ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग

प्रकरण सहावे
ब्रह्मदेशाची यात्रा करण्याचे मनात आणून मी जेव्हा इ.स. १९२७ च्या फेब्रुवारीत कलकत्त्याहून निघालो, तेव्हा माझे मनातील मुख्य उद्देश केवळ बौध्द धर्माचे साधन प्रत्यक्ष पाहण्याचाच होता. हा निर्वेधपणाने साधावा म्हणून माझे इतर व्यवसाय आणि अभ्यास काही काळ तरी बाजूस ठेवावेत, असे मला वाटत होते.  पण मी जेव्हा या विचित्र देशात संचार करू लागलो तेव्हा प्राचीन वास्तुशास्त्र, तुलनात्मक भाषाशास्त्र, मानवंशशास्त्र इत्यादी ज्या माझ्या आवडीच्या गोष्टी त्यांनी मजवर एकदम हल्ला चालविला.  ब्राह्म धर्माचा प्रचारक ह्या नात्याने तुलनात्मक धर्मशास्त्राचे अवलोकन मला आजन्म करणे भाग आहे.  आणि वरील शास्त्रे तौलनिक धर्मशास्त्राच्या अगदी हद्दीवरती व त्याशी सजातीय असल्याने त्यांच्या अध्ययनापासून, विशेषतः इतक्या भिन्न परिस्थितीत आल्यावर, स्वतः अलिप्त राहणे मला फार कठीण पडले.

ब्रह्मदेशात हिंदुस्थानातला जातिभेद मुळीच नाही, ही गोष्ट अगदी खरी आहे.  तेवढयावरून येथे कोणत्याही प्रकारचा बहिष्कृतवर्ग मुळीच नाही, किंवा पूर्वी नव्हता, असा माझा समज होता.  इतकेच नव्हे, तर ह्या देशात पुष्कळ वर्षे राहून वरवर पाहणाराचाही असाच समज असलेला मला दिसून आला.  पण खरा प्रकार असा नसून, अगदी अलीकडच्या काळापर्यंत ह्या देशात, बहिष्कृत स्थितीत निदान एक हजार वर्षे तरी खितपत पडलेले चार-पाच तरी मानववर्ग मला आढळले. श्वे यो ह्या टोपणनावाच्या एका इंग्रजाने लिहिलेल्या Burman - His Life and Nation ह्या इंग्रजी ग्रंथात मी जेव्हा ह्या बहिष्कृत दासवर्गाचे वर्णन वाचले तेव्हा मला त्याचे फारच आश्चर्य वाटले.  जातिभेद नसताही बहिष्कृतवर्ग असून शकतो, हे अमेरिकेतील अत्यंत सुधारलेल्या संयुक्त संस्थानातील सामान्य लोकांचे तेथील निग्रोशी जे वर्तन घडते व दक्षिण आफ्रिकेतील गौरकायांचे इतर वर्णीयांशी जे वर्तन घडते, ते ज्यांनी पाहिले आहे, त्यांना सहज पटण्यासारखे आहे.

गेल्या वर्षी भारत इतिहास संशोधक मंडळापुढे अस्पृश्यतेचे मूळ आणि तिचा हिंदुस्थानातील विकास ह्या विषयावर मी माझा निबंध वाचला.  तेव्हापासून ह्या विषयाचा मी अधिकच शोध करीत आहे.  ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्गाची मला जी माहिती शोधाअंती मिळाली व जी हल्लीची वस्तुस्थिती जागोजागी जाऊन मी प्रत्यक्ष निरखिली, तिच्यामुळे माझ्या स्वीकृत विषयावर अधिक प्रकाश पडणार आहे, म्हणून मी पुढील माहिती संक्षेपाने देत आहे.

ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्गाचा उगम ब्रह्मदेशातील गुलामगिरीच्या संस्थेत आहे.  ब्रिटिश राज्याची संस्थापना ब्रह्मदेशात इ.स. १८८५ साली पूर्णपणे झाली.  ह्यापूर्वीच्या स्वराज्यात ह्या देशात गुलामगिरीची संस्था होती.  ती येथे किती पुरातन होती हे ठरविण्याची निश्चित साधनू तूर्त उपलब्ध नाहीत.  अनेकविध सामग्री जमवून मि.जी.ई.हार्वे, आय.सी.एस. ह्यांनी नुकताच ब्रह्मदेशाचा एक नमुनेदार आमूलाग्र इतिहास दिलेला आहे.  त्यात त्यांनी इसवी सनाच्या चालू सहस्त्रकाच्या आरंभी सूरू झालेल्या पगान येथील राजघराण्यापासून विश्वसनीय इतिहास दिला आहे.  हे घराणे अनिरुध्द या नावाच्या पराक्रमी थोर पुरुषाने स्थापिले.  ह्या घराण्याने या देशात जे मोठे मन्वंतर घडवून आणण्यासाठी अनेक राष्ट्रीय हिताची कामे केली; त्यात देशातील बौध्द धर्माची सुधारणा करून मोठमोठी बौध्द देवस्थाने बांधली, हे एक काम होय.  ही देवळे बांधण्यासाठी खेडयांतून शेतकीवरील पुष्कळशा लोकांना जबरीने धरून आणून गुलाम करून त्यांच्याकडून काम घेतले.  ह्याशिवाय कायमच्या गुलामगिरीचे दुसरे एक कारण ब्रह्मदेशात असे आहे - देवस्थानांत झाडलोट व इतर राखणदरीची कामे करणे, हे गुलामांचेच काम आहे.  कित्येक भाविक लोक ही गुलामगिरी आपण होऊन पत्करीत असत.  पण साधारपणे राजाज्ञेने हा जबरीचा गुरवपणा खेडयातून धरून आणिलेल्या लोकांवर किंवा लढाईत जिंकून आणिलेल्या लोकांवर लादण्यात येत असे.  मि. हार्वे ह्यांनी पान ३३१ वर एक इ.स. १९७९ चा शिलालेखाचा उतारा दिला आहे.  त्यात 'अभिनंदथू नावाच्या एका श्रीमंत दरबारी गृहस्थाने एक मोठे देऊळ बांधून त्याच्या साफसफाईसाठी स्वतःला, आपल्या बायकोला व मुलांना गुलाम म्हणून वाहिले...' असा उल्लेख आहे.

अशा देवळी गुलामांवर व त्यातल्या त्यात लढाईत जिंकून आणलेल्या गुलामांवर वंशपरंपरेचा बहिष्कार पडत असे.  त्यांच्याशी इतर साधारण स्वतंत्र समाज मिळूनमिसळून राहत नसे.  म्हणजे ब्रह्मदेशांत जातिभेद मुळीच नसला तरी स्वतंत्र आणि गुलाम असे दोन मुख्य सामाजिक भेद असत व घरकामाकरिता ठेविलेल्या गुलामांना जरी समाजात वावरावयास मुभा असली, तरी देवळी गुलामांना फारच हीन व तिरस्करणीय समजण्यात येत असे.  याप्रमाणे गुलामगिरीतून ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्गाचा उगम झाला असावा.  एकंदरीत ब्रह्मदेशातील हल्लीची धार्मिक संस्कृती व काही अंशी घरगुती व सामाजिक संस्कृतीही हिंदी संस्कृतीतून आली आहे, असे दिसते.  निदान काही वर्गांची ग्रामबहिष्कृतता तरी हिंदुस्थानातूनच गेली असावी, असे म्हणण्यात हिंदी बौध्द संस्कृतीचाच पुरावा नसून इतरही असा पुरावा आहे की, हल्लीही जे हीन स्थितीतले बहिष्कृतवर्ग तेथे आढळतात, त्यांची संडाला, डूनसंडाला, तुबायाझा अशी जी नावे आहेत, ती हिंदी भाषेतून तिकडे गेली आहेत.  ती नावे चंडाल, डोमचंडाल, अशुभराजा ह्या हिंदी नावाचेच अपभ्रंभ होय, ह्यात संशय नाही.  संस्कृत अथवा पाली भाषांतील शब्दांचे उच्चार ब्रह्मी लोकांना नीट न करता आल्यामुळे या भाषंतीलच च श र ह्या अक्षरांच्या उच्चारांचा ब्रह्मी भाषेत अनुक्रमे स त य असा विपर्यास व्हावा, असा ब्रह्मी अपभ्रंभाचा नियम आहे; त्याबरहुकूम ब्रह्मी बहिष्कृतवर्गाची नावे हल्ली येथे प्रचारात आहेत.  अशुभराजा ह्यातील पहिल्या 'अ' चा लोप झाला व इतर नियमांप्रमाणे तुबायाझा असे शेवटले नाव सिध्द झाले आहे.

