बहिष्कृत भारत

ह्या पृथ्वीवर सर्व मनुष्यजातीच्या इतिहासात जरी कोठे कधी कोणावर प्रचंड बहिष्कार घालण्यात आला असेल आणि जो पुरातन काळापासून चालत येऊन आज पूर्ण दशेला पोहचला असेल, तर तो ह्या भरतखंडातील नीच मानिलेल्या जातीवरचा भयंकर बहिष्कारच होय !  भारतवासियांनो, स्वार्थाला, मानवजातीला आणि ईश्वराला स्मरून हा घातकी, पाती आत्मबहिष्कार नाहीसा करा.


मायो

सुमारे* एक हजार वर्षांपूर्वी गुजराथ देशाची पाटण नामे राजधानी होती.  तेथे इ.स. १०९४-११४३ पर्यंत सिध्दराजा नावाचा राजा राज्य करीत होता.  त्याने एकदा सहस्त्रलिंग नावाचा एक मोठा तलाव बांधण्यास सुरुवात केली.  पण काही केल्या तलावात पाणी म्हणून ठरेना.  तेव्हा धर्माचार्याच्या सूचनेवरून राजाने कोणा तरी एकास बळी देण्याचे ठरविले.  देवो दुर्बल घातक ...., बली देण्याकरिता मायो नावाच्या एका धेडास आणून उभे करण्यात आले.  शिरच्छेद करतेवेळी ''शेवटची काय मागणी असेल ती माग !''  अशी आज्ञा होताच मायो गहिवरून म्हणाला, ''महाराज, माझा हा नीच देह सार्वजनिक हिताकडे लागणार ह्याबद्दल मला आनंदच होत आहे.  माझ्या तिरस्कृत जातिबांधवांवर आपण एवढीच कृपा करावी की, आजपर्यंत त्यांना शहरापासून दूर अंतरावर जंगलात राहावे लागत आहे आणि त्यांच्या नीचपणाची खूण म्हणून त्यांना निराळाच पोशाख करावा लागत आहे.  तसे ह्यापुढे होऊ नये, त्यांना शहराजवळ राहण्याची परवानगी असावी.''

----------------------------------------------------------
* मासिक मनोरंजन, १९०८
* मुंबई गझेटियर, काठेवाड, पुस्तक ८, पान १५७ मा.म.२१.
-----------------------------------------------------------

सिध्दराजाने ही विनंती मान्य केली आणि मायोने आनंदाने प्राण सोडला.

वाचकहो, ही साडेसातशे वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट वाचून आपल्याला आज काय सुचते ?  आपल्या ह्या चमत्कारिक देशात जातिभेदरूपी सहस्त्रलिंग म्हणजे दुहीच्या हजारो खुणा किंवा लहरी दाखविणारा जबरदस्त तलाव आहे.  आज हजारो वर्षे ह्यातले पाणी स्थिर आहे, पण ह्याच्या तळाशी गाळामध्ये मायोचे असंख्य, नीच मानिलेले जातिबांधव जिवंत आणि वंशपरंपरेने रुतले आहेत.  मायोच्या स्वार्थत्यागाने किंवा सिध्दराजाच्या मेहेरबानगीने ह्या जाती जरी नगराजवळ राहू लागल्या आहेत, तरी नगरवासी होण्यास, अर्थात सुधारलेल्या जगात राहण्यास त्यांना अद्यापि ह्या विसाव्या शतकातही परवानगी मिळालेली नाही.  ह्यांना अद्यापि अस्पृश्यच ठेवण्यात आले आहे.


अंत्यज हे कोण आहेत ?

