माझ्या एकांत सहली
भाग चौथा : ‘धर्म भावनेचा विकास’
प्रकरण १६ वें
एकांतांतील सहली
जमखंडी हा गांव तिन्ही बाजूंनीं वेष्टिलेल्या डोंगराच्या बगलेंत आहे. विशेषतः दक्षिणेस मुधोळ संस्थानच्या वाटेवर तर एक सुंदर लांब दरी आहे. तिच्यांत कट्टेगिरी नांवाचा दुसरा एक विस्तीर्ण तलाव आहे. पावसाळ्यांत हा भरून वाहूं लागला म्हणजे त्या सर्व प्रदेशास सुंदर वन्य शोभा येत असे. मी जरी नेहमीं माझ्या सवंगड्याच्या घे-यांत अडकलेला दिसें तरी पुष्कळ वेळां त्यांना टाकून एकटाच एकाद्या दरींतून, डोंगराच्या माथ्यावरून, पूर्व व उत्तरेच्या बाजूनें पिकलेल्या शेतांतून किंवा जमखंडींतील मोतीबागेंतून हिंडणें मला फार आवडत असे. जमखंडीचे उत्तरेस ४–४॥ मैलांवर भव्य कृष्णेचें पात्र आहे. तें किंचित् माझ्या नित्याच्या आटोक्याच्या बाहेरचें असे. पण तेथेंही केव्हां केव्हां मी माझी गोपाळ मंडळी घेऊन जात असे. माझ्या हृदयाचा परिपोष माझ्या एकांतांतील सहलीमुळेंच विशेष झाला. निर्जन डोंगरांतून व दरींतून हिंडत असतां मी वाचलेल्या कादंबरींतला नायक मीच बनत असें. मात्र मला नायिका नसल्यामुळें माझा विप्रलंभ श्रृंगार लंगडालुळा पडत असे. जमखंडींत वसंतऋतूंत कांहीं आंबरायांना अमोघ मोहोर येऊन झाडावरच्या कोकिळा मदोन्मत्त होत! उन्हाळा तेथें कडक भासे. सायंकाळच्या क्लांत समयीं मीं मोतीबागेंतल्या कारंज्याजवळच्या बकुळीच्या झाडाखालीं बकुळीच्या मधुर सुगंधाच्या फुलांच्या माळा विणीत बसलों असतां,
“ कारंजाचे तुषार वाटती अग्नी कणाचे परी,
पुष्पांचा तो सुगंध माझ्या शूळ निपजवी शिरीं,
कोकिळ कुंजित ऐकुनि वाटे वीज कडाडे वरी”
पहिला ठसा
वगैरे संगीत सौभद्र नाटकांतून ऐकलेल्या पीडा मलाच होऊं लागत! पण सुभद्रेचा मागमूस कोठेंच नसे! सुभद्रा खोटी असली तरी सृष्टिदेवीचे हावभाव नजरेपुढें खरेच असत. मोठा झाल्यावर कालिदास, बाणभट्ट आणि त्याहीपुढें वर्डस्वर्थ आणि स्कॉटस् ह्या कवींनीं व कादंबरीकारांनीं जें दिव्यामृत पाजिलें, त्याचेंच बाळकडू मला ह्या ओबडधोबड कादंब-यांनीं व नाटकांनीं पोरवयांतच पाजिलें होतें. मग त्यांचा मी आभारी कां असूं नयेॽ पण सर्वांच्याही पूर्वीं मला हृदयदान दिलें तें माझ्या पवित्र आईनेंच! तिच्याच पुण्यप्रभावानें मला सर्व जडरसांतून तारण मिळून माझ्या हृदयाचा परिपाक प्रथम धर्माच्या भक्तिरसांत व नंतर तत्वज्ञानाच्या शांतरसांत झाला. माझ्या वेळेच्या मराठी पांचव्या क्रमिक पुस्तकांत ‘सहल करून येणें’ हा एक धडा होता. तो मला फार आवडत असे. त्या आवडीचा साक्षात्कार माझ्या स्वतःच्या सहलींत मला घडत. पण ह्या सर्वांची पूर्व तयारी माझ्या आईच्या रानावनाच्या गोड गोष्टींत आणि बाबांच्या प्रेमळ सहवासांतच झाली. पुढें कादंब-यांनीं आणि पौराणिक पोथ्यांनीं जी काय भर टाकली असेल ती केवळ शब्दसंपत्तीची आणि जड रसांचीच होय. दैवी कोमल भावनांचा पहिला ठसा माझ्या आईचाच!
वनभोजन
वर्षांतून निदान एकदां तरी - विशेषतः पावसाळ्याच्या अखेरीस बाबा आम्हां सर्वांना घेऊन कोठेंतरी वनभोजनाला जात असत. जमखंडी गांवाला (आमचे वाड्याला) लागून पश्चिमेला एक डोंगर आहे. हा जवळ जवळ ७००।८०० फूट तरी उंच असावा. ह्याच्या अत्यंत उंच शिखरावर एक लहानसें शिवालय आहे. त्याचें कानडींत नांव मेलगिरी लिंगाप्पा ( उंच गिरीवरचा लिंग) असे. येथून जमखंडी गांवचाच नव्हे तर आसमंतांतील निदान २०।२५ मैलांचा देखावा पावसाळ्यांत सुंदर दिसतो. देऊळ उंच चबुत-यावर बांधलेलें आहे. त्याचे मागें एका खडकांतील गुहेंतून निर्मळ पाण्याचा झरा पावसाळ्यांत वाहतो. येरवी रुक्ष असलेला हा उंच डोंगर पावसाळ्यांत हिरवागार दिसतो. हें उंच आणि एकांत ठिकाण बाबांना पसंत असे. आमच्या घरच्या सर्व मंडळींनाच नव्हे तर एका दोघा आपल्या जिवलग मित्रांनाही बरोबर घेतल्याशिवाय त्यांना वनभोजन यथासांग झालेसें वाटत नसे. अर्थात ह्या कल्पनेंत आईची त्यांना पूर्ण सहानुभूति व साह्य असे. बहुतेक सगळा दिवस आमचा मोठ्या आनंदाचा जाई. ही रसिकता बाबांमध्यें कोठून आली ह्याचें मला आतां आश्चर्य वाटतें. ह्यामुळें मजमध्यें सृष्टीशोभेची रुचि व अवलोकनशक्तीचीं बीजें रुतलीं. आणि माझ्या ग्रहणशील मनावर चांगला परिणाम झाला.