ब्रह्मदेशात ब्रिटिश राज्य स्थापन होईपर्यंत खालील चार प्रकारचे बहिष्कृत हीन वर्ग आढळत असत.

१.  युध्दात जिंकलेले कैदी आणि त्यांचे वंशज यांना देवळांतील सेवेला वाहिलेले गुलाम करण्यात आलेले असे.  ह्यांना फयाचून हे नाव आहे.  फया हा शब्द बुध्द ह्या शब्दाचा चिनी भाषेतून आलेला अपभ्रंश आहे.  बुध्द-बुढ-भुर-फुर-फया अशी ही अपभ्रंश परंपरा आहे.  फया हा शब्द ब्रह्मदेशात बुध्द, त्याची मूर्ती, देऊळ आणि कोणी मोठा सन्माननीय माणूस ह्या सर्वांबद्दल उपयोजिला जातो.  चून म्हणजे नोकर असा अर्थ आहे.

२.  स्मशानातील मर्तिकादी अशुभ संस्कारांशी संबंध असलेली, थडगी खणण्याची व ती सांभाळण्याची वगैरे हीन कामे करणारे ग्रामबाह्य वर्ग ह्यांना तुबायाझा (अशुभ राजा), संडाला, डूनसंडाला अशी नावे आहेत.

३.  केवळ भिक्षेवर निर्वाह करणारे महारोगी व इतर असाध्य रोगांनी पछाडलेले, हातपाय किंवा दुसरा एखादा महत्त्वाचा अवयव तुटून अपंग बनलेले यांना केबा असे नाव आहे.  केबा हे नाव आता तुबायाझंनाही लावण्यात येते.  कारण तेही भीकच मागतात.  के = मदत, बा = हो (संबोधन).  'मला मदत करा', असे म्हणत भीक मागणारे असा ह्या नावाचा मूळ अर्थ आहे.

४.  माफीचे भयंकर गुन्हेगार  :  अशा गुन्हेगारांना पूर्वी स्वराज्यात राजाच्या कृपेने किंवा इतर कारणांनी माफी मिळून त्यांना पोलीसचे, जेलरचे, फाशी देण्याचे वगैरे तिरस्कृत काम आणि अधिकार मिळत असत.  त्यांना पॅगवे म्हणजे पोलीस, लेयाटों = चोपदार, छडीदार अशी नावे असत.  अशा अधिकाऱ्यांचा जनतेमध्ये मोठा दरारा असला तरी त्यांच्याविषयी सर्वत्र तिरस्कार असून ते समाजबाह्य मानले जात.

५.  ह्याशिवाय तु-ङै-डो म्हणजे राजे लोकांचे हलालखोर म्हणून एक वर्ग पूर्वी असे.  व ह्यांचा एक लहान गाव मंडालेपासून १०-१२ मैलांवर आहे असे माझे ऐकण्यात आले.  पण मला प्रत्यक्ष जाऊन पाहण्यास वेळ मिळाला नाही.  ह्यांचा समावेश वरील दुसऱ्या वर्गात मी केला असता, पण हल्ली हे फारसे ग्रामबाह्य नाहीत, असेही मी ऐकले.

वरील पाचही बहिष्कृतवर्गांतील लोकांची हल्लीची संख्या हिंदुस्थानातील बहिष्कृतांच्या मानाने फारच थोडी म्हणजे फार तर साऱ्या ब्रह्मदेशांत ५६ हजार असेल.  यांची स्थितीही हिंदुस्थानातल्याइतकी करुणास्पद नाही.  हे आपले ठिकाण सोडून, धंदा सोडून व मूळ लपवून सर्वसाधारण समाजात छपून गेल्यास हल्लीच्या राज्यात कोणी पर्वा करीत नाहीत.  हे जरी आपल्या मूळ गावीच बहिष्कृत स्थितीत राहिले तरी, व पूर्वीदेखील, हिंदुस्थानातल्या इतक्या कडक रीतीने यांना अस्पृश्य मानण्यात येत नसे.  तरी पण त्यांना गावात येण्याला व इतर धंदे करण्याला व लोकांत मिसळण्याला परवानगी नसे.  म्हणून अजूनी हे मागासलेल्या विपन्नावस्थेत खितपत पडलेले मी प्रत्यक्ष गावोगावी मुद्दाम जाऊन पाहिले.  ब्रह्मदेशात कडक अस्पृश्यता नव्हती- निदान हल्ली नाही - हे खरी असले, तरी तेथील बहिष्कृतांचा व अंतःकृतांचा भेटीव्यवहार पूर्वी होत नसे व आताही होत नाही; मग रोजीव्यवहार व बेटीव्यवहाराची गोष्ट नको.  हल्लीदेखील कोणी उघडपणे आपले मूळ वरील चार-पाच प्रकारांपैकी एकात आहे, असे सांगेल, तर त्याच्याशी ब्रह्मदेशातील पुराणमतवादी बहुसंख्या नुसता भेटीव्यवहार करण्यासही तयार नाही.  म्हणजे गृह्य आणि सामाजिक प्रसंगी समानतेने बहिष्कृतास आमंत्रण करण्यास अंतःकृत वर्ग अद्यापि तयार नाही.  ब्रह्मदेशातील पुराणमतवाद हिंदुस्थानातल्यापेक्षा कमी दृढमूल आहे व तो जो झपाटयाने मावळत आहे, तरी पण तो मुळीच नव्हता किंवा नाही असे नाही.  म्हणून तेथील बहिष्कृतवर्ग हा एक संशोधनीय विषय आहे.

वरील पाचही प्रकारचा बहिष्कृतांचा इतिहास माझ्या अल्पशा संशोधनात जो आढळला, तो संक्षेपाने पुढे देत आहे.  ब्रह्मदेशाचा इतिहास अद्याप तयार व्हावयाचा आहे.  उपलब्ध साधनासामग्रीचा भारतीय सामाजिक इतिहासाशी निकट संबंध भासत आहे आणि तो रंजक व तसाच बोधकही आहे.

फयाचून  :   ह्या नावाचा अर्थ 'देवळी गुलाम' असा आहे.  ब्रह्मदेशातील देवस्थाने अत्यंत पवित्र मानली जातात; इतकी की, युरोपियांनादेखील पादत्राण घालून देवळातच नव्हे तर भोवतालच्या विस्तीर्ण आवारातही पाय टाकण्याची छाती होत नाही.  अशा बाबतीत युरोपियनांचेही खून पडले, म्हणून पादत्राण घालून मंदिरातच नव्हे तर प्राकारातही प्रवेश करण्यासंबंधी सरकारी ठराव आणि वटहुकूम मोठमोठया पाटयांवर आवारापासून काही अंतरावर जाहीर केलेले आढळतात.  देवळे पवित्र तरी देवळी गुलाम अपवित्र, हे मोठे कोडेच मला पडले !  शोध करिता देवळी गुलामच नव्हे तर देवळात वाहिलेल्या इतर पदार्थ, फळे, फुले, सुगंधी पदार्थ व नैवेद्य इत्यादी सर्वच वसतू मनुष्यांना अग्राह्य आहेत.  ह्या न्यायाने फयाचून म्हणून जो देवळी गुलामवर्ग आहे तो पूर्वी अग्राह्य असला पाहिजे.  तो कालांतराने त्याज्य व नंतर अपवित्र मानला असणे अगदी संभवनीय आहे.  ह्या गुलामवर्गात पूर्वी बहुतेक धरून आणलेले राजकैदी असत.  ह्याचे एक उदाहरण अत्यंत हृदयद्रावक पण अगदी इतिहासप्रसिध्द आहे, ते असे :

