आत्म्याची यात्रा

(ता. २४-९-११ रोजीं झालेलें व्याख्यान)

हल्लींच्या स्थितींत होत असलेले शोध आणि सुधारणा ह्यांच्या मानाने पाहता आमच्या कायमच्या हितसंबंधाकडे आम्ही आपल्या पूर्वजांपेक्षा कमी लक्ष पुरवीत आहो हे दिसून येत आहे. आमच्या सनातन हिताहितसंबंधी विचार करण्याची जबाबदारी आम्हांपैकी सुशिक्षित वर्गावर विशेषत: असूनही त्यांचे बहुतेक सर्व लक्ष चालू गोष्टीतच गुंतुन जात आहे. आज ना. बसूचे बिल, उद्या गुजराथचा दुष्काळ, ह्या आणि अशा तात्पुरतिक चळवळीतच आमच्या शक्तीचा लय होत आहे. शिवाय जगात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी बातमी पोहोचविण्याची साधने अत्यंत सुलभ झाल्यामुळे तर नित्य नव्या चळवळी आणि नवे प्रश्न ह्यांनी मन व्यग्र होऊन मनाची वरील कामचलाऊ स्थितीच दुणावत आहे. परंतु आमच्या ह्या प्रार्थना समाजसंस्थेचा उद्देश मनुष्याने आपल्या नित्याच्या गरजा सांभाळून कायमच्या हिताकडे आपले लक्ष लावावे हा आहे. म्हणून आपण वरील विषयाविषयी थोडासा विचार करूं.

आत्मा हल्लींप्रमाणें देहांत राहूं लागल्या काळापासूनही त्याचा इतिहास अत्यंत दीर्घ काळाचा आहे हे ह्या देहाच्या विलक्षण रचनेवरूनच दिसून येणार आहे. मग देहातील त्याच्या प्राचीन चरित्राची नुसती कल्पनाही आपणांस करवत नाही म्हणून त्याचा प्रस्तुत विचार करणे नाही. तो अत्यंत प्राचीन यात्रेकरू आहे, एवढेच लक्षात नीटपणे आणून ह्या पुढील त्याच्या यात्रेच्या किंचित भागाचे दिग्दर्शन आज करावयाचे आहे.

आत्मा पुरूषस्थितीला येऊन पोहोचल्यापासून त्याला चार प्रकारचे पुरूषार्थ साधावयाचे असतात, असे आपल्या हिंदुधर्मात सांगितले आहे. ते-अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष. ह्यांपैकी पहिला जो अर्थ हा केवळ साधनीभूत आहे. काम किंवा धर्म ह्या दोन्ही पुरूषार्थाला ह्याची जरूरी असते आणि त्याच्याशिवाय ह्याचा काहीच उपयोग नाही. ह्यावरून अर्थ हा एक निराळा पुरूषार्थ आहे असे विशेष विभागदृष्ट्या म्हणता येत नाही. ना काम ना धर्म; केवळ अर्थच साठविणारे असे काही अभागी आणि अधन्य पुरूष आढळून येतात, ते केवळ अपवादात्मक होत. १०० साधारण माणसांमध्ये असे अपवाद क्वचित आढळावयाचे. कंजूष माणसाचे राष्ट्र, कंजूष माणसाचे गाव किंबहुना कंजूष माणसाचे कुटुंबही असणे शक्य नाही. ते शक्य असते तर हाही एक निराळा पुरूषार्थ संभवला असता. तसेच शेवटचा अर्थ जो मोक्ष हाही ह्यामधील दोन पुरूषार्थांचा एक अवश्य घडणारा परिणाम आहे. आपल्या प्राचीन वेदांताचे (गौडपाद) असे मत आहे की, मोक्ष ही एक पुढे कधीतरी आरंभणारी स्थिती नाही. तिचा पुढे कधी तरी आरंभ व्हावयाचा असेल तर तिचा अंतही होणार असावयाचा. ज्याला आदी आहे त्याला अंत आहेच. मग असा अंत पावणारा मोक्ष मिळाला तरी त्याला दुस-या मोक्षाची आकांक्षा रहाणार. ह्यावरून पहिला पुरूषार्त केवळ साधन आणि चौथा पुरूषार्थ हा एक केवळ परिणाम हे ध्यानात आणिले असता खरे पुरूषार्थ केवळ दोनच आहेत असे दिसून येते. ते काम आणि धर्म हे होत.

