बहिष्कृत भारत

ह्या पृथ्वीवर सर्व मनुष्यजातीच्या इतिहासात जरी कोठे कधी कोणावर प्रचंड बहिष्कार घालण्यात आला असेल आणि जो पुरातन काळापासून चालत येऊन आज पूर्ण दशेला पोहचला असेल, तर तो ह्या भरतखंडातील नीच मानिलेल्या जातीवरचा भयंकर बहिष्कारच होय !  भारतवासियांनो, स्वार्थाला, मानवजातीला आणि ईश्वराला स्मरून हा घातकी, पाती आत्मबहिष्कार नाहीसा करा.


मायो

सुमारे* एक हजार वर्षांपूर्वी गुजराथ देशाची पाटण नामे राजधानी होती.  तेथे इ.स. १०९४-११४३ पर्यंत सिध्दराजा नावाचा राजा राज्य करीत होता.  त्याने एकदा सहस्त्रलिंग नावाचा एक मोठा तलाव बांधण्यास सुरुवात केली.  पण काही केल्या तलावात पाणी म्हणून ठरेना.  तेव्हा धर्माचार्याच्या सूचनेवरून राजाने कोणा तरी एकास बळी देण्याचे ठरविले.  देवो दुर्बल घातक ...., बली देण्याकरिता मायो नावाच्या एका धेडास आणून उभे करण्यात आले.  शिरच्छेद करतेवेळी ''शेवटची काय मागणी असेल ती माग !''  अशी आज्ञा होताच मायो गहिवरून म्हणाला, ''महाराज, माझा हा नीच देह सार्वजनिक हिताकडे लागणार ह्याबद्दल मला आनंदच होत आहे.  माझ्या तिरस्कृत जातिबांधवांवर आपण एवढीच कृपा करावी की, आजपर्यंत त्यांना शहरापासून दूर अंतरावर जंगलात राहावे लागत आहे आणि त्यांच्या नीचपणाची खूण म्हणून त्यांना निराळाच पोशाख करावा लागत आहे.  तसे ह्यापुढे होऊ नये, त्यांना शहराजवळ राहण्याची परवानगी असावी.''

----------------------------------------------------------
* मासिक मनोरंजन, १९०८
* मुंबई गझेटियर, काठेवाड, पुस्तक ८, पान १५७ मा.म.२१.
-----------------------------------------------------------

सिध्दराजाने ही विनंती मान्य केली आणि मायोने आनंदाने प्राण सोडला.

वाचकहो, ही साडेसातशे वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट वाचून आपल्याला आज काय सुचते ?  आपल्या ह्या चमत्कारिक देशात जातिभेदरूपी सहस्त्रलिंग म्हणजे दुहीच्या हजारो खुणा किंवा लहरी दाखविणारा जबरदस्त तलाव आहे.  आज हजारो वर्षे ह्यातले पाणी स्थिर आहे, पण ह्याच्या तळाशी गाळामध्ये मायोचे असंख्य, नीच मानिलेले जातिबांधव जिवंत आणि वंशपरंपरेने रुतले आहेत.  मायोच्या स्वार्थत्यागाने किंवा सिध्दराजाच्या मेहेरबानगीने ह्या जाती जरी नगराजवळ राहू लागल्या आहेत, तरी नगरवासी होण्यास, अर्थात सुधारलेल्या जगात राहण्यास त्यांना अद्यापि ह्या विसाव्या शतकातही परवानगी मिळालेली नाही.  ह्यांना अद्यापि अस्पृश्यच ठेवण्यात आले आहे.


अंत्यज हे कोण आहेत ?

महार, मांग, धेड, पारिया, नामशूद्र इत्यादी ज्या अगदी नीच मानिलेल्या जाती सर्व हिंदुस्थान देशभर आढळतात, त्यांना ओळखण्याकरिता अद्यापि चांगलेसे एक सर्वसाधारण नाव प्रचारात आलेले नाही, आणि तसे एखादे नवीन नाव कल्पून प्रचारात आणणे हेही काही सोपे नाही.  मुंबई शहरात म्युयनिसिपालिटीच्या ह्या लोकांकरिता ज्या स्वतंत्र शाळा आहेत, त्यांना 'निराश्रित शाळा' असे नाव देण्यात आले आहे.  त्याला अनुसरून ह्या शहरात 'प्रार्थना समाजा'च्या लोकांनी ह्या लोकांच्या साहाय्याकरिता जे एक मिशन काढिले आहे, त्याच्या शाळेलाही 'निराश्रित शाळा' असे म्हटले आहे, परंतु खरे म्हटले असता निराश्रित हे नाव ह्या मंडळीस अगदी अन्वर्थक आहे असे नाही.  Depressed Classes ह्याचे मराठीत शोभेलसे रूपांतर होण्यासारखे नाही.  ह्या सर्व वर्गांचे एक मुख्य आणि साधारण लक्षण अथवा खूण म्हटली म्हणजे 'अस्पृश्यता' ही होय.  ह्यांना शिवून घेण्यात येत नाही.  म्हणून ह्यांना अस्पृश्य ह्या नावाने ओळखावे, तर तो शब्दही चांगलासा प्रचारात नाही व तितका साधा आणि सोपाही नाही.  पंचम हे अलीकडे मद्रास इलाख्यात ह्या वर्गाला नवीन नाव देण्यात आले आहे, आणि ते यथार्थ असून त्यात कोणत्याही प्रकारचा तिरस्कार ध्वनित होत नाही.  पण ते नाव ह्या प्रांती प्रचारात नाही.  अंत्यज हा शब्द मात्र बराच व्यवहारातला आहे.  पण हे लोक खरोखरच सर्वांच्या शेवटी जन्मले, अशातला मुळीच प्रकार नव्हे.  म्हणून हे नाव त्यांच्यापैकी पुष्कळांना आवडण्यासारखे नाही.  तथापि वरील सर्व अडचणींचा विचार करिता एकंदरीत तूर्त लेखनव्यवहाराच्या सोईसाठी अंत्यज हेच नाव नाइलाजाने पसंत करावे लागत आहे, आणि अंत्यज म्हणजे त्यांचा दर्जा हिंदू समाजात अगदी खालच्या प्रतीचा अथवा शेवटचा समजला जात आहे असे लोक, एवढाच अर्थ प्रस्तुत विषयासंबंधी ह्या नावाचा घेतला आहे.


व्याप्ती

आता प्रथम ह्या अफाट हिंदुस्थानातील अनेक धर्मांच्या, असख्ंय जातींच्या जनसमूहामध्ये ह्या अंत्यज वर्गांची व्याप्ती किती आहे, व अंत्यज ह्या सदराखाली कोणकोणत्या जाती येण्यासारख्या आहेत व त्या कोणत्या कारणांनी येतात, ह्याचा विचार करू.  एकंदर हिंदी जनसमूहाकडे पाहिले असता त्याच्यामध्ये इतका विचित्रपणा व विस्कळीतपणा दिसून येतो की, कोणत्याही दृष्टीने एका विवक्षित कारणासाठी ह्या जनसमूहाचे नीटसे वर्गीकरण करू म्हटले असता जवळजवळ अशक्यच वाटते.  तथापि, आपण हल्ली प्रचारात असलेले सर्व जातिभेद व वर्गभेद घटकाभर बाजूस ठेवून केवळ विद्या, आचार, विचार व गृहस्थिती इत्यादी मिळून एकंदरीत सामाजिक दर्जाच्या दृष्टीने पाहता ह्या अफाट जनसमूहाचे ठोकळमानाने पाच वर्ग करता येण्यासारखे आहेत.

१ ला. वरिष्ठ वर्ग  :  त्यात मोठमोठे अधिकारी, सरदार, मानकरी, मोठमोठे व्यापारी वगैरे बडया लोकांचा समावेश होतो.

२ रा. मध्यम वर्ग  :  ह्यात साधारण नोकऱ्या करणारे, कलाकौशल्याची काम करून उदरनिर्वाह करणारे, लहान-लहान दुकानदार व आपल्या मालकीची शेती करणारे वगैरे पांढरपेशांचा समावेश होतो.

३. रा. कनिष्ठ वर्ग  :  आपल्या पोटासाठी केवळ काबाडकष्ट करणारे, उदाहरणार्थ न्हावी, धोबी, साळी, माळी, स्वयंपाकी, पाणक्ये, शागीर्द, कुणबी इत्यादिकांचा ह्या वर्गात समावेश होतो.

वर सांगितलेल्या तिन्ही वर्गांचा हिंदी समाजात समावेश होतो.  लग्नकार्य झाले तर ब्राह्मण सरदार आणि युरोपियन अधिकाऱ्यांपासून तो अगदी कनिष्ठ नोकरांपर्यंत सर्व एकाच दिवाणखान्यात जमू शकतात.  एखादी सभा अगर व्याख्यान झाले तर वरील तिन्ही वर्गांपैकी कोणीही सारख्याच हक्काने येऊ शकतो व त्यांना कोणीही मनाई करू शकत नाही.  रोटीबेटीव्यवहाराचा भाग मात्र निराळा.  त्या दृष्टीने पाहता हिंदी समाजातच काय, पण हिंदुसमाजात व त्यातल्यात्यात कोणत्याही एका नाव घेण्यासारख्या मुख्य जातीतदेखील एकोपा नाही.  पण सार्वजनिक किंवा एखाद्या विशेष खासगी प्रसंगी एकत्र बसणे, उठणे हा जो साधारण सार्वजनिक व्यवहार आहे, त्यात वरील तिन्ही वर्गांचा सारखाच समावेश होतो. इतकेच नव्हे, तर अगदी कनिष्ठ वर्गातला एखादा न्हावी, धोबी जर आपल्या अंगच्या करामतीने आपली विद्याचारसंपन्नता वाढवील, तर त्याला सभेसारख्या सार्वजनिक ठिकाणीच नव्हे, तर लग्नकार्यासारख्या घरगुती प्रसंगीही मानपान देण्यास हल्ली जुन्या चालीचादेखील कोणी गृहस्थ कचरत नाही.  उलट, जर कोणी वरच्या वर्गातल्या मनुष्याने आपल्या बेअकलीपणाने आपली सर्व विद्याचारसंपन्नता घालविली, तर तो वरील मानपानास खास मुकतो; पण तोसुध्दा एकत्र बसण्या-उठण्याच्या सामाजिक हक्काला मुकत नाही.

