भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची महाराष्ट्र परिषद -पहिला दिवस

दिवस पहिला

या परिषदेत ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर ता. ५ शनिवार रोजी फर्ग्युसन कॉलेजवर सुरुवात झाली.  सुरुवातीच्या अगोदरच परिषदेकरिता आलेल्या प्रतिनिधींनी व प्रेक्षकांनी ऍम्फिथिएटर भरून गेले होते.  येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याकरिता जनरल सेक्रेटरी रा. रा. शिंदे व परिषद-कमिटीचे सभासद तयार होते.  पाहुण्यांना ठरलेल्या जागी बसविण्याची व्यवस्था स्वयंसेवक मंडळी फार तत्परतेने व मेहनतीन करीत होती.  परिषदेतील वक्तयांना व थोर थोर पाहुण्यांना उच्चासनावर बसविण्याची व्यवस्था केली होती.  जमलेल्या थोर मंडळींत अध्यक्ष डॉ. भांडारकर, नि. सा. मंडळीचे अध्यक्ष सर चंदावरकर, डॉ. मॅनसाहेब, भावनगरचे दिवाण श्री. पट्टणीसाहेब, नामदार मौलवी रफिउद्दिन, रा.ब.सी. वि. पटवर्धन, कोल्हापूरचे श्री. जाधवराव, मुंबईच्या श्री. लक्ष्मीबाई रानडे, रा. लक्ष्मणराव नायक, रा. रा. गोपाळराव देवधर, रा.रा.बी. एस. कामत, प्रो. कर्वे, रे. रॉबर्टसन, मिसेस हारकर, तेलगू समाजाचे एक पुढारी डॉ. पोरेडा वगैरे मंडळी व अस्पृश्यांपैकी सुभेदार मेजर भाटणकर, रा. डांगळे, रा. कांबळे, रा. शिवरामजी कांबळे, रा. श्रीपतराव नांदणे, रा. नाथमहाराज वगैरे मंडळी हजर होती.  प्रारंभी मुलांचे ईशस्तवनपर गीत झाल्यावर रा. शिंदे यांचे प्रास्तविक भाषण झाले.  ते म्हणाले :

रा. शिंदे ह्यांचे भाषण

सभ्य गृहस्थहो आणि सद्भगिनींनो !

आजचा दिवस महत्त्वाचा आहे.  येथे जमलेल्या जनसमूहाकडे नुसते निरखून पाहिले तरी सहृदय माणसाला आनंद होण्यासारखा आहे.  आमच्या पुढे विश्वबंधुत्वाचे ध्येय-शिखर स्पष्ट दिसत आहे.  त्याच्या चढणीची एक महत्त्वाची पायरी आम्ही आज चढणार आहोत.  जातिभेदामुळे आमच्या देशाचे असंख्य तुकडे झाले आहेत.  याजबद्दल आम्ही पुष्कळ वेळा दुःख मानले आहे.  परंतु आज त्यापैकी बहुतेक तुकडे एकत्र आणि एकोप्याने जुळून आलेले दाखविणारा सुखाचा दिवस आम्हांला आला आहे.  याबद्दल प्रथम आपण आपल्या विश्वजनकाचे आभार मानू या.

ह्या चळवळीचा इतिहास

अस्पृश्यवर्गांच्या हीन स्थितीचा प्रश्न आज जवळजवळ दोन हजार वर्षांचा जुनाट आहे.  ह्या प्रश्नाविषयीची आधुनिक पद्धतीची जाणीव आणि ह्या वर्गा विषयी उच्च वर्गांमध्ये सहानुभूती ह्यांचा उदय व्हावयाला लागूनही आज जवळजवळ पन्नास वर्षे होत आली आहेत.  दोन-चार शतकांमागे काही उदार संतांच्या अंतःकरणामध्ये ह्यांच्याविषयी सहानुभूती उदय पावली होती, पण ती आधुनिक पद्धतीची नव्हती.  तसेच अलीकडे पन्नास वर्षांत जरी यांच्याविषयीची सहानुभूती काही व्यक्तींच्या आणि लहानसहान संस्थांच्या प्रयत्नांनी उदयास येत होती तरी तिला हल्लीचे संघटित स्वरूप आले नव्हते.

