उत्पत्ती : अस्पृश्यतेचा इतिहास निदान हिंदुस्थानात तरी आर्यन् लोकांच्या आगमनाइतकाच जुना आहे. चांडाल हा शब्द वैदिक वाङमयात आणि बौध्द ग्रंथांतून आढळतो. बुध्दाच्या वेळेच्या पूर्वीपासून तरी निदान चांडाल आणि इतर जित राष्ट्रे अस्पृश्य गणली जात होती असे उल्लेख आढळतात. इराणातील झरथुष्ट्रपंथी आर्य हिंदुस्थानातील देवयज्ञी व इतर देवोपासक आर्यांनाही अस्पृश्य आणि तिरस्करणीय समजत असत, असे पार्श्यांच्या जुन्या व अर्वाचीन ग्रंथांत पुरावे मिळतात. आर्यांचा हिंदुस्थानात कायमचा जम बसल्यावर त्यांनी येथील दस्यू ऊर्फ शूद्र नावाच्या जित राष्ट्रांना आपल्या वस्तीजवळच पण बाहेर रहावयास लावून त्यांच्या व आपल्या संस्कृतीत भेसळ होऊ नये म्हणून त्यांना अस्पृश्य ठरविले. ज्या अर्थी जपानात हेटा, हीना नावाच्या अस्पृश्य जाती अद्यापि आहेत; त्या अर्थी अस्पृश्यता ही संस्था आर्यांनीच निर्माण केली नसून तिचा प्रादुर्भाव मोगल लोकांतही पूर्वी होता हे सिध्द होते. हेटा किंवा ऐटा ही जात फिलीपाईन बेटातून जपानात गेली असावी. अथ्रवण (ब्राह्मण), रथेस्ट्र (राजन्य), वस्ट्रय (वैश्य) आणि हुइटी (शूद्र) असे झरथुष्ट्राच्या वेळी इराणात चार भेद होते. वेदात शूद्र हा शब्द आढळत नाही, पण महाभारतात अभिर आणि शूद्र ह्यांचा उल्लेख असून सिंधू नदीच्या मुखाजवळील भागात त्यांची वस्ती असावी असे दिसते. (ॠग्वेदात पुरुषसूक्तात शूद्र हा शब्द आला आहे व शुल्क यजुर्वेदात ८ वेळा या शब्दाचा उल्लेख आला आहे. २३.३०.३१ इ.-संपादक : ज्ञानकोश) 'कास्टस् ऑफ इंडिया' या पुस्तकात वुईल्सनने म्हटले आहे की, कंदाहार प्रांतात शूद्रोई नावाचे प्राचीन राष्ट्र होते आणि सिंधू नदीवर शूद्रोस नावाचे शहर होते (रसेल ह्यांचे कास्टस् ऍण्ड ट्राईब्स् सी.पी. हे पुस्तक पहा). इराणातील हुइटी अथवा शूद्रोई आणि फिलीपाईन बेटातील ऐटा ह्या जातींचा संबंध असल्याचे सिध्द करता आल्यास अस्पृश्यतेचा उत्पत्तीवर बराच प्रकाश पडण्यासारखा आहे.
--------------------------------------------------------------
* महाराष्ट्रीय ज्ञानकोश, विभाग ७ वा
--------------------------------------------------------------
आर्यांचा विसतार उत्तर हिंदुस्थानात होऊन आर्यावर्ताची स्थापना झाल्यावर शूद्र राष्ट्रांचा आर्यांच्या वर्णव्यवस्थेत समावेश होऊन पुढे दुसरी जी कोणी जंगली जित राष्ट्रे आर्यांच्या खिदमतीस राहण्यास कबूल झाली; ती हळूहळू अस्पृश्य गणली जाऊन गावाच्या शिवेबाहेर राहू लागली, अशी उपरिनिर्दिष्ट उपपत्ती रसेलच्या ग्रंथात आहे. मनुस्मृतीच्या काळानंतरची अलीकडच्या अस्पृश्य जातीची चांगली माहिती मिळण्यासारखी आहे. मनुस्मृतीत ब्राह्मण स्त्री आणि शूद्र पुरुष यामधील प्रतिलोक संततीस 'चांडाल' अशी संज्ञा आहे.