४ था.  हीन वर्ग :  ह्यात महार, मांग, पारिया, शिक्लिया, नामशूद्र, डोंब, धेड, मेहतर, मिरासी, इत्यादी अनेक नीच मानिलेल्या जातीचा समावेश होतो.  हा वर्ग हिंदी समाजाला लागून पण समाजात नाही असा आहे.  समाज ह्यांजवर काही बाबतीत अवलंबून आहे व ह्या वर्गाची उपजीविकाही समाजावरच चालते.  हा वर्ग हिंदी साम्राज्याची कर देणारी रयत आहे.  हिंदी राष्ट्राचा योगक्षेम चालवीत आलेला हा घटक आहे; पण असे असून हिंदी समाजात वरील तीन वर्गांप्रमाणे ह्याचा मुळीच समावेश होत नाही.  हा वर्ग हीन आहे म्हणून समाजबाह्य आहे.  किंवा समाजबाह्य आहे म्हणून हीन आहे, ह्याचा विचार पुढे करू.  पण सध्या वस्तुस्थिती एवढीच ध्यानात घ्यावयाची आहे की, राष्ट्राचा हा एक घटक असून समाजबाह्य आहे.

५ वा. अलग वर्ग  :  ब्रिटिश राज्य व एतद्देशीय संस्थाने ह्यांच्या सरहद्दीवर डोंगरांतून व जंगालांतून राहणारे कोंग, शिकलगार, चिगलीबगली, भिल्ल, खोंड, संताळ वगैरे अर्धवट रानटी जातीचां ह्यात समावेश होतो.  हिंदी राष्ट्राशीच मुळी ह्या वर्गाचा अद्यापि संबंध जडला नाही.  हे वर्ग सरकारची रयत नाहीत.  आपल्या पंचायती ते स्वतःच करितात.  शिकारीवर पोट भरले नाही तर परकीयाप्रमाणे आपल्याजवळचा काही ओबडधोबड माल गावखेडयांतून विकून परत जंगलांत शिरतात व तेथे परस्परांशी व सर्व हिंदी समाजाशी अगदी तुटून राहतात.

वर जे स्थूलमानाने आपण पाच वर्ग केले, त्यांत ह्या विशाल भरतखंडातील हल्ली राहत असलेल्या सर्व मनुष्यप्राण्यांचा समावेश होत आहे.  प्रस्तुत विषयाच्या दृष्टीने पाहता ह्या पाच वर्गांचे तीन मुख्य भेद होतात.  ते असे :

पहिले तीन म्हणजे वरिष्ठ, मध्यम, कनिष्ठ हे वर्ग हिंदी साम्राज्यांतर्गत असून समाजांतर्गतही आहेत, म्हणून ते तिन्ही मिळून एक मुख्य भेद समजण्यास काही हरकत नाही.  चवथा जो हीन वर्ग, तो हिंदी साम्राज्यांतर्गत आहे.  तथापि समाजबाह्य आहे म्हणून तो निराळा दुसरा मुख्य भेद समजला पाहिजे.  पाचवा जो अलग वर्ग तो साम्राज्यबाह्य आणि समाजबाह्य आहे म्हणून तो तिसरा मुख्य भेद होय.

आता मधला मुख्य भेद जो साम्राज्यांतर्गत असून समाजबाह्य आहे, त्यालाच आपण प्रस्तुत लेखाच्या केवळ सोयीसाठी प्रचारात असलेले अंत्यज हे नाव दिले आहे.  ह्याच वर्गाच्या अवनत स्थितीसंबंधी आमचा आजचा लेख आहे.  ह्या गरीब जाती खरोखरच अंत्यज आहेत असे आम्हांला मुळीच वाटत नाही, इतकेच नव्हे, तर ह्या अमंगल आणि अन्यायमूलक नावाचा प्रचार होता होईल तो लवकर बंद व्हावा अशी आमची इच्छा आहे.  म्हणूनच ह्या निबंधाच्या मथळयात ह्या नावाचा प्रवेश होऊ न देण्याची आम्ही काळजी घेतली आहे.


मूळ

आपल्या देशात महार, मांग, चांभार, पारिया इत्यादी ज्या अनेक नीच मानिलेल्या जाती आहेत, त्यांची बरोबर मूळपीठिका शोधून काढण्यास येथे अवकाश नाही, आणि प्रस्तुत तशी जरुरीही नाही.  ह्यासंबंधी प्राचीन शास्त्रांत आणि हल्ली पाहण्यात व ऐकण्यात येणाऱ्या काही थोडया ढोबळ गोष्टींचा निर्देश केला म्हणजे पुरे आहे.  आमच्या आद्य श्रुतीमध्ये व त्यानंतरच्या भगवद्गीतेमध्ये चारच वर्ण सांगितले आहेत.  मध्यंतरीच्या स्मृतीमध्ये मनूने १० व्या अध्यायात स्पष्ट म्हटले आहे :

ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यस्त्रयो वर्णा द्विजातयः ।
चतुर्थ एकजातिस्तु शूद्रो नास्ति तु पंचमः ॥४॥

अर्थ :  ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीन वर्ण दोनदा जन्मतात, म्हणजे एकदा सृष्टिक्रमाने व मागून उपनयनसंस्काराने.  शूद्र सृष्टिक्रमाप्रमाणे एकदाच जन्मतो, ह्या चारीपेक्षा पाचवा असा वर्णच नाही.

म्हणजे चंडाल म्हणून जो वर्ग आहे, तो वरील चार जातींचीच कशीतरी भेसळ होऊन झाला आहे, हे त्याच अध्यायातील पुढील श्लोकावरून उघड होते.

शूद्रादायोगवः क्षत्ता चंडालश्चाधमो नृणाम् ।
वैश्यराजन्यविप्रासु जायन्ते वर्णसंकराः ॥१२॥

अर्थ :  शूद्र पुरुष आणि त्याच्यावरील वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण जातींतील स्त्री ह्यांच्यामध्ये प्रतिलोम म्हणजे उलटया शरीरसंबंधामुळे जी प्रजा होते तिला अनुक्रम अयोगव, क्षत्ता आणि चंडाल अशी नावे आहेत, त्यात शूद्र आणि ब्राह्मणी ह्यांची संतती जी चांडाल; तिला अत्यंत नीच मानून अस्पृश्य ठेवण्यात आले आहे.

मनूने वर्णसंकराचा जो निषेध केला आहे, तो प्रतिलोमाचाच म्हणजे खालच्या जातीचा पुरुष आणि वरच्या जातीची स्त्री ह्यांच्या संबंधाचाच केला आहे.  ह्याच्या उलट जो अनुलोमसंकर त्याचा निषेध केला नाही.  स्मृतीत स्पष्ट म्हटले आहे :

शूद्रायां ब्राह्मणाज्जातः श्रेयसा चेत्प्रजायते ।
आश्रेयान्श्रेयसी जातिं गच्छत्यासप्तमादयुगात ॥
शूद्रो बा्रह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम ।
क्षत्रियाज्जातमेव तु विद्याद्वेश्यात्तथैव च ॥६५॥

अर्थ :  शूद्र कन्येला ब्राह्मणापासून कन्या झाली, त्या कन्येला पुनः ब्राह्मणापासून कन्या झाली आणि अशा सात पिढया झाल्यावर जी संतती होईल, ती अगदी ब्राह्मणच उपजली असे होय.  ह्याप्रमाणे शूद्राचा ब्राह्मण व ब्राह्मणाचा शूद्र बनतो.

ह्यातील तत्त्व असे मानिले गेले आहे की, स्त्रीपेक्षा पुरुषाचे अर्थात क्षेत्रापेखा बीजाचे सामर्थ्य श्रेष्ठ, म्हणून प्रतिलोमापेक्षा अनुलोम संकर श्रेष्ठ आणि प्रतिलोमातही शेवटी शूद्र आणि ब्राह्मणी ह्यांच्यांतील संकर तर अत्यंत अधम होय.  तो करणे गुन्हा समजून त्याला अस्पृश्यत्वाची शिक्षा दिली आहे.


गुन्हा आणि कडेलोटाची शिक्षा

असो.  हा गुन्ह्याचा विचार एकीकडे ठेवला तर वस्तुतः पाहता शुद्र पुरुष व ब्राह्मणकन्या ह्यांची संतती केवळ शूद्र संततीपेक्षा अधिक श्रेष्ठ असली पाहिजे.  मात्र येथे ब्राह्मण, शूद्र इत्यादी जातींचा दर्जा ठरवावयाचा तो केवळ गुणधर्माप्रमाणेच ठरविला पाहिजे.  ह्या दृष्टीने पाहता, आज अंत्यज मानिलेले सर्व लोक वर सांगितल्याप्रमाणे जर खरोखरच शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्रिया यांच्या संबंधापासून उत्पन्न झालेले असते आणि त्यांना आजपर्यंत असली जबर शिक्षा भोगावी लागली नसती, तर त्यांची स्थिती आजच्या केवळ शूद्रांपेक्षा खात्रीने उच्च दिसू आली असती.

मद्रासेकडील कर्नल आलकाटच्या पारिया शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेतील इतरांच्या मानाने दिसून येणारी प्रगती आणि वऱ्हाड व मध्यप्रांतातील रेल्वेची कंत्राटे वगैरे घेऊन, पुढे सरसावलेल्या काही महार मंडळीची अलीकडे झालेली सुस्थिती, ह्या गोष्टी लक्षात घेता असे दिसून येते की, ह्या तिरस्कृत वर्गांना योग्य रीतीने थोडीशी सवलत किंवा मदत मिळाली असता त्यांच्या अंगी बराच काळ दबून गेलेले चांगले गुण लवकर विकास पावू लागतात, पण तसा सुयोग फारच विरळा.  एकंदरीत ह्या विस्तीर्ण देशातील ह्या हतभागी लोकांची अवाढव्य संख्या लक्षात घेतली असता, ह्यांची स्थिती सर्व बाजूंनी केवळ शूद्रांपेक्षा अत्यंत हीन झाली आहे, हे उघड होते.

