लंडन शहर.

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड,
ता. १०।१।१९०२.

आमच्या कॉलेजास नाताळची रजा मिळाल्याबरोबर ती लंडन येथें घालवावी म्हणून तिकडे निघालों.  ज्या पाश्चात्य सधारणेचे गोडवे आपण शाळांतून, कॉलेजांतून, ग्रंथातून, गुरुमुखांतून ऐकतों-इतकेंच नव्हे, तर जें हें सुधारणाचक्र, खाऊन पिऊन घरीं स्वस्थ राम राम म्हणत बसणार्‍या आमच्या साध्या भोळ्या राष्ट्रास आज सुमारें १०० वर्षें सारखें चाळवीत आहे त्याचीं कांहीं कळसत्रें वरील अचाट शहरांत दिसतील तीं पहावीं असा एक हेतु निघतेवेळीं मनांत दडून राहिला होता.  कारण, ऑक्सफर्डचें विद्यापीठ हें एक थोरलें आश्रम असल्यासारखें आहे.  येथें विद्याव्यासंगाशिवाय दुसर्‍या कसल्याही भानगडीचें वारें नाहीं.  आणि आधुनिक सधारणारूपी चीज तयार होण्याची लंडनएवढी मोठी वखार तर जगांत दुसरीकडे कोठें नाहीं.  तेव्हां निघतांना माझ्या मनांत वरील हेतु असणें साहजिक आहे.  पण लंडन येथें गेल्यावर निराळाच प्रकार झाला !  सुधारलेल्या उद्योगी लोकांचें ५६ लाख वस्तींचें हें मुख्य शहर.  ह्यांत प्रथम गेल्याबरोबर मानवी महासागरांत आपण जणूं गटंगळ्या खातों आहों कीं काय असें वाटूं लागते !  आमच्याकडील पारमार्थिक कवींनीं भवसागराविषयींची आपली भीति वारंवार प्रदर्शित केली आहे. त्यांपैकीं एखादा जर ह्या साक्षात् भवसागरांत येऊन पडला, तर बिचार्‍याची कोण त्रेधा उडून जाईल !  कुठल्याही रहदारीच्या रस्त्यांत गेल्याबरोबर स्त्री-पुरुषांच्या लाटांवर लाटा थडकत असतांना पाहून जगावर मनुष्यप्राणी फार सवंग झाला आहे,  असें वाटतें आणि त्याविषयीं फारशी पूज्यबुद्धि राहत नाहीं.  शेंकडों मंडळ्या, हजारों संस्था, अनेक भानगडी व असंख्य चळवळी, सार्वजनिक हिताकरितां चाललेल्या आहेत हें गाईडबुकांवरून कळतें.  पण त्या कोणत्या कोपर्‍यांत आहेत व त्यांचें ह्या जनसमूहावर काय कार्य घडतें, ह्याचा कांहीं बोध होत नाहीं.  अशा स्थितींत माझ्या वरील हेतूची काय वाट झाली असावी, हें निराळें सांगावयास नको.  शिवाय स्पेन्सरनें आपल्या 'समाजशास्त्राचें अध्ययन' ह्या ग्रंथांत लिहिलेलें आठवतें कीं कोणी एक फ्रेंच प्रवासी इंग्लंडांत येऊन आठ दिवस राहिल्यावर त्यास इंग्रजांविषयीं एक ग्रंथ लिहावा असें वाटून तो लिहूं लागला.  एका महिन्यानें त्याच्या मतांविषयीं त्यालाच खात्री वाटेना.  एक वर्षभर राहिल्यावर तर ग्रंथ लिहिण्याचें काम त्यानें अजीबात टाकून दिलें !  तात्पर्य विश्रांतीकरितां मिळालेल्या सुट्टींत नुसते तर्क लढविण्याची दगदग न करितां ह्या अक्राळविक्राळ शहरांत नजरेस पडतील ते चमत्कार मुकाट्यानें पाहण्याचा मीं निश्चय केला !