इंग्रजी शिक्षणामुळे हिंदुस्थानात जी आधुनिक सुधारणेची प्रवृत्ती सुरू झाली, तिच्यामुळे वरील अस्पृश्यतेच्या निवारणार्थ केवळ हिंदू लोकांकडून जे प्रयत्न होत आहेत, त्यांचा संक्षिप्त इतिहास एवढाच प्रस्तुत विषय आहे.
ह्या विषयाचे दोन मुख्य भाग पडतात, ते असे : इ.स. १९०६ मध्ये भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया) मुंबई येथे स्थापन झाली. हिचा पूर्वकाळ आणि उत्तरकाळ असा : पूर्वकाळी अनुक्रमे महाराष्ट्र, बंगाल, बडोदे आणि मद्रास प्रांती काही उदार व्यक्तींनी थोडेसे प्रयत्न केले, पण त्यांच्यांत सातत्य, संघटना, परस्पर संबंध नसल्यामुळे त्यांना यावी तशी दृढता आली नाही; पण ही मंडळी मुंबईत स्थापन झाल्यावर सर्व हिंदुस्थानभर हिच्या शाखा झपाटयाने पसरल्या. त्यांच्यांत कमी अधिक परस्परसंबंध जडल्यामुळे व त्यांच्या द्वारा सर्वत्र लोकमताचा विकास झाल्यामुळे शेवटी सन १९१८ साली कलकत्त्याच्या काँग्रेसने मंडळीचे जनरल सेक्रेटरी रा. शिंदे ह्यांच्या पत्रावरून अस्पृश्यतानिवारणाचा ठराव सर्वानुमते पास केला व पुढे लवकरच महात्मा गांधी ह्यांच्या पुरस्कारामुळे ह्या प्रयत्नाला आता अखिल राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. कलकत्त्याच्या काँग्रेसमध्ये मिसेस बेझंट या अध्यक्ष होत्या व त्यांचा ह्या मंडळीशी बराच परिचय होता. म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांच्या जोरावर हा ठराव पास केला.
रा. फुले यांचा प्रयत्न : इंग्रजी विद्येचा उगम एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी तरी प्रथम बंगाल्यात झाला, आणि तेथे राजा राममोहन रॉय ह्यांनी इ.स. १८३१ त ब्राह्मसमाजाच्या रूपाने सर्व आद्य प्रगतीची ध्वजा उभारती. तरी अस्पृश्यतानिवारणाचा अग्र आणि अंतिम मान महाराष्ट्रसच आणि विशेषतः जोतीबा फुले ह्या महात्म्यानेच मिळविला. ह्यांचा जन्म पुणे येथे फुलमाळी जातीत झाला. सन १८४७ पर्यंत ह्यांचे मराठी आणि इंग्रजी शिक्षण मिशनरी शाळेत झाले. रा. लहूजी नावाच्या एका तालीमबाज मांग जातीच्या गृहस्थाच्या आखाडयात ह्यांचे शारीरिक शिक्षण झाले होते. तेव्हापासून अस्पृश्योध्दाराकडे ह्यांचे लक्ष वेधले होते. पुढे बंगाल्यात बाबू शशिपाद बानर्जी ह्या गृहस्थांनी स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, अस्पृश्योध्दार वगैरेसंबंधी सामाजिक प्रगतीची जी कामे चालविली; ती त्याच्या पूर्वीच २० वर्षे आधी महाराष्ट्रात ह्यांनी चालविली. ''डेक्कन असोसिएशन'' नावाची एक प्रागतिक विचारप्रसारक संस्था पुण्यास होती. तिच्या वतीने सरकारांनी जोतीबास २०० रुपयांची शाल, मोठी जाहीर सभा करून १८५२ साली नजर केली. त्याचे कारण १८४८ साली जोतीबांनी मुलींची पहिली शाळा स्थापन केली, आणि १८५२ साली आरंभी महारमांगांच्या मुलांसाठी पहिली शाळा स्थापन केली. ही शाळा मुंबई इलाख्यातच नव्हे, तर अखिल जगात अस्पृश्यांसाठी हिंदू लोकांनी उघडलेली पहिलीच खासगी शाळा होय. सरकारी इन्स्पेक्टर मेजर कँडीसाहेबांनी हिची