'नॉटर डेम् ड ला गार्ड' देऊळ व तें पाहून सुचलेले विचार.

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड.
ता. २९।११।१९०१.

पुण्यास जशी पर्वती, मुंबईस जसा बाबुलनाथ, तसें हें वरील नांवाचें देऊळ मार्सेय येथें आहे.  ह्या फ्रेंच नांवाचा मराठींत अर्थ 'आमची रक्षक माता' असा होतो. ही माता म्हणजे श्री येशू ख्रिस्ताची आई कुमारी मेरी ही होय.  हीच ह्या देवळांतील मुख्य आराध्यदैवत आहे.  शहराला लागूनच आग्नेय बाजूस एक उंच टेंकडी आहे.  तिच्या माथ्यावर हें सुंदर देऊळ बांधिलें आहे.  टेंकडी चढून वर जाईपर्यंत थकवा येतो. टेकडीच्या पायथ्यापासून तों माथ्यावर देवळाच्या दारापर्यंत लिफ्टनें प्रेक्षकजनांस वर उचलून नेण्याची योजना केली आहे, असें आम्हांस वर गेल्यावर कळून आलें. ही टेकडी समुद्राच्या कांठावर असल्यानें येथून एका बाजूस अनंत महासागराचा व दुसर्‍या बाजूस चित्रविचित्र मार्सेय शहराचा देखावा एकाच वेळीं दिसत होता.  माथ्यावर पोहोंचल्यावर देवळाचा दगडी घाट लागला.  आजूबाजूस आंतबाहेर चहूंकडे झाडून साफ केलें असल्यामुळें, मनाला फार निर्मळ वाटलें.  तसेंच ह्या उंच एकांत पवित्र स्थळीं माणसाची फारशी चाहूल नव्हती.  म्हणून येथें लवकरच मन निःशंक होऊन खेळूं लागलें.  देऊळ भक्कम दगडांचें बांधलें असून काम साधें, सफाईदार व सुबक झालें आहे.  तळमजल्याचें दार झांकलें होतें व आंत अंधार दिसत होता.  देवळाचा मुख्य भाग दुसर्‍या मजल्यांत होता म्हणून आम्ही वर गेलों.  आम्ही हिंदुस्थानचे लोक परकीय यवनांस आमच्या पवित्र देवळांत येऊं देत नाहीं, तसेंच या देवळांतही आम्हां हिंदुनांस जाऊं देतील कीं नाहीं ही अपवित्र शंका आमच्या मनांत येऊन आम्ही सगळे दारांतच गुटमळूं लागलों.  इतक्यांत एका वृद्ध मनुष्यानें आंत जाण्यास खूण केली.

देवळांत शिरलों, तेव्हां १२ चा अम्मल होता. चोहींकडे शांत व गंभीर देखावा दिसत होता.  विरळा एखादा प्रेक्षक अगर उपासक पावलांचा आवाज न करितां जपून पाहून अगर प्रार्थना करून नकळत जात असे.  आंत गेल्याबरोबर दोन्ही बाजूंस दोन मोठ्या ७-८ फूट उंच पितळेच्या लखलखीत ठाणवया दिसल्या.  त्यांवर २।३ फुट लांब बारीक मोठ्या शेंकडों मेणबत्या जळत होत्या.  हे ख्रिस्ती नंदादीप पाहिल्यावर क्यॉथलिक धर्माचें साक्षात् स्वरूप पुढें दिसूं लागलें.  खालपासून वरती गाभार्‍यापर्यंत विशाल भिंतीवरून पौराणिक चित्रें टांगलीं आहेत.  कोठें दुःखितांचे अश्रु पुशीत आहे, कोठें आजार्‍यांस बरें करीत आहे तर दुसरीकडे कोठें स्वतः येशूचीच छळणा चालली आहे, कोठें त्यास सुळावर खिळून टाकलें आहे, अशीं नानातर्‍हेचीं चित्रें हुबेहुब रेखिलीं होतीं.  शिवाय कोपर्‍यांत, कोनाड्यांत, चौकांत चौरंगावर निरनिराळ्या धातूंचे ओतलेले व दगडांचे घडविलेले येशूचे व त्याच्या शिष्यांचे पुतळे बसविले होते व त्यांपुढें धूप, दीप पुष्पांदिकांचा थाट सजला होता.  ही दिव्य शोभा पहात पहात आम्ही शिखराखालच्या मुख्य गाभार्‍यांत उच्च स्थानीं दैदीप्यमान् देव्हार्‍यावर उभी असलेली कुमारी मरीआमा हिच्यापुढें आलों.  ही उंचीनें वीस वर्षांच्या कुमारीइतकी होती.  रंग सांवळा, पोशाक अगदीं साधा व पायघोळ आणि चेहरा उदात्त पण सचिंत आणि उदास दिसत होता. हिनें डाव्या कडेवर लहानग्या येशूस घेतलें होतें.  ह्या उतावळ्या अर्भकाचें वय केवळ १॥ वर्षाचें असून तो कांहीं केल्या आईच्या बगलेंत ठरत नव्हता, ती आई तशीच बालकाकडे अर्धवट दुर्लक्ष करून, त्याचें पुढें कसें होईल ह्याच विवंचनेंत तटस्थ उभी होती. इकडे पोरालाही आईच्या चिंतेची पर्वा मुळींच नसून उलट त्याच्या गुबगुबीत गालावर हास्याचें कमल फुललें होतें !!  त्याच्या डोईवर काट्यांचा सोनेरी मुकूट लकाकत होता.  दीनोद्धारासाठींच जणूं ह्या अचाट कीर्तीच्या लहान मूर्तीनें आईच्या कडेवरून पुढें झेंप टाकिली होती.  ह्या मायालेंकरांच्या दोन्ही बाजूंस नंदादीपाच्या तेजाचें हजारों कारंजीं सतत वहात होतीं ! अशाप्रकारें ह्या दैवी गुणांचें हें मंगल प्रदर्शन पाहून मन आपल्या स्वाभाविक धर्मास अनुसरून सर्व मंगल गुणांचें जें मळ त्यास आळवूं लागलें !  क्षणमात्र सात्त्विक वृत्तीच्या उच्च वातावरणांत विहार करून पुनः मानवी कृतीचें कौतुक करण्यास तें खालीं उतरलें.  इतक्यांत १२ चा ठोका पडून चर्चमधील माध्यान्ह घंटा दणदणूं लागली.  आम्हांला इतर ठिकाणें पहावयाची घाई होती म्हणून आम्ही देवळाच्या दुसर्‍या बाजूचीं चित्रें व पुतळे लगबगीनें पाहून बाहेर पडलों.

