अस्पृश्यांचा गैरसमज*

(महर्षी शिंदे यांचे एक अनावृत पत्र)

'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी'च्या धोरणासंबंधी अलीकडे अस्पृश्यवर्गातील काही तरुण व्यक्तींनी आपला गैरसमज करून घेऊन निषेध रूपाने इतरांचाही करण्याचा प्रयत्न चालविला आहे.  विशेषतः ह्या तरुण व्यक्तींचे शिक्षण ह्या मंडळीच्या साह्याने झालेले पाहून ह्या मंडळीला आणि तिच्या मित्रांना ह्या व्यक्तीचा असा विरोध पाहून वाईट वाटणे साहजिकच आहे.  मंडळीच्या काही चालकांनी वर्तमानपत्रांतून ह्या विरोधाला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.  विरोधनिवारक असे प्रयत्न करणे मला स्वतःला आवडत नाही.   कारण आमची मंडळी म्हणजे एक परोपकारी संस्था आहे.  तिने काही ध्येये आणि पध्दती ठरवून घेतल्या आहेत.  त्या ध्येयांना आणि पध्दतींना धोरण हे नाव देणेच मुळी चुकीचे आहे.  मंडळीने जी उदात्त सेवा पत्करली आहे, तिला कसल्याही धोरणाची मुळीच गरज नाही.  केवळ प्रेरणेची आहे.  त्या प्रेरणेचा झरा कायम असेपर्यंत असल्या तरुणांच्या - किंबहुना अस्पृश्यवर्गाची दिशाभूल होऊन त्यातील काही व्यक्तींना मदत करण्याचे सामर्थ्य मंडळामध्ये उरणार नाही.  अशा विचाराने मी ह्या विरोधाकडे दुर्लक्ष केले होते.  ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, सुबोधपत्रिका, जागृती, जागरूक ह्या आणि इतर वृत्तपत्रांनी वरील तरुण व्यक्तींस चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या.  पण त्यात त्यांनाही यश आलेले नाही, हे पाहून वरील विरोधाकडे मी दुर्लक्ष केले, यात चुकी केली नाही असे मला अद्यापि वाटत आहे.  इतकेच नव्हे; तर अस्पृश्यवर्गातील काही जबाबदार आणि वृध्द अशी जी काही माझी मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडून वरील विरोधासंबंधी पूर्ण निषेध आणि तिटकारा दर्शविणारी पत्रे माण्याकडे आली आहेत; आणि अशा मित्रांनी जाहीर रीतीने हा निषेध प्रकट केल्याचे माझ्या ऐकिवात आहे.  ह्या गोष्टीवरून आमच्या मंडळीला म्हणण्यासारखा धोका नाही.  इतकेच नव्हे तर थोडासा विरोध झाल्याबरोबर आमच्या मंडळीने आपले धैर्य आणि शांती यांचा भंग होऊ देणे यातच धोका आहे, अशी माझी अल्प समजूत आहे.  असे असता मी हे पत्र लिहिण्याचे कारण इतकेच की, रा. रा. 'जागरूक' पत्राच्या संपादकांनी आपल्या पत्राच्या ता. १५ माहे 'मे' च्या अंकामध्ये ह्या वरील विरोधाचा उल्लेख करून मी ह्या संबंधी खुलासा करावा, अशी जाहीर विनंतीही केली आहे.  जागरूककारांनी आपला लेख सरळ आणि सहानुभूतीपर लिहिला आहे.  सर्वच गोष्टींत त्यांची आणि माझी मते जुळत नसतानाही त्यांनी हा जो थोरपणा दाखविला आहे, त्याला उतराई म्हणूनच मी हे पत्र किंचित नाखुषीने लिहीत आहे.

------------------------------------------------------------
*सुबोधपत्रिका, ३० मे १९२०
------------------------------------------------------------
वर म्हटल्याप्रमाणे मिशनला धोरण असे मुळीच नाही, मग त्यांच्या खुलाशाचा प्रश्नच उरत नाही.  मिशनची ध्येये, पध्दती, कामे आणि अडचणी ही मिशनच्या रिपोर्टांतून आणि इतर वाङमयांतून वेळावेळी प्रसिध्द झालेलीच आहेत.  अस्पृश्यवर्गाच्या उच्च शिक्षणाच्या आड आमची मंडळी येत आहे, अशा आक्षेपाला उत्तर देणे म्हणजे हा आक्षेप जबाबदार मनुष्यांचा खरा वाटत आहे, असा भ्रम करून घेऊन मंडळीने आत्मविश्वासाला मुकण्यासारखे आहे.  ज्या थोडया व्यक्तींनी विरोधाची चळवळ चालविली आहे, त्यांतील बहुतेकांना मंडळीकडून प्राथमिक आणि औद्यागिक शिक्षणाच्या बाबतीतच नव्हे, तर त्याहून वरिष्ठ दर्जाच्या शिक्षणासाठीदेखील शक्य ती मदत देण्यात आली आहे.  असे असून त्यांनी आपले शिक्षणाचे कर्तव्य अवेळी टाकून देऊन उलट मंडळीविषयी गैरसमज पसरविण्याला तयार होणे, हा एक हल्लीच्या काळाचा अपूर्व महिमा आहे.  अशा तात्कालिक आपत्तीकउे आमच्या मंडळीतील सेवकांनी पाहून स्वीकृत कार्यात क्षणमात्रही खोळंबा होऊ देऊ नये, अशी माझी त्यांना विनंती आहे.  विशेषतः मंडळीच्या ध्येयाचे आणि कार्याचे समर्थन वर निर्दिष्ट केलेल्या वर्तमानपत्रकारांनी आणि इतर थोर गृहस्थांनी केले असताना मंडळीतील सेवकांनी स्वसमर्थनासाठी पुढे यावे, हे मला बरे दिसत नाही. म्हणून जागरूककारांनी जो खुलासा केला आहे तोच आमच्या मंडळीचा खुलासा आहे असे त्यांनी समजल्यास वावगे होणार नाही, हे मी त्यांस नम्रपणे कळवितो; आणि ज्या इतर वृत्तपत्रकारांनी आणि मित्रांनी मिशनची अशी पाठीराखी केलेली आहे, ती सर्व जरी माझ्या पाहण्यात आलेली नाही तरी त्या सर्वांचे अत्यंत आभार मानणे, माझे कर्तव्य समजतो आणि पुन्हा ह्या शुष्क विषयासंबंधी लिहिण्याची पाळी मजवर न येवो, अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो.

अस्पृश्यांची शेतकी परिषद*

शेतकी प्रदर्शन  :  चालू शेतकी प्रदर्शनाबद्दल लोक फार साशंक आहेत.  कारण मन चिंती ते वैरी न चिंती.  ह्यात हिंदुस्थानचा किंबहुना शेतकऱ्याचा काही फायदा नाही; हे इंग्रजी भांडवलशाहीचे एक डोहाळ-जेवण आहे, अशी अफवा आहे.  असाच खरा प्रकार असल्यास ''अजि हौस जिजीची पुरवा ।  हट गर्भवतीचा नुरवा ॥धृ.॥  सित छत्र तिच्या शिरी धरवा ।  सित चामर सुंदर फिरवा ॥  गज शिबिका यातुनि मिरवा ।  नव भव्य महोत्सव करवा ॥  पाचु हार चुडा हिरवा ॥  हिरवा शालु, वेणित मरवा ।  शृंगार थाटुनि बरवा ॥  प्रिय सखिची ओटी भरवा ''  ही खरेशास्त्रीकृत आरती प्रदर्शनअखेर म्हणून शेतकी कमिशनची ओटी भरणे अगदी योग्य आहे.  ते कसेही असो.  चालू डोहाळ-जेवणात 'अस्पृश्यां'चा काय संबंध आहे हा एक मोठा प्रश्नच आहे.  कानडीत एक म्हण आहे की, राजाला मुलगा झाला तर, दासीला दहा घागरी पाणी जास्तच.  यदाकदाचित थोडासा फायदा शेतकऱ्यांस झाला तरी एकंदरीत भारतीय अस्पृश्यवर्ग शेतकरीपदाला अद्यापि पोचला नाही; हे मी प्रतिज्ञेवर सांगतो.

----------------------------------------------------------------------------
*पुणे येथील अस्पृश्यांच्या शेतकी परिषदेत दिलेले अध्यक्षीय भाषण, ३० ऑक्टोबर १९२६
----------------------------------------------------------------------------

इ.स. १९०१ सालच्या खानेसुमारीत म्हटले आहे की, हिंदुस्थानच्या एकंदर लोकसंख्येचे दोनतृतीयांश शेतकीवर अवलंबून आहेत; वट्ट संख्येचे शेकडा ५२ जमिनीचे मालक व कुणबी (वाहणारे) मिळून आहेत. पण अस्पृस्यांची गणना ह्या दोन्ही वर्गांत होत नाही.  शेकडा १२ शेतकीवरचे मजूर आहेत आणि अस्पृश्यांची गणना मजुरांतही होत नसून, ती बिनमुदतीच्या जमिनीवरच्या गुलामांतच करण्यालायक आहे.  एका मद्रास इलाख्यातच सुमारे २ कोटी अस्पृश्य आहेत.  त्यांपैकी निदान एक कोटी तरी ह्या गुलामगिरीत हल्ली खितपत पडलेले मी माझ्या डोळयांनी वारंवार पाहून येत आहे.  केवळ शेतकीवर निर्वाह होता एवढयावरून अस्पृश्यांना शेतकरी ही फुकटची पदवी बहाल करावयाची असली तर गाय, बैल, म्हशी, रेडे, बकरे इत्यादींना शेतकरी का म्हणू नये ?  ह्या जनावरांन मराठे शेतकरी 'लक्ष्मी' ह्या गोड नावाने संबोधतात.  निदान मद्रासकडच्या शेतावरच्या गुलामांना 'लक्ष्मी' ऊर्फ Live Stock हे नाव देण्यात मला कोणतीही अतिशयोक्ती वाटत नाही.  इतर इलाख्यांत अस्पृश्य समाज हा फार तर शेतीवरचा बिनमुदतबंदीचा मजूर असेल; त्याला शेतकरी म्हणणे हे त्याच्या दुःखावर डाग देण्याप्रमाणेच कठोर अज्ञान आहे !

शेतकीचा प्रश्न अर्थशास्त्राचा आहे.  अस्पृश्यतेचा प्रश्न हा सामाजिक, धार्मिक व विशेषतः राजकीय जुलुमाचा आहे.  एकषष्ठांश भारत मी म्हणतो की, तुरुंगाचे दारात नव्हे तर प्रत्यक्ष सामाजिक तुरुंगातच आहे.  मग कैद्यांपुढे अर्थशास्त्राच्या गप्पा सांगितल्यास तो म्हणतील की, आम्हांला मोकळया मैदानात सोडा म्हणजे तुमच्यापेक्षाही अर्थशास्त्रावर अधिक लांब व्याख्याने आम्ही झोडू.  हे खोटे काय ?  मद्रासेकडे, तामिळनाड, तेलंगणात असे किती तरी जिल्हे मी दाखवून देईन की, त्यांत पारियांना जमीनदार तर नव्हेच पण लहानसा कुणबीही होणे शक्यच नाही.  इ.स. १८४४ चे सुमारास लॉर्ड एलिनबरोचे कारकीर्दीत हिंदुस्थानात नामधारी कायद्याने गुलामगिरी बंद केली.  पण इ.स. १९१८ साली मी मलबारात प्रवास करीत असता कालीकत येथील माझ्या एका जमीनदार मित्राने सांगितले की, त्याच्या इस्टेटीवर शेकडो 'अस्पृश्य' वंशपरंपरागत दास ऊर्फ लक्ष्मी होते.  आपल्या इस्टेटीवर काम नसताना तो त्यांना गुरांप्रमाणे दुसऱ्याच्या शेतांत भाडयाने पाठवीत असे !  जमीनीबरोबर दासांची विक्री होते. ते पळून जुन्या मालकांकडे आल्यास मलबारातील ब्रिटिश कोर्टात दावा लावून आंद्रोक्लीजाप्रमाणे त्याला पकडून नव्या इस्टेटीवर डांबता येते !  अशा मद्रासी आंद्रोक्लीजाला हल्ली चालू असलेल्या डोहाळ जेवणातील उष्टावळीची तरी आशा करता येईल काय ?  वरील सालीच मद्रासेत तंजावर जिल्ह्यात मी दौऱ्यावर असताना काही पारिआंना सरकारकडून जमीन वाहण्याचा हक्क सवलतीने देण्यात आला होता.  'कळळर' (ह्याचा अर्थ द्राविड भाषेत 'चोर' असा आहे.)  नावाचा ब्राह्मणेतर जमीनदारांचा एक वर्ग तिकडे आहे. त्यांचा व पारिआंचा ह्या नवीन हक्काच्या बाबतीत घनघोर तंटा लागला होता.  लॉर्ड पेंटलंड हे त्या वेळी गव्हर्नर होते.  त्यांचया अनुमतीने ह्या तंटयाचे इंगित स्वतः निरखिण्यास मी गेलो.  तेव्हा तेथील एका स्वराज्यवादी ब्राह्मण वकिलाने जमीनदारांचा पक्ष घेऊन मला असा स्नेहाचा सल्ला दिला की, मी ह्या भानगडीत न पडता जीव घेऊन मुकाटयाने स्वदेशी जावे.