कार्थेज, केरो, बगदाद, रोम इ. जगाच्या इतिहासावर परिणाम घडविणारीं जीं प्रचंड शहरें झालीं, त्याच तोडीचें पण त्या सर्वांहूनही मोठें लंडन हें होय.  आणि ह्याचा प्रताप हल्लीं कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारें सर्व जगाला भोंवत आहे.  लोकसंख्येच्या मानानें हें आस्ट्रेलिया खंडापेक्षां सव्वा पटीनें मोठें आहे.  स्काटलंड व वेल्स ह्या दोहोंची लोकवस्ती मिळविली तरी इतकी होत नाहीं.  २० वर्षांपूर्वी ह्याच्या भोंवती जीं खेडीं होतीं तीं आतां ह्यांतील रस्ते झाले आहेत.  तरी अद्यापि हें वणव्याप्रमाणें आसमंतात् झपाट्यानें पसरत आहे.  ह्या शहरांत वाहनांची जी अचाट योजना केली आहे, तिजकडे परकीयांचें लक्ष आधीं जातें.  कांहीं आगगाड्या जमिनीवरून धांवतात, कांहीं उंच कमानीवरून हवेंतून धांवतात, तर कांहीं जमीनीखालून खोल बोगद्यांतून धांवतात.  टैम्स नदीवरून आगबोटी तरंगतात, नदीवरील उंच पुलावरून एखादी आगगाडी पाखरासारखी फडफडते, तर पाण्याखालून एखादी सरपटते !  ह्याशिवाय ट्रॅमवे, आम्नीबस् व साध्या गाड्या ह्यांची तर रस्त्यांत खेंचाखेंची !  अगदीं नुकतीच एक सेंट्रल लंडन रेलवे म्हणून ८० फूट खोल भुईंतून जाणारी विजेची गाडी झाली आहे.  प्रत्येक स्टेशनावर उतारू लोकांस लिफ्टनें खालीं सोडतात व वर घेतात.  आंतील स्टेशनावर प्रकाशाची व हवेची इतकी सुंदर व्यवस्था केली आहे कीं, वरच्यापेक्षां खालींच बरें वाटतें.  तीन तीन मिनिटांनीं एक गाडी अकस्मात् पुढें येते आणि हजारों लोकांना घेऊन एका मिनिटांत पसार होते.  ही परंपरा सकाळ पासून रात्रीच्या १२ पर्यंत घड्याळांतील कांट्याप्रमाणें नियमानें चालू असते.  लंडनच्या जमिनींत खालीं कोठें काय आहे हें सांगवत नाहीं.  विजेच्या दिव्यांच्या तारा, धुराच्या दिव्यांच्या तोट्या, पाण्याचे बंब, मैल्याचीं गटारें आणि आगगाड्यांचे बोगदें ह्यांनी सगळी जमीन मधमाशांच्या पोळ्याप्रमाणें पोखरली आहे.  खालीं जमिनींत ही नकशी, तर वरतीं हवेंतून टेलिग्राफ व टेलिफोनचें जाळें पसरलें आहे.  जागजागीं टेलिफोनचीं ठिकाणें आहेत.  त्यांतून जरूरीचे निरोप जाऊन लगेच उत्तर येतें; अगर दोघांचे संभाषण चालतें.  ह्याप्रमाणें लंडन नांवाचें २००।३०० चौरस मैल क्षेत्रफळाचें एक सावयवी शरीर आहे !

इंग्लंड हें बोलून चालून व्यापार्‍यांचें राष्ट्र - अर्थात् त्याचें मुख्य शहर म्हणजे सर्व जगाचें एक भलें मोठें मार्केट.  तेव्हां त्यांतील दुकानें पहाण्यासारखीं असतील ह्यांत नवल काय ?  माल तर मोहक खराच.  पण तो दुकानांत मांडून ठेवण्याची ढब त्याहून मोहक.  आमच्याकडील दुकानदार आपल्या मालाचे ढिगाचे ढीग दुकानांत लपवून ठेवून आपण दाराशीं येऊन बसतात. एखाद्यास वाटावें हे जणूं रखवालीच करीत आहेत.  इकडे कांहीं निराळाच प्रकार.  दुकान म्हणजे एक जंगी पारदर्शक पेटी-अथवा पदार्थ संग्रहालय-अगर एक लहानसें प्रदर्शनच.  रस्त्यांतून धांवतांना देखील दुकानांतील सर्व जिन्नस किंमतीसहित दिसतील.  हिंदुस्थानांत मागें एकदां प्रदर्शनाकरितां मेणाचे सुंदर पुतळे आणले होते,  तसले पुतळे येथें प्रत्येक कापडवाल्याच्या दुकानांत उभे केलेले असतात.  आणि त्यांवर दुकानांतील पोशाकाचे मासले चढविलेले असतात.  पुतळ्यांकडे पाहून पोशाक घेण्याची इच्छा सहजच होते.  काळोख पडल्यावर प्रत्येक पदार्थांजवळ एक एक बिजलीची बत्ती चमकूं लागते.  दुकानावरच्या ज्या पाट्या आणि जाहिराती दिवसा शाईनें लिहिलेल्या दिसतात, त्या रात्रीं दिव्यानें अधिक स्पष्ट दिसतात आणि दुकानांस अधिकच शोभा येते.  जाहिरातीनें तर इतका कहर उडवून दिला आहे की पहावे तिकडे अक्षरे, चित्रे आणि पुतळे हीच दिसतात. कित्येक हालतात, कित्येक लकाकतात, तर कित्येक वारंवार आपला रंग बदलतात! शहरास कंटाळून बाहेर पडलो, तर शेतांतून व पिकांतूनही जाहिराती दिसाव्यात काय? भुईखालच्या विजेच्या गाडीकडे जाण्यास मी एकदा लिफ्टमधून खाली उतरत असताना माझी नजर काळोखातून सहज भुयाराच्या भिंतीकडे गेली. तितक्यातच लिफ्टच्या उजेडामुळे भिंतीवर एक जाहिरात दिसली!! अशा ह्या मायावी लोकांपुढे व्यापारात आमचा टिकाव कसा लागेल!

