प्रकरण नववे
आतापर्यंतच्या विवेचनावरून दिसून आले असले पाहिजे की, हिंदुस्थानात हल्ली ज्या मानीव अस्पृश्यांच्या असंख्य जाती आहेत, त्या अगदी भिन्न भिन्न वंशांतून आलेल्या आहेत व त्यांची संस्कृती आणि दर्जाही भिन्न आहे; इतकेच नव्हे तर, त्यांच्या संस्कृतीत मध्यंतरीच्या इतिहासात बरेच चढउतार झाले आहेत. पण हेही खरे की आजकालच्या अस्पृश्य जातींपैकी ज्यांनी प्राचीन काळी वैभव भोगिले असावे, अशांवरही पुढे अस्पृश्यतेचा परिणाम बरीच शतके होत आल्याने स्वाभाविकपणे त्यांच्या संस्कृतीचा फार बिघाड झालेला आहे. ह्या आणि पुढील प्रकरणांतील विषयाचा विचार कातना ह्या जातींमध्ये घडलेल्या मध्यंतरीच्या कालवाकालवीकडे दृष्टी ठेवणे जरूर आहे. एरवी आमच्या विचारांना एकांगीपणा येऊन, ह्या बिचाऱ्यांवर आणखी एका नवीन अन्यायाचा बोजा पडेल !
ह्या प्रकरणात 'धर्म' हा जो शब्द योजिण्यात आला आहे तो सामुदायिक धर्म म्हणजे धार्मिक पंथ किंवा संघ ह्या अर्थानेच योजिला आहे. धर्माचा जो आध्यात्मिक अथवा परमार्थिक अर्थ आहे तो केव्हाही व्यक्तिपुरताच असतो. तो सामुदाचिक होऊ शकतच नाही. सामुदायिक अर्थ म्हणजे पंथ अथवा संघ हा देश, काल अथवा जनसमाज यांच्या संकेताप्रमाणे बदलणारा भिन्न असतो. धर्माचा खरा अर्थ आध्यात्मिक असतो, तो काही कोणा समूहाच्या संकेताप्रमाणे बदलणारा नसतो. तो सनातन असून केवळ व्यक्तीच्या अनुभवातच आढळून येणारा असतो. ती व्यक्ती स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित कशीही असो; प्रौढ वय आणि शुध्द भावना असली की पुरे. तिच्या अनुभवात आणि जीवनव्यवहारात कमी अधिक मानाने हा सनातन धर्म आढळणारच. हा सनातन धर्म ह्या प्रकरणाचा मुळीच विषय नव्हे. इतकेच नव्हे, ह्या सार्वत्रिक धर्माला हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती वगैरे नावांनी संबोधिताही येणार नाही.
येथून पुढील प्रकरणांत अस्पृश्यतेचा, अर्थात हिंदुस्थानात आज हजारो वर्षे वर दिलेल्या व्याख्येनुसार बळी पडलेल्या असंख्य जनसमूहाचा प्रश्न धसाला लागत आहे. पहिला प्रश्न हा आहे की, ह्या अवाढव्य अस्पृश्य समाजाचा धर्म कोणता ? म्हणजे सामाजिक आणि कायद्याच्या व्यवहाराच्या दृष्टीने सुधारलेल्या जगात हल्ली जे दहापाच मोठे मोठे सर्वमान्य धर्मसंघ, अथवा गट, रूढ झाले आहेत, त्यांपैकी कोणत्यात ह्यांचा समावेश होत आहे किवा होण्यासारखा आहे ? कोणी सहज विचारतील की, हा प्रश्नच मुळी कसा उद्भवतो ? अर्थात हे सर्व लोक हिंदुधर्मसंघात आजपर्यंत वावरत आले असून आताच ही विक्षिप्त दीर्घ शंका का आली ? शंका दीर्घ असो की विक्षिप्त वाटो, ती अनाठायी नाही. अगोदर