राजकारण

प्रकरण अकरावे

ह्या पुस्तकाची मागील १० प्रकरणे १९३२ सालच्या ऑगस्ट महिन्यातच तयार करून छापखान्याकडे पाठविण्यात आली होती.  अलीकडे दोन चार वर्षांत अस्पृश्यांच्या राजकारणाला अगदी चुरशीचे स्वरूप आल्यामुळे, विशेषतः महात्मा गांधींच्या १९३२ सालच्या सप्टेंबर महिन्यातील उपोषणामुळे, हे प्रकरण लिहिण्याचे लांबणीवर टाकून काही काळ वाट पहावी लागली.  पुढे पुण्याचा करार झाला.  चालू (१९३३) सालच्या मे महिन्यात महात्माजींनी पुनः २१ दिवस उपोषण केले.  आता ह्यापुढे हे पुस्तक ताबडतोब प्रसिध्द झाले पाहिजे; म्हणून हे प्रकरण लिहून संपविले आहे.

अस्पृश्यांचे राजकारण किंवा त्याच्यासंबंधी स्पृश्यांचे राजकारण म्हणजे काही नुसती आजकालची धामधूम आहे अशातला मुळीच अर्थ नव्हे.  हे राजकारण अस्पृश्यतेइतकेच पुरातन आहे, असे म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती होणार नाही.  माझी तर स्वतःची अशी खात्री होऊन चुकली आहे की, हिंदूंतील अस्पृश्यता म्हणजे त्यांच्या दूषित राजकारणाचा एक मासला होय.  पहिल्या प्रकरणात केलेल्या व्याख्येप्रमाणे अस्पृश्यतेचे संघटित स्वरूप म्हणजे प्राचीन वर्णाभिमानी हिंदूंच्या दूषित राजकारणाचा यशस्वी विकासच होय.  ह्या विकासाची पोलादी चौकट मागे केव्हा एकदा जी घडविली गेली, ती आजवर जशीच्या तशीच जवळ जवळ शाबूत आहे.  म्हणून घडविणारांच्या दृष्टीने हिला यशस्वी म्हटले आहे.  कालांतराने मूळ चार वर्णांच्या पुढे हजारो जाती-पोटजाती झाल्या, कालमहात्म्याने त्यांचे आपासांत स्थलांतर व रूपांतरही झाले.  पण ह्या चौकटीबाहेरील अस्पृश्यांवर प्रत्यक्ष काळाच्या हातूनही काही अनुकूल परिणाम घडविता आले नाहीत.  उलट, वहिवाटीच्या दाबाखाली जणू काय ते कायमचेच दडपले गेले आहेत असे दिसते.  'सवय म्हणजे प्रतिसृष्टीच' ही म्हण सार्थ झाली आहे.

ह्या प्राचीन राजकारणाचा खडान्खडा इतिहास उपलब्ध नाही, हे खरे आहे.  त्या काळचा प्रत्यक्ष जेत्यांचाच इतिहास उपलब्ध नाही, तेथे जितांचा कोठून असेल ?  ज्यांचे सर्वस्व गेले, त्या जितांचा इतिहास तरी कसा उरणार ?  असा कोण जेता आहे की, जो आपल्या कृतकर्माची कथा जशीच्या तशीच लिहून ठेवील ?  आणि स्वतःचा इतिहास लिहिण्याची अक्कल आणि करामत असती तर हे बिचारे आजचे अस्पृश्य; जित तरी का झाले असते ?  ह्या प्रकरणी इतिहास मागणे म्हणजे 'बाप दाखीव नाही तर श्राध्द कर' म्हणण्याप्रमाणेच आहे.  बिचारे बाप कोठून दाखवतील ?  मुकाटयाने श्राध्द करीत आहेत, झाले !  तथापि अगदी तपशीलवार इतिहास नाही, तरी त्याचे दिग्दर्शन काही अंशी मागील प्रकरणांतून आलेलेच आहे.  त्यावरूनही ज्यांना अंदाज करण्याची इच्छा होत नाही, त्यांच्यापुढे समग्र इतिहास आणून ठेविला, म्हणून तरी काय लाभणार आहे ?  