ह्यावरून दोन प्रकारची अनुमाने निघतात.  एक असे की, सांप्रत अस्पृश्य असलेल्या लोकांच्या सर्वच पूर्वजांनी काही वरील प्रतिलोमसंकराचा गुन्हा केलेला नसावा.  ह्यांच्यांतील बरेच लोक - विशेषतः दक्षिणेकडील जाती - केवळ एतद्देशीय अर्धवट रानटी अनार्य लोक असावे आणि त्यांचा वरील कोणत्याही श्रेष्ठ वर्णाशी कसलाही शरीरसंबंध झालेला नसावा आणि ज्या अर्थी भिल्ल, गोंड, वडारी इत्यादी जाती अद्यापि जरी रानटी स्थितीत असूनही त्यांच्या अस्पृश्य समजण्यात येत नाही, त्या अर्थी, ह्यांच्यांतील पुष्कळांना ही धर्मशास्त्राची शिक्षा लागू पडत नसावी.  दुसरे अनुमान असे की, ज्यांच्या पूर्वजांनी हा गुन्हा केला असेल, त्यांना आजपर्यंत झालेली ही अस्पृश्यत्वाची शिक्षा वाजवीपेक्षा अत्यंत कठोर झाली आहे.  त्यांची स्थिती केवळ शूद्रांच्यापेखा स्वभावतः बरी असावी, ती तशी नसून उलट इतकी हीन झाल्यामुळे नुसते त्यांचेच नव्हे तर राष्ट्राचेही जबर नुकसान झाले आहे.


शिक्षेचा सूड

आर्य-अनार्यांचा विरोध उत्तर हिंदुस्थानापेक्षा दक्षिणेतच जास्त दिसून येतो.  त्यात कर्नाटकाच्या खाली दक्षिणेस जसजसे जावे, तसतसे तर हा स्पृश्यास्पृश्यविधी अधिक तीव्र होत जातो.  रंग, चेहरा, चालीरीती वगैरेवरून पाहता कर्नाटकातील व्हलिया (महार), मादिग (मांग), इत्यादी त्या जाती आहेत; त्यांचा वरच्या जातींशी फारच कमी संकर झालेला असावा असे दिसते.  हे आपल्याला मूळचे एतद्देशीय समजतात.  ह्यांना जंबू असेही नाव आहे.  ह्यांचा मूळ पुरुष जंबू नावाचा होता.  पूर्वी पृथ्वीचा हा भाग दलदलीचा आणि डळमळीत होतो.  तो*  जंबूने आपल्या मुलास जिवंत पुरून स्थिर केला अशी ह्या लोकांमध्ये दंतकथा आहे.  ह्या दंतकथेत जरी विशेष तथ्य नसले तरी आर्य लोकांनी ह्यांच्यापासून जमीन हिसकावून घेऊन तिला पुढे जंबुद्वीप हे नाव दिले असावे, हे काही अंशी संभवते.  ह्या लोकांचा आर्यांच्या तीन वर्णांशी जरी फार क्वचितच संकर झालेला दिसतो, तरी जेव्हा जेव्हा तो झाला तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम फारच भयंकर झाला असावा, हे खालील आख्यायिकेवरून दिसून येते.

ह्या व्हलिया जातीत*  पोतराज (रेडयाचे राजे) ह्या नावाची एक शाखा आहे.  कर्नाटकातील बहुतेक लहान मोठया गावांत जेव्हा पटकी वगैरे भयंकर व्याधीच्या शमनार्थ द्यामव्वाची (दुर्गादेवीची) जत्रा गावकऱ्यांकडून करण्यात येते; तेव्हा ते पोतराज - मुख्य हक्कदार - जत्रेतले अध्वर्यूच असतात.  जत्रेत पुष्कळ रेडयांचा वध होत असतो, त्यांतील मुख्य रेडयाचे शिर डोक्यावर घेऊन ह्या पोतराजास गावपंचांस बरोबर घेऊन नगरप्रदक्षिणा करावयाची असते.  ह्या पोतराजाच्या उत्पत्तीसंबंधी अशी एक चमत्कारिक दंतकथा आहे की, याच्या मूळ पुरुषाने आपण ब्राह्मण आहोत असे भासवून द्यामव्वा नावाच्या एका ब्राह्मणीशी विवाह केला.  पुढे जेव्हा तिला पोतराजाची हीन जात कळून आली, तेव्हा तो भिऊन रेडयाचे रूप घेऊन पळाला.  द्यामव्वाने आपल्या घरास आग लावून पोतराजाचा पाठलाग केला व त्याचा वध केला.

-------------------------------------------------------------
* मुंबई गॅझेटियर सन (१८८४), पुस्तक २२, पान २१४-१७.
-------------------------------------------------------------

मागे केव्हा तरी एखाद्या प्रमुख अनार्याने आर्यस्त्रीशी वर्णसंकर केला असेल व त्यावरून ही भयंकर झटापट झाली असेल.  हल्ली अमेरिकेत एखाद्या गौरकाय तरुणीवर एखाद्या काळया निग्रोने हात टाकला तर कायद्याची वाट न पाहताच सार्वजनिक रीतीने त्याचा वध करण्यात येतो, त्याला लिंचिंग असे म्हणतात.  हे लिंचिंग जरी हल्ली आमच्या देशात उघडपणे होत नाही तरी आजपर्यंत कर्नाटकात ह्या प्राचीन लिंचिंगचे ओबडधोबड स्मारक ह्या जत्रेच्या रूपाने राहिले आहे.  अजूनही हे पोतराज ह्या जत्रेच्या शेवटी देवीच्या समोर तिला शिव्याशाप देत कित्येक गरीब कोवळया कोंकरांना हातात धरून दाताने त्यांच्या अंगावरचे सर्व कातडे जिवंतपणी सोलतात.  ही कोकरे म्हणजे मूळ द्यामव्वा नावाच्या ब्राह्मणीची मुले असे मानून, त्यांचा असा भयंकर घात करून हे लोक आपल्या मूळ पोतराजाच्या लिंचिंगचा सूड उगवितात.


मराठे वगैरे जातींशी ह्यांचे साम्य

हल्ली ह्या देशातील नीच मानलेल्या एकंदर लोकांची स्थिती किंचित सहानुभूतीच्या दृष्टीने आणि उदार बुध्दीने अवलोकन केल्यास असे दिसून येईल की, ह्यांच्यामध्ये अनेक प्रसंगी अनेक कारणांनी वरील पुष्कळ जातींची भेसळ होत आहे.  गुजराथ, सिंध, गंगथडी इत्यादी प्रांतांत राहणाऱ्या मेघवाल महारांचे असे म्हणजे आहे की, मागे काठेवाडात एकदा बारा वर्षांचा पुष्काळ पडला होता, तेव्हा मेलेली जनावरे उचलून नेण्याचे काम केल्यामुळे त्यांना ही हीन दशा आली.

* काठेवाडाकडील भंग्यांचे सहा पोटभाग आहेत, त्या सर्वांची नावे पुढीलप्रमाणे अस्सल रजपुतांची आहेत.  १. मकवान, २. परमार (पवार), ३. राठोड, ४. सोळंकी, ५. वाघेला व ६. डोरी.  महाराष्ट्रातील महारांमध्येही मराठयांच्या अस्सल ९६ कुळांपैकी बऱ्याच कुळांची नावे आढळतात.  ती जाधव, साळुंके (चालुक्य), पवार, मोरे (मौर्य), गाईकवाड, शेलार, साळवी, सुरवसे (सुर्यवंशी), इत्यादी.

-------------------
* मुंबई गॅझेटियर महिकाठा, पुस्तक ५, पान ६३
-------------------

महाराष्ट्रातील महारांची भाषा पाहिली असता त्यांचे उच्चार, स्वर व एकंदर बोलण्याची ढब मराठी कुणब्यांसारखीच आहे असे दिसून येते.  कोळी वगैरे गावात राहणाऱ्या खालील जातींच्या लोकांच्या भाषेत काही फारक दिसतो, पण ह्या बहिष्कृत लोकांच्या भाषेत तितका फरक दिसत नाही.  ह्यांच्या देव्हाऱ्यावर खंडोबा, बहिरोबा, भवानी वगैरे मराठयांच्याच देवतांच्या मूर्ती दिसतात.  नाशिक, त्र्यंबक, पैठण, पंढरपूर, तुळजापूर इत्यादी क्षेत्रांचे ठिकाणी इतरांबरोबर ह्यांची गर्दी जमते आणि वारकरी, कथेकरी, भाविणी, वाघ्ये वगैरे धर्मसंप्रदाय मराठयांप्रमाणे ह्यांच्यांतही पूर्वीपासून चालू आहेत. ह्या सर्व गोष्टींत ह्यांनी आपल्याला उच्च म्हणविण्यासाठीच मराठयांचे केवळ अनुकरण केले असावे असे म्हणावे, तर ह्यांच्या वरच्या कोळी वगैरे जातींनी हे अनुकरण का केले नाही ? शिवाय, अनुकरण करून आपल्यास उच्च म्हणवून घेण्याचे चातुर्य ह्यांच्यात असते तर ते ह्यांनी मराठयांचेच का केले ?  सर्वात उच्च समजले गेलेले जे ब्राह्मण, त्यांचे अनुकरण ह्यांनी का केला नसावे ?