महार, मांग, धेड, पारिया, नामशूद्र इत्यादी ज्या अगदी नीच मानिलेल्या जाती सर्व हिंदुस्थान देशभर आढळतात, त्यांना ओळखण्याकरिता अद्यापि चांगलेसे एक सर्वसाधारण नाव प्रचारात आलेले नाही, आणि तसे एखादे नवीन नाव कल्पून प्रचारात आणणे हेही काही सोपे नाही.  मुंबई शहरात म्युयनिसिपालिटीच्या ह्या लोकांकरिता ज्या स्वतंत्र शाळा आहेत, त्यांना 'निराश्रित शाळा' असे नाव देण्यात आले आहे.  त्याला अनुसरून ह्या शहरात 'प्रार्थना समाजा'च्या लोकांनी ह्या लोकांच्या साहाय्याकरिता जे एक मिशन काढिले आहे, त्याच्या शाळेलाही 'निराश्रित शाळा' असे म्हटले आहे, परंतु खरे म्हटले असता निराश्रित हे नाव ह्या मंडळीस अगदी अन्वर्थक आहे असे नाही.  Depressed Classes ह्याचे मराठीत शोभेलसे रूपांतर होण्यासारखे नाही.  ह्या सर्व वर्गांचे एक मुख्य आणि साधारण लक्षण अथवा खूण म्हटली म्हणजे 'अस्पृश्यता' ही होय.  ह्यांना शिवून घेण्यात येत नाही.  म्हणून ह्यांना अस्पृश्य ह्या नावाने ओळखावे, तर तो शब्दही चांगलासा प्रचारात नाही व तितका साधा आणि सोपाही नाही.  पंचम हे अलीकडे मद्रास इलाख्यात ह्या वर्गाला नवीन नाव देण्यात आले आहे, आणि ते यथार्थ असून त्यात कोणत्याही प्रकारचा तिरस्कार ध्वनित होत नाही.  पण ते नाव ह्या प्रांती प्रचारात नाही.  अंत्यज हा शब्द मात्र बराच व्यवहारातला आहे.  पण हे लोक खरोखरच सर्वांच्या शेवटी जन्मले, अशातला मुळीच प्रकार नव्हे.  म्हणून हे नाव त्यांच्यापैकी पुष्कळांना आवडण्यासारखे नाही.  तथापि वरील सर्व अडचणींचा विचार करिता एकंदरीत तूर्त लेखनव्यवहाराच्या सोईसाठी अंत्यज हेच नाव नाइलाजाने पसंत करावे लागत आहे, आणि अंत्यज म्हणजे त्यांचा दर्जा हिंदू समाजात अगदी खालच्या प्रतीचा अथवा शेवटचा समजला जात आहे असे लोक, एवढाच अर्थ प्रस्तुत विषयासंबंधी ह्या नावाचा घेतला आहे.


व्याप्ती

आता प्रथम ह्या अफाट हिंदुस्थानातील अनेक धर्मांच्या, असख्ंय जातींच्या जनसमूहामध्ये ह्या अंत्यज वर्गांची व्याप्ती किती आहे, व अंत्यज ह्या सदराखाली कोणकोणत्या जाती येण्यासारख्या आहेत व त्या कोणत्या कारणांनी येतात, ह्याचा विचार करू.  एकंदर हिंदी जनसमूहाकडे पाहिले असता त्याच्यामध्ये इतका विचित्रपणा व विस्कळीतपणा दिसून येतो की, कोणत्याही दृष्टीने एका विवक्षित कारणासाठी ह्या जनसमूहाचे नीटसे वर्गीकरण करू म्हटले असता जवळजवळ अशक्यच वाटते.  तथापि, आपण हल्ली प्रचारात असलेले सर्व जातिभेद व वर्गभेद घटकाभर बाजूस ठेवून केवळ विद्या, आचार, विचार व गृहस्थिती इत्यादी मिळून एकंदरीत सामाजिक दर्जाच्या दृष्टीने पाहता ह्या अफाट जनसमूहाचे ठोकळमानाने पाच वर्ग करता येण्यासारखे आहेत.

१ ला. वरिष्ठ वर्ग  :  त्यात मोठमोठे अधिकारी, सरदार, मानकरी, मोठमोठे व्यापारी वगैरे बडया लोकांचा समावेश होतो.

२ रा. मध्यम वर्ग  :  ह्यात साधारण नोकऱ्या करणारे, कलाकौशल्याची काम करून उदरनिर्वाह करणारे, लहान-लहान दुकानदार व आपल्या मालकीची शेती करणारे वगैरे पांढरपेशांचा समावेश होतो.

३. रा. कनिष्ठ वर्ग  :  आपल्या पोटासाठी केवळ काबाडकष्ट करणारे, उदाहरणार्थ न्हावी, धोबी, साळी, माळी, स्वयंपाकी, पाणक्ये, शागीर्द, कुणबी इत्यादिकांचा ह्या वर्गात समावेश होतो.

