मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
(सुबोधपत्रिका ता. ५-१०-१९०२)
मुलांनो, आमच्यापेक्षां खालील प्राण्यांस बुद्धी नाही, अक्कल नाही असे आम्ही नेहमी मोठ्या तो-याने बोलत असतो. पण, आज मी तुम्हांस ह्या प्राण्यांबद्दल दोन तीन गोष्टी सांगणार आहे. त्यासंबंधाने तुम्ही आपल्याशीच विचार करा.
डेव्हन पोर्ट शहरी एके दिवशी मी आपल्या खोलीत वाचीत बसलो होतो. जवळच घरचे मांजर घुरघुरत बसले होते. काही वेळाने त्यास बाहेर जावेसे वाटले. पण दार घट्ट झाकले होते. ह्या देशात थंडीमुळे घराची सर्व दारे आणि खिडक्या सुमारे ६ महिने बंद ठेवावी लागतात. ते दोन तीनदा ओरडले. पम माझे लक्ष तिकडे गेले नाही. शेवटी मी जेव्हा तिकडे पाहिले तेव्हा मांजर आपल्या पायांवर ताठ उभारून मजकडे पहात पहात दाराच्या कडीकडे आपले रेशमी हात पोहोचविण्याचा प्रयत्न करू लागले. एवढी खूण मला पुरे झाली. मी दार उघडल्यावर मांजर मुकाट्याने बाहेर चालते झाले ! बोलता आले असते तर मांजर ‘थँक यू’ म्हणून आभार मानल्याशिवाय राहते ना !
पण एवढ्यावरून सर्वच प्राणी ह्या मांजरासारखे मुके आहेत असे समजू नका. थोड्या वर्षांपूर्वी तुम्हा सवतःला जितके बोलता येत होते त्यापेक्षा अधिक व जास्त स्पष्टपणे आणि तेही इंग्रजीत माझ्याशी एक पक्षी बोलला त्याची हकीकत अशी :-
स्कॉटलंड देशाची राजधानी एडिंबरो ह्या शहराजवळ ‘फर्थ ऑफ फोर्थ’ नावाच्या खाडीवर एक भला जंगी पूल बांधला आहे. तो पाहाण्यास मी एके दिवशी गेलो होतो. पाहून झाल्यावर पुलाखालच्या खेड्यातील एका गृहस्थाने मला चहाला बोलाविले. कोणी नवीन पाहुणा घरी आल्यास त्याची आधी घरातील सर्व मंडळींशी शिष्टसंप्रदायाप्रमाणे हात हालवून ओळख करून देण्याची इकडे (फुट नोट – सुबोध पत्रिका ता. ५-१०-१९०२) चाल आहे. पण, ह्या वेळी घरातील सर्व मुली बाहेर गेल्या असल्यामुळे घरधनिणीने आपला आवडता पोपट मजपुढे आणिला. पोपटबुवांची मुद्रा गंभीर आणि अति संभावित दिसली. पुढे आल्याबरोबर पॉलपंतानी मला ‘हाऊ डू यू डू’ (कसे काय आहे ?) असे इंग्रजीत स्पष्ट कुशल विचारले आणि लगेच आपला उजवा पंजा पुढे केला ! ही असाधारण सभ्यता पाहून मी जरी चकित झालो होतो, तरी आपले बोट स्वारीच्या पंजात घालून त्याच्याशी मला सख्य करावे लागले. आम्ही सर्वजण बसल्यावर पॉलसाहेबही खिडकीतून पुलाचा देखावा पाहत बसले. धनीणीने त्यास गावयास सांगितल्यावर ‘आय हॅव्ह गॉट कोल्ड’ (मला थंडी झाली आहे) अशी थाप ठेवून दिली ! स्वारीस गावयास येत होते की नाही , ह्याची शंकाच होती ! पण त्याच्या गाण्यापेक्षा त्याची थाप ऐकून मला विशेष कौतुक वाटले. शेवटी टेबलावर चहाची तयारी झाल्यावर ‘आय वॉन्ट ए कप ऑफ टी’ (मला एक चहाचा पेला आणा) असे कितीदा तरी म्हटले. निरनिराळ्या देशांच्या चालीरीतीसंबंधाने बोलणे निघून आम्ही मध्ये जेव्हा जेव्हा हासू तेव्हा तेव्हा पोपटही जणू कळल्याप्रमाणे हुबेहूब माणसासारखेच हासे. त्याचे खोटे हासू ऐकून आम्हांला अधिकच हासू येई, तरी तिकडे त्याचाच गोंगाट अधिक ! स्वारी लहरीत आल्यास केव्हा केव्हा पुष्कळ वक्तृत्व दाखविते असे त्याच्या धनिणीने सांगितले.
