प्रकरण सहावे
ब्रह्मदेशाची यात्रा करण्याचे मनात आणून मी जेव्हा इ.स. १९२७ च्या फेब्रुवारीत कलकत्त्याहून निघालो, तेव्हा माझे मनातील मुख्य उद्देश केवळ बौध्द धर्माचे साधन प्रत्यक्ष पाहण्याचाच होता. हा निर्वेधपणाने साधावा म्हणून माझे इतर व्यवसाय आणि अभ्यास काही काळ तरी बाजूस ठेवावेत, असे मला वाटत होते. पण मी जेव्हा या विचित्र देशात संचार करू लागलो तेव्हा प्राचीन वास्तुशास्त्र, तुलनात्मक भाषाशास्त्र, मानवंशशास्त्र इत्यादी ज्या माझ्या आवडीच्या गोष्टी त्यांनी मजवर एकदम हल्ला चालविला. ब्राह्म धर्माचा प्रचारक ह्या नात्याने तुलनात्मक धर्मशास्त्राचे अवलोकन मला आजन्म करणे भाग आहे. आणि वरील शास्त्रे तौलनिक धर्मशास्त्राच्या अगदी हद्दीवरती व त्याशी सजातीय असल्याने त्यांच्या अध्ययनापासून, विशेषतः इतक्या भिन्न परिस्थितीत आल्यावर, स्वतः अलिप्त राहणे मला फार कठीण पडले.
ब्रह्मदेशात हिंदुस्थानातला जातिभेद मुळीच नाही, ही गोष्ट अगदी खरी आहे. तेवढयावरून येथे कोणत्याही प्रकारचा बहिष्कृतवर्ग मुळीच नाही, किंवा पूर्वी नव्हता, असा माझा समज होता. इतकेच नव्हे, तर ह्या देशात पुष्कळ वर्षे राहून वरवर पाहणाराचाही असाच समज असलेला मला दिसून आला. पण खरा प्रकार असा नसून, अगदी अलीकडच्या काळापर्यंत ह्या देशात, बहिष्कृत स्थितीत निदान एक हजार वर्षे तरी खितपत पडलेले चार-पाच तरी मानववर्ग मला आढळले. श्वे यो ह्या टोपणनावाच्या एका इंग्रजाने लिहिलेल्या Burman - His Life and Nation ह्या इंग्रजी ग्रंथात मी जेव्हा ह्या बहिष्कृत दासवर्गाचे वर्णन वाचले तेव्हा मला त्याचे फारच आश्चर्य वाटले. जातिभेद नसताही बहिष्कृतवर्ग असून शकतो, हे अमेरिकेतील अत्यंत सुधारलेल्या संयुक्त संस्थानातील सामान्य लोकांचे तेथील निग्रोशी जे वर्तन घडते व दक्षिण आफ्रिकेतील गौरकायांचे इतर वर्णीयांशी जे वर्तन घडते, ते ज्यांनी पाहिले आहे, त्यांना सहज पटण्यासारखे आहे.
गेल्या वर्षी भारत इतिहास संशोधक मंडळापुढे अस्पृश्यतेचे मूळ आणि तिचा हिंदुस्थानातील विकास ह्या विषयावर मी माझा निबंध वाचला. तेव्हापासून ह्या विषयाचा मी अधिकच शोध करीत आहे. ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्गाची मला जी माहिती शोधाअंती मिळाली व जी हल्लीची वस्तुस्थिती जागोजागी जाऊन मी प्रत्यक्ष निरखिली, तिच्यामुळे माझ्या स्वीकृत विषयावर अधिक प्रकाश पडणार आहे, म्हणून मी पुढील माहिती संक्षेपाने देत आहे.
ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्गाचा उगम ब्रह्मदेशातील गुलामगिरीच्या संस्थेत आहे. ब्रिटिश राज्याची संस्थापना ब्रह्मदेशात इ.स. १८८५ साली पूर्णपणे झाली. ह्यापूर्वीच्या स्वराज्यात ह्या देशात गुलामगिरीची संस्था होती. ती येथे किती पुरातन होती हे ठरविण्याची निश्चित साधनू तूर्त उपलब्ध नाहीत. अनेकविध सामग्री जमवून मि.जी.ई.हार्वे, आय.सी.एस. ह्यांनी नुकताच ब्रह्मदेशाचा एक नमुनेदार आमूलाग्र इतिहास दिलेला आहे. त्यात त्यांनी इसवी सनाच्या चालू सहस्त्रकाच्या आरंभी सूरू झालेल्या पगान येथील राजघराण्यापासून विश्वसनीय इतिहास दिला आहे. हे घराणे अनिरुध्द या नावाच्या पराक्रमी थोर पुरुषाने स्थापिले. ह्या घराण्याने या देशात जे मोठे मन्वंतर घडवून आणण्यासाठी अनेक राष्ट्रीय हिताची कामे केली; त्यात देशातील बौध्द धर्माची सुधारणा करून मोठमोठी बौध्द देवस्थाने बांधली, हे एक काम होय. ही देवळे बांधण्यासाठी खेडयांतून शेतकीवरील पुष्कळशा लोकांना जबरीने धरून आणून गुलाम करून त्यांच्याकडून काम घेतले. ह्याशिवाय कायमच्या गुलामगिरीचे दुसरे एक कारण ब्रह्मदेशात असे आहे - देवस्थानांत झाडलोट व इतर राखणदरीची कामे करणे, हे गुलामांचेच काम आहे. कित्येक भाविक लोक ही गुलामगिरी आपण होऊन पत्करीत असत. पण साधारपणे राजाज्ञेने हा जबरीचा गुरवपणा खेडयातून धरून आणिलेल्या लोकांवर किंवा लढाईत जिंकून आणिलेल्या लोकांवर लादण्यात येत असे. मि. हार्वे ह्यांनी पान ३३१ वर एक इ.स. १९७९ चा शिलालेखाचा उतारा दिला आहे. त्यात 'अभिनंदथू नावाच्या एका श्रीमंत दरबारी गृहस्थाने एक मोठे देऊळ बांधून त्याच्या साफसफाईसाठी स्वतःला, आपल्या बायकोला व मुलांना गुलाम म्हणून वाहिले...' असा उल्लेख आहे.
अशा देवळी गुलामांवर व त्यातल्या त्यात लढाईत जिंकून आणलेल्या गुलामांवर वंशपरंपरेचा बहिष्कार पडत असे. त्यांच्याशी इतर साधारण स्वतंत्र समाज मिळूनमिसळून राहत नसे. म्हणजे ब्रह्मदेशांत जातिभेद मुळीच नसला तरी स्वतंत्र आणि गुलाम असे दोन मुख्य सामाजिक भेद असत व घरकामाकरिता ठेविलेल्या गुलामांना जरी समाजात वावरावयास मुभा असली, तरी देवळी गुलामांना फारच हीन व तिरस्करणीय समजण्यात येत असे. याप्रमाणे गुलामगिरीतून ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्गाचा उगम झाला असावा. एकंदरीत ब्रह्मदेशातील हल्लीची धार्मिक संस्कृती व काही अंशी घरगुती व सामाजिक संस्कृतीही हिंदी संस्कृतीतून आली आहे, असे दिसते. निदान काही वर्गांची ग्रामबहिष्कृतता तरी हिंदुस्थानातूनच गेली असावी, असे म्हणण्यात हिंदी बौध्द संस्कृतीचाच पुरावा नसून इतरही असा पुरावा आहे की, हल्लीही जे हीन स्थितीतले बहिष्कृतवर्ग तेथे आढळतात, त्यांची संडाला, डूनसंडाला, तुबायाझा अशी जी नावे आहेत, ती हिंदी भाषेतून तिकडे गेली आहेत. ती नावे चंडाल, डोमचंडाल, अशुभराजा ह्या हिंदी नावाचेच अपभ्रंभ होय, ह्यात संशय नाही. संस्कृत अथवा पाली भाषांतील शब्दांचे उच्चार ब्रह्मी लोकांना नीट न करता आल्यामुळे या भाषंतीलच च श र ह्या अक्षरांच्या उच्चारांचा ब्रह्मी भाषेत अनुक्रमे स त य असा विपर्यास व्हावा, असा ब्रह्मी अपभ्रंभाचा नियम आहे; त्याबरहुकूम ब्रह्मी बहिष्कृतवर्गाची नावे हल्ली येथे प्रचारात आहेत. अशुभराजा ह्यातील पहिल्या 'अ' चा लोप झाला व इतर नियमांप्रमाणे तुबायाझा असे शेवटले नाव सिध्द झाले आहे.
