परिषद कमिटीच्या कामाचा रिपोर्ट
ज्या मंगलमय प्रभूच्या कृपेने भा. नि. सा. मंडळीची महाराष्ट्र परिषद शनिवार, रविवार व सोमवार ता. ५,६ व ७ ऑक्टोबर सन १९१२ या तिन्ही दिवशी निर्विघ्नपणे पार पडली, त्या प्रभूचे आरंभी नम्रभावाने स्तवन करून नंतर परिषदेच्या अहवालास सुरुवात करू.
कल्पनेचा उदय : नि.सा. मंडळीच्या पुणे शाखेच्या कामावर देखरेख ठेवण्याकरिता रा. वि. रा. शिंदे हे ऑगस्ट महिन्यात पुणे येथे आले. त्यानंतर त्यांच्या मनात पुणे शाखेच्याच हितचिंतकांची एक लहानशी परिषद अगदी अल्प प्रमाणात भ्रवावी, हे विचार घोळू लागले व यासंबंधी चर्चा करून रा. जव्हेरे, सत्तूर, सहस्त्रबुध्दे, पटवर्धन वगैरे मंडळींची एक लहानशी सभा भरून ज्या पद्धतीवर परिषदेचे काम चालावे असे ठरले, ती पद्धत आखली गेली. पुढे विचारांती या संकुचित परिषदेची कल्पना राहून विस्तृत प्रमाणावर भारतीय नि. सा. मंडळीच्या महाराष्ट्रातील हितचिंतकांचीच एक परिषद भरवावी असे ठरले व त्याप्रमाणे परिषदेची कार्यकारी कमिटी ठरली. या कमिटीच्या रचनेत एक विशेष आहे तो हाच की, हिच्यात सर्व अस्पृश्य जातीचे निवडक प्रतिनिधी तर घेतलेच, पण त्याखेरीज प्रो. भाटे, कानिटकर व सहस्त्रबुध्दे, रा. देसाई, सत्तूर व भातखंडे वगैरे मंडळी घेऊन पुण्यास जनतेकरिता खटपट करणाऱ्या संस्थांचेही त्यात प्रतिनिधी येतील, अशी व्यवस्था केली. इतकी व्यवस्था झाल्यानंतर या परिषद स्वगत कमिटीचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची डॉ. मॅनसाहेब यांना विनंती केली व ती त्यांनी नेहमीच्या सौजन्यास अनुसरून मान्य केली. नंतर परिषद स्वागत मंडळीची पहिली बैठक ता. ७ सप्टेंबर रोजी भरली. त्या वेळी परिषदेसंबंधी सर्व व्यवस्थेचे टाचण तयार झाले, व्यवस्थापकांत कामाची वाटणी झाली व कामास जोराने सुरुवात झाली. या परिषदेकरिता बाहेरगावाहून निराश्रितांचे प्रतिनिधी, नि. सा. मंडळीच्या शाखांचे प्रतिनिधी व इतर हितचिंतक विद्वान वत्तेफ् यांना आमंत्रण करावयाचे ठरले व ती सर्व मंडळी येथे आल्यावर त्यांची उतरण्याची, राहण्याची, जेवण्याची वगैरे सर्व सोय करण्याचेही परिषद-कमिटीने पत्करिले. अर्थात 'मूळातरभास्तंडुलाः प्रस्थमूलाः' या न्यायाने पैशाची अडचण दत्त म्हणून पुढे उभी राहिली. पण त्या बाबतीत शक्य ती खटपट करण्याचे काम प्रो. सहस्त्रबुध्दे व भाटे आणि रा. देसाई व शिंदे यांनी पत्करिले व प्रो. धर्मानंद कौसंबी, प्रो. घाटे, रा. हिवरगांवकर, रा. चिटणीस वकील, रा. नीलकंठराव सहस्त्रबुध्दे व भारत सेवक समाजाचे रा. आपटे यांनी फार श्रम घेऊन मदत केली. त्याबद्दल या सदगृहस्थांचे आम्ही फार आभारी आहोत.
परिषदेकरिताप्रथम पाचशे रुपयांपर्यंत खर्च लागेल असा अंदाज होता, पण अखेरीला सोबत जोडलेल्या हिशेबांत दाखविल्याप्रमाणे खर्च झाला.
