उत्तरयुगीन अथवा अर्वाचीन अस्पृश्यता

प्रकरण पाचवे

येथपर्यंत मध्ययुगीन अस्पृश्यतेचे विवेचन झाले.  आता तिसरा टप्पा जो उत्तरयुगीन म्हणजे ज्या काळी बौध्द धर्माचा नायनाट जैन, शैव, वैष्णवादिकांनी अनुक्रमाने चालविला आणि त्यानंतर मुसलमानांची धाड येऊन तो (बौध्द धर्म) नाहीसा झाला, तो काळ होय.  ह्या काळातील अस्पृश्यतेचे एक मुख्य लक्षण म्हणजे तत्कालीन अस्पृश्यांच्या संख्येमध्ये निरनिराळया प्रांतांतून आंधळे राजकारण आणि जुलमी राज्यक्रांती ह्यामुळे भली मोठी ठोकळ भर पडली, हे होय.  तरी तिकउे आपण आता वळू.  इ.स. १८९४ साली मद्रास येथे थिऑसाफिकल सोसायटीने येथील पारियांची स्थिती सुधारण्यासाठी प्राथमिक शिक्षणाच्या शाळा सुरू केल्या.  ह्या प्रयत्नास प्रोत्साहन देण्यासाठी ह्या सोसायटीचे तत्कालीन उदारधी अध्यक्ष कर्नल ऑल्कॉट यांनी सन १९०१ साली The Poor Pariah ('बिचारा पारिया') ह्या नावाची एक इंग्रजी चोपडी प्रसिध्द केली.  तिच्या २४ व्या पानापासून शेवटपर्यंत एका नवीन कल्पनेचा निर्देश आणि पुरस्कार केला आहे.  ती कल्पना म्हणजे हल्लीचे पारिया हे एके काळी बौध्द होते, आणि पुढील धर्मक्रांतीच्या काळी ते हिंदुधर्मात सामील न झाल्यामुळे राजशासनावरून त्यांना अस्पृश्य ठरवण्यात आले, ही होय.  १८९८ च्या सुमारास कर्नल ऑल्कॉटकडे पारिया जातीचे काही पुढारी आले आणि म्हणू लागले की, अशोकाच्या वेळी आपण बौध्द होतो, म्हणून आमच्यासाठी ऑल्कॉट साहेबांनी बौध्दांचा एक नवीन संघ काढून त्यात आम्हांस घ्यावे.  ऑल्कॉट साहेबांनी त्यांना कोलंबो येथील H. Sumangala (एच. सुमंगल) ह्या मुख्य बौध्द भिक्षूकडे नेले.  त्यांनी एका मोठया जाहीर सभेत त्यांना बौध्द धर्माची दीक्षा दिली.  परंतु हे लोक पूर्वी बौध्द होते ह्याविषयीचा पुरावा ऑल्कॉट साहेबाला मिळाला नाही.  अश्वघोषाचा काही लेख आपणांजवळ होता, असे पारियांचे म्हणणे होते.  पण तो लेख त्यांना त्यांच्याकडून मिळाला नाही.  तथापि असा पुरावा पुढे-मागे मिळेल, अशी ऑल्कॉट साहेबांची खात्री होती.  कोलंबो येथील एक तामीळ हिंदु मि. व्ही. जी. टी. पिल्ले यांनी सिध्दांतदीपिका नावाच्या एका मासिकात लिहिलेल्या लेखातून पान २५ वर खालील उतारा दिला आहे :  ''इ.स. ५३४ च्या सुमारास सिलोनच्या एका बौध्द राजाने पुष्कळ तामिळ शैव ग्रंथांचा नाश केला, त्यावरून शैवांचा बौध्द किती तिटकारा करतात हे कळणे कठीण नाही.  उलटपक्षी तेव्हा तामिळ हिंदूंनी सिंहलद्वीपावर स्वारी केली तेव्हा त्यांनी तालवृक्षाइतके उंच बौध्द धर्माचे ग्रंथ जाळले आणि बौध्दांचा नायनाट केला.  मदुरेचा बौध्द राजा कण्ह पांडय याने इ.स. च्या सहाव्या शतकात शैव धर्म स्वीकारल्यापासून बोध्दांच्या ऱ्हासास सुरुवात झाली.''  तामिळ भाषेतील सर्वात मोठे आणि सन्मान्य काव्य 'कुरळ' हे होय.  ह्याचा कर्ता तिरुवल्लुवर हा पारिया होता.  (वाल्मीक ॠषीच म्हणावयाचा !)  इ.स. १८८५ च्या मॅन्युअल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पान ३३-३६ वर म्हटले आहे की तामिळ पारिया हे दुसऱ्या कोणत्याही जातीपेक्षा शारीरिक गुणाने श्रेष्ठ ठरतात.  सर्व दक्षिण देशांत त्यांचे महत्त्व अधिक आहे.  पारिया हे वायव्य दिशेने आर्यांच्या पूर्वी दक्षिण हिंदुस्थानात येऊन तेथील राज्यकर्ते झाले असावेत असे ह्या मॅन्युअलमध्ये म्हटले आहे.  ऑल्कॉट यांच्या चोपडीत पान २९ वर 'हालस्य महात्म्यं' नावाच्या ग्रंथात ६९ व्या भागामध्ये ८००० द्रविडियनांना ज्ञानपूर्ण ह्या नावाच्या एका संन्याशाने शैव धर्मात कसे घेतले ह्याचा उल्लेख केला आहे.  ह्यांपैकी जे शैव धर्मात येण्यास नाखूष होते त्यांचे हाल हाल करून शिरच्छेद केले.  तेलाच्या घाण्यात त्यांची डोकी घालून रगडली आणि त्यांची शरीरे सुळावर लोंबत ठेवून कोल्ह्याकुत्र्यांकडून फाडविली.  ह्याचे एक दृश्य चित्र मदुरा येथील मीनाक्षीच्या भव्य देवालयाच्या भिंतीवर कोरलेले आहे.  ऑल्कॉट साहेबांनी आपल्या चोपडीच्या शेवटच्या पानावर ह्या चित्राचा ब्लॉक दिला आहे.