मुलांनो, खालील प्राण्यांत केव्हा केव्हा दिसणा-या ह्या चमत्कारिक गुणांचे आम्ही घटकाभर करमणुकीपलीकडे विशेष महत्त्व मानीत नाही, का तर ह्यांहून पुष्कळपट मोठे गुण आमच्या स्वतःमध्ये किती तरी आहेत ! बरे असो. मी आता तुम्हांस तिसरी गोष्ट सांगतो.
इंग्लंडच्या उत्तरभागी सरोवर प्रांती हेलव्हेलन नावाच्या एका उंच पर्वतशिखरावर मी एके दिवशी चढत होतो. चढण बरीच कठीण होती. चढून गेल्यावर शिखरावर मला एक सुंदर संगमरवरी शिळा उभी केलेली दिसली. अशा कठीण व एकांत स्थळी कोणातरी थोर साधूचे हे स्मारक असावे असे वाटून मी त्यावरील लेख वाचण्यासाठी जवळ गेलो. लेख पुढील अर्थाचा होता. इ. स. १८०५ साली चार्लस गाऊ नावाचा कोणी गृहस्थ ह्या पर्वतावरून हिडत असताना खाली पडून बर्फात गोठून मरण पावला. त्याचा प्रामाणिक कुत्रा त्याच्या प्रेताचे रक्षण करीत तीन महिने त्या ओसाड डोंगरात होता. शेवटी धन्याची वाळलेली हाडे राखीत असताना हा कुत्रा एका धनगरास आढळला ! ह्या एकनिष्ठ दैवी पशूच्या स्मारकार्थ प्राण्यांची कनवाळू प्रसिद्ध फ्रान्सिस पॉवर कॉबभाई हिने हा सुंदर शिलालेख सन १८९० मध्ये रोविला. ह्या दगडांच्या स्मारकाहून अधिक महत्त्वाचे स्मारक वर्डस्वर्थ कवीने (Fidelity) म्हणजे एकनिष्ठा ह्या नावाने कवितेच्या रूपाने करून ठेविले आहे ! मुलांनो, ह्या भयाण व निर्जन प्रदेशात कडक हिवाळ्याच्या बर्फात तीन महिने ह्या कुत्र्याने आपली उपजीविका तरी कशी केली असेल ! ह्याचे उत्तर वर्डस्वर्थने आपल्या कवितेच्या शेवटी दिले आहे ते असे –
How nourished there through such long time –
He knows that gave that love sublime;
And gave that strength of feeling great;
Above all human estimate !
मुलांनो, तुम्हांस इंग्रजी येत नसेल कदाचित तर वरील ओळींचा अर्थ इंग्रजी जाणणा-या तुमच्या वडिलांस विचारा. आणि नुसता शब्दार्थच नव्हे तर खोल अर्थ—व तो तुम्हांस स्वतःला नीट उमजेपर्यंत वडिलांची पाठ सोडू नका.
चिमुकल्यांनो, ह्या तीन गोष्टी झाल्या. अशा आणखी किती तरी सांगता येतील ! पुष्कळ तुम्ही स्वतःच पाहिल्या असतील, पण त्या तुम्हांला दिसल्या नसतील—म्हणजे कळल्या नसतील. आता तुम्हांला घरातील कुत्री, मांजरे, गोठ्यांतील गाई, घोडे, बागेतील चिमण्या, राघू ह्यासंबंधाने काय वाटते ? त्यांस ईश्वराने केवळ आमच्या काबाडकष्टांकरिता व तुमच्या खेळाकरिताच उत्पन्न केले असेल काय ? ईश्वर आम्हांवर जशी प्रीती करतो तशी त्यांच्यावरही करितो. आम्हांस जसे गुण दिले आहेत तसेच थोडेबहुत त्यांना दिले आहेत, ही गोष्ट आता आम्ही कबूल करावीच काय ! देवाच्या मोठ्या कुटुंबात हे प्राणी आमची लहान भावंडे आहेत असे म्हणण्याची अद्यापि थोडी लाज वाटते नव्हे ! एकेकाळी कमी दर्जाच्या माणसास मोठ्या दर्जाच्या माणसाच्या उपयोगासाठीच केले आहे, असा समज होता, पण आता हा अडाणी समज कमी होऊन सर्व मनुष्यजात एकाच बापाची लेकरे आहोत असे हळूहळू वाटू लागले आहे.
हलक्या मनाच्या मनुष्यास दैवाने संपत्ती मिळाली की तो आपल्या पूर्वीच्या गरीब नातलगांस तुच्छ मानू लागतो. मुलांनो, तुम्ही खालील प्राण्यांशी आपले खरे नाते विसराल तर तुमच्यावरही वरील दोष येईल. तर कुत्र्यामांजरांत तुमचे जे खेळगडी असतील, त्यांच्याशी आतापासून प्रेमाने व गोडीने वागाल ना ?