दक्षिण ब्रह्मदेशात मोलमेन शहराचे उत्तरेस २०-२२ मैलांवर किनाऱ्यालगत थटून म्हणून एक इतिहासप्रसिध्द प्राचीन राजधानीचा गाव आहे.  तेथे इ.स.च्या ११ व्या शतकाच्या मध्यसमयी मनुहा नावाचा तेलंग राजा राज्य करीत होता.  ह्या प्रांतात द्रविड देशातून  कांची येथून गेलेला 'हीनयान' बौध्द धर्म जोरात होता.  उत्तरेकडे ऐरावती नदीचे काठी पगान येथे अनिरुध्द नावाच्या ब्रह्मी जातीच्या राजाने जेव्हा पहिली ब्रह्मी बादशाही स्थापिली, तेव्हा दक्षिणेत थटून येथे मनुहा राज्य करीत होता.  अनिरुध्दाला उत्तरेकडील भ्रष्ट बौध्द धर्माची सुधारणा करावयाची होती.  थटूनकडून नामांकित बौध्द भिक्षू पगान येथे जाऊन अनिरुध्दाच्या राष्ट्रीय कार्यात मार्गदर्शक झाला.  त्याने थटून येथे बौध्द त्रिपिटक ग्रंथाच्या प्रती आहेत, त्या मिळविण्याचा अनिरुध्दास मंत्र दिला.  सामोपचाराने मागूनही मनुहा त्रिपिटक ग्रंथ देत नाही; म्हणून त्यावर रागावून अनिरुध्दाने मनुहाच्या राज्यावर मोठी चाल करून त्रिपिटकच नव्हे, तर त्याचे अक्षरशः सर्वस्व हरण केले.  म्हणजे त्याच्या राज्यातील सर्व मौल्यवान चिजा ऐनजिनशी आपल्या राज्यात नेल्या, इतकेच नव्हे, तर प्रजाही गुलाम म्हणून आपल्या राज्यात नेली.  तेव्हापर्यंत दक्षिण ब्रह्मदेशातील संस्कृती दक्षिण हिंदुस्थानातील आंध्र आणि द्रविड देशांतून दक्षिण ब्रह्मदेशात हीनयान बौध्द संस्कृतीचे मार्गाने गेली होती.  ती ह्या युध्दापुढे उत्तर ब्रह्मदेशात पसरू लागली.  थटूनचे बौध्द ग्रंथ, बौध्दभिक्षू, आचार्य आणि कारागीर नेले इतकेच नव्हे, सर्व राजघराणे आणि दरबारही गिरफरदार करून पगान येथे नेण्यात आले.  शेवटी त्या थटून राजघराण्यासह सर्व नामांकित प्रजेला पगान येथे बांधलेल्या नवीन असंख्य पगोडांमध्ये बहिष्कृत देवळी गुलाम म्हणून कायमचे वंशपरंपरा नेमण्यात आले.  मी थटून आणि पगान ही जुन्या संस्कृतीची दोन्ही ठिकाणे शिल्पशास्त्र, समाजशास्त्र आणि धर्मशास्त्र अशा तिनही दृष्टीने निरखून पाहिली.  दक्षिण ब्रह्मदेशात ब्रिटिशांचा अंमल जसा इ.स. १८२५ चे सुमारास बसला, तसाच तो उत्तर ब्रह्मदेशात १८८५ साली बसून सर्व ब्रह्मदेश नव्या मनूत आला. ह्या साठ वर्षांच्या अंतरामुळे मला दक्षिण देशात बहिष्कृतवर्ग कोठेच आढळला नाही.  तो पाहण्यास मला उत्तरेकडे मनुहा पगानला जावे लागते.  पगान येथील बहिष्कृत वाडयात मनुहा राजाचे घराणे, वाडा व त्याचा हृदयस्पर्शी लवाजमा अद्यापि आहे.  शेवटचा पुरुष उ बा ल्विन हा २६ वर्षे वयाचा पाणीदार तरुण व त्याची खानदानी वृध्द आई यांना मी डोळयांनी पाहिली.  त्यांची गाऱ्हाणी ऐकली.  न्यऊ या बंदराजवळ श्रेझीगो नावाच्या मोठया राष्ट्रीय पगोडाजवळ फयाचूनांचे एक वेगळे खेडे आहे. त्याचा थजी ऊर्फ पाटील म्हणून ब्रिटिश सरकारने उ बा ल्विनची नेमणूक केली आहे.  कारण तो मोठया राजवंशातील पिढीजाद फयाचून आहे.

फयाचून हे लोक लहानमोठया देवळांत हल्ली फुले, माळा, उदकाडया मेणबत्त्या विकण्यासाठी दुकाने मांडून बसलेले आढळतात. हा धंदा किफायतीचा असल्याने अलीकडे फयाचून नसलेल्या इतर अंतःकृत लोकांचीही अशी दुकाने आहेत.  उलट फयाचूनही आपले मूळ लपवून व हा धंदा सोडून अंतःकृत वर्गात सर्रास मिसळत आहेत.  ह्यामुळे खरा फयाचून कोण, हे ओळखून काढणे मोठे मुष्किलीचे काम आहे.  विशेष तपशील निरीक्षण नं. ४ यात पुढे दिला आहे.

तुबायाझा  :   या नावातील मूळ शब्द वर सांगितल्याप्रमाणे 'अशुभ राजा'.  ह्यासंबंधी मी एक दंतकथा ठिकठिकाणी ऐकली ती अशी  :  एकदा एका ब्रह्मी राजाची एक गर्भवती राणी अत्यवस्थ आजारी पडली.  ती मेलीच, असे समजून तिला स्मशानात पाठविले.  थडग्यात उतरविताना ती जिवंत आहे, असे आढळले.  स्मशानात नेलेली राणी राजाने पुन्हा स्वीकारणे शक्यच नव्हते. तिला थडगे खणणाऱ्या संडाला जातीतच ठेवून दिले व तिचे पोटी पुढे जो राजपुत्र झाला त्याला 'अशुभ राजा' हे नाव पडले.  त्याला संडालांचे मुख्य पद मिळून, स्मशानातील धार्मिक संस्कारात बौध्द फौंजीला (भिक्षूला) जी दक्षिणा मिळेल तितकीच ह्या राजवंशालाही मिळावी, असे राजशासन मिळाले.  ही दंतकथा मला पगाम येथील तुबायाझाच्या खेडयातील पाटलाने व सगाईन येथील एका सभ्य गृहस्थानेही स्वतंत्रपणे सांगितली.  कथा खरी असो नसो, ब्रह्मी चंडाल ऊर्फ संडाला लोक राजवंशाशी आपला संबंध कसा पोहोचवितात, हे ह्यावरून दिसते.  मलबारातील पुलया, चिरुमा ह्यांचाही अन्य रीतीने राजवंशाशी कसा संबंध येतो, हे मी हिंदुस्थानात पाहिलेले मला स्मरले.  तुबायाझा हे बहिष्कृत असले तरी कधी जित नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे.  संडाला, डूनसंडाला लोक मणीपूरच्या बाजूने हिंदू संस्कृतीच्या राजाने प्राचीन काळी ब्रह्मदेशात नेले असावेत.  याशिवाय माझा दुसरा तर्क धावत नाही.  अलीकडे दक्षिण हिंदुस्थानातील लक्षावधी परैया, पुलया इत्यादी अस्पृश्य जातींचे लोक पोट भरण्यासाठी, ब्रह्मदेशात अगदी हीन धंदा करून राहिले आहेत.  ते मुळीच बहिष्कृत नाहीत.  पण हे प्राचीन काळी गेलेले संडाला मात्र अद्यापि तुरळक तुरळक आपल्या जुन्या वतनाच्या गावी थडगे खणण्याचे आपले जुने वतनच चालवीत असलेले आढळतात; त्या अर्थी हे प्राचीन हिंदी संस्कृतीचे वतन प्राचीन हिंदी राजांनीच स्थापिले असेल असे माझे मत आहे.  विशेष तपशिलासाठी पुढे निरीक्षण नंबर १ व ३ पाहा.

