आत्म्याची वसति

(ता. २३-९-१२ रोजीं मुंबई येथील प्रार्थना समाजाच्या वार्षिकोत्सवामध्यें झालेलें व्याख्यान.)

विश्रांतीची शांति तुझे पायाविण |
न होयचि जाण नारायण ||
कोटी कल्पवरी उपाय साधने |
केलियाही तेणे सुख नोहे ||
सुखाचे जे सुख अखंड अपार |
जेथे मुनीश्वर रमताती ||
तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना |
दावी हो चिद्धना पाउले ती ||

गेल्या वर्षाच्या उत्सवामध्यें आत्म्याची यात्रा ह्या विषयाचें विवेचन केलें. त्यावेळीं कामना आणि कर्तव्यबुद्धी हे जे आत्म्याचे दोन पुरूषार्थ त्यांचे स्वरूप काय आहे हे सांगितले, आणि ते साधीत असताना आत्म्याला श्रम होत असतात, त्या श्रमातून विश्रांती कोठे मिळेल ह्याचाही शेवटी उल्लेख केला. आत्मा हा असा कायमचा यात्रेकरू आहे, ह्याला श्रमाशिवाय दुसरी अवस्थाच नाही हे खरे असे तर मोठी कठीण स्थिती होईल. आम्ही ब्राह्म आत्म्याची जी अनंत उन्नती मानतो तिचा अर्थ असा नव्हे की आत्म्याची निरंतर परिश्रमाचीच अवस्था आहे. तसे नसता ह्याला मधूनमधून विसाव्याचेही स्थान आहे. श्रम आणि विश्रांती अथवा यात्रा आणि वसती, किंबहुना बंधन आणि मोक्ष ह्यासंबंधीच्या इतरांहून आमच्या कल्पनेचा निराळेपणा इतकाच की, इतर ह्या अवस्था एकामागून एक येतात असे मानतात, म्हणजे आत्मा काही काळ बद्ध राहून पुढे कायमचाच मुक्त होतो, एक जन्म असो किंवा ८४ लक्ष योनी असोत, ती यात्रा संपल्यानंतर तो कायमच्या वसतिस्थानाप्रत जातो, अशी इतरांची समजूत आहे. आम्हांस असे वाटते की पुरूषार्थाचे श्रम आणि ‘विश्रांतीची शांती’ ह्या आमच्या अवस्था आलटून पालटून पुन: पुन: होतात व येणेप्रमाणे आत्म्याची उन्नती अनंतकाळ चालू असते.

आता आपण आत्म्याच्या वसतीविषयी विशेष विचार करू या. व्यवहारातील आमचा अनुभव असा आहे की घराबाहेर पडल्याबरोबर आम्हांला नुसते शारीरिकच नव्हे तर मानसिक श्रम आणि चिंता उत्पन्न होतात. जंगलात गेलो तर पायात काटे बोचतील काय? वन्य पशू आपणांस खातील काय? अशी भीती असते. शहरात फिरावयास गेलो तर आपला पेहराव नीटनेटका आहे की नाही, चालीरीती आणि सभ्यतेचे नियम आपणांकडून पाळले जातात की नाही ह्याची चिंता असते. सभेत बसून बोलत असलो तरी आपली भाषा शुद्ध आहे की नाही, तिचे प्रघात योग्य आहेत की नाहीत, हे वेळोवेळी पहावे लागते. मनातील भाव गैरसमज न होता दुस-यास कळावे म्हणून अनेक वेळां केवळ औपचारिक रीतीने आम्हांस माफी मागावी लागते, सभेचे आभार मानावे लागतात. एकूण ह्या प्रकारे नेहमी चिंता आणि श्रम होत असतात. पण तेच आम्ही आपल्या वसतिस्थानी म्हणजे घरी बसलो असताना आम्हांला अगदी मोकळे वाटते, घरी कसेही असलो, कसेही बसलो, हसलो की रूसलो ह्याची काही काळजी घ्यावी लागत नाही. हा ऐहिक जीवनातल्या वसतिस्थानाचा महिमा.

