आपुलिया बळें घालावी हे कास

 (ता. १४-६-१९१० रोजी रा. रा. सत्यवंत वासुदेव नवरंगे यांच्या घरीं त्यांचे वडील प. वा. वासुदेव बाबाजी नवरंगे यांच्या तिस-या पुण्यतिथिनिमित्त केलेल्या हरिकीर्तनाचा सारांश.)

विषयोपक्रम :- ह्या मानवी संसारामध्ये मनुष्याची बुद्धी उत्तरोत्तर जसजशी जास्त विकसित होत जाते, तसतसा त्याच्या कर्तव्याचा प्रदेश विस्तृत होऊन त्याची बुद्धी संकीर्ण होते व अशा वेळेस काय करावे असा त्याला भ्रम होत असतो. त्याची चित्तशुद्धी आणि समाजहित ह्या दोन कर्तव्यांचा कलह लागून बुद्धी व्यामिश्रित होते. प्राचीन काळी वेदांतात समष्टी, व्यष्टी ह्या दोन भावना जरी अवगत होत्या तरी अर्वाचीन काळाप्रमाणे तेव्हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नव्हता. आता प्रत्येकाची जात, समाज, राष्ट्र, जग अशा उत्तरोत्तर समष्टी सुधारणेकडे ध्यास लागतो आणि अंतःकरणशुद्धी ह्या व्यष्टी सुधारणेची हयगय होते आणि त्यामुळे समष्टी सुधारणेलाही बाध येतो. तुकाराम म्हणतात, अशा वेळेस एक गोष्ट करा ती ही की –

आपुले स्वहित करावे पै आधी । विचारुनी बुद्धी समाधान ।।
नये मागे पाहो वाट फिरोनिया । दुसरा संगिया साहाकारी ।।
आपुलिया बळे घालावी हे कास । न घेणेचि आस आणिकाची ।।
तुका म्हणे ब्रह्मरसी द्यावी बुडी । वासना हे कुडी सांडुनिया ।।

आपल्या स्वतःच्या बद्धीला ज्यायोगे समाधान वाटेल अशी गोष्ट करा. स्वतःच्या बुद्धीला सोडून दुस-याच्या बुद्धीचे समाधान पाहू नका. जितकी त्वरा करवेल तितकी करून आपले हित साधून घ्या. कारण –

जरा टुक सोच ये गाफील, । के दमका क्या ठिकाना है ।
निकल जब ये गया तनसे । तो सब आपना बेगाना है ।।१।।
मुशाफिर तूं है, यह दुनिया । सराहे भूल मत गाफील ।
सफर परलोकका आखिर । तुझे दरवेश आना है ।।२।।

तुमचे जीवित फार थोडे आहे, त्याचा प्रदेश फार आकुंचित आहे, तुमचे ठिकाण कोठे आहे ? पर्यवसान कशात आहे ह्याचा विचार करा. ह्या तनूतून दम निघून गेला म्हणजे जे आपले म्हणून समजतो ते परकीय बनेल. आपण ह्या जगामध्ये मुशाफर असून आपली वसती तात्पुरती आहे. ही सराई-धर्मशाळा आहे, कायमची वसती नाही. सध्या आपण ज्या पायरीवर आहो त्याच्या वरच्या पायरीवर जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बुद्धीचे बदलत जाणारे आपले कर्तव्य करीत असता, आपल्या बुद्धीचे समाधान केले पाहिजे, कारण –
न जाने कौनसी बीरया । बजेगा कूच नक्कारा ।।
विषयसुख देख मत भूलो । वृथा जंजालमें फूलो ।।
जगत है रैनका सुपना । समज मन कोई नही अपना ।।
तजो मन लोभ चतुराई । भजो हरिचरण सुखदाई ।।

कोणत्या वेळेस ह्या पाय-या आपटतील ह्याचा नियम नाही, ह्या प्रवासाचा आदी व अंत अनिश्चित आहे, हे सर्व जगत् क्षणभंगुर आहे व नेहमी बदलत जाणारे असून रात्रीच्या वेळी पडलेल्या स्वप्नाप्रमाणे आहे. आपले मत स्थापित करण्याकरिता प्रयत्नाने बहुमत आपणाकडे मिळविण्याची चतुराई आपण करू नये. त्यायोगे आपणाला खरे सुख प्राप्त होणार नाही. ते मिळविण्यास हरीचे चरण घट्ट धरले पाहिजेत. नाही तर-