केबा  :  पूर्वीप्रमाणेच हे महारोगी, अपंग, बेवारशी भिकारी लोक अजून मोठमोठया देवळांच्या वाटेवर याजना करीत बसलेले आढळतात.  असे अपंग याचना करीत बसलेले इटालीसारख्या प्राचीन अमदानीतल्या रोम व इतर क्षेत्रांच्या ठिकाणी मी युरोपातही प्रत्यक्ष पाहिले.  आमच्या हिंदुस्थानातल्या क्षेत्रांतल्या भिकाऱ्यांचा येथे उल्लेखही करण्याची गरज नाही.  हा वर्ग समाजबाह्य आहे.  ह्यात काहीच नवल नाही.  मंडालेपासून ८।१० मैलांवर असलेल्या मेंढाई नावाच्या खेडयाजवळ केबांची एक स्वतंत्र लहानशी वसाहत मी पाहिली.  ती मी पुढे एका निरीक्षणामध्ये विस्ताराने वर्णिली आहे.

चौथा वर्ग जो माफीचा गुन्हेगार तो हल्ली ब्रिटिश आमदानीत कोठेच आढळणे शक्य नाही.  पूर्वीच्या स्वराज्यात 'राजा कालस्य कारणम' हे तत्त्व जोरावर होते.  राजाची वैयक्तिक मर्जी संपादन केल्यावर 'प्यादाचा जसा फर्जी', तसाच सात खून करूनही आपली हुशारी दाखविणाराला माफी मिळून उलट शहर कोतवाली मिळविणारांची उदाहरणे पाहण्यासाठी संशोधकाला ब्रह्मदेशापर्यंत लांब जावयासही नको.  हल्लीच्या कोठल्याही लोकछंदानुवर्ती ब्यूराक्रसीच्या सी.आय.डी.मध्ये असले पाणीदार माफीबहादूर शोधीत बसल्यास मिळणार नाहीत, अशी कोण हमी घेईल ?  मात्र पूर्वीच्या ब्रह्मी स्वराज्यात अशा लोकांना दरबारात जरी वेतन मिळे, तरी तेवढयावरून समाजात त्यांना मान्यता न मिळता उलट बहिष्कार पडे, असे मी ब्रह्मदेशाच्या वाङमयात वाचिले आहे.  पॅगवे हे अशा पोलीस व जेलर लोकांना नाव पडण्याचे कारण, ह्यांच्या गालांवर ह्यांनी पूर्वी केलेल्या गुन्ह्यांची कायमची निशाणी म्हणून एक गोलाकार शिक्का मारलेला असे.  अलीकडच्या काही गुन्हेगारांना पाश्चात्त्य सुधारलेल्या सोन्याच्या तलवारी नजर करण्यात आल्या आहेत.  हा एक फरक जुन्यानव्यात ध्यानात धरण्यासारखा आहे.  एरवी पाणीदार गुन्हेगारांना उगाच शिक्षेत खितपत न टाकता आताप्रमाणेच पूर्वीही कोठे कोठे समाजकार्याला लावण्यात येत होते, हे त्या ब्रह्मदेशातील उदाहरणांवरून उघड होते.

तु-ङै-डो ह्या पाचव्या वर्गाचे प्रत्यक्ष निरीक्षण करावयाला मला वेळच मिळाला नाही म्हणून त्यांचे जास्त वर्णन मला करता येत नाही ह्याबद्दल मी दिलगीर आहे.  असो.

येथपर्यंत मी पाच बहिष्कृतवर्गाचा उल्लेख व वर्णन केले.  ब्रह्मदेशात जाईपर्यंत व गेल्यावरही कित्येक आठवडे तेथे आमच्या देशातल्याप्रमाणे ग्रामबहिष्कृतवर्ग असेल, अशी कल्पनाही माझ्या मनाला शिवली नाही.  पण वर सांगितल्याप्रमाणे अकस्मात मी जेव्हा असे वर्ग काही विवक्षित प्राचीन ठिकाणी आढळण्यासारखे आहेत असे ऐकले, तेव्हा मी त्यांचा फारच जारीने शोध चालविला.  दक्षिण ब्रह्मदेशातील पुराणमतवादी अशिक्षित ब्रह्मी लोकांकडून मला त्यांची थोडीबहुत माहिती मिळाली.  पण तीही उडवाउडवीनेच मिळू लागली.  म्हणून मी उत्तर ब्रह्मदेशात बौध्द धर्माचे खरे साधन पाहावयास गेलो असता खालील पाच खेडी मी ह्या निरनिराळया वर्गांची वस्तुस्थिती प्रत्यक्ष घरोघर जाऊन निरीक्षण करण्याकरिता निवडून काढिली.  त्यांपैकी तु-ङै-डो या (हलालखोर) वर्गाचे मात्र प्रत्यक्ष पाहण्यास मला वेळ मिळाला नाही.  पण बाकीच्या चार ठिकाणी मात्र मी चांगल्या सुशिक्षित जाणत्या ब्रह्मी दुभाष्याला घेऊन घरोघरी फिरून ह्या निराळया वर्गातल्या वृध्द आणि वजनदार लोकांना भेटून त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून व शिवाय प्रत्यक्ष स्थिती निरखून पाहून खालची सविस्तर टिपणे लिहिली आहेत.  ती माझ्या रोजनिशीवरून येथे थोडक्यात उतरून घेत आहे.  प्रोम शहराजवळीत खेडयात मात्र माझी जी खडतर निराशा झाली, ती पुढे दिलीच आहे.

येथे एक गोष्ट नमूद करणे मला अवश्य वाटत आहे की, ह्या बहिष्कृतवर्गाची स्थिती आता अगदी झपाटयाने सुधारत आहे.  आणखी दहापंधरा वर्षात, मला दिसली तितकी तरी कुटुंबे मी पाहिलेल्या स्थितीत पुढील संशोधकांस आढळतील की नाही याची मला जबर शंकाच वाटत आहे. फार तर काय, आता आताही ह्या बहिष्कृतवर्गांना त्यांच्या मूळ नावाने संबोधण्याचे मोठे शिताफीचे व धैर्याचे काम आहे.  ब्रह्मी लोकांचा स्वभाव अत्यंत चिडखोर, उतावळा व तापट आहे.  थोडया कारणावरून हे लोक वर्दळीला येऊन हातघाई करितात.  त्यामुळे दुभाष्याचे काम करून ही नसती उठाठेव करण्यास मला शांत व समंजस माणसे मिळणेही बऱ्याच वेळा मुष्किलीचे झाले; व पुष्कळदा अर्ध्या दमाच्या दुभाष्यांनी माझी ऐन वेळी निराशा करून माझा बेत ढासळून टाकला.  म्हणून माझा सर्व भार माझ्यावर किंवा वाटाडयावरच न टाकता अगोदर अनेक उपायांनी खालील ठिकाणच्या लोकांचा विश्वास मला संपादावा लागला.  ब्रह्मी लोक जितके उतावळे तितकेच भोळे व दिलदारही आहेत.  विश्वास बसल्यावर ते आपले सर्व हितगुज - आपल्या उलट असले तरी - मोकळया मनाने सांगतील, हा भरवसा मला अंतःकृत आधुनिक सुशिक्षणाने अर्धवट भाजून निघालेल्या ब्रह्मी लोकांच्या समागमाने जो आला नाही; तो तेथील बहिष्कृतांच्या समागमात आला.  हिंदुस्थानात काय किंवा कोठेही काय, वरिष्ठ म्हणून गाजलेल्यांपेक्षा त्यांनी पायाखाली तुडविलेल्या कनिष्ठ वर्गातच त्या राष्ट्रांच्या खऱ्या माणुसकीची व स्थानिक स्वभावाची लक्षणे सूक्ष्म संशोधकांना जास्त आढळून येण्यासारखी आहेत, हे मी निरनिराळया देशांतील आजन्म घेतलेल्या माझ्या अनुभवांवरून म्हणू शकतो !

