एकनाथ व अस्पृश्य जाती

(श्रीमत चोखामेळा यांची पुण्यतिथी साजरी करण्याकरिता माजगाव, नेसबिट रोड, मुंबई येथील रा. कोंडाजी रामजी मास्तर यांच्या घरासमोर रविवार ता. ५ जून १९१० रोजी सायंकाळी पनवेलचे अस्पृश्य जातीचे सुभेदार मेजर बहादूर, गंगारामभाऊ ऑनररी मॅजिस्ट्रेट यांच्या अध्यक्षतेखालीं अस्पृश्य जातींच्या स्त्रीपुरुषांच्या मोठया जाहीर सभेपुढे दिलेले व्याख्यान.)

आज आपण सर्वजण येथे श्री चोखोबांची पुण्यतिथी साजरी करण्याकरिता जमलो आहोत. नामदेवांनी म्हटले आहे :

शालिवाहन शके बाराशे साठ ।  प्रमाथे नाम स्पष्ट संवत्सर ॥
वेशाख वद्य पंचमी सुदिना ।  गुरुवारी प्रयाण करी चोखा ॥

चोखोबा हे मंगळवेढ्याला गावकुसू बांधण्याला गेले असता अंगावर भिंत पडून चिरडून मेले.  श्री. विठ्ठलाने नामदेवास त्यांच्या अस्थी आणण्यास सांगितले तेव्हा त्या इतर अस्थींतून कशा ओळखाव्या असे त्यांनी विचारले, ह्याचे उत्तर देवांनी दिले :

नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या ।  विठ्ठलनाम जयामध्ये निघे ।
ऐकोनिया कानी अचळी भराव्या ।  आणेनियां द्याव्या आम्हापाशी ।
वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार ।  नामाचा गजर महाद्वारी ।
ऐसी आनंदाने नामाच्या गजरी ।  दिली महाद्वारी समाधि त्या ॥

हाडांमधून विठ्ठलनामाचा गजर झाला असो किंवा नसो, चोखोबांचे सर्व चरित्र ईश्वरपर होते, हे ह्यावरून स्पष्ट दिसेल. त्यांच्या पुण्यतिथीचा आज समय आहे. आजच्या सुप्रसंगी मला एका प्रश्नाचा विशेष विचार करावयाचा आहे.