चामडेकी पूतली तूं करले भजन ।।धृ।।
चामडेकी पूतली चांवलेवे पान ।
आछे आछे कपडे पहिरे करत गुमान ।।
चामडेका बछा चामडेकी गाय ।
चामडेका दूध दही चामडेमें जाय ।।
चामडेका हाथीघोडा चामडेका उंठ ।
चामडेका बाजा बाजे बाजे चारो खूंट ।।
चामडेका बादशहा चामडेका वजीर ।
चामडेकी सारी दुनिया बोले दास कबीर ।।

मनुष्ये कातड्याच्या बाहुल्या आहेत, त्या बाहुल्या तरी सुंदर असाव्या तशा नसून बहुतेक कुरूप आहेत. शंभरामध्ये एकादी दुसरी सुंदर असते. अशी स्थिती असूनही मनुष्य कितीतरी गर्व वहातो ! पानसुपारी खाऊन कृत्रिम सौंदर्याने कुरुपतेचे तो प्रदर्शन करीत असतो. एका राष्ट्राचे सौंदर्य दुस-या राष्ट्रास हसावयास लावते, एकाद्याची टोपी, जोडा किंवा अंगरखा दुस-यास हास्यास्पद वाटतो. दुस-याला बरे वाटावे म्हणून आपण चांगला पेहराव करतो. ह्याप्रमाणे आपण ह्या कातड्याच्या देहाचा विनाकारण गर्व वाहतो. जिचे आपण दहीदूध खातो ती गाय चामड्याचीच आहे, तिचे वासरू, दही, दूध देखील कातड्याचेच आहे, आणि ते दूधही कातड्याच्याच पोटात जाते. हत्ती, घोडे, उंट, वजीर व बादशहादेखील कातड्याचाच आहे. अशी ही सर्व दुनियाच कातड्याची बनलेली आहे. तथापि आपल्या आदर्शाच्या मागे लागून आपण जर उच्चपद संपादन करून आपले हित साधून घेतले तर ह्या चामड्याच्या देहाचे सार्थक होते. जेथे जेथे भजन होत असते तेथे तेथे आत्माराम येत असतो, नाही तर निसते चामडे रहाते. आपण जर स्वहित लवकर साधून घेतले नाही तर आपण काळाच्या जबड्यात जाऊ. काळ कसा आहे तर-

पुरंदरसहस्त्राणि चक्रवर्तिशतानि च ।
निर्वापितानी कालेन प्रदीपा इव वायुना ।।
अद्यैव हसितं गीतं पठित यैः शरीरिभिः ।
अद्यैव ते न दृश्यन्ते कष्ट कालस्य चेष्टितम ।।
म्रियमाणं मृतं बंधुं शोचन्ते परिदेविनः ।
आत्मानं नानुशोचन्ति कालेन कवलीकृतम ।।

मोठमोठी शहरे काबीज करणारा सोनापती, एवढेच नव्हे तर सार्वभौम राजासुद्धा काळाच्या एका फुंकाराने नाहीसा होतो. थोड्या वेळेपूर्वी वाचीत असलेला किंवा सुस्वर गायन गात असलेला मनुष्य एकदम काळाच्या तावडीत सापडतो. ह्या काळाने सर्वांना आपल्या मुठीत धरलेले आहे. परंतु हा कालवादसुद्धा खरा नाही. कर्म हेच सर्वांपेक्षा बलवत्तर आहे. महाभारतातील अनुशासनपर्वामध्ये अशी गोष्ट आहे की, गौतमी नावाच्या एका वृद्ध बाईचा एकुलता एक मुलगा साप चावून मेला, तेव्हा अर्जुनका नावाच्या व्याधाने त्या सापास जिवंत धरून आणून, ह्यास कोणती शिक्षा करू म्हणून गौतमीस विचारले. त्यावर तिने सापासच ती गोष्ट विचारण्यास सांगितले. सापास विच्यारल्यावरून त्याने उत्तर दिले की, ह्यात माझा काही एक अपराध नाही, मी मरणाचा दास आहे, मरणाने सांगितलेले काम मी बजावतो एवढेच. त्यावरून व्याध्याने मरणास जिवंत पकडून आणून हे दुष्कृत्य तू का केलेस म्हणून त्याला विचारले. मरणाने उत्तर दिले, “बाबा, मी सापासारखाच काळाचा नोकर आहे. त्याच्याच आज्ञेवरून मी पडशाकडे, खोकल्याकडे, तापाकडे वगैरे अनेक रोगांकडे जाऊन मनुष्यांना घेऊन येतो.” पुढे व्याधाने त्या काळासही पकडून आणिले, तेव्हा काळाने पुढीलप्रमाणे उत्तर दिले –

