जलप्रवास

प्रयाण

आगबोट पर्शिया.  
तरुण भार्या, तान्हें बालक, वृद्धही माता-पितरें । अनाथ भगिनी, बंधु धाकुटा, आश्रित बांधव सारे ॥  आलों टाकुनियां । पदरीं घेईं दयामाया ॥१॥

शनिवार ता. २१ सप्टेंबर १९०१ रोजीं सकाळचे १०॥ वाजतां रा. कोरगांवकरांचे घरांतून निघालों तेव्हांपासून वियोगाच्या तीव्र वेदनांस सुरूवात झाली.  बॅलर्ड पियरवर माझ्या आधीं बरीच मित्रमंडळी जमली होती.  गुरूजन आशीर्वाद देऊं लागले. मित्रमंडळ अभिष्टचिंतन करूं लागला.  कांहीजण प्रवासांत उपयोगी अशा महत्त्वाच्या सूचना करूं लागले.  अशी एकच गर्दी उडाल्यामुळें मी भांबावल्याप्रमाणें झालों होतों.  अशा स्थितींत मीं कांहींचा मुळींच निरोप घेतला नसेल, कांहींस मीं उत्तरें दिलीं नसतील.  त्या सर्वांची मी आतां प्रांजलपणें क्षमा मागत आहें.  १२ वाजतां प्लेग-डॉक्टरची तपासणी सुरू झाली.  १२॥ वाजतां मी सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन निघालों.  दारावर आंत सोडतांना रखवालदारानें थोडासा दांडगाईचा प्रसंग आणिला, पण हिंदुस्थानांतील निदान २ वर्षेपर्यंत तरी ही अखेरची असल्यामुळें मीं ती कौतुकानें सहन केली ।  तपासणी एका मिनिटांतच आटोपली.  एकदां आंत गेल्यावर जाणारांची आणि पोंचविण्यास आलेल्यांची नुसती
नजरानजरही होत नाहीं, म्हणून दोघांसही फार वाईट वाटतें.  मी मचव्यांत बसल्यावर, मला न भेटलेल्या बाहेरच्या तिघां मित्रांकडून, पुनः भेटून जाण्याबद्दल ३ चिठ्या आल्या.  पण इतक्यांत मचवा निघाल्यामुळें, माझा नाइलाज झाला.  हळूहळू माझा मायदेश डोळ्यांदेखत अंतरूं लागला.  परदेशगमनाचा विचार प्रथम आल्यापासून तों आतांपर्यंत मी सारखा धांदलींत असल्यामुळें, स्वीकृत गोष्टीचें पूर्ण स्वरूप डोळ्यांपुढें आलें नव्हतें; तें मी मचव्यांत स्थिरपणें बसल्यावर प्रत्यक्ष दिसूं लागल्यामुळें, ह्या पांच मिनिटांत मनाच्या ज्या कित्येक कधींच न अनुभविलेल्या भावना झाल्या, त्या लिहून व्यक्त करणें केवळ अशक्य आहे !  वियोग मूर्तिमंत पुढें उभा राहून माझ्या जिवलग माणसांचीं उदास व खेदमय दिसणारीं चित्रें मला एकामागून एक दाखवूं लागला.  अशाच कष्टमय स्थितींत मला दोन वर्षें काढावीं लागतात कीं काय अशी धास्ती पडली.  पण अखेरची मनाची भावना प्रार्थनामय झाली. विरहवेग कमी होऊं लागला.  किंचित् शांत दृष्टीनें किनार्‍याकडे पाहूं लागलों, तों ह्या प्रवासाची मनांत प्रेरणा होण्यास जी पर्यायानें कारण झाली आहे, ती मुंबई युनिव्हर्सिटी जणूं काय हात वर करून आशीर्वाद देत आहे, असें दिसलें.

याप्रमाणें मी १ वाजतां पर्शिया आगबोटीवर दाखल झालों.  नंतर एका तासानें माझें सर्व सामान मला मिळालें.  २॥ वाजतां आम्ही सर्व मिळून जेवणास बसलों.  जेवण चाललें असतां आगबोट सुटून केव्हां चालू लागली होती हें कांहीं वेळ कळलेंच नाहीं.  एंजीनची धडधड लांबनं किंचित् ऐकूं येत होती.  ग्लासांतील पाणी देखील सहज दिसण्यासारखें हालत नव्हतें.  ३ वाजतां जेवण आटपून घाईनें डेकवर येऊन पाहतों तों कुलाब्याचा दीपस्तंभही मागें राहिला होता.  ३॥ वाजतां १० लाख वस्तीच्या मुंबई शहरास मला क्षितिजांत शोधून काढावें लागलें !  ४। वाजतां मुंबईजवळच्या डोंगरांचाही कोठें मागमूस लागेना !!  सभोंवर क्षितिजाचें विशाळ वलय पसरलेलें, वरतीं ढग खालीं लाटा, ह्यांशिवाय आसमंतात् दृश्य पदार्थ काय तो आगबोटींतून निघणारा धुराचा लोट हाच होता.  खरोखर हा देखावा साक्षात् दगडालाही कवित्वाची स्फूर्ति करणारा आहे !  बोटीच्या अगदीं पिछाडीच्या टोंकावर-म्हणजे मजकडून होईल तितकें करून माझ्या देशाजवळ-मी सुमारें एक तासभर हा देखावा पाहात चित्राप्रमाणें तटस्थ उभा होतों.  बोट वेगानें चालली असतां पाणी दुभंगून तिच्या मागें कोनाकृति घार दिसत होती.  बाजूनें पाण्याचे तुषार उडून त्यावर ऊन पडून त्यांतून इंद्रधनुष्य दिसे.  संध्याकाळानंतर रात्रीं चांदणें पडलें आणि समुद्रानें आपला पेहेराव बदलला.  दुसरे दिवशीं पहाटेस उठून पोशाक करून डेकच्या अगदीं आघाडीस गेलों.  हा देखावा कालच्यापेक्षांही अधिक मोहक व प्रेरक होता.  आकाश अगदीं निरभ्र असल्याकारणानें समुद्र त्याच्या रंगानें रंगला होता; आणि बोटींतून धूर निघालेला दिसत नसल्यामुळें, चहूंकडे ऐक्य नांदत होतें.  अत्यंत पुरातन सागर महामुनि शांत व गंभीर रूप धारण करून 'एकमेवाद्वितीयम्' ह्या महामंत्राचा आपल्याशींच पाठ करीत संध्यावंदन करीत बसलेले दिसले.  त्यांस पाहून प्रत्यक्ष पापमूर्तिचाही संत बनेल ह्यांत शंका नाहीं !!