पहिली परीक्षा, ता. २१ मार्च १८५२ रोजी शुक्रवार पेठेतील शाळेत घेतली असे त्या दिवशी प्रसिध्द झालेल्या ज्ञानप्रकाशाच्या अंकात नमूद झाले आहे. ''त्या वेळेस शुध्द लिहिणे व वाचणे वगैरे गोष्टींत ह्या शाळेतील मुलांनी विश्रामबागेतील (वरिष्ठ वर्गाच्या) किती एक विद्यार्थ्यांपेक्षाही उत्तम परीक्षा दिली, असे मेजरसाहेबांनी म्हणून दाखविले, असे ज्ञानप्रकाशने त्याच अंकात प्रसिध्द केले आहे. ता. ५ डिसेंबर १८५३ च्या ज्ञानप्रकाशात शाळेच्या पहिल्या वाषर्िाक रिपोर्टासंबंधाने संपादकांनी जे स्पष्ट व सविस्तर मत दिले आहे त्यातील खालील उतारे विशेष लक्षात घेण्यासारखे आहेत. ''एक मुलींची शाळा आपल्या घराजवळ घातली. त्या कालावधीत व पुढेही त्यास त्यांच्या जातीच्या लोकांकडून फार त्रास सोसावा लागला. त्यास शेवटी तीर्थरूपांनी त्याच कारणावरून घरातून काढले. आपल्या नीच बंधुजनांस अज्ञानसागरातून काढून ज्ञानामृताचे सेवन करण्याकरिता त्यांनी संकटे भोगली, हा त्यांचा त्या जातीवर मोठा उपकार आहे. आम्हीही त्यांचे आभार मानितो. ब्राह्मण लोकांमुळे अतिशूद्रांचे ज्ञानेकरून व द्रव्येकरून बिलकुल बरे होऊ नये, अशी उंच जातीची इच्छा खरी, परंतु त्यात ब्राह्मण काय ते अग्रेसर असा ह्यांचा लिहिण्याचा हेतू कळून येतो. त्याशिवाय स्पष्टीकरण करण्याचे कारण नाही. प्रायः आम्ही ही गोष्ट खरी समजतो, असे फुलेराव जाणत असता, ज्या ब्राह्मणांनी अशाच कामात द्रव्याची वगैरे मदत केली, त्यापेक्षा त्यांची स्तुती तर इतरांपेक्षा जास्त केली पाहिजे व त्यांचे स्मरण सवा्रंस राहावे यास्तव त्यांचे नावे जोतीरावांनी (रिपोर्टात) अवश्य लिहावी असे आम्हास वाटते.'' ह्या शाळेत चांभाराच्या मुलींस जोतीबा स्वतः व त्यांची बायको किती कळकळीने शिकवीत असत, ह्याविषयी एक पत्र ज्ञानप्रकाशात प्रसिध्द झाले आहे. ह्यांचे तीन मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे ह्यांची जोतीबांना बरीच मदत असे. ''महारमांगांच्या शाळांत बरीच गर्दी होत असे. ह्या लोकांस त्यांनी आपल्या राहत्या घराच्या विहिरीवर पाणी भरण्यास परवानगी दिली.'' (अ. ए. गवंडीकृत फुले यांचे परित्र, पान ८) ता. ४ सप्टें. १८५६ च्या ज्ञानप्रकाशाच्या अंकात खालील मजकूर आहे : ''गेल्या शुक्रवारी येथील अति शूद्रांच्या शाळांची परीक्षा झाली. मुख्य स्थानी मिस्तर स्विससाहेब रिविन्यू कमिशनर हे बसले होते, युरोपियन, नेटिव्ह बरेच आले होते. आरंभी कमिटीने रिपोर्ट इंग्रजीत व नंतर मराठीत वाचला व त्यावरून असे समजते की, एकंदर शाळा तीन आहेत व त्यांमध्ये मुलांची संख्या सुमारे ३०० वर आहे. परंतु महारमांग आदिकरून नीच जातीखेरीजकरून इतर मुले पुष्कळ होती. शिक्षक सुमारे ८ आहेत. ह्या शाळांत मुली मुळीच नाहीत. गेल्या दोन वर्षात मुली असत, परंतु एक शाळा ह्या वर्षी जास्त वाढविली आहे. स्थापन झाल्यापासून दिसत आहे की, त्या शाळांच्या अभ्यासाची धाव पलीकडे जात नाही व ह्याचे कारण काय ते कळत नाही. कमिटी असे म्हणते की, शिक्षक चांगले मिळत नाहीत.''
