(कल्याण येथें डॉ. खांडवाला यांचे घरीं केलेल्या उपदेशाचा सारांश इं. प्र. १७-८-१९१०.)
संगे वाढे शीण न घडे भजन | त्रिविध हे जन बहु देवा ||
याचिमुळें आला संगाचा कंटाळा | दिसताती डोळा नाना छंद ||
एकविध भाव राहावया ठाव | नेदी हा संदेह राहो चित्तीं ||
शब्दज्ञानी हित नेणती आपुलें | आणिक देखिलें नांवडे त्यां ||
तुका म्हणे आतां एकलेंचि भलें | बैसोनि उगलें रहावें ते ||
या अभंगांत तुकारामबुवा म्हणतात-संगाचे योगानें शीण येतो, व भजन कांहीं घडत नाहीं. बरें, वाईट व मध्यम असे तीन प्रकारचे लोक ह्या जगामध्यें आहेत. त्यांच्या संगानें मनाची एकाग्रता होत नाहीं. एकाचा कल एकीकडे, दुस-याचा दुसरीकडे, तिस-याचा तिसरीकडे अशी स्थिती सर्वत्र आहे. नानाप्रकारचे छंद दृष्टीस पडतात. एक म्हणतो संसार सांभाळा, दुसरा म्हणतो समाज, राष्ट्र वगैरे सांभाळा अशा प्रकारच्या छंदामध्ये मनास भ्रांती पडते, भजन सुचत नाहीं. नाना प्रकारचे गुरू, नाना प्रकारचे पंथ, नाना प्रकारची सोंगे, ढोंगे यामुळें एकविधि बाव रहात नाहीं, व मन छंदाधिस्थ होऊ जातें. नुसत्या शब्द ज्ञानानें आपल्या हितास धोका पोहोंचतो. ‘अर्थे लोपलीं पुराणें’ अशी स्थिती होते. असा प्रकार संगाचा होतो, म्हणून संगापासून दूर रहाणेंच बरें. अशाच प्रकारच्या संगाविषयींचा कंटाळा त्यांनी खालील अभंगांत दाखविला आहे.
रुसलों आम्ही आपुलीया संसारा | तेथे जनाचार काय पाड ||
आम्हां इष्टमित्र सज्जन सोयरे | नाहीं या दुसरें देवाविण ||
दुराविले बंधु सखे सहोदर | आणीक विचार काय तेथें ||
उपाधि वचन नाइकती कान | त्रासलें हें मन बहु माझें ||
तुका म्हणे करा होईल तें दया | सुख दुःख वायां न धरावें||
आम्ही आमच्या संसारावरच रूसलों आहों, तर जनाच्या आचाराला घेऊन आम्हांस काय करावयाचें आहे ! एकाच घरांतील कुटुंबांतील माणसांचें जमत नाहीं. बापाचा पंथ वेगळा, मुलाचा वेगळा. नव-याचा हव्यास निराळा, बायकोचा निराळा. बहीण, भाऊ यांचे जर एकमेकांशीं पटत नाहीं तर इतरांची गोष्ट बोलावयासच नको. या त्रासानें माझें मन भांबावलें आहे. तर देवा ! मला हा संसार नको, ही उपाधी नको, मी रानामध्यें जाऊन या संगापासून दूर राहीन. संसारांतील उपभोग्य जे विषय त्याविषयी नामदेव म्हणतात :
विषयीं आसक्त झालें माझें मन | न करी तुझें ध्यान देवराया ||
नाथिले संकल्प करी नानाविध | तेणें थोर खेद पावतसे ||
ऐसा मी अपराधी दुराचारी देवा | भेटसी केधवां कवणें परी ||
आयुष्य सरे परी न सरे कल्पना | भोगावी यातना नानाविध ||
जरा-व्याधि-कष्ट भोगिता संकटीं | होतसें हिंपुटी चित्त माझें ||
आशा मोहोरत भ्रांत माझें चित्त | चुकलों निजहित नारायणा ||
तूं अनाथ कैवारी म्हणुनी धांवा करी | सोडवी श्रीहरी म्हणे नामा ||
माझें मन विषयामध्ये आसक्त झाल्यामुळे ते ध्यानस्थ होत नाही. अनेक प्रकारचे नसतेच संकल्प मनात उद्भवतात. अमुक मान मिळवावा, अमके धन मिळवावे म्हणून सारखा विचार चाललेला असतो. आयुष्य संपून जातें, पण कल्पना कांहीं संपत नाहीं. अनंत लोक स्वर्गस्थ झाले पण कल्पना म्हणून जशाच्या तशाच कायम राहिल्या आहेत. विषयांच्या मोहामुळें माझें मन भ्रांत होतें.
