एके रविवारीं सायंकाळीं मुंबई येथील प्रार्थनामंदिरामध्यें रा. रा. शिंदे यांच्या प्रेमळ प्रार्थनेचा जो माझ्या मनावर परिणाम झाला, तो मी कधींही विसरणार नाहीं. प्रार्थना ऐकत असतांना एक दोन क्षणच कां होईना, माझ्या अंतःकरणाचें परिवर्तन झालें; व मी ईश्वराच्या समागमांत आहें, प्रत्यक्ष मला त्या परमात्म्याचा साक्षात्कार प्रथम झाला असें वाटलें. तेव्हांपासून रा. शिंदे यांच्याविषयीं माझ्या मनांत जी पूज्यबुद्धि उत्पन्न झाली आहे, ती उत्तरोत्तर वाढतच आहे. ती प्रेमळ प्रार्थना ऐकल्यापासून रा. शिंदे यांचें होतां होई तों प्रत्येक व्याख्यान कसें बसें टिपून घेऊन किंवा त्यांचे घरीं जाऊन त्यांच्याकडून मजकूर सांगवून घेऊन, तें वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करावयाचें अशी मीं माझ्याशीं गांठ बांधून ठेविली; व त्याप्रमाणें प्रथम जगदवृत्त पत्रांत व नंतर ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, सुबोधपत्रिका या पत्रांत मी तीं प्रसिद्ध करूं लागलों. त्यांचीं व्याख्यानें ज्ञानप्रकाशांत प्रसिद्ध होत असतां त्याच वेळीं प्रार्थनामंदिरांतील दुस-या विद्वान गृहस्थांचेही सुंदर उपदेश प्रसिद्ध होऊं लागले; तेव्हां ते सर्व एकत्र करून पुस्तकरूपानें छापवावे असें मला वाटलें. पण मी अननुभवी म्हणून तें काम माझ्यानें झेंपणार नाहीं म्हणून माझे अनुभवी मित्र, सुबोधपत्रिकेचे संपादक रा. रा. व्दारकानाथ गोविंद वैद्य यांच्या पोक्त सल्यानें आम्ही दरवर्षीं ‘धर्मपर व्याख्यानें’ या नांवानें एक पुस्तक प्रसिद्ध करूं लागलों. आतांपर्यंत अशीं तीन पुस्तकें प्रसिद्ध झालीं आहेत; व चवथ्याचें काम सुरू आहे. या चारी पुस्तकांतील रा. शिंद्यांचीं व्याख्यानें व त्यांचे उपदेश प्रस्तुत पुस्तकांत घेतले आहेत; मात्र ‘ बहाई समाजाचा संदेश’ हें व्याख्यान घेतलें नाहीं; तें, ‘धर्मपर व्याख्यानें’ पुस्तक पहिलें यामध्यें आहे.
एकदां माझ्या एका मित्राशीं बोलत असतां ते सहज म्हणाले ‘रा. शिंदे हे इंग्लंडमधून सुबोधपत्रिकेंत जीं पत्रें लिहीत तीं उत्तम असून मला फार आवडत.’ तेव्हांपासून मी तीं पत्रें वाचावयास मिळावींत म्हणून खटपट करूं लागलों. रा. रा. वैद्य यांचेकडे गेलों व समाजांतील पत्रिकेच्या जुन्या फाइली वाचण्याची परवानगी मागितली व ती त्यांनीं ताबडतोब मोठ्या आनंदानें दिली. दोन वर्षांचीं तीं पत्रें वाचून माझ्या मनांत आलें कीं, हीं पत्रें कोणीं छापून काढल्यास त्यांपासून परदेशीं जाऊं इच्छिणा-या नवख्या मनुष्यास समुद्रावरील प्रवासाविषयीं व युरोप आणि फ्रान्स या देशांतील निदान कांहीं महत्त्वाच्या गोष्टींविषयीं तरी उपयुक्त माहिती होईल. पुढें मी कोल्हापूर येथील ब्राह्मसमाजाच्या वार्षिकोत्सवाकरितां तेथें गेलों असतां, तेथें ज्याचा स्वतःचा छापखाना आहे, अशा माझ्या एका मित्राजवळ ही गोष्ट काढली; व त्यानें रा. शिंदे यांचे सर्व लेख व व्याख्यानें स्वतःच्या खर्चानें छापून प्रसिद्ध करण्याचें कबूल केलें. कोल्हापुराहून आल्याबरोबर मी त्या कामास लागलों व रा. वैद्य यांच्या परवानगीनें जुने अंक शोधून काढून व जे सांपडले नाहींत ते समाजांतील फायलीवरून उतरून घेऊन प्रथमच्या दोन फार्मांचा मजकूर कोल्हापुरास पाठविला; पण माझ्या मित्राकडून बोलल्याप्रमाणें तें काम झालें नाहीं. ही निराशा झाली खरी, पण त्यामुळें मनांतला निश्चय म्हणून ढळला नाहीं. पुढें शेठ दामोदर सांवळाराम यंदे यांची रा. रा. लक्ष्मणराव नायक बी. ए. यांच्यासह दोन तीन वेळां गांठ घेऊन हा योग जुळून आला आहे.