हिंदुधर्माचीच ठाम व्याख्या होत नाही. यहुदी, झरतुष्ट्री (पारशी), बौध्द, जैन, ख्रिस्ती, मुसलमान, ह्या मोठया आणि प्राचीन, किंवा शीख, लिंगायत, ब्राह्म समाज, आर्यसमाज, देवसमाज वगैरे अर्वाचीन लहान संघांप्रमाणे हिंदुसंघाच्या मर्यादा इतिहासाच्या दृष्टीने, किंबहुना लोकव्यवहाराच्या दृष्टीनेही ठाम ठरविता येत नाहीत. हिंदुधर्म ही एक केवळ पुरातन काळापासून चालत आलेली रूढी आहे. कोणत्याही रूढीच्या मर्यादा ठरविणे जितके कठीण आहे, त्याहूनही ह्या हिंदू धर्मरूपी पुरातन रूढीच्या मर्यादा ठरविणे अनंत पटीने जास्त दुरापास्त आहे. हे काम जवळ जवळ अशक्य आहे. हिंदुधर्म हे एक मायपोट आहे ! ह्यात सगळया जगाचाही समावेश करू पाहणाराचा हात कोणालाही, निदान तर्कशास्त्राचे दृष्टीने, धरता येणार नाही. कोणी म्हणेल, हिंदू म्हणजे जातिभेद मानणाऱ्यांचा एक गट आहे. पण शीख, लिंगायत, ब्राह्म समाज वगैरे अलीकडचे जातिभेद न मानणारे पंथही खानेसुमारीच्या अहवालात बिनबोभाट हिंदू ह्या सदरात गणले जात नाहीत काय ? परवापर्यंत मिश्रविवाह करू पाहणाऱ्यांना आपण हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती वगैरेंपैकी कोणी नाही असे लिहून दिल्याशिवाय इंग्रज सरकारचे रजिस्ट्रार त्यांचा विवाह नोंदण्याचे नाकारीत असत. पण अलीकडे सर हरिसिंग गौरच्या ह्या कायद्यातील सुधारणेमुळे ही खुंटीही अगदी ढिली झाली आहे. गौरच्या सुधारणेपूर्वीही अनेक मिश्रविवाहितांनी आपले विवाह नोंदून घेण्याचेच मुळी साफ नाकारले आहे. म्हणून तेवढयानेच ते हिंदू नाहीत असे कोण म्हणू शकेल ? मनुस्मृतीत वर्णसंकराचा कितीही बाऊ दाखविला असला, तरी प्रत्यक्ष मनुस्मृतीच्या काळातही चार वर्णांच्या मर्यादा ठरविणे जे अशक्य होते, ते आता शक्य थोडेच झाले आहे ? तात्पर्य काय की हिंदू धर्माची धरी व्याख्या म्हणजे जो कोणी आपल्यास हिंदू म्हणवीत असेल, तोच हिंदू. जो हिंदू असूनही म्हणवून घेण्यास तयार नसेल त्याच्यावर कोण जबरी करू शकेल ? रोजच्या व्यवहाराच्या दृष्टीने इतक्या खोल पाण्यात शिरण्याची तसदी कोणी घेत नाही. पण खानेसुमारी तयार करणारावर ह्या खोल पाण्यात शिरण्याची जबाबदारी अलबत पडते; ती त्याला टाळता येणार नाही. आजच्या आमच्या ह्या खंडवजा मोठया देशात असे अनेक असंसकृत मागासलेले जनसमूद आहेत की, ते आपण हिंदू आहोत की नाही, ह्या प्रश्नाला काहीच उत्तर देऊ शकत नाहीत; किंबहुना देऊ इच्छितही नाहीत. अशा असंख्य असंस्कृतांच्या आचारविचारांची नीट पाहणी करून व त्यांच्या लक्षणांची व्याख्या ठरवून त्यांना धर्माच्या सदरात एक विवक्षित जागा देणे खानेसुमारीच्या खात्याला भाग पडते.
