हिंदुस्थानातील अस्पृश्य मानिलेल्या लोकांची स्थिती अत्यंत शोचनीय आहे व त्यांच्या उन्नतीसंबंधी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत, असे वरिष्ठ वर्गांतील लोकांना पुष्कळ वर्षे वाटत आहे; पण आपल्या महराष्ट्र प्रांतात ह्या कामी प्रथमतः खऱ्या प्रयत्नाला आरंभ केल्याचे श्रेय परलोकवासी श्रीयुत जोतीबा फुले ह्यांनाच द्यावे लागेल. त्यांच्याच श्रमाने पुणे मुक्कामी ह्या लोकांसाठी एक-दोन शाळा स्थापन करण्यात आल्या. हल्ली त्या तेथील म्युनिसिपालिटीच्या ताब्यात आहेत. त्यानंतर ह्या हतभागी लोकांकडे ज्या दुसऱ्या उदार अंतःकरणाच्या पुरुषाचे लक्ष गेले; ते परलोकवासी श्रीयुत रामचंद्र अण्णाजी कळसकर हे होत. ह्यांनी प्रथम 'वांगी व्हिलेज एज्युकेशन सोसायटी' नावाची संस्था वांगी येथे स्थापन करून नंतर ती बारामती येथे नेली. ह्या संस्थेच्या आश्रयाखाली त्यांनी महार लोकांकरिता खेडयांतून काही शाळा उघडल्या होत्या; पण त्या फार दिवस चालल्या नाहीत. हे काम भरपूर द्रव्यसाहाय्याशिवाय नावारूपास येणे शक्य नव्हते; सरकार, संस्थानिक आणि श्रीमंत व्यापारी ह्यांच्याजवळ द्रव्यबळ आणि सत्ताबळही असतात; पण तेवढयाने अशी कामे उदयाला येत नाहीत. हे मुंबईसारखी धनाढय शहरे आणि इंग्रजांसारखे मातबर आणि न्यायी सरकार ह्या देशात पिढयानपिढया असूनही ह्या दीन लोकांचे भाग्य उदयास आले नाही ह्यावरून उघड होते. महानुभाव श्रीमंत सयाजीराजे ह्यांच्या कारकीर्दीत मात्र ह्या दीनांची बरीच दाद लागत आहे व अलीकडे कोल्हापूर येथेही बरीच चळवळ चालली आहे, पण काही होवो; हे कार्य इतके अवघड आहे की, तशीच असाधारण धर्मप्रेरणा झाल्याशिवाय आणि कोणत्यातरी एका नव्या जोमाच्या उदार पंथाने पुढाकार घेतल्याशिवाय ह्याला काही रूप येईल, हे अद्यापि संभवत नाही.
प्रार्थनासमाज, ह्या कामी हळूळहू पण बिनबोभाट आज बरीच वर्षे अल्पस्वल्प प्रयत्न करीत आला आहे. मुंबई, पुणे, सातारा, अहमदनगर ह्या ठिकाणी ह्या लोकांकरिता रात्रीच्या शाळा उघडून त्यांतून समाजाचे प्रचारक थोडाबहुत धार्मिक आणि नैतिक उपदेश आज बरीच वर्षे करीत आहेत. अलीकडे ह्या वर्गाविषयी कळवळा वाटणारांना हुरूप येण्यासारखा एक नवीन प्रकार दिसून येतो, तो हा की, आज कित्येक वर्षे अज्ञान आणि कंगाल अवस्थेच्या चिखलात रुतून गेलेल्या ह्या हतभागी लोकांतच स्वतःची स्थिती सुधारण्यासंबंधी जागृती दिसू लागली आहे.