ह्याप्रमाणे कर्नल ऑल्कॉट यांनी आपल्या वरील कल्पनांना अनुकूल व प्रतिकूल असलेली व आपणांस सहज उपलब्ध झालेली माहिती प्रांजलपणे जशीच्या तशी दिली आहे.  पण ती माहिती अर्थातच अपुरी आहे.  ह्याच मुद्दयावर दुसऱ्या अनपेक्षित दिशेने सुदैवाने बळकट पुरावा सापडत आहे,  तो खाली दिला आहे :

आंध्र देशातील विजयनगर येथील कॉलेजातील दोन तरुण प्रोफेसर एम. एम. रामस्वामी आयंगार आणि व्ही. शेषगिरिराव यांनी मिळून बऱ्याच श्रमाने प्राचीन तामिळ वाङमयाचे अवगाहन करून Studies in South Indian Jainisn ('दक्षिणेतील जैन धर्माचे अध्ययन') ह्या नावाचा एक विस्तृत शोधग्रंथ अलीकडे प्रसिध्द केला आहे.  आयंगार हे वैष्णव व राव हे तेलगू ब्राह्मण असून ते केवळ संशोधक असल्यामुळे पक्षपाताचा आरोप त्यांच्यावर येण्याचा संभव नाही.  त्यांनी, दक्षिणेत शैव आणि वैष्णव ब्राह्मणांनी बौध्दांचा आणि विशेषतः जैनांचा किती अनन्वित छळ केला हे अगदी निर्भीडपणे ठिकठिकाणी वर्णिले आहे.  मदुरेच्या कण्हपांडय राजाला तिरुज्ञानसंबंदर या शैव संन्याशाचे आणि कांचीच्या महेंद्रवर्मा नावाच्या पल्लव राजाला तिरुना बुक्करसर ऊर्फ आप्पार नावाच्या शैव आचार्याने जैन धर्मातून शैव धर्मात घेतल्याने जैन धर्माच्या उलट जो इ.स. ७५० सालच्या सुमारास भयंकर वणवा पेटला त्यांत ८००० दिगंबर जैन साधूंना सुळावर चढवून ठार करण्यात आले, ही गोष्ट दंतकथा नसून ऐतिहासिक आहे अशी येथे पुष्टी देण्यात आली आहे.  कर्नल ऑल्कॉटच्या 'हालस्य महात्म्या'तील वरील उताऱ्याला याप्रमाणे दुजोरा मिळत आहे.  वरील दोन प्रोफेसरांनी पारियांच्या बाबीत काहीच उल्लेख केला नाही हे खरे आहे.  या बाबतीत संशोधकांनी आणखी पुष्कळ श्रम केल्यास अधिक पुरावा मिळण्याची निराशा बाळगण्याचे कारण नाही.