ह्यांच्या अंगचे गुण

ह्या लोकांत इमानीपणा, करारीपणा, शौय इत्यादी नैतिक गुण अगदी उपजत असलेले आढळतात.  महारासारखी निमकहलाल जात दुसरी क्वचितच सापडेल.  म्हणूनच जुन्या व अलीकडच्या अमदानीतदेखील रखवालदाराचे, सरकारी पोते पोहचते करण्याचे वगैरे विश्वासाची कामे ह्या लोकांकडेच चालत आलेली आहेत.  मद्रास इलाख्यात अव्वल इंग्रजीचा पाया घालण्याच्या कामी ज्या लढाया झाल्या, त्यांत तिकडच्या पारिया मंडळीने अतुल बहाद्दरी गाजविली आहे.  क्लाइव्हच्या सैन्यामध्ये गोऱ्या सोजिरांस भात देऊन आपण वरचे नुसते पाणी पिऊनच ह्या पारिया पलटणींनी लढाया जिंकिल्या, अशी तिकडे प्रसिध्दी आहे; पण बिचाऱ्यांचा इतिहास लिहितो कोण ? आत्मिक गुणांचीही ह्या लोकांत वाण नाही.  उत्तरेकडे रोहिदास चांभार व महाराष्ट्रात चोखोबा महार हे महान साधुपुरुष प्रसिध्दच आहेत.  ''बुध्दी, विद्वत्ता आणि साधुता ह्यासंबंधी प्राचीनकाळी पुष्कळ पंचम वर्गाचे लोक प्रसिध्दीस आले होते.  आद्यकवी वाल्मीकी हा पंचम जातीचा होता, अशी कथा आहे.  पद्मपुराण व ज्ञानवासिष्ठ ह्यांवरून ह्या कथेला दुजोरा मिळतो.  सुप्रसिध्द ग्रंथ 'कुरळ' ह्याचा कर्ता तिरुवेल्लुवर आणि वैष्णव लोकांनी पूज्य मानिलेले जे बारा संत झाले, त्यांपैकी एक तिरूप्पानियल्वर हे दोघेही मुळी पंचम जातीचेच होते.  यमुनाचार्याचे शिष्य भार्नर नंबियर हे एक महान पंडित साधू झाले.  ते पंचम असूनही त्यांना ब्राह्मण संन्याशाप्रमाणे समाधी देण्यात आली.'' *

-------------------------------
* मि. सी. वाय. चिंतामणी ह्यांनी प्रसिध्द केलेल्या इंडियन सोशल रिफॉर्म ह्या पुस्तकातील
मि. के. रामानुजाचार्य एम.ए.बी.एल. ह्यांचा निबंध पाहा.

-------------------------------

दुराग्रह टाकून ह्या आणि अशा अनेक गोष्टींचा विचार केला असता कळून येते की, हल्ली नीच मानिलेल्या ज्या असंख्य जाती ह्या अफाट देशात पसरल्या आहेत, त्यांचे खरे मूळ काय हे ठरविणे जरी कठीण आहे व पूर्वीपासून वरच्या जातींतून ह्यांच्यात कशी कशी भर पडत गेली आहे तेही कळण्यास जरी फारसा मार्ग नाही, तथापि एवढे मात्र उघड आहे की, ह्या वर्गाचे सर्वच लोक जितके मानण्यात येत आहेत तितके मुळापासूनच नीच नाहीत.  त्यांच्यात वरिष्ठ वर्गापासून तो कनिष्ठ वर्गापर्यंत सर्वांचे अनेक कारणांमुळे देशकालमानाने मिश्रण होत आले आहे; आणि आज हजारो वर्षे ह्यांच्याशी वरील वर्गांचा व्यवहार जबरीने बंद पाडल्यामुळे ह्यांची अर्थातच अशी हीन आणि करुणास्पद स्थिती झाली आहे. आजकाल आमच्या देशात लहानमोठया सर्वांच्या अगदी परिचयातली अशी गोष्ट म्हणजे बहिष्कार ही होय. ह्या पृथ्वीवर सर्व मनुष्यजातींच्या इतिहासात जर का कोठे, कधी कोणावर प्रचंड बहिष्कार घालण्यात आला असेल, व जो पुरातन काळापासून चालत येऊन हल्ली पूर्णदशेला पोहचला असेल तर तो ह्या नीच मानलेल्या जातीवरचा हा भयंकर बहिष्कार होय !! मनुस्मृतीच्या दहाव्या अध्यायात ह्या बहिष्काराचा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा असा दाखला आढळतो :

चांडालश्वपचानां तु बहिर्ग्रामात्प्रतिश्रयः ।
अपपात्राश्च कर्तव्या धनमेषां श्वगर्दभम् ॥५१॥
वासांसि मृतचैलानि भिन्नभांडेषु भोजनम् ।
कार्ष्णायसमलंकारः परिव्रज्या च नित्यशः ॥५२॥
न तैः समयमन्विच्छेत्पुरुषो धर्ममाचरन् ।
व्यवहारी मिथस्तेषां विवाहः सदृशैः सह ॥५३॥
अन्नमेषां पराधनं देयं स्याध्दिन्नभाजने ।
रात्रो न विचरेयुस्ते ग्रामेषु नगरेषु च ॥५४॥
दिवा चरेयुः कार्यार्थ चिह्यिता राजशासनेः ।
अबांधवं शवं चैव निर्हरेयुरिति स्थितिः ॥५५॥
वंध्याश्च हन्युः सततं यथाशास्त्रां नृपाज्ञया ।
वध्यवासांसि गृण्हीयुः शय्याश्चाभरणानि च ॥५६॥

अर्थ :  चंडाल, श्वपच इत्यादी जातींनी गावाबाहेर रहावे, ह्यांच्याजवळ भांडी नसावी; कोंबडी आणि गाढव हेच ह्यांचे धन; प्रेतावरचे कपडे हीच ह्यांची वस्त्रे; ह्यांनी फटक्या मडक्यात खावे, काळया लोखंडाचे अलंकार ल्यावे, नित्य भटकत असावे; इतरांनी ह्यांच्याशी कसलाही व्यवहार करू नये; त्यांना पाहूही नये; ह्यांना अन्न द्यावयाचे असल्यास दुसऱ्यांकडून खापरांतून देववाव; शहरांत किंवा खेडयांत ह्यांनी रात्री येऊ नये; दिवसा कामासाठीच काही चिन्ह धारण करून यावे; ते काम म्हणजे बेवारशी प्रेत नेणे, देहान्त शिक्षा झालेल्यांचा राजाज्ञेने वध करणे व त्यांचे कपडे, दागिने वगैरे घेणे ही होत.

दोन हजार वर्षांहूनही अधिक काळपर्यंत अशा ह्या घोर बहिष्काराचे, जबरीचे वंशपरंपरागत वतन स्वीकारावे लागल्यामुळे, ह्या हतभागी लोकांची जी अवनती झाली आहे, तिच्याविषयी यथार्थ ज्ञान इतरांना होणे कठीण ! इतकेच नव्हे, तर स्वतः या लोकांनाही करून देणे जवळ जवळ अशक्य आहे !  असा बहिष्कार कधी आणि कोठेही घालण्यात आला नसावा !  जरी असे असले तरी त्याला इतकी पूर्ण सिध्दी आलेली नाही हे अगदी खास.  ह्या बहिष्कार-कुठाराला दोन धारा आहेत.  एका धारेने ज्यांच्यावर हा बहिष्कार आहे, त्यांची स्वाभिमान बुध्दी कापून नष्ट केलेली आहे.  ह्या दैवहतकांचा उपजत स्वाभिमान असा नष्ट झाल्यामुळे जरी कदाचित कोणी अपवादक दयेने प्रेरित होऊन ह्यांना जवळ करण्यास गेला, तरी दोन हजार वर्षांच्या सवयीमुळे हे स्वतःच आपल्या हितकर्त्यापासून दूर दूर पळतात !  कारण, सवय म्हणजे दुसरा स्वभावच !  उलटपक्षी, ह्या कुठाराच्या दुसऱ्या धारेमुळे ज्या उच्च वर्गांनी हे बहिष्कारशस्त्र पिढयानपिढया आपल्या हातांनी चालविले त्यांचीया, ह्या लोकांसंबंधी विवेक आणि करुणा ह्या दोन्ही शक्ती नष्ट झाल्या आहेत !  सर्व माणसांनी आपल्या गुणधर्माप्रमाणे गुजारा करावा, त्यात कोणी कोणास अडथळा करू नये व हा उपजत हक्क ह्या नीच मानिलेल्यांना आहे, हे साधे आणि उघड तत्त्व दुसऱ्यांना नीच मानणाऱ्या व आपल्याला उच्च म्हणविणाऱ्या कोळया-माळयांपासून तो क्षत्रिय-ब्राह्मणांपर्यंत कोणालाही मान्य होत नाही; ह्यात त्यांचा काही जाणूनबुजून अविचारी किंवा कठोरपणा आहे, असेच केवळ नव्हे; तर हा प्रताप केवळ त्या बहिष्कार-कुठाराच्या दुसऱ्या धारेचा !  तिच्यामुळे ह्या स्वतःस उच्च म्हणविणाऱ्या व दुसऱ्यांना नीच मानणाऱ्या लोकांचा विवेक आणि दया साहजिक नष्ट होऊन ह्यांना सवयीने असे वाटत आहे की, नीच मानिलेल्या लोकांस देवानेच ज्या अर्थी ह्या स्थितीत उत्पन्न केले आहे, त्या अर्थी तीच स्थिती त्यांना योग्य आहे व म्हणून तिजबद्दल कुणालाही दोष देता येणार नाही. ह्यापेक्षा थोडा अधिक विचार केल्यास हे लोक असेही म्हणू लागतात की, ह्या नीच मानिलेल्या लोकांस जर उच्च स्थितीत आणिले, तर ते हल्ली जी समाजाची मलमूत्र साफ करण्यासारखी हलकी कामे करीत आहेत, ती पुढे कोण करील ? जर कोणी ती कामे करील तर तेही असे नीच मानण्यात येतील !  त्यापेक्षा हेच ह्या अवस्थेत आहेत हे काय वाईट ? सुधारकांनी विधवाविवाहाची जेव्हा प्रथम चर्चा सुरू केली, तेव्हा विधवांची लग्ने झाल्यास कुटुंबात पोळया लाटण्याचे, मुलांची हागओक काढण्याचे, केरपोतेरे करण्याचे व अशीच दुसरी फुकटया मोलकरणची कामे कोण करील ?  अश एक मोठी अडचण त्यांचे प्रतिपक्षी काढीत असत !  ती लक्षात घेतली असता वरील शंका पाहून फारसे आश्चर्य वाटावयास नको !  स्वतःच्या आयाबहिणी आणि मुली ह्यांच्यासंबंधीदेखील ज्यांची साहजिक दया, प्रेम व विवेक केवळ सवयीच्या जोराने नष्ट होऊन जे असले कोटिक्रम करण्यास तयार होतात; ते गावाबाहेरील महार-मांगांविषयी वरील शंका काढतील यात नवल काय ?  समाजाच असली घाणेरडी कामे अनादिकालापासून माणसेच करीत आली आहेत, आणि अनंत कालापर्यंत माणसांनीच ती केली पाहिजेत, किंबहुना माणसांनाच ती करावी लागतील, असे काही खात्रीने म्हणता येणार नाही.  मुसलमान लोक इकडे येण्याचे पूर्वी ह्या देशात पायखान्याची व्यवस्था हल्ली आहे अशीच होती की काय ?  असती, तर मनुस्मृतीत चंडालाकरिता जी सर्व नीच कामे सांगितली आहेत, त्यांत ह्यांचा उल्लेख झाल्याशिवाय राहता ना.*  ह्या प्रांतात म्युनिसिपालिटयांची स्थापना झाल्यावर पायखाने साफ करण्याकरिता भंगी लोकांना गुजराथ, काठेवाड आणि पंजाब येथून आणावे लागले.  कारण येथील कोणीच अंत्यज मंडळी हे काम पत्करीना. ह्यावरून पायखान्यांची ही चाल उत्तरेकडूनच आली असावी, व ज्या अर्थी भंगी लोकांमध्ये बहुतेक मुसलमानच फार आहेत, त्या अर्थी ही चाल मुसलमानांकडून प्रथम आली असावी, असे अनुमान करण्यास हरकत नाही.  यद्यपि, भंगी लोक मुसलमानांतून आले नसले, तरी आज ज्या असंख्य लोकांवर हा सार्वजनिक बहिष्कार पडला आहे, ते सर्वच कोठे भंगी आहेत ?  आणि जे फार थोडे भंगी आहेत त्यांच्यावर तरी असा बहिष्कार का असावा ?  इराण, अरबस्थान वगैरे मुसलमानांच्या देशांत, किंबहुना पृथ्वीवरच्या कोणत्याही देशांतील भंगी लोकांवर हा बहिष्कार नाही; मग आमच्याच देशात हा राष्ट्रघातकी सोवळेपणा का असावा ?