ह्या अपूर्व जागृतीस इंग्रजी राज्याचे औदार्य आणि त्या औदार्याची अपूर्णता ह्या दोन्ही परस्परभिन्न गोष्टी कारणीभूत झाल्या आहेत. इंग्रजी राज्यातील समतेच्या वागणुकीमुळे महारमांगांची लष्करांत भरती होऊन गेल्या दोनतीन पिढयांत ह्या वर्गातील बरेच लोक हवालदार, जमादार आणि सुभेदार-बहादूर अशा पदवीला पोहचले होते. शिवाय, साहेबलोकांच्या खासगी तैनातीत बटलरचे वगैरे धंदेही इमानाने बजावून त्यांच्या साहजिक समागमाने ह्या वर्गातील बरीच कुटुंबे अंमळ सुखवस्तू झाली; पण ह्या बाबतीतील आपल्या उदार धोरणाचा विकास उत्तरोत्तर जास्त होऊ देण्याचे नैतिक धैर्य आणि शक्ती ह्या जातिभेदाने सडलेल्या देशात इंग्रज बहादुरांच्याही अंगी कायम राहिली नाही व सुमारे पंधरा वर्षांपासून अलीकडे ह्या लोकांची लष्करात पूर्वीप्रमाणे भरती होईनाशी झाली आहे. पुढे येण्याला जो एकच मार्ग खुला होता, तोही अशा रीतीने बंद झालेला पाहून ह्या लोकांचे आपल्या निराश्रित अवस्थेसंबंधी डोळे किंचित उघडू लागले. ह्या बाबतीत प्रथम जे प्रयत्न झाले व अजून चालू आहेत; त्याचे बरेचसे श्रेय पुणे येथील महार जातीतील पाणीदार गृहस्थ श्रीयुत शिवराम जानबा कांबळे यांजकडे आहे. श्रीयुत कांबळे ह्यांचा मुख्य रोख जरी सरकारात आपल्या जातीची पूर्वीप्रमाणे भरती व्हावी म्हणून कायदेशीर पध्दतीने अर्ज करण्याचाच अद्याप आहे, तरी आपल्या जातीला शिक्षण मिळून तिचे पाऊल पुढे पडावे म्हणून त्यांचे दुसऱ्या बाजूनेही अविश्रांत श्रम चालले आहेत. त्यांनी 'सोमवंशीय समाज' नावाची संस्था पुण्यास काढली असून तिच्याच नमुन्यावर अहमदनगर येथे श्रीयुत श्रीपतराव थोरात आणि पांडोबा डांगळे ह्यांच्या परिश्रमाने दुसरा एक 'सोमवंशीय समाज' सन १९०५ सालच्या जून महिन्यात स्थापन झाला आहे. ह्या पूर्वी नागपूरजवळ मोहपा येथे श्रीयुत किसन फागू नावाच्या एका तरुण आणि स्वार्थत्यागी गृहस्थाने धर्माच्या पायावर एक समाज स्थापून चळवळ चालविली होती. मुंबई येथील प्रार्थनासमाजाच्या पोस्टल मिशनची काही उदार मतांची पुस्तके वाचून ह्या तरुण गृहस्थाचे मन प्रार्थनासमाजाकडे वळले. प्रार्थनासमाजाविषयी प्रत्यक्ष माहिती करून घेण्यासाठी म्हणून मुंबई प्रार्थनासमाजाच्या १९०५ सालाच्या वार्षिक उत्सवाला श्रीयुत किसन फागू हे आले होते. तेथे पंधरा दिवसांच्या पाहुणचारामुळे त्यांची आणि समाजाच्या काही मंडळीची ओळख होऊन परस्पर हेतूंची आणि प्रयत्नांची परस्परांस माहिती झाली. शेवटी हे गृहस्थ समाजाच्या प्रीतिभोजनातही हजर असल्याचे प्रसिध्दच आहे. ह्या ओळखीमुळे ह्या जातीतील आत्मोन्नतीसंबंधी ज्या काही चळवळी चालल्या होत्या, त्यांकडे समाजाच्या प्रचारकांचेही बरेचसे लक्ष वेधले व पुढे लवकरच (हल्ली परलोकवासी झालेले) स्वामी स्वात्मानंद आणि मी असे दोघे अहमदनगरास फिरतीवर गेलो असता तेथील नवीनच स्थापना झालेल्या 'सोमवंशीय समाजा'मार्फत भिंगार नावाच्या खेडयातील महारवाडया आमची काही व्याख्याने झाली.
लोकांची हळूहळू या विषयाकडे सहानुभूती वळू लागली, आणि विशेषेकरून मुंबई प्रार्थनासमाजाच्या आणि सोशन रिफॉर्म असोसिएशनच्या उदार मनाच्या अध्यक्षांनी या कामात बरेच प्रोत्साहन दिल्यामुळे मी एक निबंध लिहून त्यात या लोकांची कशी स्थिती आहे, संख्या किती आहे, यांच्यासाठी कोणी काय काय केले आहे, या मुद्दयाचे विवरण केले आणि शेवटी यांना वर आणण्याकरिता एतद्देशीय लोकांनी आपले पौरस्त्य आचार, रीतिरिवाज आणि परंपरा यांना धरून एक कायमचे मिशनच स्थापले पाहिजे आणि ते सध्याच्या स्थितीत प्रार्थनासमाजाशिवाय दुसऱ्याकडून होणे विशेष संभवनीय नाही, असे विचार, उदार मतवादी समाजबंधूंपुढे मांडले. हा निबंध 'इंडियन सोशल रिफॉर्मर'च्या ता. २९ जुलै १९०६ च्या अंकात प्रसिध्द झाला व नंतर स्वतंत्र पुस्तकरूपाने छापून प्रार्थनासमाजाच्या पोस्टल मिशनच्या आश्रयाने त्याच्या पुष्कळ प्रती वाटण्यात आल्या. विचार केला, सहानुभूती मिळाली, निर्णय झाला, निश्चय झाला. तथापि 'सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः' हे त्रिकालसत्य कधी खोटे व्हावयाचे नाही. म्हणून ह्या तांदुळांची वाट काही दिवस पहावी लागली.