परिषदेस येण्याकरिता बाहेरगावच्या निवडक निराश्रित बंधूंना व इतर वरिष्ठ जातींच्या बंधूंनाही परिषद-कमिटीच्या सेक्रेटरींनी आमंत्रण केले व त्यांचापत्रव्यवहार परिषद भरेपर्यंत चालूच होता. परिषदेकरिता जवळजवळ २००० पत्रे बाहेर पाठवून त्यांची उत्तरेही आली, व हे काम अवघ्या १-१॥ महिन्याच्या आत करावे लागले. बाहेरगावांहून परिषदेसाठी येणाऱ्या मंडळींना कन्सेशन्स देण्याबद्दल निरनिराळया रेल्वे कंपन्या व बोटींच्या कंपन्या यांच्याशीही सेक्रेटरींनी पुनःपुनः पत्रव्यवहार केला; पण सर्वांकडून शेवटपर्यंत नाकारार्थीच जबाब आल्यामुळे बाहेरून येणाऱ्या बऱ्याचजणांची व परिषद-कमिटीचीदेखील फार निराशा झाली. या परिषदेच्या बाबतीत खाली दिलेल्या विशेष गोष्टींची योजना केली होती.
१. स्थानिक सभा : परिषदेची कल्पना समजावून देण्यासाठी स्थानिक निराश्रितांच्या मोहल्यांत जाऊन भवानी पेठेत २, गंज पेठेत १, भांबुर्डा येथे २, कसबा पेठेत १, हडपसर येथे १ व वानवडी येथे १, अशा एकंदर आठ सभा भरविण्यात आल्या. या सर्व ठिकाणी जमलेल्या मंडळींना या सभेस निमंत्रण करण्यात आले व ह्यांपैकी बरीच मंडळी परिषदेस आली होती, ही मोठया आनंदाची गोष्ट आहे.
२. परिषदेकरिता स्वयंसेवकांची मंडळी : या मंडळीची सभा ता. ४ ऑक्टोबर रोजी भरून त्यांत रा. शिंदे यांनी परिषदेचा उद्देश समजावून दिला व त्याप्रमाणे सोबत नावे दिलेल्या मंडळींनी स्वयंसेवकांचे काम परिषदेच्या तिन्ही दिवशी उत्तम तऱ्हेने पार पाडले याबद्दल परिषद कमिटी यांची फार आभारी आहे. स्वयंसेवकांखेरीज सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सभासद रा. वझे यांनी तर परिषदेच्या कामाला रात्रंदिवस मदत केली व त्यांच्या प्रयत्नांनी परिषदेचे बरेच काम यशस्वी झाले, हे नमूद करण्यास आम्हांस फार आनंद वाटत आहे. रा. वझे यांचे हातून अशीच देशसेवा व समाजसेवा होवो, असे आम्ही इच्छितो.
३. पाहुण्यांची सोय : परिषदेकरिता आलेल्या सर्व पाहुण्यांच्या जेवण्याची सोय नि.सा. मंडळीच्या पुणे येथील लष्करांतील शाळेच्या इमारतीत केली होती. या इमारतीच्या पिछाडीस या पाहुण्यांच्या भोजनाकरिता एक प्रशस्त मंडप घातला होता. या मंडपात शुक्रवार सायंकाळपासून सोमवार दुपारपर्यंत पाहुण्याची भोजने झाली. पाहुणे सर्व मिळून सुमारे २५० होते. स्वयंपाक करण्यास ब्राह्मण आचारी मिळाले होते, ही विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. अशा रीतीने सर्व जातींच्या पाहुण्यांचे एकाच मंडपात भेदभाव न बाळगिता एकत्र भोजन होत होते.