पर्शिया आगबोट :-  कॅलिडोनिया, अरेबिया यांप्रमाणेंच पर्शिया आगबोटही फार मोठी आहे.  ही लांबीनें सुमारें एक फर्लांग म्हणजे १/८ मैल व रुंदीनें मध्यें २२ यार्ड आहे.  उंचीनें ४।५ मजली इमारतीइतकी भरेल.  वजन ७,००० टनपर्यंत नेऊं शकते.  हिजमध्यें ५३० प्रवाशांची सोय आहे.  पण ह्या खेपेस प्रवासी फार थोडे म्हणजे केवळ ७५ च होते.  हिचा वेग दर तासास सरासरीनें १५ मैल पडतो.  पहिले दिवशीं ३१८, दुसरे दिवशीं ३५८, तिसरे दिवशीं ३५५ मैल ह्याप्रमाणें ही चालते.  हिला दोन धुरांडीं आहेत.  समुद्र खवळून केव्हां केव्हां तुषार आंत येतात, म्हणून आगबोटीच्या बाजूस पुष्कळ आणि मोठ्या अशा खिडक्यांची योजना करितां येत नाहीं.  ह्यामुळें चोहींकडे वारा खेळावा,  विशेषेंकरून खालच्या मजल्यांत हवा पोंचावी म्हणून अशी योजना केली असते कीं, मोठाले २।३ फूट रुंदीचे बंब खालपासून वरपर्यंत नेऊन त्यांची तोंडें पुष्कळशीं पसरट करून हवेंत निरनिराळ्या दिशेनें वळवून दिलेलीं असतात.  तेणेंकरून वारा कसाही वाहत असला, तरी ह्यांच्या तोंडांत सांपडून खालीं उतरतो. असे बंब सुमारें ४० आहेत.  प्रकाशासाठीं खालच्या मजल्यांत २४ तास एकसारखे विजेचे दिवे जळत असतात.  बोटीला एकंदर पांच मजले आहेत.  तळमजला पाण्याखालीं आहे.  त्यामुळें त्यांत अंधार असतो.  त्यांत जड सामान आणि माल भरलेला असतो.  दुसर्‍या मजल्यास लोअर डेक म्हणतात. दुसर्‍या वर्गाचें ह्या डेकवरील मुंबईपासून लंडनपर्यंत एका जागेचें भाडें ५२२८८ रु. पडतें.  पाण्यावरचा हा पहिलाच मजला असल्याकारणानें, प्रकाश आणि हवा येथें पुरेशीं नसतात.  वरचेवर एखादी लाट खिडकीवरून जाते म्हणून ती नेहमीं जाड भिंगानें बंद ठेवावी लागते.  तिसर्‍या मजल्यास मेनडेक म्हणतात.  मी ह्यांत दुसर्‍या वर्गाचें तिकीट घेतलें आहे; त्यास लंडनपर्यंत ६०० रुपये भाडें पडलें.  ह्यांतील खोलींत अधिक सोई असून, खिडकी नेहमीं उघडी ठेवितां आल्यामुळें, हवा व प्रकाश मुबलक असतात.  शिवाय अंथरुणावर पडल्या ठिकाणाहूनच खिडकींतून समुद्राचा सर्व देखावा नजरेस पडतो.  चवथ्या मजल्यास डेक किंवा अपर डेक म्हणतात.  येथें दुसर्‍या वर्गाच्या जागा नाहींत.  मंडळीस हिंडण्यास, फिरण्यास, आरामखुर्च्यांवर बसण्यास किंवा कांहीं खेळ खेळण्यास दोन्ही बाजूंस दोन ग्यालरीसारख्या ४० यार्ड लांब व ५।६ यार्ड रुंद अशा खुल्या जागा आहेत.  मध्यें सुमारें १० यार्डांची चौरस धूम्रपानाची खोली आहे.  पहिल्या वर्गांच्या मात्र ह्या मजल्यांतही खोल्या आहेत.  एका प्रवाशास सबंध एक खोली मिळते. तिचें भाडें लंडनपर्यंत सुमारें ८२२ रुपये पडतें.  पांचवा मजला उंच गोपुरासारखा आहे.  येथें कोणी जात नाहींत.  पण येथून सर्व क्षितिज नजरेस पडतें.  

केबिन - एक एक खणाची एक खोली असते.  तीस केबिन म्हणतात.  लोअर डेकवर एका केबिनमध्यें तिघांची व मेनडेकवर एकींत चौघांची सोय केलेली असते.  प्रत्येकाच्या जाग्यास बर्थ म्हणतात.  त्यावर नंबर मांडलेला असतो.  असे एकंदर ५३० नंबर आहेत.  प्रत्येकाकरितां एक गादीवर चादर आंथरलेली, एक ब्ल्यांकेट, एक पासोडी, दोन मोठ्या व मऊ उशा आणि एक मोठा टॉवेल इतकें सामान भिंतीत अडकविलेल्या दोन गजांवर व्यवस्थेनें ठेवून एक अंथरूण बनवलेलें असतें.  हीं दोन खालीं आणि दोन त्यावर असतात.  भिंतींत एक शिसवीचें टेबल असतें; त्यांत एकावर एक असें चार खण असतात.  समोर दुसरें एक टेबलासारखें असतें त्यावर एक मोठा गोल आरसा लटकलेला असतो.  त्याचेखालीं एक फडताळ असतें; तें उघडल्याबरोबर तोंड धुण्याचें एक जाड चिनी भांडें बाहेर येतें.  त्याचे मागेंच दोन पेल्यांतून दोन साबण ठेवलेले असतात.  दोन्ही बाजूंस दोन स्वच्छ रूमाल टांगलेले असतात.  तोंडधुणें आटपल्यावर फडताळ उचलून झांकल्याबरोबर त्यांतील पाणी खालीं जाऊन सर्व पूर्वींप्रमाणें पेटीसारखें दिसतें.  आरशाच्या मागें एक कांचेचा तांब्या व दोन ग्लास पिण्याचें पाणी भरून ठेविलेले असतात; अशा पेट्या दोन असतात.  बारीक सामान ठेवण्यास चार जाळ्या आणि कपडे ठेवण्यास १२ खुंट्या असतात.  एक विजेची बत्ती असते, ती संध्याकाळीं आपोआप लागते.  तिच्याखालीं एक बटण असतें.  तें फिरविल्यास आपल्या मर्जी प्रमाणें ती विझवितां येते.  शिवाय एक मेणबत्तीचें शेड असतें.  वरतीं माळ्यावर चार लाइफ बेल्टस् असतात.  २ इंच जाड व १ फूट लांब असे कॉर्कचे तुकडे दुहेरी एकत्र बांधून आपल्या पोटाभोंवतीं बांधण्यास एक पट्टा तयार असतो.  अपघाताचे वेळीं हा पट्टा बांधून पाण्यांत पडल्यास मनुष्य बुडत नाहीं.