-----------------------------------------------------------------------
* मुंबई गॅझेटियर, ठाणे, पुस्तक १३, भाग १, पान १९०.
-----------------------------------------------------------------------

महार, चांभार, मांग, ढोर वगैरे सर्व अस्पृश्यवर्ग आमच्या हिंदुधर्मातच मोडतात, ह्यांना जर कोणी परधर्मीयांनी बाटविले आणि त्यांची स्थिती सुधारली, तर आम्ही धर्माभिमानी आमच्या धर्माची महान हानी झाली म्हणून आक्रोश करितो, पण ज्या महारांना ते हिंदू धर्मातच राहून कितीही चांगले धंदे करून संपन्न असले; तरी आम्ही स्पर्श करण्यास किंवा आमच्या उंबरठयाचे आत आत येऊ देण्यास तयार नसतो, हेच महार ख्रिस्ती, किंवा मुसलमान झाले की, त्यांच्याशी हात हालविणे किंबहुना प्रसंगी आडजागी एकादा चहाचा पेलाही झोकणे, ह्यात आम्हांला काही वाटत नाही !  मग हा जो बहिष्कार आहे, तो ह्या अंत्यज मंडळवर की त्यांच्यामध्ये असलेल्या हिंदुधर्मावर ?  एका बाजूने अशा मंडळीस ख्रिस्ती मिशनऱ्यांनी बाटविले की, आक्रोश करावयाचा, आणि दुसऱ्या बाजूने अशा ह्या बाटग्या अंत्यजांवरचा सर्वत्र बहिष्कार काढून त्यांना उद्योगधंद्यात आणि स्पर्शव्यवहारात मोकळीक ठेवावयाची, आणि जे हिंदू राहिले त्यांचा मात्र तिरस्कार करावयाचा, हा कोण विसंगतपणा !

मनुस्मृतीत दहाव्या अध्यायात स्पष्ट म्हटले आहे -

शत्तेफ्नापि हि शूद्रेण न कार्यो धनसंचयाः ।
शूद्रो हि धनमासादय ब्राह्मणानेव बाधते ॥१२९॥

अर्थ - अंगी सामर्थ्य असले तरी शूद्राने धनसंचय करू नये, कारण अशापासून ब्राह्मणास बाधा होते.

शूद्रालाच संपन्नता मिळविण्याची धर्मशास्त्रात परवानगी नाही !  मग अतिशूद्राला ती कोठून असणार ?  पण अशा अतिशूद्राने वाटल्यास ह्या हिंदुधर्माच्या कचाटयातून सुटून परधर्मात जावे.  म्हणजे त्याला मनुष्यजातीचे सर्व उपजत हक्क मिळतात, असे समजून वरील विसंगतपणा टाळावयाचा की काय ?

ह्या लोकांच्या पूर्वजांनी असा कोणता गुन्हा केला असेल की, त्यांच्या वंशजास आम्ही अजूनही अशी भयंकर सजा द्यावी ?  वर्णसंकर, व्यभिचार, देशद्रोह, राजद्रोह, धर्मद्राह ह्यांपैकी कोणताही भयंकर गुन्हा, हल्ली कोणी करीत नाही काय ?  जे करितात त्यांना अशी जबर शिक्षा हल्ली समाजाकडून होत आहे काय ?  तर मग, ह्यांच्या पूर्वजांनी तो केला म्हणून ह्यांनाच हा बहिष्कार भोगावा लागतो, ह्याचे कारण काय ?  केवळ रूढी चालत आली आहे, आणि ह्या बाबतीत पुढारी मंडळी जोराने चळवळ करून लोकमत जागृत करीत नाही व सतत प्रयत्न होत नाही, म्हणूनच हा प्रकार चालू आहे.  ईश्वराने निर्माण केलेला असा कोणताही प्राणी नाही की, तो अस्पर्श मानला आहे !  मनुष्यप्राण्यांपैकी मात्र ह्या लोकांना बाहेर ठेवले जात आहे !  महाराच्या घरच्या कुत्र्यालाही आम्ही शिवू, पण त्या महाराला शिवणार नाही ! बहिष्कारामुळे झालेली हल्लीची स्थिती वर सांगितल्याप्रमाणे आज हजारो वर्षे हा असा बहिष्कार भोगल्यामुळे व हल्लीच्या प्रगतीच्या काळीही, हा बहिष्कार व्हावा त्या मानाने कमी न झाल्यामुळे, ह्या दुर्दैवी लोकांची स्थिती सांपत्तिक, नैतिक व धार्मिक इत्यादी सर्वच बाजूंनी अगदी करुणास्पद झाली आहे.  तथापि काही सुशिक्षित मंडळींस हे म्हणणे पटत नाही, ह्याचे कारण असे की, अलीकडे रेल्वे वगैरेसंबंधी लहानमोठी कंत्राटे घेऊन क्वचित महार मंडळी चांगली श्रीमंत झालेली आढळते; पण असे अपवाद किती थोडे आहेत ह्याचा विचार करावयाला नको काय ?  दुष्काळ किंवा प्लेग वगैरे आधिदैविक संकटे ह्या गावाबाहेरच्या लोकांस कशी भोवतात, त्याची प्रत्यक्ष उदाहरणे डोळे उघडे ठेवणाऱ्यांस पावलोपावली दिसून येतील. कोणी कोणी असेही म्हणतात की, नीच मानिलेल्या लोकांना वाटेल ते काम करण्याची मुभा असल्यामुळे त्यांना इतरांपेक्षा मजुरी चांली मिळते. हाडे, कातडे, चरबी वगैरेसंबंधी सर्व उद्योग चांभर, ढोर ह्या खालच्या जातींकडेच आहे हे खरे; पण ह्या धंद्यात केवळ मजुरी मात्र ह्या लोकांकडे राहिली आहे व भांडवल आणि व्यापाराचा सर्व फायदा उच्च वर्गाच्या हिंदूंनी नसला, तरी मद्रासी मुसलमान व बाहेऱ्यांनी बळकाविला आहे.  याचे कारण हेच की, या लोकांची सभ्यता, संस्कार व एकंदरीत सर्व सामाजिक स्थिती बहिष्कारामुळे अत्यंत हीन राहिल्यामुळे, जरी चांभार वगैरे वर्गाची मिळकत व पुंजी कोळयामाळयांपेक्षा बरी असली, तरी त्या स्थितीचा फायदा घेऊन यांना आपली हिंदुसमाजात बढती करून घेण्यास काही वाव उरला नाही.  यामुळे आपले वडिलोपार्जित डबोले चुलीजवळ पुरून ठेवून फाटकी लंगोटी आणि फुटके मडके यांवर पिढयानपिढया गुजारा करण्याची चांभार वगैरे जातींना सवय लागली आहे.  बहिष्काराचा वरवंटा डोक्यावर सारखा फिरत असल्यामुळे त्याखाली त्यांच्या महत्त्वाकांक्षेला अवकाशच राहत नाही.  असा प्रकार असताना त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे म्हणून एखाद्या कुणब्याला हेवा वाटेल काय ?  सुशिक्षित मंडळीकडूनच असा आक्षेप केव्हा केव्हा निघतो, ह्याचे कारण केवळ बहिष्कार-कुठाराच्या दुसऱ्या धारेचा परिणामच होय.  दुसरे काय !