हल्लीची स्थिती

आता या पाच वर्षांत या प्रश्नाची जागृती सर्व देशभर होऊन निरनिराळया भागांमध्ये व्यवस्थित कार्य होऊ लागले आहे.  इतकेच नव्हे, तर प्रत्यक्ष अस्पृश्यवर्गांमध्येही स्वतःची जाणीव उत्पन्न होऊन त्याचे अल्पस्वल्प प्रयत्न सुरू होऊ लागले आहेत.  कोठे एखाद्याने काढलेली शाळा, कोठे एखादे बोर्डिंग, कोठे एखादा समाज किंवा एखादे लहानसे वृत्तपत्र अशी ही दहा-बारा वर्षांपूर्वीची तुटकतुटक स्थिती जाऊन आता सदरील मंडळीच्या नावाखाली पश्चिम आणि दक्षिण हिंदुस्थानातील ह्या विशिष्ट कार्याची संघटना बनत चालली आहे.  आणि ह्याच वळणावर किंबहुना डिप्रेस्ड क्लासेस मिशन हे नाव घेऊनही बंगाल आणि पंजात ह्या दूरदूरच्या प्रांतीही अगदी स्वतंत्र पण जोमाचे काम चालले आहे.

पण सर्वत्र चाललेल्या कामामध्ये सहानुभूती, सहकार्य आणि संघटना ह्यांचे अंकुर दिवसेंदिवस अधिकाधिक बळावत आहेत, ही ह्या कार्याची आशाजनक सुचिन्हे आहेत.  सर्व देशांत ह्या कार्यासंबंधी चळवळीचे एकवटलेले स्वरूप कधी दिसून येईल तेव्हा येवो; तूर्त यांच्यामध्ये विरोध नसून मोठमोठया भागांमध्ये ह्यांची घटना बळावत चाललेली आहे,  ही देखील मोठी समाधानाची गोष्ट आहे.

भा. नि. सा. मंडळीचा इतिहास

ज्या मंडळीच्या आश्रयाखाली आजची ही परिषद भरत आहे ती मंडळी १९०६ ऑक्टोबर तारीख १८ रोजी स्थापित झाली; म्हणजे आणखी तो दिवसांनी तिचे सहावे वर्ष संपेल.  पहिल्या दोन वर्षांत मंडळीच्या मुंबई आणि पुणे येथे शाखा सुरू झाल्या.  दुसऱ्या दोन वर्षांमध्ये मुंबई इलाख्यात निरनिराळया दहा ठिकाणी आणि मद्रास इलाख्यात दोन ठिकाणी शाखा उघडण्यात आल्या.  शिवाय तिसऱ्या व चौथ्या वर्षी निरनिराळया वीस मुख्य मुख्य शहरी मंडळीच्या वाढदिवसानिमित्त अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसंबंधी सभा झाल्या.  या प्रकारे या नवीन प्रश्नासंबंधी चोहोकडे जोराची चळवळ ह्या चार वर्षांत चालू राहिल्यावर तिला दृढता आणण्यासाठी पाचव्या वर्षी मंडळीचे प्रचारक ह्या इलाख्याच्या निरनिराळया भागांतून संचार करून आले.  त्यामुळे पूर्वेकडे वऱ्हाड, उत्तरेकडे गुजराथ, पश्चिमेकडे कोकण व दक्षिणेकडे कर्नाटक ह्या चारी भागांतील शाखांना किंचित दृढता आली.  सहाव्या वर्षाच्या आरंभी कर्नाटकामध्ये मंडळीच्या एका कायमच्या प्रतिनिधीची स्थापना होऊन बेळगाव, धारवाड व विजापूर ह्या तीन जिल्ह्यांसाठी मंडळीच्या प्रत्यक्ष सत्तेखाली एक शाखा सुरू झाली.  येथपर्यंत झालेल्या प्रयत्नांचे आजची परिषद हे फळ आहे.  प्रथम मुंबईसारख्या ठिकाणी संस्थापना, नंतर निरनिराळया मुख्य शहरी सहानुभूतीचा उद्भव, ह्यानंतर मंडळीच्या प्रचारकांचा संचार ह्या प्रकारे या कार्याच्या तीन अवस्था झाल्यानंतर त्याला ओघानेच जी चौथी अवस्था आज प्राप्त झाली आहे, ती ही की, ह्या प्रांतांतील निरनिराळया ठिकाणांहून अस्पृश्यवर्गाचे लोक आणि त्यांचे हितचिंतक या सर्वांनी मिळून या प्रांताची खरी राजधानी जे पुणे शहर ह्या ठिकाणी एकत्र जमावे.