ह्या इतिहासाची पुनरावृत्ती जगात वेळोवेळी पुष्कळदा झाली आहे.  गेल्या पाच शतकांत अमेरिका खंडात ती झाली आहे व हल्ली आफ्रिकेत, ऑस्ट्रेलियात वगैरे चालली आहे.  युरोपातून सुधारलेली म्हणविणारी अनेक राष्ट्रे उत्तर व दक्षिण अमेरिकेत जाऊन तेथील मूळ रहिवाश्यांचा हळूहळू नाश करून किंवा त्यांना दूर घालवून देऊन त्यांच्या जमिनीवर आता आपले ठाण मांडून बसली आहेत.  प्राचीन भारतवर्षात बाहेरून अशीच अनेक राष्ट्रे वेळोवेळी आली.  त्यांनी एतद्देशीयांचा नाश केला, त्यांच्यापैकी कित्येकांना घालवून दिले व कित्येकांना आपल्या दास्यात ठेविले.  अमेरिकेतील अत्याचारांचा इतिहास उपलब्ध आहे व तो प्रसिध्दही होत आहे.  येथला होण्याची आशा नाही.  हाच काय तो फरक.  अमेरिका हे नावही जेत्यांनी आपले दिले तसेच भारत हे नावही जेत्यांचेच आहे.  अमेरिकेतील मूळ एतद्देशीयांचा नायनाट झाला आणि जे अगदी थोडे उरले ते उपऱ्या जेत्यांच्या खिदमतीला खुशी अगर लायक नव्हते, म्हणून नवीन वसाहत करणाऱ्यांना आपल्या काबाडकष्टासाठी इतर खंडांतून जबरीने दासांना धरून आणावे लागले.  हिंदुस्थानात वसाहत करणारांची गरज येथल्या येथेच भागली.  पण जोरजबरीचा मामला दोहोकडे सारखाच आहे.  अमेरिकेतील प्रकार निष्ठुर होता आणि येथला फार कनवाळूपणाचा होता असे भासविण्याचा प्रयत्न वेळोवेळी आमच्यातले काही इतिहासकार करतात, तो एक नुसता कोडगेपणाचा मामला आहे.  ह्यापेक्षा अधिक काही म्हणवत नाही.  गेल्या दहा प्रकरणांत, मलबारात नंबुद्री आणि नायर जातींच्या जमीनदारांनी आज हजारो वर्षे तेथील चेरुमा, पुलया वगैरे अस्पृश्य जातींना किती घोर अवस्थेत आपल्या मालकीच्या अगर खंडाच्या शेतांवर गुरांप्रमाणे राबविले आहे, ह्याचा उल्लेख आलाच आहे.  त्यावरून, ज्या ज्या काळी अशा क्रांत्या घडून आल्या, त्या त्या काळच्या राजकारणाचे उग्र स्वरूप दिसून येणार आहे.

जगातील राजकारणाचे मुख्य लक्षण म्हणजे बलिष्ठाने दुबळयावर सत्ता चालविणे; हे आजकालच्या सुधारलेल्या काळातही खरेच आहे.  ही सत्ता एकदा आपल्या हाती आल्यावर नामोहरम झालेल्या जातींनी अथवा राष्ट्रांनी पुनः आपले डोके वर काढू नये म्हणून त्यांचा राजकीयच नव्हे; तर सामाजिक दर्जाही खाली दडपून बेपत्ता करण्यासाठी, सामुदायिक अस्पृश्यता हे प्राचीन राजकारणातील एक थोर साधन आहे व हे साधन हिंदुस्थान व सरहद्दीवरील देशांत मध्ययुगातही उपयोगात आणले गेले.  ह्याचा पुरावा ब्रह्मदेशाचा जो मिळतो, त्याचे वर्णन सहाव्या प्रकरणात केलेच आहे.  इतकेच नव्हे, तर बौध्द धर्मातून हिंदू धर्मात, बंगाल व मद्रासकडे परत क्रांती झाली तेव्हा, ज्या पाखंडी समजलेल्या जमाती हिंदू शासनाखाली सहजासहजी आल्या नाहीत, त्यांना हिंदू धर्माधिकाऱ्यांच्या कारवाईला बळी पडावे लागले.  तत्कालीन हिंदू राजांनी अशा स्पृश्य जमातींना एकजात अस्पृश्य आणि बहिष्कृत कसे ठरविले, ते पाचव्या प्रकरणात सांगण्यात आले आहे.  ह्यावरून प्राचीन राजकारणाचा हा तोडगा, ह्या देशात अगदी मध्ययुगाच्या अंतापर्यंत बिनदिक्कत चालविण्यात आला आहे हे दिसून येत आहे.  आता आपण ह्या वर्णद्वेषाच्या पायावर उभारलेल्या राजकारणाच्या टप्प्याचे कालानुक्रमे पुरावे म्हणून वाङमयातून काही उतारे मिळाल्यास पाहू.