निरीक्षण पहिले  :  सगाईन  -  सोमवार ता. १४ मार्च १९२७ रोजी चौथे प्रहरी ४ वाजता सगाईन शहरातून सगाईन टेकडीकडे जाण्यासाठी आम्ही उ माँ माँचे मोटारीतून निघालो.  ऐरावती नदीचे काठी मंडालेपासून ८-१२ मैलांवर हे शहर आहे.  माझेबरोबर रा. भिडे व वृध्द ब्रह्मी पेन्शनर गृहस्थ उ पो विन हे तुबायाझा ह्या लोकांची वस्ती दाखविण्यासाठी होते.  ह्या शहराच्या स्मशानाजवळ आम्ही मोटारीतून उतरलो.  तेथे सुमारे २०-२५ तुबायाझा लोकांची लहान वस्ती होती.  हे लोक स्मशानातील थडगी खणण्याचा धंदा व इतर मर्तिकासंबंधी कामे करितात.  हे लोक आपणांस फयाचून लोकांपेक्षा श्रेष्ठ समजतात.  फयाचून हे साधारण देवळी गुलाम असून तुबायाझा हे आपण राजवंशातील आहो असे समजतात; कारण 'याझा' हे यांच्या नावातील शेवटचे पद 'राजा' या शब्दाचा अपभ्रंश आहे.  'तुबा' हे 'शुभ' याचा अपभ्रंश आहे.  पूर्वी हा शब्द अशुभ असा होता, त्यातील 'अ' जाऊन शुभ-तुबा हा अपभ्रंश उरला.  ह्या राजवंशाने भिक्षेशिवाय दुसरा कोणताच धंदा करता कामा नये, ह्यामुळे ह्यांना केबा (मला मदत करा) हे नावही पडले, असेही कोणी सांगतात.  वस्ती एकंदरीत स्वच्छ व नीटनेटकी दिसली.  तरुण मुलींना लिहिता-वाचता येत होते.  वस्तीच्या मध्यावरील झोपडी चांगली प्रशस्त बंगलीवजा होती.  ती म्युनिसिपालिटीने बांधिली आहे.  या लोकांनी वस्तीत आपले स्वतःचे चांगले देवस्थान उभारले आहे.  त्यात म. गौतम बुध्दाच्या व नाटांच्या (भूत यक्षाच्या) पुष्कळ मूर्ती होत्या.  फौंजी (बौध्द भिक्षू) ह्यांच्याकडे जेवणाला, भिक्षेला व धार्मिक कृत्याला येत आहेत; तरी यांच्यात विशेष महत्त्वाकांक्षा दिसली नाही.  एकंदर स्थिती मागासलेली व करुणास्पद दिसली.  माझे बरोबरीचे उ पो विन हे वृध्द व श्रीमंत गृहस्थ असूनही ह्या लोकांबरोबर उघडपणे बसून जेवण्यासही आपण तयार आहो, असे म्हणाले.  ह्या लोकांना मी विचारले की, ''तुम्ही इतरांप्रमाणे सुशिक्षण मिळवून मोठी हुद्दयाची कामे कराल काय ?''  तेव्हा ह्या प्रश्नांचा अर्थच त्यांना कळला नाही.  कारण हे कसे घडेल ?  हे त्यांना अशक्य कोटीतले वाटले. एकंदर स्थिती अज्ञानाची, आत्मविश्वासाच्या अभावाची व अल्पसंतुष्टतेची दिसली.  पुष्कळ अंशी हिंदुस्थानातही हल्ली हाच प्रकार आहे !

निरीक्षण दुसरे  :  मेंढाई  -  ऐरावती नदीच्या किनाऱ्यावरील अमरपुरा शहराजवळ केबांचा हा गाव ता. १८ मार्च १९२७ रोजी शुक्रवारी सकाळी पाहिला.  ऐरावतीच्या किनाऱ्यापासून पूर्वेकडे एक मैलाच्या आत मेंढाई नावाचा सुमारे २५० लोकवस्तीचा एक गाव आहे.  त्याला लागून २-३ फर्लांगावर केबांची एक लहान वस्ती आहे.  ह्या वस्तीत सुमारे ५-७ झोपडया व त्यांत सुमारे २०-२५ बायका व पुरुष पाहिले.  सर्व कोष्टयांचा धंदा करतात.  गुजराथेत व नागपुराकडे धेड लोक नुसती खादी विणतात; पण हे केबा उत्तम रेशमी कापडही विणतात.  गुजराथेत तर ह्या अस्पृश्यांना विणकर असेच नाव आहे.  येथील केबा खाऊन पिऊन स्वतंत्र आहेत.  ते 'केबा' हे आपले नाव सांगत नाहीत, म्हणून माझ्या दुभाष्याला त्यांच्या स्वतःविषयी जातिवाचक माहिती विचारण्याचे धैर्यच होईना.  तथापि ते केबाच होते, याची त्याला खात्री होती.  पुढे आम्ही मेंढाई गावात जाऊन चौकशी केली.  मेंढाईचे लोकही सर्व विणकराचा धंदा करीत होते.  त्यांतील एका प्रमुख विणकराच्या घरी गेलो.  तो ब्रह्मी राष्ट्रीय शाळेत थोडयाच दिवसांपूर्वी शिक्षक होता.  हा मनुष्य उ उत्तमाच्या राष्ट्रीय पंथाचा आहे.  त्याने सांगितले की, जवळच्या केबांशी मेंढाईचे लोक संबंध ठेवीत नाहीत, तरी त्यांच्यात व मेंढाईचे लोकांत काही फरक नाही.  रोटी-बेटी किंवा भेटीव्यवहार होत नाही, याचा अर्थ ते अस्पृश्य आहेत, असे मुळीच नाही.  ब्रह्मदेशात अस्पृश्यता अशी पूर्वीही नव्हती, आता तर मुळीच नाही.  अशी विधाने जरी ह्या एका व्यक्तीने केली तरी पण ह्या बहिष्कृत लोकांना कोणी लग्नमुंजीत किंवा अशा सामाजिक प्रसंगी वरिष्ठ वर्ग भेटीव्यवहाराचे आमंत्रण करीत नाहीत, हा खरा प्रकार आहे.  पूर्वी त्यांना गावात येण्याचीही मनाई होती.  भिक्षेपुरते यावे, पुनः बाहेर जावे.  पण यांची स्थिती आता इतकी सुधारली आहे किंवा मनू पालटला आहे की, त्यांना कोणीही उघड आमंत्रण करीत नसले तरी त्यांना 'दूर सर' म्हणण्याची कोणाचीही छाती नाही.  फौंजीच्या शाळेत त्यांची मुले जाऊ शकत, पण सरकारी शाळेत कोठे कोठे जाऊ शकत नाहीत.  त्यांच्याकडे फौंजी भिक्षेलाही पूर्वी येत नसत, पण आता येताना मीच पाहिले.  फार काय, त्यांची ग्रामबाह्यता आता पुष्कळ ठिकाणी नष्ट होत चालली आहे.  धंद्यामुळे त्यांना पूर्वीच्या रिवाजाला चिकटून राहावे लागते.  स्थान व धंदा बदलला तर कोणी त्यांचे मूळ विचारीत नाही.  ते साधारण समाजात मिसळून जातात.  हिंदुस्थानच्या व ब्रह्मदेशाच्या बहिष्कारात हा विशेष फारक आहे की, हिंदुस्थानात ह्याला केवळ लौकिक व सामाजिक रूप आहे.  हिंदूंतील ब्राह्मणादी वरिष्ठ वर्ग बहिष्कार कडकडून पाळतात, पण ब्रह्मदेशात फौंजी ह्यांची भिक्षा आता सर्रास उघडपणे घेतात व त्यांना शाळांतून शिकवितात.  मात्र त्यांना पूर्वी फौंजीची दीक्षा मिळण्यास अडचण पडे; कारण ती दीक्षा देण्यापूर्वी तो मनुष्य स्वतंत्र पुरुष असावयास पाहिजे, दास स्थितीत असून चालायचे नाही, असा नियम आहे.  आता हे लोक स्वतःच फौंजी होऊ शकतात.  ब्रह्मदेशातला फौंजी व हिंदुस्थानातला वैदिकी करणारा ब्राह्मण ह्यांत असा फरक आहे.  ह्यानंतर मेंढाई येथील नाथाचे देऊळ पाहिले.  बौध्द धर्मापूर्वी ब्रह्मदेशात नाथ ऊर्फ नाट् म्हणजे भूत अथवा पिशाच ह्यांची पूजा चालत असे.  खालील व पुष्कळशा वरील वर्गातही ही अद्यापि चालू आहे.  नाथांची ही देवळे मी पुष्कळ ठिकाणी पाहिली.  ह्या देवळात दोन मूतीट आसनावर व एक घोडयावर बसलेल्या अशा पाहिल्या.  हे पूर्वी मुसलमान बंधू होते.  किनाऱ्यावर यांची नाव बुडाली, तेव्हा ते ब्रह्मी राजाच्या आश्रयाला राहिले.  ते मेल्यावर त्यांची ही देवळे क्षूद्र झाली.  मुसलमानाशिवाय सर्व लोक त्यांना भजतात.  वार्षिक यात्रा होते, तेव्हा ह्या गावासाठी एक रेल्वेचे स्वतंत्र स्टेशन करावे लागते.  ह्या (मुसलमान) नाथांची नावे श्वेफिजी श्वेफिगल अशी आहेत. कोणी प्रसिध्द पुरुष अपघाताने मेला तर त्याचे देऊळ होते, त्याला नाट म्हणतात.