भा. नि. सा. मंडळीचा हल्लीचा विस्तार व तिच्या कार्याचे क्षेत्र याची माहिती खाली आहे :

कार्याचे क्षेत्र (तक्ता क्रं. १ पहा)

तक्ता क्र. १ .

सध्या एकंदर १४ ठिकाणी २३ शाळा, ५५ शिक्षक, ११०० मुले, ५ वसतिगृहे, इतर १२ संस्था व ५ प्रचारक असून खर्च एकंदर २४,४८५ रुपये आहे. संस्थेच्या कमाचा विस्तार खाली दिलेल्या कोष्टकात दिसून येईल. (तक्ता क्रं. २ पहा)

तक्ता क्र. २

परिषदेची आवश्यकता

वरील विस्ताराचे निरीक्षण केल्यावर असे दिसून येईल की, निरनिराळया चार भाषा चालू असलेल्या सात प्रांतांमध्ये मंडळीला आपले प्रयत्न करावयाचे आहेत, आणि म्हणून तिला हल्ली भरलेल्या परिषदेसारख्या निरनिराळया ठिकाणी प्रांतिक परिषदा भरविण्याची अगदी जरुरी आहे.  अशा परिषदेशिवाय मंडळीला आपल्या कार्याचा विस्तार आणि दृढीकरण करण्याचा दुसरा मार्ग नाही.

परिषदेचे स्वरूप

या परिषदेचे विशेष सवरूपही ध्यानात घेण्यासारखे आहे.  आजकाल आमच्या देशात विवक्षित जातीच्या अनेक परिषदा भरत आहेत.  त्या बऱ्या आहेत किंवा वाईट आहेत याची चर्चा करण्याचे हे स्थळ नव्हे.  पण त्या सर्व परिषदांहून ही परिषद अगदी भिन्न स्वरूपाची आहे.  त्या परिषदांचे कारण जाती व ह्याही परिषदेचे कारण जाती हेच होय.  पण त्या परिषदांचे कार्य एकेक जाती निरनिराळया बसूनच व्हावयाचे असून हिचे कार्य सर्व जातींनी एकत्र बसल्याशिवाय साधण्यासारखे नाही. पण यावरून हिचा हेतू हिंदुस्थानातील ज्ञातिभेद मोडून टाकून नुसता सबगोलंकारच करावयाचा आहे, असेही नाही.  जातिभेद राहो वा जावो, सर्व ज्ञातींनी मिळून आपल्या सहानुभूतीच्या जोराने ह्या दीन जातींना वर ओढल्याखेरीज प्रस्तुत कार्यभाग साध्य होणार नाही.  ह्या दृष्टीने पाहता ही परिषद इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी भरलेल्या सर्वजातीय परिषदेची एक लहानशी प्रतिमाच आहे असे म्हटले तरी चालेल.

परिषदेचे कार्य

ह्या परिषदेला जितक्या निरनिराळया दिशांनी आणि निरनिराळया प्रमाणांनी सहानुभूतीची आणि सहकार्याची जोड मिळेल तितकी थोडीच आहे.  हे परिषदेपुढे आलेल्या विषयांचे व परिषदेला आलेल्या वक्तयांचे अवलोकन केले असता उघड दिसून येणार आहे.  अस्पृश्यवर्गाचे कल्याण व्हावे; हा ह्या सर्व वक्तयंचा मनःपूर्वक सामान्य हेतू आहे, परंतु त्यांची विचाराची दृष्टी, सहानुभूतीचे प्रमाण आणि कार्याची पद्धती ही परस्परांहून अगदी भिन्न आहेत.  असे असूनही ज्या अर्थी ते एकत्र आले आहेत त्या अर्थी कल्याणचिंतनाचा त्यांचा सर्वसामान्य हेतू खरा आणि बळकट आहे, हे उघड आहे.

