आजोळ

येथवर माझ्या बाबांच्या व त्यांच्या आईबापांच्या आठवणी झाल्या.  आतां माझ्या आईच्या आईबापांच्या आठवणींकडे वळूं.

कृष्णराव काळे :  जमखंडीच्या पूर्वेस ६ मैलांवर आलगूर म्हणून कृष्णाकांठीं एक खेडेगांव आहे.  हें माझ्या आईचें माहेर.  माझ्या आईचें नांव यमुनाबाई, तिच्या आईचें नांव गंगाबाई व बापाचें नांव कृष्णराव काळे असें होतें.  गुडघीच्या रोगानें त्यांचा एक पाय गुडघ्यांत अगदीं वांकडा झाला.  त्यामुळें ते तरुणपणींच कायमचे लंगडे झाले होते.  म्हणून त्यांना गांवांत कुंट कृष्णप्पा म्हणजे लंगडा कृष्णराव असें म्हणत असत.  जमखंडी संस्थानांत खेड्यांतील सर्व लोक कानडीच बोलतात.  मराठी कोणालाच येत नाहीं.  माझ्या आजाआजीला मराठी बोलतां येत होतें.  आजापेक्षां आजीला जास्त चांगलें येत असे.

पतिव्रता गंगाबाई :  बसवंतराव मराठी तर संताबाई जशी कानडी, तशी गंगाबाई मराठी तर कृष्णराव कानडी असें हें जोडपें होतें.  गंगाबाई गोरी होती.  कृष्णराव अगदीं काळे होते.  इकडे बसवंतराव गोरे, तर संताबाई काळी होती.  बाबांचें घराणें सुखवस्तु, वजनदार होतें आणि आईचें गरीब होतें.  तरी कृष्णरावांचा आलगुरांत चांगला दरारा होता, तो त्यांच्या प्रामाणिकपणामुळें होता.  गुडघीच्या रोगानें ते वर्षभर अंथरुणावर खिळलेले होते.  गंगाबाईनें त्यांची अतिशय प्रेमानें व श्रध्देनें रात्रेंदिवस शुश्रूषा केली.  त्या वेळीं माझी आई ५।६ वर्षांची व तिचा भाऊ सोमा नांवाचा १।२ वर्षांचा होता.  आलगूरचे कुळकर्णी गोविंदाप्पा नांवाचे वैष्णव ब्राह्मण मोठे देवमाणूस होते.  त्यांची पत्‍नी सरस्वतीबाई, वडील बंधु बाबासाहेब व एकंदरींत सर्व घराणें अगदीं बाळबोध, प्रेमळ व प्रामाणिक असे.  कुष्णरावांना या घराण्याचा मोठाच आश्रय होता.  कृष्णरावाचें या घराण्यांत त्यांच्या प्रामाणिकपणामुळें मोठें वजनही होतें.  एक वर्षाच्या आजारांत आमची आजी नेहमीं अंथरुणाला धरून बसलेली राहिल्यामुळें चूल आणि मुलाचा सर्व जोजार (भार) माझ्या आईवरच पडला.  तेवढ्या लहान वयांतही तिनें तो बिनबोभाट चालविला.  या लहानपणाच्या हालानें आमच्या आईला पुढें सहिष्णुतेचें व दक्षतेचें चांगलेंच वळण लागलें.  माझ्या आईचा सारा जन्मच सहन करण्यांत गेला.  तें सामर्थ्य तिनें लहानपणींच माहेरीं मिळविलें होतें.  माझी आजी व तिची नमुनेदार मुलगी माझी आई हीं दोन माणसें सार्‍या आलगूर गांवाला पातिव्रत्याचा व हिंदु स्त्रियेच्या चांगुलपणाचा एक अनुपम नमुनाच वाटत होता.  अद्याप त्यांचें नांव काढलें, तर त्यांची माहिती असणारांपैकी न गहिंवरणारें माणूस त्या गांवांत सांपडणार नाहीं.