ह्यावरून अस्पृश्यांनी शेतकीत लक्ष घालू नये, असे माझ मुळीच म्हणणे नाही.  मुद्दा हा आहे की, जेथे जमीन वाहण्याचा तात्त्वि हक्क अस्पृश्यांना नाही, तेथे तपशिलांचे प्रदर्शन त्यांना दाखवून काय उपयोग ?  चालू प्रदर्शनात काही धारवाडी व सिंधी जनावरे ठेविली आहेत असे ऐकतो.  त्याचप्रमाणे काही मलबारातील चिरुमा व त्रिचनापल्लीकडचे पळळर आणिले असते तर ते औताचे कामी किती उपयोगी आहेत हे पाहण्यासाठी आमच्या पुणे मिशनच्या सर्व सभासदांना मी सुचविले असते.  असो. केवळ शेतकीच्या दृष्टीने पाहता बंगाल्यात, मध्यप्रांतात व महाराष्ट्रात अस्पृश्यांची स्थिती इतर काही प्रांतांपेक्षा थोडी बरी आहे.  पण येथेही त्यांना शेतीवर इतर स्पृश्य मजुरांबरोबर मजुरी खात्रीने मिळेलच अशी कोणी खातरजमा देईल ?  एखादा कलेक्शनसाठी उभा असलेला उमेदवार देईल.  पण त्यावर अस्पृश्यांनी विश्वासण्याचे कारण नाही.  न जाणे, नवीन शेतकी कमिशनच्या फुकटया शिफारशीवरून साम्राज्य सरकार मजुरी वाढविण्याचा एखादा कायदाही पास करील.  पण ज्या इंग्रजांना आपल्या घरच्या मजुरांची करुणा येत नाही; त्यांनी इकडील मजुरांना डोक्यावर घेऊन थोडा वेळ नाचल्याने शेती सुधारेल काय ?  की अस्पृश्यता कमी होईल ?  

'अस्पृश्य' वर्गांच्या शेतकी परिषदेत अस्पृश्यता ही प्रधान आणि शेतकी ही गौण गोष्ट आहे.  ही वरील मुद्दाची गोष्ट आपल्या ध्यानात आणण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला आहे.  जमिनीच्या मालकी हक्काला किंवा वाहतुकीला महाराष्ट्रात तरी कायदेशीर प्रतिबंध नाही.  अडचण आहे ती दारिद्रयाची व धंदेवाईक सवलतींची.  इ.स. १९१४ साली सातारा जिल्ह्यात मांग लोकांची वसाहत करण्यासाठी मुंबई सरकारने आमच्या मिशनला एक हजार एकर पडीक जमीन लागवडीस देण्याचे कबूल केले होते.  पण जमीन शोधण्यासाठी मी आणि खुद्द डॉ. मॅन त्या जिल्ह्यात शेकडो मैल हिंडलो.  मराठयाच्या शिवेची जमीन मराठयाने किंवा ब्राह्मणच्या शिवेची जमीन ब्राह्मणानेच आपल्याकडे दाबून ठेवावी किंवा त्यांच्याकडेच असावी हे सरकारी वसुलाच्या दृष्टीने किती साहजिक होते, हे व्यावहारिक शहाणपण मी तेव्हा शिकलो !  कायद्यातले व परोपकारातले पुस्तकी शहाणपण जमीन-शिवारात वावरताना फारसे उपयोगी पडत नाही.  ही गोष्ट शेतकी कमिशनच्या परकीय सभासदांना समजणार नाही व स्वकीय पांढरपेशांना सांगून आम्ही आपला वेळही घालवू नये हेच बरे.  सदाशिव पेठेत मांगाला घर भाडयाने मिळण्याला हल्ली कायद्याची आडकाठी नसली तरी ते मिळणार नाही.  तशीच शेतांत सोवळया वशिल्याच्या मालकाच्या हद्दीला महारमांगाला सवलतीने जमीन मिळावयाची नाही.  ती पडीक झाली म्हणून काय झाले ?  अस्पृश्य जात तिच्याहूनही कितीतरी अधिक काळ पडीक आहे !

अस्पृश्य शेतकऱ्यांची गोष्ट राहोच.  पण हिंदुस्थानातील अगदी अस्सल क्षत्रिय शेतकऱ्यांनाही चांगले दिवस यावयाचे असल्यास, ते असल्या शेतकी कमिशनमुळे न येता, सक्तीच्या शिक्षणामुळेच येणार.  मग त्यासाठी कर बसविण्याइतके हिंदी पुढाऱ्यांनी निर्भीड झाले पाहिजे, हे आता शाळेतील मुलांनाही कळू लागले आहे.  पण हे काळया-गोऱ्या नोकरशाहीच्या मात्र गळी कधी उतरेल ते उतरो.  मला तर वाटते की, हिंदुस्थानासारख्या मागासलेल्या व दुहीने सडलेल्या देशात शेतकीच्या भरभराटीचा प्रश्न केवळ अर्थशास्त्राच्या पोकळ तत्त्वांवर किंवा प्रदर्शनाच्या परकीय भपक्यावर अवलंबून नसून तो सामाजिक शिक्षणावर व हितसंबंधांच्या सहकार्यावर जास्त अवलंबून आहे.  ही जर प्रत्यक्ष स्पृश्यांची स्थिती मग अस्पृश्यांची कोण वाट !

परवा शेतकरी कमिशनपुढे भारतीय शिक्षणमंत्र्याची जी साक्ष झाली; तिच्यात त्यांनी शेतकीच्या दृष्टीनेही सक्तीच्या शिक्षणाची किती आवश्यकता आहे हे निर्भीडपणे सांगितले.  शेतकीत अधिक पैदाशी करून वाढलेल्या पैदाशीचा खप योग्य वेळी करून आपला फायदा करून घ्यावयाचा असेल, तर हिंदी शेतकऱ्यांची हल्लीची मनोरचनाच बदलली पाहिजे.  ती सक्तीचे शिक्षणाशिवाय होणे नाही.  अस्पृश्यवर्गासंबंधी तर ही गोष्ट अधिकच खरी आहे.  ह्या दुर्दैवी वर्गावर आज हजारो वर्षे अस्पृश्यतेची मूठ मारण्यात आली आहे.  त्यामुळे त्यांना स्वतःचे असे मनच उरले नाही.  संन्याशाच्या लग्नाची जशी शेंडीपासून तयारी, तशी अस्पृश्यांच्या उन्नतीची त्यांच्या मनापासून तयारी करावयाची आहे.  वरवर पाहता असे दिसते की, शेतकऱ्यांची मुले लिहावयास शिकली म्हणजे त्यांचे लक्ष शेतकीवरून उडते.  पहिल्या पिढीत असे होणार हे जाणूनच शिक्षणाचा तोडगा तसाच चालविला पाहिजे. फार दिवस हाडीमांसी खिळलेल्या रोगांची लक्षणे अशी उलटी असणारच.  त्यातूनच उपाय करणारक्यांनी चिकाटीने मार्ग काढणे आवश्यक आहे.  ह्यांचा विशेष विचार आपल्या शिक्षण परिषदेत होईल अशी मला आशा आहे.

शेवटी पुन्हा एकदा आठवण करून देतो की, महाराष्ट्रात अस्पृश्यांची जमीनमालकीसंबंधी स्थिती इतर प्रांतांतल्यापेक्षा किंचित बरी आहे.  मराठे आणि महार हे दूरचे चुलत बंधू असल्यासारखे आहेत.  त्यांत महारांना थोरल्या घरचे हे नाव आहे.  पण तेवढयावरून इतर अस्पृश्यांचे मूळ कमी दर्जाचे असे मुळीच माझे म्हणणे नाही.  अस्पृश्य हेच महाराष्ट्र ऊर्फ दंडकारण्याचे मूळ मालक.  मराठे हे केवळ उपरे.  मूळ मालक तो आज केवळ पहिल्या नंबरचा बलुतेदार झाला आहे !  जमिनीच्या शिवेचा तंटा लागल्यास महारांचा निकाल पूर्वी शेवटला समजत असत.  कोकणात अद्यापि गावकरी महारांना पागोटे बांधून त्यांच्या मूळ हक्काची दरसाल आठवण करून देत असतात.  म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्यात दुर्भेद्य एकी करून जमिनीवरील आपली गेलेली सत्ता पुनः मिळविली पाहिजे.  ह्या कामी ब्रिटिश सरकारची झाली तर मदतच होईल.  प्राचीन परंपरेचे महत्त्व हे सरकार जाणते; आमचेकडे जशी तुळशीची लग्ने होतात तसाच एक चमत्कारिक विधी मद्रासकडील तामीळ देशात अद्यापी रूढ आहे.  त्यात भूदेवीचे गळयात लग्नाची ताळी बांधावयाची असते; ती बांधण्याचा हक्क गावच्या पारियाचाच असतो.  ह्यावरून तोच पूर्वीचा बळीराजा, पृथ्वीपती हे उघड होते.  परंतु नुसती परंपरेची पोथी वाचून सरकार वळेल असे नाही.  सरकार म्हणजे काही धर्मादाय खाते नव्हे.  ते बिनहिशोबी व्यवहार कधी करणार नाही.  सरकारजवळ अजूनही पडीक जमीन पुष्कळ पडली आहे.  उत्तर हिंदुस्थानातील शिंदे, होळकर इत्यादी संसथानिकांजवळ तर अशा जमिनींचे अफाट प्रदेश पडले आहेत.  चालू धामधुमीची संधी साधून पाश्चात्त्य भांडवलवाल्यांनी चहा-कॉफीचे विषारी मळे लावून आपले हातपाय पसरल्यावर तुम्ही तेथे मुदतबंदी मजूर म्हणून जाणार काय ?  लहान लहान प्रमाणावर ह्या जमिनीचे तुकडे नांगराखाली आणून स्वतंत्र रयत झाल्यास तुमचा, सरकारचा व सर्व देशाचाही फायदाच होणार आहे.  हा विषय तुमच्या पुढाऱ्यांनी शेतकी कमिशन येथे आल्यावर त्याच्यापुढे अवश्य ठेवण्यासारखा आहे.  