इ.स. १९०१ साली हिंदी खानेसुमारीचे प्रमुखत्व जेव्हा सर एच. एच. रिस्ले ह्या नामांकित समाजशास्त्रज्ञाकउे सोपविण्यात आले, तेव्हा त्याला अशा अनेक असंस्कृत जाती ह्या देशात आढळून आल्या की, त्यांच्या धार्मिक आचारविचारांना आणि भावनांना हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती वगैरेंपैकी कोणत्याच नावाखाली समाविष्ट करणे अश्यक्य झाले. आणि साधारण गणकांना तर काहीतरी वटहुकूम फर्माविणे भाग पडले. म्हणून धर्माचाप्रश्न आल्याबरोबर अशा धर्माच्या सदराखाली त्या त्या असंस्कृत जातींचेच कामचलावू नाव नमूद करण्याविषयी हुकूम देणे रिस्ले ह्यांना भाग पडले. याप्रमाणे गणकांचे काम सोपे झाले. तरी अशा अनेक जातींना प्राथमिक प्राकृत धर्माची लक्षणे पाहून काही तरी एक नवीनच सामान्य नाव कल्पिणे भाग पडले. देशी रूढ भाषेत असे नाव आढळेना. (१) Fetishism श्रमणवाद (जडवस्तुपूजा), (२) Shamanism (श्रमणवाद ऊर्फ पंचाक्षरी मार्ग), (३) Animism (भूतपूजा), ही तीन नावे त्यांनी आधुनिक समाजशास्त्रातून अथवा तौलनिक धर्मशास्त्रातून निवडून, त्यांपैकी सारासार विचार करून तिसरे भूतधर्म अथवा पिशाचपूजा हे नाव पसंत केले. व त्या नावाच्या सदराखाली या सर्व जातींची सरगणना करण्यात आली. सन १९०१ साली हिंदुस्थान, बलुचिस्थान आणि ब्रह्मदेश मिळून एकंदर लोकसंख्या २९,४३,६१,०५६ आणि एकंदर हिंदूंची संख्या २०,७१,४७,०२६ भरली. त्या हिंदूंशिवाय वरील भूतधर्मीयांची संख्या एकूण ८५,८४,१४८ दाखविण्यात आली आहे. (खाने. रिपोर्ट १९०१; खंड १-अ, भाग २-कोष्टके; कोष्टक ६, पान ५८-६२ पहा). त्याच रिपोर्टाच्या पहिल्या पुस्तकातील पुरवणी भागात शेवटी पान ५६०-५६९ पर्यंत एकंदरीत सर्व हिंदी लोकांचा सामाजिक दर्जा दाखविणारी जी कोष्टके दिली आहेत; त्यात निरनिराळया प्रांतांतून जी अस्पृश्य मानलेल्या अनेक जातींची संख्या दिली आहे तिचा वट्ट आकडा ५,१७,३८,६७३ हा तयार होतो. या विशिष्ट प्रांतवार कोष्टकांवरून उघड दिसते की, रिस्ले यांनी या मानीव अस्पृश्यांना पूर्ण विचाराअंती व जबाबदारीपूर्वक हिंदू-धर्म-संघातच समाविष्ट केले आहे. शास्त्रीय आणि केवळ औपपत्तिक दृष्टीने काही ठरो, चालू लोकमत आणि लोकव्यवहार या दृष्टीने पाहता, या गणनेत आक्षेपार्ह असे काही नाही असे कोणासही वाटेल; आणि मलाही असेच वाटते. पुढील दशवार्षिक म्हणजे इ.स. १९११ सालच्या शिरगणतीचे काम इ.ए. गेट यांचेकडे सोपविण्यात आले. हे गृहस्थ इ.स. १९०१ सालीही रिस्ले साहेबांचे सहकारी होत. या दहा वर्षांत पुढीलप्रमाणे वरील वट्ट आकडयात वाढ झालेली दाखविली आहे. एकूणन हिंदी लोकसंख्या ३१,३५,४७,८४०, एकूण हिंदू २१,७५,८६,८९२, एकूणन भूतधर्मीय १,०२,९५,१६८. या दहा वर्षांत हिंदूंच्या वट्ट लोकसंख्येविषयी मुलमानांनी वाद उपस्थित केला होता. पण तो या भूतधर्मीयांच्या संख्येबद्दल नसून केवळ अस्पृश्यांना हिंदूत गणावे की वेगळे गणावे, याबद्दल होता.