आमचा तोरा :  जमखंडीस बाबांच्या घराण्याचा लौकिक व आलगुरांत आईच्या घराण्याविषयीं असा अकृत्रिम आदर यांची जोड साधल्यामुळें आम्ही लहानपणीं जेव्हां आजोळीं जात असूं तेव्हां सारा गांव आमचें नेहमीं कौतुक करीत असे.  वाटेंत कुंभारहाळ हें गांव लागे.  तेथूनच आमच्या स्वागताला सुरुवात होई.  यामुळें आम्हांलाही मोठी आढ्यता वाटत असे.  लागुरास जाण्यास आम्ही एका पायावर तयार असूं.  माझ्या बाबांच्या आईचा स्वभाव कडक व सहानुभूतिशून्य असल्यामुळें माझ्या आईला पुढें सासुरवास सोसावा लागला.  आपण भोगलेल्या त्रासाचे मासले ती आम्हांस बालपणीं सांगूं लागली, म्हणजे आमच्या कोमल अंतःकरणाला घरेच पडत.  माझ्यामध्यें पुढें पुढें जें स्त्रीदाक्षिण्य आणि हिंदुविवाहपद्धतीसंबंधीं कायमची तेढ उत्पन्न झाली, तिचें पहिलें बीज ह्या आईच्या खडतर सासुरवासांतच आहे.  आईच्या माहेरचीं माणसें-आजा असो, आजी असो, आईचा भाऊ रामजी असो किंवा माझी मावशी तान्हुबाई असो- जमखंडींत आमच्या वाड्यांत आलीं म्हणजे मुठीत जीव धरून येत.  उलट आम्ही कोणी आलगुरांत गेलों कीं, जसे बडे बापके बेटेच असें वागत असूं.  नुसत्या आजाच्या घरांतच नव्हे, तर सार्‍या खेड्यांतूनच आम्ही आमचा तोरा चालवीत असूं.  आम्ही शहरांत राहणारे, शाळेंत शिकणारे, मराठी बोलणारे, खाणें-पिणें-पोषाख यांची मिजास चालविणारे आणि सरकारदरबारांत वजन असलेल्या सुप्रसिद्ध व कडक बापाचीं मुलें.  मग काय ?  आम्हांला या खेड्यांत स्वर्ग दोनच बोटें उरत असे.  आम्हांला आलगूर फार आवडे.  याचें कारण तो नदीकांठचा गांव तेथील स्वच्छ हवा, गोड पाणी, साधी राहाणी व तेथें चालणारे आमचे चोचले !

आजोबांचा पाय लंगडा असल्यामुळें ते आम्हांस बोलावण्यासाठीं आलगुराहून आपल्या वांझ म्हशीवर बसून येत.  पोषाख खादीचा मांडचोळणा, खादीची बंडी, एक काळें दणकट कांबळें आणि डोईला तपकिरी रंगाचा एक भलामोठा रुमाल.  काटक चेहरा, मिशा पांढर्‍या झुबकेदार आणि आवाज खणखणीत.  एकंदरीनें स्वारी जरी ठेंगणी होती, तरी एखाद्या गनिमी काव्याच्या नायकाप्रमाणें पाहिल्याबरोबर नजरेनेंच पाहणार्‍याला नरम करणारी त्यांची मुद्रा होती.

आलगूरच्या आजोबांचें घर चंद्रमौळी, भांडीं मातीचीं.  अंथरूणपांघरूण जमखंडीहून नेलेलें तेवढेंच.  शिवाय लागेल तें शेजार्‍यांकडून आणलेलें.  कण्यांत घालावयास मीठदेखील शेजारणीकडे मागावयाला एखाद्या आम्हांला पाहावयाला आलेल्या गचाळ मुलीला आजी मोठ्या मायाळुपणानें सांगे.  आणि तिला कोणतीही वस्तु कोण नको म्हणेल ?  त्या वेळीं खेड्यांतून हल्लींचा रशियांतील कम्यूनिझमच होता.  म्हणजे कोणतीही वस्तु प्रत्येकानें कोणालाही हक्कानें मागावी.  यामुळें आम्हांला पाहुणचार फार आवडे.  गेल्याबरोबर आम्हांला पाहायला आळींतील लहानमोठीं पोरें व त्यांच्या पोरकट आयांचा घोळका आमच्याभोंवतीं जमे.  हाकलून दिलें तरी जातात कशाला ?  लक्कव्वा, सिद्दाव्वा, पद्मक्का वगैरे म्हातार्‍या ओरडून ओरडून कानठाळ्या बसवीत मजजवळ येत.  कोणी म्हणे माझ्याशीं लग्न कर, कोणी म्हणे पाट लाव, कोणी म्हणे तूं माझा नवराच - इतके दिवस सोडून कोठें गेला होतास - आतां पोटकी टाक वगैरे.  ही रानटी थट्टा ऐकून आम्ही चिडत असूं.  त्यामुळें त्यांचा हंशा जास्तच पिके.