नुसत्या भपक्या-भपक्यानेच ह्यांचा व्यापार इतका वाढला आहे, असे म्हणणे केवळ भ्रममूलक आहे. अनियंत्रित व्यापार आणि कायदेशीर स्पर्धा ह्या तत्त्वाचा ह्या लोकांवर असा फायदेशीर परिणाम झाला आहे की गि-हाईकांशी बेशिस्तपणा, आडदांडपणा, बेविश्वास अगर किमतीत अफरातफर केल्यास व्यापारी आपले भांडवल लवकरच गमावून घेईल. आपल्या पेढीची कोणत्याही प्रकारे बदनामी होऊ नये इतकेच नव्हे, तर लहान-थोर दर्जाच्या कसल्याही गि-हाईकाचे क्षुल्लक बाबतीतही मन दुखवू नये म्हणून दुकानदार हरएक प्रयत्न करीत असतात. एकंदरीत सौंदर्य, बुद्धी आणि नीती ह्या तीनही मुख्य तत्त्वांची समान सांगड घालून दीर्घोद्योग व अचाट धाडस व निश्चळ श्रद्धा ह्यांच्या पायांवर ह्या लोकांनी आपल्या व्यापारशास्त्राची इमारत उभारली आहे म्हणून लंडन शहरास हल्लीचे वैभव आले आहे!

हे लोक स्वार्थी आहेत, सुखार्थी आहेत, जडवादी आहेत इ. समज पुष्कळ शहाण्या लोकांचेही आहेत आणि इकडे आल्यावर ह्यांचे वैभव, ह्यांची चैन आणि फॅशन्स पाहून हेच ग्रह कायम होण्याचा पुष्कळ संभव आहे. इकडील बाजारातील एक-चतुर्थांश तरी माल निव्वळ चैनीचा आहे असे दिसेल. परवा ‘ख्रिस्तमस बजार’ ह्या नावाचे केवळ नाताळाकरिता एक जंगी दुकान मांडण्यात आले होते, त्यात तळघरापासून तो वर चार मजल्यांपर्यंत लहान मुलांस नाताळात नजर करण्याची खेळणी मांडून ठेविली होती. हे लाखो रूपयांचे दुकान पाहून मला वाटले की इंग्लंडातील लहान मुलांनी जर नुसती आपली खेळणी विकली तर हिंदुस्तानातील दुष्काळपीडितांचे प्राण वाचतील! असो, तो भाग वेगळा. पण पाश्चात्य सुधारणेचे सर्व रहस्य केवळ चैनीतच नाही. जगात राहून सुख भोगण्याची अत्यंत लालसा ह्या लोकांस आहे हे खरे. पण, पृथ्वीवर राहून आकाशातील स्वर्गाकडे उडी न घेता येथेच स्वर्ग उतरविण्याची ह्यांची दिशा आहे. हे लोक स्वार्थी आहेत हे तर खरेच. पण स्वार्थसाधल्याबरोबर परमार्थास ते कसे लागतात, हे आम्हांस समजून घेणे आहे. असो. आज इकडील भौतिक प्रकार सांगितला. पुढे साधल्यास एक दोन बौद्धिक आणि नैतिक मासले सांगेन.