इ.स. १९०८ च्या सुमारास अस्पृश्यतेसंबंधी मी माझा मराठीतील पहिला विस्तृत निबंध लिहिला. तो 'बहिष्कृत भारत' ह्या मथळयाखाली इ.स. १९०८ च्या डिसेंबर महिन्याच्या 'मनोरंजन' मासिकात सचित्र प्रसिध्द झाला. तोच पुढे श्रीमंत गायकवाड महाराजांच्या आज्ञेने पुस्तकरूपाने प्रसिध्द झाला. ह्यापूर्वी इ.स. १९०४ सालापासून ह्याच विषयावरील माझे इंग्रजीतील लेख, आकडे व इतर प्रमाणांसह, 'टाइम्स ऑफ इंडिया', 'सोशल रिफॉर्मर' वगैरे पत्रांतून प्रसिध्द होत होते. अस्पृश्यतानिवारणासाठी आमच्या देशांत गेल्या शतकापासून कोणते व कसे प्रयत्न झाले ह्याचा समग्र पण संक्षिप्त इतिहास मी इ.स. १९२३ साली लिहिला, तो मराठी 'ज्ञानकोशा'त प्रसिध्द झाला आहे. तथापि, अस्पृश्यतेची उत्पत्ती, विकास आणि ती घालविण्याचा पध्दतशीर उपाय ह्या विषयावर समाजशास्त्राच्या दृष्टीने सोपपत्तिक विचार अद्यापि झाला नाही. निदान तो कोणी केलेला माझे तरी आढळात नाही.
हिंदुस्थान सरकारने खानेसुमारीचा अहवाल, डिस्ट्रिक्ट आणि इंपीरियल गॅझेटिअर्स, एथ्नॉग्राफिक सर्व्हे इ. ग्रंथावली सुरू केल्यापासून, काही प्रसिध्द पाश्चात्य समाजशास्त्रांचे लक्ष भारतीय वर्णव्यवस्थेकडे लागले आहे. इबेट्सन, सिनार्ट, नेसफील्ड, रिस्ले, रस्सल इ. शोधकांनी जातिभेदाची मीमांसा करताना ओघाने 'अस्पृश्यां'विषयी काही प्रासंगिक विचार प्रकट केले आहेत; पण प्रत्यक्ष अस्पृश्यता ही संस्था जगात कशी निर्माण झाली, व तिचा विकास विशेषतः भरतखंडात कोणकोणत्या कारणांनी व टप्प्यांनी घडून आला ह्या चित्तवेधक विषयासंबंधी म्हणण्यासारखी एकादी उपपत्ती कोणी ठरविलेली माझ्या आढळात अद्यापि आलेली नाही. मुंबई विश्वविद्यालयातील तरुण पदवीधरांकडून वेळोवेळी अस्पृश्यता ह्या विषयावर एक पारितोषिक निबंध मागविण्यात येत असतो. परीक्षणासाठी हे निबंध मजकडे येत असतात. त्यावरून पाहता वृध्दांप्रमाणेच तरुणांनीही ह्या विषयाच्या उपपत्तीकडे आजवर दुर्लक्षच केलेले मला आढळले. रा. सातवळेकरांनी 'स्पर्शास्पर्श' नावाचे एक सुंदर पुस्तक संस्कृतातील उतारे देऊन प्रसिध्द केले आहे. काही विद्वान ख्रिस्ती मिशनऱ्यांनी विवक्षित 'अस्पृश्य' जातींची स्थिती प्रत्यक्ष निरीक्षण करून निःपक्षपाताने प्रसिध्द केली आहे. तथापि, अशा त्रुटित ग्रंथांतूनही एखादी ऐतिहासिक उपपत्ती ठरविण्याचा नुसता प्रयत्नही झालेला दिसत नाही. एकंदरीत, नव्या, जुन्या, तरुण, वृध्द, स्वकीय, परकीय इ. कोणत्याही विद्वानांच्या डोळयांवर हा विषय शास्त्रीय दृष्टीने अद्यापि यावयाचाच आहे. व्यावहारिक गोंधळ मात्र बराच गाजत आहे. त्यात सरकारचा डफ, काँग्रेसचे तुणतुणे, हिंदु-मुसलमानांचा नाच आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतरांच्या टाळया, ह्यांचा एकच कल्लोळ माजला आहे. ह्या गोंधळाचा प्रस्तुत प्रयत्नांशी मात्र कसलाही संबंध पोचत नाही, हे टीकाकारांनी कृपा करून ध्यानात राखावे. हा प्रयत्न केवळ शास्त्रीय दृष्टीने व निर्विकार मनाने करण्यात आला आहे. वाचकांनीही केवळ त्याच प्रकाराने त्याचा स्वीकार करावा.
मजकूर लिहिण्याच्या कामी वगैरे माझे परलोकवासी मित्र कृष्णराव गोविंदराव पाताडे ह्यांची फार मदत झाली. पण हा प्रथम भाग प्रसिध्द झालेला पाहण्यासाठी ते जगले नाहीत; ह्याबद्दल मला फार खेद होत आहे. ह्या ग्रंथाचा बराच भाग माझेजवळ बरेच दिवस लिहून पडला होता. तो प्रसिध्द करण्याचे श्रेय नवभारत ग्रंथमालाकारांनी स्तुत्य चिकाटी दाखवून आपल्याकडे घेतले, हे जाहीर करणे माझे कर्तव्य आहे. या विषयाचे माझे अध्ययन अद्याप चालूच आहे. अद्यापि पुढील दोन खंड दुसऱ्या पुस्तकाच्या रूपाने लिहावयाचे आहेत.
श्रीमंत सर सयाजीराव महाराज गायकवाड ह्यांनी हा अल्पग्रंथ त्यांना अर्पण करण्याची परवानगी दिली, याबद्दल मी त्यांचा फार ॠणी आहे.
विठ्ठल रामजी शिंदे
गुरुवार, २० जुलै इ.स. १९३३
अहल्याश्रम, नानाची पेठ,
पुणे शहर.