इ.स. १८६७ सालापासून म्हणजे हिंदुस्थानात खानेसुमारी सुरू झाल्यापासून या भूतधर्मीयांची संख्या हिंदूंपासून अलग दाखविण्यात येत आहे; म्हणून त्यांच्यासंबंधाने वादाला कारणच नव्हते. पण अस्पृश्यांच्याबद्दल वाद उपस्थित होण्यास सबळ कारण होते. मानीव अस्पृश्यांची जेव्हा इ.स. १९०१ सालच्या खानेसुमारीत जवळ जवळ ५॥ कोटी ही संख्या प्रांतवार पसरलेली आढळली, इतकेच नव्हे, पण या मानीव अस्पृश्यांतही काही प्रांतांतून काही काही अस्पृश्य जाती भूतधर्मीयांच्या सदरात दाखविलेल्या आढळल्या, तेव्हा सर्वच मानीव अस्पृश्यांसंबंधी वाद उपस्थित होणे साहजिकच होते. कदाचित या वादला काही अंशी बळी पडून म्हणा, किंवा ही कटकट चुकविण्याच्या हेतूने म्हणा, इ.स.१९११ साली मानीव अस्पृश्यांची संख्या वेगळी दाखविण्यात आली नाही. इतकेच नव्हे, तर १९०१ सालाप्रमाणे हिंदुधर्मांतर्गत निरनिराळया समाजांचा अथवा जातींचा परस्पर उच्चनीच दर्जा दाखविणारी कोष्टकेच स. १९११ सालच्या खानेसुमारीतून वगळण्यात आली. त्यामुळे ह्या भूतधर्मीयांपैकी किती जाती व त्यांची किती संख्या मानीव अस्पृश्य आहे, आणि उलट पक्षी, ह्या मानीव अस्पृश्यांतील किती जाती व त्यांची किती संख्या भूतधर्मीय आहे, हे नक्की ठरविण्यास मार्गच उरला नाही. काही असो. मानीव अस्पृश्यांच्या प्रचंड लोकसंख्येत काहीतरी भूतधर्मीयांची गणना झालेली आहे, ह्यात शंका नाही. तथापि सर्वच मानीव अस्पृश्य भूतधर्मीय, असेही म्हणता येत नाही. कारण पहिल्यांची वट्ट संख्या दुसऱ्यांच्यापेक्षा पाच पटीहून अधिक उघड उघड भरत आहे.
हा निर्णय झाला आधुनिक लोकमतानुसारे व लोकव्यवहाराच्या दृष्टीने. पण अगदी प्राचीन काळी जेव्हा वेदधर्मीय आर्य (?) नावाचे लोक हिंदुस्थानात येऊन वसाहत करू लागले. त्या वेळी हिंदुधर्माचा व्याप आणि अर्थ आजच्यासारखा व इतका स्पष्ट असणे शक्य नाही. अस्पृश्यतेची संख्या आर्यांच्या वसाहतीपूर्वी किंवा वसाहतीच्या काळी ह्या देशात होती की नव्हती हे निश्चित ठरविण्यास साधन नाही. वेदसंहितेचा काळ ख्रिस्ती शकापूर्वी हजार बाराशे वर्षे इतका अलीकडे मानला तरी त्या काळच्या वाङमयात अथवा अन्य प्रकारे अस्पृश्यतेचा ग्रांथिक अथवा लेखी पुरावा मुळीच सापडत नाही, हे आपण पहिल्या खंडात पाहिले. मानीव अस्पृश्य त्या वेळी असले तरी, त्यांची संख्या आणि आपत्ती आजच्यासारखी आणि इतकी तीव्र असणे शक्य नव्हते. कारण, तत्कालीन सामाजिक घटना आजच्याप्रमाणे सुसंघटित व दृढमूल झालेली नव्हती. पाणिनीच्या कालापासून अस्पृश्यतेचे उल्लेख मिळू लागतात. यास्काचार्यांनी आपल्या निरुक्तात अध्याय ३, खंड १६, मंत्र १० ह्यावर भाष्य करताना केलेला 'चत्वारो वर्णा निषादः पंचम इति औपमन्यवः ।' हा पंचम वर्णाचा उल्लेख संस्कृत वाङमयात जवळ जवळ पहिलाच होय. वर्ण तर चारच. पाचवा जन म्हणजे वर्णबाह्य निषादांच्या जाती असा पंचम शब्दाचा अभिप्राय आहे. औपमन्यवांच्या काळीही निषाद म्हणून जो लोकसमूह होता, तो सर्व आताप्रमाणे अस्पृश्य मानला जात होता ह्याला पुरावा नाही. निषाद म्हणजे आर्यांच्या वसाहतीबाहेरचे लोक; स्वतः वसाहत करून स्वतंत्रपणे राहणारे. त्यांचा व आर्यांचा संबंधच येत नसल्याने आधुनिक बहिष्काराचा व अस्पृश्यतेचा प्रश्नच त्यांच्यासंबंधी उद्भवत नाही. (मागे पान २५-२७ पहा.)