निरीक्षण तिसरे  :  पगान  -  पगानचे दक्षिणेकडे एक मैलावर नदीकाठी टॉटवा नावाचे तुबायाझाचे एक स्वतंत्र खेडे आहे.  ते पगानच्या स्मशानालगतच आहे.  २६ मार्च रोजी शनिवारी सकाळी ९ वाजता मी प्रिन्सिपॉल उ सैन (लॅकर स्कूलचे) यांच्यासह तेथे गेलो.  गावात सुमारे ७० घरे व लोकसंख्या ४०० आहे.  ही तपासणी तीन तासांवर बारकाईने केली.  गाव नदीकाठावर असल्यामुळे पाण्याची सोय नैसर्गिक आहे.  म्युनिसिपालिटीची शहरातच विशेष सोय नाही, मग ह्यांना कोठून मिळणार ?  सर्वत्र शाळा नाहीत, पण फौंजीच्या शाळांत सर्वांबरोबर शिकण्यास ह्यांना हरकत नाही.  तेथे मुलामुलींचा भेद नाही, पण फौंजीच्या मठात मुलींना शिकता येत नाही.  येथे भिक्षुणींचा मठ नसल्याने मुली घरी शिकतात. दोनचार बायकांना लिहिता-वाचता येते.  ब्रिटिश राज्य होईपर्यंत ह्यांच्यावर कसलाही कर नव्हता.  कारण हे बहिष्कृतच होते.  आता कर आहेत पण त्यांचा उपयोग मात्र त्यांच्या उन्नतीकडे होत नाही.  हाच प्रकार हिंदुस्थानात आहे.  ब्रिटिश राज्याचा ''घेऊ जाणे, परि देऊ ना जाणे'' हा भोळेपणा सर्वत्र प्रसिध्दच आहे !  माझ्या समक्ष फौंजींना शिजलेल्या भाताचीच भिक्षा मिळाली.  थडगे खणणे, टेप विणणे, वैद्यकी करणे, शिवाय सर्वमान्य भिक्षा मागणे इत्यादी यांची हक्काची कामे आहेत.  कित्येक घरांची दारे लागलेली होती; कारण पुरुष, बायका, मुले भिक्षेस गेली होती.  भिक्षेचे तांदूळ स्वस्त दराने विकून रोख पैसा करितात.  मग त्यांनी इतर काबाडकष्ट का करावेत ? राहणी आमच्याकडील चांभारांपेक्षा पुष्कळ बरी दिसली.  तरी गावात घाणेरडेपणा, बागबगीचे, टापटीप यांची मिसळ दिसली.  सर्वसाधारण ब्रह्मदेशात घराभोवती पुष्कळ जागा असतेच.  त्यात कुंडयांतून गुंफा लावून फुलझाडे आणि भाजीपाला करण्याची चाल चहूकडे आहे.  ब्रह्मी लोक (बहिष्कृतांसह) फुलांच्या माळांचे मोठे शोकी !  या महारवाडयांसारखी काही स्वच्छ अंगणं व फुलांच्या वेलींचे मंडप मला हिंदुस्थानातील खेडयांतील ब्राह्मणांच्यासुध्दा परसांत आढळतील की नाही, याची शंकाच आहे !  तरी ह्या खेडयांत मला कुजलेल्या मांसाची दुर्गंधी येतच होती.  अशा खेडयांतून डुकरे कोठेच दिसली नाहीत, पण गावगुंड कुत्री मात्र ब्रह्मदेशात वतनदार-इनामदारांप्रमाणे वावरत आहेत.  जेथे जावे तेथे त्यांचे स्वागत आहेच !  नंतर आम्ही खालील ७ घरे बारकाईने पाहिली.

पहिले घर  :   वृध्द मालकीण बैलासाठी सुंभी काढण्या वळीत बसली होती.  इतरांप्रमाणे सर्व घर सहा फूट उंच खांबावर बांधिले होते.  ते सर्व लाकूड व बांबूंचे होते.  पक्ष्याच्या घरटयाप्रमाणे शोभत होते; हवेचा तोटा नव्हता.  पुढे पडवी, बाजूस सैंपाकाची खोली, नंतर माजघर, त्याचे बाजूस निजावयाची खोली, अशी प्रशस्त सोय होती.  प्रत्येक खोली अजमासे १२ x १० फूट लांबरूंद होती.  स्वयंपाकाची भांडी मातीची, माजघरात एक मोठा आरसा, भिंतीस पूर्वेकडच्या बाजूस पूजेसाठी बुध्दाचे चित्र, निजावयाचे खोलीत मच्छरदाणी असे सामान होते.  भिंती व जमीन बांबूच्या कुडांच्याच होत्या.  आई, मुलगा, सून अशी तीन माणसे.  पैकी मुलगा व सून भीक मागावयास गेली होती !  हे मध्यम प्रकारचे घर म्हणावयाचे.

दुसरे घर  :   मालक तरुण व धडधाकट होता.  धंदा भीक मागण्याचा.

तिसरे घर  :  मालकाचे वय ७३ वर्षे, त्याच्या बायकोचे वय ७७ वर्षे.  त्याचा पहिला मुलगा वय ५५, बायको व तीन मुले.  दुसरा वय ५०, बायको व तीन मुले.  तिसरा वय ४०, बायको व दोन मुले.  अशा एकंदर सोळा माणसांचे हे कुटुंब होते.  म्हाताऱ्याचा धंदा वैद्यकीचा, शिवाय भिक्षा ही आहेच.  मधला मुलगा दुसरीकडे आपल्या बायकोच्या घरी राहत होता.  नवराबायकोशिवाय सर्व माणसे भिक्षेला गेली होती.  कारण सकाळची भिक्षेची वेळ.  चमत्कार हा की, स्वतः भिक्षा मागणाऱ्या बहिष्कृतांचे घरी सर्वात पूज्य व श्रेष्ठ मानिलेला फौंजीवर्ग सकाळी भिक्षा मागायला येत होता.  घराला प्रशस्त व स्वच्छ अंगण होते.  मंडपात एक लाकडी मंचक होता.  बसावयाची ही आरामवाटिका होती. डाव्या बाजूस स्वतंत्र स्वयंपाकाची जागा होती.  हे पहिल्या प्रकारचे घर म्हणावयाचे.

चौथे घर  :   मालकाचे वय ५२, धंदा वैद्यकीचा, भिक्षा मागत नाही.  घर दोन मजली व मजबूत लाकडी होते.  बायकोचे
वय ४२, चार मुले.  कोणासही लिहिता-वाचता येत नव्हते.

पाचवे घर  :  मुख्य मालकीण नवार विणीत बसली होती.  नवराबायको व मुले.  राहावयास एकच खोली, हे कनिष्ठ प्रकारचे घर.

सहावे घर  :  मालक तरुण, ताजातवाना.  धंदा वैद्यकीचा.  बायको व तीन सुंदर मुले.  भिक्षा मागत नाही.

सातवे घर  :  हे सर्व खेडयात सुंदर होय.  सागवानी लाकडाचे, खालवर बांधिलेले, वारनीस केलेले, अगदी पेटीसारखे.  पण नवराबायकोचा धंदा केवळ भिक्षेचा !  भिक्षेला गेल्यामुळे घर बंद होते.  प्रशस्त अंगणही होते.