सहानुभूतीचा आणि सहकार्याचा हाच क्रम कायम ठेवून त्यांच्या मार्गातील अडथळे हळूहळू काढून टाकून त्यांना अमर्याद केल्याशिवाय ह्या फार दिवस मागे पडलेल्या महत्कार्याला खरे यश येणार नाही. सरकार आणि संस्थानिक, म्युनिसिपालिटया आणि परोपकारी संस्था, सर्व जाती आणि सर्व धर्म - एकूण ह्या प्रचंड देशातील सर्व शुभशक्ती ह्यांचे केंद्र ह्या कार्यात जितक्या अंशाने जास्त साधेल, तितक्या अंशाने अधिक यश येईल, हे ध्यानात वागवून आजच्या परिषदेचे सर्व सभासद शांतपणे व सात्त्वि वृत्तीचे विचार करतील, अशी उमेद आहे. रा. शिंदे यांचे वरील भाषण झाल्यानंतर स्वागत कमिटीचे अध्यक्ष डॉ. मॅनसाहेब यांनी योग्य शब्दांनी डॉ. सर भांडारकर यांची श्रोतृजनांना माहिती करून देऊन त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी सूचना केली व तिला रा. रखमाजीराव कांबळे व रा. पांडुरंगराव डांगळे यांचे अनुमोदन व पुष्टी मिळाल्यावर ते स्थानापन्न झाले.  नंतर त्यांनी भाषणास सुरुवात केली.  ते म्हणाले :