माझ्या व इतर सहकाऱ्यांच्या हातून आजवर जे अल्पस्वल्प प्रयत्न तुमच्यासाठी झाले आहेत, त्यात म्हणण्यासारखे यश आले नसले तरी अनुभव आले आहेत, त्यांची किंमत कमी नाही.  ते तुम्हांस सादर करण्यास आम्ही सदैव तयार आहो.  आता तुमचे मिशन सर्वस्वी तुम्हांवर, तुमच्याच मागणीवरून सोपविण्यात आले आहे.  त्यात तुम्हाला अत्यंत कष्ट पडत आहेत हे मी जाणून आहे.  परंतु ह्या व्यायामाचा तुम्हाला अंती फायदाच झाल्याचे आढळून येईल.  शेतीमध्ये ज्या निरनिराळया खतांचा उपयोग होतो, त्या सर्वांत निढळाच्या घामाचे खत अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे ठरते.  ह्यात कसूर उपयोगी नाही.  हल्ली ज्या फुकट सवलती मिळविण्याच्या शर्यती चहूकडे चालू आहेत.  त्यांच्यात तुम्ही सामील होऊ नका.  अशा सवलती मिळालेल्यांचे न मिळालेल्यांचेपेक्षाही अधिक नुकसान झाल्याचे योग्य वेळी आढळल्याशिवाय राहत नाही.  अर्थात तुमच्या दुर्बल स्थितीमुळे, विशेषतः ती स्थिती इतरांच्या अन्यायामुळे आली असल्याने तुम्हांला काही सवलती सढळ हातांनी देणे न्याय्यच नव्हे, तर अत्यंत आवश्यकही आहे.  पण ह्याही सवलती तुम्ही कर्जाऊच म्हणून घेण्यात आपला बाणेदारपणा दाखवाल अशी मी आशा करतो.

अस्पृश्यांचे राजकारण

सद्यस्थितीत या विषयावर मी माझे विचार प्रकट करणे जरूर आहे असे समजून माझ्या काही मित्रांनी व सहकाऱ्यांनी आग्रह धरला.  इतक्यात वसंत व्याख्यानमालेकडूनही व्याख्यानाविषयी विनंती करण्यात आली, म्हणून मी माझे विचार व अनुभव सांगण्यास आज तयार झालो आहे.  आजच्या व्याख्यानात कोणत्याही प्रकारचे सिध्दांत ठरवावयाचे नाहीत अगर गाजवावयाचे नाहीत, म्हणून आज कोणी अध्यक्ष नको अशी मालाकारांजवळ विनंती केली, कारण माझे भाषण केवळ प्रवचन आहे.  त्याला निर्णयाची जरूर नाही.  पण वहिवाटीच्या सबबीवर मालाकारांनी माझी विनंती मान्य केली नाही.  टीकाकारांनी माझ्या भाषणावर वाटेल अशी टीका करावी, पण अध्यक्षांनी निर्णय देण्याची तसदी घेऊ नये अशी माझी विनंती आहे.  राजकारणात काही पक्षोपपक्ष असतात; पण मी आतापर्यंत राजकारणाच्या कोणत्याही पक्षात सामील झालेलो नाही.  अस्पृश्यांतही आज असे पक्ष जोराने दंड थोपटून उभे आहेत.  त्यांच्यांतही मध्यस्थी करून राजकारणाचे जागतिक असे जे उच्च कार्य असते, ते करण्यास मी केव्हावी तयार आहे.  श्रोत्यांनीही अशाच निर्विकार व उदात्त भावनेने माझे चार अल्पबोल ऐकावेत.  खवळलेल्या सद्यस्थितीत पक्षाच्या लाटांवर वाहून जाण्याचा प्रयत्न मीही करीन, आपणही सर्व कराल अशी आशा आहे.

----------------------------------------------------------------------------
* पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत दिलेले भाषण
----------------------------------------------------------------------------

अस्पृश्यांच्या कारणावर बोलण्यापूर्वी राजकारणाचाच अर्थ पाहू.  त्यामुळे प्रवचनाच्या अर्ध्याअधिक भागाचा खुलासा सहज होऊन या क्लिष्ट प्रश्नाचा मार्ग सोपा होईल.  राजकारणाचा अर्थ अर्थकारण (Economics) म्हणजे अर्थाच्या आधारे समाजशास्त्राची धारणा एवढाच आहे.  समाजाची धारणा व्हावी म्हणून अर्थशास्त्रासारखे शासनशास्त्राचेही तत्त्व राजकारणात समाविष्ट होते, पण हे दुसरे तत्त्व शक्यतोवर गौण असावयास पाहिजे.  प्राचीन काळी जेव्हा जीवनकलह इतका तीव्र नव्हता, तेव्हा राजकारणात अर्थशास्त्राचेच प्राधान्य होते.  पण पुढे जसजसे कनक आणि कांता या लोभनीय वस्तूंविषयी मारामारी सुरू झाली; तसे राजकारणात अर्थशास्त्रापेक्षा शासनशास्त्राचे प्राबल्य वाढले.  पण अलीकडे इतर भावनामय अवांतर गोष्टींपेक्षा पोटापाण्याचाच प्रश्नाला प्राधान्य येऊ लागल्यामुळे आजकालच्या राजकारणात अर्थशास्त्रालाच पूर्ववत प्राबल्य येऊ लागले आहे.  कनक हे मुख्य साध्य आणि त्यासाठी शासनाची हाव हे केवळ साधन होऊन बसले आहे.

सर्व राजकारणाची जर ही मीमांसा तर हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या राजकारणाला पोटापाण्याचे महत्त्व यावे यात काय नवल आहे ?  'अस्पृश्य' हे अल्पसंख्याक, हतवीर्य, हतबल व पददलित आहेत.  त्यांना दुसऱ्यावर शासन चालविण्याची हाव अद्यापि तरी नाही.  कशी असणार ?  मात्र दुसऱ्याची त्यांच्यावर मिरविण्याची हाव अद्यापि तिळमात्रही कमी झाली नाही.  मग हे क्षत्रिय असतो, ब्राह्मण असोत, शूद्र असोत, स्वकीय असोत, की परकीय असोत, प्रागतिक असोत की स्थितिनिविष्ठ असोत !  जोपर्यंत हे होईजड वर्ग आपल्या इज्जतीखातर अस्पृश्यांच्या योगक्षेमात आणि स्वयंनिर्णयात ढवळाढवळ करू पाहतात; तो 'अस्पृश्य' आजकाल करू देण्यास तयार नाहीत; एवढाच त्यांच्या राजकारणाचा अर्थ आतापर्यंत माझ्या अनुभवास आला आहे.  पुढे काय होईल त्याविषयी भविष्यवाद करण्याचे हे स्थळ नव्हे.  अस्पृश्यांची आजची भूक एवढी थोडी असताना त्यांच्या स्पृश्य शत्रूमित्रांना काय वाटते ते पाहा.  'अस्पृश्य' स्पृश्यांच्या दाव्यातून सुटल्यावर लवकरच ते सूड उगविण्याच्या मार्गाला लागतील आणि स्पृश्यांवर आज जे जुलूम करणारे परकीय आहेत, त्यांच्याशी एकजीव होतील (जणू परकीय तसे होऊ देतीलच) आणि परकीयांच्या साह्याने स्पृश्यांवर जुलूम करू लागतील वगैरे वगैरे अनेक नीतीचे काहूर आम्हा स्पृश्यांमध्ये माजले आहे.  ह्या काहुराला नीतीचे आणि न्यायाचे किती पाठबळ आहे, हे मला स्पष्ट सांगण्याची इच्छा नाही.  ही सांगण्याची इच्छा ऐकणाऱ्यांच्या तयारीवर अवलंबून राहणार.

अस्पृश्यांचे राजकारण अस्पृश्यतेइतकेच प्राचीन आहे आणि ते सांगण्यासाठी अस्पृश्यतेचा उदय कसा झाला हे सांगू गेल्यास प्रवचनाचा व्याप मर्यादेपलीकडे वाढेल.  पुढेमागे हाच विषय निराळया ग्रंथाद्वारे प्रसिध्द होत असल्यामुळे अत्यंत संक्षेपाने हा मुद्दा सांगणे जरूर आहे.  मानववंशाचे पृथक भाग प्राचीन काळी एकमेकांशी लढत असत.  परस्परांच्या संस्कृतीबद्दल अभिनिवेश उत्पन्न होऊन वंशद्वेष मनुष्यजातीत रूढ झाला.  याच वंशद्वेषाला जादूटोणा, मंत्र, विटाळचंडाळ, सोवळे-ओवळे आणि शेवटी रूढधर्म यांचेही पाठबळ मिळून काही विशिष्ट वंश इतर मानववंशांनी आपल्यापासून दूर ठेवले.  याप्रकारे सामाजिक अस्पृश्यतेचा पाया घालण्यात आला.  एका वंशाने दुसऱ्या वंशास जित केल्यावर जेत्यांनी जिताला गुलामगिरीत ठेवल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत.  अशा गुलामांना 'अस्पृश्य' मानण्याची उदाहरणे प्राचीन काही पश्चिम आशियातील सेमेटिक, मध्य आशियातील हिंदू आणि पूर्व आशियातील ब्रह्मदेश, जपान इत्यादी राष्ट्रांत आढळतात.  'अस्पृश्य' मानलेले वंश सारे संस्कृतिहीनच होते असे मूळीच नाही.  ब्रह्मदेशोत 'तुव्हायाजा' (अशुभ राजा), फयाचून वगैरे जे अस्पृश्य वंश आढळत आहेत, ते जिंकले जाण्यापूर्वी राजवंश होते.  हेच तर काय हल्लीच्या सुधारलेल्या काळीदेखील द. आफ्रिकेसारख्या ठिकाणी हिंदूंसारख्या काह्या वंशाला तेथील गोरे वसाहतकार अस्पृश्याप्रमाणेच ग्रामबाह्य ठरवितात.  यावरून अस्पृश्यतेला संस्कृती अथवा संस्कृतीचा अभाव हे कारण ठरत नाही.  जेत्यांनी जितांशी चालविलेले राजकारण, हेच ह्या जातिविशिष्ट अस्पृश्यतेचे हेतू होत, हे सिध्द होते.

ह्याच वंशद्वेषाला पुढे पुढे रूढ धर्माचे पाठबळ मिळाल्यामुळे ह्या भरतखंडात पूर्वी अल्प असलेल्या अस्पृश्यांची संख्या कालवशात इतकी अवाढव्य झाली आहे.  समाज सुसंपन्न आणि सुसंस्कृत स्थितीत असला तर दहा वर्षात त्याची दुप्पट वाढ होते, असा एक सामान्य लोकसंख्याशास्त्राचा अजमास आहे.  ह्या अजमासाप्रमाणे अस्पृश्यांची संख्या वाढलेली असणे शक्य नाही.  कारण हे दुर्दैवी मानववंश एकदा अस्पृश्य आणि ग्रामबाह्य ठरल्यावर त्यांच्यांत संपन्नता आणि संस्कृती कोठून उरणार ?  असे असूनही त्यांची संख्या जी इतकी प्रचंड वाढलेली आहे त्याला काही विपरीत कारणेच असली पाहिजेत.  ती कारणे म्हणजे ह्या प्रचंड खंडवजा देशात धर्माच्या आणि धर्मपंथाच्या नावावर ज्या क्रांत्या आणि जुलूम झालेले आहेत, तेच होत.  बौध्द, शैव, वैष्णव, शाक्त इत्यादी पंथांच्या मारामाऱ्या दक्षिणेत द्राविडांमध्ये व उत्तरेत आर्यांमध्ये झाल्यामुळे पूर्वी स्पृश्य असलेले जातिसमूह अस्पृश्यांत ढकलण्यात आले.  अशाविषयी ऐतिहासिक दाखले कर्नल अलकॉटसारखे परकीय धर्मप्रचारक आणि महामहोपाध्याय हरप्रसादशास्त्री यांच्यासारखे पुराणमतवादी संशोधक यांच्या ग्रंथांत आढळतात.

थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अस्पृश्यता म्हणजे स्पृश्यांच्या दूषित राजकारणाचे एक दृढमूल झालेले जाळे आहे.  अस्पृश्यांमध्ये जो आता हीनपणा आलेला आहे; त्यामुळेच अस्पृश्यता उदय पावली असे म्हणण्याने कार्यकारणांचा विपर्यास हल्लीच्या काळीसुध्दा जाणत्या लोकांकडून होत आहे, ही एक करमणुकीची गोष्ट.  समाजशास्त्राचे निरपेक्ष अवलोकन केल्यावर जातीय अस्पृश्यता ही हीनतेचे कार्य नसून उलट ती दीनतेचे कारण आहे असे दिसून येते; आणि ब्रह्मदेशातील अस्पृश्य लोकांचा इतिहास पाहिल्यास हा कार्यकारणभाव सिध्द होतो.  काही असो, अस्पृश्यतेची व अस्पृश्यांसंबंधी स्पृश्यांच्या राजकारणाची ही मीमांसा साधारण लोकांच्या गळी सहज उतरेल अशी माझी तरी अपेक्षा नाही.  तथापि प्रस्तुत विषय माझ्या अपेक्षा असा नसून अस्पृश्यासंबंधी माझे निरीक्षण, अध्ययन, संशोधन व अनुवाद हीच होत.