वर सांगितलेल्या तिन्ही वर्गांचा हिंदी समाजात समावेश होतो.  लग्नकार्य झाले तर ब्राह्मण सरदार आणि युरोपियन अधिकाऱ्यांपासून तो अगदी कनिष्ठ नोकरांपर्यंत सर्व एकाच दिवाणखान्यात जमू शकतात.  एखादी सभा अगर व्याख्यान झाले तर वरील तिन्ही वर्गांपैकी कोणीही सारख्याच हक्काने येऊ शकतो व त्यांना कोणीही मनाई करू शकत नाही.  रोटीबेटीव्यवहाराचा भाग मात्र निराळा.  त्या दृष्टीने पाहता हिंदी समाजातच काय, पण हिंदुसमाजात व त्यातल्यात्यात कोणत्याही एका नाव घेण्यासारख्या मुख्य जातीतदेखील एकोपा नाही.  पण सार्वजनिक किंवा एखाद्या विशेष खासगी प्रसंगी एकत्र बसणे, उठणे हा जो साधारण सार्वजनिक व्यवहार आहे, त्यात वरील तिन्ही वर्गांचा सारखाच समावेश होतो. इतकेच नव्हे, तर अगदी कनिष्ठ वर्गातला एखादा न्हावी, धोबी जर आपल्या अंगच्या करामतीने आपली विद्याचारसंपन्नता वाढवील, तर त्याला सभेसारख्या सार्वजनिक ठिकाणीच नव्हे, तर लग्नकार्यासारख्या घरगुती प्रसंगीही मानपान देण्यास हल्ली जुन्या चालीचादेखील कोणी गृहस्थ कचरत नाही.  उलट, जर कोणी वरच्या वर्गातल्या मनुष्याने आपल्या बेअकलीपणाने आपली सर्व विद्याचारसंपन्नता घालविली, तर तो वरील मानपानास खास मुकतो; पण तोसुध्दा एकत्र बसण्या-उठण्याच्या सामाजिक हक्काला मुकत नाही.

४ था.  हीन वर्ग :  ह्यात महार, मांग, पारिया, शिक्लिया, नामशूद्र, डोंब, धेड, मेहतर, मिरासी, इत्यादी अनेक नीच मानिलेल्या जातीचा समावेश होतो.  हा वर्ग हिंदी समाजाला लागून पण समाजात नाही असा आहे.  समाज ह्यांजवर काही बाबतीत अवलंबून आहे व ह्या वर्गाची उपजीविकाही समाजावरच चालते.  हा वर्ग हिंदी साम्राज्याची कर देणारी रयत आहे.  हिंदी राष्ट्राचा योगक्षेम चालवीत आलेला हा घटक आहे; पण असे असून हिंदी समाजात वरील तीन वर्गांप्रमाणे ह्याचा मुळीच समावेश होत नाही.  हा वर्ग हीन आहे म्हणून समाजबाह्य आहे.  किंवा समाजबाह्य आहे म्हणून हीन आहे, ह्याचा विचार पुढे करू.  पण सध्या वस्तुस्थिती एवढीच ध्यानात घ्यावयाची आहे की, राष्ट्राचा हा एक घटक असून समाजबाह्य आहे.

५ वा. अलग वर्ग  :  ब्रिटिश राज्य व एतद्देशीय संस्थाने ह्यांच्या सरहद्दीवर डोंगरांतून व जंगालांतून राहणारे कोंग, शिकलगार, चिगलीबगली, भिल्ल, खोंड, संताळ वगैरे अर्धवट रानटी जातीचां ह्यात समावेश होतो.  हिंदी राष्ट्राशीच मुळी ह्या वर्गाचा अद्यापि संबंध जडला नाही.  हे वर्ग सरकारची रयत नाहीत.  आपल्या पंचायती ते स्वतःच करितात.  शिकारीवर पोट भरले नाही तर परकीयाप्रमाणे आपल्याजवळचा काही ओबडधोबड माल गावखेडयांतून विकून परत जंगलांत शिरतात व तेथे परस्परांशी व सर्व हिंदी समाजाशी अगदी तुटून राहतात.

