अस्पृश्यता व हिंदूंचा संकोच *

ब्राह्मसमाजाचा अखिल भारतीय प्रचारक या नात्याने मला सन १९२४-२५ ह्या दोन साली मुंबई इलाख्याबाहेर सामान्यतः आणि मद्रास इलाख्यात विशेषतः सतत संचार करावा लागला.  त्यांपैकी मलबार प्रांत व दक्षिण कानडा जिल्ह्यात माझे एक वर्ष गेले.  माझे निरीक्षण अर्थात 'अस्पृश्य' समाजातच विशेष झाले.  ह्या नैर्ॠत्य कोपऱ्यात अस्पृश्यांवर अद्यापि दुःसह अन्याय चालू असल्यामुळे तेथील 'तिय्या' नामक अत्यंत पुढारलेल्या व सुशिक्षित 'अस्पृश्य' समाजाचे लक्ष बौध्द धर्माकडे लागले आहे.  हा भाग सिंहलद्वीपाला जवळ असल्यामुळे काही बौध्द भिक्षूंनी त्रावणकोर संस्थानात कायमचे ठाणे दिलेले मी पाहिले.  कालीकत येथे बौध्द धर्मप्रचारक मंडळाचे काम पूर्वाश्रमीचे ब्राह्मण गृहस्थ श्री. मंजेरी रामय्या आणि प्रसिध्द श्रीमंत श्री. सी. कृष्णन् (तिय्या जातीचे) ह्यांनी नेटाने चालविले आहे.  मोपल्यांच्या बंडात किती हिंदू आपल्या जुन्या धर्मास मुकले हे प्रसिध्दच आहे.  गेल्या महायुध्दाचे पूर्वी त्या प्रांतात मोठा दुष्काळ पडला तेव्हा पुष्कळ निराश्रित अस्पृश्यांनी पोटासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.  खेडीच्या खेडी ख्रिस्ती धर्मात शिरली होती किंवा तसे मानण्यात येत होते.  महायुध्दानंतर अशा पोटाळया ख्रिस्त भक्तांना पोसणे ख्रिस्ती मिशनांना अत्यंत कठीण झाले.  अशा संकटात त्या प्रांताच्या प्रसिध्द (प्रोटेस्टंट) मिशनला जर्मनीचा आधार राजकीय कारणांवरून नाहीसा झाला.  त्यामुळे नामधारी नूतन ख्रिस्ती शिष्यांची स्थिती फार करुणास्पद झाली.  ह्याचे एक ढळढळीत उदाहरण माझ्या डोळयांनी पाहिले, ते खाली देत आहे.

इ.स. १९२४ साली स्वामी श्रध्दानंद मंगळूर येथील आर्यसमाजाच्या उत्सवानिमित्त पश्चिम किनाऱ्यावर आले.  मी तेथे बरेच दिवस अगोदरच होतो.  अस्पृश्योन्नतीचे कार्यात आर्यसमाजाचे व ब्राह्मसमाजाचे प्रयत्न मिळूनच चालले होते.  मंगळूराहून पूर्वेकडे वेणूर नावाच्या एका खेडयातील अस्पृश्याकडून आम्हा दोघांना आमंत्रण आले.  दोहो समाजाचे आम्ही सुमारे ७८ जण तेथे गेलो.  त्या जंगली गावातील सुमारे २००।२५० अस्पृश्य मंडळी वाट पाहत बसली होती.  त्या प्रदेशात ख्रिस्ती मंडळीचे प्रयत्न पैशांचे अभावी आखुडले होते, असे आम्हाला दिसले.  व्याख्यान, भजन, उपहार वगैरे झाल्यावर जमलेल्या सर्व मंडलीस हिंदुधर्माची परत दीक्षा देण्यात आली.  विधायक कामासाठी एक आश्रमही उघडण्यात आला.

