स्वाशय निवेदन*

(महर्षी शिंदे यांचे एक प्रकट निवेदन)

आज दुसरीकडे निराश्रित साहाय्यकारक मंडळीचे चिटणीस व मंडळीची स्थापना करणारे रा. विठ्ठल रामजी शिंदे व मुंबईच्या शाखेचे चालक रा. वामनराव सोहोनी यांचे अस्पृश्यांच्या उच्च शिक्षणासंबंधाचे लेख आम्ही प्रसिध्द केले आहेत; ते वाचकांनी अवश्य लक्षपूर्वक वाचावेत; म्हणजे संस्थेसंबंधाने विनाकारण गैरसमज माजवून काही परोपकारी गृहस्थ कसा नुसता घोटाळा उत्पन्न करीत आहेत, त्याची चांगली कल्पना आल्यावाचून राहणार नाही.

एका गृहस्थाचे तर असे म्हणणे आहे की, अस्पृश्यांमध्ये जी जागृती होत आहे ती आपल्या सर्वस्वास घातक आहे असे वाटून अस्पृश्यांना दाबात ठेवण्याचा प्रयत्न मंडळीकडून होत असतो व ही जागृती आम्हासही सहन होत नाही.  निराश्रित साहाय्यकारक मंडळी स्थापन झाल्यापासून अनेक प्रसंगी आम्ही असे प्रतिपादिले आहे की, अस्पृश्य मंडळींनी अंती आपला स्वतःचा उध्दार आपणच करून घ्यावयाचा आहे.  निराश्रित साहाय्यकारक मंडळीचे प्रयत्न हे कुबडयांच्या साहाय्याने चालण्यासारखे आहेत.  स्वतःच्या पायावर ह्या लोकांनी उभे राहिले पाहिजे.  आठ वर्षांपूर्वी एका विशेष प्रसंगी आम्ही जे* उद्गार काढले ते ह्या पुढे दिले आहेत.  त्यावरूनही आमच्या धोरणाची कल्पना कोणासही होण्यासारखी आहे.  आमच्या अस्पृश्य मानिलेल्या बंधूंनी आत्मोध्दाराचे प्रयत्न स्वतः करणे हेच इष्ट आहे.  पण त्यासाठी जी इतर माणसे थोडेबहुत कार्य करीत आहेत, त्यावर बोळा फिरविण्याची व त्यांच्यापैकीच एकाची तेवढी पूजा करण्याच काही आवश्यकता नाही.  म्हणून आम्ही पुन्हा एकवार म्हणतो की, क्षेत्र फार मोठे आहे, निराश्रित साहाय्यकारक मंडळी आपल्या सामर्थ्यानुसार प्रयत्न करीत आहे.  ज्यांना निराळया दिशेने कार्य करण्यात आपले हित आहे असे वाटत आहे त्यांनी ते साधावे.  सर्व अस्पृश्य मंडळीचा उध्दार निराश्रित साहाय्यकारक मंडळी कशी करणार ?

-----------------------------------------------------------------------------------

*सुबोधपत्रिका, १९१२
*''आज उच्च वर्णाच्या लोकांनी नीच मानिलेल्या जातीचापक्ष जो घेतलेला आहे तो त्यांच्यामध्ये जागृती उत्पन्न करण्यासाठी, त्यांना मार्ग दाखविण्यासाठीच होय हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.  अस्पृश्यांनी आपला स्वतःचा आपणच उध्दार केला पाहिजे.  स्वतः त्यांनी आपल्या पायावर उभे राहू लागले पाहिजे असे आम्ही आजपर्यंत पुष्कळ वेळा म्हटले आहे.  परंतु ही मंडळी स्वतः थोडी चळवळ करू लागली की, तीस प्रारंभच उच्च वर्णाच्या द्वेषाच्याद्वारे होत असतो, हे जे एक नवीनच निघ्न उपस्थित होते ते त्यांच्या उध्दाराच्या चळवळीत उच्च वर्णाचे लोक असले म्हणजे कमी प्रमाणाने भासेल असा आमचा समज आहे; असा आमचा अनुभव आहे.  इतरांच्या द्वेषाच्या द्वारे स्वतःची उन्नती होत नाही, हे तत्त्व स्वत्वाचे वारे अंगी संचरत लोकांवर बिंबविण्याचा हाच एक मार्ग आहे, असे आम्हांस वाटते.

दुसरी एक खेदाची गोष्ट आम्ही अशी अनुभवली आहे की, अस्पृश्यवर्गातील काही मंडळी पुढे गेली म्हणजे मग आपल्या मागासलेल्या बंधूंची त्यांना आठवण पडत नाही.  ते आपल्यापैकीच आहेत हे ते विसरतात व त्यांची उन्नती करण्यासाठी झटणारास हातभार लावणे, नव्हे ते काम आपलेच आहे, अशी त्यांच्या ठिकाणी जागृती राहत नाही.  हा एक कष्टप्रद अनुभव आहे.  आणि पुढे गेलेल्यांमध्ये मागे राहिलेल्यांच्या संबंधाने जागृत सहानुभूती कशी उत्पन्न करता येईल, हा फार महत्त्वाचा प्रश्न नीच मानिलेल्या जातींची कळकळ बाळगणारांपुढे आहे.''