ब्रह्मदेशात ब्रिटिश राज्य स्थापन होईपर्यंत खालील चार प्रकारचे बहिष्कृत हीन वर्ग आढळत असत.
१. युध्दात जिंकलेले कैदी आणि त्यांचे वंशज यांना देवळांतील सेवेला वाहिलेले गुलाम करण्यात आलेले असे. ह्यांना फयाचून हे नाव आहे. फया हा शब्द बुध्द ह्या शब्दाचा चिनी भाषेतून आलेला अपभ्रंश आहे. बुध्द-बुढ-भुर-फुर-फया अशी ही अपभ्रंश परंपरा आहे. फया हा शब्द ब्रह्मदेशात बुध्द, त्याची मूर्ती, देऊळ आणि कोणी मोठा सन्माननीय माणूस ह्या सर्वांबद्दल उपयोजिला जातो. चून म्हणजे नोकर असा अर्थ आहे.
२. स्मशानातील मर्तिकादी अशुभ संस्कारांशी संबंध असलेली, थडगी खणण्याची व ती सांभाळण्याची वगैरे हीन कामे करणारे ग्रामबाह्य वर्ग ह्यांना तुबायाझा (अशुभ राजा), संडाला, डूनसंडाला अशी नावे आहेत.
३. केवळ भिक्षेवर निर्वाह करणारे महारोगी व इतर असाध्य रोगांनी पछाडलेले, हातपाय किंवा दुसरा एखादा महत्त्वाचा अवयव तुटून अपंग बनलेले यांना केबा असे नाव आहे. केबा हे नाव आता तुबायाझंनाही लावण्यात येते. कारण तेही भीकच मागतात. के = मदत, बा = हो (संबोधन). 'मला मदत करा', असे म्हणत भीक मागणारे असा ह्या नावाचा मूळ अर्थ आहे.
४. माफीचे भयंकर गुन्हेगार : अशा गुन्हेगारांना पूर्वी स्वराज्यात राजाच्या कृपेने किंवा इतर कारणांनी माफी मिळून त्यांना पोलीसचे, जेलरचे, फाशी देण्याचे वगैरे तिरस्कृत काम आणि अधिकार मिळत असत. त्यांना पॅगवे म्हणजे पोलीस, लेयाटों = चोपदार, छडीदार अशी नावे असत. अशा अधिकाऱ्यांचा जनतेमध्ये मोठा दरारा असला तरी त्यांच्याविषयी सर्वत्र तिरस्कार असून ते समाजबाह्य मानले जात.
५. ह्याशिवाय तु-ङै-डो म्हणजे राजे लोकांचे हलालखोर म्हणून एक वर्ग पूर्वी असे. व ह्यांचा एक लहान गाव मंडालेपासून १०-१२ मैलांवर आहे असे माझे ऐकण्यात आले. पण मला प्रत्यक्ष जाऊन पाहण्यास वेळ मिळाला नाही. ह्यांचा समावेश वरील दुसऱ्या वर्गात मी केला असता, पण हल्ली हे फारसे ग्रामबाह्य नाहीत, असेही मी ऐकले.