केवळ शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने पाहताही ह्या लोकांच्या स्थितीत कसा फरक दिसून येतो, त्याचा एक मासला खालील आकडयांवरून दिसेल.  हे आकडे इ.स. १९०१ सालच्या हिंदुस्थानच्या खानेसुमारीवरून घेतलेले आहेत.
मुंबई इलाखा

 एकंदर तपासलेल्या लोकांची संख्या तपासल्यांपैकी महारोगी आढळले त्यांची संख्या
ब्राम्हण      -         १,००,०००
युरोशियन  -          १,००,००० ३१
महार, धेड -         १,००,००० ८८
मराठे -              १,००,००० ७७

 वऱ्हाड

 एकंदर तपासलेल्या लोकांची संख्या तपासल्यांपैकी महारोगी आढळले त्यांची संख्या
धनगर   -  १७,७१६ २३
   कुणबी   -   १,८७,२०३ २५९
महार   -    ९६,३८१ ८६
पठाण   -   १२,७७० ११


मध्यप्रांत

 एकंदर तपासलेल्या लोकांची संख्या तपासल्यांपैकी महारोगी आढळले त्यांची संख्या
भिल्ल -    २३,११०
  ब्राम्हण  -  ३,९१,५१९ ८४
चांभार    - ३५,२६२० ३८६
तेली   -   ७,१२,१७० ५७०

मद्रास

 एकंदर तपासलेल्या लोकांची संख्या तपासल्यांपैकी महारोगी आढळले त्यांची संख्या
ब्राम्हण      -       ११,९८,९११ ३९५
युरोशियन  -          २६,२१० २७
होलिया (महार) - १,४७,९८७ १२८
कामाठी   -      ४,२८,१८८ 
१३९

 नैतिक बाबतीत विशेष लिहावयास नकोच !  अलीकडच्या कोणत्याही लष्करी छावणीत गेल्यास तेथे ज्या हतभागी स्त्रियांनी दुकाने मांडून स्वतःचे देह विकावयास ठेविलेले आढळतात त्या कोणत्या वर्गातल्या असतात, हे प्रसिध्द आहे. धार्मिक बाबतीत तर विचारच करावयाला नको.  हिंदुधर्म बोलूनचालून ह्या वर्गासंबंधी बेजबाबदार !  इतकेच नव्हे, तर त्याने आज इतकी वर्षे ह्या पामरांवर बहिष्कारशस्त्र धरले आहे.  वास्तविक पाहता, हे धर्मबाह्यच आहेत.  अलीकडील देशाभिमानाचे वारे अंगात शिरल्यापासून काही 'दे. भ.', 'दे. बं.' ह्या वर्गाशी नुसता शाब्दिक आपलेपणा जोडीत आहेत; पण खरे धर्माभिमानी ह्यांना कितपत आपले म्हणतात हे जगजाहीर आहे !  मुसलमानांनीही आजवर ह्यांचा तिरस्कारच केला आहे.  मुसलमानांचा सगळा रोख हिंदू म्हणविणारांना बाटविण्याकडे होता.  तेव्हा त्यांना ह्या ग्रामबाह्या लोकांना सहज मुसलमान करून घेता आले असते; परंतु तसा प्रकार कोठे आढळत नाही, ह्यावरून अव्वल मुसलमानीत ह्या वर्गाची गणना हिंदूंत होती की नाही, ह्याबद्दल शंका येते.  ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मात्र ह्यांच्यासाठी पुष्कळ प्रयत्न चालविले आहेत व त्यांत त्यांना बरेच यशही आले आहे.  केवळ परोपकाराच्या दृष्टीने पाहता इतर बाबतींप्रमाणेही ह्याही बाबतीत ख्रिस्ती धर्माची आणि मिशनरी मंडळीची, करावी तितकी स्तुती थोडीच आहे. एकंदरीत कोणत्याही दृष्टीने पाहता हल्ली अस्पृश्य मानिलेल्या ह्या वर्गाची स्थिती अत्यंत शोचनीय आहे, हे आपल्यांपैकी पुष्कळांस कबूल होत नसल्यास इतकेच म्हणणे भाग पडते की 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे !'  पण राष्ट्रीय दृष्टीने पाहता यांची स्थिती सर्व राष्ट्राला घातक आहे, हे तरी निदान त्यांच्या वंशास न जाताही कळावयाला पाहिजे आहे !
संख्या

येथवर ह्या हतभागी लोकांची मूळ उत्पत्ती, त्यांच्यावर पुरातन काळापासून आजपर्यंत पडलेला घोर बहिष्कार व त्यामुळे त्यांची सर्व बाजूंनी आज दिसून येणारी हीनदीन स्थिती वगैरे, गोष्टींचा स्थूल दृष्टीने विचार केला.  आता ह्या अफाट देशात अशा हीन दशेप्रत पोहचलेल्या वर्गातील लोकांची एकंदर संख्या किती आहे, हे पाहू. वर सांगितलेल्या भयंकर अन्यायाचे प्रसंग ह्या लोकांवर कितीही गुदरले असले, आणि सहृदय मनुष्यास लाज आणणारे हे प्रकार हजारो वर्षे जरी घडत असले, तथापि त्याचा दुष्परिणाम ज्यांना प्रत्यक्ष भोगावा लागतो, अशांची संख्या अगदी थोडीथोडकी असती, आणि मग तिकडे आमच्या लोकांनी दुर्लक्ष केले असते, तर एखादे वेळी चालले असते !  कारण, हल्ली आमच्या देशाचा पाया सर्वच दिशांनी पाहता खोलात चालला आहे, अशा वेळी आमच्या पुढाऱ्यांना पुष्कळ मोठमोठया राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टींत मन घालावे लागत असल्यामुळे काही व्यक्तींवर, किंबहुना एकदोन जातींच्या एकदोन लाख माणसांवर एकादा स्थानिक अथवा प्रासंगित तात्पुरता अन्याय होत असता आणि तिकडे आमच्या उद्योगी पुढाऱ्यांचे लक्ष वेधले नसते, तर त्यात फारसे आश्चर्य नव्हते; पण वस्तुतः तसा प्रकार मुळीच नाही !  उलट अतिशय आश्चर्याची गोष्ट ही की, हिंदू साम्राज्यात ह्या अंत्यज वर्गाची प्रचंड संख्या असून व ती ह्या खंडवजा विशाल देशात सर्वत्र पसरली असून, ती किती आहे व कशी पसली आहे, याची बरोबर कल्पना करून घेण्याची कोणाला इच्छाही होत नाही !  दर दहा वर्षांनी सरकारी खानेसुमारीत ह्या वर्गाची संख्या प्रसिध्द होत असते.  तथापि ती एकत्र केली असता किती मोठी होईल, हेदेखील पाहण्याची कोणी तसदी घेत नाही ! ता. ३१ मार्च १९०१ रोजी रात्री करण्यात आलेल्या हिंदी साम्राज्यातील (बलुचिस्थान, ब्रह्मदेश, निकोबार, अंदमान ही सर्व मिळून) खानेसुमारीवरून हिंदुस्थानची एकंदर लोकसंख्या २९,४३,६१,०५६ होती.  ह्यात एकंदर अंत्यज संख्या ५,३२,३६,६३२ आहे.  हा एकूण आकडा सन १९०१ च्या सेन्सस रिपोर्टाच्या भाग १, पान ५६०-५६९ मध्ये जी जातवारी दिली आहे; हा तिच्यावरून तयार केला आहे.  तयार करताना मूळ कोष्टकात ज्या जातींना untouchable or Depressed Classes म्हणजे अस्पृश्य अथवा निकृष्ट झालेल्या जाती असे नाव दिले आहे, त्यांचाच अंत्यज नावाखाली समावेश करण्यात आला आहे.  मुसलमान लोकांमध्येही अश्राफ (वरिष्ठ) अजलाफ (मध्यम) आणि अर्जाल (हिन), असे भेद दाखविण्यात आले आहेत व त्यांची संख्या उत्तर हिंदुस्थानातील गणतीमध्ये निरनिराळी दाखविली आहे.  अर्जाल वर्गाचे मुसलमान बहुतेक मूळचे अंत्यज जातीतून मुसलमान झाले असावे, आणि म्हणूनच ह्यांनी धर्मांतर केले तरी इस्लामसारख्या एकांतिक धर्मातही ह्यांना हीन मानण्यात येत असावे. हिंदुस्थान देशात एकंदर मुसलमानांची संख्या ६,२४,५८,०७७ आहे व त्यांपैकी उत्तर हिंदुस्थानात हीन मुसलमानांची संख्या ८६,२८,५६६ दाखविण्यात आली आहे.  पण ह्यांचा समावेश वरील अंत्यज संख्येत करण्यात आलेला नाही.  कारण, हे मुसलमान असल्याने ह्यांची स्थिती कितीही हीन असली तरी हिंदू अंत्यजाइतकी ती असेल की काय, ह्याबद्दल शंका आहे.  तथापि हिंदू जातिभेदाचा परिणाम कडकडीत मुसलमानी धर्मावरही कसा घडत आहे, ह्याचे वरील हीन मुसलमानांची संख्या हे एक चांगले उदाहरण आहे.  बलुचिस्थान व सरहद्दीवरील तुर्की-इराण प्रदेशांतील सुलतानांमध्ये उत्तम, मध्यम व कनिष्ठ असा भेद केलेला दिसत नाही, ह्याचे कारण, तेथील मुसलमानांमध्ये हिंदूंतून मुसलमान बनविलेल्यांची भेसळ क्वचितच झालेली आहे, हे होय.  तसेच दक्षिणेतील मुसलमानांमध्येही असा भेद केलेला नाही.  ह्याचे कारण असे असावे की, इकडील हल्लीचे बहुतेक मुसलमान पूर्वीचे हिंदूच असलयाने असा भेद असणे शक्य नाही.  मध्यंतरी उत्तर हिंदुस्थानातल्या मुसलमानांतच हा उच्चनीच भेद दिसून येणे शक्य आहे व तो तसा दाखविण्यात आला आहे.  ह्याप्रमाणे बलुचिस्थान व वायव्य सरहद्द आणि तसेच नर्मदेच्या खालचे सर्व दक्षिण हिंदुस्थान इतका भाग वगळला असता बाकी जो अस्सल उत्तर हिंदुस्थानचा भाग पंजाब, काश्मीर, राजपुताना, संयुक्त प्रांत, बंगाल, बिहार, ओरिसा इत्यादी राहतो, त्यामध्ये मुसलमानांची एकंदर संख्या ४,७०,४८,५८१ आहे आणि त्यांपैकी ८६,२८,५६६ महणजे एक षष्ठांशाहून अधिक हीन मानलेले मुसलमान आहेत.  तथापि ह्यांची गणना अंत्यजांत केलेली नाही, हे वर सांगितलेच आहे.

अंत्यज आणि एकूण हिंदूंची प्रांतनिहाय संख्या (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्यांचे वर्गीकरण करता आले नाही व जे अर्धवट रानटी स्थितीत आहेत, अशा हिंदू लोकांची संख्या ह्याशिवाय आहे.  ती धरली असता एकूण हिंदूंची संख्या २०,७१,४७,०२६ इतकी होते.

हिंदुस्थानातील निरनिराळया भागांतील एकूण हिंदू संख्येमध्ये अति उच्च मानलेल्या व अति नीच मानलेल्या जातींचे दर शेकडा प्रमाण खाली दिल्याप्रमाणे आढळून येते.