सन १८७५ सप्टेंबर ता. २४ च्या मुंबई सरकारच्या रेव्हिन्यू खात्याच्या नं. ५४२१ च्या ठरावावरून जोतीबांच्या ह्या शाळांविषयी खालील ठराव १८५५-५६ च्या सुमारास महारमांगांच्या मुलांच्या शाळेसाइी इमारत बांधण्याकरता सरकारांनी पुणे येथे एक जागेचा तुकडा दिला असे दिसते व तसेच इमारत खर्चासाठी दक्षिणा फंडातून ५००० रुपये देण्याचे सरकारांनी वचन दिले. ही रक्कम वसूल करण्यात आली नाही. तरी ह्या जागेवर एक झोपडी उभारण्यात येऊन तिच्यात गेल्या वर्षापर्यंत महारांसाठी एक शाळा भरत होती. आता शाळा बंद आहे. ह्या शाळेच्या मंडळीचे सेक्रेटरी रावबहादूर सदाशिवराव बल्लाळ. त्यांच्या ताब्यात ही जागा आहे. शाळेला लागणाऱ्या जागेखेरीज इतर भाग एका मांगाला लागवडीने सेक्रेटरी देत आहेत. तिचे लावणी उत्पन्न दरसाल ८० ते १०० रुपये येत असते. रावबहादूर सदाशिव ह्यांच्या मनात ही जागा व शाळा सरकारास द्यावयाची आहे. ही जागा लोकलफंड कमिटीस द्यावयाची आणि शाळा तिच्या उत्पन्नातून सदर कमिटीने पुढे चालवावी. दक्षिणाफंडातून ८०० रुपये ग्रँट देण्यास सरकारांना हरकत वाटत नाही. मुंबई सरकारच्या विद्याखात्याचा तारीख १३ नोव्हेंबर १८८४ नंबर १९, २१ चा ठराव झाला, त्यावरून ही शाळा लोकफंड कमिटीकडून पुणे म्युनिसिपालिटीकडे येऊन सरकारातून वेगळी ग्रँट मिळण्याची तजवीज झाली. येणेप्रमाणे महारमांगांसाठी जोतीबांनी जी प्रथम संस्था काढली, तिच्या मिळकतीची हकीकत आहे. भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीने नानापेठेत पुणे म्युनिसिपालिटीकडून सन १९१४ तारीख १८ माहे जून रोजी भोकरवाडीजवळील ७ एकन जागा आपल्या प्रशस्त इमारतीकरिता ९९ वर्षांच्या कराराने घेतली आहे, ती हीच मिळकत होय. सरकारकडून म्युनिसिपालिटीला जी शाळा मिळाली तीदेखील हल्ली ह्या मंडळीच्या शाळांतच सामील झाली आहे.
शशिपाद बंदोपाध्यायांचे प्रयत्न : बंगाल्यात अस्पृश्यतानिवारणाचा प्रथम मान वरील ब्राह्मण गृहस्थांकडे आहे. हे कलकत्त्याजवळील बारानगर गावी सन १८४० त कुलीन ब्राह्मण जातीत जन्मले. १८६६ साली ब्राह्मधर्मी झाले. तेव्हापासून ते अगदी खालच्या जातींशी मिळूनमिसळून जेवूखाऊ लागले. सन १८६५ च्या नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेस ह्यांनी बारानगर येथील गिरणीतील मजूरवर्गाची एक सभा भरविली. त्यात ठराव होऊन त्यांच्यासाठी रात्रीच्या आणि दिवसाच्या शाळा काढल्या. हा अनाचार, टवाळ लोकांस न खपून त्यांनी त्या उठविल्या. पण ह्यांनी स्वतःच्या खर्चाने इमारती बांधून त्या कायम केल्या. इकडील चोखामेळयाप्रमाणे बंगल्यातील कर्ताभजापंथी चांडाळवर्ग भजनाचा शोकी आहे. त्यांचा बिहालपारागावी एक उत्तम सारंगी तयार करण्याचा कारखाना आहे. तेथे जाऊन बाबूजी चांडाळांचे कीर्तन ऐकत. सन १८७० च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी अशा मजूरवर्गाचा एक क्लब काढला. त्याच्या द्वारा त्यांना वाचनाची गोडी लाविली आणि मद्यपान वगैरे दुष्ट चाली सोडविल्या. वेडीवाकडी गाणी सोडून ही मंडळी सात्त्वि कीर्तने करू लागली. १८७१त जेव्हा बाबूजी विलायतेस निघाले, तेव्हा ह्या गरीब मजुरांनी