निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन

(बेळगांव येथील म्युनिसिपल हॉलमध्यें ता. २५ मे १९१२ रोजीं मेहरबान आर. सी. ब्राउन साहेब बेळगांवचें कलेक्टर ह्यांचे अध्यक्षतेखालीं झालेल्या भाषणाचा थोडक्यांत सारांश.)

मंडळीचें धोरण व जबाबदारी
ह्याविषयीं मंडळीनीं वेळोवेळीं शांतपणानें व स्पष्टपणानें खुलासा करावा तितका थोडाच आहे. कारण ह्या बाबतीत नव्या व जुन्या लोकांमध्ये, योग्यायोग्य कारणांवरून मंडळीच्या कामासंबंधी गैरसमज उत्पन्न होऊन इतर अनेक अपरिहार्य अडचणींमध्ये ह्या परिहार्य अडचणींची भर पडते. हजारो वर्षे अज्ञानाचे काळोखात पडलेल्या ह्या कोट्यवधी हीन जातींमध्ये आज एकदम आधुनिक शिक्षणपद्धतीच्या उजेडाचा लोट सोडल्यामुळे त्यांचा मोठा समाज विचकून अस्वस्थ होईल व कदाचित स्थापित राजसत्तेस अपाय पोहोचेल असा पहिला आक्षेप निघण्याचा संभव आहे, पण ह्या गरीब जातीच्या सुदैवाने व सरकारच्या शहाणपणाने सरकारचे सहानुभूतिपूर्वक लक्ष ह्या प्रश्नाकडे ही मंडळी निघण्यापूर्वीच कित्येक वर्षे लागले असल्यामुळे वरील वेडगळ आक्षेप बहुतेक मुळीच घेण्यात आला नाही असे म्हणण्यास हरकत नाही, उलट इलाख्याच्या अधिपतीपासून तो जिल्ह्याचे अधिपतीपर्यंत सरकारी अधिका-यांनी वेळोवेळी ह्या कार्यास प्रोत्साहन दिले आहे. हेही मंडळी जाणून आहे व तदनुरूप तिचे वर्तन आहे.

दुसरा महत्त्वाचा पण वरच्या इतकाच भ्रममूलक आक्षेप असा निघण्याचा संभव आहे की, आजपर्यंत निर्जीव अवस्थेत पडलेल्या ह्या प्रचंड समूहापूढे आज एकदम आधुनिक शिक्षण पद्धतीच्या द्वारा समता, स्वतंत्रता, बंधुता इत्यादी विक्षोभक तत्त्वांचे आदर्श ठेविल्यामुळे हा समूह जागृत होऊन वरील वर्गाचा द्वेष करू लागेल व सामाजिक युद्ध जुंपेल, ह्या आक्षेपात कादंबरी किती आहे व सत्य किती आहे हेही मंडळी पूर्ण जाणून आपले काम निमूटपणाने पण नेटाने करीत आहे, इतकेच नव्हे तर मंडळीच्या बाहेरील उतावळ्या वक्त्यांकडून विशेषतः अस्पृश्य आणि मागासलेल्या वर्गातील वक्त्याकडून जेव्हा जेव्हा ह्या बाबतीत हयगय होते तेव्हा तेव्हा मंडळीकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

तिसरा एक चमत्कारिक आक्षेप धर्माच्या नावाने वस्तुतः धर्मपंथाच्या वतीने दोन परस्परविरुद्ध बाजूने घेण्यात येतो. तो असा :- ह्या मंडळीचे कार्य सुरू झाल्यापासून ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचे कामी मोठा अडथळा आला आहे असे काही आमचे ख्रिस्ती मिशनरी बंधू ओरडू लागले आहेत. उलट बाजूने काही जुन्या हिंदुधर्माभिमानी मित्रांकडून असा आक्षेप ऐकण्यात येतो की आमच्या धार्मिक प्रयत्नामुळे ह्या वर्गातील धार्मिक आचारविचारांत ढवळाढवळ होऊन हे हिंदुत्वाला मुकतील. हे दोन्ही आक्षेप परस्परविघातक आहेत हे एक आमचे सुदैव आहे, इतकेच नव्हे, तर त्या त्या बाजूनेच ह्या काल्पनिक आक्षेपांचे क्रियात्मक निरसन होईल, अशी सहानुभूती व मदतही आम्हांला मिळत आहे. उदाहरणार्थ नुकतीच एका प्रसिद्ध अमेरिकन ख्रिस्ती मिशनरीने न मागताच आम्हांला स्वतःच्या खिशातून पैशाची मदत पाठविली आहे. उलटपक्षी ह्या वर्गातील धार्मिक आचारविचार उज्ज्वल आणि उन्नत हिंदुधर्मास शोभण्यासारखे नाहीत हे जाणून कित्येक वयोवृद्ध आणि ख-या हिंदुधर्माच्या अभिमान्यांनी मंडळीच्या निरनिराळ्या ठिकाणी तुकाराम, रामदास, इत्यादिकांच्या उपदेशांच्या द्वारे धर्म आणि नीतिशिक्षणाचे काम चालविले आहे.

