अस्पृश्यता घालविण्याचा बिनतोड उपाय*

ता. ८ फेब्रुवारी हा दिवस रा. विठ्ठलराव रामजी शिंदे ह्यांच्या परलोकवासी पूज्य मातोश्रींच्या श्राध्दाचा असतो.  दरवर्षी ह्या दिवशी ते कीर्तन करीत असतात.  पण ह्या वर्षी त्यांनी तो बेत रहित करून ब्राह्मोपासना चालविली.  सायंकाळी साडेसात वाजता भजनसमाजाचे मंदिर साफसूफ करून बिछायती पसरून आत रोषणाई करण्यात आली होती.  दिवसाच्या व रात्रीच्या शाळेतील मुलामुलींनी व त्यांच्या पालकांनी मंदिर गच्च भरले होते.  प्रथम भगवद्गीतेतील 'अर्जुनविषाद' हा भाग वाचून दाखवून ''अशोच्यानन्वशोचत्स्वं प्रज्ञावादांश्च भाषसे'' ह्या वाक्यावर निरूपण करण्यात आले.  ''जाऊ देवाचिया गावा ।  देव देईल विसावा''  हा अभंग उपदेशास घेण्यास आला होता.  मृताविषयी उल्लेख करताना परलोकवासी यमुनाबाईंच्या कोवळया अंतःकरणाचे कित्येक दाखले सांगण्यात आले.  घरी अतिथी आल्यास तो कोणत्याही जातीचा असो, त्याचे ताट ह्या माउलीने आपल्या हातानेच धुवावे हे व्रत त्यांनी शेवटपर्यंत चालविले.  पंचवीस वर्षांपूर्वी जमखंडीस असता एक दहा वर्षांची महाराची अनाथ मुलगी रा. विठ्ठलराव ह्यांनी घरी आणून ठेवली.  तिचेही ताट यमुनाबाई स्वतःच धूत असत.  हा प्रकार शेजाऱ्यापाजाऱ्यांस उघड माहीत असूनही बाईंच्या सात्त्विपणाच्या जोरावर सर्वच खपून जात असे.  आपल्या कुटुंबातील अशा घडलेल्या कित्येक गोष्टी रा. विठ्ठलराव उघडपणे सांगत असूनही त्यांच्या जातीकडून त्यांचा छळ किंवा अनादर होत असलेला फारसा दिसत नाही.  अस्पृश्यतानिवारणासंबंधी जातवार सभेमध्ये पुण्याच्या लोकांशी वाटघाट करीत बसण्यात वेळ घालविण्यापेक्षा आम्हा गरीब लोकांमध्ये अशा प्रकारे उपासना चालविणे, आपला आणि वडिलांचा अनुभव सांगणे हाच मार्ग रा. शिंदे ह्यांनी अधिक चालू ठेवावा असे आम्हांस वाटू लागले आहे.  अस्पृश्य लोकांशी उघडपणे शिवाशिव करतात; ह्या गोष्टीपेक्षा प्रार्थनासमाजाच्या पध्दतीप्रमाणे डोळे मिटून प्रार्थना करण्यात ख्रिस्ती लोकांचे अनुकरण करतात, ह्याच गोष्टीसाठी कित्येक लोक पूर्वी नाके मुरडीत असत.  पण तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून उपासनेचा साधा आणि धोपट मार्ग आमच्या भजनमंदिरात दर आठवडयास नित्याच्या वेळी आणि नामकरण, वाढदिवस, श्राध्दादी नैमित्तिक प्रसंगी आज कित्येक वर्षे बिनबोभाट चालू आहे.  त्याचा परिणाम असा झाला आहे की, आजूबाजूचे लोक अशा प्रसंगी ह्या उपासनांस श्रध्देने जमतात.  समाजाच्या तत्त्वांचा स्वीकार करून ते जरी सभासद होण्यास तयार नसले, तरी निश्चितपणे भजन करून प्रार्थना करणे, ह्यासाठी स्त्रीपुरुष, लहानथोर सर्व जातींच्या लोकांनी एका बिछायतीवर बसणे आणि शेवटी खिरापत, प्रसाद एकत्र घेणे, ह्या गोष्टी आता लोकांच्या अंगवळणी पडू लागल्या आहेत.  ह्यावरून जी गोष्ट वादविवादाने साध्य होत नाही; ती भजनाने सहज होते हे लक्षात घेण्यासारखे आहे.

आपला नम्र
बाबू धोंडी वायदंडे
अहल्याश्रम, भोकरवाडी
पुणे ता. ११-२-१९२३

------------------------------------------------------------------------
*सुबोधपत्रिका, १८ फेब्रुवारी १९२३
------------------------------------------------------------------------