स्कॉच सरोवरांत

स्कॉटलंडचे राजधानीचे शहर एडिंबरो हे सगळ्या ग्रेटब्रिटनात अत्यंत सुंदर आहे. समुद्रकाठी टेकड्यांच्या आंदोलावर, ह्यास ठिकाण फार अनुकूल मिळाले असून, स्वतःचा बांधाही पाखरासारखा आटोपशीर व टुमदार आहे. त्यामुळे अवजडशा लंडनसारख्या शहरातून आलेल्या पांथाचे मन ह सकृद्दर्शनीच हरण करिते. युरोपात हे एक पाहण्यासारखे स्थळ असून आत्मसंतुष्ट स्कॉच लोकांस ह्याबद्दल मोठा अभिमान वाटत आहे. आजूबाजूच्या सात टेकड्यांमध्ये हे वसले असल्याकारणाने स्कॉच लोक ह्यांस आधुनिक अथेन्स असे म्हणतात, व आल्यागेल्यांस त्यंचे मत विचारतात. इतकेच नव्हे तर अथेन्सची सर आणण्यास तेथील एका प्राचीन इमारतीच्या अवशेष राहिलेल्या खांबांच्या रांगेचे येते एका टेकडीवर हुबेहूब अनुकरण केले आहे. ह्या स्वच्छ व सुखी नगरीत एक आठवडा घालवून पुढे मी ग्लासगो येथे गेलो. उद्योगाची धडधड, व्यापाराची घडामोड, गर्दी, धूर आणि धुरळा इ. आधुनिक सुधारणेची वरवर दिसणारी लक्षणे येथे भरपूर आहेत. तीनच दिवस येथे राहून माझे इष्ट स्थळ जो स्कॉच सरोवर प्रांत, तिकडे निघालो. पण तितक्याच अवधीत मला भावी एकांताच्या सेवनार्थ फार चांगली भूक लागली होती.

ग्लासगोच्या एका धुकटलेल्या बोगद्यातून आगगाडीने मला फरफटीत बाहेर ओढून एके सुप्रभाती क्लाईड नदीच्या खाडीत निवांत पाण्यावर आणून सोडिले. किती तरी आराणूक वाटली मनाला! पण येथेही माणसांची गर्दी काही चुकली नाही. इतका वेल कामात गुंतलेल्यांच्या गर्दीत होतो, तर आता विश्रांती घेणा-यांच्या गर्दीत पडलो! ज्या बोटीत मी उतरलो ती आधीच भरून गेली होती. अशा भरलेल्या बोटी वेळोवेळी बंदरातून निघून, गिरिगव्हर, मैदान, जंगल इ. निरनिराळ्या प्रांती शिरत. ह्या गर्दीपैकी काहीना काम फार पडल्यामुळे व काहीना काम मुळी नसल्यामुळे शीण आला होता. तथापि शरण आलेल्यांचे गुणावगुण न पाहता सृष्टिमाता सर्वांचे सारखेच सांत्वन करू लागली. सुधारणेचा ताप किती आहे हे खरे पहावयाचे असल्यास एकाद्याने अशा विश्रांतीच्या ठिकाणी किती व कोणत्या प्रकारची झांगड लागून गेलेली असते ते पहावे. इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड इतकेच नव्हे तर युरोपातील निरनिराळ्या ठिकाणांहून विशेषेकरून अमेरिकेतून लोक येथे येतात व तसेच इतर ठिकाणीही जातात. डोंगराच्या खबदडीतही सुखाचे प्रत्येक साधन पुरविणारी, व अहर्निश सृष्टि-नटीचे सर्व हावभाव दाखविणारी हॉटेले येथे सर्वत्र सज्ज होऊन वाट पहात उभी आहेत. खुश्कीने व जलमार्गाने प्रवासाचे दर कमी करून भपकेदार वर्णनाची गाईडबुके लिहून, जाहिराती देऊन वगैरे वगैरे नाना उपायांनी व्यापारी लोक गि-हाईकांस घरातून बाहेर काढतात. तशात, फॅशनदेवीचे नवस पुरविणेही इकडे फार जरूरीचे झाले आहे. ज्या ठिकाणी हिवाळा व पावसाळा घालविला तेथेच उन्हाळ्यातही राहणे म्हणजे इकडच्या संभावितपणाला शोभत नाही. अशा अनेक कारणांमुळे मला ही गर्दी जमलेली पाहून फारसे आश्चर्य वाटले नाही. आश्चर्य वाटले ते हे की, ह्या लोकांची विश्रांती घेण्याची त-हा दगदगीचीच. निदान मला ती तशी भासली. रेल्वेवर काम करून शिणलेले तरूण पुरुष, पोस्टात खपणा-या तरूण मुली, गिरणीतले मजूरही, एथील निरनिराळ्या भागांतील इतिहासप्रसिद्ध स्थळे व सुंदर देखावे रात्रीचा दिवस करून पाहून जात असतात.