वर जे स्थूलमानाने आपण पाच वर्ग केले, त्यांत ह्या विशाल भरतखंडातील हल्ली राहत असलेल्या सर्व मनुष्यप्राण्यांचा समावेश होत आहे.  प्रस्तुत विषयाच्या दृष्टीने पाहता ह्या पाच वर्गांचे तीन मुख्य भेद होतात.  ते असे :

पहिले तीन म्हणजे वरिष्ठ, मध्यम, कनिष्ठ हे वर्ग हिंदी साम्राज्यांतर्गत असून समाजांतर्गतही आहेत, म्हणून ते तिन्ही मिळून एक मुख्य भेद समजण्यास काही हरकत नाही.  चवथा जो हीन वर्ग, तो हिंदी साम्राज्यांतर्गत आहे.  तथापि समाजबाह्य आहे म्हणून तो निराळा दुसरा मुख्य भेद समजला पाहिजे.  पाचवा जो अलग वर्ग तो साम्राज्यबाह्य आणि समाजबाह्य आहे म्हणून तो तिसरा मुख्य भेद होय.

आता मधला मुख्य भेद जो साम्राज्यांतर्गत असून समाजबाह्य आहे, त्यालाच आपण प्रस्तुत लेखाच्या केवळ सोयीसाठी प्रचारात असलेले अंत्यज हे नाव दिले आहे.  ह्याच वर्गाच्या अवनत स्थितीसंबंधी आमचा आजचा लेख आहे.  ह्या गरीब जाती खरोखरच अंत्यज आहेत असे आम्हांला मुळीच वाटत नाही, इतकेच नव्हे, तर ह्या अमंगल आणि अन्यायमूलक नावाचा प्रचार होता होईल तो लवकर बंद व्हावा अशी आमची इच्छा आहे.  म्हणूनच ह्या निबंधाच्या मथळयात ह्या नावाचा प्रवेश होऊ न देण्याची आम्ही काळजी घेतली आहे.


मूळ

आपल्या देशात महार, मांग, चांभार, पारिया इत्यादी ज्या अनेक नीच मानिलेल्या जाती आहेत, त्यांची बरोबर मूळपीठिका शोधून काढण्यास येथे अवकाश नाही, आणि प्रस्तुत तशी जरुरीही नाही.  ह्यासंबंधी प्राचीन शास्त्रांत आणि हल्ली पाहण्यात व ऐकण्यात येणाऱ्या काही थोडया ढोबळ गोष्टींचा निर्देश केला म्हणजे पुरे आहे.  आमच्या आद्य श्रुतीमध्ये व त्यानंतरच्या भगवद्गीतेमध्ये चारच वर्ण सांगितले आहेत.  मध्यंतरीच्या स्मृतीमध्ये मनूने १० व्या अध्यायात स्पष्ट म्हटले आहे :

ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यस्त्रयो वर्णा द्विजातयः ।
चतुर्थ एकजातिस्तु शूद्रो नास्ति तु पंचमः ॥४॥

अर्थ :  ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीन वर्ण दोनदा जन्मतात, म्हणजे एकदा सृष्टिक्रमाने व मागून उपनयनसंस्काराने.  शूद्र सृष्टिक्रमाप्रमाणे एकदाच जन्मतो, ह्या चारीपेक्षा पाचवा असा वर्णच नाही.

म्हणजे चंडाल म्हणून जो वर्ग आहे, तो वरील चार जातींचीच कशीतरी भेसळ होऊन झाला आहे, हे त्याच अध्यायातील पुढील श्लोकावरून उघड होते.

शूद्रादायोगवः क्षत्ता चंडालश्चाधमो नृणाम् ।
वैश्यराजन्यविप्रासु जायन्ते वर्णसंकराः ॥१२॥

अर्थ :  शूद्र पुरुष आणि त्याच्यावरील वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण जातींतील स्त्री ह्यांच्यामध्ये प्रतिलोम म्हणजे उलटया शरीरसंबंधामुळे जी प्रजा होते तिला अनुक्रम अयोगव, क्षत्ता आणि चंडाल अशी नावे आहेत, त्यात शूद्र आणि ब्राह्मणी ह्यांची संतती जी चांडाल; तिला अत्यंत नीच मानून अस्पृश्य ठेवण्यात आले आहे.