डायनिंग सलून -  हा एक सुरेख दिवाणखाना आहे.  त्यांत दोन्हीकडे चारचार खुर्च्या ठेविलेल्या अशीं पांच टेबलें एकापुढें एक मांडलीं आहेत.  अशा पांच टेबलांच्या दोन्ही बाजूंस दोन रांगा असून मध्यें एक मोठें न्याहारीचें टेबल ठेविलेलें आहे.  सकाळीं ६॥ वाजतां चहा, रोटी, लोणी, फळें इ. असतात.  ८॥ स न्याहारी; १॥ ला मुख्य जेवण; ४॥ वाजतां फराळ; ६॥ ला चहा आणि रात्रीं ९॥ वाजतां फराळ, असा नेहमींचा क्रम असतो.  ह्या सर्व प्रसंगीं सर्व मंडळी हॉलमध्यें जमते; आणि आपापल्या ओळखीप्रमाणें जागा पसंत करते.  सकाळचा चहा व रात्रीचा फराळ सोडून बाकी सर्व प्रसंगीं जेवणास कोणते पदार्थ तयार केले आहेत त्यांची यादी कार्डावर छापून तीं कार्डे टेबलांवर मांडलेलीं असतात.  प्रत्येक टेबलाजवळ एक स्टुअर्ड (वांकनीस) उभा असतो.  क्रमानें सर्व पदार्थ आपलेकडे हा वांकनीस आणितो.  आपल्यास लागेल तो लागेल तितका आपण घ्यावा.  प्रत्येक वेळीं सात किंवा अधिक पदार्थ असतात.  कलकत्त्याची कढी, फ्रान्सचे वाटाणे, यारमाउथचे मासे, इटलीची आमटी, सार्डिनियाचें अमुक आणि रंगूनचें तमुक, अशीं यादींतलीं चटकदार नांवें वाचून नवख्यांस मोठी मौज वाटते.  तरी प्रत्यक्ष पदार्थ पाहीपर्यंत नुसत्या यादीवरून कांहीं कल्पना होत नाहीं. हा सर्व थाट आणि हे प्रकार पाहून नवीन मनुष्य सहजच वाजवीपेक्षां अधिक खातो आणि दोन दिवसांनीं ओकूं लागल्यावर म्हणतो कीं आपल्यास बोट लागली !

स्नानगृह -  एका खोलींत एक हौद कंबरेइतका खोल असतो.  त्यांत एक ऊन पाण्याची व एक थंड पाण्याची अशा दोन तोट्या असतात.  त्या दोन्ही मोकळ्या करून आपल्यास लागेल तसें गरम पाणी करून घेतां येतें.   पण हें पाणी खारें असतें म्हणून एका वेगळ्या पिंपांत गोडें पाणी ठेविलेलें असतें.  हौदांतल्या पाण्यानें स्नान केल्यावर ह्या गोड्या पाण्यानें आंग धुवावें.  खार्‍या पाण्यांत आपला नेहमींचा साबण चालत नाहीं म्हणून, खार्‍या पाण्याचा साबण किंवा सीसोप वेगळा मिळतो तो येतांना आपण आणावा.  येथें मिळत नाहीं.

करमणूक -  धूम्रपानाचे खोलींत बुद्धिबळाचा आणि दुसरा कसलासा खेळ मांडलेला असतो.  शिवाय पत्ते, गंजीफा मिळतात.  इतर २।३ प्रकारच्या व्यायामाच्या खेळांचीही योजना आहे.  डेक स्टुअर्ड एका बाजूस क्रिकेट खेळण्यास जागा करून देतो, तरट हांतरून पिच तयार करतो.  पहिल्या वर्गाकरितां पियानो वगैरेची अधिक व्यवस्था असते.  लायब्ररींतून आपल्या नांवावर पुस्तकें वाचण्यास मिळतात.  त्याबद्दल वर्गणी भरावी लागते.

नोकर -  पांच पांच केबिनला एक स्टुअर्ड इंग्लिश मनुष्य असतो.  तो रोज सकाळीं संध्याकाळीं आमची खोली झाडून साफ करितो, सामान व्यवस्थेनें ठेवितो, पांघरुणाच्या घड्या घालतो, बूट साफ करितो आणि दुसरें कांहींही सांगितलेलें काम करितो व माहिती देतो.  आम्हीं मागितल्यास आमचें जेवण खोलींतच आणून देतो.  दाराजवळ एक बटन असतें, तें वाटेल तेव्हां दाबल्यास वरची घंटा वाजते आणि एक स्टुअर्ड खालीं येऊन सांगितलेलें काम करून जातो.  सर्व गोरे नोकर कोणतें कांहींही काम मोठ्या तत्परतेनें, आदबीनें व खुशीनें करितात; मग तें काम गोर्‍या प्रवाशानें सांगितलेलें असो, किंवा काळ्यानें असो, महत्त्वाचें असो किंवा हलकें असो, जरुरीचें असो किंवा कसेंही असो, करण्याची तर्‍हा एकच.  पण स्नानगृहांत काळे नोकर आहेत ते वरचेवर कुर कुरतात !  आणि आमच्यापेक्षां साहेब लोकांचीं कामें मात्र लवकर करितात.  गोरे नोकर कामें लवकर करितात, इतकेंच नव्हे, तर अशा ऐटींत करतात कीं त्यांच्याकडे पाहतच बसावेंसें वाटतें.

सोबती -  ७५ प्रवाशांपैकीं आम्ही हिंदुस्थानचे रहिवासी नेटिव्ह ख्रिश्चन सोडून सातजण; कलकत्त्याचे एक कायस्थ गृहस्थ, लाहोरचे आणि आग्र्याचे दोन मुसलमान गृहस्थ, निजाम हैदराबादचे एक नायडू, मुंबईचे एक पारशी आणि एक मुसलमान व पुण्याचा मी असे सातजण आहों.  सातहीजण तरुणच आहों.  वरील पारशी गृहस्थ व्यापारास जात आहेत.  बाकी सर्वजण विद्यार्थी आहों.  पैकीं पांचहीजण कायद्याचा अभ्यास करावयास जात आहेत.  मी एक मात्र आपला विक्षिप्‍तच.  प्रत्येक बोटींतून अलीकडे हिंदुस्थानची जी तरुण मंडळीच विलायतेस जात आहे, त्यावरून हिंदुस्थानचे इंग्लंडशीं विद्यार्थ्यांचें नातें कसें आहे, तें दिसून येतें.  पण ह्या सर्व बाबतींत गतानुगतिकत्वच दिसून येतें.  असों; आम्हां सर्वांचा चांगला स्नेह झाला होता.  पैकीं पांचजण तर नेहमीं एकत्रच होतों.  त्यामुळें प्रवासांत एकांतवास मुळींच भासत नाहीं.