वरील पाचही बहिष्कृतवर्गांतील लोकांची हल्लीची संख्या हिंदुस्थानातील बहिष्कृतांच्या मानाने फारच थोडी म्हणजे फार तर साऱ्या ब्रह्मदेशांत ५६ हजार असेल. यांची स्थितीही हिंदुस्थानातल्याइतकी करुणास्पद नाही. हे आपले ठिकाण सोडून, धंदा सोडून व मूळ लपवून सर्वसाधारण समाजात छपून गेल्यास हल्लीच्या राज्यात कोणी पर्वा करीत नाहीत. हे जरी आपल्या मूळ गावीच बहिष्कृत स्थितीत राहिले तरी, व पूर्वीदेखील, हिंदुस्थानातल्या इतक्या कडक रीतीने यांना अस्पृश्य मानण्यात येत नसे. तरी पण त्यांना गावात येण्याला व इतर धंदे करण्याला व लोकांत मिसळण्याला परवानगी नसे. म्हणून अजूनी हे मागासलेल्या विपन्नावस्थेत खितपत पडलेले मी प्रत्यक्ष गावोगावी मुद्दाम जाऊन पाहिले. ब्रह्मदेशात कडक अस्पृश्यता नव्हती- निदान हल्ली नाही - हे खरी असले, तरी तेथील बहिष्कृतांचा व अंतःकृतांचा भेटीव्यवहार पूर्वी होत नसे व आताही होत नाही; मग रोजीव्यवहार व बेटीव्यवहाराची गोष्ट नको. हल्लीदेखील कोणी उघडपणे आपले मूळ वरील चार-पाच प्रकारांपैकी एकात आहे, असे सांगेल, तर त्याच्याशी ब्रह्मदेशातील पुराणमतवादी बहुसंख्या नुसता भेटीव्यवहार करण्यासही तयार नाही. म्हणजे गृह्य आणि सामाजिक प्रसंगी समानतेने बहिष्कृतास आमंत्रण करण्यास अंतःकृत वर्ग अद्यापि तयार नाही. ब्रह्मदेशातील पुराणमतवाद हिंदुस्थानातल्यापेक्षा कमी दृढमूल आहे व तो जो झपाटयाने मावळत आहे, तरी पण तो मुळीच नव्हता किंवा नाही असे नाही. म्हणून तेथील बहिष्कृतवर्ग हा एक संशोधनीय विषय आहे.
वरील पाचही प्रकारचा बहिष्कृतांचा इतिहास माझ्या अल्पशा संशोधनात जो आढळला, तो संक्षेपाने पुढे देत आहे. ब्रह्मदेशाचा इतिहास अद्याप तयार व्हावयाचा आहे. उपलब्ध साधनासामग्रीचा भारतीय सामाजिक इतिहासाशी निकट संबंध भासत आहे आणि तो रंजक व तसाच बोधकही आहे.
फयाचून : ह्या नावाचा अर्थ 'देवळी गुलाम' असा आहे. ब्रह्मदेशातील देवस्थाने अत्यंत पवित्र मानली जातात; इतकी की, युरोपियांनादेखील पादत्राण घालून देवळातच नव्हे तर भोवतालच्या विस्तीर्ण आवारातही पाय टाकण्याची छाती होत नाही. अशा बाबतीत युरोपियनांचेही खून पडले, म्हणून पादत्राण घालून मंदिरातच नव्हे तर प्राकारातही प्रवेश करण्यासंबंधी सरकारी ठराव आणि वटहुकूम मोठमोठया पाटयांवर आवारापासून काही अंतरावर जाहीर केलेले आढळतात. देवळे पवित्र तरी देवळी गुलाम अपवित्र, हे मोठे कोडेच मला पडले ! शोध करिता देवळी गुलामच नव्हे तर देवळात वाहिलेल्या इतर पदार्थ, फळे, फुले, सुगंधी पदार्थ व नैवेद्य इत्यादी सर्वच वसतू मनुष्यांना अग्राह्य आहेत. ह्या न्यायाने फयाचून म्हणून जो देवळी गुलामवर्ग आहे तो पूर्वी अग्राह्य असला पाहिजे. तो कालांतराने त्याज्य व नंतर अपवित्र मानला असणे अगदी संभवनीय आहे. ह्या गुलामवर्गात पूर्वी बहुतेक धरून आणलेले राजकैदी असत. ह्याचे एक उदाहरण अत्यंत हृदयद्रावक पण अगदी इतिहासप्रसिध्द आहे, ते असे :