ह्या दोन्ही शब्दांविषयी आपल्या प्राकृत भाषेत पराकाष्ठेचा गोंधळ माजलेला आहे. शब्दांचे यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय आणि त्यांची सम्यक् योजना न करता भाषेचा व्यवहार करणे म्हणजे मोठा धोका आहे. हे थोड्या दिवसांपूर्वीच आमच्या ह्या समाजाचे सन्मान्य अध्यक्ष सर नारायण ह्यांनी फार उत्तम रीतीने दुसरीकडे सांगितल्याचे आपल्याला स्मरत असेलच. काम म्हणजे काही विवादित दुष्ट वासना आणि धर्म म्हणजे देवाविषयी आणि परमार्थाविषयी काही गोष्ट असा ह्या दोन्ही शब्दांचा आकुंचित अर्थ हल्ली अगदी रूढ झालेला आहे. पण वस्तुत: पहाताच काम ह्याचा अर्थ इच्छा अर्थ इच्छा किंवा मनाची भूक आणि धर्म ह्याचा अर्थ कर्तव्यबुद्धी हा आहे. संस्कृत वाडमयामध्ये व इकडील देशात इंग्रजीचा व्यवहार सुरू होण्यापूर्वी प्राकृत भाषांमधूनही धर्म ह्या शब्दाचा केवळ कर्तव्यकर्म असाच साधा अर्थ होत असे. मग ते कर्तव्यकर्म एकाद्या शास्त्रात किंवा ग्रंथात सांगितलेले असो, किंवा ईश्वराने मनुष्याच्या मनामध्ये प्रत्यक्ष प्रेरणा केलेले असो, मनुष्याच्या मनाच्या स्वाभाविक प्रवृत्तीकडे पाहिले असताही त्या ह्या दोनच प्रकारच्या आहेत असे दिसून येते. अमुक एक गोष्ट रूचकर आहे, अमुक एक हितकर आहे, अमुक एक सुंदर आहे, ती आपणांस पाहिजे अशी इच्छा होणे ही एक प्रवृत्ती. अमुक एक गोष्ट रूचकर असो व नसो, सुंदर दिसो वा न दिसो किंबहुना आपल्या स्वत:स हितकर असो वा नसो, ती योग्य आहे म्हणून आचरलीच पाहिजे, किंवा अयोग्य आहे म्हणून टाकलीच पाहिजे, अशी आतून प्रेरणा होणे ही दुसरी प्रवृत्ती. पहिलीचे नाव कामना व दुसरीचे नाव कर्तव्यबुद्धी. ह्या दोन्ही प्रवृत्तींना अनुसरून आत्म्याला दोन भिन्न पुरूषार्थ साधावयाचे असतात. ते साधित असताना केवळ उपकरण म्हणून त्याला अर्थसंचयही करावयाचा असतो आणि हे दोन पुरूषार्थ तो ज्या ज्या मानाने अधिक अधिक साधीत जाईल त्या त्या मानाने त्याची यात्रा अधिकाधिक सफल होते व ती झाली म्हणजे तो मुक्त किंवा पूर्ण झाला म्हणावयाचे.