प्रकृति - अद्यापपर्यंत उत्तम आहे.  दुसरे व तिसरे दिवशीं दोनप्रहरीं एक तासभर बरेंच मळमळलें.  औषध घेतल्यावर तेंही राहिलें.  बाकी सर्व ठीक आहे.  मात्र माझ्या घड्याळाची प्रकृति मोठ्या गमतीनें बिघडली आहे !  आगबोटींतल्या घड्याळाशीं ताडून पाहतां माझें घड्याळ दुसरे दिवशीं १० मिनिटें पुढें गेलें आणि तिसरे दिवशीं २५ मिनिटें पुढें गेलें.  मग मी त्याचा मागचा कांटा फिरवून हळू चालेल असें केलें.  तरी चौथे दिवशीं तें आपलें ४० मिनिटें पुढें !  मला वाटलें घड्याळाला आगबोट लागली !  पण लवकरच माझ्या लक्षांत खरा प्रकार आला.  त्यावेळीं आमची आगबोट मुंबईपासून सुमारें १,००० मैल आली होती आणि रोज ३६० मैल पश्चिमेकडे जात होती त्यामुळें असा फरक पडत आहे, हें लक्ष्यांत येऊन माझा मीच खजील झालों !

आगबोटींत पोस्ट ऑफीस व दवाखाना हीं आहेत.  एकंदरींत तिकिटाचे पैसे दिले आणि आपल्याजवळ भरपूर पोशाक असला म्हणजे येथें कसलीही वाण पडत नाहीं.  इतकी जर सर्व कडेकोट तयारी आहे तर धर्मसंबंधीही कांही व्यवस्था केली आहे कीं कसें ?  ह्याबद्दल मीं एका रविवारीं शोध केला.  पण त्यासंबंधीं कधीं विशेष गरज लागत नाहीं म्हणून व्यवस्था केली नाहीं असें कळलें.  मलाही बोटीवरचा रविवार आणि इतर वार ह्यांमध्यें कोणत्याच बाबतींत फरक आढळून आला नाहीं.  बोटीवरच्या अधिकार्‍यास ह्यासंबंधीं काळजी नसली तरी विश्वाच्या अधिकार्‍यास ती आहे व त्यानें पूर्ण व्यवस्था करून ठेविली आहे.  मनुष्यानें मात्र आपल्या स्वतःवरची आणि आपल्या बोटीवरची नजर काढून बोटीभोंवतालच्या प्रदेशावर टाकावी म्हणजे पंचमहाभतांचें अष्टौप्रहर सतत हरिकीर्तन चाललेलें कानांला ऐकूं येईल, डोळ्यांना दिसेल, रोमरोमांचांस भासेल व शेवटीं अंतरात्माही परमात्म्याच्या समागमांत धन्य होईल.

समुद्रावरच्या एकंदर प्रवासांत मुंबईपासून एडनपर्यंतचाच प्रवास कायतो विशेष कंटाळवाणा होतो.  सभोंवतालची परिस्थिति अगदींच नवी असल्यानें पहिला दिवस केव्हांच निघून जातो.  पण दुसर्‍या दिवशीं दोनप्रहरपासून हळूहळू कंटाळा येऊं लागतो.  पाहिलेलें तेंच तेंच नजरेस पडूं लागल्यामुळें मनाचा उत्साह नाहींसा होतो.  अष्टौप्रहर अंग हालल्यानें तोंडाला प्रकृतीच्या मानाप्रमाणें कमजास्त मळमळ सुटते.  नवीन सोबत्यांशीं अद्यापि चांगली घसण न पडल्यामुळें, एकांतवास वाटूं लागतो.  सभोंवती लोकांची इतकी गर्दी असून, सुखदुःखाचे दोन शब्दही कोणाशीं बोलण्यास मन धजत नाहीं आणि आंत तर विरह धुमसत असतो.  अशा स्थितींत, बायरन कवीनें एके ठिकाणीं वर्णिलेला हा गर्दीतला एकांतवास निर्जन एकांतवासापेक्षांही फार दुःसह होतो.  पण अशी स्थिति बहुतकरून आमच्याच लोकांची होते.  गोरे लोक लगेंच एकमेकांशीं मिसळून अनेक प्रकारचे खेळ खेळत दिवस काढतात.  लहान मुलें, पोक्त बाया आणि मोठे धटिंगण ह्यांचा दिवसभर धांगडधिंगा चालू असतो.  ह्या गुलहौशी पाश्चात्य लोकांनीं सर्व जगभर-जमिनीवरच नव्हे तर पाण्यावरही - आपलें घर पसरून टाकिलें आहे, तेणेंकरून हे कोठें गेलें तरी ह्यांचा उल्हास कमी होत नाहीं.  आम्हांला येथें धरून आणल्याप्रमाणें होतें.  असो, हा प्रकार रजोगुणाचा झाला; पण मनाची जर सात्विक वृत्ति होऊन तें धर्माच्या उच्च वातावरणांत वावरूं लागलें, तर हीच परिस्थिति त्यास अत्यंत अनुकूल होते.  लाटांचें एकसारखें उत्क्रमण, वायूचें सतत वाहणें, अपार आकाशमंडळांत फांकणारी निःसीम प्रभा वगैरे पाहून विश्वाचें आनंत्य व सृष्टिव्यापाराचें सातत्य आणि अखेरीस परमेशाचें सर्वत्र भरलेलें मंगल वास्तव्य साक्षात् दृग्गोचर होतें आणि वर्ड स्वर्थनें सांगितल्याप्रमाणें, 'भेटीच्या अशा उदात्त प्रसंगीं विचाराला अवकाशच नाहीं' व परमात्म्याशीं जीवात्म्याचें तादात्म्य होऊं लागतें !  पृथ्वी वर अशा ब्रह्मोपासना विरळ !

