच त्यांच्या मागे काही भगभग लावीत नाही.  आमचेकडे हायस्कूल म्हटले की, निदान एक लाखाची काळया दगडांची उंच इमारत पाहिजेच.  अर्थात हेडमास्तरने क्लासात तरी बूट, पाटलोण आणि झिळमिळयांच्या कोकींचे प्रदर्शन केलेच पाहिजे.  ह्या बहिरंगाप्रमाणेच शिक्षणाचा आतील साज सजवावा लागतो.  अलीकडे तर अमुक एवढी लॅबोरेटरी आणि तमुक तेवढी लायब्ररी दाखविल्याशिवाय युनिव्हर्सिटीकडून हायस्कूललाच प्रवेश मिळत नाही; मग विद्यार्थ्यांना कोण पुसतो ? विद्यार्थ्यांसाठी विद्यालय नसून विद्यालयासाठीच जेथे विद्यार्थी जमतात, तेथे विद्यालयांची इज्जत आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची ऐपत ह्यांमध्ये कोणताच ऐहिक संबंध नसल्यास काय नवल !

निव्वळ शिक्षणाच्या खोल दृष्टीनेच पाहू गेल्यास बंगाल्यातील अशा हायस्कुलांतील शिक्षण फार कमी दर्जाचे दिसते, हे मला कबूल केले पाहिजे.  पण एक लाखांच्या उंच इमारतीतले शिक्षण ह्या एक हजार रुपयांच्या झोपडीपेक्षा शंभरपटीने अधिक असेही खास नाही.  शिक्षणाचा उपकरणांशी संबंध नाही आणि शिक्षकांच्या दर्जाशी आणि त्यांच्यात व शिष्यांत जी सहानुभूती असणार तिच्याशी अलबत जास्त.  ही दुसरी मिळकत म्हणजे सहानुभूती मला ह्या शाळांतून विपुल दिसली.  आमच्या इकडच्या हायस्कुलाच्या राजमहालात एखादे नोकरवाडीतले पोरगे गेले तर पहिल्या दिवशी ते भेदरून जाते.  टिकून राहिलेच तर सहामाही परीक्षेच्या कोऱ्या कागदांचाही खर्च त्याला न झेपल्यामुळे त्याला हा नाद सोडावा लागतो.  हे शिष्य-शिक्षक नाते कमी सांगावे, तितके अधिक बरे.

वीस वर्षांतील ही प्रगती पाहून मला सर्व बाजूंनी समाधानच झाले, असे म्हणवत नाही.  तरी संख्येच्या व इतर दर्शनी बाजूंनी नामशूद्र ग्रॅज्युएट सामान्य बंगाली ग्रॅज्युएटसारखाच दिसतो, हे खरे.  असे शे-दोनशे तरी ग्रॅज्युएट आमच्या इकडे मराठयां आढळतात.  तसेच तिकडे नामशूद्रांत आढळतात.  पण आमच्या इकडे शिवाजी मराठा हायस्कूल हे एकच एक साऱ्या इलाख्यात मराठयांनी चालविलेले तर तिकडे चारच जिल्ह्यांत १३ हायस्कुले मला दिसली.  आमच्या ह्या हायस्कुलात सर्व शिक्षक मराठे नाहीत.  ते कधी मिळतील ते सांगवत नाही.  पण तिकडील शाळेत बहुतेक सर्व नामशूद्र !!  एकंदरीत इकडील मराठयांपेक्षा उच्च शिक्षणात तिकडील नामशूद्रांची स्थिती बरी म्हणविते आणि ही सर्व धाव गेल्या वीस वर्षांत त्यांनी मारली, हे विशेष !