आता आपण ह्या दोन प्रवृत्तींचाच विशेष विचार करू. साधारणत: लौकिकात असा समज आहे की, ह्या दोन वरील स्वाभाविक मन:प्रवृत्तींपैकी कामना ही हलक्या दर्जाची आणि कर्तव्यबुद्धी ही श्रेष्ठ दर्जाची आणि वस्तुत: जरी लोकांचा खरा ओढा, कर्तव्यापेक्षा कामनेकडेच अत्यंत अधिक आहे तथापि त्याचा समज पाहू गेले असता वरीलप्रमाणे विपरीत दिसून येतो. पण हा केवळ गैरसमज आहे. कामना आणि कर्तव्यबुद्धी ह्या दोन्हीही सारख्याच ईश्वरदत्त आहेत आणि त्या दोहोंचे कार्यही आत्म्याच्या यात्रेत सारखेच पवित्र आणि सारख्याच महत्त्वाचे घडून येत आहे. खाणे, पिणे वगैरे शारिरीक वासनांमध्येच गुरफटून असलेल्या आद्यस्थितीतील पुरूषांची कर्तव्यबुद्धीही बेताचीच असते आणि श्रेष्ठपदाप्रत पोहोचलेल्या पुरूषांमध्ये विकास पावणा-या कर्तव्यबुद्धीची कारणे शोधून पाहता ती त्याच्या थोर मनकामनामध्येच आढळून येणार आहेत. ह्यावरून पाहता यद्यपि कठोपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे प्रिय वस्तू एक, श्रेयस्कर वस्तू निराळीच म्हणजे कामना आणि कर्तव्यबुद्धी ह्या दोन अगदी भिन्न प्रवृत्ती आहेत हे जरी खरे आहे, तथापि ह्या प्रत्येकीचा विकास परस्परांवर अवलंबून आहे. जगाचे कल्याण मनुष्याच्या कर्तव्यबुद्धीमुळेच झाले आहे आणि कामनेमुळे नाही असे मुळीच म्हणता येत नाही. प्राचीन काळी मोठमोठ्या तत्त्वांचा जो शोध लागला, आधुनिक काळी जे शास्त्राचे शोध लागत आहेत, ते केवळ कर्तव्यबुद्धीमुळे नव्हेत, तर शोधकाच्या जिज्ञासास्वरूपी मनकामनेमुळेच होत. मला जगताचे कल्याण कर्तव्य आहे म्हणून कोणी शोधक होत नाही, तर क्षुधितास जशी अन्नाची जरूरी वाटावी तशी विवक्षित पुरूषास ज्ञानाची हाव सुटून तो शोधक बनतो, त्याच्या त्या मनकामनेमुळे आणि ती पूर्ण करून घेण्यामध्ये त्याने दाखविलेल्या पुरूषार्थामुळे जगताचे कोटकल्याण होते. कामनेचा हव्यास नसताना केवळ जगताची कितीही कीव येऊन मनुष्यास कर्तव्यजागृती झाली असती तरी त्याच्या हातून हे कोटकल्याण झाले नसते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या ललितकलांचा, सदभिरूचीचा, शिष्टाचारांचा आणि सभ्य संप्रदायांचा प्रकार आहे. ललितकलांच्याद्वारा आत्म्याची उन्नती होते ही थोडीबहुत अलीकडचीच भावना आहे. यद्यपि जुन्या धर्माच्या कित्येक प्रचारात संगीतादी कलांची योजना रूढ झालेली आहे; तथापि ह्या कलांचा आधअयात्मिक प्रभाव आणि त्यांच्या विस्ताराची जरूरी अद्यापि कळून यावी तितकी आलेली नाही. संगीत, चित्रलेखन, शिल्प, वाड्मय, वक्तृत्व आणि विनोद इत्यादी कलांचा विकास होण्याला कारण मनुष्याची कर्तव्यबुद्धी अथवा