ता. २६ (सपटंबर) रोजीं सकाळीं एडन जवळची टेकडी दिसूं लागली.  ५ दिवसांत दगड आणि माती आमच्या मुळींच नजरेस न पडल्यामुळें ही टेकडी दुरून पाहून आम्हांस अत्यानंद झाला.  एडन बंदर उंच उंच टेकड्यांमध्यें लपून बसल्यासारखें व मधून मधून डोकावतें असें दिसतें.  टेकड्यांचे कडे उंचवर निमूळते होत गेले आहेत.  चोहोंकडे वाळूकामय प्रदेश दिसतो, झाडझुडूप किंवा एखादें हिरवें पानही कोठें दिसत नाहीं.  बंदरांत शिरल्यावर बोटीवर क्वारंटाईनचें निशाण फडकुं लागलें.  व्यापारी लहान लहान होड्यांतून आपला माल विकण्यास अगदीं बोटीजवळ येऊं लागले.  व्यापारी गोरे आरब असत; व होड्या हाकणारीं पोरें सोमाली शिद्दी असत.  क्वारंटाईनमुळें ह्यांस बोटीवर येण्यास किंवा आम्हांस त्यांचेकडे जाण्यास परवानगी नव्हती.  म्हणून खालूनच ते आपला माल दाखवीत व किंमती ओरडून सांगत.  ह्यांस मुसलमानी साफ बोलतां येत होतें.  होडी हांकणारीं सोमाली पोरें केव्हां केव्हां आपला जिन्नस दाखवून केव्हां केव्हां आपल्या इंग्रजी भाषेनें आणि केव्हां केव्हां आपल्या विद्रूप आंगविक्षेपानें गिर्‍हाइकांचें चित्त वेधीत.  अरबांचा पोषाक बोहरी लोकांसारखा होता; ह्यांस दाढ्या नव्हत्या; पण कानांवर केंसाची लांब झुलपीं होतीं.  सोमाली पोरें अर्धी नागवींच होतीं आणि तींही स्वतःचा कांहीं माल विकीत.  येथें विक्रीचे जिन्नस म्हणजे मडमांच्या गळ्यांतले पिसांचे हार, सुटीं लांबरुंद सुंदर पिसें,  सांबरांचीं शिंगें, माशांचे सांगाडे, शहामृगाचीं अंडीं वगैरे प्राणीज कच्चा माल होता.  ह्या जिनसांवरून व त्यांच्या विकण्याच्या तर्‍हेवरूनही ह्या लोकांची कंगाल स्थिति दिसून येत होती.  माल खपेनासा झाला म्हणजे हीं शिद्दी पोरें ८।१० मिळून बँडचे चालीवर इंग्रजी गाणीं गाऊं लागत, तीं ऐकून मोठी गंमत वाटे.  कोणी त्यांजकडे पेनी टाकीत. अशा प्रकारें हा संगीत व्यापार बोट निघेपर्यंत २।३ तास चालला होता.  पूर्वीं प्रवासी लोक लहान लहान नाणीं समुद्रांत फेकीत असत व हीं पोरें चटकन पाण्यांत बुडी मारून तीं नेमकीं बाहेर काढीत, पण वरचेवर फार अपघात होऊं लागल्यामुळें, ह्या प्राणघातकी करमणुकीसंबंधानें वर्तमानपत्रांतून गवगवा होऊन सरकारांनीं ही चाल सक्तीनें बंद केली, वगैरे हकीकत मीं ऐकिली होती.  आतां तसला कांहीं प्रकार दिसला नाहीं.

सकाळीं ९॥ वाजतां आगबोट बंदरांतून निघाली.  दुपारीं १ वाजण्याच्या सुमारास समुद्रांत पोर्पस नांवाचे ३।४ फूट लांब मासे पुष्कळसे दिसले.  ते पाण्यावर ३।४ फूट उंच उड्या घेत एकमेकांमागून धांवत जात; कांहीं बोटीबरोबर धांवत येत.  मध्यसमुद्रांत ह्या प्राण्यांचा हा खेळ पाहून मनास करमणूक झाली; आणि अशा प्राथमिक कोटींतल्या प्राण्यांसही करमणुकीची आवश्यकता आहे व त्यांनींही आपापले खेळ बनविले आहेत, हें पाहून मोठें कौतुक वाटलें.  आमची बोट ४॥ वाजतां बाबेलमांडेवच्या सामुद्रधुनींत शिरली.  ह्या आरबी शब्दाची व्युत्पत्ति बाब+इल+मंदब् अशी आहे.  बाब=दार, इल=चें, भंदब्=रडणें, अश्रु.  एकंदरींत रडण्याचें दार असा ह्या पदाचा अर्थं होतो.  ह्या ठिकाणीं आशियाचा व आफ्रिकेचा असे दोन्ही किनारे जवळ जवळ आल्याकारणानें आगबोटीस जाण्यायेण्यास हें ठिकाण फार धोक्याचें झालें आहे.  थोड्याच वर्षांपूर्वीं येथें एक आगबोट दगावली आहे; आणि असे अपघात आणखी कितीतरी झाले असतील म्हणून आरबी लोकांनीं पूर्वींपासूनच ह्या स्थलास वरील अन्वर्थक नांव देऊन भयसूचक कायमचें चिन्ह करून ठेविलें आहे.  ४॥। वाजतां आम्ही तांबड्या समुद्रांत शिरलों.  इतर ठिकाणापेक्षां येथें तांबड्या रंगाचें विशेष कांहीं चिन्ह नसून ह्यास तांबडा समुद्र असें नांव कां पडलें हें कळत नाहीं.  तांबडा समुद्र अगर इंग्रजींतील  Red Sea  हीं दोन्ही नांवें आरबी भाषेंतील कुलझम् ह्या नांवावरून पडलीं आहेत.  कुलझम् ह्याचे अफाट, खोल, तांबडा इत्यादि अर्थ आहेत.  आरबस्थानच्या व इजिप्‍तच्या किनार्‍या वरच्या गांवांची व इतर स्थळांचीं नांवें बहुत करून आरबीच आहेत.  ह्यावरून आरबी लोकांनीं एकेकाळीं व्यापार, विद्या व राज्यकारभार इ. गोष्टींत आपलें नांव व सत्ता बरीच गाजविली आहे हें दिसून येतें.  पण बंदरावर विकावयाला आणलेल्या जिन्नसांवरून पाहतां हे आतां फार मागासलेले दिसतात.  तांबड्या समुद्रांत उष्मा फार होतो.  वारा अगदींच बंद असल्यानें खोलींत मुळींच बसवत नाहीं, समुद्र एकाद्या डबक्याप्रमाणें शांत असतो. कपडे सर्व साहेबी थाटाचे असल्यानें अंगांतून घामाची संतत धार चाललेली असते.  आशिया मातेचा लवकरच निरोप घ्यावयाचा असतो म्हणून जणूं ती आम्हांस उष्णोदकाचें सचैल स्नानच घालीत असते.