तक्ता (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

अत्यंज अथवा पंचम वर्गाच्या काही मुख्य जातींची हिंदुस्थानातील एकूण संख्या
तक्ता (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

 

ह्या आकडयांवरून असे सिध्द होते की, हिंदू लोकांपैकी एकचतुर्थांशापेक्षा अधिक संख्या हीन मानलेल्या अत्यंज जातीची आहे, व मुसलमान लोकांपैकी जवळ जवळ एकसत्पमांश हीन मानलेल्या अर्जाल वर्गांची आहे.  ह्या हीन मुसलमानांची संख्या विचारात न घेता नुसत्या हिंदू अंत्यजांची संख्या हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्येशी ताडून पाहिली तरी ती तिच्या एकषष्ठांशाहून अधिक भरते !  म्हणजे, प्रत्येक सहा हिंदी माणसांमध्ये (मग ते कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे अथवा रंगाचे असोत) एक अगदी टाकाऊ-शिवून घेण्यालादेखील अयोग्य मानलेला असा मनुष्यप्राणी सापडतो.
पुढे काय ?

येथवर ह्या भारत देशाने आपल्या एका भागावर कसा कडक बहिष्कार घातला आहे; ह्या बहिष्काराचा आतापर्यंत काय परिणाम झाला आहे; आणि हा बहिष्कृत झालेला ह्या देशाचा कितवा भाग आहे, याविषयी विचार झाला.  आता पुढे काय करावयाचे व त्यासंबंधी हल्ली काय चालले आहे याचा विचार करण्यापूर्वी या गोष्टीसंबंधी एकदोन आगंतुक मुद्दयांचा विचार करणे अवश्यक आहे.

इंग्रजी अमलातील स्थिती

इंग्रजी या शब्दाने आमच्या देशातील इंग्रज सरकार आणि पाश्चात्त्य आधुनिक सुधारणा या दोन्हींचा अंमल दर्शित करण्यात येतो.  एका पिढीच्या मागे इंग्रज सरकार म्हणजे मायबाप सरकार (Parental Government) अशी तत्कालीन समजुतदार माणसांची कल्पना होती.  इंग्रज सरकार हे शहाणे आणि जबरदस्त आहे आणि त्याच्यापासून हिंदुस्थानचे हित बरेच झाले आहे आणि पुढेही होण्याची आशा अद्यापि नष्ट झाली नाही, असे पुष्कळ समजुतदार माणसांना अद्यापि वाटत आहे.  हल्ली युगांतर झपाटयाने होत असल्यामुळे या कल्पनेस प्रस्तुत काळी बराच आळा बसला आहे.  आणि हे योग्यच आहे. कारण, आईबापांची कामगिरी सरकारी रीतीने मागे कधीच झाली नाही आणि पुढे होईल अशी आशा करणे मनुष्यजातीला शोभत नाही.  म्हणून इंग्रज सरकारला ते मायबाप नाहीत म्हणून दोष देणाऱ्या माणसांत मुळी माणूसपणाच कमी आहे, असे म्हणणे फारसे वावगे होणार नाही.  इंग्रज लोक या देशात केवळ आधुनिक सुधारणेचा अंमल गाजविण्याकरिता जरी आले नाहीत -  मायबापगिरी बाजूला राहिली - तरी पर्यायाने त्यांच्यामुळे सुधारणेचा हितकारक अंमल बसत चालला आहे, हे त्यांच्या शत्रूंसही कबूल करावे लागेल.  इंग्रजी राज्य आणि आधुनिक सुधारणा ह्यांचे प्रस्तुत विषयाला अनुलक्षून पाहता एक प्रकारे ऐक्य आहे, असे दिसून येईल.

आता अलीकडे इंग्रजी राज्यात आणि सुधारलेल्या मनून ह्या बहिष्काराचा कडकपणा पुष्कळ कमी झाला आहे की काय, असा सहजच प्रश्न उत्पन्न होतो.  मध्यंतरीच्या ह्या दीर्घ काळात ह्याची कडक अंमलबजावणी झाली आहे, ह्याला पुष्कळ दाखले सापडतील, पण हल्ली इंग्रजीच्या महात्म्याने हा कडकपणा बऱ्याच ठिकाणी काही अंशी कमी झाला आहे; ही गोष्ट ह्या लोकांच्या अत्यंत कळकळीच्या कनवाळूसही कबूल करावी लागेल, आणि ह्याबद्दल त्याच्या आनंदही वाटेल.  तथापि, हल्लीच्या सर्व बाजूंनी होणाऱ्या प्रगतीच्या मानाने व इंग्रज सरकारच्या सत्तेच्या, संपत्तीच्या आणि शहाणपणाच्या मानाने पाहता ह्या लोकांची आज जी दाद लागत आहे, ती फारच अल्प होय, असे म्हटल्यावाचून आमच्याने राहवत नाही.  मिठावरचा आणि जमिनीवरचा कर, जकात आणि दुसऱ्या अशाच सर्वसाधारण करांची वसुली करतेवेळी सरकार अमूक जाती उच्च आणि अमुक जाती नीच हा भेद पाहत नाही; पण असे असूनही न्याकोर्टे, दवाखाने, शाळा, पोस्ट ऑफिसे इत्यादी सार्वजनिक जागी नीच मानिलेल्या वर्गास उच्च म्हणविणारांच्या दृष्टीने वागविण्यात येते, त्यामुळे ह्या आधीच रंजलेल्या बापडयांस अनेक अपमान, अडचणी आणि पुष्कळ वेळा अन्यायही सोसावे लागतात.  कर घेतेवेळी सरकार जी समदृष्टी ठेविते ती प्रजापालनाचे वेळी का ठेवीत नाही ?  ती ठेवणे जर काही राजकीय धोरणामुळे अशक्य किंवा अनिष्ट असेल, तर कर घेण्यातही तशीच विशेष सूट असावयाला नको होती काय ?  असो; ह्या बाबतीत सरकारचा कदाचित फारसा दोष नसेल.  आपल्या राज्यात सर्वांना सारखे हक्क आहेत असे सरकारने जाहीर केले आहे व तशी त्याची इच्छा आहे व प्रयत्नही आहेत.  पण ह्या जाहीर इच्छेची अखेरची अंमलबजावणी आमच्या लोकांवरच अवलंबून असल्यामुळे सरकार केव्हा केव्हा अगदी पंगू बनून जाते.  तथापि, सरकारचा फार नसला तरी थोडा तरी दोष आहेच.  लोकांच्या धर्मसमजुतीत हात घालावयाचा नाही, हे सरकारचे धोरण जरी फार इष्ट आणि अवश्य आहे, तरी प्रजेपैकी काही वर्गांच्या धर्मसमजुती, सार्वजनिक शांतता, वगैरे सबबीवरून एखाद्या वर्गाच्या उपजत हक्कांची पायमल्ली होते तेव्हा सरकारने तिकडे कानाडोळा करणे म्हणजे आपल्या प्रजापालनाच्या कर्तव्यास अंशतः तरी चुकणेच होय.  वऱ्हाडप्रांतात अत्यंज मुलांस शाळांतून इतरांबरोबर बसविण्यात येते; इतकेच नव्हे, तर सरकारी नोकरीतही ह्या जातींपैकी थोडयांचा शिरकाव झाला आहे, ही गोष्ट खरी आहे, आणि ती तेथील सरकारी अंमलदार आणि उच्च वर्ग ह्या दोघांनाही भूषणावह आहे.  तथापि इतर प्रांतांत मोठमोठया शहरांतूनही याच्या अगदी उलट प्रकार राजरोस चालू आहेत !  सरकारच्या तगाद्यामुळे म्युनिसिपालिटयांनी मोठमोठया गावी अंत्यजांसाठी वेगळया शाळा काढिल्या आहेत; पण अत्यंत शाळेकरिता चांगले हुशार मास्तर नेमण्यासंबंधी म्युनिसिपल बोर्डांकडून फारच थोडी काळजी घेण्यात येते.  एखादी धर्मार्थ शाळा उघडली की, आपले कर्तव्य आटोपले, असे बोर्डास वाटते.  शाळा कोठेतरी दूर कोपऱ्यात असावयाची, तेथे एक अर्धवट शिकलेला मुसलमान मास्तर ठेवावयाचा - आणि असा जुलमाचा रामराम करून वेगळे व्हावयाचे.

सरकारी नोकरीसंबंधीही या लोकांवरचा बहिष्कार वऱ्हाड प्रांताबाहेर जशाचा तसाच आहे.  मागे लष्करखात्यात या लोकांची बढती होत असल्यामुळे यांच्यांत काही चांगली पेन्शनर मंडळी अद्याप आढळते; पण १८९२ सालापासून ह्या बाबतीतही काही अकल्पित धाड आल्यामुळे ह्यांची पीछेहाट होत आहे.  ह्या नोकरीच्या बाबतीत आपलेच लोक आपल्या ह्या दीन देशबांधवांस कसे खाली रगडीत आहेत, हे खालील गोष्टीवरून कळण्यासारखे आहे.

मंगळूर येथे तेथील ब्राह्मसमाजाच्या सेक्रेटरींनी पंचम लोकांकरिता एक शाळा काढिली आहे.  त्या शाळेत शिकून तयार झालेल्या विद्यार्थ्यांना कोठेतरी चांगली नोकरी मिळवून देण्याकरिता हे गृहस्थ फार झटत असतात.  त्यांच्याकडून आलेल्या एका खासगी पत्रात पुढील मजकूर आहे :

''मी किती खटपट केली तरी एकाही विद्यार्थ्यास नोकरी मिळवून देता आली नाही !  शेवटी एका भल्या युरोपियन डिस्ट्रिक्ट जज्जांनी पुढे जी चपराशाची जागा रिकामी होईल ती पंचमास द्यावी, असा ठराव केला.  जागा रिकामी होऊन एका पंचमाचा अर्ज गेल्याबरोबर त्या सर्व खात्यांतील सुमारे १०० शिपाई मिळून जज्जसाहेबांच्या बंगल्यावर जाऊन आडवे पडले आणि मेहेरबानांनी पंचमाला नोकरीवर घेऊन आपल्यास हिणवू नये; अशी मागणी इतक्या नेटाने केली, की शेवटी मेहेरबानास ती मान्य करावीच लागली !''

ह्या बाबतीत जो अन्याय घडला तो स्वदेशी की परदेशी, ह्याचा निर्णय वाचकांनीच करावा !  मुळी अन्याय घडलाच नाही, असा निर्णय करणारे वाचक भेटल्यास लेखकाचे नशीब म्हणावयाचे.