सोईकरितां या पुस्तकाचे तीन भाग केले आहेत. पहिला भाग लेख. यामध्यें रा. शिंदे यांनीं इंग्लंडमधून पाठविलेल्या पत्रांचा व हिंदुस्थानामध्यें लिहिलेल्या लेखांचा समावेश केलेला आहे. अशा प्रकारचे एकंदर ३० लेख या भागांत घेतले आहेत. पैकीं मुरळी हा लेख मूळ इंग्रजींत आहे त्याचें भाषांतर केलें आहे. कौटुंबिक अथवा सार्वजनिक उपासनेच्या वेळीं जें प्रवचन रा. शिंद्यांनीं केलें, त्या सर्व प्रवचनांचा समावेश तिस-या भागात केला आहे. त्यांशिवाय त्यांनीं जीं वेळोवेळीं भाषणें केलीं त्यांचा समावेश ‘व्याख्यानें’ या नांवानें दुस-या भागांत केला आहे. दुस-या भागांत १६ व्याख्यानें व तिस-या भागांत ३७ उपदेश आहेत.
लेख, व्याख्यानें व उपदेश मिळून ह्या पुस्तकांत ८३ विषय आले आहेत. या विषयांपैकीं चार पांच विषयांची भाषा रा. शिंदे यांच्या इतर विषयांची भाषासरणी आणी शैली यांच्याशीं जमत नाहीं, कारण ती भाषा त्यांच्या वाणींतून किंवा लेखणींतून उतरली नाहीं. तर त्यांच्या मराठी भाषणाचे उतारे कोणी तरी स्वतःच्या भाषेंत वर्तमानपत्रांत छापलेले, तसेंच येथें घेतल्यामुळें हा भाषेचा किंचित् विजोड दिसून येण्यासारखा आहे.
सर्व विषय मला रा. शिंदे यांना वाचून दाखवितां आले नाहींत, तेव्हां त्यांमध्यें चुकाराहण्याचा संभव आहे, त्याबद्दल मी जबाबदार आहें. तसेंच कांहीं मराठी लेख घाईमुळें व पुस्तक विस्तारास्तव या पुस्तकामध्यें घालतां आले नाहींत, व इंग्रजीमध्यें त्यांचीं जीं पुस्तकें छापून तयार आहेत त्यांचेंही मराठी भाषांतर करणें झालें नाहीं, त्याबद्दल मला फार दिलगिरी वाटते. सध्यां माझ्या स्मृतीमध्यें जे त्यांचे दुसरे मराठी व इंग्रजी लेख आहेत, त्यांचीं नांवें खालीलप्रमाणें :-- (१) धर्मविकासाच्या तीन स्थिति. (२) सामाजिक उपासना-राष्ट्राची एक मोठी गरज. (३) लोकशिक्षण. (४) बहाई समाजाचा संदेश. (५) नीच मानलेल्या जातींच्या कर्तव्याची दिशा. (६) नि. सा. मंडळीच्या महाराष्ट्र परिषदेंतील प्रास्ताविक भाषण. (७) साधनाश्रमाचा पाया. (8) The Brahma Samaj and The Prophets of the world. (9) Elevation of the Depressed classes. (10) Mission for the Depressed classes. (11) The untouchable India. सुदैवानें दुसरी आवृत्ति काढण्याचा प्रसंग आल्यास त्यांत यांचा समावेश होईल.
ह्या संग्रहास जोडलेलें चरित्र रा. शिंदे ह्यांच्या व माझ्या एका मित्रानें, मीं त्यांस पुरविलेल्या माहितीवरून लिहिलें आहे. रा. शिंदे ह्यांचें विस्तृत चरित्र देण्याचें हें स्थळ नव्हे व हा काळही नव्हे, म्हणून तें त्रोटकच दिलें आहे.
शेवटीं माझें मित्र रा. रा. व्दारकानाथ गोविंद वैद्य यांनीं मोठ्या आनंदानें पत्रिकेच्या फायली मला वाचावयास दिल्या, वेळोवेळीं या पुस्तकाबद्दल ज्या महत्त्वाच्या सूचना केल्या व पत्रिकेंतील व्याख्यानें व लेख ह्या संग्रहांत दाखल करण्यास जी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे रा. रा. लक्ष्मणराव नायक बी. ए. यांनीं हें पुस्तक छापून देण्यास शेठ दामोदर सांवळाराम यंदे यांना माझ्या तर्फे विनंति केली व दुसरीही पुष्कळ मदत केली त्याबद्दल त्यांचे, शेठ यंदे यांनीं हें पुस्तक छापून प्रसिद्ध केलें त्याबद्दल त्यांचे व रा. रा. नारायण शंभू वराडकर यांनीं प्रूफें तपासण्यास मला मदत केली म्हणून त्यांचे, मी अत्यंत आभार मानितों.
शेवटीं ज्या प्रेममय परमात्म्यानें आपल्या प्रसादानें व आशीर्वादानें माझ्या अंतःकरणामध्यें हें काम हातीं घेण्यास प्रेरणा केली, व तें मजकडून कसेंबसें शेवटास नेवविलें, त्याबद्दल त्या जगच्चालक परमेश्वराचे उपकार मानून व अनन्य भावानें शरण जाऊन ही प्रस्तावना पुरी करितों.