वैदिक काळातील कटकट

ॠग्वेदकालीन आर्यांची शासनपध्दती कशी होती ह्यासंबंधी कलकत्ता विद्यापीठातील एक अध्यापक प्रफुल्लचंद्र बसू यांनी  Indo Aryan Polity ह्या नावाचा इ.स. १९१९ साली इंग्रजीत एक प्रबंध प्रसिध्द केला आहे.  त्यातील सहावे प्रकरण,  Polity (राजव्यवस्था), मननीय आहे.  अर्थात ही आर्यांच्या किंवा आर्य म्हणविणाऱ्या जमातींशी मिळते घेऊन राहणाऱ्या आर्येतर जमातींपुरतीच होती, हे सांगावयास नको.  ह्या काळी आर्यांची समजली जाणारी व्यवस्था तीन वर्णांची, किंबहुना चार वर्णांची बनत चालली होती.  पण ह्या चातुरर््वण्याबाहेर ज्या आर्येतर जमाती हिंदुस्थानात पूर्वीच ठाण मांडून राहिलेल्या होत्या, ज्यांच्याशी आर्यांच्या लढाया होत, त्या जमाती सर्व आर्यांहून कमी संस्कृतीच्या होत्या असे मुळीच नव्हे.  उलट काही जमाती तर सर्व आर्यांहून पुष्कळ सुसंपन्न व सुसंघटित स्थितीत होत्या.  काही असो; ह्या दोन्ही दर्जांचे आर्येतर अस्पृश्य किंवा बहिष्कृत स्थितीत मुळीच नव्हते.  ते येथील मूळचे रहिवासी किंवा आर्यांच्या पूर्वी बाहेरून आलेले व येथे कायम वसाहत करून राहिलेले, पण भिन्न संस्कृतीचे होते.  मात्र त्यांच्याशी आर्यांचे संधिविग्रह होऊन (१) जे आर्यांशी समानबल किंवा अधिक सुसंपन्न होते ते आर्यांच्या तिन्ही वरिष्ठ वर्णांत गुणकर्मशः समाविष्ट झाले;  (२) जे किंचित कमी संस्कृतीचे होते ते आर्यांतील चवथा शूद्रवर्ण म्हणून त्यांच्यात मिसळले; ह्याशिवाय जो मोठा कमी अधिक संस्कृत वर्ग होता त्याचा आर्यांनी अगदी पाडाव केला  (३) तोच कालवशाने पुढे अस्पृश्यत्वाप्रत पोचला; आणि (४) जो कधी विशेष संस्कृत नव्हता, आणि ज्यांचा आर्यांशी संबंधच आला नाही, किंवा जे आर्यांच्या कटकटीला कंटाळून डोंगर, झाली, किनारा, बेटे वगैरेंचा आश्रय करून दूर राहिले, ते अद्यापि त्याच स्थितीत आहेत.  पण ह्या चारी प्रकारच्या आर्येतरांना वेदमंत्रांतून दस्यु अथवा दास, हे एकच सामुदायिक नाव आहे.  ह्याशिवाय कित्येक विशेषणवाचक नावे ॠग्वेदातून आढळतात, त्यांच्याशी आर्यांचा किती द्वेष होता व त्यांच्या एकमेकांशी कशा लढाया होत हे वर पहिल्या खंडातील दुसऱ्या प्रकरणाचे शेवटी ज्या ॠचा अवतीर्ण केल्या आहेत त्यावरून कळण्यासारखे आहे.

ह्या परजातीच्या द्वेषाचे एक मुख्य कारण, त्यांच्या धार्मिक भावना, उपासना व आचार भिन्न असत हे होय.  ह्यामुळे परकीयांना अब्रह्मा, अयज्यु, अश्रध्द, अक्रतु, अकर्म, अमानुष, अदेव्य, अशा अनेक शिव्या दिलेल्या वेदमंत्रांतून आढळतात.  ह्याच शिव्यांचा व द्वेषभावनांचा विकास पुढे ज्या काळी ह्या परकीयांचा पूर्ण पाडाव होऊन ते आर्यांच्या राजकीय व आर्थिक गुलामगिरीतून दडपून गेले, त्या काळी आताच्या अस्पृश्यतेत व बहिष्कारात झाला हे उघड आहे.