एक देवालय होते, ते गावकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने बांधिलेले.  पुढे सभामंडप होता.  गाभाऱ्यात उंच कट्टयावर बुध्दाच्या १० लहानमोठया मूर्ती होत्या.  त्या सर्व सोनेरी वर्खाने मढविलेल्या होत्या.  शिवाय दोन मूर्ती संगमरवरी दगडाच्या सुंदर होत्या.  चातुर्मास्यानंतर (नवंबरच्या सुमारास) वार्षिक महोत्सव होतो.  त्या वेळी पागान गावातील सर्व लोक देवास नैवेद्य आणितात.  त्यास मांस, मासे इ. सर्व प्रकार असतात पण देवळापुढे बळी मारला जात नाही.  गावात कॉलरा, देवी वगैरे आजार झाल्यास ह्यांतील एक मूर्तीचा छबिना शांतिप्रीत्यर्थ गावातून मिरविण्यात येतो.  येणेप्रमाणे मरीआईचे काम बुध्दाला आणि महारमांगाचे अधिकर ह्यांना आहेत.  हा सर्व हिंदू-परिणाम.  फौंजी येऊन ह्या लोकांच्या मुलांचे उपनयन-विधी ह्या सभामंडपात करितात.  ही मुले फौंजीच्या शाळेमध्ये इतरांबरोबर समान दर्जाने राहतात.  फौंजीच्या मठात भेदभाव नाही.  ह्या लोकांतील भिक्षुणी इतर भिक्षुणींच्या संघात राहू शकतात.  अशी एक भिक्षुणी सध्या आहे.

प्रिन्सिपाल सैन यांनी दुभाष्याचे काम उत्तम कौशल्याने व धोरणाने केले, म्हणून ह्या लोकांचा विश्वास आम्हांवर बसला.  त्यांनी आपला खरा वृत्तान्त सांगितला, एरव्ही उडवाउडवीच केली असती.  आम्ही जाऊ तेथे स्त्रीपुरुषांचा घोळका जमत असे.  नागडी, उघडी, शेंबडी मुले काखेत व जात्याच्या खुंटयाएवढा मोठा चिरुट तोंडात धरून धराचे लोट हवेत सोडीत.  बायका भोवताली जमत असत.  प्रथम ज्यांनी भुंकून हैराण केले तीच कुत्री तपासणी चालली असता पायाशी स्वस्थ निजून राहत.  जणू काय भुंकणारे वेगळेच होते !

शेवटी मी सभामंडपात मंडळीत बसावयास सांगून ब्राह्मसमाज आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन ह्यांवर सुमारे १५ मिनिटे व्याख्यान दिले.  ते प्रि. सैन यांनी ब्रह्मी भाषेत समजावून सांगितले.  मंडळींना ते आवडले.  असेच मिशन ब्रह्मदेशात काढावे, अशी त्यांनी कळकळीची इच्छा दाशविली.  प्रि. सैन 'आपण या कामी मदत करू' म्हणाले.  वेळवाच्या टोपल्यांवर लाख मढवून सुंदर भांडी करण्याच्या सरकारी शाळेचे ते प्रिन्सिपॉल आहेत.  त्याला लॅकर (लाख) स्कूल (शाळा) असे नाव आहे.  पण त्या शाळेत ह्यांच्या मुलांना घेण्यास मात्र ते तयार नव्हते.  कारण, यांची शाळा निघून तीन वर्षे झाली, तरी ती अद्यापि प्रयोगाचे अवस्थेत आहे.  यांची मुले असल्यास वरिष्ठ वर्गाची मुले शाळा सोडतील ही त्यांना अद्यापि भीती आहे !  ही सर्व तपासणी व माझे डिप्रेस्ड क्लासेस मिशन, प्रि. सैनच्या पत्नीला फार आवडले.  दोन प्रहरी पत्ते खेळताना जिने जो पैसा जिंकला होता तो सर्व ह्या कामासाठी घ्या, असे म्हणाली !

निरीक्षण चौथे  :  न्याँऊ

२७ मार्च १९२७ रविवारी सकाळी ९ वाजता आम्ही पश्चिम न्याँऊ येथे पोहचलो.  श्वेझिंगो पगोडा पाहिला.  हा; अनिरुध्दाने (इ.स. १०४४-१०७७) बांधण्यास सुरुवात केली.  याची पूर्ती त्याचा समजला गेलेला मुलगा कॅझिटा ह्या राजाने (इ.स. १०८४-१११२) केली.  अनिरुध्दाने थाटूनच राजा मनुहा ह्याला युध्दात जिंकून त्याच्या सगळया प्रजेला कैदी करून पगानला आणिले.  मनुहाने इ.स. १०५९ त 'मनुहाचे देऊळ' म्हणून प्रसिध्द असलेला पगोडा पगानमध्ये बांधिला.  शेवटी त्याला असे मोकळे ठेवणे इष्ट न वाटल्यामुळे अनिरुध्दाने त्याच्या कुटुंबातील सर्व माणसे व त्याचे सर्व लहानथोर चाकर व अनुयायी यांना देवळी गुलाम करून त्यांचा सामाजिक दर्जा अत्यंत क्रूरपणे अतिशय नीच करून टाकिला.  श्वेझिंगो देवळाची झाडलोट करण्याचे कामावर इतरांप्रमाणे मनुहाची नेमणूक झाली.  त्यापूर्वीही देवळी गुलाम होतेच.  मात्र मनुहाच्या वंशाला अशा देवळी गुलामांचे 'राज्यपद' देऊन दुःखावर अपमानाचा डाग दिला.  अगदी आतापर्यंत श्वेतछत्र, पायात सोन्याच्या कलाबतूचा जोडा, घराला सरळ उभा जिना इ. राजचिन्हे मात्र मनुहाच्या वंशजास अद्यापि कायम आहेत.  मात्र त्यांना देवाचा नैवेद्य व देव्हाऱ्यावरच्या देणगीशिवाय उपजीविकेचे साधन दुसरे नव्हते.  हे त्यांना पूर्वी मुबलक मिळत असावे. एरव्ही त्यांना अशा लवाजम्याने कसे राहता येईल ?

अशा देवळी नोकरांना फयाचून-देऊळ +  नोकर अशी संज्ञा आहे.  तुबायाझा आणि फयाचून हे एकमेकांस महाराष्ट्रातील महारांमांगांप्रमाणे  कमी लेखतात.  तुबायाझांचे म्हणणे, आपण कधी जिंकलेले गुलाम नव्हतो.  फयाचुनांपैकी मनुहाच्या खानदानी अनुयायांचे म्हणणे तर उघडपणेच आपण श्रेष्ठ असून कोणतेही हलके काम आपण केले नाही.  पण ज्या अर्थी ते जिंकलेले गुलाम आहेत, त्या अर्थी कोणी त्यांच्याकडे तिरस्काराशिवाय पाहणार नाहीत. आम्ही ह्या गावी या लोकांचा राजा म्हणा, पाटील म्हणा, जो होता, त्याची भेट घेतली.  त्याचे नाव उ बा ल्विन (Ubalwin) वय २७.  हल्ली हा आपल्या बायकोचे घरी राहतो.  तिचा बाप खाऊनपिऊन सुखी व स्वतः रुबाबदार दिसला.  बायकोच्या माहेरचे मध्यम प्रकारचे दुकान व तिच्या बापाचा वैद्यकीय धंदा आहे.  घर दोन मजली व भोवताली स्वच्छ अंगण, लतामंडप, भोवताली कुंडयांतून फुले दिसली.  उ बा ल्विन आता फयाचून गावचा राजा अथवा थजी ऊर्फ पाटील झाला आहे.  ह्यांनी सरकारी रजिष्टर काढून दाखविले.  त्यावरून ह्या फयाचून वाडीत ५०९ घरे आहेत, असे आढळले.  लोकसंख्या सुमारे २००० असावी.  ह्या गावासाठी एक सरकारी प्राथमिक मोफत शाळा आहे.  पण ह्या लोकांवरचा बहिष्कार पूर्वीप्रमाणे आता कडक नाही.  ह्यांच्या विहिरींतील पाणी वरचे वर्ग खुशाल पितात.  उघड रोटीबेटी व भेटीव्यवहार मात्र अद्यापि होत नाहीत.  ह्यांच्यापैकी बरेच लोक दुसरीकडे खाऊनपिऊन सुखी आहेत, व ते बिनबोभाट वरच्या वर्गात मिसळून जातात.