दक्षिण ब्रह्मदेशात मोलमेन शहराचे उत्तरेस २०-२२ मैलांवर किनाऱ्यालगत थटून म्हणून एक इतिहासप्रसिध्द प्राचीन राजधानीचा गाव आहे. तेथे इ.स.च्या ११ व्या शतकाच्या मध्यसमयी मनुहा नावाचा तेलंग राजा राज्य करीत होता. ह्या प्रांतात द्रविड देशातून कांची येथून गेलेला 'हीनयान' बौध्द धर्म जोरात होता. उत्तरेकडे ऐरावती नदीचे काठी पगान येथे अनिरुध्द नावाच्या ब्रह्मी जातीच्या राजाने जेव्हा पहिली ब्रह्मी बादशाही स्थापिली, तेव्हा दक्षिणेत थटून येथे मनुहा राज्य करीत होता. अनिरुध्दाला उत्तरेकडील भ्रष्ट बौध्द धर्माची सुधारणा करावयाची होती. थटूनकडून नामांकित बौध्द भिक्षू पगान येथे जाऊन अनिरुध्दाच्या राष्ट्रीय कार्यात मार्गदर्शक झाला. त्याने थटून येथे बौध्द त्रिपिटक ग्रंथाच्या प्रती आहेत, त्या मिळविण्याचा अनिरुध्दास मंत्र दिला. सामोपचाराने मागूनही मनुहा त्रिपिटक ग्रंथ देत नाही; म्हणून त्यावर रागावून अनिरुध्दाने मनुहाच्या राज्यावर मोठी चाल करून त्रिपिटकच नव्हे, तर त्याचे अक्षरशः सर्वस्व हरण केले. म्हणजे त्याच्या राज्यातील सर्व मौल्यवान चिजा ऐनजिनशी आपल्या राज्यात नेल्या, इतकेच नव्हे, तर प्रजाही गुलाम म्हणून आपल्या राज्यात नेली. तेव्हापर्यंत दक्षिण ब्रह्मदेशातील संस्कृती दक्षिण हिंदुस्थानातील आंध्र आणि द्रविड देशांतून दक्षिण ब्रह्मदेशात हीनयान बौध्द संस्कृतीचे मार्गाने गेली होती. ती ह्या युध्दापुढे उत्तर ब्रह्मदेशात पसरू लागली. थटूनचे बौध्द ग्रंथ, बौध्दभिक्षू, आचार्य आणि कारागीर नेले इतकेच नव्हे, सर्व राजघराणे आणि दरबारही गिरफरदार करून पगान येथे नेण्यात आले. शेवटी त्या थटून राजघराण्यासह सर्व नामांकित प्रजेला पगान येथे बांधलेल्या नवीन असंख्य पगोडांमध्ये बहिष्कृत देवळी गुलाम म्हणून कायमचे वंशपरंपरा नेमण्यात आले. मी थटून आणि पगान ही जुन्या संस्कृतीची दोन्ही ठिकाणे शिल्पशास्त्र, समाजशास्त्र आणि धर्मशास्त्र अशा तिनही दृष्टीने निरखून पाहिली. दक्षिण ब्रह्मदेशात ब्रिटिशांचा अंमल जसा इ.स. १८२५ चे सुमारास बसला, तसाच तो उत्तर ब्रह्मदेशात १८८५ साली बसून सर्व ब्रह्मदेश नव्या मनूत आला. ह्या साठ वर्षांच्या अंतरामुळे मला दक्षिण देशात बहिष्कृतवर्ग कोठेच आढळला नाही. तो पाहण्यास मला उत्तरेकडे मनुहा पगानला जावे लागते. पगान येथील बहिष्कृत वाडयात मनुहा राजाचे घराणे, वाडा व त्याचा हृदयस्पर्शी लवाजमा अद्यापि आहे. शेवटचा पुरुष उ बा ल्विन हा २६ वर्षे वयाचा पाणीदार तरुण व त्याची खानदानी वृध्द आई यांना मी डोळयांनी पाहिली. त्यांची गाऱ्हाणी ऐकली. न्यऊ या बंदराजवळ श्रेझीगो नावाच्या मोठया राष्ट्रीय पगोडाजवळ फयाचूनांचे एक वेगळे खेडे आहे. त्याचा थजी ऊर्फ पाटील म्हणून ब्रिटिश सरकारने उ बा ल्विनची नेमणूक केली आहे. कारण तो मोठया राजवंशातील पिढीजाद फयाचून आहे.