मनूने वर्णसंकराचा जो निषेध केला आहे, तो प्रतिलोमाचाच म्हणजे खालच्या जातीचा पुरुष आणि वरच्या जातीची स्त्री ह्यांच्या संबंधाचाच केला आहे.  ह्याच्या उलट जो अनुलोमसंकर त्याचा निषेध केला नाही.  स्मृतीत स्पष्ट म्हटले आहे :

शूद्रायां ब्राह्मणाज्जातः श्रेयसा चेत्प्रजायते ।
आश्रेयान्श्रेयसी जातिं गच्छत्यासप्तमादयुगात ॥
शूद्रो बा्रह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम ।
क्षत्रियाज्जातमेव तु विद्याद्वेश्यात्तथैव च ॥६५॥

अर्थ :  शूद्र कन्येला ब्राह्मणापासून कन्या झाली, त्या कन्येला पुनः ब्राह्मणापासून कन्या झाली आणि अशा सात पिढया झाल्यावर जी संतती होईल, ती अगदी ब्राह्मणच उपजली असे होय.  ह्याप्रमाणे शूद्राचा ब्राह्मण व ब्राह्मणाचा शूद्र बनतो.

ह्यातील तत्त्व असे मानिले गेले आहे की, स्त्रीपेक्षा पुरुषाचे अर्थात क्षेत्रापेखा बीजाचे सामर्थ्य श्रेष्ठ, म्हणून प्रतिलोमापेक्षा अनुलोम संकर श्रेष्ठ आणि प्रतिलोमातही शेवटी शूद्र आणि ब्राह्मणी ह्यांच्यांतील संकर तर अत्यंत अधम होय.  तो करणे गुन्हा समजून त्याला अस्पृश्यत्वाची शिक्षा दिली आहे.


गुन्हा आणि कडेलोटाची शिक्षा

असो.  हा गुन्ह्याचा विचार एकीकडे ठेवला तर वस्तुतः पाहता शुद्र पुरुष व ब्राह्मणकन्या ह्यांची संतती केवळ शूद्र संततीपेक्षा अधिक श्रेष्ठ असली पाहिजे.  मात्र येथे ब्राह्मण, शूद्र इत्यादी जातींचा दर्जा ठरवावयाचा तो केवळ गुणधर्माप्रमाणेच ठरविला पाहिजे.  ह्या दृष्टीने पाहता, आज अंत्यज मानिलेले सर्व लोक वर सांगितल्याप्रमाणे जर खरोखरच शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्रिया यांच्या संबंधापासून उत्पन्न झालेले असते आणि त्यांना आजपर्यंत असली जबर शिक्षा भोगावी लागली नसती, तर त्यांची स्थिती आजच्या केवळ शूद्रांपेक्षा खात्रीने उच्च दिसू आली असती.

मद्रासेकडील कर्नल आलकाटच्या पारिया शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेतील इतरांच्या मानाने दिसून येणारी प्रगती आणि वऱ्हाड व मध्यप्रांतातील रेल्वेची कंत्राटे वगैरे घेऊन, पुढे सरसावलेल्या काही महार मंडळीची अलीकडे झालेली सुस्थिती, ह्या गोष्टी लक्षात घेता असे दिसून येते की, ह्या तिरस्कृत वर्गांना योग्य रीतीने थोडीशी सवलत किंवा मदत मिळाली असता त्यांच्या अंगी बराच काळ दबून गेलेले चांगले गुण लवकर विकास पावू लागतात, पण तसा सुयोग फारच विरळा.  एकंदरीत ह्या विस्तीर्ण देशातील ह्या हतभागी लोकांची अवाढव्य संख्या लक्षात घेतली असता, ह्यांची स्थिती सर्व बाजूंनी केवळ शूद्रांपेक्षा अत्यंत हीन झाली आहे, हे उघड होते.