ता. ३० सपटंबर सकाळीं ६ वाजतां आम्ही सुवेज येथें पोंचलों.  व्यापाराच्या आणि जलपर्यटनाच्या बाबतींत ह्या कालव्यामुळें अत्यंत महत्वाच्या सोई व सुधारणा झाल्या आहेत.  ह्याची लांबी म्हणजे तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र ह्यांमधील अंतर सुमारें ८२ मैल आहे; आणि रुंदी म्हणजे आशिया आणि आफ्रिका ह्यांमधील अंतर १५० पासून २०० फुटांच्या आंतच आहे.  ह्यामुळें एकाच वेळीं एकच बोट जाऊं शकते.  आगबोटीला जाण्याला पाणी २५।३० फूट तरी खोल असलें पाहिजे.  तितक्या खोल पाण्याचा १०० फूट रुंद भाग कालव्याच्या मधोमध १०० यार्डांवर एकएक बोट तरंगत ठेवून आंखून दिल्याप्रमाणें केला आहे.  समोरून जर ट्रॅम आली तर अरुंद गल्लींत बाजूला उभी करण्यास जसा रस्ता करून दिलेला असतो तशी येथेंही समोरून आगबोट आल्यास उभी करण्यास जागजागीं बाजूला तळीं खणलीं आहेत.  हा कालवा दोन मोठ्या सरोवरांतून व कित्येक लहान लहान सरोवरांतून जातो.  हा सर्व प्रदेश सपाट मैदान आहे; आणि समुद्रसपाटीवर ह्याची उंची ५।१० फुटांच्या आंत बाहेर इतकी आहे.  ह्यावरून परमेश्वराच्याच मनांत येथें कालवा व्हावा असें होतेंसें दिसतें.  तरी त्याची ही इच्छा ओळखण्यास मास्यूलेसेप - ज्या फ्रेंच गृहस्थानें हा कालवा खणला-सारख्या धोरणी व साहसी मनुष्याला आपली सर्व अक्कल खर्चं करावी लागली !

आमची आगबोट सुवेझ बंदराच्या अगदीं जवळ जाऊन उभी राहिली.  लगेंच ईजिप्‍त सरकाराकडून तीन लष्करी कामगार क्वारंटाइन कामासाठीं बोटीवर आले, ते पोर्टसेडपर्यंत बोटीवरच होते.  त्यांपैकीं एकास विचारतां त्यानें सांगितलें कीं कालवा अगदीं अरुंद असल्यामुळें, बोटींतून कोणासही सहज मध्येंच उतरून देशावर जातां येतें.  त्यांनीं तसें जाऊं नये म्हणून देखरेखीस तिघांस ठेविलें आहे.  एडनमध्यें तर बोट बंदरापासून लांबच होती.  सुवेझ आणि मार्सेयच्या दरम्यान उतरणार्‍यांस सुवेझ येथेंच उतरून घेऊन तेथें कांहीं वेळ क्वारंटाईनमध्यें ठेवून मग सोडतात.  पोर्टसेडपासून मार्सेयपर्यंतही एक कामगार होताच.  ह्याप्रमाणें आम्ही हिंदुस्थान सोडून आलों, तरी युरोपच्या दारापर्यंत प्लेगच्या उपाधीनें आमची पाठ सोडिली नाहीं.  असो.

पृथ्वीवर जीं कांहीं अचाट मानवी कृत्यें आहेत त्यांत सुवेझच्या कालव्याची गणना आहे.  हा कालवा तयार करण्यास क्रोडो रुपये लागले आहेत; इतकेंच नव्हे तर तो दुरुस्त ठेवणें अतोनात खर्चाचें काम आहे.  दोन्ही कांठची जमीन अगदीं वाळूची असल्यानें कांठ पसरून आंत येतात, आणि कालवा वरचेवर उथळ होतो, म्हणून गाळ काढण्याचें काम नेहमीं चाललेलें असतें.  गाळ यंत्रानेंच काढण्याची एक चमत्कारिक योजना केली आहे.  एका आगबोटीवर एक रहाट-गाडगें उभें केलें आहे.  ज्या वाफेच्या यंत्रानें ही बोट हळू हळू पुढें सरकते, त्याच्याच शक्तीनें हें रहाटगाडगें हालतें, आणि रहाटाचा खालचा भाग जसजसा गाळांतून वर येतो, तसतसा प्रत्येक गाडग्यांतून पाणी नितळून जाऊन गाळ वरतीं जातो.  रहाटाच्या टोंकापासून तों किनार्‍यापर्यंत एक उतरता पूल जोडून दिला आहे.  तो बोटीबरोबरच हालतो.  त्यांत प्रत्येक गाडग्यांतील गाळ पडून तो घसरत किनार्‍यावर जाऊन पडतो.  कोळशाची आणि लोखंडाची खाण व काड्यांच्या पेट्या इतकें मिळालें कीं हे पाश्चात्य लोक शुद्ध दगडाकडून अत्यंत प्रचंड कामें करून घेतात.  आणि हे लोखंडी राक्षस त्यांच्या आज्ञा कशा तत्परतेनें व दक्षतेनें वेळेवर आणि व्यवस्थेशीर करितात, हें पाहून आम्ही नुसतें तोंडांत बोट घालून पहात राहतों !!

कालव्यांत पाणी शांत असतें, पण ह्या अरुंद कालव्यांत आमच्या एवढ्या मोठ्या बोटीचा २०।२५ फूट उंच भाग पाण्यांत बुडतो.  त्यामुळें आगबोट हालूं लागली म्हणजे पाण्यांत खळबळ उडते.  ही धोक्याची जागा आहे म्हणून कालव्यांतून बोट दर तासाला फक्त ४।५ मैल चालते.  एक भिकारी कांहीं तरी मिळेल, ह्या आशेनें किनार्‍यावरून धांवत होता, तो बोटीबरोबर बरेंच अंतर धावूं शकला.  कालव्यांतून आगबोट नेण्याबद्दल कंपनीला भाडें भरावें लागतें.  आणि येथें मोठी रहदारी असल्यानें कंपनीचें रोजचें उत्पन्न लक्षावधि रुपयांचें आहे.  रात्र झाल्यावर आमच्या समोरून 'रीम' नांवाची एक मोठी फ्रेंच आगबोट आली, तिला वाट देण्यास आमची गजगामिनी 'पर्शिया' एके बाजूस वळून मर्यादेनें उभी राहिली.  'रीम' आमचे जवळून जातांना मध्यें अंतर फार तर २०।२५ फुटांचें होतें.  दोन्ही बोटीवरच्या लोकांनीं जवळून जातांना टाळ्यांचा आणि 'हुर्रे' चा मोठा गहजब केला.  इतक्या आकुंचित व धोक्याच्या जाग्यांतून एवढ्या प्रचंड बोटी अशा संथपणानें गेल्या, हें पाहून फार आश्चर्य वाटलें.  त्या जिवंत असून अगदीं समजूतदार असत्या तरी ह्यापेक्षां जास्त जपून गेल्या नसत्या !  