४. पाहुण्यांचे व इतर हितचिंतकांचे प्रीतिभोजन : परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी परिषदेचे स्वयंसेवक, वरिष्ठ ज्ञातींचे हितचिंतक व इतर पाहुणे मंडळी यांचे प्रीतिभोजन झाले. भोजनप्रसंगी डॉ. मॅन यांनी स्वागतकमिटीचे अध्यक्ष म्हणून मुख्य यजमान या नात्याने पाहुणे मंडळींचा मोठया प्रेमाने समाचार घेतला व ते स्वतःही एतद्देशीय पद्धतीने बूट काढून सर्वांबरोबर जमिनीवर जेवावयास बसले. या वेळेचा थाट व आनंद अवर्णनीय होता. सर्व हिंदुस्थानात अशा आनंदाचे प्रसंग नेहमी केव्हा येतील ते येवोत, पण नि.सा. मंडळीच्या परिषदेच्या वेळी तरी हा प्रसंग आला याबद्दल परिषद-कमिटीला धनयता वाटत आहे. भोजनास सुमारे ४०० मंडळी होती. त्यांपैकी निदान ५० तरी निरनिराळया वरिष्ठ जातींची होती.
५. परिषदेस आलेल्या प्रतिनिधींची व पाहुण्यांची विशेष माहिती : परिषदेकरिता निरनिराळया जिल्ह्यांतून व निरनिराळया गावांतून सर्व जातींचे पाहुणे आले होते. या सर्व पाहुण्यांची जातवारी व स्थलवारी दाखविणारे कोष्टक सोबत जोडलेले आहेच. या पाहुण्यांत उमरावती व अकोला वगैरेसारख्या लांबच्या पल्ल्यावरून रा. भांगले व रा. परचुरे व भावनगरहून रा. वैद्य यांनी सहकुटुंब येऊन आपल्या निराश्रित बंधूंना वर घेण्याचा जो उत्साह दाखविला त्याबद्दल; अहमदनगर, बेळगांव, सातारा, मुंबई वगैरे ठिकाणांहून आमच्या निराश्रित बंधूंनी कळकळ दाखवून त्यांच्या उन्नतीकरिता चाललेल्या या मुंडळीच्या प्रयत्नांना उत्तेजन देण्याकरिता ते येथे आले त्याबद्दल; नाशिक, कोल्हापूर, पंढरपूर, मुंबई वगैरे ठिकाणांहून जी थोर थोर वरिष्ठ जातींची मंडळी येथे आली त्याबद्दल; त्या सर्वांचे परिषदकमिटी अंतःकरणपूर्वक आभार मानीत आहे. कित्येक ठिकाणच्या आमच्या अस्पृश्य बंधूंना रेल्वेकडून कन्सेशन न मिळाल्यामुळे, पैशाच्या अडचणीमुळे व वरिष्ठांकडून रजा न मिळाल्यामुळे निराश होऊन येता आले नाही, हे आम्ही जाणून आहोत. परंतु त्यांनी परिषदेच्या कामाबद्दल जी सहानुभूती व प्रेम दाखविले त्याबद्दल त्यांची परिषद-कमिटी ॠणीच राहील. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, उमरावतीहून मिसेस भांगले, अकोल्याहून श्री. व सौ. इंदिराबाई परचुरे, श्रीमती बेंद्राबाई; मुंबईहून श्री. सौ. लक्ष्मीबाई रानडे व श्री. सौ. जनाबई शिंदे, भावनगरहून श्री सौ. चंपूताई वैद्य व सातारा, मिरज वगैरे ठिकाणांहून इतर अस्पृश्य भगिनींनी या परिषदेकरिता येऊन जी मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. या सर्व बाहेरगावाहून आलेल्या भगिनींनी श्री. सौ. रुक्मिणीबाई शिंदे यांनी व मिसेस कांबळे, थोरात, सदाफळे वगैरे अस्पृश्य भगिनींनीही येऊन जी मदत केली; त्यामुळेच सर्व सामानासुमानाची नीट व्यवस्था लागली. या सर्व मदतीबद्दल वरील भगिनींचे आम्ही फार आभारी आहोत.
