राज्यारोहण

(गुरुवार ता. २२-०६-१९११ रोजी झालेला उपदेश.)

लंडन शहर हे ब्रिटिश साम्राज्याची राजधानी होय, किंबहुना ते काही दृष्टीने सर्व जगाची राजधानी असे म्हटल्यासही विशेष अतिशयोक्तीचे होईल असे नाही. त्या ठिकाणी आज किंबहुना आताच आमचे प्रिय व पूज्य बादशहा पाचवे जॉर्ज ह्यांच्या राज्याभिषेकाचा महोत्सव चालू आहे. त्यातच आम्ही सामील होण्यासाठी येथे जमलो आहो. पण अशा वेळी साधारण माणसाची वृत्ती कोणत्या त-हेची होण्याचा संभव आहे, हे लंडन येथीलच एका विनोदी पत्राने एका चित्राच्या द्वारे दाखविले आहे. हे चित्र असे आहे की, राज्याभिषेकाचा छबिना पहावयास प्रेक्षकांसाठी रस्त्यावर ठिकठिकाणी जागा तयार करीत असलेल्या सुतारांपैकी एका ओबडधोबड सुतारास एक पार्लमेंटचा सभासद भेटून म्हणतो की, अशा वेळी मला ब-याच गोष्टींविषयी बोलावयाचे आहे. सुतार त्यास निक्षून सांगतो की, तशा काही तू भानगडीत पडू नकोस. तुझे आज कोणीच ऐकणार नाही, ह्यावेळी ऐकण्यात येणारा शब्द काय तो हाच माझ्या हातोड्याचा, असे म्हणून तो आपले खिळे ठोकीत आहे. ह्यावरून कोणत्याही महोत्सवाचा वेळ प्रत्यक्ष आला म्हणजे सामान्य लोकांचे लक्ष अगदीच वरवरच्या गोष्टीकडे जाते, हे दाखविले आहे. तुकारामबोवांनी तर ह्याहीपेक्षा निर्भिडपणाने म्हटले आहे की, “आली सिंहस्थ पर्वणी । न्हाव्या भटा झाली धणी ।।” पर्वकाळ प्रत्यक्ष आला असता कोणासही तत्त्वविवेचन किंवा धर्मानुभव कथन अशा गंभीर गोष्टीमध्ये मन घालण्यास फुरसत मिळत नाही. लंडन शहरातील सुतारांच्या ठोक्यांनी लंडन शहर आता जसे दणाणून गेले आहे, तसाच सगळा गंगाकिनारा न्हाव्यांच्या आरोळ्यांनी आणि भटांच्या संकल्पांनी गजबजून जातो, परंतु आम्ही येथे जरी ह्या महोत्सवानिमित्तच जमलो आहो, तरी सुताराच्या ठोक्यांनी आमचे कानठाळे बसण्याची भीती नाही, म्हणून ह्या प्रसंगाविषयी एक दोन तात्त्विक विचार आमच्या मनात येण्यास अवसर आहे, आणि त्यासंबंधी सावधान असणे आमचे कर्तव्य आहे.

थोडासा संसारामध्ये दुःखाचा चटका बसल्याबरोबर आमच्यापैकी कित्येकजण मुळी ईश्वरच नाही, ह्या विश्वाला कोणी नियंताच नाही असा सिद्धांत ठोकून देतात, ही गोष्ट लक्षात घेतली असताना एकाद्या राज्यसंस्थेमध्ये थोडासा दोष आढळल्याबरोबर किंवा तिच्यामुळे एकाद्या व्यक्तीस किंवा व्यक्तीसमूहास नुकसान पोहोचल्याबरोबर तो राजाच नको किंवा अजीबात राजकीय संस्थाच नको असे म्हणणारे काही संतापी लोक आढळतात, ह्याविषयी विशेष नवल मानण्यासारखे काही नाही. उलट अशा लोकांची शांतपणे, शक्य असल्यास समजूत घालून त्यांना आळा घालणे हेच थोर पदावर चढलेल्या पुरुषास भूषणावह आहे. मनुष्यप्राण्याची हल्ली जी उन्नती झाली आहे, तिच्या इतिहासाकडे मागे दूरवर दृष्टी देऊन पाहिल्यास राजकीय संस्था ही ह्या उन्नतीचे एक मोठे साधन आहे असे कळून येण्यास काही अडचण पडणार नाही. केवळ तात्त्विक दृष्टीने पाहता राजकीय संस्था जरी मनुष्यप्राण्याच्या उन्नतीचा एक शाश्वतचा भाग नसला तथापि तो बराच चिरकाल टिकणारा एक भाग आहे हे कोणासही नाकबूल करता येत नाही. मनुष्यप्राणी समाज करून राहू लागल्या दिवसापासून तो आजपर्यंत ही संस्था अबाधित राहिली आहे, इतकेच नव्हे तर ती पुढेही ज्याची नुसती अटकळही करता येत नाही इतका वेळ टिकणार आहे, ह्यावरून तिची चिरकालिक आवश्यकता आहे, हे उघड आहे, आणि पूर्णतेच्या काळाबद्दल हल्ली आम्हांला जी स्वप्ने पडत आहेत, की त्या काळी पूर्ण स्वतंत्र, नीतिमान आणि कर्तृत्ववान होऊन हल्लीच्या सारख्या कृत्रिम राजबंधनाची आवश्यकता राहणार नाही, सगळे सारखेच ज्ञानवान आणि हिंमतवान पवित्र झाल्याने कोणाचे ठायी दुस-याला अपाय करण्याची मुळी इच्छाच संभवणार नाही – मग एकापासून दुस-याचे संरक्षण करण्याची किंवा दोघांमध्ये मध्यस्थी करण्याची गोष्टच राहीली – ती स्वप्ने पडण्याइतकी आमची उन्नती होण्यास देखील ही मध्यंतरीची चिरायुषी राज्यसंस्थाच कारण होय. म्हणून आमची तिच्याविषयीची पूज्यबुद्धी आणि कृतज्ञताबुद्धी असली पाहिजे, आणि अशा महोत्सवाचे वेळी ती भावना उचंबळून आली पाहिजे.

