प्रकरण आठवे
आता काही मुख्य जातींच्या नावांची मूळ व्युत्पत्ती काय असावी, ह्याचे भाषाशास्त्राच्या निर्विकार दृष्टीने विवेचन करून ह्या हीन मानलेल्या जाती खरोखर मुळातच हीन होत्या, किंवा त्यांचया नावांतूनही काही उज्ज्वल पूर्वेतिहासाचा पुरावा बाहेर डोकावत आहे, हे पाहण्याचा मी प्रयत्न करीत आहे. हे विवेचन करण्यासाठी ज्या थोडया जाती मी निवडल्या आहेत; त्या जातींच्या लोकांमध्ये मी स्वतः बहुशः दोन-दोन, चार-चार महिने, क्वचित वर्ष वर्षभरही, जाऊन राहिलो आहे. त्यात माझा हेतू हा होता की, त्यांचे खाद्य, पेय, पेहराव, डामडौल, व्यक्तिविषयक आवडी, घरगुती चालरीत, जातीय परंपरा, ह्या गोष्टी समक्ष निरखून पहाव्या. आज माझ्या तीस वर्षांच्या सूक्ष्म निरीक्षणानंतर मला ह्या कित्येक हतभागी जातींचे ऊर्फ राष्ट्रांचे मूळ उज्ज्वल असावे, असे स्वतंत्रपणे वाटत आहे. पुढील व्युत्पत्तीमध्ये माझे भाषाशास्त्र सपशेल जरी चुकले असले, तरी त्यामुळे माझ्या इतर निरीक्षणाला बाधा येत नाही. उलट पक्षी, माझी व्युत्पत्ती खरी ठरल्यास मात्र तो एक स्वतंत्र पुरावा होईल. एवढयाच उद्देशाने माझ्या ह्या ऐतिहासिक विषयाला हे जे व्युत्पत्तीचे ठिगळ जोडण्याचे धाडस मी केले आहे, ते अगदी अनाठायी ठरेल, असे मला वाटत नाही.
महार (महाराष्ट्र)
महार ह्या नावाचा विस्तार मराठी भाषेपुरता अथवा महाराष्ट्रापुरताच नसून पंजाबी, सिंधी, गुजराथी, राजस्थानी, हिंदी, बंगाली, ओरिया, तेलगू, आसामी, इतक्या भाषांतून व अनुक्रमे देशांतून आढळतो. तो असा :- महार, म्हार - आधुनिक महाराष्ट्र, मध्य हिंदुस्थान; म्हेतर, म्हेर, मेर - गुजराथ, मारवाड, माळवा, राजपुताना आणि मध्य प्रांताचा हिंदी भाग; मेघ, मघ-मेघवाळ, मोघिया-पंजाब, गुजराथ, ग्वाल्हेर; माल, मालो, माली, मलयन-बंगाल, ओरिसा, आंध्र, मलबार.
महार ह्या नावाची आजवर अनेक निरुत्तेफ् सुचविण्यात आली आहेत. त्यांपैकी काही विक्षिप्त आहेत, तर काही विचार करण्यासारखी आहे. महाअरी = मोठा शत्रू अशी व्युत्पत्ती जोतीबा फुले ह्यांनी सुचविली आहे. दुसरी अशी आहे : पार्वतीच्या कपाळावर घामाचा बिंदू आला, तो एका कमळ पत्रावर पडला; त्याचे सुंदर मूल होऊन खेळू लागले. ते रांगत बाहेर जाऊन एक मेलेली गाय खाऊ लागले. म्हणून शिवाने रागावून त्यास महा आहारी - मोठा खादाड - होशील असा शाप दिला. तो महार झाला; ही विक्षिप्त निरुत्तेफ्.
मृताहर : परलोकवासी डॉ. सर भांडारकर ह्यांनी मृताहर अशी व्युत्पत्ती सुचविली होती. इ.स. १९१२ साली पुण्यात डी. सी. मिशनची पहिली अस्पृश्यतानिवारक परिषद भरली, तिचे अध्यक्ष ह्या नात्याने डॉक्टरसाहेबांनी ही प्रथमतःच पुढे आणिली. मृत + आहार = मेलेली गुरे ओढून नेणारा, हा अर्थ ह्या लोकांच्या चालू धंद्याला लागू पडतो. पण संस्कृत वाङमयात ह्या नावाचा असा प्रचार कोठे आढळत नाही. माडेय पुराणातील ३२ व्या अध्यायात पुढील श्लोक आहेत :
उदक्याश्वशृगालादीन्सूतिकान्त्यावसायिनः ।
स्पृष्ट्वा स्नायीत शौचार्थ तथैव मृतहारिणः ॥३३॥
मृतनिर्यातकाश्वैव परदारारताश्च ये ।
एतदेव हि कर्तव्यं प्राज्ञैः शोधनमात्मनः ॥४०॥
अभोज्यसृतिकाषंढमार्जाराखुश्वकुक्कुटान ।
पतिताविध्दचंडालान् मृताहारांश्च धर्मविद् ॥४१॥
संस्पृश्य शुध्दयते स्नानादुदक्याग्रामसूकरौ ।
तद्वच्च सूचिकाशौचदूषितौ पुरुषावपि ॥४२॥