तुकाराम म्हणतात संग नको व नामदेव म्हणतात विषय नकोत. अशाच प्रकारचा उपदेश चोहोंकडे बहुतकरून ऐकू येतो. पण आज आपण तर संघ बनवून ह्या ठिकाणी जमलो आहो. मग परस्पर विरूद्ध ह्या दोन गोष्टींची आता सांगड ती कशी घालावयाची. तुकाराम ज्याप्रमाणे संग नको म्हणून म्हणतात, त्याचप्रमाणे तो पाहिजे असेही म्हणतात.
संगतीने होतो पंगतीचा लाभ | अशोभी अनुभव असिजेते||
जैसी तैसी असा पुढिलांचे सोई| धरिती हाती पायी आचारिये||
उपकारी नाही देखत आपदा| पुढिलांची सदा दया चित्ती||
तुका म्हणे तरी सज्जनांची कीर्ती| पुरवावी आर्ति निर्बळाची||
ज्या पंगतीला आपण जेवावयास बसतो त्या पंगतीचा लाभ आपणांस मिळतो. राजाच्या पंगतीमध्ये एकदा का शिरकाव झाला म्हणजे राजाला मिळणारे पदार्थ आपल्याला मिळावयाचेच. आम्ही कोण, गरीब का मोठे असे प्रश्न वाढपी विचारीत नाहीत. त्याचप्रमाणे आचार्यांनी, सज्जनांनी धर्मस्थापनेकरिता जे संग स्थापिलेले असतात त्या संगांमध्ये जाण्याचा अवकाश की लागलीच आपणास त्याचा लाभ मिळतो. दुबळ्याची आपत्ती निवारण करण्याकरिताच संग स्थापलेले असतात. एकट्याने बसून काही होत नाही. दुसरे एके ठिकाणी म्हटले आहे की,
संगत करे सज्जनकी| बढत बढत बढ जाय||
संगत करे नीचनकी| तो फल छोड फत्तरकी||
साधूको साधू मिले तो| हशी खुषीसे दो बात||
और गद्धेकु गद्धा मिले| तो उडउडाके दो लात||
संगत करावयाची तर उत्तम संगाबरोबर केली पाहिजे. पंखा मोडलेली नाव पंखा न मोडलेल्या नावेला धरून तरून जाते त्याप्रमाणे दुर्जन सज्जनाच्या मदतीने तरून जातो. संग करावयाचा तो सज्जनांबरोबर करावा, नाहीपेक्षा एकांती राहणे बरे. विषयाविषयी तुकाराम म्हणतात :
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे| पक्षीही सुस्वरे आळविती||
येणे सुखे रूचे एकांताचा वास| नाही गुण-दोष अंगा येत||
आकाश मंडप पृथिवी आसन| रमे तेथे मन क्रीडा करी||
कंथा कमंडलु देह उपचारा| जाणवितो वारा अवसरू||
हरिकथा भोजन परवडी विस्तार| करोनि प्रकाश सेवे रूचि||
तुका म्हणे होय मनासी संवाद| आपुलाचि वाद आपणासी||
जे उपभोग्य पदार्थ ईश्वराने निर्माण केले आहेत, त्यांवर आसक्ती न ठेवता त्यांचे सेवन करावे. विषयांचा उपभोग घेत असताना गर्व, अहंकार, कोतेपणा जर उत्पन्न झाला तर मग ते विषय नसलेले पुरवले. बागेमध्ये फिरावयास गेलो असता हा बाग माझ्या आजाचा, माझ्या आजानेच ही झाडे लावली, माझा आजा कितीतरी वाकबगार होता, असा अहंकार उत्पन्न होऊन तेथील वृक्ष, वल्ली, फळे-फुले ह्यांचा उपभोग घेण्यापेक्षा त्यांचा नाश झालेला पुरवला. अहंकार अवनतीला कारण होतो. शुद्ध भावनेने विषयांचा आदर करावा. निरहंकारभावाने आपण सृष्टीमध्ये वावरू लागलो, तर संग व विषय आपल्या घातास कारण न होता उन्नतीसच कारण होतात. तेव्हा संगाचा व विषयांचा आदरही केला पाहिजे व अनदरही केला पाहिजे. कपडे, अलंकार, धनदौलत, मान-मरातब ह्यांचे योगे जर अहंकार उत्पन्न होत नसेल तर मग अनेकश: आणखी विषय उत्पन्न झाले तरी हरकत नाही. पण जर अहंकार उत्पन्न होईल तर मग धूमकेतू येऊन त्यांचा सत्यानाश झालेला बरा. एकंदरीत काय की, संग पाहिजे, पण तो सज्जनांचा असावा. तसे नसेल तर एकांतवास बरा. विषय पाहिजेत, पण त्यामुळे गर्व होता कामा नये. नाही तर ते विषय नसलेले बरे.