उद्योगधंद्याच्या बाजूने, व्यावहारिक शक्यतेच्या दृष्टीने आणि इतर अनेक त-हेने मंडळीच्या कार्यासंबंधी वेळोवेळी लहानमोठ्या असंख्य शंका व हरकती घेण्यात येतात, आणि विशेषेकरून ह्या मंडळीचे प्रयत्न लोकाश्रयावरच केवळ अवलंबून असल्यामुळे मदत मागावयास गेले असता पावलोपावली अशा हरकतीतून अडखळत मंडळीला मार्ग क्रमावा लागत आहे. म्हणून शेवटी वरील सर्व आक्षेपकांना एवढीच विनंती आहे की, मंडळीच्या कार्यास प्रत्यक्ष थोडासा हातभार लावून पहावा, म्हणजे आपल्या आक्षेपांस कसा अवकाश मिळत नाही हे तेव्हाच दिसून येईल.

कर्नाटक शाखा
मंडळीच्या कार्याची आवश्यकता सर्व हिंदुस्थान देशभर आहे. विशेषेकरून जसजसे खाली दक्षिणेत उतरावे, तसतसे तर अशा प्रयत्नांची अत्यंत जरुरी भासते. मंडळीचे ठिकाण मुंबईस आहे व तिच्या शाखा मुंबई इलाखाभर असून बाहेर मध्यप्रांत आणि मद्रास इलाख्यातही त्या आहेत. तरी बाहेरील ह्या ब-याच ठिकाणी ह्याच कामाकडे वाहिलेला निदान एकतरी प्रतिनिधी असलेल्या अशा सुव्यवस्थित आणि नियमबद्ध शाखा नसून नुसत्या फावलेल्या वेळी काम करणा-या किंवा मदत पाठविणा-या सद्गृहस्थांच्या स्थानिक कमिट्या आहेत. निरनिराळ्या भाषा चालू असलेल्या निरनिराळ्या प्रांती एक मुख्य शाखा आणि मग तिच्या उपशाखा निघाल्याशिवाय मंडळीच्या कामास म्हणण्यासारखा जोर येणार नाही. अशा शाखा निदान कर्नाटक आणि गुजराथ ह्या प्रांती एक दोन वर्षांतच उघडण्याचा मंडळीचा निश्चय आहे, त्यांपैकी कर्नाटक शाखा उघडण्याची पूर्वतयारी करण्याकरिता मंडळीचे प्रतिनिधी हल्ली ह्या प्रांती फिरत आहेत. ह्या शाखेच्या दोन वर्षांचा खर्चाचा अंदाज सुमारे २।। हजार रुपयांचा असून सुमारे १। हजार कर्नाटकात ह्या फिरतीवर जमवावयाचा आहे. त्यांपैकी ५०० रु. मिळवून देण्याचे येथील मंडळीनी मनावर घेतले आहे. येथील चिकित्सक पत्राने आमच्या कामासंबंधाने सहानुभूतीपर लेख लिहिला, व त्यामुळे आमच्या कामास येथे इतकी रक्कम जमा झाली. एकदर्थ आम्ही चिकित्सकाचे आभार मानतो. तसेच ह्या बाबतीत येथील अत्यंत उत्साही वकील रा. रंगराव नाईक ह्यांच्या निःस्वार्थ खटपटीबद्दल व्याख्यात्यांनी फार आभार मानिले व अशीच मदत इतर शहरी मिळून शाखा एक दोन महिन्यांतच स्थापिली जाऊन त्यांचेबरोबर असलेले त्यांचे सहकारी मि. सय्यद अबदुल कादिर ह्यांच्या हवाली ती करण्यात येईल अशी उमेद त्यांनी प्रदर्शित केली.

बोर्डिंगची जरुरी
सरकार, लोकल बोर्ड आणि म्युनिसिपालिट्या ह्यांच्या आश्रयाखाली ह्या लोकांसाठी पुरेशा वस्तीच्या ठिकाणी शाळा आता बहुतेक इलाखाभर पसरल्या आहेत, पण त्यांपैकी पुष्कळ चालाव्या तशा चांगल्या चालल्या नाहीत. ह्याचे मुख्य कारण योग्य शिक्षकांची उणीव हेच होय. ही उणीव भरून काढण्याकडे मंडळीचे लक्ष लागावे असे मोठ्या अधिकारी लोकांनी बोलून दाखविले आहे व ह्या मंडळीलाही तसेच वाटत आहे. शिवाय कशातरी शाळा काढून पाच तास एकत्र बसविल्याने कार्यभाग न होता चालू शाळांतून हुषार व होतकरू मुले निवडून त्यांचा पुढील अभ्यासक्रम मंडळीच्या अधिका-यांनी खुद्द आपल्या नजरेखाली त्या मुलांना रात्रंदिवस आणि बारा महिने ठेवून घेऊन करवावा, म्हणजे त्यांचे शिक्षण चांगले होईल, इतकेच नव्हे, तर त्यांची चाल, रीत, भाषा आणि सर्व संवयी सुधारतील, ह्याच उपायांनी त्यांच्यात चांगले शिक्षक निपजतील व थोडक्याच काळात ते आपल्या जातीची आपणच सुधारणा करू पाहतील, म्हणून अशा प्रत्येक प्रांतातील मुख्य शाखांचे बोर्डिंग अथवा विद्यार्थी वसतिगृह हे मुख्य व जरुरीचे अंग आहे.