आजीचें घर :  आजीचें घर धाब्याचें.  जमीन धुळीनें भरलेली.  न झाडावी तेंच बरें.  सोपा कोठें संपला व गोठा कोठें सुरू झाला हें तीन आठवडे राहिलों तरी समजलें नाहीं.  निजलों असतांना रात्रीं म्हशीचें पारडूं मुसकटींत शिरावयाचें किंवा आमच्या तंगड्या त्या वांझ म्हशीच्या शिंगांत गुंतावयाच्या !  आजीची चूल घर बांधल्यानंतर सारवली असेल तर गांवच्या मारुतीची शपथ !  खोलींत दोन मडकीं, एक काथवट व एक भला मोठा पाटा.  तो सुध्दां कधीं उभा करावयाचा नाहीं.  मग धुवायची गोष्ट कशाला !  मीठ असेल तर लसूण नाहीं व दोन्ही असलें तर मिरची नाहीं, हें रोजचें रडगाणें.  तरी तिची तांबडी भगभगीत मिरच्यांची चटणी, घट्ट ताक आणि ताज्या शाळूच्या भाकरी हें जेवण आम्हांला परमामृतासारखें गोड लागे.  वांग्यांची भाजी तर सुखाची परमावधि !  कृष्णातीरचीं बांगीं प्रसिद्धच आहेत.

देवघर म्हणून जी एक खोली होती ती एक काळोखाचे पेवच होतें.  भर दोन प्रहरींही तिथें जाण्याची छाती होत नसे.  भिंतीला व जमिनीला लोणा चढलेला.  देव्हार्‍यावर देव कोण होते, किती होते कीं मुळींच नव्हते, हें शोधायला धाडशी कोलंबसच आला पाहिजे.  खिडकी तर नव्हतीच.  एक साणें होतें.  तें जर उघडलें तर वरून जो दोन प्रहरीं प्रकाश पडे, त्यामुळें त्या गुहेला अधिकच भयानक स्वरूप येईल.  अशा देवघरांतील देव होण्यापेक्षां बाहेरील मोकळ्या हवेंतील गोठ्यांतील म्हशीचें पारडूं होणें बरें वाटे !

सावलींतील तुळस :  माझ्या बाबांची आई जशी धार्मिक होती तशी आईची आई धार्मिक दिसत नव्हती.  पण ती स्वतःच धर्माची मूर्ति होती.  निराळा धर्म तिला कोठून येईल ?  ती नांवाप्रमाणें आंतबाहेर शुभ्र यशाची गंगाच होती आणि तिच्या कुशींतून माझी आई यमुना निघालेली.  गंगाबाईचा देव म्हणजे तिचा लंगडा नवरा.  मराठ्यांतला पडदानशीनपणा तिच्यांत नव्हता.  तरी पण ती उंबरठा ओलांडून कधीं बाहेर जात नसे.  खेड्यांतील स्त्रिया शेतांत खपतात, पाणी आणतात व अष्टौप्रहर उघड्यावर असतात.  प्रत्यक्ष माझ्या बाबांची आई उघड्यांत वाढलेली रानदांडगी बाई होती.  पण गंगाबाई सावलींतील तुळस होती.  कधीं म्हणून शेजारणीकडे बालायला गेली, अशी गोष्ट कशाला !  हा जातिवंत मराठमोळा कांहीं औरच होता.  ज्या कुळकर्ण्याच्या घराचा आजाला आश्रय होता तें घराणें वैष्णव ब्राह्मणाचें असून मोठें धार्मिक होतें.  वैष्णव कर्मठ असावयाचेच.  विधि, संस्कार, उपवास, व्रतें, गाणीं, न्हाणीं, सौभाग्यलेणीं इत्यादींची तिथें लयलूट होती.  ह्या सर्वांचा जन्मजात संस्कार माझ्या आईच्या हाडाहाडांत व रोमरोमांत शिरला होता.  ती एखाद्या वैष्णव ब्राह्मणीप्रमाणें दिसत होती.  पण माझी आजी अगदीं साधी, तिच्यांत रूढ धर्माचा कसलाही वरपंग नव्हता. इतकेंच नव्हें तर तिच्यांत धर्मभोळेपणाही नव्हता.  मग कर्मठपणाचें तर नांवच नको.  हा प्राणीच कांही विरळा होता.  आळींतल्या स्त्रिया गंगाबाईचें नांव घेऊनच आपणांस पवित्र मानीत होत्या.  साध्या रोगावर माझी आजी कांहीं साधे उपचार करी.  कावीळ झाली असतां ती नेमक्या ठिकाणीं मणगटांत बिबा घाली व त्यामुळें अचूक गुण येई.  उसण भरली असतां ती उतारा करी.  वनस्पतीपेक्षां अशा वैद्यकीय श्रध्देचाच जोर असावयाचा, हें सांगावयास नको.  अशा अकृत्रिम पवित्र पातिव्रत्याला आकर्षून घेणारे आमचे आजोबाही तसेच पात्र आणि गरीब असूनही बाणेदार पति होते.  नदीचें पाणी आणायलाही कधी त्यांनीं आपल्या बायकोला बाहेर पाठविलें नाहीं.  गुडघी रोग होण्यापूर्वी ते सामर्थ्यवान् व हिंमतवान् होते.  ज्या कुलकर्ण्याच्या आश्रयाला ते होते त्याच्या घरावर एकदां दरोडा आला.  त्या वेळीं एकट्या आजोबांनीं आरोळ्या फोडून व धोंडे फेकून त्यांना पिटाळून लाविलें.