आजची अस्पृश्यता मनुस्मृतीच्या काळी पूर्णत्वाला आलेली आढळते. ह्या अस्पृश्यांची पूर्वापीठिका आणि हे कोणत्या कारणांनी अस्पृश्य ठरविण्यात आले, ह्याविषयी मनुस्मृतीची मीमांसा निराधार व अनैतिहासिक आहे, असे मी वर प्रतिपादिले आहे. तरी त्या काळी आजचा बहिष्कार व अस्पृश्यता ह्यांचा जम पूर्ण बसला होता असे मानण्याचा मनुस्मृतीचा पुरावा अगदी बिनतोड आहे, अह्यात शंका नाही. मनूच्या दहाव्या अध्यायात वर्णसंकराने उत्पन्न झालेल्या कोणत्या जाती कशा व किती हीन, म्हणून अस्पृश्य व बहिष्कृत, ह्याचा निर्णय दिला आहे. ब्राह्मण स्त्री आणि शूद्र पुरुष ह्यांच्या प्रतिलोमसंकरजन्य संततीला चंडाल ही संज्ञा देऊन ती जात पहिल्या पायरीची अस्पृश्य कल्पिली आहे. पण ह्या चंडाल आणि निषाद स्त्री ह्यांच्या संकरसंततीला व अंत्यावसायी, पुक्कस, कारावर, आहिंडिक, सोपाक, वगैरे जातींना, चंडालाहून अधिक नीच पायरीचे ठरविण्यात आले आहे. चांडाल झाला तरी शूद्रापासून म्हणजे वर्णांतर्गत शेवटच्या वर्णापासून झाला म्हणून तो तुलनेने बरा. पण वर्णबाह्य निषाद आणि हा अस्पृश्य चांडाल ह्यांच्या संकराला अधिकाधिक नीच मानण्यात आले आहे. तरी पण स्वतः निषाद हा अस्पृश्य असण्याचे कारणच नव्हते. कारण त्यांचा व आर्य वसाहतींचा अर्थाअर्थी संबंधच येत नव्हता. त्याचप्रमाणे हल्लीही बृहद् हिंदू समाजाशी अगदी फटकून राहणाऱ्या जंगली भूतधर्मीय जाती अस्पृश्य मुळीच नाहीत. ज्या असंस्कृत आर्येतरांचा आर्य वसाहतीशी केवळ हीन कामधंद्यासाठी संबंध आला; किंबहुना ज्या स्वतंत्र जातींना जिंकून अगर त्यांच्याशी समजुतीने वागून, वसाहतीला चिकटूनच पण अगदी बाहेर डांबण्यात आले; त्याच तेवढया जमाती आजकालच्या बहिष्कृत अस्पृश्य जाती होत. केवळ जिंकण्यामुळे, अगर हीन धंद्यामुळेच नव्हे तर पाखंडी धर्मावरील क्रूर बहिष्कारामुळेही वेळोवेळी व देशोदेशी या बहिष्कृतांत भर पडत जाऊन आजकालची अवाढव्य संख्या कशी तयार झालेली आहे, हे मागील प्रकरणात सिध्द झालेच आहे. पण अजून त्यांचा वसाहतीशी संबंध आलेला नाही, अशा जंगली जाती आजही अस्पृश्य नाहीत. पण त्यांचा धर्म मात्र प्राथमिक दर्जाचा म्हणजे भूत-प्रेत-पिशाचादिकांची पूजा, हा आहे.