--------------------------------------------------------
* सुबोधपत्रिका, १ ऑगस्ट १९२६.
------------------------------------------------------

गेल्या वर्षी विशेषतः आंध्र देशात माझ्या तीन सफरी झाल्या.  त्या देशातील खेडयांत विशेषतः प्रोटेस्टंट ख्रिस्ती मिशनचे काम झपाटयाने चालले आहे.  काही ठिकाणी त्या कामामुळे बऱ्याच अस्पृश्यांची पुष्कळशी भौतिक उन्नती झाली हे मला निर्विकार मनाने कबूल करणे भाग आहे.  पण इतर पुष्कळ ठिकाणी अस्पृश्यांची जी खेडीच्या खेडी ख्रिस्ती झाली आहेत; त्यांचे धर्मांतर झाले म्हणण्यापेक्षा नामांतरच झाले आहे म्हणणे जास्त शोभेल.  ही खेडी हिंदू म्हणवू लागतील तर लागलीच सुखात पडतील असेही माझे म्हणणे नाही.  माझ्या लिहिण्याचा प्रस्तुत मुद्दा हा आहे की, अशा नवीन ख्रिस्त्यांना पूर्वीइतका भौतिक फायदा अलीकडे मिळत नसून उलट आपल्या हिंदू अस्पृश्य जातीपासून फुटून राहावे लागल्यामुळे प्रसंगी अपमान सोसावा लागतो.  असा देखावा पाहून मला ख्रिस्ती प्रचारकांच्या उत्साहाचे जितके कौतुक करावेसे वाटले; तितकेच आमच्या हिंदू म्हणविणाऱ्या बोलघेवडयांची कीव आली.  गुंतूर जिल्ह्यातील बापएला आणि एपुरीवाल्यं ह्या दोन गावांतील महार व मांगवाडयांची मी घरोघर तपासणी केली.  दोन्ही गावांत ह्या वाडयांतून मला एकदोनच कुटुंबे हिंदुधर्मात उरलेली दिसली.  ह्या जिल्ह्यात शाळा, धर्ममंदिरे व दवाखाने वगैरे जे ख्रिस्ती प्रयत्न जोरात चालले आहेत, ते पुष्कळ अंशी स्तुत्य वाटतात.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मछलीपट्टण जिल्ह्यातील गुडीवाडा येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची एक परिषद भरली.  तेथे स्वामी श्रध्दानंदांची व माझी पुन्हा गाठ पडली.  त्यांनी वेलोर येथे जाऊन त्या शहराजवळील खेडयातील दोन हजार ख्रिस्ती अस्पृश्यांना हिंदुधर्मात घेतल्याची बातमी चोहोकडे वर्तमानपत्रातून पसरली होती.  ती अगदी खरी आहे असे स्वामींनी मला स्वतःही सांगितले.  त्या प्रांताचे माझे अनुभव मी स्वामींना सांगितले आणि कायमचे प्रचारक ठिकठिकाणी ठेवून शिक्षण, उद्योग, उदार हिंदुधर्माचा सक्रिय उपदेश वगैरे विधायक प्रयत्न केल्याशिवाय अस्पृश्यतेचे उच्चाटन होणार नाही, असे आमचे दोघांचे एकमत झाले.  विशेषतः आंध्र देशात काँग्रेसच्या स्वयंसेवकांनी तेथील तरुण 'अस्पृश्य' वर्गात फार स्तुत्य स्फूर्ती उत्पन्न केली आहे.  पण विधायक कामाच्या अभावी न जाणे; तीही मावळून जाण्याची भीती आहे.

निदान संख्येच्या दृष्टीने तरी हिंदुधर्माचा झपाटयाने ऱ्हास होत आहे.  खुद्द आमच्या पुणे शहरात गेल्या वर्षी गुलटेकडीवरच्या ५० मांगांना मुसलमान करण्यात आले अशी हूल उठली होती.  तिचा परिणाम आमच्या अहल्याश्रमाजवळील भोकरवाडीतील मांगांवर काही झाला नाही इतकेच.  तेथील सार्वजनिक सभेत जाहीर सभा होऊनही हूल जेथल्या तेथेच जिरविण्यात आली.  पण खेडयात इतकी सुरक्षितता राहिलेली नाही हे ध्यानात ठेवणे बरे.

ब्राह्मसमाज, आर्यसमाज, हिंदू मिशनरी सोसायटी, हिंदुसभा, भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी आणि सोशल सर्व्हिस लीग ह्या व इतर धार्मिक व सामाजिक मंडळयांनी एकत्र होऊन विधायक कामाची कायमची घटना जमवीपर्यंत केवळ तात्ुपरत्या चळवळीने काही चालणार नाही.