अस्पृश्यांच्या विषयी पूर्ण आणि निष्काम सहानुभूती वाटल्यावरून 'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी' या नावाने अखिल भारतातील अस्पृश्यांच्या सेवेसाठी आणि शुश्रूषेसाठी एक विधायक धर्मकार्य उघड स्थापण्यात आले.  पण त्यापूर्वी बरीच वर्षे त्यांचया स्थितीचे अध्ययन चाललेच होते.  हे कार्य निघाल्याबरोबर अनुकूल व प्रतिकूल टीकांचा गहजब उडाला, सहानुभूतीइतकाच विरोधाचा वर्षाव झाला.  बाहेरील सहकाऱ्यांइतकाच अंतःकलह माजला.  या मंडळीच्या विधायक कार्यामुळे मंडळीच्या बाहेरही विक्षोभक चळवळ प्रचंड माजली.  राष्ट्रीय सभेच्या केवळ राजकारणाच्या रणांगणात अस्पृश्यांच्या नावावर रणशिंग वाजू लागले.  पक्षात्मक राजकारणात भाग न घेता मंडळीने उच्च आणि मूलभूत राजकारणात अस्पृश्यांच्याही वतीने भाग घेण्यास माघार घेतली नाही.  मात्र हे सर्व काम मंडळीने गाजावाजा न करता केले.  त्यांचा प्रयत्न विधायक असल्यामुळे तो अद्यापि चालू आहेच.  हा प्रयत्न चालू असता मडळीवर प्रतिकूल टीकास्त्रांचा जो वर्षाव झाला त्यांतील काही मासल्यांचा उल्लेख करणे विषयाला धरून आहे.  हे उल्लेख मंडळीच्या संरक्षणासाठी नसून विषयाच्या परिपूर्ततेसाठी आहेत.

या मंडळीचे हे कार्य अस्पृश्यांच्या उध्दारासाठी नसून ब्राह्मणादी उच्च वर्गांना खाली ओढण्यासाठी आहे; अशी नुसती सुटी सुटी विधानेच करून न राहता या जाडया जाडया विद्वारांनी सुसंबध्द व्याख्याने दिली आहेत.  ती मला आज चांगली आठवतात.  मंडळीच्या कार्याची घटना सर्व देशभर होऊन त्याचा परिणाम जाणवू लागल्यावर १९२३ सालच्या जानेवारीच्या अंकात 'अस्पृश्योध्दार' या मथळयाखाली रा. रा. महादेव राजाराम बोडस या लेखकाने 'चित्रमय जगतासारख्या' सन्मान्य मासिकात एक मननीय लेख लिहिलेला आहे.  त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा व्यक्तीविषयकता बाजूस ठेवून आजच्या विषयासाठी विचारात घेणे जरूर आहे.

वरील लेखात पान ४५ वर खालील उतारा वरील मंडळीच्या कार्यासंबंधानेच नव्हे, तर साधारण हितासंबंधीही महत्त्वाचा आहे :

''आपली सामाजिक व धार्मिक सुधारणांची तट्टे चोहीकडे नाचविण्याकरताच निराश्रितांचा कैवार घेण्याऱ्यांचे हातून त्यांचा उध्दार कधीही व्हावयाचा नाही.  कारण त्यांच्या प्रामाणिकपणावर लोकांचा विश्वास बसत नाही.  कोणतीही चळवळ एकनिष्ठ असल्याशिवाय यशस्वी होत नाही.  एका कामात दुसरी दहा खेकटी घुसडली की, सर्वच कामे बिघडतात.  अस्पृश्यतेच्या प्रश्नाला रोटीबेटीव्यवहार आणि सनातन धर्माची टवाळी चिकटविल्याने निराश्रित शिखंडींना पुढे करून सबगोलंकार करण्याचा या मंडळीचा बेत आहे; अशी साधारण लोकांची समजूत झाली व त्यामुळे कारण नसता सर्व जातींचा या चळवळीला विरोध होऊ लागला.  पण तेच सन १९१८ साली लो. टिळकांनी सहानुभूती दाखविल्याबरोबर १९२० साली महात्मा गांधींनी हा प्रश्न हाती घेतला व १९२१ साली अहमदाबादच्या काँग्रेसमध्ये राजकीय व राष्ट्रीय करून टाकला.  विठ्ठलराव शिंद्यांना १२ वर्षांत जे कार्य करता आले नसते, ते गांधींनीं दोन दिवसांत केले, म्हणजे शिंद्यांच्या कामाचे महत्त्व कमी होते असे नाही.  उलट असेही म्हणता येईल की, शिंद्यांच्या १२ वर्षे नांगरणीमुळे गांधींना बीजारोपण करता आले.  परंतु एकाच कार्याविषयी उभयतांचा दृष्टिकोण आणि कार्यपध्दती यांतील भेद दाखविण्याकरताच ही तुलना केली.  शिंदे निराश्रितांना व्यक्तिशः सुखी करण्याकरिता झटत असल्यामुळे समाजाला विशेष कळकळ वाटत नव्हती.  समाजात सुखी व दुःखी दोन्ही प्रकारचे लोक असल्यामुळे समाजातील वैयक्तिक सुखाविषयी लोकांना फारशी आशा वाटत नाही.  पण राष्ट्राच्या भवितव्यतेचा प्रश्न आला की, सर्व समाज खडबडून जागा होतो.  पाचसहा कोटी निराश्रितांचा उध्दार करावयाचा तो त्यांनी अधिक सुखात व ऐषआरामात राहावे म्हणून नव्हे तर तीस कोटी हिंदी राष्ट्र एकजीव होऊन स्वराज्य मिळवण्यास लायक व्हावे म्हणून.  लोकमान्य टिळकांनी निराश्रितांविषयी नुसती शाब्दिक कळकळ दाखविली म्हणून त्यांची टवाळी करणारांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही, की ज्यांच्या हातांत निराश्रितांची चळवळ आहे, त्यांची जास्त योग्यताच नाही.  टिळक-गांधींसारख्यांकडून मदत मिळवावयाची असेल तर त्यांच्याप्रमाणेच राष्ट्रकार्याला कंबर बांधली पाहिजे.  साहेबलोकांना खूष ठेवावयाचे, मिशनऱ्यांच्या मागे लागावयाचे, पैशाकरता श्रीमंत लोकांच्या दारोदार हिंडावयाचे, मग लोकमान्य टिळकांनी असल्या भिक्षेकऱ्यांना नुसत्या शब्दांची भीक घातली तर नवल काय ?  "You Cannot serve both God and mamon at the same time" अशी एक इंग्रजीत म्हण आहे.  निराश्रितांना केवळ ऐहिक सुखे देणेच ज्यांचे ध्येय त्यांनी सर्व ऐहिक सुखावर पाणी सोडलेल्या टिळक-गांधींसारख्यांकडून मदतीची अपेखा करू नये, हेच उत्तम.  कारण त्यांचे ध्येय निराळे, मार्ग निराळा व दृष्टिकोणही निराळा !''

अस्पृश्योध्दाराच्या मार्गातील धोंड*

अस्पृश्यतानिवारणासंबंधाने वरच्या वर्गातील काही उदारविचारवादी लोक काही अस्पृश्य मानलेल्या लोकांस आपल्याबरोबर घेऊन कमी-अधिक प्रमाणावर प्रयत्न करतात.  अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, मनुष्यतेवरील, हिंदुधर्मावरील हा काळाकुट्ट डाग आहे, तो काढून टाकल्यावाचून आम्हाला कोणत्याही प्रकारचे हक्क मागण्याचा अधिकार पोचत नाही, असे कोणीही उच्च मानिलेल्या वर्गातील गृहस्थाने म्हटले, तर ते आमच्या अस्पृश्य मित्रांना ताबडतोब पटते.  परंतु हेच आमचे बंधू आपआपसांतील अस्पृश्यतानिवारणाचा प्रश्न कुठे आला की बिचकतात.  एवढेच केवळ नव्हे, तर एखादा कर्मठ ब्राह्मण अस्पृश्यतेचा प्रश्न पुढे येताच ज्याप्रमाणे क्रोधायमान होऊन आपले श्रेष्ठत्व स्थापित करावयास व धर्माचे रक्षण करावयास सत्त्वर सिध्द होतो, त्याप्रमाणे आमच्या कित्येक अस्पृश्य बंधूंची स्थिती होऊन जाते.  हा कटु अनुभव पदरात पडल्यानंतर अस्पृश्योध्दाराची चळवळ सर्वतोमुखी करावयास कारण झालेले रा. रा. विठ्ठलराव शिंदे नेहमी म्हणत असत की, अस्पृश्योध्दाराच्या मार्गातील मोठे धोंडे हे स्वतः अस्पृश्य मानलेलेच लोक !  ह्या उद्गाराची आठवण ह्या आठवडयात आम्हाला पुन्हा एकदा झाली.

---------------------------------------------------------------------------------
*सुबोधपत्रिका, संपादकीय स्फुट, ११ फेब्रुवारी १९२१
---------------------------------------------------------------------------------

पुण्यास सरकारने स्वतःच्या खर्चाने अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी एक मोफत बोर्डिंग काढले आहे.  तेथे मुलांचा स्वयंपाक महार स्वयंपाक्याने करावयाचा की, चांभार स्वयंपाक्याने करावयाचा हा वाद त्यांच्यातच उपस्थित झाला आहे !  चांभारांना महार अस्पृश्य वाटतात व महार चांभारांचे श्रेष्ठत्व कबूल करावयास तयार नाहीत.  म्हणजे आपापसांतील स्पृश्यास्पृश्यत्वाचा व सोवळयाओवळयाचा हा सावळा गोंधळ कायम ठेवून उच्च जातींनी मात्र अस्पृश्यत्व मानू नये असा ह्या लोकांचा आग्रह आहे.  परंतु आपापसांतील भेदभाव नष्ट केल्यावाचून श्रेष्ठपणाच्या लटक्या कल्पना घालविण्यावाचून उच्च वर्णाचे लोक अस्पृश्यत्वनिवारणाचा प्रश्न मनापासून हाती घेणे शक्य नाही हे 'बहिष्कृत भारत'कारांनीच दाखवून आपल्या बंधूंना सरळ मार्ग दाखविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे, हे पाहून आम्हांस फार समाधान वाटले.  त्यांनी असे स्पष्ट उद्गार काढले आहेत की, ''जे महार-मांगांना किंवा चांभारांना अस्पृश्य लेखतात किंवा जे चांभर अस्पृश्यांना अस्पृश्य लेखतात त्यांना आपली अस्पृश्यता ब्राह्मणांनी किवां ब्राह्मणेतरांनी काढून टाकावी असे म्हणावयास अधिकार नाही.  महारांनी चांभारांचा किंवा चांभारांनी महारांचा विटाळ मानावा व ह्या दोन्ही जातींनी आपला विटाळ ब्राह्मणांनी किंवा ब्राह्मणेतरांनी मानू नये अशी मात्र इच्छा करावी, हे कोणालाही चमत्कारिक वाटल्याशिवाय राहणार नाही ?  महार, मांग, चांभार यांनी आपसांतील अस्पृश्यता काढून टाकल्याशिवाय आम्ही त्यांची अस्पृश्यता काढून टाकणार नाही, असे कोणताही समजूतदार ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर म्हणणार नाही हे खरे असले तरी खुद्द अस्पृश्य जातीच आपल्या स्वतःच्या अशा वर्तनाने आपली हानी करतात, हे त्यांनी लक्षात ठेवावे.''