आता आमच्या आध्यात्मिक जीवनातही अशा वसतिस्थानाची गरज भासते. शरीराला जसे आमचे घर, तसेच आमच्या आत्मारूपी पक्ष्याला कोठेतरी घरटे आहे काय की, ज्यात तो मधूनमधून विराम पावेल? आत्म्याच्या अनंत उन्नतीचा असा अर्थ समजावा काय की त्याने नेहमी अंतराळामध्ये फडफडतच रहावे? केवळ नीतीच्या जगामध्ये हे घरटे नाही. नीती म्हणजे निरनिराळ्या आदर्शांच्या मागे लागून आम्ही करतो ते प्रयत्न. ते श्रमाचेच जग. नीतीच्या पलीकडे हे घरटे कोठेतरी असावयास पाहिजे. केवळ नीतीने म्हणजे शुभ प्रयत्नाने मानाची आणि आत्म्याची भूक भागत नाही, निदान ‘विश्रांतीची शांती’ तरी मिळत नाही. ह्या शांतीचे एकच स्थळ आहे. जसे आपल्या शरीरामध्ये जीवचैतन्य, त्याप्रमाणे सर्व विश्वामध्ये विश्वचैतन्य नांदत असून जीवचैतन्य अल्प प्रमाणावर जसे शुभ प्रयत्न करीत आहे त्याप्रमाणेच ते विश्वचैतन्यही अवीट अमर्याद प्रमाणांनी शुभ प्रयत्न करीत आहे, ह्या गोष्टीचा अनुभव आणि साक्षात्कार हेच जीवाच्या विश्रांतीचे व शांतीचे स्थळ होय. हीच आमच्या आत्म्याची वसती. हे स्थान नीतिजगाच्या पलीकडचे आहे, नीतिजगाशिवाय त्याजकडे जाण्याला मार्ग नाही हे खरे. नीती ही ह्या शांतीची शिडी आहे, पण नीती ही स्वत:च शांती नाही. नुसते ज्ञान, नुसता भक्तीचा मनोविका, तो कितीही शुद्ध आणि उज्ज्वल असो ह्या दोनच पाय-या ओलांडून ही वसती प्राप्त होत नाही, तर नीतीची कठीण पायरीही ओलांडली पाहिजे. आणि ती नुसती नीतीच आपल्याला पुरे असे म्हणूनही चालत नाही.

जीवचैतन्याचा दुसरा एक असा अनुभव आहे की ह्याच्यावर दोन इतरांनी नेहमी ताण पडलेला भासतो. एक बाहेरून शासनाचे दडपण आणि दुसरे अंत:करणातून प्रेरणेचे प्रोत्साहन. कुटुंबसंस्था, राजसंस्था, समाजसंस्था, धर्मसंस्था ह्या सर्व संस्थांचे आपणांवर नेहमी दडपण असते. हे दडपण नेहमीच अहितकारक असते असे नाही. ह्यामुळेच आपली उन्नती होत असते हे खरे. तथापि त्यांचे दडपण आपल्याला भासत आहे हे खोटे नव्हे. ह्याच्या उलट आपल्या अंत:करणामध्ये अशी एक प्रवृत्ती आहे की आपण ह्या सर्व दडपणांतून आपल्या ध्येयाकडे वाट काढावी. बाहेरचे दडपण आणि आतील प्रोत्साहन ह्या दोन शक्तींचा अनुभव जसा जीवचैतन्यास येतो ही गोष्ट एकदा का आपल्यास पटली म्हणजे आमच्या विश्रांतीच्या शांतीला दुजोराच येतो आणि जीवचैतन्य आणि विश्वचैतन्य  ह्यांमध्ये अनुपम सख्य अनुभविले जाते. मग गेल्या व्याख्यानात सांगितल्याप्रमाणे:

तो हरि सांपडला सांपडला |
मोठा लाभ जाहला ||
ज्यातें स्मरतां मीपण जाय |
आत्मा प्राण विसावा माय ||

ह्या वचनांतील आप्तपुरुष आपणांला भेटून आपणांस घरच्यासारखी शांति मिळते.