वरील उताऱ्यास चांडाल, अन्त्यावसायी, असे शब्द योजून पुनः मृताहार, मृतहारि, मृतनिर्यातक असे शब्द घातले आहेत. मृत ह्याचा अर्थ मनुष्य अथवा प्रेत असाच आहे. मेलेली ढोरे अशा अर्थाचा संदर्भ ह्या ठिकाणी मुळीच संभवत नाही. वरिष्ठ जातीच्या माणसांची प्रेते महार नेऊ शकणार नाही, म्हणून मृतांचे आप्त असाच येथे अर्थ आहे. मृताहार म्हणजे मेलेली ढोरे ओढणारा असा अर्थ डॉ. भांडारकर ह्यांनी नव्यानेच केलेला दिसतो. महार असे मागाहून संभावित मराठीत रूपान्तर झाले, त्याचे मूळ रूप म्हार असे गावंढळांचे तोंडांत अद्यापि आहे, तेच रूप पहिले असावे. माळव्यात व नागपुराकडे हिंदी भाषेत 'म्हेर' असे रूप हल्लीही आहे; त्यावरून मराठीत म्हार असे होणेच जास्त संभवनीय आहे. त्याचा संभावित अपभ्रंश महार असा करून पुनः त्याचे 'मृताहर' असे संस्कृत रूप मानण्यात फारच दुरान्वय होत आहे. म्हार हे पूर्वीपासूनच मेलेली गुरे ओढणारे होते, ही कल्पना इतिहासाला धरून नाही; म्हणून ही व्युत्पत्ती असमर्थनीय ठरते. माळव्याप्रमाणे गुजराथेतही म्हारांना म्हेत्तर असे म्हणतात. त्यापासून म्हेर असे रूप होणे शक्य आहे. अजमीर-मेरवाडामध्ये म्हेर असे रूप आहे. म्हेतर (महत्तर) म्हणजे मोठा अथवा जुना माणूस. म्हातारा शब्दाचीही हीच व्युत्पत्ती आहे. आणि हीच व्युत्पत्ती ह्या प्राचीन जातीच्या इतिहासाला अधिक सुसंगत दिसते.
म्हार म्हात्म्य : ह्या पुराणाची हस्तलिखित पोथी इ.स. १९०७ साली परळ येथील आमच्या रात्रीच्या शाळेतील एका भाविक म्हार मुलाने मला दिली. तिची भाषा मासलेवाईक म्हारी आहे. ह्यात म्हार, म्हादेव, म्हामुनी असे नमुनेदार शब्द आहेत. ह्याच्या दुसऱ्या अध्यायाच्या आरंभी खालीलप्रमाणे मूळ वर्णिले आहे.
आद्यन्त तुमच्या ववस्याचे म्हैमा । सेस न वर्णवी झाली सीमा । वेदा न कळे आगमा । सोमववष अप्रंपार ॥२॥ हे म्हार म्हात्म्य कथा आगळी । जो का धरील हृदयकाळी । तयाचे द्वीतभावाची होळी । करील रुषि माडी ॥३॥ ... तरी हा माडी मूळ पुरुष । तयापासून म्हाराचा ववस । ऐसा सजना हो सावकास । चित्ती विश्वास धरुनिया ॥५॥ अनंत यौगापासून । कितीक राजाचे ढळले जन ॥ परी हा म्हार जुनाट पुरातन । न ढळेची कल्पान्ती ॥६॥ देव झाले उदंड । परि हा म्हार अक्षय्य काळदंड । ह्याच्या स्वाधीन नवखंड । केले मुळीच क्रत्यांनी ॥७॥
मुसलमानांचा संबंध मोठा चमत्कारिक उल्लेखिला आहे.
म्हार आणि मुसलमान । हे दोघे एक वंशे उत्पन्न । चंद्र वंश पूर्ण । सोम म्हणती तयालागे ॥ अ. ३ ओवी १९.
तिसऱ्या अध्यायाच्या आरंभी विलक्षण आचार सांगितला आहे. ह्या अध्यायाची ७६ वी ओवी अशी आहे :
म्हाराचा मूळ पुरुष सोमाजी नाम । दैवत सिव, देस मार्वड उत्तम । रुषि माडेय तयाचा उत्तम । घाई पूर्ण गरजतसे ॥७६॥
सहाव्या अध्यायात ४९ व्या ओवीपासून आद्य शून्यवादाचे वर्णन आहे. ह्यात महायान बौध्द धर्माची छटा दिसते. सातव्या अध्यायात कर्त्याचे नाव आहे.
''पूर्वी व्यास वाल्मिक मनी । सुखसनकादिक आदि करुनी । तयाने हे म्हार म्हात्म्य रत्नखाणी । कल्पित करोनी ठेविले ॥१६॥ तयाची चतुरा ऐसी । कलियुगी अवतरला बाळकदास । त्यांनी ह्या म्हार म्हात्म्याचा प्रकास । करोनि दाखविला कलियुगी ॥''
सातव्या अध्यायाच्या शेवटी ग्रंथसमाप्तीचे स्थळ व काळ सांगितला आहे.
''पूर्वे सन्निध पने पाकन । पावणे दोन योजन । दक्षिणेस गोदावरी पूर्ण । तीन योजने जाण बा ॥८०॥ पश्चिमेस नीराबाई मध्ये । उत्तरभागी पाडेगाव आहे । ग्रंथकर्त्याचा अवतार पाहे । तेथे झाला जाणिजे ॥८१॥ शके १८८८ (?) । सर्वधारी नाम संवत्सर प्रवेसी । वैशाख वद्य पंचमीस । ग्रंथ समाप्त झाला पै ॥८२॥ चंद्रवार ते दिसि । सोमवंश प्रवेसी । प्रथम प्रहारासी । ग्रंथ समाप्त केला हो ॥८३॥
शके १८८८ असे चुकून पडले असावे. शके १७८८ असावे. येरवी पुढील ओवीचा प्रास जुळणार नाही. शके १८८८ पुढे यावयाचे आहे.