स्पर्शास्पर्शांचा आपणांस असा भेद ठेवल्याने अस्पृश्यता काढून टाकण्याची त्यांची चळवळ कशी लुळी पडते, ह्याचा विचार त्यांनी करणे जरूर आहे.  अस्पृश्यता हा अन्याय आहे असे जर त्यांना खरोखर वाटत असेल तर त्यांनी आपसांतील अस्पृश्यताही काढून टाकली पाहिजे.  एवढेच नवहे तर रोटी-बेटी व्यवहारही त्यांनी आपसात सुरू केला पाहिजे आणि असे त्यांनी केले तर त्यांच्या चळवळीला जोर येईल.  वरिष्ठ जातींनी चालविलेले सामाजिक अन्याय नाहीसे केल्याशिवाय कोणीही ऐकणार नाही.

पुण्याच्या बोर्डिंगपुरताच हा प्रश्न नाही आणि तेवढयापुरता तो सुटलाही असेल. परंतु आमचे जे अस्पृश्य बंधू स्वतः अस्पृश्यतानिवारणाच्या चळवळीत पुढाकार घेत आहेत, त्यांनी बोले तैसा चाले ।  त्याची वंदावी पाऊले ॥  ह्या साधुक्तीची इतरांस आठवण करून देताना ती स्वतः सही करून घ्यावी, हे बरे !  हा प्रश्न आता उंटावरून शेळया हाकून सुटण्यासारखा नाही.  आता कृतीची वेळ आली आहे.  ''वाचा वदे परि करणे कठीण'' असे मात्र म्हणू नये म्हणजे झाले.

उत्तरयुगीन अथवा अर्वाचीन अस्पृश्यता

प्रकरण पाचवे

येथपर्यंत मध्ययुगीन अस्पृश्यतेचे विवेचन झाले.  आता तिसरा टप्पा जो उत्तरयुगीन म्हणजे ज्या काळी बौध्द धर्माचा नायनाट जैन, शैव, वैष्णवादिकांनी अनुक्रमाने चालविला आणि त्यानंतर मुसलमानांची धाड येऊन तो (बौध्द धर्म) नाहीसा झाला, तो काळ होय.  ह्या काळातील अस्पृश्यतेचे एक मुख्य लक्षण म्हणजे तत्कालीन अस्पृश्यांच्या संख्येमध्ये निरनिराळया प्रांतांतून आंधळे राजकारण आणि जुलमी राज्यक्रांती ह्यामुळे भली मोठी ठोकळ भर पडली, हे होय.  तरी तिकउे आपण आता वळू.  इ.स. १८९४ साली मद्रास येथे थिऑसाफिकल सोसायटीने येथील पारियांची स्थिती सुधारण्यासाठी प्राथमिक शिक्षणाच्या शाळा सुरू केल्या.  ह्या प्रयत्नास प्रोत्साहन देण्यासाठी ह्या सोसायटीचे तत्कालीन उदारधी अध्यक्ष कर्नल ऑल्कॉट यांनी सन १९०१ साली The Poor Pariah ('बिचारा पारिया') ह्या नावाची एक इंग्रजी चोपडी प्रसिध्द केली.  तिच्या २४ व्या पानापासून शेवटपर्यंत एका नवीन कल्पनेचा निर्देश आणि पुरस्कार केला आहे.  ती कल्पना म्हणजे हल्लीचे पारिया हे एके काळी बौध्द होते, आणि पुढील धर्मक्रांतीच्या काळी ते हिंदुधर्मात सामील न झाल्यामुळे राजशासनावरून त्यांना अस्पृश्य ठरवण्यात आले, ही होय.  १८९८ च्या सुमारास कर्नल ऑल्कॉटकडे पारिया जातीचे काही पुढारी आले आणि म्हणू लागले की, अशोकाच्या वेळी आपण बौध्द होतो, म्हणून आमच्यासाठी ऑल्कॉट साहेबांनी बौध्दांचा एक नवीन संघ काढून त्यात आम्हांस घ्यावे.  ऑल्कॉट साहेबांनी त्यांना कोलंबो येथील H. Sumangala (एच. सुमंगल) ह्या मुख्य बौध्द भिक्षूकडे नेले.  त्यांनी एका मोठया जाहीर सभेत त्यांना बौध्द धर्माची दीक्षा दिली.  परंतु हे लोक पूर्वी बौध्द होते ह्याविषयीचा पुरावा ऑल्कॉट साहेबाला मिळाला नाही.  अश्वघोषाचा काही लेख आपणांजवळ होता, असे पारियांचे म्हणणे होते.  पण तो लेख त्यांना त्यांच्याकडून मिळाला नाही.  तथापि असा पुरावा पुढे-मागे मिळेल, अशी ऑल्कॉट साहेबांची खात्री होती.  कोलंबो येथील एक तामीळ हिंदु मि. व्ही. जी. टी. पिल्ले यांनी सिध्दांतदीपिका नावाच्या एका मासिकात लिहिलेल्या लेखातून पान २५ वर खालील उतारा दिला आहे :  ''इ.स. ५३४ च्या सुमारास सिलोनच्या एका बौध्द राजाने पुष्कळ तामिळ शैव ग्रंथांचा नाश केला, त्यावरून शैवांचा बौध्द किती तिटकारा करतात हे कळणे कठीण नाही.  उलटपक्षी तेव्हा तामिळ हिंदूंनी सिंहलद्वीपावर स्वारी केली तेव्हा त्यांनी तालवृक्षाइतके उंच बौध्द धर्माचे ग्रंथ जाळले आणि बौध्दांचा नायनाट केला.  मदुरेचा बौध्द राजा कण्ह पांडय याने इ.स. च्या सहाव्या शतकात शैव धर्म स्वीकारल्यापासून बोध्दांच्या ऱ्हासास सुरुवात झाली.''  तामिळ भाषेतील सर्वात मोठे आणि सन्मान्य काव्य 'कुरळ' हे होय.  ह्याचा कर्ता तिरुवल्लुवर हा पारिया होता.  (वाल्मीक ॠषीच म्हणावयाचा !)  इ.स. १८८५ च्या मॅन्युअल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पान ३३-३६ वर म्हटले आहे की तामिळ पारिया हे दुसऱ्या कोणत्याही जातीपेक्षा शारीरिक गुणाने श्रेष्ठ ठरतात.  सर्व दक्षिण देशांत त्यांचे महत्त्व अधिक आहे.  पारिया हे वायव्य दिशेने आर्यांच्या पूर्वी दक्षिण हिंदुस्थानात येऊन तेथील राज्यकर्ते झाले असावेत असे ह्या मॅन्युअलमध्ये म्हटले आहे.  ऑल्कॉट यांच्या चोपडीत पान २९ वर 'हालस्य महात्म्यं' नावाच्या ग्रंथात ६९ व्या भागामध्ये ८००० द्रविडियनांना ज्ञानपूर्ण ह्या नावाच्या एका संन्याशाने शैव धर्मात कसे घेतले ह्याचा उल्लेख केला आहे.  ह्यांपैकी जे शैव धर्मात येण्यास नाखूष होते त्यांचे हाल हाल करून शिरच्छेद केले.  तेलाच्या घाण्यात त्यांची डोकी घालून रगडली आणि त्यांची शरीरे सुळावर लोंबत ठेवून कोल्ह्याकुत्र्यांकडून फाडविली.  ह्याचे एक दृश्य चित्र मदुरा येथील मीनाक्षीच्या भव्य देवालयाच्या भिंतीवर कोरलेले आहे.  ऑल्कॉट साहेबांनी आपल्या चोपडीच्या शेवटच्या पानावर ह्या चित्राचा ब्लॉक दिला आहे.

ह्याप्रमाणे कर्नल ऑल्कॉट यांनी आपल्या वरील कल्पनांना अनुकूल व प्रतिकूल असलेली व आपणांस सहज उपलब्ध झालेली माहिती प्रांजलपणे जशीच्या तशी दिली आहे.  पण ती माहिती अर्थातच अपुरी आहे.  ह्याच मुद्दयावर दुसऱ्या अनपेक्षित दिशेने सुदैवाने बळकट पुरावा सापडत आहे,  तो खाली दिला आहे :

आंध्र देशातील विजयनगर येथील कॉलेजातील दोन तरुण प्रोफेसर एम. एम. रामस्वामी आयंगार आणि व्ही. शेषगिरिराव यांनी मिळून बऱ्याच श्रमाने प्राचीन तामिळ वाङमयाचे अवगाहन करून Studies in South Indian Jainisn ('दक्षिणेतील जैन धर्माचे अध्ययन') ह्या नावाचा एक विस्तृत शोधग्रंथ अलीकडे प्रसिध्द केला आहे.  आयंगार हे वैष्णव व राव हे तेलगू ब्राह्मण असून ते केवळ संशोधक असल्यामुळे पक्षपाताचा आरोप त्यांच्यावर येण्याचा संभव नाही.  त्यांनी, दक्षिणेत शैव आणि वैष्णव ब्राह्मणांनी बौध्दांचा आणि विशेषतः जैनांचा किती अनन्वित छळ केला हे अगदी निर्भीडपणे ठिकठिकाणी वर्णिले आहे.  मदुरेच्या कण्हपांडय राजाला तिरुज्ञानसंबंदर या शैव संन्याशाचे आणि कांचीच्या महेंद्रवर्मा नावाच्या पल्लव राजाला तिरुना बुक्करसर ऊर्फ आप्पार नावाच्या शैव आचार्याने जैन धर्मातून शैव धर्मात घेतल्याने जैन धर्माच्या उलट जो इ.स. ७५० सालच्या सुमारास भयंकर वणवा पेटला त्यांत ८००० दिगंबर जैन साधूंना सुळावर चढवून ठार करण्यात आले, ही गोष्ट दंतकथा नसून ऐतिहासिक आहे अशी येथे पुष्टी देण्यात आली आहे.  कर्नल ऑल्कॉटच्या 'हालस्य महात्म्या'तील वरील उताऱ्याला याप्रमाणे दुजोरा मिळत आहे.  वरील दोन प्रोफेसरांनी पारियांच्या बाबीत काहीच उल्लेख केला नाही हे खरे आहे.  या बाबतीत संशोधकांनी आणखी पुष्कळ श्रम केल्यास अधिक पुरावा मिळण्याची निराशा बाळगण्याचे कारण नाही.

इ.स. १९०८ साली मी जेव्हा मद्रास येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची एक शाखा स्थापण्यासाठी गेलो, तेव्हा तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजातील तेव्हाचे भौतिकशास्त्राचे प्रोफेसर लक्ष्मीनरसू यांची गाठ घेतली.  त्यांनी त्या पारिया लोकांत बौध्द धर्माचा प्रसार करण्याची त्या वेळी चळवळ चालविली होती.  हे थिऑसॉफिस्ट नाहीत.  पूर्वाश्रमीचे हिंदू नायडू असून ते आता सहकुटुंब बौध्द झाले आहेत.  त्यांनी आता पारियांचा एक बौध्द संघ स्थापिला असून ते स्वतः त्या संघाचे अध्यक्ष आहेत.  तामिळ आणि मल्याळ देशांत, विशेषतः पश्चिम व पूर्व किनाऱ्यावरील 'अस्पृश्य' वर्गाची स्थिती मी स्वतः बारकाईने जसजशी अधिक निरखून पाहू लागलो तसतसे ऑल्कॉटच्या म्हणण्याप्रमाणे हे लोक फार पूर्वी ह्या प्रांतातील राज्यकर्ते असावेत व मध्ययुगात त्यांचा धर्म बौध्द अगर जैन असावा असे अंधुक पुरावे दिसू लागले.  मलबारात मलयगिरीवर पुलया (पुल्कस) नावाच्या अस्पृश्यवर्गीयांचे काही जुने किल्ले आढळले.  त्यांच्या देवांना 'चाटन' म्हणजे 'शास्ता' ह्या बौध्द नावाचा प्रचार काही ठिकाणी आढळला.  'चाटन' हा शब्द शास्ता ह्या संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट रूप आहे.  शास्ता = चाट; 'न' असा आदेश द्राविड भाषेत प्रत्येक नावापुढे येतो.  उदाहरणार्थ, राम = रामन.  शास्ता हे बुध्दाचे एक नाव अमरकोशात आढळते.  असो 'चिरुमा' आणि विशेषतः 'यझवा' अथवा 'तिय्या' या अस्पृश्य जाती संस्कृतचे पूर्वापार उत्तम अध्ययन करीत असलेल्या आढळल्या.  तिय्या जातीमध्ये नारायणस्वामी नावाच्या एका संन्याशाने आत्मोध्दाराची नवीन धार्मिक चळवळ मोठया जोरात चालविलेली पाहिली.  या आत्मोध्दाराच्या चळवळीचे मुख्य लक्षण म्हणजे हजारो रुपयांचे फंड जमवून ह्या तिय्या जातीच्या लोकांसाठी ठिकठिकाणी सुंदर व प्रशस्त देवळे बांधणे व त्यातून संस्कृत उत्तम शिकलेले त्याच जातीचे तरुण देवपूजक तयार करणे व त्यांच्या वृत्तीची योजना करणे, हे होय.  ह्या तपस्वी स्वामींची मी पुनःपुन्हा भेट घेऊन त्यांच्या चळवळीचे आध्यात्मिक स्वरूपही निरखून पाहिले.  या अस्पृश्य जातीमध्ये शेकडो सुशिक्षित इंग्रजी पदवीधर सरकारी नोकरीत हायकोर्ट जज्जाच्या पायरीपर्यंत चढलेले, व्यापारात मोठमोठया पेढया स्थापन केलेले, वकील, डॉक्टर इत्यादी नवीन धंदे यशस्वी रीतीने चालविलेले, नव्या कौन्सिलचे सभासद आणि लोकधुरीण असे झालेले असून त्यांची संख्या उत्तरोत्तर वाढतच आहे.  तथापि त्यांनाही हिंदू देवळांच्या वाटेवर चालण्याची मुभा नाही.  हा विपरीत प्रकार पाहून ऑल्कॉटच्या वरील म्हणण्याचा पुरावा मिळविण्याची निराशा मला तरी वाटत नाही.

