समता-स्वतंत्रता-बंधुतेचा झेंडा मिरविणारी, सौंदर्याची जी खाण त्या पॅरीसपुरींत आम्ही सकाळचे १० वाजतां उतरलों. पॅरीस शहर पॅरिस शहराप्रमाणेंच आहे - ह्यापेक्षां ज्यास्त कांहीं वर्णन करवत नाहीं. पुष्कळ लोकांनीं ह्याचें वर्णन केलें असल्यामुळें, येथें त्याचें वर्णन करण्याचें विशेष प्रयोजन नाहीं. शिवाय जेवण वगैरे आटपून आम्ही गाडींत बसून बाहेर पडलों, तोंच आम्हांस पावसानें गांठलें. आम्ही मुख्य रस्त्यानें प्रदर्शनाकरितां मुद्दाम बांधलेले मोठेमोठे सुंदर महाल पाहत प्रथम 'पॅलेसडी न्याशनल इन्व्हालिड्' म्हणजे जेथें प्रसिद्ध ऐतिहासिक राजपुरुषांचीं थडगीं आहेत, अशा राजवाड्यांत गेलों. वीरमणि नेपोलियनाचें येथें भव्य कबरस्थान आहे. हौदासारखी सुमारें २० फूट व्यासाची वर्तुलाकार जागा जमिनींत सुमारें २० फूट खोल सुरेख बांधून काढिली आहे. ह्या हौदाच्या मध्यभागीं नेपोलियनाचें भव्य थडगें आहे. त्याचा रंग दाट काळसर तपकिरी आहे. हौदाच्या छातीइतक्या उंच कठड्यावरून खालीं डोकावून त्याकडे पाहावें लागतें. हा दिवस आदित्यवारचा असल्यामुळें, येथें हजारों लोकांची गर्दी जमली होती. हें ठिकाण गंभीर असल्यामुळें इतकी गर्दी असूनही चहूंकडे शांत होतें; त्यामुळें देखावा अधिकच गंभीर दिसला ! थडग्याभोंवतीं भिंतीच्या कोनाड्यांतून ७।८ पुतळे उभे आहेत. तशींच सभोंवतीं निशाणें, भाले व कांहीं हत्यारें ठेविलीं आहेत आणि त्यानें जिंकलेल्या मुख्य मुख्य लढायांचा भोंवतालीं उल्लेख केला आहे. पण शेवटीं ह्या जग जिंकू पाहणार्या जेत्यास काळानें चीत करून आपल्या सर्वभक्षकतेचें स्मारक येथें त्याच्या थडग्याच्या रूपानें स्थापित केलें आहे.
दि बिग् व्हील - ह्यानंतर आम्ही 'राक्षसी चक्र' पहावयास गेलों. आपल्याकडे जत्रेच्या ठिकाणीं जसे उंच पाळणे उभारून त्यांत लोकांस बसवून हालवितात, त्याच नमुन्याचें पण अत्यंत प्रचंड हें वरील चक्र आहे. ह्याचा व्यास २००।२५० फूट असावा. सुमारें १०० फूट उंचीच्या दोन्हीकडच्या दोन दोन तिर्कस खांबांवर ह्या राक्षसी चक्राचा राक्षसी कणा ठेविला आहे. ह्या चक्राच्या परिघांत सुमारें २० मोठ्या लांकडी पेट्या अथवा खोल्या बसविल्या आहेत. प्रत्येक खोली १५ हात लांब, ५ हात रुंद आणि ५ हात उंच आहे. एका खोलींत २० माणसें बसतील इतकी जागा असते. आंत एक टेबल व दोन खुर्च्या ठेविलेल्या असतात. हें चक्र पांच पांच मिनिटांनीं एकदां थांबतें. तेव्हां खोलींत बसलेलीं माणसें बाहेर येतात व नवीं आंत जातात. एका फेरीस एका माणसास एक फ्रँक म्हणजे सुमारें १० आणे पडतात. खोलीच्या बाजू तावदानाच्या असल्यामुळें चहूंकडचा पारीस शहराचा देखावा दिसतो आणि जेव्हां चक्राच्या वरच्या टोंकावर जातों तेव्हां आम्ही आकाशांत
२००-२५० फूट उंच असतों. ज्या सळ्यांवर ह्या खोल्या अडकविल्या असतात, त्या फार जाड नसल्यामुळें केव्हांच मोडतील कीं काय अशी विनाकारण भीति वाटत असते. हें चक्र जेव्हां प्रथम सुरू केलें तेवहां ह्यास हालविणार्या यंत्राचा कांहीं भाग बिघडला होता, तो दुरुस्त करून चक्र पुन्हां चालू करण्यास १२ तास लागले, तोंपर्यंत २०० फुटांवरच्या खोलींत बसलेल्या माणसांची काय भयंकर अवस्था झाली असेल ह्याची कल्पना हें चक्र प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय सहज होण्यासारखी नाहीं.
नंतर आम्ही एफे नांवाचा प्रसिद्ध मनोरा पहावयास गेलों. हा ७००-८०० फूट उंच असावा असें म्हणतात. वरील चक्रापेक्षांही हें काम अचाट आहे. हा सर्व मनोरा लोखंडाचा आहे. दर माणसीं दोन फ्रँक दिल्यास खोलीसकट मनोर्याच्या शिखरावर उचलून नेतात. वरून खालीं पाहण्याची देखील छाती होत नाहीं. आम्ही अर्धा मनोरा चढून गेल्यावर पाऊस सोसाट्यानें पडूं लागला व वारा सोसाट्याचा सुटला म्हणून वर जाण्याचा नाद सोडून खालीं उतरलों. हें असलें अचाट कृत्य इतका खर्च करून केलें असून तें कायम ठेवावें कीं पाडावें ह्याविषयीं म्युनिसिपालिटी वाद करीत आहे. हा मनोरा १८८९ च्या प्रदर्शनासाठीं बांधला. हा पाडावा असें म्हणणार्यांचा एक मुद्दा असा आहे कीं, मनोरा बेढब झाला आहे ! कमाल आहे फ्रेंच सौंदर्याची !! नुकत्याच झालेल्या प्रदर्शनासाठीं बांधलेल्या भव्य व सुंदर इमारती पाडण्याचें काम चाललें आहे.
९॥ वाजतां पारीसहून निघून रात्रीं १ वाजतां कॅले येथें पोंचलों. इंग्लिशचॅनेल ओलांडण्यास १ तास लागला. येथें समुद्र नेहमीं खवळलेला असतो. आमच्या बरोबरच्या बहुतेकांस वांत्या झाल्या, मलाही फार मळमळलें. ता. ७ रोजीं सकाळीं ७ वाजतां लंडन येथें पोंहोंचलों. तेथें ३ दिवस राहून ता. १० संध्याकाळी सुखरूप ऑक्सफर्ड येथें पोहोंचलों, येथें माझा प्रवास संपला. तो सुखाचा झाला, ह्याबद्दल परमेश्वराचा मी फार आभारी आहें.