ता. १ आक्टोबर ४ वाजतां मी जागा झालों, आणि पाहतों तों आगबोट केव्हांच पोर्टसेद बंदराला लागली आहे.  अंगावर ओव्हर कोट चढवून मी लगेंच डेकवर चढलों.  तेथें अगदीं सामसुम होतें.  रात्रीच्या काळोखांत बंदरांवरून बोटींत कोळसा भरण्याची खालीं गडबड चालली होती, चहुंकडे भयाण देखावा पसरला होता, अशा वेळीं अशा परक्या स्थळीं निद्रिस्त झालेल्या बिचार्‍या मोतीची मूर्ति डोळ्यांपुढें उभी राहिली, आणि औदासीन्यानें मनास घेरल्यामुळें उजाडेपर्यंत झोंप लागली नाहीं.  

एडनपर्यंत हवा मुंबईतल्या सारखीच असते.  तांबड्या समुद्रांत वारा खेळत नसल्यामुळें व दोन्ही बाजूंस रुक्ष डोंगर आणि वाळूची मैदानें असल्यामुळें ह्या ठिकाणीं मुंबईपेक्षांही अधिक उष्मा होतो.  पण सुवेझला पोंहोंचल्याबरोबर हवेंत फरक भासूं लागला.  सुवेझ येथें सकाळीं ८ वाजतां पारा ७५ अंशांवर होता, व दोनप्रहरीं कालव्यांत ८१ वर होता.  भूमध्य-समुद्रांत अधिकच थंडी वाजूं लागली.  पुष्कळ गरम कपडे घातले तरी थंडी राहीना.  त्यामुळें इंग्लंडांत पोंहोंचल्यावर माझें कसें होईल.  ह्याबद्दल धास्ती वाटूं लागली.  ता. २ आक्टोबर रोजीं दोनप्रहरीं वारा सोसाट्याचा सुटल्यामुळें समुद्र खवळला होता.  लाटा दोन दोन पुरुष उंच येत होत्या.  आगबोट इतकी हालूं लागली कीं, एके ठिकाणीं सरळ उभे राहतां येईना.  खालच्या मजल्याच्या खोलींतल्या खिडकीवरून प्रत्येक लाट जोरानें आपटून जात असे, त्यामुळें पाणी आंत येतें कीं काय असें वाटे, पण जाड कांचेचें भक्कम झांकण असल्यामुळें एक थेंबही आंत येत नाहीं.  अशा वेळीं अंथरुणावर नुसतें बसवतही नाहीं.  कारण, बसलें कीं तोंडाला मळमळ सुटून डोकें फिरूं लागतें.  कोणी चालूं लागला तर दारू पिऊन झिंगल्याप्रमाणें झुकांड्या खात जातो.  म्हणून अंथरुणावर अगदीं पडून राहणेंच बरें.

ता. ३ संध्याकाळीं ४ वाजतां आम्ही इताली आणि सिसिली मधील मेसिनाचे सामुद्रधुनींतून जाऊं लागलों.  एडन, सुवेज आणि सिसिली येथील वेळा अनुक्रमें २, ३, ४ तास मुंबईच्या वेळेच्या मागें असाव्या, असें माझे घड्याळावरून दिसलें.  दोन्ही बाजूंच्या किनार्‍यावर उंच डोंगर आहेत.  त्यांच्या पायथ्यांशीं समुद्र व डोंगर ह्यांच्यामधील अरुंद प्रदेशांत दोन्हीकडे लहान लहान खेडीं व शहरें ह्यांच्या एकसारख्या रांगा लागून गेल्या आहेत.  डोंगराच्या कांहीं अवघड ठिकाणीं देखील कड्यांतून गांवें वसलेलीं दिसलीं.  अगदीं कांठावरच एक देऊळ होतें, त्याचा घांट व शिखर हीं थेट हिंदु देवळाप्रमाणेंच दिसत होतीं.  पावसाळ्यांत डोंगरांतील ओढ्यांचें पाणी गांवांतन पसरूं नये म्हणून वरपासून खालपर्यंत दोन्हीकडे भिंती बांधून वळणावळणानें सपाट उतरणी करून दिल्या आहेत.  त्या दुरून फार सुंदर दिसतात.  नकाशांत इताली देशाचें जें निमुळतें स्पार्टिव्हेंटो भूशिर दिसतें, त्याच्या अगदीं टोंकालाच एक उंच तुकडा तुटला आहे.  तो वाटोळा असल्यानें बुरुजाप्रमाणें दिसतो.  समुद्रकांठानें जाणारी एक आगगाडी ह्याच बुरुजाच्या बोगद्यांतून बाहेर पडतांना दिसली.  इतालीचे किनार्‍यावर मेलिटो, रेजिओ आणि सिला ही शहरें आणि सिसिलीचे किनार्‍यावर मेसिना हें मोठें शहर नजीकच दिसतें.  ह्या ठिकाणीं समुद्राची रुंदी २।३ मैल असेल.  पण समुद्रसपाटीमुळें त्याहूनही कमीच असेल, असें दिसतें, चांगला पोहणारा दुसर्‍या बाजूस पोहून सहज जाईल.

वेळ संध्याकाळचा असल्यामुळें व समुद्र फार शांत असल्यामुळें ह्या ठिकाणीं दोहोंकडच्या शहरांचा व उंच डोंगरांचा देखावा फार मनोहर होता.  कुलाब्याच्या दांडीसारखा शिसलीचा एक लांब, सपाट, चिंचाळा जमिनीचा भाग इतालीजवळ जवळ गेला आहे.  त्यास वळसा घालून आगबोट पुनः उघड्या अफाट समुद्रांत शिरल्यावर डावीकडे लिपेरी बेटें आणि स्ट्रंबोलीचा ज्वालामुखी पर्वत दिसूं लागतो.  हाच देखावा पाहून बायरन् कवीस कवितेची स्फूर्ति झाली असावी.  वारा मंद व शीतल वाहत होता.  स्वर्गांतून परमेश्वरानें शांतीचा जणूं निरोपच धाडिला होता !  सूर्य अस्तास जात असतांना पश्चिमेकडच्या ढगांतून तापलेल्या लोखंडाप्रमाणें तांबडा लाल दिसत होता.  तो सगळा क्षितिजाखालीं गेल्यावरही त्याचें चपटें प्रतिबिंब कांहीं वेळ दिसत होतेंच.  अफाट समुद्रावर स्वच्छ आकाशांत ह्या शांत वेळीं सूर्यास्ताचा देखावा पाहण्याची भारी मौज असते.  बुडतांना त्याचीं आरक्त किरणें लाटांवरून लांबपर्यंत पसरल्यामुळें समुद्र जणूं सोन्याच्या रंगानें उचंबळतो कीं काय असें दिसतें !  ६ वाजतां --- बोली ज्वालामुखी पर्वताच्या शिखरांतून निघणारा धुराचा लोळ दिसूं लागला.  ह्या डोंगराच्या नजीक आलों, त्या वेळीं अगदीं काळोख पडल्यामुळें ह्याचा देखावा स्पष्ट दिसला नाहीं.  ता. ४ रोजीं संध्याकाळीं ४॥ वाजतां आम्ही कार्सिका व सार्डिनीया बेटांमधील बोनिफोसिया सामुद्रधुनींत आलों.  दोन्ही बेटांच्या किनार्‍यावर मुळींच कोठें वस्ती दिसली नाहीं.  ता. ५ ला सकाळी मार्सेल येथें पोंचलों.