इ.स. १९०८ साली मी जेव्हा मद्रास येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची एक शाखा स्थापण्यासाठी गेलो, तेव्हा तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजातील तेव्हाचे भौतिकशास्त्राचे प्रोफेसर लक्ष्मीनरसू यांची गाठ घेतली.  त्यांनी त्या पारिया लोकांत बौध्द धर्माचा प्रसार करण्याची त्या वेळी चळवळ चालविली होती.  हे थिऑसॉफिस्ट नाहीत.  पूर्वाश्रमीचे हिंदू नायडू असून ते आता सहकुटुंब बौध्द झाले आहेत.  त्यांनी आता पारियांचा एक बौध्द संघ स्थापिला असून ते स्वतः त्या संघाचे अध्यक्ष आहेत.  तामिळ आणि मल्याळ देशांत, विशेषतः पश्चिम व पूर्व किनाऱ्यावरील 'अस्पृश्य' वर्गाची स्थिती मी स्वतः बारकाईने जसजशी अधिक निरखून पाहू लागलो तसतसे ऑल्कॉटच्या म्हणण्याप्रमाणे हे लोक फार पूर्वी ह्या प्रांतातील राज्यकर्ते असावेत व मध्ययुगात त्यांचा धर्म बौध्द अगर जैन असावा असे अंधुक पुरावे दिसू लागले.  मलबारात मलयगिरीवर पुलया (पुल्कस) नावाच्या अस्पृश्यवर्गीयांचे काही जुने किल्ले आढळले.  त्यांच्या देवांना 'चाटन' म्हणजे 'शास्ता' ह्या बौध्द नावाचा प्रचार काही ठिकाणी आढळला.  'चाटन' हा शब्द शास्ता ह्या संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट रूप आहे.  शास्ता = चाट; 'न' असा आदेश द्राविड भाषेत प्रत्येक नावापुढे येतो.  उदाहरणार्थ, राम = रामन.  शास्ता हे बुध्दाचे एक नाव अमरकोशात आढळते.  असो 'चिरुमा' आणि विशेषतः 'यझवा' अथवा 'तिय्या' या अस्पृश्य जाती संस्कृतचे पूर्वापार उत्तम अध्ययन करीत असलेल्या आढळल्या.  तिय्या जातीमध्ये नारायणस्वामी नावाच्या एका संन्याशाने आत्मोध्दाराची नवीन धार्मिक चळवळ मोठया जोरात चालविलेली पाहिली.  या आत्मोध्दाराच्या चळवळीचे मुख्य लक्षण म्हणजे हजारो रुपयांचे फंड जमवून ह्या तिय्या जातीच्या लोकांसाठी ठिकठिकाणी सुंदर व प्रशस्त देवळे बांधणे व त्यातून संस्कृत उत्तम शिकलेले त्याच जातीचे तरुण देवपूजक तयार करणे व त्यांच्या वृत्तीची योजना करणे, हे होय.  ह्या तपस्वी स्वामींची मी पुनःपुन्हा भेट घेऊन त्यांच्या चळवळीचे आध्यात्मिक स्वरूपही निरखून पाहिले.  या अस्पृश्य जातीमध्ये शेकडो सुशिक्षित इंग्रजी पदवीधर सरकारी नोकरीत हायकोर्ट जज्जाच्या पायरीपर्यंत चढलेले, व्यापारात मोठमोठया पेढया स्थापन केलेले, वकील, डॉक्टर इत्यादी नवीन धंदे यशस्वी रीतीने चालविलेले, नव्या कौन्सिलचे सभासद आणि लोकधुरीण असे झालेले असून त्यांची संख्या उत्तरोत्तर वाढतच आहे.  तथापि त्यांनाही हिंदू देवळांच्या वाटेवर चालण्याची मुभा नाही.  हा विपरीत प्रकार पाहून ऑल्कॉटच्या वरील म्हणण्याचा पुरावा मिळविण्याची निराशा मला तरी वाटत नाही.