आजचा प्रस्तुतचा मुद्दा 'अस्पृश्यांचा' धर्म कोणता हे ठरविण्याचा आहे. आज हजारो वर्षे मानीव अस्पृश्य यजाती शहरांतून व खेडयांतून वरिष्ठ म्हणविणाऱ्या हिंदू, मुसलमान इत्यादिकांच्या वसाहतीजवळ त्यांच्या सेवेत राहत आल्यामुळे या मानीव वरिष्ठांच्या धर्माचा व राहणीचा थोडा फार परिणाम या मानीव अस्पृश्यांवर होणे अगदी साहजिक आहे. बौध्द, लिंगायत, शीख, ख्रिस्ती, मुसलमान हे धर्मपंथ प्रसारक आणि प्रागतिक असल्याने मानीव अस्पृश्यांचा शिरकाव या निरनिराळया नवीन पंथांत हजारांनीच नव्हे, तर लक्षांनी झाला आहे. एरवी या परकीय व पाखंडी समजले गेलेल्या पंथांना तरी प्रथम प्रथम रिक्रूट भरती कोठून मिळणार ? बंगाल्यात, मध्यप्रांतात, विशेषतः मद्रासेत आणि मलबारात हल्लीच्या मुसलमानांच्या व ख्रिस्त्यांच्या संख्येपैकी शेकडा नव्वद हे मूळचे 'अस्पृश्य'च आहेत, असे जे खानेसुमारीच्या रिपोर्टात म्हटलेले आढळते, ते मुळीच अतिशयोक्तीचे नाही. या नवीन सुधारक पंथात न शिरता, मागे सवयीच्या जोरावर ज्यांची मोठी संख्या पूर्वस्थितीत राहिली त्यांच्यापैकी बहुसंख्येवर हिंदुधर्मातील हीन देवता आणि अडाणी विधिसंस्कार यांचा परिणाम कालवशात झाला असलेला आता दिसतो व म्हणून त्यांना हिंदू हे नाव पडले यात काय नवल ? नवल हेच की परकीयांनी व 'पाखंडयांनी' या अस्पृश्यांचा एवढा मोठा भाग काबीज करून घेतला असता, उलट सावळा हिंदुधर्म अद्यापि या बिचाऱ्यांना झिडकारून हिरमुसले करीत आहे ! इतकेच नव्हे, तर त्यांचे हाडवैर संपादन करीत आहे. ते कसेही असो. अशा स्वाभाविक ओघाने अस्पृश्यांचा समावेश हिंदुधर्मात झालेला आता दिसत आहे. ते संस्कारतः हिंदू नसून, केवळ संसर्गतः किंबहुना स्वभावतः हिंदू बनले आहेत असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.
एखाद्या मेजवानीचे वेळी पक्वान्नाचा ताजा वाटा सर्व 'वरिष्ठ' वर्गांना जाऊन मातीत मिसळलेल्या उष्टया पत्रावळी उकिरडयावर टाकल्यावर, ज्याप्रमाणे खेडयातील 'अस्पृश्यांना' चाटायला मिळतात, त्याचप्रमाणे हिंदुधर्माचा हीन भाग मात्र नेमका यांच्या वाटयाला येतो. बंगाल्यातला चैतन्यांचा वैष्णव भक्तिमार्ग, शिखांचा सत् अकाल, महाराष्ट्रातील ज्ञानबा-तुकारामांचा वारकरी संप्रदाय अनुसरण्यास आणि द्राविडांतील काही वरवरची सांप्रदायिक चिन्हे आचरावयास त्यांना मुभा आहे. पण उच्चवर्णी वैष्णवांत कोणी अस्पृश्य वैष्णवाने अगर शैवाने समान दर्जाने मिसळू म्हटले किंवा देवळांतच काय पण काही देवळांच्या नुसत्या वाटेवर पाय ठेवू म्हटले तर त्यांच्या जीवावरच येऊन बेतते. इतकेच नव्हे, तर सार्वजनिक शांतीच्या सबबीवर इंग्रज बहादुरांचे सोटेशाही पोलीस व लष्कर सोवळेवाल्यांचीच बाजू घेऊन या हतभाग्यांवरच घसरते. असो, या अपवादक गोष्टी सोडुन दिल्या तर आज मानीव अस्पृश्यांचा बहुजनसमाज भुताखेतांच्या पूजेतच गुरफटलेला दिसत आहे. तो केवळ नामधारी खानेसुमारीतलाच हिंदू आहे असे म्हटल्यास, निदान तज्ज्ञांचा तरी आम्हांवर राग होणार नाही अशी आशा आहे.