पण आतां असा प्रश्न उद्भवतो की वर सांगितलेले जीवाचे जे लक्षण यत्नशीलता त्या लक्षणानें युक्त अशी विश्वामध्ये एकादी शक्ती आहे किंवा नाही? मनुष्यजातीपुढे असलेल्या तत्त्वज्ञानाच्या पुरातन प्रश्नांपैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणून तत्त्वज्ञानाची आज कोठवर मजल येऊन पोहोचली आहे त्याचे निरीक्षण करू. हा विचार करीत असताना पाश्चात्य तत्त्वज्ञान, पौरस्त्य तत्त्वज्ञान, प्राचीन तत्त्वज्ञान, अर्वाचीन तत्त्वज्ञान अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाच्या भेदाकडे फारसे लक्ष पुरवू नये. एकंदरीत स्थूलमानाने मनुष्याची विचारसरणी कशी वाहत आली आहे हे ध्यानात घेऊन आज काय ह्या बाबतीत विशेष शोध झाला आहे हे पहाणे प्रस्तुत प्रसंगी युक्त होणार आहे.

पौरस्त्य देशात उपनिषदे, षड्दर्शने आणि बुद्ध ह्यांच्या काळई आणि पाश्चात्य देशात सॉक्रेटिस व प्लेटो ह्यांच्या काळई मानवी तत्त्वज्ञानामध्ये जो नवीनपणा होता तो पुढील मध्ययुगामध्ये राहिला नाही. सृष्टीचे प्रत्यक्ष ज्ञान करून घेऊन वर निर्दिष्ट केलेल्या काळातील ऋषींनी आपली तत्त्वमीमांसेची इमारत रचली आणि पुढे त्याच पायावर सृष्टीशी प्रत्यक्ष संबंध न ठेवता आणि तिच्याशी नवीन परिचय करून न घेता पुढील तत्त्ववेत्त्यांनी स्वकपोलकल्पित तर्कवितर्काच्या जोरावरच मीमांसा केली. त्यामुळे त्यांच्या मीमांसेचा परिणाम म्हणण्यासारखा काहीच झाला नाही. अलीकडे आधुनिक शास्त्रांचा प्रसार होऊन सृष्टीच्या अनेक नवीन चमत्कारांचा परिचय झाल्यावर तत्त्वमीमांसेला एक नवीनच वळण लागू लागले. प्रथम प्रथम ह्या नवीन वळणाचा परिणाम मनुष्याच्या उपजत श्रद्धाशक्तीच्या उलट होऊ लागला. पण आधुनिक शास्त्रांचा पाया आता बळकट बसल्यामुळे हल्लीच्या मीमांसेला अधिक पूर्ण स्वरूप येऊ लागले आहे. ह्या गोष्टीची साक्ष आज युरोपात नाणावलेल्या तत्त्ववेत्त्यांचे शिरोमणी फ्रान्स येथील बर्घसन आणि जर्मनीतील ऑयकेन ह्यांच्या विचारसरणीत स्पष्ट दिसून येत आहे. कँट, हेगेल ह्यांच्यापेक्षाही ह्या तत्त्ववेत्त्यांच्या विचारसरणीचा आधुनिक शास्त्रीय शोधांशी अधिक निकट संबंध असल्यामुळे ह्यांच्या विचारात कँट, हेगेलपेक्षाही अधिक ताजेपणा दिसून येतो. इतकेच नव्हे तर कँट, स्पेन्सर इत्यादिक निश्चित ज्ञानवाद्यांपेक्षा ह्यांच्या विचारसरणीत अधिक खोलपणाही दिसून येत आहे. त्यामुळे ह्यांच्या विचारांचा परिणाम विचारशील समाजावर जितका आणि जसा होत आहे, तितका आणि तसा आजवर कोणाच्याही विचारसरणीचा झाला नाही. आता स्पेन्सरच्या विचारांचा पगडा सुशिक्षित लोकांवर अद्यापि असलेला क्वचित दिसून येतो हे खरे, तथापि त्याच्या परिणामाचे निराकारण करून शिवाय नवीन परिणाम ज्याअर्थी ह्या आधुनिक तत्त्ववेत्त्यांचे घडत आहेत त्याअर्थी ह्यांचे विचार सर्वांपेक्षा अधिक परिणामकारी आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. ह्या दोन तत्त्वज्ञान्यांपैकी ऑयकेनपेक्षाही वर्गसनच्या विचारांचा प्रसार सुशिक्षित लोकांमधअये अधिकच झपाट्याने होत आहे. म्हणून त्याच्या विचारसरणीतील मुख्य एक दोन मुद्यांचे आज आपल्या विषयाला अनुसरून अवलोकन करू. ती विचारसरणी मुख्यत्वेकरून त्याच्या “Creative Evolution” ह्या पुस्तकामध्य निर्दिष्ट केलेली आहे. जडसृष्टी, वनस्पतिसृष्टी, प्राणिसृष्टी आणि मनुष्यसृष्टी ह्या चार सृष्टींचे खोल आणि मार्मिक निरीक्षण