(इ.स. १९३५ मध्ये म.वि.रा. शिंदे यांनी 'किर्लोस्कर' मासिकाला दिलेल्या मुलाखतीतील भाग)
प्रश्न : अस्पृश्यतेच्या प्रश्नाला हल्ली जे तीव्र स्वरूप आले आहे, त्याविषयी आपणांस काय वाटते ?
उत्तर : माझे असे मत आहे की, सर्वांनी मिळून हा अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवावा. नाही तर तो एक कायमचा काटा होऊन बसेल. आपण जर स्वखुषीने अस्पृश्यांस स्वतंत्र केले नाही, तर त्यांस आपल्या उलट जावयास तयार केल्यासारखे होईल व ते तसे तयार झाले व आम्हांला विरोध करून पुढे येऊ शकले, तर त्यास नाव ठेवण्यास आपणांस काहीही हक्क नाही. म्हणून आपण उदार दृष्टीने अस्पृश्यांस आपणास अगदी मिळवून घेतले पाहिजे. इतके की, त्यांचा वेगळा नामनिर्देशसुध्दा करावा लागू नये. असे जर आपण केले नाही तर 'अस्पृश्यांचा मुसलमानांसारखा सवतासुभा होईल व तो झाल्यास अखेरपर्यंत जाचक होऊन बसेल. तेव्हा आपण आत्महिताच्या दृष्टीने विचार केला, तरी अस्पृश्यांस वर आणणे आपले कर्तव्य ठरते. राजकारणामध्ये ब्राह्मणेतर, मुसलमान हे जसे सवतेसुभे आतापर्यंत झाले आहेत तशीच अस्पृश्यांची ही तिसरी मेख तयार होत आहे. याचा सर्वांनी, विशेषतः ब्राह्मणांनी, विचार करावा. सनातन्यांचा बोजा ब्राह्मणांवर आहे. त्यांची सर्व जबाबदारी ब्राह्मणांवर आहे, तेव्हा त्यांनी आपले कर्तव्य नीट रीतीने पार पाडावे.