धर्म हा पुरूषार्थ नव्हे तर काम हा पुरूषार्थ होय. सौंदर्याचे दर्शन होऊन मनुष्य तळमळू लागला आणि पुढील सौंदर्यास किंवा आपल्या मनाच्या स्थितीला दृश्य स्वरूप देऊ लागला म्हणजे ह्या विविध कलांचा विकास होतो, आणि तद्वारा दुस-याचीही अभिरूची, सहृदयता, सानुकंपा वाढते. एका आधुनिक बंगाली चित्रकाराने काढलेले शहाजहानाचे स्वप्न हे चित्र ज्यंनी पाहिले असेल त्यांनाच कळून येण्यासारखे आहे की हल्ली यमुनेच्या तीरावर उभारलेला ताजमहाल, तो बांधण्यापूर्वी शहाजहानाच्या मनकामनेमध्ये कित्येक दिवस पोहत होता. त्याला दृश्यस्वरूप द्यावयाची इच्छा शहाजहानाला अनावर झाली म्हणून पुढे वीस हजार मनुष्यांनी २२ वर्षे खपून त्याला हल्ली दिसतो तसा उभा केला आहे. हा शहाजहानाच्या कर्तव्यबुद्धीचा प्रभाव नव्हे तर त्याच्या कल्पनेचा विकास होय. पुष्कळ वेळां खोट्या कर्तव्यबुद्धीमुळे म्हणजे समाजाच्या विघातक अशा वैराग्यवृत्तीमुळे वरच्यासारख्या कित्येक शुद्ध आणि दैदीप्यमान कामनांचा नायनाट झालेला आहे. मनुष्यव्यक्तीचे आणि राष्ट्राचे आजवर नुकसान झाले आहे ते त्याच्या केवळ क्षुद्र स्वार्थपरतेमुळेच झाले आहे असे नव्हे तर त्याने खोट्या धर्मबुद्धीला बळी पडून आपल्या उदात्त कामना पूर्ण करून घेण्याचा पुरूषार्थ साधला नाही म्हणूनही झाले आहे. मनुष्याच्या मनाचा विकास जसजसा अधिकाधिक होतो तसतशा त्याच्या कामना अधिक पवित्र, अधिक महत्त्वाच्या आणि अधिक लोकहितकारक होतात, इतकेच नव्हे, तर त्यामुळे त्याच्या कर्तव्यबुद्धीचेही क्षेत्र अधिक शुद्ध आणि अधिक विस्तृत होते. म्हणून जो धर्म अथवा जी कर्तव्यबुद्धी ह्या कामनेच्या मुळाशीच कुठार घालू पहाते तो अधर्म समजावा. पुरूषार्थहीन माणसे आपला दुबळेपणा विसरून ह्या अधर्माचा सहज आश्रय करतात आणि आपणांस धार्मिक समजतात पण त्यात त्यांचे आणि सर्वांचेच अशुभ होते, ते न व्हावे म्हणून प्रत्येकाने कामना ह्या पहिल्या पुरूषार्थासंबंधाने दक्ष असावे. पण कामनेच्या मानानेच कर्तव्यबुद्धीचाही विकास झाला पाहिजे, म्हणजे कर्तव्याचा ओघ कामनेच्या उलट न वाहता जसजसा कामनांचा विकास होईल तसतसा त्यांच्या शुभ परिणामाचा विस्तार सर्व जनसमूहावर करून देण्याची कामगिरी कर्थव्यबुद्धीने केली पाहिजे आणि हाच धर्म हा दुसरा पुरूषार्थ होय. जगाच्या इतिहासामध्ये आजवर हा पहिला पुरूषार्थ ज्यंनी नेटाने साधला आहे असे तत्त्वद्रष्टे, कवी, कलावंत, वक्ते, विनोदी महात्मे वेळोवेळी निर्माण झाले आहेत. परंतु त्यांच्या कृतीचा शुभ परिणाम सर्व जगतावर विस्तरणारे कर्तव्यवान पुरूषही निपजावयाला पाहिजेत. त्यांनी आपली स्वार्थपरायणता