(ता. २५-४-१० रोजीं प्रार्थनासमाजांत केलेल्या उपदेशाचा सारांश.)
भक्त देवाजीचे भोळे | त्यांचे पायीं ज्ञान लोळे ||
भक्तीवीण शब्दज्ञान | व्यर्थ अवघें तें जाण ||
नाहीं ज्याचें चित्तीं भक्ति | जळो तयाची व्युत्पत्ति ||
नामा म्हणे ऐसें जाण | नाहीम भक्तीसी बंधन ||
जे भोळे लोक असतात त्यांच्या पायी ज्ञान लोळत असते. जे भक्त नाहीत त्यांचे शब्दज्ञान व्यर्थ होय. जे भक्त ते मुक्त होत. त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. प्रेमाच्या महत्त्वाबद्दल अशाच प्रकारचा दुसरा एक उल्लेख आहे. (सेन्टपालचे कारेथकरास पहिले पत्र) तो असा :- (१) मनुष्याचे व देवदूतांचे वक्तृत्व माझ्या ठायी असले परंतु मजमध्ये प्रेम नाही तर नाद करणा-या पितळेच्या भांड्याची किंवा वाजवावयाच्या झांजेची व माझी योग्यता सारखीच. (२) मला धर्मज्ञानाची प्रेरणा होत असली, सर्व गूढ गोष्टी व विद्या अवगत असल्या आणि श्रद्धेच्या जोरावर डोंगर हालविण्याची शक्ती मजमध्ये असली, परंतु मजमध्ये प्रेम नाही तर मी काहीच नाही. (३) आणि मी आपली सर्व संपत्ती गरिबांना अन्नदान करण्यात खर्च केली, किंबहुना आपले शरीर जिवंत जाळण्यासाठी देऊन टाकिले, परंतु मजमध्ये प्रेम नाही तर मला काही लाभ नाही. (४) प्रीती आहे तेथे सहनशीलता नांदते, द्या नांदते, तेथे हेवा राहत नाही, तेथे अहंकार नाही, डौल नाही, स्वार्थ रहात नाही, चीड येत नाही, अपकार ध्यानात येत नाही. (५) असदाचरणाचा कंटाळा येतो, सत्यात आनंद वाटतो. (६) सर्व काही चालते, सर्वांचा विश्वास वाटतो, सर्वांची आशा वाटते, सर्व सहन करता येते. (७) प्रीती कधी हताश होत नाही.
मानवी संसाराकडे पाहिले तर हा संसार सुखमय आहे का दु:खमय आहे ह्याबद्दल मनुष्याची त्रेधा उडते. निराशावादी लोक संसाराचे अंध:कारमय चित्र रेखाटतात. विनोदी लोकांच्या लेखामध्ये देखील निराशेचे विष कालविलेले असते.
मार्क टवेनसारख्या विनोदी माणसांनी देखील एके ठिकाणी निराशा उत्पन्न करणारे उद्गार काढिले आहेत ते असे: “ज्याने संसारामध्ये अनुभव येण्याइतके बरेचसे दिवस काढिले आहेत त्याला मूळ पुरूष जो आदम त्याचे आपण किती ऋणी आहो हे समजते. त्याने मनुष्यजातीवर कोमता उपकार केला म्हणाल तर त्याच्यामुळे जगात प्रतम मरम आले हा होय.” “जन्म झाला असता आनंद व मृत्यूमुळे मनुष्य दु:खी होतो तो का? कारण तो प्रसंग आपणावर नसतो म्हणून.” येणेप्रमाणे संसारात दु:ख आहे, एवढेच नव्हे तर सर्वांत श्रेष्ठ प्राणी जो मनुष्य तो सर्वांत नीच कसा आहे ह्याविषयी खालील वचने दिली आहेत:- (पर्शियन कवी सादी म्हणतो) “मनुष्य हा कुत्र्यापेक्षाही कृतघ्न आहे. कुत्र्याला शंभर खडे मारून एक भाकरीचा तुकडा त्याच्या पुढे टाकिला तर तो त्या खड्यांचे दु:ख विसरून जाऊन भाकरी देणाराचे आभार मानतो. पण मनुष्यावर शंभर उपकार केले व एक अपशब्द बोलल्यास तो ते शंभर उपकार विसरून तेवढा अपशब्दच ध्यानात ठेवील.” अशा प्रकारचे मनुष्यस्वाभावाविषयी सादीचे मत आहे. विकास पावलेल्या अमेरिका देशातील मार्क टवेननेसुद्धा सादीवर ह्या बाबतीत वरचढ केली आहे. तो म्हणतो- “भूकेने मरत पडलेल्या कुत्र्याला तुम्ही उचलून जर त्याला उत्तम प्रकारे पुष्ट केले तर तो तुम्हांला चावणार नाही. असा हा मनुष्य व कुत्रा ह्यांत फरक आहे”. अगदी रानटी देशापासून तो अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातील विनोदी मनुष्याकडूनही असे प्रतिपादिले आहे. असा हा संदेश जर निराशावादी आहे तर उल्हासप्राप्तीकरिता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहावे? तत्त्वज्ञान्यांकडे जावे तर ते गंभीर, दु:खी व उदासी असतात, कवींकडे जावे तर त्यांची काव्ये इतकी काळ्या रंगाची दिसतात की ती आपणांस नकोशी वाटतात. मार्ग टवेनसारख्या विनोदवाद्याकडे गेलो तरी सुद्धा आमची निराशाच होते. तर संसार