६. पाहुण्यांची दिनचर्या : सर्व पाहुणे मंडळी येथे आल्यावर त्यांच्या नावांची नोंद होई, नंतर त्यांची सर्व प्रातःकालची कृत्ये वगैरे आटोपल्यानंतर त्यांना चहा देण्यात येई, नंतर त्यांची व इतर मंडळींची ओळखदेख होऊन बोलणेचालणे होई व नंतर मोठया प्रेमाने भेजने होत. सर्व दिवसाचा कार्यक्रम ठरलेला असे, त्याप्रमाणे नियमितपणे सर्व कामे होत. दर दिवसाच्या कार्यक्रमाला भजनाने व उपासनेने सुरुवात होई. पहिल्या दिवसाची उपासना येथील वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध नागरिक रा. ब. काशिनाथ बाळकृष्ण मराठे यांनी चालविली. दुसऱ्या दिवसाची उपासना, पुणे येथील प्रार्थनासमाजाच्या बुधवारातील श्रीहरिमंदिरात परिषदेचे अध्यक्ष डॉ. भांडारकर यांनी चालविली. त्या वेळी परिषदेची सुमारे २५० मंडळी समाजाच्या बुधवारांतील श्रीहरिमंदिरात जमली होती. तिसऱ्या दिवशी सकाळी रा. शिंदे ह्यांनी शाळेत उपासना चालविली. त्या वेळी परळ बोर्डिंगातील मुलांनी निरनिराळया व्यक्ति-प्रार्थना केल्या.
७. स्त्रियांची सभा : परिषदेच्या कामाची पुण्यातील निराश्रित वर्गातील स्त्रियांना व त्यांच्या वरिष्ठ वर्गातील हितचिंतक भगिनींना माहिती करून देण्याकरिता मंडळीच्या लष्करातील शाळेत सोमवार ता.७ ऑक्टोबर १९१२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता स्त्रियांची सभा भरली होती. या सभेस पुण्यातील फीमेल ट्रेनिंग कॉलेजांतील विद्यार्थिनी, सेवासदनातील श्री. सौ. सीताबाई भाण्डारकर, श्री. सौ. काशीबाई कानिटकर वगैरे पुष्कळ सभासद, मुंबईच्या श्री. सौ. लक्ष्मीबाई रानउे, अकोल्याच्या श्री. सौ. इंदिराबाई परचुरे व श्रीमती बेंद्राबाई, मिसेस हारकर व लष्करातील बऱ्याच अस्पृश्य भगिनी मिळून सुमारे ३०० स्त्रिया या सभेस हजर होत्या. या सभेचे अध्यक्षस्थान श्री. रमाबाईसाहेब रानडे यांनी स्वीकारले होते. प्रास्ताविक भाषणे श्री. जनाबाई शिंदे व त्यांचे बंधु रा. शिंदे यांची झाल्यानंतर, श्रीमती रमाबाईसाहेब यांचे फार मुद्देसूद भाषण झाले. त्यानंतर श्री. सौ. इंदिराबाई परचुरे, श्री. सौ. लक्ष्मीबाई रानडे, मिसेस हारकर व अस्पृश्य भगिनींपैकी सौ. पार्वतीबाई जाधव यांची भाषणे झाली. या सभेच्या प्रसंगी मुलांची स्वागतपर गाणी व ड्रिल प्रेक्षणीय झाली.