असो, बहिष्काराचे ह्यापेक्षाही खडतर मासले नित्य आपल्या डोळयांसमोर दिसत आहेत; आणि त्रावणकोरसारख्या अगदी सुधारलेल्या संस्थानातदेखील ह्या लोकांची जी अपेष्टा चाललेली सर्वांच्या ऐकण्यात येते, तीवरून आधुनिक सुधारणेच्या मानाने आमचे पाऊल ह्या बहिष्काराच्या बाबतीत अद्यापि फारच मागे आहे, असे कष्टाने कबूल करावे लागते.
ख्रिस्ती पंथ

व्यवहारात धर्माच्या नावाने जितक्या चुका झाल्या आहेत व होत आहेत तितक्या कशाने झाल्या नसतील !  केवळ व्यवहारातच नव्हे, तर भाषेतही तितक्याच चुका होतात.  खरे पाहू जाता धर्म एकच आहे आणि हिंदू, मुसलमानी, ख्रिस्ती इत्यादी केवळ त्याचे पंथ होत.  असे असता, हे सर्व पंथ निरनिराळे धर्मच मानण्यात आल्यामुळे त्या परस्परांतील तेढही अत्यंत तीव्र झालेली आहे.  मनुष्यप्राण्याला स्वभावसिध्द असलेली ही धर्मप्रवृत्ती ह्या सर्वच पंथांत निरनिराळया रूपाने व कमी-अधिक शुध्द स्थितीत प्रकट होत आहे.  ही धर्मवृत्तीच काय ती शाश्वत आणि हे सर्व पंथ देशकालमानाप्रमाणे बदलत जाणारे आहेत, हे इतिहासावरून उघड दिसत असताही ख्रिस्त्यांना असे वाटते की, ख्रिस्ती धर्मच काय तो सार्वत्रिक धर्म -universal religion- आणि हिंदूंनी तर आपल्या धर्माला 'सनातन' हे नाव कधीच दिलेले आहे !

धर्म आणि त्याचे पंथ यांविषयी वरील शुध्द आणि निरपेक्ष सत्य ध्यानात ठेवून ख्रिस्ती पंथाने प्रस्तुत विषयासंबंधी जी कामगिरी बजाविली आहे, तिचा थोडक्यात कृतज्ञपणाने पण निर्भीडपणे विचार करू या.  हे आमचे विचार ख्रिस्ती, हिंदू, ख्रिस्ती झालेले किंवा हिंदूच राहिलेले अस्पृश्यवर्ग ह्यांपैकी पुष्कळांना पटणार नाहीत, हे आम्ही जाणून आहो; पण त्याला इलाज नाही.  हिंदुपंथाने हीन समजून टाकून दिलेल्या ह्या जातींचा ख्रिस्ती पंथाने जो आजवर परामर्श घेतला आहे व त्याची अंशतः तरी उन्नती केली आहे, त्याबद्दल ह्या पंथाचे जितके धन्यवाद गावे तितके थोडेच आहेत.  या बाबतीत ख्रिस्ती मिशनरी केवळ परोपकारबुध्दीने काम न करिता ह्या गरीब लोकांना आपल्या कळपात ओढण्याचा त्यांचा कावा असतो; असा जो काहीसा आक्षेप असतो, त्यातही विशेष अर्थ नाही.  ख्रिस्ती मंडळीला जर आपला पंथ चांगला वाटतो, तर त्यात दुसऱ्यांनी यावे असा त्यांनी प्रयत्न करणे हे त्यांच्या ख्रिस्तीपणाला शोभते.  उलट, ज्या हिंदूला ह्या गरीब जाती आपल्या धर्मात राहिल्या काय अथवा गेल्या काय सारख्याच वाटतात, आणि ह्या लोकांनी हिंदुधर्मात असेतोपर्यंत मात्र दूर रहावे आणि ख्रिस्ती होऊन पोशाख बदलून जवळ आल्यास हरकत नाही, असे वाटते, त्यांच्या उदासीनपणाला व विसंगतपणाला दुसऱ्या कशाचीही उपमा दिसत नाही !

पण मुख्य प्रश्न बाजूलाच राहिला आहे.  तो हा की, जवळ जवळ ५॥ कोटी प्रजेने अशा हीन स्थितीत राहून चालेल काय ?  हिंदुपंथ तर आपला सोवळेपणा सोडावयाला तयार नाही, आणि तो सोवळेपणा कायम आहे तोपर्यंत या जातीला पुढे सरकावयाला जागा नाही.  तर मग हे व्हावे कसे ?  इतक्या सगळयांनी एकदम ख्रिस्ती व्हावे ?  याक्षिणीची कांडी फिरवून इतक्या लोकसमुदायाला कोणी एकदम ख्रिस्ती करील म्हणावे तर तेही संभवनीय नाही.  तथापि हिंदू लोकांची उदासीनता व विसंगतता शाश्वत राहिली, तर मात्र वरील चमत्कारही घडण्याचा संभव आहे.  असा प्रकार खरोखरीच घडून आला तर राष्ट्रीयदृष्टया काय प्रकार होईल पहा.  हल्ली भारतीय साम्राज्यात खालीलप्रमाणे लोकसंख्या आहे.

(इतर १५ + हीन ५॥ मिळून) २१ कोटी हिंदू.  (इतर ५ + हीन १ मिळून) ६ कोटी मुसलमान.  ३० लक्ष ख्रिस्ती.  १ कोटी जंगली.  १ कोटी बुध्द, जैन, शीख वगैरे.

हिंदुपंथाची उदासीनता आणि ख्रिस्ती पंथाची चळवळ आताप्रमाणेच कायम राहील तर पुढे, खाली दिल्याप्रमाणे गणना होण्याचा संभव आहे :

१५ कोटी हिंदू, ६ कोटी मुसलमान.  ७ कोटी ख्रिस्ती.  १ कोटी बुध्द, जैन, शीख इत्यादी.  म्हणजे राष्ट्रीयदृष्टया आता जी हिंदुमुसलमानांची दुही आहे, तिच्याऐवजी वरील प्रकार घडलाच तर हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती यांचा तिरपगडा होणार !  १५ कोटी मवाळ हिंदू आणि जवळ जवळ तितकेच कडवे मुसलमान आणि ख्रिस्ती मिळून या तिघांचे सूत कसे जमणार, ईश्वर जाणे ! यावर काही ख्रिस्ती मंडळीचे म्हणणे असे पडते की, ५॥ कोटी हीन दशेतल्या महारमांगांचे व त्यांना दूर दूर ठेवणाऱ्या १५ कोटी इतर हिंदूंचे आता तरी कोठे सूत जमत आहे ?  हे ५॥ कोटी महारमांग ख्रिस्ती होऊन सुशिक्षित आणि सुखवस्तू झाल्याने राष्ट्राचे पाऊल मागे पडण्यापेक्षा पुढेच पडणार नाही कशावरून ?  इतके लोक ख्रिस्ती झाल्यावर ते ह्या देशातलेच कायमचे राहणारे असल्याने इतर हिंदूंशी ते राष्ट्रीय बाबतीत विरोधानेच वागतील कशावरून ?  दुसऱ्या पक्षी, काही जुन्या मताच्या आणि तटस्थ वृत्तीच्या हिंदू मंडळीचे असे म्हणणे पडते की, वरिष्ठ हिंदू कितीही उदासीन राहिले तरी हीन मानिलेले लोक कालांतराने आपली आपणच सुधारणा करून घेऊन एक वेगळी जात बनवून सुखाने रहाणार नाहीत कशावरून ? मग त्यांच्या उध्दारासाठी एवढा खटाटोप कशाला हवा आहे ? हिंदूंचा उदासीनपणा कायम धरून चार प्रकारचे परिणाम संभवतात.  (१) हे ५॥ कोटी लोक अशाच स्थितीत राहतील, किंवा (२) आपणच आपला उध्दार करून नवी जात बनवितील, किंवा (३) ख्रिस्ती होऊन हिंदूंशी विरोधाने वागतील किंवा (४) धर्म बदलला तरी राष्ट्रीय बाबतीत सलोख्याने वागतील.  पण हे चारी प्रकार हिंदुस्थानातील कोणाही बाणेदार, पगमनशील हिंदूला समाधानकारक वाटणार नाहीत.  हिंदुस्थानातील जातिभेद हिंदी राष्ट्राला घातक आहे, हे आता इतके दिवस सामाजिक प्रगतीच्या उलट असलेली 'काळ', 'भाला', 'केसरी'सारखी पत्रेही कंठरवाने सांगू लागली आहेत !  हिंदूंच्या तटस्थपणाचा आता बहुतेकाला वीट येऊन चुकला आहे. ह्या ५॥ कोटी प्राण्यांचा उध्दार होऊन हे भावी हिंदी समाजात व हिंदी साम्राज्यात एकजीव होऊन जावे अशी सर्वांची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे.  पण ही संजीवनी देणारा द्रोणागिरी कोणी उचलून आणावा, हाच प्रश्न आहे.  हिंदू, ख्रिस्ती, मुसलमान इत्यादी पंथांचे जुनाट आणि जाड कवच फोडून धर्मप्रवृत्तीचा नवीनच एक अंकुर बाहेर आला पाहिजे.  धमसंचाराशिवाय केवळ स्वार्थी आणि हिशोबी प्रवृत्तीच्या जोरावर हे काम होण्यासारखे नाही.  आणि धर्माची प्रेरणा झाली तरी ती पंथाची जाड भिंत फोडण्याइतकी बळकट नसेल, तर आतल्या आतच विरून जाण्याचा संभव आहे.  ही भिंत फोडून काही नवीन अंकुर ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज ह्यांच्या रूपाने ह्या देशात वर येऊ लागले आहेत.  त्यांच्यात अंतरीचे बल किती आहे हे पाहण्याची कसोटी प्रस्तुत विषयात आहे. विचार करिता करिता आपण प्रेरणेच्या प्रदेशात जाऊन पोहचलो.  या प्रदेशात आपल्या दृष्टीस काय काय पडत आहे, या हीन-दीन लोकांच्या उध्दारासाठी आपल्या लोकांचे कसकसे प्रयत्न चालले आहेत व ते कितपत सफल झाले आहेत अगर होण्याचा संभव आहे, याचा विचार पुढील भागात करू.