खरोखरच दु:खमय आहे की काय ह्याचा विचार केल्यास दु:खापेक्षा सुखच जास्त आहे हे आपणांस कळून येईल. सुखापेक्षा दु:ख जास्त वाटते ह्याचे कारण आपल्या अं:तकरणात प्रीती किंवा भक्ती नसते व त्यामुळे आपणांस सर्वत्र निराशा वाटते. भक्ती हेच एक सत्त्व आहे. संसाराशिवाय जर आपली सुटका नाही तर आपली दु:खावस्था का होते? हे आपण पाहू. संसार दु:खमय वाटण्यास पहिले कारण की, आपल्या भोवतालची परिस्थिती सदोष असते. परिस्थितीच्या दोषामुळेच जे शहर खेड्यापेक्षा सुखमय व्हावे, त्या शहरामध्ये मनुष्यास अनेक व्याधी जडतात. अशाच प्रकारची सदोष परिस्थिती मार्क ट्वेनची झाली. लहानपणी खोड्या व उनाडक्या करीत त्याचे दिवस सुखाचे गेले, पण पुढे त्याची परिस्थिती बदलली म्हणजे यशापयशामध्ये तो पडला. त्याची बायको मेली. दोन तरूण मुली मेल्या. व त्यामुळे त्यास संसार दु:खमय वाटू लागला. त्याच्या परिस्थितीमुळे त्याला संसार दु:खमय वाटला म्हणून आपणांसही तो तसा का वाटावा? नदीचे पाणी अस्वच्छ नसते. पण ज्या पात्रातून ते येते त्या पाण्याच्या परिस्थितीमुळे आलेला गढूळपणा ते पाणी शुद्ध करून काढून टाकिला पाहिजे. संसार दु:खमय वाटण्यास दुसरे कारण म्हटले म्हणजे स्वदोष हे होय. परिस्थिती चांगली आहे, पण सुसंधी दवडल्यामुळे जाणूनबुजून किंवा आळसाने त्याच्या हातून अन्याय होतात. अशा मनुष्याच्या दोषामुळेच त्याला जी हळहळ वाटते व संसार दु:खमय वाटतो त्याच्या बोलण्याकडे आपण लक्ष देऊन निराशावादी काय म्हणून व्हावे? तिसरे कारण मनुष्याचा मूळचाच दूषित स्वभाव हे होय. परिस्थिती चांगली असते. हातून काही दोष घडलेले नसतात, पण स्वभावच दूषित असतो. एकाद्या बाजाची सर्वांगे योग्य प्रमाणात असतात, पण त्याचे (Timber) लाकूड चांगले नसले तर जसा त्या बाजातून चांगला आवाज निघत नाही; त्याप्रमाणे जन्मत:च दु:खी स्वभाव असल्यामुळे त्याला सर्व संसारच दु:खमय वाटू लागतो. (१) परिस्थिती, (२) स्वदोष, (३) स्वभाव अशा तीन प्रकारच्या कारणांमुळे विशिष्ट व्यक्तींना संसार दु:खमय वाटत असतो. पण त्यांच्या सांगण्यावरून आपणही संसार दु:खमय आहे असे म्हणू नये. बंधुभगिनींनो, आपली तशी परिस्थिती आहे का? स्वदोष आहेत का? व आपला स्वभाव तसा आहे का? ह्याचा पूर्ण विचार करून दोष असतील ते काढून टाकण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे आपली मूळ स्थिती सुखरूपच आहे हे कळून येईल. जे दु:खी लोक दुस-याचे दु:ख ऐकतात त्यांची तर संसार दु:खमय आहे अशी बालंबाल खात्री झालेली असते. ‘समानशीले व्यसनेषु सख्यम्’ त्यांना त्याच्या विरूद्ध कितीही सांगितले तरी ह्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. मग संसारच जर दु:खमय तर देव कोठला असे त्यांना वाटू लागते. पण ज्यांच्यावर असा प्रसंग आला नाही त्यांनी खरे कारण शोधून काढून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. लहान मुलाला स्वभावाची जाणीव नसते म्हणून ते उल्हासी असते.
सुदैवाने तशीच स्थिती राहिली तर बरे, पण दुर्दैवाने परिस्थितीमुळे एकादा दोष जडला तर तो आपण काढून टाकिला पाहिजे. जगत् जर दु:खी तर त्यात आम्ही राहणारे दु:खीच होणार, सुखी कोठून होणार अशी भ्रामक समजूत कोणी करून घेऊ नये. बुद्धाचेसुद्धा हेच सांगणे आहे. ते म्हणतात ‘दु:ख दु:ख म्हणून जे आहे ते काल्पनिक नव्हे, खरोखरीचे आहे, पण त्यास कारण आहे. ते निवार्य आहे, अनिवार्य नाही, तुम्ही स्वयंभू आहा, दु:ख स्वयंभू नाही. तुमच्या ठिकाणचे दोष काढून टाका. सुखदु:खाची वजाबाकी केली तर सुखच जास्त आहे हे तुम्हांस कळेल. ‘निराशेचे जेव्हा वारे सुटते तेव्हा आपणांस सुखाची विस्मृती होते. ह्याकरिता हा संसार सुखमय वाटण्यास शिरोभागी दिलेल्या नामदेवाच्या अभंगात सांगितल्याप्रमाणे आपण जर भोळी भक्ती कायम ठेविली तर आपल्या ठिकाणी सर्व ज्ञान येईल.