तुळजापूरची भवानी, सौंदत्तीची यल्लमा, कोल्हापुरची महालक्ष्मी इत्यादि जीं जीं कांहीं पुरातन हिंदु देवस्थानें पाहिलीं आहेत त्यांची सहजच आठवण होऊन मार्सेयच्या मरीआमाच्या देवळाचे त्यांच्यांशीं साम्यभेद काय आहेत ह्याविषयीं मनांत विचार येऊं लागले.  साम्य हें कीं हिंदु उपासकांस बारामाहे आणि आठी प्रहर आपल्या देवळांत मोठमोठ्या दिव्यांची आवश्यकता वाटते, तशीच येथेंही ख्रिस्ती उपासकांस वाटत आहे.  हिंदु आपल्या देवळांतील भिंतीवर रामरावणाचीं व कौरव पांडवांची चित्रें काढितो तर ख्रिस्त्यानेंही येथें आपल्या भिंती चित्रविचित्र केल्या आहेत.  हिंदु आपल्या देवळांत मुख्य स्थानीं झगझगीत देव्हार्‍यावर पार्थीव मूर्तीची स्थापना करितो, तशी येथें ख्रिस्त्यानेंही आपल्या उपास्य देवतेची मूर्ति उभी केली आहे.  येथपर्यंत दोघांचे केवल साम्य आहे.  ख्रिस्त्यानें हिंदूस हींदन, आयडॉलेटर (मूर्तिपूजक) इ. नांवें ठेवून कितीही हिणविलें तरी त्यानें येथें आपली आकारप्रियता पूर्ण व्यक्त केली आहे.  ही उणीव एखाद्या विशिष्ट धर्मपंथाची अगर मनुष्यवर्गाची नव्हे, तर हिचें मूळ मानवी स्वभावांतच आहे.  म्हण आहे कीं, वाघ्याचा पाग्या बनला तरी त्याचा यळकोट जात नाहीं !  त्याचप्रमाणें तिकडे पौरस्त्यानें आपल्यास पूर्ण ब्रह्मज्ञानी, अद्वैती इ. इ. जाड्या संज्ञा देऊनही त्याच्या पाठीची लिंगपूजा अद्यापि सुटली नाहीं; आणि इकडे पाश्चात्य पॅगनचा ख्रिस्ती झाला तरी मूर्तिपूजा आणि विभतिपूजा ह्यांनीं कोणत्या ना कोणत्या तरी रूपानें त्यांस घेरलें आहेच.

