माझें बि-हाड
प्रकरण २६ वें
डॉ. ग्रेडन
इंग्लंडांत परक्यांना राहण्यासाठीं उत्तम व्यवस्था असते. श्रीमंतासाठीं व सामान्यासाठीं निरनिराळ्या दर्जाचीं हॉटेलें शहरांत, गांवांत आणि प्रेक्षणीय स्थळें रानांवनांतून सुद्धां मुबलक आहेत. शिवाय खासगी रीतीनें राहण्यासाठीं मध्यमप्रतीचे लोक पाहुण्यांकडून पैसे घेऊन (Paying Guest) आपल्या घरीं वाटेल तितके दिवस सोय करतात. डॉ. आणि मिसेस ग्रेडन या दंपतीकडे मीं बहुतेक पहिली टर्म घालवली. कॉलेज वसतिगृहांत, मी उशिरां गेल्यानें जागा मिळाली नाहीं. पण पुढील अनुभवावरून, स्वातंत्र्य आणि काटकसर या दृष्टीनें बाहेर राहणेंच बरें वाटूं लागलें. ग्रेडनसारख्या संभावित कुटुंबामध्यें मला इंग्रजी चालीरीति आणि सभ्यता यांची बरीच माहिती मिळून फार लाभ झाला. सामान्य हिंदु विद्यार्थ्याला टेबलावर बसून कांटे-चमचे वापरणें, टॉय कॉलर नीट बांधणें वगैरे क्षुल्लक गोष्टीपासून तों संभावित मंडळीमध्यें बोलण्या चालण्याची ढब राखणें व दुस-याचा पाहुणचार करणें, वगैरेपर्यंतची फार खबरदारी घ्यावी लागते. शिकल्याशिवाय ही खबरदारी शक्य नाहीं. काटकसरीसाठी मला हें घर सोडून स्वतंत्र रीतीनें भाड्याची जागा घेणें पुढें काटकसरीच्या दृष्टीनें बरें वाटलें. गरीब स्थितीचें कुटुंब एक सबंध घर घेऊन आपण तळघरांत राहून इतर मजले सभ्य गृहस्थांस भाड्यानें देऊन आपली गुजराण करतात. कुटुंबांतील मालकीण (हिला Land Lady असें म्हणतात) बहुतेक अशा प्रकारचा धंदा करते. पाहुण्यांचें जेवणखाण, स्नानाची, कपडे धुण्याची व कांहीं घरगुती व्यवस्थेची जबाबदारी या बाईकडे असते.
भाड्याची जागा
ऑक्सफर्ड वूल्स्टर प्लेस नांवाच्या मध्यम वस्तीच्या भागांत नं. २३ च्या घरांतील पहिल्या मजल्यांतील दोन खोल्या मीं घेतल्या होत्या. ऑक्सफर्डचा विद्यार्थी, विशेषतः ब्राह्मसमाजाचा प्रतिनिधी म्हणून काटकसर संभाळून व्यवस्थेनें व सभ्यतेनें वागणें मला जरुर होतें. निजावयाची खोली व उठण्याबसण्याची खोली निराळी ठेवावी लागते. युनिव्हर्सिटीतील बाहेर राहणा-या विद्यार्थ्यांवर युनिव्हर्सिटीच्या शिस्तीचा डोळा असतो. म्हणून अशा घरांना युनिव्हर्सिटीकडून परवाना घ्यावा लागतो. माझ्या लॅंड लेडीचें नांव मिस पिअर्सन होतें. मिस्टर पिअर्सन ऑक्सफर्डच्या एका मोठ्या हॉटेलांत वाढप्याचें काम करीत होते. ह्यांना दोन मुलें व चार मुली होत्या. माझ्या वरच्या मजल्यांत दुसरा एक पाहुणा होता. आम्ही दोघे ६ महिन्यांचे वर तेथें राहिलों तरी एकमेकांशीं कधींच बोललों नाहीं. कारणाशिवाय एकमेकांशीं सलगी लावणें हें असभ्य समजलें जातें.
पिअर्सन
पिअर्सन हें कुटुंब अत्यंत साधें, गरीब व फार प्रामाणिक होतें. जातिभेद नाहीं तरी इंग्लंडांत वर्गभेदाचें प्रस्थ फार आहे. ऑक्सफर्डचा विद्यार्थी आणि त्यांतल्यात्यांत धर्मशिक्षणाचा विद्यार्थी, याचा दर्जा इंग्लंडांत फार मोठा समजला जातो. अमीर उमरावांच्या खालोखाल धर्माधिका-यांचा दर्जा फार मोठा मानला जातो. प्रसंगविशेषीं मोठमोठ्या लॉर्ड लोकांवरही अशा लोकांचें दडपण पडतें. ह्या कुटुंबांतील सर्व लहानथोर माणसांनीं मला नेहमीं फारच आदबीनें वागवलें. म्हणून मला शेवटपर्यंत बि-हाड बदलण्याचें कारण उरलें नाहीं. सर्वांत वडील मुलगी ॲलिस हिच्याकडे पाहुण्यांची सर्व व्यवस्था पाहण्याचें काम होतें. बोलावल्याशिवाय कोणीही खोलीच्या आंत पाय टाकत नसत. इंग्लंडांत खोल्यांचीं सर्व दारें, उन्हाळ्यांतही नेहमींच लावलेलीं असतात. कोणी कोणाकडे परवानगीशिवाय आंत येत नाहीं. पुढें दाट परिचय झाल्यावर मी होऊनच तळघरांतील स्वयंपाकघरांत मिसेस पिअर्सनकडे खेळीमेळीनें जाई. तेव्हां सर्व कुटुंबाला आपला मोठा सन्मान झाल्यासारखें वाटे. ॲलिसचें वय सुमारे बावीस वर्षांचें होतें. तिच्या पाठीवर विली व फ्रॅंक असे भाऊ होते. त्यांच्या पाठीवर नेली, मे आणि मॅगी अशा तीन मुली होत्या. मॅगी तीन वर्षांची होती.
व्यक्तित्व
मी या सर्व मुलांना घेऊन आदितवारीं फिरण्यास जात असें. ॲलिसचा एक मोठा भाऊ वारला होता. त्याचें थडगें मी पाहण्यास जावें अशी ॲलीसनें एकदा मला सूचना केली होती. ख्रिस्ती समाजाची स्मशानभूमि देखील फार सुंदर व रमणीय असते. नाहींतर आमच्या पुण्याचें ओंकारेश्वर! एके रविवारीं मी तें थडगें सर्व लहानग्यांसह पाहण्यास गेलों. थडग्यावरील गुलाबाच्या झाडाला सुंदर फूल आलें होतें. तें पाहून मी लहानग्या मॅगीला म्हटलें, ‘बाळ, तें फूल घे बघूं!’ ती म्हणाली, “No Sir, तें झाड माझ्या आईचें आहे. तिच्या परवानगीशिवाय मला हात लावतां येत नाहीं.” हें ऐकून मी मनांत चरकलो. मॅगी केव्हां केव्हां बोलावल्यावर माझ्या खोलींत येई. तिला, ‘हें टेबल कुणाचें, ही खुर्ची कुणाची’ असे प्रश्न विचारल्यास “माझ्या आईची” असें गंभीर उत्तर येई. ‘आमची’ असे उद्गार तिचे तोंडून कधींच येत नसत. गरीब स्थितींतील लहानग्या मुलीचे व्यक्तीत्वाचे हे उद्गार ऐकून इंग्रजांविषयीं मला धन्यता वाटली.