८. परिषदेत झालेली वक्तयांची भाषणे : या परिषदेत तिन्ही दिवशी मिळून बऱ्याच वक्तयांची भाषणे झाली. त्यात अध्यक्ष डॉ. भाण्डारकर, नामदार सरकार बाबासाहेब इचलकरंजीकर, नामदार मौलवी रफिउद्दीन अहमद, रा. देवधर, रा. नरसोपंत केळकर, धारवाडचे श्रीमत महाभागवत, रा. लक्ष्मणशास्त्री लेले, रा. जाधवराव, प्रो. भाटे, कानिटकर व लिमये व अस्पृश्यवर्गापैकी रा. गवई, कांबळे, सुभेदार, मेजर भाटणकर, डांगळे, रखमाजी कांबळे, संतूजी वाघमारे, साताऱ्याचे रा. श्रीपतराव नांदणे व पुण्याचे रा. नाथामहाराज वगैरे मंडळींची भाषणे फार मुद्देसूद व विचारणीय झाली. अध्यक्षांच्या भाषणातील विचारणीय माहिती व अस्पृश्यांच्या प्रश्नांबद्दल त्यांची कळकळ खरोखर अवर्णनीय आहे. श्रीमंत इचलकरंजीकर यांच्यासारख्या संस्थानिकाने निराश्रित साहाय्यकारी मंडळीने चालविलेल्या शिक्षणविषयक कामाला सहानुभूती दाखवावी, मंडळीला प्रेमाच्या शब्दांनी उत्तेजन द्यावे, अस्पृश्यांना प्रथम कडू वाटणारा पण परिणामी हितकर होणारा उपदेश करावा, या गोष्टीने मंडळीच्या चालकांना आपल्या कामात जय मिळविण्याची फार उमेद वाटत आहे. श्रीमंत महाभागवत, रा. लक्ष्मणशास्त्री लेले व नरसोपंत केळकर यांची भाषणे फारच उदारतादर्शक झाली. त्यांच्यासारख्या जुन्या हिंदुधर्माभिमानी गृहस्थांनी पुढाकार घेऊन नि. सा. मंडळीला आपल्याकडून शक्य ती मदत करण्याची अशीच तजवीज केली, तर मंडळीवर हे त्यांचे महदुपकार होतील. वरील सर्व वक्तयांच्या मदतीनेच परिषद यशस्वी झाली. डॉ. भाण्डारकर यांनी उतारवयात कामाचा पुष्कळ बोजा शिरावर असता, अध्यक्षस्थान स्वीकारून परिषदेच्या कार्याला जी बिनमोल मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार शब्दांनी मानणे फार कठीण आहे. इतर सर्व वत्तेफ्, परिषदेचे प्रतिनिधी व हितचिंतक व फर्ग्युसन कॉलेजची सर्व मंडळी यांचे आभार मानणे आमच्या शक्तीबाहेर आहे. कारण त्या सर्वांनी जी मदत केली व परिषदेचे जे काम आपले म्हणून अंगावर घेतले, त्याबद्दल त्यांचे आभार किती मानावे !
९. परिषदेच्या कामाकरिता मिळालेली मदत : परिषदेच्या फंडाला रोख रक्कम रुपये मिळाली व वटखर्च रुपये ..... झाला यावरून ...... रुपयांची तूट आलेली आहे; ही तूट भरून काढण्यास मदत करण्यास उदार देशबंधूंना परिषद-कमिटीची विनंती आहे. परिषदेच्या कामाकरिता रोकड रक्कम ज्यांनी दिली त्यांची तर परिषद-कमिटी आभारी आहेच. त्याखेरीज वानवडीचे अस्पृश्यवर्गातलेच काँट्रॅक्टर रा. शिवराम कृष्णाजी कांबळे यांनी व त्यांच्या मुलांनी मांडव घालण्याच्या कामी स्वतःचे सामान पुरवून रात्रंदिवस केलेल्या अंगमेहनतीबद्दल, रा. मांडगावकर यांनी मांडवाच्या छताकरिता कापडाचे सुमारे ६० रु.चे ८ तागे पाठविल्याबद्दल, रा. गौडसाहेब यांनी खर्ुच्या, तंबू वगैरे सामान मिळवून देण्याकरिता केलेल्या खटपटीबद्दल, रा. मार्गन बाळमृष्ण, मेहता मंपनी, एच. ओ. अब्दुल रहिमान, मेसर्स मेरवानजी मेस काँट्रॅक्टर, रा. मारुतीराव व कांबळे, मेसर्स गोखले, टोकेकर व कंपनी व श्री. सीतारामपंत जव्हेरे यांनी खर्ुच्या, तंबू, ताडपत्र्या व इतर सामान दिल्याबद्दल, डॉ. रानडे, रा. शिवराम कृष्णाजी कांबळे, रा. शिवराम जानबा कांबळे, रा. थोरात, रा. ढवळे वगैरे मंडळींनी भांडी वगैरे दिल्याबद्दल त्या सर्वांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. त्याखेरीज रा. काशीनाथ विष्णु दामले यांनी टाइपरायटर देऊन व सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीने आपला सायक्लोस्टाइल प्रेस देऊन परिषदेच्या कामाला फार मदत केली. आर्यभूषण छापखान्याच्या व्यवस्थापकांनी परिषदेची सर्व कामे फार थोडया वेळात सुबक व सुंदर छापून दिली. या मदतीबद्दल आम्ही वरील सर्व मंडळींचे ॠणी आहोत.