ह्यावरून दोन प्रकारची अनुमाने निघतात.  एक असे की, सांप्रत अस्पृश्य असलेल्या लोकांच्या सर्वच पूर्वजांनी काही वरील प्रतिलोमसंकराचा गुन्हा केलेला नसावा.  ह्यांच्यांतील बरेच लोक - विशेषतः दक्षिणेकडील जाती - केवळ एतद्देशीय अर्धवट रानटी अनार्य लोक असावे आणि त्यांचा वरील कोणत्याही श्रेष्ठ वर्णाशी कसलाही शरीरसंबंध झालेला नसावा आणि ज्या अर्थी भिल्ल, गोंड, वडारी इत्यादी जाती अद्यापि जरी रानटी स्थितीत असूनही त्यांच्या अस्पृश्य समजण्यात येत नाही, त्या अर्थी, ह्यांच्यांतील पुष्कळांना ही धर्मशास्त्राची शिक्षा लागू पडत नसावी.  दुसरे अनुमान असे की, ज्यांच्या पूर्वजांनी हा गुन्हा केला असेल, त्यांना आजपर्यंत झालेली ही अस्पृश्यत्वाची शिक्षा वाजवीपेक्षा अत्यंत कठोर झाली आहे.  त्यांची स्थिती केवळ शूद्रांच्यापेखा स्वभावतः बरी असावी, ती तशी नसून उलट इतकी हीन झाल्यामुळे नुसते त्यांचेच नव्हे तर राष्ट्राचेही जबर नुकसान झाले आहे.


शिक्षेचा सूड

आर्य-अनार्यांचा विरोध उत्तर हिंदुस्थानापेक्षा दक्षिणेतच जास्त दिसून येतो.  त्यात कर्नाटकाच्या खाली दक्षिणेस जसजसे जावे, तसतसे तर हा स्पृश्यास्पृश्यविधी अधिक तीव्र होत जातो.  रंग, चेहरा, चालीरीती वगैरेवरून पाहता कर्नाटकातील व्हलिया (महार), मादिग (मांग), इत्यादी त्या जाती आहेत; त्यांचा वरच्या जातींशी फारच कमी संकर झालेला असावा असे दिसते.  हे आपल्याला मूळचे एतद्देशीय समजतात.  ह्यांना जंबू असेही नाव आहे.  ह्यांचा मूळ पुरुष जंबू नावाचा होता.  पूर्वी पृथ्वीचा हा भाग दलदलीचा आणि डळमळीत होतो.  तो*  जंबूने आपल्या मुलास जिवंत पुरून स्थिर केला अशी ह्या लोकांमध्ये दंतकथा आहे.  ह्या दंतकथेत जरी विशेष तथ्य नसले तरी आर्य लोकांनी ह्यांच्यापासून जमीन हिसकावून घेऊन तिला पुढे जंबुद्वीप हे नाव दिले असावे, हे काही अंशी संभवते.  ह्या लोकांचा आर्यांच्या तीन वर्णांशी जरी फार क्वचितच संकर झालेला दिसतो, तरी जेव्हा जेव्हा तो झाला तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम फारच भयंकर झाला असावा, हे खालील आख्यायिकेवरून दिसून येते.

ह्या व्हलिया जातीत*  पोतराज (रेडयाचे राजे) ह्या नावाची एक शाखा आहे.  कर्नाटकातील बहुतेक लहान मोठया गावांत जेव्हा पटकी वगैरे भयंकर व्याधीच्या शमनार्थ द्यामव्वाची (दुर्गादेवीची) जत्रा गावकऱ्यांकडून करण्यात येते; तेव्हा ते पोतराज - मुख्य हक्कदार - जत्रेतले अध्वर्यूच असतात.  जत्रेत पुष्कळ रेडयांचा वध होत असतो, त्यांतील मुख्य रेडयाचे शिर डोक्यावर घेऊन ह्या पोतराजास गावपंचांस बरोबर घेऊन नगरप्रदक्षिणा करावयाची असते.  ह्या पोतराजाच्या उत्पत्तीसंबंधी अशी एक चमत्कारिक दंतकथा आहे की, याच्या मूळ पुरुषाने आपण ब्राह्मण आहोत असे भासवून द्यामव्वा नावाच्या एका ब्राह्मणीशी विवाह केला.  पुढे जेव्हा तिला पोतराजाची हीन जात कळून आली, तेव्हा तो भिऊन रेडयाचे रूप घेऊन पळाला.  द्यामव्वाने आपल्या घरास आग लावून पोतराजाचा पाठलाग केला व त्याचा वध केला.