बाजूला ठेवून वरील शुभाचा विस्तार हाच आपला स्वार्थ केला पाहिजे. ह्या विस्ताराच्या मार्गांमध्ये जे हीनधर्म, क्षुद्रधर्म, मृतधर्म आड येतील ते काट्यासारखे निवडून काढून लोकहिताचा मार्ग खुला केला पाहिजे. शुद्धता, स्वतंत्रता, समानता ह्यांची द्वाही फिरविली पाहिजे. व्हावे तितके आजवर असे न झाल्यामुळे कोठेतरी क्वचित एकादी अद्वितीय तेजस्वी विभूती, आणित त्याच्याभोवती गाढ अज्ञानांधकारामध्ये बुडालेले जनसमूह, एकादा प्रतापी राजा आणि त्याच्याभोवती पशुतुल्य प्रजासमूह, एकादा श्रीमान पुरूष आणि त्याच्या सभोवती दैन्य आणि दारिद्र्य ह्यांत रूतलेले त्याचे सजातीय, असे ओंगळ देखावे इतिहासात असंख्य दिसत आहेत. ते नाहीसे होऊन आत्म्याची यात्रा सुरळीत चालावी आणि जनता सुखी व्हावी असे असेल तर आपण दुस-या ह्या पुरूषार्थाविषयी दक्ष असले पाहिजे. कामना आणि कर्तव्यबुद्धी ह्या वरील मन:प्रवृत्ती अगदी भिन्न आहेत असे वर सांगितले, पण त्यांना अनुसरून मनुष्य जसजसा पुरूषार्थ गाजवू लागला तसतसा ह्या दोहोंमधील अलगपणा नाहीसा होऊन त्यांची सांगड जुळते आणि कर्तव्यबुद्धी हीच एक कामना आणि कामना हेच क कर्तव्य असे ह्या दोन पुरूषार्थाचे ऐक्य भासू लागते. असे झाल्यावर तेच एक पूर्णतेचे किंवा मोक्षाचे लक्षण होय. भिन्न पुरूषार्थ संपादन करण्याचे प्रयत्न करीत असता आत्म्यास शीण आणि श्रम हे होणारच. परंतु देहामध्ये जसा आत्मा, तसाच विश्वामध्येही एक परमात्मा असून त्याचे दर्शन झाल्यावर आत्म्यास पले श्रम विसरून जाऊन विसावा खावा लागतो. आपली कामना आणि कर्तव्यबुद्धी ही दोन्ही ह्या परमात्म्याच्या कामना आहेत, असे ओळखल्यावर आत्म्याला आपल्या यात्रेमध्य विसावा होतो. इतकेच नव्हे तर त्याला ह्या दोन भिन्न पुरूषार्थांचे ऐक्यही दिसून येते. परमात्मरूप दर्शन प्राप्त झाल्याशिवाय आत्म्याला विसाव्याला ठिकाणच नाही.

‘ज्याते स्मरता मीपण जाय | आत्मा प्राण विसावा माय ||

असा हरी सापडावयालादेखील अगोदर वरील दोन पुरूषार्थ साधले पाहिजेत. आत्म्याने आपल्या कामनेची आणि कर्तव्यबुद्धीची शिकस्त केल्याशिवाय त्याला परमात्मदर्शनाचा मार्ग खुला होणे शक्य नाही.

परमात्माही विश्वामध्ये आपल्या कामना पूर्ण करून घेत आहे व अहर्निश आपले कर्तव्य बजावीत आहे हे निरखण्याला आम्ही तेव्हाच समर्थ होऊ की जेव्हा आम्ही हे वरील दोन्ही पुरूषार्थ अंशत: तरी साधू आणि यद्यपि आमचे हे दोन्ही पुरूषार्थ पूर्णपणे साधले गेले नाहीत, तथापि ह्या परमार्थ दर्शनामुळेच आत्म्याच्या यात्रेमध्ये वेळोवेळी आम्हांला विसावा मिळेल, ती सुरळीत चालेल आणि योग्य काळी तीस फलही येईल.