कर्मदायादवौल्लोकः कर्मसंबंधलक्षणः ।
कर्माणि चोदयन्तीह यथान्योन्यं तथा वयम् ।।
यथा मृ त्पिंडतः कर्ता कुरुते यद्यदिच्छति ।
एवमात्मकृतं कर्म मानवः प्रतिपद्यते ।।
यथाच्छायातपौ नित्यं सुसंबंद्धौ निरंतरम् ।
तथा कर्मच कर्ता च संबंद्धावात्मकर्मभिः ।।
एवं नाहं नवैर्मृत्युर्नसर्पो न यथा भवान् ।
न चेयं ब्राह्मणी वृद्धा शिशुरेवात्र कारणम् ।।

मी काही एक करीत नसतो. जे काही घडते ते ज्याच्या त्याच्या कर्मामुळे घडत असते. कर्मसंबंधहीन अशी कोणतीच वस्तू नाही. सर्व भाव मात्र कर्मसंबंधलक्षण आहे. एका कर्मामुळे दुसरे कर्म उद्भवते. अशी ही मालिका सारखी चालू आहे. आम्ही सर्वजण छकड्याला जुंपलेले बैल आहो. कर्म वा कर्ता ह्यांचा अन्योन्य संबंध आहे. आज असे कर्म नाही की जे स्वयंभू आहे. कर्ता अगोदर की कर्म अगोदर हे एक मोठे कोडे आहे. बीजांकुरन्यायाप्रमाणे कर्ता, कर्माचा बाप, किंवा कर्म कर्त्याचा बाप हे काही सांगता येत नाही. कर्त्याच्या इच्छेच्या बीजाभोवती कर्माची जमीन, कर्माचे खत, कर्माचे पाणी व कर्माची हवा असते. त्यांतून जो अंकुर येतो त्याचा भाग कर्माकडे किती व कर्त्याकडे किती हे कोणी सांगावे ? कुंभार ज्याप्रमाणे आपल्या इच्छेनुरूप मडके बनवितो, त्याप्रमाणे मनुष्य स्वेच्छेने कर्म करीत असतो व कर्मही मनुष्येच्छेला आपल्यापरी वळवीत असते. ज्याप्रमाणे ऊन व सावली एकमेकांवर अवलंबून असतात त्याप्रमाणे कर्म व कर्ता एकमेकांवर अवलंबून असतात. परस्परांची परस्परांवर सूक्ष्म क्रिया, प्रतिक्रिया (Interaction) होत असते. व्याध, साप, मरण, काळ, किंवा गौतमी ह्यांपैकी कोणीही जबाबदार नाही तर त्या मुलाचेच जे कर्म त्याने त्यास नेले आहे. कर्मच सर्वांत श्रेष्ठ आहे. असे आदर्शमय कर्म आपल्या बुद्धीचे समाधान साधून आपण करावे, व आपली बुद्धी स्थिर करावी. भलताच वाद माजवू नये, नाही तर तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘वादे ब्रह्मवृंदे गेली वायां’ असे होईल. आपल्या जीवनपथापासून आपण एक अंगुलीभरही दूर जाऊ नये. नानाप्रकारच्या मतांचा व जीवनपथांचा काही एक संबंध नाही. आपल्या समाधानाचे जितक्या प्रमाणाने हित असेल तितक्या प्रमाणाने आपले शरीर, शील, समाधानरूपी संपत्ती खर्च करावी. जीवनपथास धरून आपण जर कर्म केले नाही तर आपली स्थिती वेड्यापेक्षाही कठीण होईल.