ढोबळमानाने तूर्त इतकेच म्हणता येईल की, ब्राह्मणी संस्कृतीची वर्णव्यवस्था, बौध्द आणि जैन धर्माची अमदानी जोरात होती तेव्हा शिथिल झाली असली तरी नष्ट झाली नव्हती.  ह्या क्रांतीच्या काळी ब्राह्मणी संस्कृतीच्या हिंदूंनी जेथे जेथे आपल्या वसाहती केल्या, तेथे तेथे त्यांच्या ग्रामसंस्थेमुळे मूळच्या तद्देशीयांचे अधिराज्यच नव्हे तर वैयक्तिक मालकी हक्कही नष्ट होऊन, ते केवळ बलुतेदार बनून ग्रामबाह्य व अस्पृश्य ठरले.  महाराष्ट्रात बलुतेदारी तरी त्यांना मिळाली; पण दक्षिण देशात तामीळ-मलबारकडे ते केवळ गुलामगिरीत गडप झाले.  अशा वसाहती पुष्कळशा बौध्द धर्माच्या अमदानीतच आणि काही तत्पूर्वीही झाल्या असाव्यात.  शेवटी जेव्हा दक्षिणेकडील व पूर्वेकडील प्रांतांत ह्या पाखंडी म्हणून समजल्या जाणाऱ्या धर्माचा उच्छेद झाला तेव्हा त्यातील वरच्या दर्जाच्या लोकांचा गरजेपुरता आणि परिस्थितीप्रमाणे, नवीन हिंदुधर्मात समावेश होऊ शकला.  परंतु खालच्या तेजोहीन, मांसाहारी, हीनकर्मी व केवळ अकुशल श्रमजीवी बहुजनसमाजाची भर ठोकळमानाने 'अस्पृश्य' आणि ग्रामबाह्य वर्गात होणे अगदी साहजिक आहे.  मागे पान ३८ वर 'पाषंडचंडालानाम् स्मशानांते वासः ।' असा जो कौटिलीय अर्थशास्त्राचा उतारा दिला आहे; त्यातील पाषंड याचा अर्थ मगध देशात जरी बौध्द-जैन असा होणे कठीण असले, तरी खाली दक्षिण देशात बौध्द-जैनांच्या नायनाटानंतर पाषंड म्हणजे बौध्द-जैनच असा होणे साहजिक आहे.  मनुस्मृतीने ब्राह्मणप्रधान वर्णव्यवस्थेचा करडा अंमल चालविल्यावर तेजोहीन खालच्या वर्गाची, विशेषतः पाषंडी मतांची, अशीच अवनती होणे सहजच आहे.  मनुस्मृतीत खालील स्पष्ट आज्ञा राज्यकर्त्यांना फर्माविल्या आहेत :

यो लोभादधमो जात्या जीवेदुत्कृष्टकर्मभिः ।
तं राजा निर्धनं कृत्वा क्षिप्रमेव प्रवासयेत् ॥
मनुस्मृति, १०.९६

अर्थ  :  अधम जातीचा जो कोणी उत्कर्षाच्या लोभाने वरिष्ठ जातीची वृत्ती चालवील, त्याचे राजाने सर्वस्व हरण करून ताबडतोब त्याला देशोधडीला लावावे.  कारण -

शत्तेफ्नापि हि शूद्रेण न कार्यो धनसंचयः ।
शूद्रो हि धनमासाद्य ब्राह्मणानेव बाधते ॥
मनुस्मृति, १०.१२९

अर्थ  :  शूद्राला धनसंचय करण्याला परवानगी असू नये.  तो ब्राह्मणास बाधक होईल.

ह्याच भीतीने ह्या निराधार पाखंडयांना महाराष्ट्रातल्याप्रमाणे बलुतेदारही न बनविता केवळ पिढीजाद पशुतुल्य गुलामगिरीची सनद दक्षिण देशात - विशेषतः मलबारात -दिलेली आज आढळते.  हे प्राणी एके काळी स्वतःच्याच असलेल्या शेतात नंबुद्री ब्राह्मण आणि त्यांचे हस्तक नायर क्षत्रिय ह्यांच्या तैनातीत बंदे गुलाम बनले आहेत.  हे मनुस्मृतीचे जुलमी राजकारण !

वरील एकंदर विवेचनावरून द्राविड आणि मलबार देशांतील हल्लीच्या प्रचंड संख्येच्या अस्पृश्यांच्या विकासांचे तीन टप्पे होतात असे मला वाटते.  १) पान २९-३० वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे द्राविड देशांत अस्पृश्यतेची संस्था आर्यांच्या आगमनापूर्वीही असावी.  पण ही कशी व किती उग्र स्वरूपाची होती ह्याचा पुरावा आता उपलब्ध नाही.  २) उत्तरेकडे बौध्द जैनांचा विजय होऊन आर्यांच्या वर्णव्यवस्थेला जो अडथळा झाला त्या वेळी, किंबहुना कदाचित त्या पूर्वीही, दक्षिणेकडे आर्यांच्या ज्या थोडया नंबुद्री ब्राह्मणांच्यासारख्या वसाहती झाल्या, त्यांच्या ग्रामसंस्थेमुळे अस्पृश्यतेचा दुसरा मजला तयार झाला.  ३) नुकतेच वर वर्णिल्याप्रमाणे हट्टी पाखंडयांची मोठया प्रमाणात अस्पृश्यांत गणना करून हल्लीचा प्रचंड तिसरा मजला तयार झाला.

ह्या शेवटच्या टप्प्यासंबंधी दक्षिण हिंदुस्थानात जरी भरपूर पुरावा अद्यापि गोळा करण्यात आला नाही; तरी तो उत्तर आणि पूर्व हिंदुस्थानातील संशोधकांना सुदैवाने निश्चित उपलब्ध झाला आहे.  तो कसा ते पुढील परिच्छेदात पाहू.

वरवर पाहता अखिल भारतखंडात हिंदूंची वर्णव्यवस्था रूढ झालेली जरी दिसत असली तरी तिचा तपशील आणि जोर निरनिराळया प्रांतांत अगदी निराळा आहे.  ह्या भिन्नतेचे कारण ब्राह्मणी आणि बौध्द संस्कृतीची भिन्नभिन्न काळी भिन्नभिन्न कारणांनी झालेली झटापट हे होय.  पंजाब आणि वायव्येकडील प्रांतांत जी व्यवस्था आहे; ती बिहार, बंगाल, ओरिसाकडे आढळत नाही आणि खाली द्राविड देशात अगदीच निराळी आहे.  बिहार, बंगाल देशांत बौध्द धर्माचा उदय आणि अंमल जारी असल्याने आणि हिंदुस्थानात याच भागात बौध्द धर्म उदय पावून तो येथेच सर्वात अधिक काळ टिकल्याने येथील जातिभेदाची रचना इतर प्रांतांहून अगदी निराळी दिसते.  येथे ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन उच्च वर्णांची जी तुरळक वस्ती आहे ती बाहेरूनच आलेली आहे.  वैद्य, कायस्थ हा जो मोठा मध्यमवर्ग आहे, तो क्षत्रिय आणि वैश्य यांचे मिश्रण आहे; आणि बाकी उरलेला जो मोठा बहुजनसमाज तो निर्भेळ आर्येतर आणि एके काळी पूर्ण बुध्दानुयायी होता.  बाराव्या शतकात मुसलमानांची अकस्मात धाड येऊन जी राज्यक्रांती झाली तिचा धक्का जीर्ण झालेल्या बौध्द धर्माला लागून, तो नष्ट झाला.  मुसलमानी हल्ल्याची ही लाट ओसरून गेल्यावर बौध्दांच्या ठिकाणी ब्राह्मणांनी तत्कालीन क्षत्रिय राजांच्या साह्याने समाजाची हल्ली रूढ असेलेली पुनर्घटना कोली.  ह्या घडामोडीत बल्लाळसेन हा राजा प्रमुख होता.  त्याने नवीनच स्मृती बनवून केवळ ब्राह्मणांच्या दृष्टीने आचरणीय, अनाचरणी, अस्पृश्य आणि ग्रामबाह्य वगैरे जनसमूहांचे नवीन वर्ग बनविले.  अर्थात ह्या उलाढालीत एका मोठया नवीनच अस्पृश्यवर्गाची समाजात भर पडली.  ही गोष्ट आधुनिक संशोधनामुळे कशी सिध्द होत आहे, ते पाहू.

संशोधनाच्या कामी बंगाली पंडितांनी अलीकडे बरीच आघाडी मारली आहे.  हिंदुस्थानातून बौध्द धर्म अजीबात नष्ट झाला आहे, अशी अजून पुष्कळांची समजूत आहे.  पण खरा प्रकार तसा नसून बंगाल्यातील काही भागांतून आणि विशेषतः ओरिसातील काही कानाकोपऱ्यात हा धर्म काही अप्रसिध्द आणि मागासलेल्या जातींत अद्यापि प्रचलित आहे; व त्यांची गणना चुकून हिंदू धर्मातच होते, असा शोध प्रसिध्द संशोधक महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री ह्यांनी केला आहे.  ओरिसात मयूरभंज म्हणून एक लहानसे संस्थान आहे.  तेथील महाराजांच्या साह्याने बाबू नगेंद्रनाथ बसू, बंगाली विश्वकोशाचे संपादक, ह्यांनी १९०८ साली त्या संस्थानच्या जंगलात प्रवास केला, तेव्हा त्यांना जे शोध लागले ते त्यांनी इ.स. १९११ साली Modern Buddhism and its Followers in Orissa ('आधुनिक बौध्द धर्म आणि त्याचे ओरिसातील अनुयायी') ह्या नावाच्या पुस्तकाच्या रूपाने प्रसिध्द केले आहेत.  त्या पुस्तकाला सदर हरप्रसाद शास्त्री यांनी आपली विस्तृत आणि अधिकारयुक्त प्रस्तावना जोडिली आहे.  पान २४ वर शास्त्रीमहाशय लिहितात :  ''इ.स.च्या १२ वे शतकाचे शेवटी मुसलमानांची टोळधाड हिंदुस्थानावर पडली.  त्यांनी प्रमुख बौध्द मठांचा आणि विश्वविद्यालयांचा नाश करून त्या ठिकाणी आपल्या लष्कराचे ठाणे केले.  हजारो साधूंचा शिरच्छेद करून त्यांची संपत्ती लुटली, पुस्तकालये जाळली,.... ब्राह्मणांनी ह्या संधीचा फायदा घेऊन बौध्द हिंदुस्थानातून समूळ नाहीसा झाला असे भासविण्यास सुरुवात केली.  सुशिक्षित आणि बुध्दिवान बौध्द मारले गेले, अथवा दूरदेशी पळून गेले.  मागे त्यांचा प्रांत ब्राह्मणांच्या कारवाईला मोकळा झाला.  पुष्कळ बौध्दांना जबरीने किंवा फुसलावून मुसलमानी धर्मात कोंबण्यात आले.  अशिक्षित, बौध्द बहुजनसमाज कोकरांच्या कळपाप्रमाणे निराश्रित झाला.  त्याला मुसलमानी किंवा हिंदू धर्माचा नाइलाजाने आश्रय घ्यावा लागला.  अशा निराश्रितांपैकी जे पूर्णपणे आपल्या कह्यात येण्यास कबूल होते, त्यांनाच दुराग्रही ब्राह्मणांनी हिंदू धर्मात घेतले.  अशांना 'नवशाखा शूद्र' अशी बंगाली समाजात संज्ञा आहे.  ह्याशिवाय इतर बौध्दांचा जो मोठा भाग स्वतंत्रपणे राहू लागला, तो बहिष्कृत होऊन अनाचरणीय ऊर्फ अस्पृश्य ठरला.''