ढोबळमानाने तूर्त इतकेच म्हणता येईल की, ब्राह्मणी संस्कृतीची वर्णव्यवस्था, बौध्द आणि जैन धर्माची अमदानी जोरात होती तेव्हा शिथिल झाली असली तरी नष्ट झाली नव्हती.  ह्या क्रांतीच्या काळी ब्राह्मणी संस्कृतीच्या हिंदूंनी जेथे जेथे आपल्या वसाहती केल्या, तेथे तेथे त्यांच्या ग्रामसंस्थेमुळे मूळच्या तद्देशीयांचे अधिराज्यच नव्हे तर वैयक्तिक मालकी हक्कही नष्ट होऊन, ते केवळ बलुतेदार बनून ग्रामबाह्य व अस्पृश्य ठरले.  महाराष्ट्रात बलुतेदारी तरी त्यांना मिळाली; पण दक्षिण देशात तामीळ-मलबारकडे ते केवळ गुलामगिरीत गडप झाले.  अशा वसाहती पुष्कळशा बौध्द धर्माच्या अमदानीतच आणि काही तत्पूर्वीही झाल्या असाव्यात.  शेवटी जेव्हा दक्षिणेकडील व पूर्वेकडील प्रांतांत ह्या पाखंडी म्हणून समजल्या जाणाऱ्या धर्माचा उच्छेद झाला तेव्हा त्यातील वरच्या दर्जाच्या लोकांचा गरजेपुरता आणि परिस्थितीप्रमाणे, नवीन हिंदुधर्मात समावेश होऊ शकला.  परंतु खालच्या तेजोहीन, मांसाहारी, हीनकर्मी व केवळ अकुशल श्रमजीवी बहुजनसमाजाची भर ठोकळमानाने 'अस्पृश्य' आणि ग्रामबाह्य वर्गात होणे अगदी साहजिक आहे.  मागे पान ३८ वर 'पाषंडचंडालानाम् स्मशानांते वासः ।' असा जो कौटिलीय अर्थशास्त्राचा उतारा दिला आहे; त्यातील पाषंड याचा अर्थ मगध देशात जरी बौध्द-जैन असा होणे कठीण असले, तरी खाली दक्षिण देशात बौध्द-जैनांच्या नायनाटानंतर पाषंड म्हणजे बौध्द-जैनच असा होणे साहजिक आहे.  मनुस्मृतीने ब्राह्मणप्रधान वर्णव्यवस्थेचा करडा अंमल चालविल्यावर तेजोहीन खालच्या वर्गाची, विशेषतः पाषंडी मतांची, अशीच अवनती होणे सहजच आहे.  मनुस्मृतीत खालील स्पष्ट आज्ञा राज्यकर्त्यांना फर्माविल्या आहेत :

यो लोभादधमो जात्या जीवेदुत्कृष्टकर्मभिः ।
तं राजा निर्धनं कृत्वा क्षिप्रमेव प्रवासयेत् ॥
मनुस्मृति, १०.९६

अर्थ  :  अधम जातीचा जो कोणी उत्कर्षाच्या लोभाने वरिष्ठ जातीची वृत्ती चालवील, त्याचे राजाने सर्वस्व हरण करून ताबडतोब त्याला देशोधडीला लावावे.  कारण -

शत्तेफ्नापि हि शूद्रेण न कार्यो धनसंचयः ।
शूद्रो हि धनमासाद्य ब्राह्मणानेव बाधते ॥
मनुस्मृति, १०.१२९

अर्थ  :  शूद्राला धनसंचय करण्याला परवानगी असू नये.  तो ब्राह्मणास बाधक होईल.

ह्याच भीतीने ह्या निराधार पाखंडयांना महाराष्ट्रातल्याप्रमाणे बलुतेदारही न बनविता केवळ पिढीजाद पशुतुल्य गुलामगिरीची सनद दक्षिण देशात - विशेषतः मलबारात -दिलेली आज आढळते.  हे प्राणी एके काळी स्वतःच्याच असलेल्या शेतात नंबुद्री ब्राह्मण आणि त्यांचे हस्तक नायर क्षत्रिय ह्यांच्या तैनातीत बंदे गुलाम बनले आहेत.  हे मनुस्मृतीचे जुलमी राजकारण !