असो; मला येथें मूर्तिपूजेच्या युक्तायुक्ततेबद्दल विचार मुळींच कर्तव्य नाहीं, उलट बाह्य देखावा व आकृति ह्यांच्या साह्यानें ईश्वराकडे मन जास्त लवकर लागतें-निदान साधारण मनुष्यास तर हाच मार्ग योग्य आहे, हा जो मूर्तिपूजेच्या अभिमान्यांचा मोठा मुद्दा आहे तो मीं तूर्त येथें गृहित धरून चालतों !  आणि मीं वर जे हिंदु व ख्रिस्ती देवळांमध्यें साम्य दाखविलें आहे त्यावरूनही वरील मुद्यालाच बळकटी येते; पण पुढें ह्या दोन्ही देवळांत भेद काय आहे तो पहा.  देवळांत मुख्य स्थानीं ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असते त्याविषयीं विचार केला तर बराच भेद दिसून येतो.  कित्येक ठिकाणीं मारुतीच्या, कित्येक ठिकाणीं गणपतीच्या, कित्येक ठिकाणीं भयंकर देवींच्या मूर्ती असतात.  कांहीं ठिकाणीं शेंदूर आणि तेल ह्यांच्या थराखालीं व कांहीं ठिकाणीं बेढब वस्त्रालंकारांखालीं मूर्तीच्या मूळच्या रूपाचा लोप झालेला असतो.  देवळाच्या भिंतींवरील चित्राकडे लक्ष्य गेलेंच तर तेथें गांवठी जिनगराचें कौशल्य झळकत असतें.  चित्रांतील विषय पाहूं गेल्यास कोठें मारुतीनें कुंभकर्णाच्या डोक्यावर गदा मारिली आहे, तर कोठें कृष्णानें राधेस कवटाळलें आहे, कोठें महिषासुरवध तर कोठें रासक्रीडा इत्यादि प्रकार चाललेले असतात.

धर्मसाधनाचे बाबतींत चित्रकार व शिल्पकार ह्यांची मदत अगदीं अवश्यच वाटल्यास वाटो.  पण ती घ्यावयाची झाल्यास सौंदर्यशास्त्री आणि नितिशास्त्री ह्यांच्या सल्ल्यानें तरी ती घ्यावयाला पाहिजेना ?  विशेषतः जेथें केवळ साधारण जनसमूहाच्याच फायद्यासाठीं मूर्तीची योजना झालेली असते, तेथें तर अधिक काळजी घ्यावयाला पाहिजे.  एकाद्या तिर्‍हाईतानें इकडचीं देवळें व त्यांतील मुर्ती पाहिल्या तर तो मूळचा निराकारवादी असला, तरी कदाचित् मूर्तिपूजक होण्याची इच्छा करील.  पण त्याच तिर्‍हाईतास आमच्या एका देवळांत नेलें आणि त्याच्यापुढें मूर्तिपूजेवर कितीही लांब व्याख्यान दिलें, तरी तो विषय त्याच्या मनांत नीटसा भरणार नाहीं.  इतका मोठा भेद पडण्याचें कारण काय असावें बरें ?  आमच्यांत कलाकौशल्य कमी आहे काय ?  आम्हीं नीतीनें कमी आहों काय ?  कां आमच्या पुराणांत, दंतकथांतून व इतिहासांतून उदात्त विषयांची बाण आहे ?  छे; ह्यांपैकीं एकही गोष्ट वरील भेदाचें कारण असावें असें आमच्या शत्रूसही वाटणार नाहीं.  श्री ख्रिस्ताच्या चरित्रांतील देखाव्याचें इकडे जसें प्रदर्शन केलें जात आहे,  तसें तिकडेही श्रीकृष्णाच्या कांहीं कृत्यांचें प्रदर्शन करितां येणार नाहीं काय ?  आपल्या भक्तांचे घोडे धुणें, उष्टी काढणें, आपल्या भक्ताची जी दासी तिची वेणी घालणें, तिला द----- लागणें, इ. पवित्र प्रेमाचे मासले ज्या विभूतीसंबंधानें ऐकतों, तिचीच विडंबना जागोजागीं व वेळोवेळीं काव्यांतून व चित्रांतून होत आहे आणि तो धर्माभिमान्यांस खपत आहे !  गौतमबुद्धाचा स्वार्थत्याग, बाबा नानकाची सुधारणा, कबीराची सत्यप्रीति आणि तुकोबाची भक्ति इ. अनेक सुबोधपर विषयांची निवडणूक करून रविवर्म्यांसारख्या मार्मिक चित्रकारांनीं त्यांवर आपलें चातुर्य खर्चिलें, तर आमच्या देवळांच्या सौंदर्यांत व पावित्र्यांत किती भर पडेल बरें !  पण अलीकडे जे नवीन नवीन धर्मांच्या नांवानें उत्सव निघूं लागले आहेत आणि त्यांत ज्या मूर्तींचें व चित्रांचें प्रदर्शन होत आहे, त्यावरून पाहतां आमच्याकडील मूर्तिपूजकांचें लक्ष्य ह्या गोष्टीकडे लागेल, ह्याचा कांहीं संभव दिसत नाहीं.