ह्या अनाचरणीय जाती हल्ली जरी अस्पृश्य हिंदू समजण्यास येत आहेत, तरी त्या पूर्वी चांगल्या सन्माननीय बौध्द होत्या.  त्यांपैकी हल्ली सर्वच अस्पृश्य नाहीत.  नुसत्या अनाचरणीय म्हणजे त्यांचे पाणी ब्राह्मणांस चालत नाही अशा होत.  वणिक सोनाराची जात अतिशय श्रीमंत व वजनदार असूनही ती अशीच अनाचरणीय आहे.  त्यांची गणना नवशाखा शूद्रांपेक्षाही अधिक खालची गणली जात आहे.  ते पूर्वी चांगले बौध्द होते.  पण त्यांच्यावर ह्या धांदलीच्या काळात बल्लाळसेन ह्या हिंदू राजाचा काही झनानी कारस्थानामुळे राग होऊन ते असे खाली दडपले गेले.  मग इतर सामान्य स्वातंत्र्येच्छू जाती अगदी हीन व अस्पृश्य बनल्या ह्यात काय नवल !  मुसलमानांची पहिली धडाडी संपून त्यांचा जम बसल्यावर आणि बौध्द धर्म दडपून गेल्यावर बंगाल्यात हिंदू धर्माची नवी घडी पुनः बसू लागली.  ह्यासंबंधी ह्या शास्त्रीपंडिताचे असे मत आहे की, लोकांना आपल्या पूर्वापार खऱ्या संबंधांचा विसर पडला; आणि ब्रह्मण सांगतील त्याप्रमाणे हल्लीचे जातिभेद संकरजन्य अगर बहिष्कारजन्य आहेत असा समज दृढ झाला.  ह्या नवीन रचनेच्या शिरोभागी ब्राह्मण विराजमान झाले.  इतकेच नव्हे, तर उलटपक्षी कित्येक कुशल कारागीर जाती आणि संपन्न व्यापारीवर्गदेखील जे पूर्वी सन्मान्य बौध्द होते, ते या मनूत हीनत्वाप्रत पोहचले.  ज्यांच्या पूर्वजांनी काही शतकांपूर्वी बौध्द धर्माची तत्त्वे तिबेट आणि चीन देशात पसरविली, ज्यांनी जलप्रवास करून हिंदुस्थानचा उद्योग आणि व्यापार वाढविला अशी 'मनसार भाषान' इत्यादी आद्य बंगाली ग्रंथांतून भडक वर्णने आहेत, तेच आज केवळ ब्राह्मणांच्या कटाक्षामुळे अनाचरणीय व तिरस्करणीय बनले आहेत !  (Modern Buddhism प्रस्तावना पान २३ पहा.)

पण अशा विपन्नावस्थेमध्येही बौध्द धर्म अगदीच नष्ट झाला नसून तो गुप्तरूपाने हीनदीन समाजाच्या वहिवाटीत अद्यापि असला पाहिजे, अशी बळकट शंका आल्यावरून तो शोधून काढण्याचे काम गेल्या शतकाचे शेवटी व चालू शतकाचे आरंभी धाडसी आणि सहानुभूतिसंपन्न शोधकांनी चालविले होते.  अशांपैकी एक संशोधक बाबू नगेंद्रनाथ बसू हे ओरिसा प्रांतातील मयूरभंज संस्थानचे मालक महाराज श्री रामचंद्र भंजदेव ह्यांच्याबरोबर त्या संस्थानातील जंगलात फिरत होते.  ते खिचिंग नावाच्या खेडयाजवळ पोहचले असता त्यांना 'पान' नावाच्या अस्पृश्य जातीच्या काही तरुण पोरांनी मनोहर गाणी गाऊन दाखविली.  'धर्मगीता' नावाच्या जुन्या ग्रंथाशी त्यांचा संदर्भ जुळल्याने नगेंद्रबाबूंना साश्चर्य आनंद झाला.  त्यानंतर त्यांना काही वृध्द माणसे भेटली.  त्यांनी जुन्या बुध्दानुयायी पाल राजांची गाणी गाऊन दाखविली.  अशा रीतीने ह्या ओसाड जंगलात विस्मृतिगर्तेत दडपून गेलेल्या बौध्द धर्माचा आकस्मिक सुगावा लागल्यामुळे या बाबूंनी आपला शोध पुढे नेटाने चालविला.  बडसाई आणि खिचिंग गावांजवळ त्यांना ओरिया भाषेतील काही हस्तलिखित पोथ्या, एक जुना बौध्द स्तूप, धर्मराज आणि शीतला ह्या महायान बौध्द पंथाच्या मूर्ती व इतर खाणाखुणांचा शोध लागला.  पण सर्वात आश्चर्याची गोष्टी ही की ह्या सर्व गत वस्तू आजवर भक्तीने सांभाळून ठेवल्याचे सर्व श्रेय, नगेंद्रबाबू बाथुरी अथवा बाउरी या हीन व अस्पृश्य मानिलेल्या जातीलाच देत आहेत !

सोळाव्या शतकातील ओरिसाचा राजा प्रतापरुद्र ह्याच्या कारकिर्दीत बलरामदास नावाचा कवी होऊन गेला.  हा प्रतापरुद्राच्या छळाला भिऊन आपला बौध्द धर्म छपवून ठेवून हिंदुधर्मात मिळूनमिसळून राहत होता.  त्याने आपल्या 'गणेश विभूति' नावाच्या आरिया भाषेतील काव्यावर आपणच 'सिध्दांताडंबर' नावाची टीका केली आहे. त्यात त्याने बाथुरी जातीची पूर्वपीठिका अशी सांगितली आहे.  खालील उताऱ्यावरून आपल्यास जाता जाता आरिया भाषेशी मराठीचे किती साम्य आहे हेही दिसेल.

निराकार दक्षिणरु विप्र होए जात ॥
उत्तर अङ्गरु जान गोपाल सम्भूत ॥१७॥
वदन अंतरे विश्वामित्र मुनि कहि ॥
ताहांकु अङ्गरे वाउरि जात होई ॥१८॥
तार तहु तेर सुत हइल जनम ॥
ताहार पत्नीर नाम पद्मालया जान ॥२५॥
कनिष्ट पत्नीरे चित्र उर्वशी तार नाम ॥
गंधकेशी वलीण तार दुतिय भार्य्या जान ॥२६॥
वायुरेखा वलिण से चतुर्थक काहि ॥
वार सुत जन्म हेले चारि पत्नी तेहि ॥२७॥

भावार्थ  : निराकाराच्या (शून्य ब्रह्माच्या) उजव्या कुशीतून विप्र जन्मले, डावीतून गोपाल, तोंडातून विश्वामित्र, त्याच्यापासून बाउरी जात उद्भवली.  पद्मालया, ऊर्वशी, गंधकेशी आणि वायुलेखा अशा चार पत्नींपासून विश्वामित्राला १२ पुत्र झाले.

भाष्य  :  एवे वाउरि वार पुत्र नामक हिवा ।  पद्मालयापुत्र दुलि वाउरि अटन्ति ब्राह्मणसङगे वेद पढु यान्ति ।  ब्राह्मण ज्येष्ठ वाउरि कनिष्ठ ।  ए पढुथिले राजा प्रतापरुद्रङग ठारु गोप्य करि रखि अच्छन्ति ।...

पद्मालयापुत्र वायोकांडी परमानन्द भोइ राधी शासमल ।
Modern Buddhism पान १५-१६

ॠग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणात विश्वामित्राचे पुत्र शंबर असे म्हटले आहे.  त्याच्याशी वरील माहितीचा संदर्भ नगेंद्रबाबूंनी जुळविला आहे.  पण ह्याशिवाय या बलरामदासाच्या मताला दुसऱ्या कुठल्याही हिंदू अथवा बौध्द पुराणांचा आधार नाही असे नगेंद्रबाबू कबूल करतात.

पुढे आणखी 'गणेशविभूती'त म्हटले आहे की,

पद्मालया तिन पुत्र जेष्ठ से प्रमाण ।
विष्णुङ्ग सङ्गते से ऱ्हुयुत्नि सम्भाषणं ॥
सङ्खासुर मारि प्रभु सङ्ख ताङ्कु दिले ।
पंचजन सङ्ख तुम्म सम्माल वोइले ॥
आउ नव भाइ अश क्कुइ न जुगाइ ।
विचारि जानिलेटी संशय केला सेहि ॥१२॥ (पान १७)

अर्थ  :  पद्मालयाच्या पाच पुत्रांना विष्णूने आपला शंख दिला, पण इतर तीन बायकांच्या मुलांना मात्र विष्णूने आपणांस स्पर्शही करू दिला नाही.

ह्या वाक्यातील सङ्ख ह्या शब्दाचा अर्थ नगेंद्रबाबू बौध्द संघ असा करतात व शून्य पुराणात सङ्ख हे पद संघ ह्या अर्थाने योजिलेले आढळते, असा दाखला देतात.  अशिक्षितांमध्ये संधाचा अपभ्रंश संख होणे साहजिक आहे.  वरील वाक्याचा लाक्षणिक अर्थ असा होईल की, बाउरी जातीच्या प्रमुख ग्रामणीने आपल्या शत्रूंचा संहार करून संघाचे आधिपत्य मिळविले.  म्हणजे बाउरी जातीचाच बौध्द धर्मात शिरकाव होऊन ते मान्यतेला पावले.  बाकीच्या शबर जाती बौध्द धर्माचा स्वीकार न करता तशाच जंगली स्थितीत राहिल्या.  (Modern Buddhism  पान २०)

'गणेशविभूती'त गणेशाला पुढे बाउरी जातीसंबंधी हेही गुह्य सांगण्यात आले आहे :

कलियुगे न छुइव ।  वाउरी छुइले सकल पातक क्षय हव ।
वोलि विष्णुमाया करि गोप्य कोरि रखि अच्छन्ति ।
शुन हे गणेश वड गहनए गुप्त करि थुइवु ।
एथि सकाशरु वाउरिगार काटिले ब्राह्मण निभाइ पारन्ति नहि ।
मूर्ध्ना पातक क्षय हव वोलि शाप्यकु मानियान्ति ॥  (अध्याय १२)

अर्थ  :  कलियुगात बाउरींना शिवू नये; शिवल्यास सकळ पापांचा क्षय होतो, म्हणून जो तो त्यांना शिवेल यासाठी त्यांना अस्पृश्य ठेवण्यात विष्णूची माया आहे.