ह्या १४ दिवसांच्या जलप्रवासांत मला विशेष म्हणण्यासारखा कंटाळा वाटला नाहीं किंवा दुसरा कसला त्रास झाला नाहीं.  एकाद्या लहानशा खेड्यांतल्याप्रमाणें अगर एकाद्या मोठ्या राजवाड्यांतल्याप्रमाणें हे आमचे दोन आठवडे गेले.  हल्लीचें काळीं आगबोट म्हणजे नुसतें प्रवासाचें उत्तम साधन आहे, इतकेंच नव्हे तर परदेशांत कामधंदा करून थकलेला मनुष्य आणि एका स्थळीं बराच वेळ राहून कंटाळलेला खुशालचेंडू ह्या दोघांसही आरामांचे आणि चैनीचें स्थान आहे.  पण जलपर्यटनांत एवढी मोठी सुधारणा नुसत्या गेल्या शतकांत कशी घडून आली, ह्याचें वर्णन एका पुस्तकांत मीं वाचलें; त्याचा दोन शब्दांत सारांश देतों.

पाण्यावरून गलबत हांकारण्याच्या कामीं प्रथम ज्या कांहीं अडचणी आल्या त्यांत लोकांचें अज्ञान, दुराग्रह आणि पोरकट भीति ह्याच फार मोठ्या होत्या.  कांही धाडसी शोधक लोकांनीं चांगले प्रयोग करून ही गोष्ट फायदेशीर आहे, असें दाखविल्यावरही सरकार, आगबोटी वापरण्यास लवकर परवाने देईना व लोकही धजेनात.  इ. सन १८१२ त मि. हेनरी बेल नांवाच्या मनुष्यानें 'कॉमेट' नांवाची पहिली आगबोट क्लाईड नदीवरून हांकारली.  तिच्या एंजिनाची शक्ति नुसती ४ घोड्यांइतकी होती.  वेग १ तासाला ७॥ मैलांचा होता; आणि वजनही फार कमी होतें.  अमेरिकेंतील 'सव्हना' या शहरामधून 'सव्हाना' नांवाची पहिली आगबोट ता. २८ मे १८१९ रोजीं निघाली.  ती ता. २९ जून १८१९ रोजीं लिव्हरपूल शहरास पोंचली.  हल्लीं इंग्लंड आणि अमेरिका ह्यांमध्यें 'क्युनार्ड' कंपनीच्या टपाल नेणार्‍या ज्या मोठ्या आगबोटी आहेत, त्यांत 'कँपानिया' आणि 'लुकानिया' फार मोठ्या आहेत.  कँपानिया १२,९५० टन माल नेऊं शकते.  तिची शक्ति ३०,००० घोड्यांची आहे, आणि ती दर तासाला २३ मैल चालते.  लुकानिया ही अमेरिकेहून इंग्लंडला एकदां ५ दिवस १५ तास ३७ मिनिटें इतक्या वेळांत आली.  आजपर्यंतच्या प्रवासांत हा सगळ्यांत जलद प्रवास आहे.  'क्युनार्ड्र' कंपनी आणि 'व्हाईट स्टार' नांवाची जर्मन कंपनी ह्यांमध्यें अटलांटिक महासागरांतून टपाल नेण्याच्या कामीं मोठी चुरशीची स्पर्धा लागली आहे.  लुकानिया जन्मेपर्यंत मेलचें काम 'व्हाईट स्टार' कडेच होतें.  आगबोटीला अधिक वेग देण्याचे कामीं आतां जर्मन लोकांची सरशी होऊं लागली आहे. 'केसर विल्हेल्मडर ग्रॉसी' नांवाची आगबोट ही एके दिवशीं ५८० नॉट्स म्हणजे ६५२ मैल चालली.  हा सर्वांत जास्त वेग आहे.  पण लुकानिया बोटीच्या वर दिलेल्या वेळांत तिला अद्यापि इंग्लंड व अमेरिकेच्या मधला प्रवास करतां आला नाहीं.  'डचंलड' ह्या जर्मन बोटीची शक्ति सर्वांत जास्त म्हणजे ३५,००० घोड्यांइतकी आहे.  'सेल्टिक' नांवाची नुक्तीच बेलफास्ट येथें केलेली बोट सर्वांत जास्त लांब म्हणजे ७०४ फूट आहे.  'फर्स्ट बिस्मार्क' ही सर्वांत अधिक श्रीमंती थाटाची बोट आहे.  म्हणून ती विलासी स्त्रियांची मोठी आवडती आहे.  दक्षिण महासागरांत तितकी स्पर्धा नसल्यामुळें, पी. अँड ओ. च्या आगबोटींची शक्ति ११००० घोड्यांपेक्षां जास्त नाहीं.  मी येतांना 'पर्शिया' आगबोटीचा सर्वांत जास्त वेग म्हणजे एके दिवशीं ती ४३१ मैल चालली, हाच होय.

कँपानियासारख्या प्रचंड आगबोटीला दररोज ४५० टन कोळसा लागतो म्हणजे प्रत्येक ३१/५ मिनिटाला एक टन पडतो !  ह्या आगबोटीची किंमत ६,००,००० पौंड म्हणजे जवळ जवळ ------ रुपये आहे !!  एडिसनचें असें म्हणणें आहे कीं, अमेरिका आणि इंग्लंड ह्यांमधील प्रवास फार तर ३।४ दिवसांत करतां येईल !  ह्याच नांव प्रगति !!!

दर रविवारीं बोटीवर धर्मसंबंधीं कांहीं होत नाहीं, असें जें मागें मीं लिहिलें आहे, तें चुकीचें आहे.  ता. २९ सपटंबर आदित्यवारीं 'पर्शिया' आगबोटीवर सार्वजनिक ईश्वरोपासना झाली, ती स्वतः कमांडरानेंच चालविली. पुरुष व स्त्रिया मिळून ४० जण हजर होते.  उपासनेनंतर समुद्रावरील धर्मकृत्यांकरितां म्हणून तेथल्या तेथेंच सुमारें २० रुपये जमले.  असो.  कोणत्या तरी रीतीनें ह्या लोकांची धर्मबुद्धि प्रकट होत आहे.