अच्छा कविं नृमणोगा अभिष्टौ स्वर्षाता मघवन् नाधमानम् ।
ऊतिभिस्तमिषणो दयुम्नहूतौ नि मायावानअब्रह्मा दस्युरर्त ॥

ॠग्वेदसंहिता, मं. ४ सू. १६ ॠ.९.

ह्यात मायावान् व अब्रह्मा म्हणजे 'जादूगार' व 'ब्रह्म म्हणजे स्तुती किंवा प्रार्थना न करणारा' अशी निंदा आहे.

न्यक्रतून् ग्रथिनो मूध्रवाचः पणीरँश्रध्दाँ अवृधाँ अयज्ञान् ।
प्र प्र तान् दस्यूँरग्निर्विवाय पूर्वश्चकारापराँ अयज्यून् ॥

ॠग्वेदसंहिता, ७.६.३.


ह्यात पणी नावाचे दस्यूंचे एक निराळेच राष्ट्र निर्दिष्ट झाले आहे.  मद्रासेकडील हल्लीचे पळळ नावाचे अस्पृश्य किंवा प्राचीन फिनिशयन यांच्याशी ह्यांचा संबंध येतो की काय, हा संशोधनीय विषय आहे.  अग्नीने त्यांचा अत्यंत नाश केला असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे.

प्रान्यच्चक्रमवृहः सूर्यस्य कुत्सायान्यद्वरिवो यातवेऽकः
अनासो दस्यूँरमृणो वधेन नि दुर्योण अवृणङ् मृध्रवाचः ॥

ॠग्वेदसंहिता, ५.२९.१०.


ह्यात दस्यूंना अनास असे म्हटले आहे.  अनास = तोंड, भाषा नसलेले = म्लेंच्छ, असे सायणाचार्य म्हणतात.  अनास = नाक नसलेले = नकटे असे मॅक्स मूलर म्हणतात.

हे दस्यू किती तरी अधार्मिक, कुरूप व दुर्गुणी असले तरी त्यांच्याशी लढण्याची हीच तेवढी कारणे नसून ते संपत्तिमान, सुसंस्कृतिवान् आणि सुसंघटित होते आणि त्यांचया संपत्तीचा आर्यांना हेवा वाटत होता, हे दुसरे अधिक बलवत्तर कारण होते. दस्यू हे किल्ले बांधून शहरांत राहत असत.  आर्यापेक्षाही ते अधिक स्थाईक झालेले होते.

इंद्राग्नी नवतिं पुरो दासपत्नीरधूनुतम् ।  साकमेकेन कर्मणा ॥
ॠग्वेदसंहिता, ३.१२.६.

इंद्र व अग्नी ह्या दोघांनी दासांचया आधिपत्याखालील नव्याण्णव पुरे म्हणजे किल्ले एकदम पाडून टाकले.  असा ह्या मंत्राचा अर्थ आहे.

प्र ते वोचाम वीर्या या मन्दसान आरुजः ।  पुरो दासीरभीत्य ॥
ॠग्वेदसंहिता, ४.३२.१०.

मन्दसानः = सोम पिऊन माजलेला (इंद्र)
आरुज = (किल्ल्याचा) फडशा उडविला.

आभिः स्पृधो मिथतीररिषण्यन् अमित्रस्य व्यवथया मन्युमिन्द्र ।
आभिर्विश्वा अभियुजो विषूचीरार्याय विशोऽवतारीर्दासीः ॥
ॠग्वेदसंहिता, ६.२५.२.

ह्या मंत्रात आर्यांभोवती दासांचा वेढा पडला आहे, किंवा आर्यांच्या वस्तीभोवताली दस्यूंच्या वसाहती आहेत, इंद्राने त्यांचा नाश करून आर्यांच्या सेनेचे रक्षण करावे, असा अर्थ आहे.

प्र ये गावो न भूर्णयस्त्वेषा अयासो अक्रमुः ।
हनन्तः कृष्णामपत्वचम् ॥
ॠग्वेदसंहिता, ९.४१.१.

कृष्ण नावाचा एक काळया रंगाचा असूर होता.  तो दहा हजार सेनेसह अंशुमती नदीचे काठापर्यंत चाल करून आला, त्याचा पराभव झाला, त्याच्या अंगाची कातडी सोलून काढली, वगैरे कथा आहे.  मं. १ सू. १३० ॠ. ८ पहा.