करून बर्गसन ह्याने असा सिद्धांत काढलेला आहे की, विश्वामध्ये पसरलेल्या अनंत प्रकृतीशी काही एक अज्ञात शक्तीची एकसारखी झटापट सुरू आहे. ह्या मूळ शक्तीला त्यांनी आपल्या ग्रंथात “Vital Impulse” असे म्हटले आहे. वनस्पती, प्राणी आणि मनुष्यकोटी हे ह्या शक्तीचे तीन निरनिराळे फाटे आहेत. ज्याप्रमाणे एकाद्या बोगद्यात लावलेला सुरूंग फुटून बाहेर येण्याविषयी वाट शोधीत असतो, आणि दोन तीन ठिकाणी प्रयत्न करून शेवटी एका बाजूने येतो, त्या रीतीने मनुष्यकोटीच्याद्वारा ह्या मूळ शक्तीने प्रकृतीच्या अभेद्य दडपणातून बाहेर वाट काढली आहे. प्रकृतीशी अनंतकाळ झगडत असताना जरी ह्या मूळ शक्तीस मनुष्यकोटीच्याबाबतीत थोडेबहुत यश आले आहे, तरी मनुष्यामध्ये दिसून येणारी जी संवेदना किंवा जाणीव ती खालील कोटीमध्येही अपरिपक्व दशेत बीजरूपाने आहेच. मनुष्याचा मेंदू हा ह्या जाणीवेचे अवयव किंवा अधिष्ठान आहे. म्हणून तेवढ्यावरून मेंदू हीच जाणीव नव्हे. त्यावरून जेथे मेंदू नाही तेथे जाणीव नाही, असे म्हणता येत नाही. पचनक्रियेचे अवयव जे पोट, ते वनस्पतीमध्ये नसते, तरी झाडातून पचनक्रिया चालू असतेच. त्या विशिष्ट अवयवाचे कार्य झाडाच्या सर्व अंगात चालू असते. पचनक्रियेप्रमाणेच अधिक स्थूलदशेत झाडामध्ये जाणीवही असतेच. मात्र तिची वाढ वनस्पतीत खुंटलेली असते. पुढील कोटीत त्या जाणीवेचे दोन फाटे फुटलेले दिसतात. खालील प्राण्यांत उपजतबुद्धी (Instinct) आणि मनुष्यमात्रांत विवेकबुद्धी (Intelligence) अशी हिला निरनिराळी नावे देता येतील. पण उपजतबुद्धी ही जाणीवेची प्रथम पायरी असे जे काही तत्त्ववेत्ते म्हणतात ते बरोबर नाही. ह्या दोन भिन्न भिन्न शाखा आहेत. एक दुसरीची पूर्व तयारी नव्हे. पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांपैकी मनुष्यामध्ये दुसरीला पूर्णता आली आहे तर कणा नसलेल्या मुंग्या आणि माशा म्हणजे (Orthropods) प्राण्यांमध्ये विशेषत: पहिलीचा (Instinct) बराच विकास दृष्टीस पडतो. इंग्लंडात मी एकदा स्वत: एका बाईने एका मोठ्या पेटीत मुंग्यांनी बांधलेल्या शहराचे प्रदर्शन केलेले पाहिले, त्या शहरात घरे, रस्ते, पूल वगैरे ह्या लहान प्राण्यांनी उत्तम प्रकारची रचना केलेली दिसून आली. तशी नागरिक रचना आमच्या कित्येक मोठ्या शहरातील म्युनिसिपालिट्यांचीही दिसून येत नाही. उपजतबुद्धी आणि विवेकबुद्धी ह्यांची भिन्न स्वरूपे आणि भिन्न विकास बर्गसनने आपल्या वरील ग्रंथात वर्णिले आहेत. विशेषेकरून त्यांनी १९११ च्या मे महिन्यात बर्मिगहॅम युनिव्हर्सिटीत जीव (Life) आणि जाणीव (consciousness) ह्या विषयावर जे अत्यंत महत्त्वाचे पण सुबोध असे व्याख्यान दिले आहे व जे “Hibbert Journal” ह्या मासिकाच्या गेल्या अंकात प्रसिद्ध झाले आहे, त्यांत त्यांनी ह्या विषयाचे फार सुंदर स्पष्टीकरण केले आहे. त्यात त्यांनी जाणीवेच्या विकासाला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली आहे. एकदी मोठी नदी पर्वतावरून निघून तिचे निरनिराळे फाटे फुटून जंगालातून, वाळवंटातून वगैरे गडप होतात तरी मुख्य प्रवाह जसा पुढे वाहत जातो, त्याप्रमाणे ही वनस्पती आणि खालील अनेक जीवकोटी ह्यांमधून प्रवास करीत अखेर मनुष्यप्राण्यांमध्येही ब-याच उज्ज्वल रूपाने विकसली आहे. ज्यांना ही विचाराची सरणी पटत असेल त्यांनी बर्गसनच्या ग्रंथांचे लक्षपूर्वक अध्ययन केल्यास मोठा लाभ होईल.