तो प्रश्न माझे मित्र रा. पांगारकर यांच्या तारीख २८ मेच्या 'ज्ञानप्रकाशा'त प्रसिद्ध झालेल्या व्याख्यानावरून उद्भवला आहे. रा. पांगारकर म्हणतात, ''एकनाथांनी अंत्यजोद्धार केला. पण कधीही १२-२० महार पंक्तीस घेऊन जेवण्याचे नुसते सोंग केले नाही. वेदशास्त्रांनी घातलेले निर्बंध पाळून त्यांनी अंत्यजोद्धार केला'' जेवण्याचे नुसते सोंग एकनाथांनी केले नाही हे खरे; पण जेवणाचा राजरोस व्यवहार केल्याचा पुरावा एकनाथाच्या चरित्रात स्पष्ट आहे. अंत्यजोद्धार करताना नाथमहाराज वेदशास्त्रांची पाने चाळीत बसले असतील असे त्यांच्या चरित्रावरून मुळीच दिसत नाही. प्रत्यक्ष आपल्या पितरांच्या श्राद्धाच्या वेळी महार-मांगांस आधी जेवू घातले. आणि पुढे ब्रह्मवृंद रागावला तरी त्याची पर्वा केली नाही. आणि देवानेही साक्षात त्यांचे पितर खाली आणून त्यांचाच पक्ष सांभाळला. ह्या गोष्टीतील तात्पर्य वेदशास्त्राशी साधक आहे की बाधक आहे ह्याचा कथ्याकूट शाब्दिकांनी करावा, संतास करावयास नको. पुढे रा. पांगारकर म्हणतात, ''भूतदयेने प्रेरित होऊन नाथांनी महाराचे पोरसुद्धा उचलून कडेवर घेतले पण ते तेवढ्यापुरतेच.''  नाथमहाराजांचे करणे तेवढ्यापुरते होते हे त्यांचे आधुनिक चरित्रकार होऊ पाहणारे जगाला सांगतात, हे पाहून स्वतः नाथांच्या डोळ्यांतून रक्ताचे अश्रू वाहतील असे वाटते. संतांची कोणतीच कृती 'एवढ्यापुरती' नसते, ती शाश्वत असते. रा. पांगारकर आणखी म्हणतात, ''परकीयांना कवटाळण्यासाठी स्वजनांना खवळून सोडण्यात अर्थ तो काय ?  महारांना आज जवळ केल्यास ब्रह्मवृंद रागावतो त्याची वाट काय ?  परकीय कोण आणि स्वकीय कोण हे ठरविताना नाथ आणि इतर संत रक्तसंबंधाकडे पाहत नसत, मनाकडे पाहत आणि ब्रह्मवृंद रागावतो त्याची वाट काय ?  या प्रश्नाचा विटाळ त्यांना कधीच झाला नाही.''  रा. पांगारकर आणखी पुढे म्हणतात, ''भूतदयेने प्रेरणा झाल्यावेळी त्यांना शिवा पण नंतर स्नान करून आपला आचारविचार पाळा,''  रा. पांगारकरांच्या सात्त्वि वृत्तीची आम्हांला जी कल्पना आहे, तिच्यावरून प्रसिद्ध झालेले वरील वाक्य खरोखरीच त्यांच्या तोंडातून आले असेल की का, ह्याविषयी आम्हास शंका वाटत आहे; पण त्यांचा खराच तसा भाव असल्यास भूतदयेची प्रेरणा म्हणजे एक प्रकारची भूतबाधाच - जी होऊन गेली असता आपण स्नान करून शुचिर्भूत व्हावे अशी त्यांची समजूत झाल्यासारखी दिसते. भूतदयेने प्रेरित होऊन आमचे जे वर्तन होते ते तर अत्यंत थोर आणि पवित्र, त्या वेळची स्थिती स्वर्गीय स्थिती असे असूनही ''आचार-विचार'' पाळण्यापूर्वी पुन्हा स्नान करण्याची जरुरी असावी, हा भूतदयेचा व आचार-विचारांचा कोण विपरीत संबंध ! कदाचित हा संबंध आम्हासारख्या अर्धवट सुधारकांच्या वर्तनात राहील, पण त्याचा दाखला नाथसारख्या संतांच्या माथ्यावर मारण्याचे दुसरे पाप तरी निदान आम्ही करू नये. शेवटी रा. पांगारकर म्हणतात, 'एकनाथाने समाजास खरे ज्ञान करून दिले. पण प्राचीन परंपरा त्यांनी मोडली नाही-' खरे ज्ञान करून देणे पण प्राचीन परंपरा न मोडणे हे हस्तकौशल्य संतास साधले होते की नाही हे आम्ही सांगू शकत नाही.'  श्रीचोखोबांचे चरित्र नामदेव, तुकाराम, एकनाथ व इतर संतांनी अभंगद्वारा लिहिले आहे. त्या सर्वात प्राचीन परंपरेच्या उलट एकनाथकृत अभंगांतच कडेलोट आहे. ते अभंग असे :

