अस्पृश्यवर्गाची उन्नती

अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसंबंधीचा ठराव पुढे आणताना रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी पदोपदी आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींचे अगदी कळकळून वर्णन केले.  हे भाषण करताना ते म्हणाले की, ''मुंबई इलाख्यातील हिंदूंमध्ये एकसष्ठमांश लोक अस्पृश्य मानिलेल्या वर्गातील आहेत.  या लोकांना नालायक, निकामी समजून आम्ही दूर लोटलेले आहे.  या जीतांना गावाबाहेर ठेवण्यात येते.  हल्लीपर्यंत माझी अशी समजूत होती की, आगबोटी, आगगाडया वगैरेमध्ये या लोकांची इतर लोकांशी सरमिसळ होते.  युरोपियन लोक व बायका यांच्यासाठी आगगाडीचे डबे राखून ठेवण्यात येतात.  असे आपल्याला साधारणपणे आढळते.  परंतु काठेवाडमध्ये ''फक्त धेडांकरिता,'' असे आगगाडीच्या एक डब्यावर लिहिलेले मला आढळले.  बरे या डब्यात इतरांनी शिरावयाचे नाही, असेही नाही.  असल्या एका डब्यात पोलीसची हत्यारबंद पार्टी शिरली व त्यांनी तो डबा बळकावला.  पुढे दुसऱ्या स्टेशनवर गार्डाने (हा गार्ड नेटिव ख्रिस्ती होता.)  या पोलीसपार्टीला त्या डब्यातून जाण्यास लावले.  सारांश, दुसऱ्या कोणास तो डबा नको असेल तर तो धेडांसाठी राखून ठेवलेला म्हणून समजावयाचा.  महार, चांभार वगैरे लोकांना आम्ही कसे शिवावे, त्यांची स्थितीच तशी घाणेरडी असते, असे कित्येक म्हणतात.  परंतु ह्या लोकांना आम्ही दूर ठेवीत गेलो.  त्यामुळेच त्यांची स्थिती दूर ठेवण्यासारखी झाली हे आपण विसरता कामा नये.  हे लोक ओंगळ आहेत, म्हणून आम्ही त्यांना शिवत नाही असे म्हणण्यापूर्वी आम्ही शिवत नसल्यामुळे ते ओंगळ झाले, हे लक्षात आणले पाहिजे.  आम्हाा जर आमची स्वच्छता व आमचे शील यांविषयी खात्री आहे तर अस्पृश्याला आम्ही मिठी मारली तरी आम्ही अमंगल होणार नाही.  अस्पृश्य लोकांची उन्नती करण्याच्या बाबतीत एक एक पाऊल पुढे पडत आहे.  आजपर्यंत आम्ही याविषयी ठराव पास केले.  आता प्रत्यक्ष कृतीने सुधारकांनी सहानुभूती दाखविली पाहिजे.  बाहेरगावी मी जातो, तेव्हा या वर्गांना शिक्षण द्या म्हणून वरिष्ठ जातींच्या लोकांना मी सांगतो.  त्यांना 'शिवा' म्हणून तेथे सांगता येत नाही.  या प्रश्नावर मोठया बंदोबस्ताने बोलावे लागते.  हल्लीच मुंबईच्याजवळ एका जिल्ह्याच्या शहरी माझ्या व्याख्यानास जागा मिळू नये म्हणून तेथल्या कर्मठ लोकांनी कडेकोट बंदोबस्त केला होता.  शेवटी मोठा वशिला बांधून जागा मिळवावी लागली.  परंतु येथे आज आपण मुंबईत आहो, बाहेरगावी नाही.  येथे भित्रेपणा किंवा अर्धवटपणा नको.  बाहेरगावी काम करणारा मनुष्य तेथील परिस्थिती पाहून धोरणाने वागतोच.  आजच्या परिषदेत अर्धवटपणा न ठेवताच ठराव पास झाला पाहिजे.  शिक्षणाच्या द्वारे अस्पृश्य मानिलेल्या वर्गाची सुधारणा केली पाहिजे हे खरेच आहे; परंतु या जातीतील लोकांशी स्पर्शास्पर्श विचार न ठेविता मिळून मिसळून वागणे, हेही मुख्य काम आहे.  

----------------------------------------------------------------
* सुबोधपत्रिका, १४ एप्रिल १९१२
----------------------------------------------------------------