वर सांगितल्याप्रमाणे विश्वचैतन्याचे पर्यवसान केवळ विवेकातच झालेले नाही, तर प्रेम आणि कर्तव्याचाही रूपाने तिचा ह्या मनुष्यकोटीत विकास झालेला दिसत आहे. हिचे अंतिम पर्यवसान कोठे आणि कसे होणार, हिचा मूळ हेतू काय आहे ह्या गोष्टी जरी आपल्या ज्ञानाच्या पलीकडच्या आहेत तरी आजर्यंत हिचे झालेले उत्पादक उत्क्रमण (Creative Evolution) आमच्या डोळ्यांपुढे स्वल्प तरी दिसत आहे. ह्या मूळशक्तीने केलेल्या सर्वच प्रयत्नांत यश आले आहे असे नाही, उलट हिला बहुतेक प्रयत्नांत बर्गसनने म्हटल्याप्रमाणे अपयश आलेले दिसत आहे, तरी हिचा प्रयत्न उत्तरोत्तर जोरावतच आहे. त्याला खंड नाही किंवा तो कायमचा विराम पावण्याचाही संभव दिसत नाही. ह्याप्रकारे आपल्याभोवती विश्वामध्ये आम्हांप्रमाणेच जी एक विराट शक्ती आपले सतत कार्य करीत आहे, तिचे दर्शन झाल्याबरोबर तेच ह्या जीवचैतन्यास विश्रांतीची शांती देण्याला कारण होते. ते दर्शन झाल्याबरोबर नुसती विश्रांतीच मिळते असे नव्हे, तर नवीन प्रयत्न करण्याला हुरूपही येतो. आपल्या मार्गात जे अडथळे येतात किंवा आपल्याभोवती जे दडपण पडते त्यांच्याशी टक्कर देण्याला वरील दिव्य दर्शनाने मिळालेल्या अंत:शांतीमुळे अधिक जोर येतो. आमच्या प्रार्थनासमाजाला ह्याच वरील विश्वचैतन्याचा भरंवसा आहे. तीच आमच्या आत्म्याची वसति.