वर सिध्दांताडंबरामध्ये सांगितल्याप्रमाणे हल्लीच्या बाथुरी ऊर्फ बाउरी ह्या अस्पृश्य जातीचा ब्राह्मणांशी काही संबंध आहे काय ह्या प्रश्नाला नगेंद्रबाबू खालील उत्तर देत आहेत :  ''मयूरभंज संस्थानात शोधाअंती आम्हाला जी अनेक प्रकारची सामग्री मिळाली आहे तीवरून हल्लीची बाथुरी ही जात खरोखरी आर्यवंशीय असावी असे आम्हास वाटते.  ह्या प्रांतात ही सामग्री भरपूर आहे.  मयूरभंज संस्थानातील सिंहलीपाल दुर्गावरील सुंदर इमारतीचे अवशेष, प्राचीन 'आठरा देऊळ' नावाचे दगडी मंदिर, जोशीपूर किंवा दासपूर नावाचा चिरेबंदी किल्ला वगैरे पुराव्यांवरून बाथुरी हे आर्य आहेत, इतकेच नव्हे तर ह्या प्रांती हे लोक पूर्वी पराक्रमी राज्यकर्ते, मंत्री व सेनानी होते, अशी जी थोडयाच दिवसांमागे समजूत होती ती साधार आहे, असे दिसते.  अद्यापि हे लोक ब्राह्मणांप्रमाणे जानवी घालतात, दहा दिवसांचे सुतक पाळतात, श्राध्द करितात, आणि ह्यांच्या श्राध्दांचे जेवण ब्राह्मण आणि वैश्यही जेवतात.  ह्या जातीच्या प्रमुखाला आजही 'महापात्र' हा किताब आहे.  खरा बाउरी ब्राह्मणाच्याही हातचे खात नाही; त्याच्या जातमध्ये त्याला फारच मान आहे.  ह्याच्या पूर्वजांनीच हल्लीच्या भंजराजाला राज्यस्थापनेमध्ये मदत केली.  पूर्वी ह्या राजाचे २२ सामंत होते.  त्यांत सिंहलीपाल, आदिपूर, दासपूर आणि करुंजा येथील अनुक्रमे चार जमीनदार बाउरी जातीचे होते.  ह्यांना भंजांकडून रुप्याच्या छत्रचामराचा मान होता.  पण आता ह्या सर्व गत गोष्टी झाल्या.  हे सर्व कर्जबाजारी होऊन खायची भ्रांत, अशी कठीण स्थिती झाली आहे.  भोवतालच्या कोळी, सांताळ लोकांत मिसळून त्यांच्यात चालीरीती आचरू लागले आहेत.'' (Modern Buddhism पान ३२)

जी अवस्था बाउरींची पश्चिम बंगाल व ओरिसामध्ये तीच पोडांची (पौंड्र ?) मध्य बंगाल्यात आणि नामशूद्रांची (चांडाल) पूर्व बंगाल्यात आहे.  इ.स. १९०१ च्या खानेसुमारीत ह्या दोन जातींसंबंधाने पुढील उल्लेख आहे  :  ''नामशूद्र १८,६१,००० आणि पोड ५,००,००० आहेत.  पण ह्यांच्यापैकी फार मोठी संख्या मुसलमान झाल्याने ह्यांचा खरा विस्तार दृष्टीआड झाला आहे.  पूर्व बंगाल्यांत १,०५,००,००० मुसलमान आहेत.  पैकी निदान ९,००,००० ह्याच जातीतून गेले असावेत.  दंतकथेवरून ह्यांचा संबंध प्राचनी पौड्रवर्धन राजाशी पोहोचतो.  ह्याची राजधानी खारातोय नदीवर होती.  ह्यांनी आपल्या पूर्वीच्या बौध्द धर्माची अद्यापि आठवण राखिली आहे.  धर्मराज व धर्मठाकूर ह्या रूपाने ते अद्यापि बुध्दाचीच पूजा करितात.  ह्यांचा वंश बहुशः मोंगली (मांगोलियन) आहे.  हे प्रथम ब्रह्मपुत्रा नदीच्या दरीतून ईशान्येकडून उत्तर बंगाल्यात शिरले असावेत.  तेथेच त्यांचे राज्य असावे.  तेथून मग कोच, राजवंशी इत्यादी लोकांनी त्यांना हुसकून लावल्यामुळे ते खाली समुद्रकिनाऱ्यापर्यंत आले असावेत.  गेल्या १० वर्षांत नामशूद्र शेकडा १० व पोड शेकडा ११ ह्या प्रमाणात वाढले आहेत.''

सन १९२३ आणि सन १९२८ ह्या दोन साली मी ब्राह्मसमाजाच्या प्रचारकार्यासाठी पूर्व बंगाल्यातील जेसोर जिल्ह्यात फिरतीवर होतो.  दोन्ही वेळा सुमारे महिनाभर ह्या नामशूद्रांच्या खेडयांत त्यांच्याशी अगदी मिळूनमिसळून राहिलो.  ह्या लोकांत आमच्या 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन'च्या शाळा व हायस्कुले-त्यांनी स्वतः चालविलेल्या-बऱ्या चालल्या आहेत.  ह्यांच्या धार्मिक उपासना व सामाजिक चालीरीती, ह्यांची नावे व गृह्यसंस्कार वगैरेंचे बारीक निरीक्षण केल्यावरून, ही मोठी जात पूर्वी बौध्द धर्मानुयायी असून ह्यांनी राजवैभव एके काळी चांगले भोगले असावे अशी माझी खात्री झाली.  हे हल्ली शेतीचा धंदा यशस्वी रीतीने करितात.  विशेषतः ताडीच्या झाडांपासून गूळ करण्याचे कारखाने घरोघरी दिसले.

असो.  येथवर या उत्तरयुगातील टप्प्यांची लक्षणे सांगितली.  ह्या युगात अस्पृश्य समाजात जी भली मोठी भर पडली ती प्राचीन युगातल्या वर्णव्यवस्थेमुळे किंवा मध्ययुगातल्या ग्रामसंस्थेमुळे नसून भलत्याच अवांतर कारणांनी म्हणजे हिंदूंच्या दुष्ट राजनीतीमुळे व आत्मघातकी कोतेपणामुळे किंवा वृत्तिमात्सर्यामुळे पडली आहे.  दक्षिण हिंदुस्थानात बौध्द धर्माचा नायनाट इ.स. ८००-९०० या शतकात झाला तसा तो उत्तर हिंदुस्थानात १२००-१५०० च्या दरम्यान झाला.  दक्षिणेत हा अत्याचार शैव आणि वैष्णव पंथांनी केला पण उत्तरेस त्या विध्वंसाचे अपश्रेय जे एकटया मुसलमानांच्याच कपाळावर काही बंगाली पंडित व संशोधक चिकटवू पाहतात, त्याची मात्र खात्री पटत नाही.  मुसलमानांचे आगमन केवळ निमित्तमात्र होते.  दक्षिणेकडे हे निमित्तही कोठे दिसत नाही.  त्या अर्थी उत्तरेकडेही ह्या निमित्तावर इतिहाससंशोधकांनी फारसा भर ठेवून चालायचे नाही.  मुसलमानंनी फार तर पुष्कळशा बौध्दांची कत्तल केली असेल व पुष्कळांना जबरीने बाटविले असेल.  पण बाकी उरलेल्यांना अस्पृश्य करा आणि गावाबाहेर ठेवा, असा काही हिंदू वरिष्ठ वर्गांना त्यांचा आग्रह असणे शक्य नाही.  ह्या बाबतीत महामहोपाध्याय हरप्रसार शास्त्री यांचे स्पष्टोद्गार फारच मार्मिक आणि निर्भीड आहेत.  ते म्हणतात की, मुसलमान आले तेव्हा पूर्व आणि उत्तर हिंदुस्थानातील बौध्द धर्मीय जातीच समाजाचा वरिष्ठ आणि वजनदार असा वरचा भाग होत्या.  म्हणून त्याच मुसलमानांच्या डोळयावर आल्या.  त्यांची अशी वाताहत झाल्याबरोबर दुराग्रही ब्राह्मणांनी, तत्कालीन शिल्लक उरलेल्या हिंदू राजवटीतून आपले वर्चस्व वाढविण्याकरिता मुसलमानांच्या छळांतून जिवंत उरलेल्या बौध्द बहुजनसमाजाला बहिष्कृत करून कायमचे दडपून टाकले.  सन १९२१ ऑक्टोबरच्या Dacca Review ('डाक्का रिव्ह्य') नावाच्या मासिकाच्या अंकात हरप्रसाद शास्त्री पुनः लिहितात की, ''ज्यांना हल्ली डिप्रेस्ड क्लासेस असे लेखण्यात येते, त्या जाती एकेकाळी बंगाल्यात राज्य करीत असलेल्या - नव्हे साम्राज्य भोगीत असलेल्या - बौध्द जातींचेच अवशेष आहेत...  नेपाळातल्या दाखल्यावरून असे दिसते की, बंगाल्यातील आजचे तिरस्कृत वर्ग काही शतकांपूर्वी बौध्द धर्मी असून तेव्हा ते हिंदुधर्मीयांशी जोराची स्पर्धा करीत असावेत.  मुसलमानी स्वारीचा धक्का ह्यांनाच अधिक जाणवला, ह्याचे कारण बौध्द हे राज्यकर्ते होते आणि ब्राह्मण वाचे ह्याचे कारण त्यांना त्या वेळी कसल्याही प्रकारचे महत्त्व नव्हते.''  शास्त्री महाशय स्वतः ब्राह्मण असूनही ते जोरजोराने आज गेली ३० वर्षे हा आपला सिध्दांत प्रतिपादन करीत आहेत.  नेपाळातील त्यांचा दाखला विशेष रीतीने लागू पडतो, तो असा की, ''तेथील बौध्दधर्मीयांचे राज्य गुरखे नावाच्या हिंदू क्षत्रियांनी बळकाविल्यावर तेथील ब्राह्मण आणि क्षत्रिय वृत्तीचे लोक तेवढे सारे हिंदू बनून बाकी उरलेल्या व्यापारी, कारागीर आणि श्रमोपजीवी जाती एकजात जशाच्या तशाच बौध्दधर्मीय उरल्या आहेत.  त्याचप्रमाणे बंगाल्यात नेपाळच्याहीवर मजल गेली आहे.  म्हणजे वरिष्ठ वर्ग मुसलमान अथवा हिंदू बनून उरलेल्या वैश्य, शूद्र जाती अनाचरणीय, बहिष्कृत आणि तिस्करणीय झाल्या आहेत.  ते खरोखरीच हीन नसून केवळ ब्राह्मणांच्या दृष्टीने अंत्यज आहेत.''  शास्त्री महाशयांचा हा सिध्दांत खरा असून ध्यानात घेण्याजोगा आहे.  बंगाल्यात जो अत्याचार ब्राह्मणांना मुसलमानांच्या वावटळीत करता आला, तो अत्याचार द्राविड देशात जैन राजांना बाटवून तेथील शैवाचार्यांनी केला, ह्या कर्नल ऑल्कॉट यांच्या म्हणण्याला विजयनगर कॉलेजमधील दोन ब्राह्मण अध्यापकांकडून अर्ध्याअधिक पुराव्याचे पाठबळ मिळत आहे.  पूर्वीच्या दोन युगांतील प्रकार घडला असेल तसा असो.  पण बुध्दोत्तरकालीन ह्या तिसऱ्या युगात मात्र केवळ दडपशाहीनेच अस्पृश्यतेच्या पेवात आजकालची भली भयंकर भर पडली, हे उघड दिसते.

आधुनिक युग डोळयांसमोरच आहे.  आता ह्या डोळस युगात मागील पापांचे नुसते संशोधनच नव्हे तर निश्चित गणनाही दर दहा वर्षाला सार्वजनिक खर्चाने चालू आहे.  ह्या शिरगणतीच्या रिपोर्टावरून ह्या भरतखंडाचा निव्वळ सहावा हिस्सा अस्पृश्य ठरला हे जगजाहीर झाले आहे.  हा सहावा हिस्सा एकदम आणि पूर्वीपासून स्वयंसिध्द नसून तो कोणत्या टप्प्यांनी बनत आला आहे, हे उपलब्ध प्रमाणांनी संक्षेपतः व ढोबळ मानाने निर्दिष्ट करण्याचा वर प्रयत्न करण्यात आला आहे.

पुढील ६ व्या प्रकरणात ब्रह्मदेशातील अस्पृश्यांची काय स्थिती आहे, हे पाहू.