अमृतासी रोग स्वर्गी जाहला पाही ।  अमरनाथा तेंही गोड नसे ॥
नारदाते प्रश्न करी अमरनाथ ।  शुद्ध हे अमृत कोठें होय ॥
पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी ।  पुंडलीकाचे द्वारी देव उभा ॥
तया ठाई जातां शुद्ध होय अमृत ।  नारदे ही मात सांगितली ॥
तेव्हां एकादशी आली सोमवारी ।  तेव्हां पंढरी उतरले ॥
नामदेवासहित अवघे गणगंधर्व ।  इंद्रादिक देव चालीयले ॥
रुक्मिणीसहित पंढरीनिवास ।  चोखीयाचे घरास आले वेगी ॥
चोख्याचे अंगणी बैसल्या पंगती ॥  स्त्री ते वाढीती चोखीयाची ।
अमृताचे ताट इंद्रे पुढे केले ॥  शुद्ध पाहिजे केले नारायणा ॥
तेव्हां देवराय पाचारी चोखीयासी ।  शुद्ध अमृतासी करी वेगीं ॥
चोखामेळा म्हणे काय हे अमृत ।  नामापुढे मात काय याची ॥
चोखियाची स्त्री चोखा दोघेजण ।  शुद्ध अमृत तेणे केलें देखा ॥
चोखीयाच्या घरी शुद्ध होय अमृत ।  एका जनार्दनी मात काय सांगू ॥
वरील अभंगातील तात्पर्य परंपरेस धरूनच होते अशी शंका येत असल्यास तिचे निरसन एकनाथांनी पुढील चरणास केले आहे.

यातिहीन मी अमंगळ महार ।  कृपा मजवर केली तुम्ही ॥
पंढरीचे ब्राह्मण देखतील कोण्ही ।  बरे मजलागूनी न पाहती जन ॥

या प्रकारे परंपरेचे पुरस्कर्ते आणि इतर टवाळ जन यांचा नुसता उल्लेख करूनच नाथ राहिले नाहीत. अशा जनांशी गाठ पडली असता भल्याने कसे वागावे तेही खालील चरणात त्यांनी सांगितले आहे.

ऐसे ऐकोनियां हंसती सकळ ।  आनंदे गोपाळ हास्य करी ॥

यावरून परंपरा मोडल्याचे दुःख व टवाळांची थट्टा हसून घालवावी. सभासदहो, आजचा प्रसंग गंभीर आहे. रा. पांगारकर हे सात्त्वि वृत्तीचे आहेत. त्यांची मते कशीही असोत ! त्यांवर नुसती लौकिक टीका करून आम्ही आजची वेळ दवडू नये. 'अस्पृश्य' जातींच्या तुम्हा सभासदांना त्यांच्या मतावरील टीका आवडून तुम्ही आनंदाने टाळया पिटाल ही मोठी गोष्ट नाही. रा. पांगारकर म्हणजे लौकिकाला भिणारे, प्राचीन परंपरेचे भक्त, वरिष्ठ वर्गातच आहेत असे नाही. अशी माणसे अस्पृश्य वर्गातही किंबहुना जास्त सापडतील; न सापडल्यास नवल ! शिवास राजसी व तामसी हेतूने प्राचीन परंपरा मोडण्यातच कोणतीही सुधारणा होणार नाही. पांगारकर, तुम्ही आम्ही सर्वच भित्री आणि नीच जातीची माणसे आहोत, श्री एकनाथ, नामदेव तुकाराम व चोखोबा ही शुद्ध सात्त्वि आणि एकाच उच्च जातीची माणसे होत. आम्हा सर्वांचा उद्धार करण्यास तेच एक समर्थ होत. त्यांनी असे केले, त्यांनी तसे केले याची चर्चा करणारी आम्ही कोण माकडे ! आमच्या ह्या नीच योनीतून त्यांच्या शुद्ध योनींत उद्धार व्हावयाचा असल्यास त्याला शुद्ध ईश्वरभक्ती हा एकच मार्ग आहे. तो चोखोबाने तुम्हांपुढे रेखाटलेला आहे. सभासदहो, तुम्ही पांगारकर व शिंदे यांच्या परस्परांविरुद्ध भाषणाने आपली दिशाभूल होऊ देऊ नका. चोखोबांचे शुद्ध वर्तन आपल्यापुढे ठेवा व त्याचा कित्ता गिरवा. मग कोण ब्राह्मण व कोण महार, प्राचीन परंपरा मोडते कशी व सुधारणा घडते कशी हे पाहणे हे देवाचे काम. तो ते योग्य वेळी करीलच करील.