जमखंडीचे आजाआजी वारल्यावर लवकरच सुमारे इ.स.१८८२-८३ सालीं आजोबा कृष्णराव आलगूर मुक्कामीं आषाढ किंवा श्रावण मासीं उद्‍भवलेल्या पटकीचे उपद्रवानें वारले.  त्या वेळीं नदीला पूर आला होता.  मी नदीवर स्मशानयात्रेला गेलों होतों.  मला तो देखावा चांगला आठवतो.

माझी मावशी तान्हूबाई हिचा सनाळांत रामजी शिंदे यांच्याशीं विवाह झाला.  ती आतां म्हातारी झाली आहे.  शेतवाडी करून तें सर्व कुटुंब सुखी आहे.

माझे मामा :  आलगुरांत माझा मामा रामजी हा मात्र दिवाळखोर कर्जबाजारी निघाला.  अगदीं लहानपणीं लाडका, तरुणपणीं प्रथम चांगला नांवाजलेला पहिलवान होता, पण पुढें तमाशांत विदूषकाचें काम करणारा निघाला.  त्याची बायको लक्ष्मीबाई ही सनाळची.  हिला दोन मुली व एक मुलगा होता.  त्यांपैकीं एक मुलगा व मुलगी वारली आणि मामीही सुमारें १८९२ सालीं वारली.  एकुलती एक मुलगी मथुराबाई पोरकी झाली, म्हणून आमचे घरींच जमखंडीस वाढली.  ती पुढें पुणें ट्रेनिंग कॉलजची थर्ड इयरची परीक्षा चांगली पास झाली.  नंतर माझे धाकटे बंधु एकनाथराव यांच्याशीं तिचा विवाह झाला.  १९१६ सालीं तिला गंगूबाई ऊर्फ छबु नांवाची पहिली मुलगी झाली.  १९१८ च्या मोठ्या इन्फ्ल्युएंझाच्या सांथींत मथुराबाई मुंबईस बाळंतपणांत वारली.  छबूला पुढें मलाच सांभाळावें लागलें.

आमचा मामा रामाजीबावा हा दिवाळखोर निघाला, म्हणून आमच्या आजीचे फार हाल झाले.  १८९७ च्या दुष्काळांत स्वतः आमचेही हाल झाले.  शेवटीं १९०१ सालीं ती आमचे घरीं येऊन राहिली होती.  सप्टेंबर १९०१ मध्यें मी धर्मशिक्षणासाठीं विलायतेला गेलों.  म्हणून माझे आई, बाबा व इतर मंडळी पुण्यास व मुंबईस आली होती.  आजी मात्र जमखंडीस आमचे घरीं असतांनाच वारली.  ह्या गोष्टीचें मला आतां राहून राहून वाईट वाटतें.