राज्यसंस्थेविषयी हा सामान्य विचार झाला, परंतु ज्या विशिष्ट राज्यसंस्थेशी आमचा संबंध जडला आहे तिच्यासंबंधीही आमची पूज्यबुद्धीच असली पाहिजे. हा जो आमचा पाश्चात्यांशी योगायोग घडला आहे तो दोन-तीन पिढ्यांमागे आमच्या पूर्वजांना अगदी एक मंगल दैवी कृत्यच वाटत होता. ह्या दोन-तीन पिढ्यांमध्ये आमच्या पूर्वजांपेक्षा आम्हांला बरेच निराळे अनुभव आले आहेत. त्यांना जे केवळ मनोवृत्तीच्या झटक्यासरशी आणि कल्पनेच्या तरंगामुळे वाटले ते आम्हांला तशाच्या तसेच वाटणे साहजिक नाही. तथापि सूक्ष्म विचार करून पहातानाही ह्या घडून आलेल्या योगायोगाची शुभता आणि महत्त्व ही आमच्या वडिलांपेक्षा आम्हांला मुळीच कमी दिसून येत नाही. आमच्या वडिलांमध्ये व आम्हांमध्ये जर कोणता फरक असेल तर तो हाच की, आमचे व्यक्तिविषयक आणि राष्ट्रीय गुण आणि दोष कसाला लागण्याचा त्याच्यावर प्रसंग आला नाही म्हणून त्यांना ह्या योजनेची शुभता फार मोहक वाटली आणि आम्हांला तर असे प्रसंग आज पावलोपावली येत असल्यामुळे साहजिकपणे ही शुभता तितकी मोहक वाटत नाही. पण ह्यावरून प्रकृत योगायोग मुळी शुभच नाही, असे म्हणणे हे केवळ अधार्मिक वृत्तीचे द्योतक होय. ज्याची धर्मबुद्धी जागी आणि उजळ आहे त्याला ही योजना त्याच्या आजा-पणजाइतकी मोहक जरी वाटली नाही तरी त्यांच्याइतकी शुभ खात्रीने वाटेल आणि ह्या योजनेची शोभनता उजागरीला येण्याला त्याला स्वतःचीच नैतिक तयारी अधिक नेटाने करण्याचा उत्साह येईल.

इंग्लंडच्या इतिहासाकडे पाहिले तर तो एक मानवी इतिहासाचा सुंदर भाग आहे आणि त्यात जरी काही काही दोष आढळून आले तरी त्या दोषांतही काही महत्त्वाची रहस्ये आहेत असे आढळून येईल. अशा इतिहासाच्या ओघाशी आपल्या भावी राष्ट्रीय चरित्राचा मिलाफ झाला ही गोष्ट कोणाही विचारी पुरुषास अभिमान बाळगण्यासारखीच आहे. तसे न करता जो कोणी रुसून फुगून बसेल किंवा वितुष्ट वाढवील तर तो चालून आलेल्या संधीचा फायदा घेण्याला स्वतः अपात्र आहे असे होईल.

राज्यशासनावर आज जे विराजमान होणार आहेत त्या भाग्यवान पाचव्या जॉर्ज बादशहाशी आम्ही व्यक्तिशः स्नेहसंबंध आणइ आदरबुद्धी राखली पाहिजे. त्याच्या अवाढव्य राज्यछत्राखआली जी असंख्य प्रजा आहे त्यातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाची फेड करणे त्याला जरी शक्य नाही, तथापि ह्या प्रत्येक व्यक्तीने त्याजवर आपल्या अंतःकरणाचे द्वारा प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करणे शक्य आहे. त्याच्या शिरावर आज जो मुकुट ठेवण्यात येत आहे, त्याच्या जबाबदारीचे ओझे त्याच्या एकट्यावरच नसून असंख्य प्रजाजनांवर आहे, ही जी सुधारलेल्या प्रजेला शोभणारी भावना तिचा पाया वरील व्यक्तिगत प्रेमामध्ये बळकट रोवलेला आहे. म्हणून विश्वनियंत्या परमेश्वराजवळ आम्ही सर्वांनी ह्या चक्रवर्तीचे आयुष्य, बळ आणि संपत्ती वृद्धिंगत होवो अशी मनोभावे प्रार्थना केली पाहिजे.