असो. आमची आगबोट क्लाईड नदीच्या रूंद खाडीतून लवकरच लाखलाँग नावाच्या सुंदर व चिंचोळ्या सरोवरात शिरली व स्कॉटलंडच्या पश्चिम भागातील हायलँड नावाच्या जगप्रसिद्ध डोंगरी प्रदेशात वरवर जाऊ लागली. दोहोंकडे केवळ सामसूम होते. शांती आणि समाधान ही स्वर्गीय भावंडे पहाटेच्या प्रहरी येथे विश्रंभाने दोहों काठांवर झोपीच गेली होती जणू! प्रत्येक वळशासरशी नवेनवेच पडदे आम्हांपुढे पसरत. आता सरोवर संपले, पुढील खडकावर आम्ही उतरणार असे म्हणतो तोच पुन: पाणी आणि पर्वत, गवत, वृक्ष आणि वेली ह्यांचे अकल्पित भांडार पुढे दिसू लागे. अखेरीस लॉखलाँगच्या अगदी शिरोभागी अँरोखर नावाच्या जंगली बंदरात आगबोट रिकामी झाली. ह्या लहानशा ठिकाणी घरापेक्षा हॉटेलांचीच संख्या अधिक होती आणि घरात राहणा-या साध्याभोळ्या हायलंडरांनाही ह्या लाघवी सुधारणेने पैशाची चट लावून दिली होती हे लवकरच दिसून आले.

येथून दीड मैलावर सगळ्या, ‘स्कॉच सरोवराची राणी’ जी लॉखलोमंड तिचा अमल सुरू होतो. ह्या सर्व प्रदेशात वस्ती फार विरळ विरळ आहे. मैल-दीड मैलावर एकादी शेतक-याची झोपडी अगर गृहस्थाचा वाडा लागतो. सुदैवाने ह्या एकांत स्थळी मला तीन निरनिराळ्या झोपड्यांत जागा मिळाल्याने ह्या सर्व प्रदेशात फिरून पाहण्यास सापडले, आणि हॉटेलात राहणा-या नागरिक लोकांचा संसर्गही थोडा वेळ चुकविता आला. लॉखलोमंडच्या दुस-या बाजूस ४-५ मैलांवर प्रख्यात कवी सर वॉल्टर स्कॉट ह्याच्या ‘लेडी ऑफ दि लेक’ ह्या काव्यातील मुख्य स्थळ लॉख कॅट्रीन हे आहे. ही तर सौंदर्याची खाणच स्कॉट कवीला लाभली होती. सरोवराच्या शिरोभागी ट्रोसॉक्स नावाच्या मनोहर दरीकडे जाताना एलन्स आईल नावाचे वरील काव्यातील नायिकेचे सुंदर स्थान लागते. त्याला अगदी चिकटूनच प्रेक्षकांची नौका जात असताना प्रत्येकाचे अंतःकरण सद्गदित झाल्यावाचून राहत नाही. यावत्काळ हा डोंगर, हे सरोवर व ही दरी पृथ्वीवर राहतील तावत्काळ स्कॉटच्या नावाला व त्याच्या साध्या सरळ व सोप्या भारतीला बाध येणार नाही ही साक्ष पटते. मी दरीत शिरलो तेव्हा :

“All in the Trossak’s glen was still,
Noon tide was sleeping on the Hill”

हा कवीचा दाखला मला प्रत्यक्ष पटला! येथून पाऊल परत घेणे जिवावर आले !