पक्कोक म्हणून एक जिल्ह्याचा गाव आहे.  तेथे एक गृहस्थ ४०५० हजारांचे मालक आहेत.  ते म्युनिसिपालटीचे सभासद आहेत.  घरी स्वतःच्या मोटारी आहेत.  लाखेची भांडी व इतर बरचे धंदे करितात.  तुबायाझाप्रमाणे थडगी खणणे व भिक्षा मागणे हे ते करीत नाहीत.  मात्र देवळाचे दारांतून फुले, मेणबत्त्या, उदकाडया, पंखे वगैरे विकणाऱ्या दुकानांची जी रांग असते, ती ह्याच लोकांची.  नंतर आम्हाला उ बा ल्विन यांनी पगानचे रस्त्याचे पश्चिम बाजूकडील वाडीत असलेला आपला वंशपरंपरागत खास वाडा दाखविला.  हा खरोखरच आमच्याकडील खेडयांतील एकाद्या श्रीमंत पाटलास शोभण्यासारखा आहे.  वाडयाच्या नैर्ॠत्य कोपऱ्याला लागून एक लाकडी मनोरा दिसला.  तो सर्व घरांपेक्षा उंच होता.  ह्यावर रखवालदार बसून रात्री पहारा करण्याची ही जागा.  वाडा इतर घरांप्रमाणे खांबाच्या एका मजल्यावर उभा होता.  सर्व घर एकच मजली पण भक्कम व रुबाबदार दिसले.  पूर्वी ह्याला दोन जिने (एक समोर व दुसरा आडवळणाचा भिंतीला समांतर असा) होते.  समोरचा जिना पडल्यामुळे आता दिसत नाही.  ह्या समोरच्या जिन्याच्या पायऱ्या चढण्यास मात्र देशाच्या बादशहाशिवाय इतराला अधिकार नसे.  सफाईदार सागवानी लाकडाचे सर्व काम होते.  खिडक्यांना व्हेनिशिअन शटर्स (झडपे) होती.  दरवाजे विशेष सफाईदार दिसले.  दिवाणखाना, निजण्याच्या खोल्या, स्वयंपाकघर ही सर्व ऐसपैस, उंच व रुंद होती.  एक मोठा रुंद लाकडी पलंग व त्यावर सुंदर मच्छरदाणी होती.  घरातील चटयाही खानदानी थाटाच्या होत्या.  थाट एकंदरीत मोडकळीस आलेल्या इनामदारीचा दिसला, हे पाहून वाईट वाटले.

उ बा ल्विन पाटलाची आई ६० वर्षांची वृध्द आहे.  तरी तिचे वय दिसण्यात सुमारे ५० वर्षांचे दिसले.  चेहरा शांत, प्रसन्न, खानदानीचा दिसला.  तिचे सर्व दात स्वच्छ, बळकट, डोळे मोठे व पाणीदार दिसले.  हिचा नवरा उ नान पाटील मरून आता १८ वर्षे झाली, असे तिने सांगितले.  त्याच्या मागे तिच्या दोन मुलांना पाटीलकीची वस्त्रे मिळाली.  तेही वारल्यामुळे सर्वात लहान मुलगा उ बा ल्विनला आता पाटिलकी मिळाली आहे.  मी हिंदुस्थानातील एका उदार (ब्राह्म) धर्माचा प्रचारक - विशेषतः निकृष्ट वर्गाचा एक सेवक - आहे, असे तिला सांगण्यात आले होते.  त्यामुळे ह्या देशातील फौंजीपुढे जमिनीवर लवून त्रिवार नमस्कार करितात, असा तिनेही मला नमस्कार केला.  आमचे संभाषण चालले असता तिने माझे काम व हृद्गत लवकर ताडले.  त्यामुळे तिचे पाणीदार डोळे दाबून ठेविलेल्या विरळ अश्रूने स्निग्ध झालेले दिसू लागले.  शेवटी सरकारला सांगून आपली काहीतरी दाद लावा, अशी स्पष्ट विनंती केल्यावाचून तिला राहवेना.  हे माझ्या हातून ह्या धावत्या सफरीत आणि उतार वयात कसे व्हावे, हे आठवून मीही किंचित गडबडलो.  मी केवळ मनःपूर्वक आशीर्वाद देऊन माझे समाधान करून घेतले.

दक्षिण ब्रह्मदेशात मोलमेनच्या उत्तर किनाऱ्यालगत थटून हे शहर इतिहासप्रसिध्द आहे.  ह्या स्थानी दक्षिणेकडील सिंहली हीनयान बुध्द धर्माची पहिली उठावणी झाली.  येथे कांची येथूनही बुध्द धर्माची लाट आली.  येथील राजे आंध्र वंशातील हिंदी क्षत्रिय कुळातील असून तेलंग ह्या नावाने एक हजार वर्षांपूर्वी त्यांचा दबदबा साऱ्या ब्रह्मदेशात होता.  पण इ.स. १०५० चे सुमारास पगानचा ब्रह्मी राजा अनिरुध्द याने थटून राज्यावरून सफाईने नांगर फिरवून ह्या क्षत्रियांना आता अत्यंत हीन बनविलेले प्रत्यक्ष पाहण्याची पाळी माझ्यावर आली !  इतिहासाची पुनरावृत्ती चहूकडेच होते.  आमच्या देशात ज्या आज महार, मांग, पारिया, चिरुमा, नामशूद्र, इ. अनेक नावांच्या जाती आहेत, त्यांनीही एके काळी राजवैभव भोगिले, असे माझ्या संशोधनात आढळले आहे.  पण इतका अलीकडचा उघड पुरावा मला आजवर मिळाला नव्हता; त्यामुळे मला संशोधनाच्या दृष्टीने आनंद होत होता, किंवा मानवी स्वभावातील आनुवंशिक विषारीपणाचा मासला प्रत्यक्ष पाहून दुःख होत होते, हे उघड सांगण्यात काही तात्पर्य नाही.  मी करीत आहे हे कार्य पवित्र आहे, एवढेच मला पुरे आहे. 

निरीक्षण पाचवे  :  शुक्रवार ता. १ एप्रिल १९२७ रोजी सायंकाळी प्रोम येथील श्वेमानडो ह्या मुख्य पगोडाच्या बाजूस असलेला तुबायाझांचा गाव पाहिला.  गाव गरीब लोकांचा दिसला.  गाव दाखवावयास एक इंग्रजी जाणणारे ब्रह्मी गृहस्थ बरोबर होते; परंतु ह्या खेडयात शिरून चौकशी करण्याचे त्यांना धैर्य झाले नाही.  एखाद्याची खासगी चौकशी करण्याची ब्रह्मी लोकांस फार भीड व भीती वाटते, असे दिसते.  मोलमेनमध्ये मला हाच अनुभव आला.  ह्या गृहस्थांनी मला मुकाटयाने गावापासून दूर नेले.  मला ब्राह्मी येत नसल्याने स्वतः चौकशी करिता आली नाही व हे गृहस्थ तर फारच भित्रे दिसले.  माझी खडतर निराशा झाली.  तेव्हा मी जवळच्या पगोडयात गेलो.  तेथे एका वृध्द गृहस्थाजवळ थोडी चौकशी केली.  'हे तुबायाझा आहेत' ह्यापलीकडे हे गृहस्थ काही सांगू शकले नाहीत.

येणेप्रमाणे ब्रह्मदेशातील मूळ बहिष्कृतवर्गांची हल्लीची स्थिती आहे. हिंदुस्थानातून अलीकडे गेलेले अस्पृश्य जातींचे लोक ब्रह्मदेशात ठिकठिकाणी पोटासाठी अनेक हलकीसलकी व काबाडकष्टाची कामे करून पुष्कळ आहेत.  पण हे बहिष्कृत नाहीत.