वरील एकंदर विवेचनावरून द्राविड आणि मलबार देशांतील हल्लीच्या प्रचंड संख्येच्या अस्पृश्यांच्या विकासांचे तीन टप्पे होतात असे मला वाटते.  १) पान २९-३० वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे द्राविड देशांत अस्पृश्यतेची संस्था आर्यांच्या आगमनापूर्वीही असावी.  पण ही कशी व किती उग्र स्वरूपाची होती ह्याचा पुरावा आता उपलब्ध नाही.  २) उत्तरेकडे बौध्द जैनांचा विजय होऊन आर्यांच्या वर्णव्यवस्थेला जो अडथळा झाला त्या वेळी, किंबहुना कदाचित त्या पूर्वीही, दक्षिणेकडे आर्यांच्या ज्या थोडया नंबुद्री ब्राह्मणांच्यासारख्या वसाहती झाल्या, त्यांच्या ग्रामसंस्थेमुळे अस्पृश्यतेचा दुसरा मजला तयार झाला.  ३) नुकतेच वर वर्णिल्याप्रमाणे हट्टी पाखंडयांची मोठया प्रमाणात अस्पृश्यांत गणना करून हल्लीचा प्रचंड तिसरा मजला तयार झाला.

ह्या शेवटच्या टप्प्यासंबंधी दक्षिण हिंदुस्थानात जरी भरपूर पुरावा अद्यापि गोळा करण्यात आला नाही; तरी तो उत्तर आणि पूर्व हिंदुस्थानातील संशोधकांना सुदैवाने निश्चित उपलब्ध झाला आहे.  तो कसा ते पुढील परिच्छेदात पाहू.

वरवर पाहता अखिल भारतखंडात हिंदूंची वर्णव्यवस्था रूढ झालेली जरी दिसत असली तरी तिचा तपशील आणि जोर निरनिराळया प्रांतांत अगदी निराळा आहे.  ह्या भिन्नतेचे कारण ब्राह्मणी आणि बौध्द संस्कृतीची भिन्नभिन्न काळी भिन्नभिन्न कारणांनी झालेली झटापट हे होय.  पंजाब आणि वायव्येकडील प्रांतांत जी व्यवस्था आहे; ती बिहार, बंगाल, ओरिसाकडे आढळत नाही आणि खाली द्राविड देशात अगदीच निराळी आहे.  बिहार, बंगाल देशांत बौध्द धर्माचा उदय आणि अंमल जारी असल्याने आणि हिंदुस्थानात याच भागात बौध्द धर्म उदय पावून तो येथेच सर्वात अधिक काळ टिकल्याने येथील जातिभेदाची रचना इतर प्रांतांहून अगदी निराळी दिसते.  येथे ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन उच्च वर्णांची जी तुरळक वस्ती आहे ती बाहेरूनच आलेली आहे.  वैद्य, कायस्थ हा जो मोठा मध्यमवर्ग आहे, तो क्षत्रिय आणि वैश्य यांचे मिश्रण आहे; आणि बाकी उरलेला जो मोठा बहुजनसमाज तो निर्भेळ आर्येतर आणि एके काळी पूर्ण बुध्दानुयायी होता.  बाराव्या शतकात मुसलमानांची अकस्मात धाड येऊन जी राज्यक्रांती झाली तिचा धक्का जीर्ण झालेल्या बौध्द धर्माला लागून, तो नष्ट झाला.  मुसलमानी हल्ल्याची ही लाट ओसरून गेल्यावर बौध्दांच्या ठिकाणी ब्राह्मणांनी तत्कालीन क्षत्रिय राजांच्या साह्याने समाजाची हल्ली रूढ असेलेली पुनर्घटना कोली.  ह्या घडामोडीत बल्लाळसेन हा राजा प्रमुख होता.  त्याने नवीनच स्मृती बनवून केवळ ब्राह्मणांच्या दृष्टीने आचरणीय, अनाचरणी, अस्पृश्य आणि ग्रामबाह्य वगैरे जनसमूहांचे नवीन वर्ग बनविले.  अर्थात ह्या उलाढालीत एका मोठया नवीनच अस्पृश्यवर्गाची समाजात भर पडली.  ही गोष्ट आधुनिक संशोधनामुळे कशी सिध्द होत आहे, ते पाहू.