१०. परिषदेत बोर्डिंगास मिळालेली मदत : परिषदेच्या प्रसंगी ता. ५ रोजी नि.सा. मंडळीच्या पुणे शाखेच्या निघणाऱ्या बोर्डिंगाकरिता मदत मागण्यासाठी जी भिक्षापात्रे सभासदांत फिरविण्यात आली; त्यात वरिष्ठ वर्गीयांच्या बरोबरीने अस्पृश्य बंधूनीही शक्तयनुसार भिक्षा घालून मदत केली, याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. आपल्याचकरिता निघणाऱ्या व चालणाऱ्या संस्थांना अशीच सक्रिय सहानुभूती अस्पृश्य बंधूंनी नेहमी वाढत्या प्रमाणात दाखवावी अशी आमची त्यांस विनंती आहे. या बोर्डिंगच्या मदतीकरिता परिषदेत रोख ८० रुपये व १२५ रुपयांची वचने मिळून अंदाजे २०० रुपये जमा झाले. बोर्डिंगकरिता सुरुवातीला २००० रुपयांची जरुरी आहे हे लक्षात घेऊन नि. सा. मंडळीच्या सर्व हितचिंतकांनी या कार्याला मदत करावी अशी त्यांस आमची नम्र विनंती आहे.
११. परिषदेतील गायनाचा कार्यक्रम : या परिषदेत नि. सा. मंडळींच्या पुणे शाखेच्या शाळेतील मुलांनी स्वागतपर गाणी म्हटली व ड्रिल करून दाखविले. त्याचा प्रेक्षकांवर फार चांगला परिणाम झाला. वरील पद्ये व ड्रिल वगैरे कामे थोडक्या दिवसांच्या अवधीत मुलांना शिकण्याचे व शिकविण्याचेही फार श्रम पडले. पण मुलांनी हुरूपाने जी आपली कामगिरी बजाविली त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. त्याचप्रमाणे पुणे शाखेच्या शिक्षकमंडळींनी परिषदेकरिता स्वयंसेवकांप्रमाणे उत्साहाने व प्रेमाने जी कामे बजाविली व परिषदेच्या कार्याला मदत केली त्याबद्दल त्या सर्वांचे परिषद-कमिटीतर्फे आम्ही आभार मानितो.
१२. मुंबईच्या बोर्डिंगचे विद्यार्थी : मुंबईच्या निराश्रित सा. मंडळीच्या परळ येथील बोर्डिंगातील वीस विद्यार्थी बरोबर घेऊन परिषदेत स्वयंसेवकांचे कामाकरिता बोर्डिंगचे सुपरिंटेंडंट स्वतः आले होते. त्या विद्यार्थ्यांच्या आचार, विचार व राहणीवर बोर्डिंगात राहून किती सुपरिणाम झाला आहे; हेही येथे परिषदेकरिता जमलेल्या अस्पृश्यवर्गातील व वरिष्ठ वर्गातील पाहुण्यांना पहावयास सापडले. या मुलांनीही परिषदेच्या कामास फार व्यवस्थितपणे मदत केली. या मदतीबद्दल परळ बोर्डिंगचे सुपरिंटेंडंट रा. वामनराव सोहोनी व त्यांचे विद्यार्थी यांचे आम्ही फार आभारी आहोत.
शेवटी ज्या जगन्नियंत्याच्या कृपेने ही परिषद यशस्वी होऊन पार पडली, त्याची अशीच कृपादृष्टी सदैव निराश्रित साह्यकारी मंडळीवर राहो व मंडळीच्या हातून नेहमी त्याला आवडतील अशीच सत्कृत्ये घडोत, अशी त्याची नम्र प्रार्थना करून हा लांबलेला रिपोर्ट पुरा करितो.
वि. रा. शिंदे
दा. ना. पटवर्धन,
सेक्रेटरीज्
नि. सा. मंडळीची शाळा,
लष्कर-पुणे
ता. २५ नोव्हेंबर सन १९१२