फयाचून हे लोक लहानमोठया देवळांत हल्ली फुले, माळा, उदकाडया मेणबत्त्या विकण्यासाठी दुकाने मांडून बसलेले आढळतात. हा धंदा किफायतीचा असल्याने अलीकडे फयाचून नसलेल्या इतर अंतःकृत लोकांचीही अशी दुकाने आहेत. उलट फयाचूनही आपले मूळ लपवून व हा धंदा सोडून अंतःकृत वर्गात सर्रास मिसळत आहेत. ह्यामुळे खरा फयाचून कोण, हे ओळखून काढणे मोठे मुष्किलीचे काम आहे. विशेष तपशील निरीक्षण नं. ४ यात पुढे दिला आहे.
तुबायाझा : या नावातील मूळ शब्द वर सांगितल्याप्रमाणे 'अशुभ राजा'. ह्यासंबंधी मी एक दंतकथा ठिकठिकाणी ऐकली ती अशी : एकदा एका ब्रह्मी राजाची एक गर्भवती राणी अत्यवस्थ आजारी पडली. ती मेलीच, असे समजून तिला स्मशानात पाठविले. थडग्यात उतरविताना ती जिवंत आहे, असे आढळले. स्मशानात नेलेली राणी राजाने पुन्हा स्वीकारणे शक्यच नव्हते. तिला थडगे खणणाऱ्या संडाला जातीतच ठेवून दिले व तिचे पोटी पुढे जो राजपुत्र झाला त्याला 'अशुभ राजा' हे नाव पडले. त्याला संडालांचे मुख्य पद मिळून, स्मशानातील धार्मिक संस्कारात बौध्द फौंजीला (भिक्षूला) जी दक्षिणा मिळेल तितकीच ह्या राजवंशालाही मिळावी, असे राजशासन मिळाले. ही दंतकथा मला पगाम येथील तुबायाझाच्या खेडयातील पाटलाने व सगाईन येथील एका सभ्य गृहस्थानेही स्वतंत्रपणे सांगितली. कथा खरी असो नसो, ब्रह्मी चंडाल ऊर्फ संडाला लोक राजवंशाशी आपला संबंध कसा पोहोचवितात, हे ह्यावरून दिसते. मलबारातील पुलया, चिरुमा ह्यांचाही अन्य रीतीने राजवंशाशी कसा संबंध येतो, हे मी हिंदुस्थानात पाहिलेले मला स्मरले. तुबायाझा हे बहिष्कृत असले तरी कधी जित नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे. संडाला, डूनसंडाला लोक मणीपूरच्या बाजूने हिंदू संस्कृतीच्या राजाने प्राचीन काळी ब्रह्मदेशात नेले असावेत. याशिवाय माझा दुसरा तर्क धावत नाही. अलीकडे दक्षिण हिंदुस्थानातील लक्षावधी परैया, पुलया इत्यादी अस्पृश्य जातींचे लोक पोट भरण्यासाठी, ब्रह्मदेशात अगदी हीन धंदा करून राहिले आहेत. ते मुळीच बहिष्कृत नाहीत. पण हे प्राचीन काळी गेलेले संडाला मात्र अद्यापि तुरळक तुरळक आपल्या जुन्या वतनाच्या गावी थडगे खणण्याचे आपले जुने वतनच चालवीत असलेले आढळतात; त्या अर्थी हे प्राचीन हिंदी संस्कृतीचे वतन प्राचीन हिंदी राजांनीच स्थापिले असेल असे माझे मत आहे. विशेष तपशिलासाठी पुढे निरीक्षण नंबर १ व ३ पाहा.