अध्यक्ष सर रामकृष्णपंत भांडारकर ह्यांचे भाषण

प्राचीनकाळी वैदिक भाषा बोलणारे आर्य जेव्हा भरतखंडांत प्रविष्ट झाले, तेव्हा त्या राष्ट्रांत मूळचे अनेक जातींचे लोक राहत असत.  त्यांचा आणि आर्यांचा संबंध बहुतकरून विरोधाचाच असे. ठिकठिकाणी युध्दे होऊन आर्यांनी त्यांच्या गावांत आपली वस्ती केली.  त्या सर्व मूळच्या लोकांसस 'दस्यू' किंवा 'दास' ही संज्ञा आर्यांनी दिली होती.  काही काळाने या दस्यूंपैकी काही लोक आर्यसमाजात जाऊन मिळाले, परंतु त्यांचा एक स्वतंत्र वर्ग करण्यात आला.  आर्यांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य असे तीन वर्ग होते, आणि हा जो नवीन चवथा वर्ग त्यांस मिळाला त्यांस 'शूद्र' अशी संज्ञा प्राप्त झाली.  'शूद्र' ह्याची व्युत्पत्ती काय याचा निर्णय करणे कठीण आहे; परंतु मूळ रहिवाशांमधील जी जात आर्यांस मिळाली तिचे नाम शूद्र असे असावे; आणि नंतर काही काळाने जसजसा आर्यांचा प्रसार पूर्वेस व दक्षिणेस होऊ लागला, तेव्हा त्या ठिकाणी जे मूळचे नवीन लोक त्यांना आढळले त्यांसही, शूद्र या संज्ञेचा उत्तरोत्तर व्यापक अर्थ करून, ती संज्ञा ते देते झाले.  प्रथमतः जी मूळ रहिवाशांची जात त्यांत मिळाली.  त्या जातीचे आर्यांची संस्कृत भाषा घेतली.  परंतु संस्कृत उच्चार यथायोग्य करण्याचा अभ्यास त्यांच्या जिव्हेस नसल्यामुळे संस्कृत शब्दांचा अपभ्रंश होऊन पाली भाषा सिद्ध झाली, आणि हा संयुक्त समाज भरतखंडाच्या दुसऱ्या भागात पसरला; तेव्हा त्या अपभ्रष्ट भाषेत आणखी काही अपभ्रंश होऊन शौरसेनी, मागधी, महाराष्ट्री अशा नवीन भाषा सिद्ध झाल्या.  ह्या दुसऱ्या भागांतही ज्या लोकांचा उद्योग निंद्य प्रकारचा नव्हता, त्यांचा समावेश पूर्वीच्या शूद्रात होऊन त्यांची सामाजिक स्थिती काही नीच प्रकारची झाली नाही.  परंतु त्यांचा उद्योग नीच प्रकारचा होता, त्यांची स्थितीही नीच अशा प्रकारची झाली.  अशा नीच जातींची नावे चांडाल, पुक्कस अथवा पुल्कस, निषाद, वेण, वेळुकार, श्वपच, क्षत्तृ, उग्र, धिग्वण, मद्गु इत्यादी होती.  निषादांचा धंदा मासे मारणे हा होता; मद्गु व दुसऱ्या काही जातींचा उद्योग पारध करून अरण्यातील श्वापदे मारणे हा होता; पुक्कस वगैरेंचा धंदा बिळांत रहाणाऱ्या प्राण्यांचा वध करणे हा असे; धिग्वण म्हणून जात होती तिचा धंदा चर्मकार्य; दुसऱ्या कित्येकांचा उद्योग राजाच्या आज्ञेवरून वध्य जे त्यांचा वध करावा आणि ज्यांचा वध झाला त्यांची वस्त्रे, त्यांची शय्या आणि त्यांचे अलंकार ही त्याने घ्यावी हा होता; आणि ज्यांना कोणी संबंध नाही अशांचे प्रेत गावाबाहेर नेणे हाही काही जातींचा धंदा होता; गावामध्ये किंवा शहरामध्ये मेलेल्या कोणत्या तरी जातीच्या प्राण्याचे शरीर गावाबाहेर टाकण्याचे कामही कित्येकांचे असे.  (मनु, अध्याय १०, श्लोक ४७-५६.) चांडाल, श्वपच इत्यादी जातींनी शहर किंवा गावाबाहेर वस्ती करावी; त्यांचे धन म्हणजे कुत्रे आणि गाढवे; दुसऱ्या उच्च जातींच्या पात्रांमध्ये त्यांनी भोजन करू नये; शवावरील वस्त्रे त्यांनी वापरावी; त्यांचे अलंकार नेहमी लोखंडाचे असावे; इतर जातींचा त्यांच्याशी संबंध नसावा; उच्च जातीच्या मनुष्यांनी त्यांना प्रत्यक्ष अन्न देऊ नये, परंतु आपले चाकरनोकर असतील त्यांच्याद्वारा ते द्यावे.  चांडालांनी ब्राह्मण जेवीत असता त्यांच्याकडे आपली दृष्टी लावू नये.  (मनु, अध्याय ३, श्लोक २३९)  दीर्घ आयुष्य ज्यांना पाहिजे आहे, त्यांनी चांडालांच्या किंवा पुल्कसांच्या बरोबर बसू नये.  (मनु, अध्याय ४, श्लोक ७९) चांडालाचा किंवा मृतहाराचा स्पर्श झाला असताना स्नान करून शुद्ध व्हावे.  (माडेय पुराण, अध्याय ५६, श्लोक ३७) ह्या माडेय पुराणामध्ये मृतहार किंवा मृतहारिन् ह्या नावाची एक जात सांगितली आहे.  मृतहार ह्यांचा अपभ्रंश 'म-अहार' असा आहे, आणि त्यांचेच पुढे 'महार' असे रूप झाले.  तेव्हा शहरातील किंवा गावातील मेलेल्या प्राण्यांची मढी बाहेर टाकावी हा महारांचा मुख्य उद्योग होता असे दिसते. ह्यावरून असे स्पष्ट होते की, ह्या ज्या अत्यंत नीच जाती त्यांना मढी टाकणे, वध्य मनुष्याचा वध करणे, स्मशानाच्या ठायी राहणे आणि प्रेतांची वस्त्रे घेणे इत्यादिक धंद्यांवरून नीचता प्राप्त झाली, परंतु जेव्हा कालेकरून अशा प्रकारच्या एखाद्या जातीची वृध्दी होते तेव्हा हे धंदे त्यांस पुरत नाहीत असे होते, तेव्हा काही तरी दुसरा धंदा त्यास करावा लागतोच.  परंतु त्यांची नीचता ही या कामी त्यांस बाधक होते, तथापि या नीच जातींनी उत्तरोत्तर दुसरेही धंदे मिळविले हे सिद्ध आहे.  आमच्याच महाराष्ट्र राज्यामध्ये हे पूर्वी मृतहार जरी होते तथापि काही कालेंकरून खेडयातील वसूल ग्रामांतरी सरकार-खजिन्यामध्ये जाऊन भरावा हा उद्योग त्यांस प्राप्त झाला आणि केवळ पुष्कळ द्रव्य अशा प्रकारे एकटेच महार खजिन्यात पोचवीत असत.  गावात एखादा पाहुणा आला तर त्याची व्यवस्था करणे हे महारांचे काम समजले जाते, आणि त्याप्रमाणे वहिवाट अजून आहे; आणि अशा प्रकारची कामे महारांच्या स्वाधीन केली होती म्हणूनच काही जमिनी महारांस लावून दिल्या आहेत.  त्यांस 'महारकीच्या जमिनी' म्हणतात आणि इतर शेतांच्या संबंधाने जे बलुते आहेत त्यांपैकी मुख्य बलुते महार आहेत.  तेव्हा आमच्या महाराष्ट्रात तरी या जातीस जनसमाजामध्ये नियत स्थान प्राप्त झाले आहे.