स्थाल्यां वैडूर्यमय्यां पचति तिलखलीमिन्धनैश्चन्दनाद्यैः ।
सौवर्णे लांगलाग्नैर्विलिखति वसुधामर्कमूलस्य होतोः ।।
छित्या कर्पूरखण्डा न्यृतिमिह कुरुते कोद्रवाणां समन्तात् ।।
प्राप्येमां कर्मभूमि न चरति मनुजो यस्तपो मन्दभाग्यः ।।

जो मनुष्य कर्मभूमीला प्राप्त होऊन व्रत आचरीत नाही तो रत्नजडित भांड्यामध्ये तिळाची पेंड घालून खाली मलयपर्वतावरील चंदन हे सर्पण लावून ती पेंड शिजविणा-या ह्या मनुष्याप्रमाणे किंवा रुईची मुळी काढण्याकरिता सोन्याच्या नांगराचा उपयोग करणा-या मुलाप्रमाणे, किंवा कोद्रवाच्या भोवती कापराचे आळे करणा-या मनुष्याप्रमाणे मूर्ख आहे. जो मंदभागी आहे तो कर्म कोणते, कर्माचे काय महत्त्व आहे हे समजल्यावरही त्या संधीचा दुरुपयोग करतो. ह्याकरिता आपण नेहमी भजन केले पाहिजे. भजन म्हणजे नुसते टाळ कुटीत बसणे नव्हे तर भजन म्हणजे आपल्या मनाला जे उच्च वाटले त्या आदर्शाचा पाठलाग करणे होय. असे भजन करून आपले उद्दीष्ट मनाला कळले अशी जरी खात्री झाली तथापि आदर्शाच्या बाजूने एक अडचण आहे ती कोणती म्हणाल तर –

आवडतो प्रिय परी गवसेना ।।धृ।।
स्वजनाहुनि प्रिय देह आपला ।
तोहि विटे परि आपण विटेना ।।
ज्यावरी धांवति इंद्रिय मन ही ।
सर्वही पाहुनि आपण दिसेना ।।
श्रीगुरुदासा अनन्य घडे जरी ।
अनुभवतंतू कधीही तुटेना ।।

आपणास आदर्श प्रिय वाटतो पण तो गवसत नाही. आपल्या स्वजनाहून प्रिय असा देह विटतो पण आदर्श विटत नाही. आपल्या सर्व गात्रांचे भाव ईश्वर पाहातो पण तो स्वतः काही दिसत नाही. असे जरी आहे तरी आपण निराश होता कामा नये. एका आदर्शाने दुसरा आदर्श मिळतो. हिमालय पर्वतावरची सर्व शिखरे एकदम दिसत नाहीत. एक चढून गेल्यावर दुसरे, दुसरे चढल्यावर तिसरे दिसते. ह्याचप्रमाणे आदर्शाचीही गोष्ट आहे. डावपेच नसेल तर आपला अनुभवतंतू कधी तुटत नाही.

प्रेम पियाला जो पिये शीस दक्षिणा देय ।
लोभी शीस न देसके नाम प्रेमका लेय ।।
जो घट प्रेम न संचरे, सो घट जान मसान ।
जैसी खाल लुहारकी, श्वास लेत बिन प्राण ।।

ज्याला प्रेमाची गोडी लागली आहे तो प्रेमाकरिता आपले डोकेही कापून देण्यास तयार असतो, पण ज्याला ती गोडी नसते तो नुसते प्रेमाचे नाव घेत बसतो, अनुभव यावयास प्रेमाचा प्याला प्यावयास पाहिजे. नाही तर लोहाराच्या भात्याप्रमाणे प्राणाशिवाय नुसता श्वास घेणारी आम्ही यंत्रे होऊ. केशवस्वामी सांगतात -

ऐसी फकिरी नही रे भाई । ये तो सालिम बेशरमाई ।।धृ.।।
चेलेके घर हात पसारे । दुनियादारकु मानत प्यारे ।।
मै घर लडके मनमे घरना । बाहेर निजाम रोजे करना ।।
कान खोलकर केशव बोले । गाफिल अलबत खावे झोले ।।

चेल्याने फकिराजवळ भिक्षा मागावयाची, ती हल्ली संध्याकाळी फकिरांची गर्दी चेल्यांचे घरी दृष्टीस पडते. बाहेरून परमार्थ पण आतून स्वार्थ बरा नव्हे, ह्याकरिता तू आपल्या बुद्धीला संतुष्ट करून आपले हित साधून घे व खालीलप्रमाणे ईश्वराची प्रार्थना कर –
प्रभू मज देई तुझी खरी शांति ।।धृ.।।

जगशांतीने मन मळमळते ।
होत असे मज वांति ।।
तव शांतीने बहु सुख वाटे ।
नेई वरी ती अंती ।।
शांति दे स्थिर करि मन माझे ।।
काढ मनाची भ्रांति ।।
शांति आपुली दिली त्वां ज्यांना ।
काय तयांची कांति ।।