संशोधनाच्या कामी बंगाली पंडितांनी अलीकडे बरीच आघाडी मारली आहे.  हिंदुस्थानातून बौध्द धर्म अजीबात नष्ट झाला आहे, अशी अजून पुष्कळांची समजूत आहे.  पण खरा प्रकार तसा नसून बंगाल्यातील काही भागांतून आणि विशेषतः ओरिसातील काही कानाकोपऱ्यात हा धर्म काही अप्रसिध्द आणि मागासलेल्या जातींत अद्यापि प्रचलित आहे; व त्यांची गणना चुकून हिंदू धर्मातच होते, असा शोध प्रसिध्द संशोधक महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री ह्यांनी केला आहे.  ओरिसात मयूरभंज म्हणून एक लहानसे संस्थान आहे.  तेथील महाराजांच्या साह्याने बाबू नगेंद्रनाथ बसू, बंगाली विश्वकोशाचे संपादक, ह्यांनी १९०८ साली त्या संस्थानच्या जंगलात प्रवास केला, तेव्हा त्यांना जे शोध लागले ते त्यांनी इ.स. १९११ साली Modern Buddhism and its Followers in Orissa ('आधुनिक बौध्द धर्म आणि त्याचे ओरिसातील अनुयायी') ह्या नावाच्या पुस्तकाच्या रूपाने प्रसिध्द केले आहेत.  त्या पुस्तकाला सदर हरप्रसाद शास्त्री यांनी आपली विस्तृत आणि अधिकारयुक्त प्रस्तावना जोडिली आहे.  पान २४ वर शास्त्रीमहाशय लिहितात :  ''इ.स.च्या १२ वे शतकाचे शेवटी मुसलमानांची टोळधाड हिंदुस्थानावर पडली.  त्यांनी प्रमुख बौध्द मठांचा आणि विश्वविद्यालयांचा नाश करून त्या ठिकाणी आपल्या लष्कराचे ठाणे केले.  हजारो साधूंचा शिरच्छेद करून त्यांची संपत्ती लुटली, पुस्तकालये जाळली,.... ब्राह्मणांनी ह्या संधीचा फायदा घेऊन बौध्द हिंदुस्थानातून समूळ नाहीसा झाला असे भासविण्यास सुरुवात केली.  सुशिक्षित आणि बुध्दिवान बौध्द मारले गेले, अथवा दूरदेशी पळून गेले.  मागे त्यांचा प्रांत ब्राह्मणांच्या कारवाईला मोकळा झाला.  पुष्कळ बौध्दांना जबरीने किंवा फुसलावून मुसलमानी धर्मात कोंबण्यात आले.  अशिक्षित, बौध्द बहुजनसमाज कोकरांच्या कळपाप्रमाणे निराश्रित झाला.  त्याला मुसलमानी किंवा हिंदू धर्माचा नाइलाजाने आश्रय घ्यावा लागला.  अशा निराश्रितांपैकी जे पूर्णपणे आपल्या कह्यात येण्यास कबूल होते, त्यांनाच दुराग्रही ब्राह्मणांनी हिंदू धर्मात घेतले.  अशांना 'नवशाखा शूद्र' अशी बंगाली समाजात संज्ञा आहे.  ह्याशिवाय इतर बौध्दांचा जो मोठा भाग स्वतंत्रपणे राहू लागला, तो बहिष्कृत होऊन अनाचरणीय ऊर्फ अस्पृश्य ठरला.''