अमेरिकेतील हल्लीचा लिंचिंगचा असाच प्रकार आहे.


उत दासं कौलितरं बृहतः पर्वताधि ।  अवाहन्निन्द्र शाम्बरम् ॥
ॠग्वेदसंहिता, ४.३०.१४.

कुलितराचा मुलगा शंबर ह्याला इंग्राने मोठया पर्वताच्या खाली ओढून मारिले.

त्वं तदुक्थमिन्द्र बर्हणा कः प्र यच्छता सहस्त्रा शूर दर्षि ।
अव गिरेर्दासं शम्बरं हन् प्रावो दिवोदासं चित्राभिरूती ॥
ॠग्वेदसंहिता, ६.२६.५

हा शंबरासुर व दिवोदास (आर्य) ह्यांच्यामध्ये बरीच कटकट झालेली दिसते.  ह्या कटकटीला कंटाळून शंबर डोंगरी किल्ल्याचा आश्रय घेऊन राहिला.  हा शंबर वरील कृष्ण व इतर अनेक आर्येतर नायक सुसंपन्न व सुसंघटित नेते होते.  त्यांच्या संस्कृतीचा एक विशेष असा होता की ते अभिचार ऊर्फ जादूक्रिया वगैरे गूढविद्येत प्रवीण होते.  सुमारे २३०० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या कौटिलीय अर्थशास्त्र नामक ग्रंथाच्या प्रलंभने भैषज्यमन्त्रयोगः ।  ह्या १७८ व्या प्रकरणात ह्या आर्येतर राजांचा पुनः खालील उल्लेख आढळतो :

बलिं वैरोचनं वन्दे शतमायं च शम्बरम् ।
भण्डीरपाकं नरकं निकुम्भं कुम्भमेव च ॥
देवलं नारदं वन्दे वन्दे सावर्णिगालवम् ।
एतेषामनुयोगेन कृतं ते स्वापनं महत् ॥
यथा स्वपन्त्यजगराः स्वपन्त्यपि चमूखलाः ।
तथा स्वपन्तु पुरुषा ये च ग्रामे कुतूहलाः ॥
कौटिलीय अर्थशास्त्र, (श्यामशास्त्री यांची आवृत्ती) पान ४१९

वरील मंत्राचा प्रयोग केला असता रक्षक व इतर माणसांना झोप लागते अशी समजूत होती.  हा प्रयोग करण्यापूर्वी एका श्वपाकी (मांगीण) कडून हातापायांची नखे विकत घेऊन ती कृष्ण चतुर्दशीला स्मशानात पुरावीत. ती पुढच्या चतुर्दशीला उकरून, कुटून त्यांच्या गोळया तयार कराव्यात.  त्यामुळे सर्व निद्रिस्त होतात असे ह्याच प्रकरणात सांगितले आहे.  आंध्र देशात जादूटोणा करणारी एक विशिष्ट अस्पृश्य जात आहे.  त्या जातीच्या बायकांची मदत वरिष्ठ वर्गही अशा कामी घेतात असे मी त्या प्रांतात फिरत असताना ऐकिले आहे.  ह्याच प्रकरणात पुनः खालील श्लोक आढळतात :

बलिं वैरोचनं वन्दे शतमायं च शम्बरम्
निकुम्भं नरकं कुम्भं तन्तुकच्छं महासुरम् ॥
अर्मालवं प्रमीलं च मंडोलुकं घटोद्वलम् ।
कृष्णकंसोपचारं च पौलोमं च यशस्विनीम् ॥
अभिमन्त्रय्य गृह्णमि सिध्दार्थ शवसारिकाम् ॥
कोटिलीय अर्थशास्त्र (श्यामशास्त्री यांची आवृत्ती), पान ४२१

चण्डीलीकुम्वीतुम्भकटुकसाराघः सनीरीभगोसि स्वाहा ।
सदर, पान ४२३

हा मंत्र म्हटला असता कसलेही बळकट दार उघडते आणि सर्वांना झोप लागते.  वरील मंत्रातील पौलोमी ही चंडाली मोठी यशस्विनी होती.  अशा प्रकारे अस्पृश्यांतील प्रवीण स्त्री-पुरुषांचा गतयुगातील राजकारणातही उपयोग होत असे, हे ह्या पुस्तकातील उल्लेखावरून दिसते.