त्यांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक मानपत्र दिले. ह्या दीनांच्या सेवेबद्दल बाबूजींचा सत्कार ते विलायतेस गेल्यावर ब्रिस्टल शहरी एका मिशनरी संस्थेने त्यांना एक मोठे मानपत्र देऊन केला. परत आल्यावर त्यांनी गरिबांसाठी एका पैशाचे एक मासिकपत्र काढले. दर महिन्यास त्याच्या १५००० प्रती खपू लागल्या. त्यात पंडित शिवनाथशायांसारख्यांनी लेख लिहिले व श्रीमंतांची चांगली मदत असे. 'बारानगर समाचार' नावाचे साप्ताहिकही काढले. ते चांडालाबरोबर जेवीत, मेहेतरांच्या मुलांची शुश्रूषा करीत. सरकारने नुकत्याच उघडलेल्या सेव्हिंग बँकेत त्यांचे पैसे ठेवून त्यांना काटकसर शिकवीत. बारानगर येथे ब्राह्मसमाज स्थापन झाल्यावर ह्या लोकांसाठी बरेच काम होऊ लागले. ह्या मजुरांच्या संस्थेच्या २३ व्या वार्षिक उत्सवाचे वर्णन १८८९ सालच्या सप्टेंबर महिन्याच्या २० ता. च्या 'इंडियन डेली न्यूज' नावाच्या इंग्रजी पत्रात सविस्तर आले आहे. बक्षीस-समारंभात १०० वर मुलांस व गडयांस बक्षिसे दिली. बडया मंडळींनी सहानुभूतीची भाषणे केली. याशिवाय बंगाल्यास दुसरे कोणते प्रयत्न झालेले ऐकिवात नाहीत. हल्ली जे डिप्रेस्ड मिशनचे काम गावोगावी चालले आहे, त्याचे मूळ महाराष्ट्रातील मिशनमध्ये आहे. वरील माहिती सीतानाथ तत्त्वभूषण यांनी निवेदिलेल्या शशिपाद बाबूंच्या चरित्रावरून व इतर साधनांवरून मिळविलेली आहे.
श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे प्रयत्न : महाराजांनी आपल्या राज्यात वेळोवेळी कानाकोपऱ्यात स्वतः जाऊन अस्पृश्य, जंगली, गुन्हेगार जातींची स्थिती स्वतः निरखिली. नवसारीजवळ सोनगड म्हणून महाराजांचा एक जंगली मुलूख आहे. तेथे ढाणका नावाची जंगली जात आहे. तेथे महाराज गेले तेव्हा हे सर्व लोक वानरांप्रमाणे झाडांवर चढून बसले. ते काही केल्या खाली उतरेनात. महाराजांनी ३२ वर्षांपूर्वी या लोकांच्या १०० मुलामुलींसाठी दोन बोर्डिंगे आणि शेतकीची नमुनेदार शाळा काढलेली मी स्वतः १९०५ साली पाहिली. तिचा उत्तम परिणाम दिसून आला. तेथील सुपरिंटेंडेंटने ह्या लोकांसाठी एक प्रार्थनासमाज चालविला होता, तो मी दोनदा पाहिला. त्याच्या द्वारा मुलांस उच्च धर्माची तत्त्वे शिकण्याची सोय होती. गुजराथी व इंग्रजी शिकलेले प्रौढ मुलगे व मुली बोर्डिंगात मी पाहिल्या. त्यांच्यात लग्ने लावून कायमची सुधारणा करण्याची महाराजांची कल्पना घेण्यासारखी दिसली. थक्क झालो. अस्पृश्यांच्या शिक्षणाचे एक निराळे खातेच आहे. त्याचे मुख्य अधिकारी पंडित आत्माराम ह्यांनी पाठविलेल्या रिपोर्टाचा अल्प सारांश खाली दिला आहे :
सन १८८३ सालापासून 'अस्पृश्यां'करिता निराळया मोफत शाळा उघडण्यास सुरुवात झाली. १९८४त ७ व १८९१त १० शाळा झाल्या व हिंदू शिक्षक मिळणे अशक्य असल्यामुळे मुसलमानांवरच काम भागवावे लागे. अधिकाऱ्यांतही सहानुभूती कमी असल्यामुळे फार अडचणी आल्या.
ह्याचसाठी मुंबईत नि. सा. मंडळी स्थापण्यात आली आणि बडोद्यात सक्तीच्या शिक्षणाचा ठराव पास होऊन शिक्षणाचा प्रसार झपाटयाने चालला.
तक्ता (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)