ह्या अनाचरणीय जाती हल्ली जरी अस्पृश्य हिंदू समजण्यास येत आहेत, तरी त्या पूर्वी चांगल्या सन्माननीय बौध्द होत्या.  त्यांपैकी हल्ली सर्वच अस्पृश्य नाहीत.  नुसत्या अनाचरणीय म्हणजे त्यांचे पाणी ब्राह्मणांस चालत नाही अशा होत.  वणिक सोनाराची जात अतिशय श्रीमंत व वजनदार असूनही ती अशीच अनाचरणीय आहे.  त्यांची गणना नवशाखा शूद्रांपेक्षाही अधिक खालची गणली जात आहे.  ते पूर्वी चांगले बौध्द होते.  पण त्यांच्यावर ह्या धांदलीच्या काळात बल्लाळसेन ह्या हिंदू राजाचा काही झनानी कारस्थानामुळे राग होऊन ते असे खाली दडपले गेले.  मग इतर सामान्य स्वातंत्र्येच्छू जाती अगदी हीन व अस्पृश्य बनल्या ह्यात काय नवल !  मुसलमानांची पहिली धडाडी संपून त्यांचा जम बसल्यावर आणि बौध्द धर्म दडपून गेल्यावर बंगाल्यात हिंदू धर्माची नवी घडी पुनः बसू लागली.  ह्यासंबंधी ह्या शास्त्रीपंडिताचे असे मत आहे की, लोकांना आपल्या पूर्वापार खऱ्या संबंधांचा विसर पडला; आणि ब्रह्मण सांगतील त्याप्रमाणे हल्लीचे जातिभेद संकरजन्य अगर बहिष्कारजन्य आहेत असा समज दृढ झाला.  ह्या नवीन रचनेच्या शिरोभागी ब्राह्मण विराजमान झाले.  इतकेच नव्हे, तर उलटपक्षी कित्येक कुशल कारागीर जाती आणि संपन्न व्यापारीवर्गदेखील जे पूर्वी सन्मान्य बौध्द होते, ते या मनूत हीनत्वाप्रत पोहचले.  ज्यांच्या पूर्वजांनी काही शतकांपूर्वी बौध्द धर्माची तत्त्वे तिबेट आणि चीन देशात पसरविली, ज्यांनी जलप्रवास करून हिंदुस्थानचा उद्योग आणि व्यापार वाढविला अशी 'मनसार भाषान' इत्यादी आद्य बंगाली ग्रंथांतून भडक वर्णने आहेत, तेच आज केवळ ब्राह्मणांच्या कटाक्षामुळे अनाचरणीय व तिरस्करणीय बनले आहेत !  (Modern Buddhism प्रस्तावना पान २३ पहा.)

पण अशा विपन्नावस्थेमध्येही बौध्द धर्म अगदीच नष्ट झाला नसून तो गुप्तरूपाने हीनदीन समाजाच्या वहिवाटीत अद्यापि असला पाहिजे, अशी बळकट शंका आल्यावरून तो शोधून काढण्याचे काम गेल्या शतकाचे शेवटी व चालू शतकाचे आरंभी धाडसी आणि सहानुभूतिसंपन्न शोधकांनी चालविले होते.  अशांपैकी एक संशोधक बाबू नगेंद्रनाथ बसू हे ओरिसा प्रांतातील मयूरभंज संस्थानचे मालक महाराज श्री रामचंद्र भंजदेव ह्यांच्याबरोबर त्या संस्थानातील जंगलात फिरत होते.  ते खिचिंग नावाच्या खेडयाजवळ पोहचले असता त्यांना 'पान' नावाच्या अस्पृश्य जातीच्या काही तरुण पोरांनी मनोहर गाणी गाऊन दाखविली.  'धर्मगीता' नावाच्या जुन्या ग्रंथाशी त्यांचा संदर्भ जुळल्याने नगेंद्रबाबूंना साश्चर्य आनंद झाला.  त्यानंतर त्यांना काही वृध्द माणसे भेटली.  त्यांनी जुन्या बुध्दानुयायी पाल राजांची गाणी गाऊन दाखविली.  अशा रीतीने ह्या ओसाड जंगलात विस्मृतिगर्तेत दडपून गेलेल्या बौध्द धर्माचा आकस्मिक सुगावा लागल्यामुळे या बाबूंनी आपला शोध पुढे नेटाने चालविला.  बडसाई आणि खिचिंग गावांजवळ त्यांना ओरिया भाषेतील काही हस्तलिखित पोथ्या, एक जुना बौध्द स्तूप, धर्मराज आणि शीतला ह्या महायान बौध्द पंथाच्या मूर्ती व इतर खाणाखुणांचा शोध लागला.  पण सर्वात आश्चर्याची गोष्टी ही की ह्या सर्व गत वस्तू आजवर भक्तीने सांभाळून ठेवल्याचे सर्व श्रेय, नगेंद्रबाबू बाथुरी अथवा बाउरी या हीन व अस्पृश्य मानिलेल्या जातीलाच देत आहेत !