युनिटेरिअन समाज

पूर्वपीठिका व इतिहास
हिंदुस्थानात ज्याप्रमाणे ब्राह्म अगर प्रार्थनासमाज आणि आर्यसमाज ह्या उदार धर्माच्या संस्था पुरातन हिंदुधर्मातून विकास पावून, आधुनिक शास्त्र, तत्त्वज्ञान व विचारपद्धती ह्यांस विसंगत न होता ज्या एका सनातन व सार्वत्रिक धर्माचे कार्य करीत आहेत त्याच धर्माचे कार्य युनिटेरिअन समाज हा इंग्लंड, अमेरिका इ. सुधारलेल्या पाश्चात्य देशांत करीत आहे.

युनिटेरिअन ह्या इंग्रजी पदाचा अर्थ एकवादी असा हे. १६ व्या शतकात ख्रिस्ती धर्मात जी मोठी सुधारणा झाली त्यानंतर हे नाव प्रचारात आले. पण ह्याचा खरा अर्थ कळण्यास ख्रिस्ती धर्माच्या अगदी मुळाशी गेले पाहिजे. ख्रिस्ती लोक जरी देव एकच आहे असे मानतात, तरी त्याचे तीन पुरूष आहेत अशी त्यांची समजूत आहे. पितादेव, पुत्रेदेव (ख्रिस्त), पवित्र आत्मा हे त्रयात्मक कोडे प्रचलित ख्रिस्ती धर्माचे केवळ जीव आहे. ह्या कोड्यावर ज्यांचा विश्वास नाही ते जुन्यांच्या मते ख्रिस्ती नव्हेत व त्यास पुढे गतीही नाही. ह्याच्या उलट युनिटेरिअन लोक परमेश्वर सर्वतोपरी एकच आहे व ख्रिस्त हा केवळ एक अतिपवित्र साधुपुरूष पण इतरासारखा मनुष्य होता असे समजतात. ख्रिस्ती श्रुतीचे व धर्मेतिहासाचे काळजीपूर्वक संशोधन केल्यास ति-हाइताला सहज दिसून येईल की, हा कूटात्मक त्रयवाद मुळात नसून ख्रिस्तानंतर सुमारे ३०० वर्षांनी धर्माधिका-यांनी काही कारणास्तव आत घुसडला आहे. स्वत: ख्रिस्तास अगर त्याने नेमलेल्या बारा संदेशकांस हे कोडे माहीत नव्हते. त्यांच्या शिकविण्यात ह्याचा उल्लेख नाही हे साहजिक आहे. मागाहून सेंट पॉल ह्यास संदेशक नेमण्यात आले. ख्रिस्ती धर्मात ख्रिस्ताच्या खालोखाल पॉल ह्याने अति मोठी कामगिरी बजाविली आहे. किंबहुना पॉल झाला नसता, तर ख्रिस्ताने केलेले धर्मविधान जुन्या यहुदी धर्माचाच केवळ एक सुधारलेला पंथ बनून थोड्या काळात नामशेष झाले असते. ख्रिस्ताप्रमाणे त्याचे बाराही संदेशक यहुदीच होते. ख्रिस्ताचा उपदेश ऐकूनही त्यांची मने व्हावी तितकी उदार झाली नव्हती. त्याने दिलेल्या सार्वत्रिक देणगीचा फायदा यहुदी तर बाह्य जगास देण्यास तयार नव्हते व समर्थही नव्हते. पण स्वभावत: हिंमतवान पॉल ह्यास ख्रिस्ताने तरी संदेशक नेमले नव्हते, तरी त्याच्या अतिरिक्त चांगुलपणाने त्यास झपाटले होते. त्या प्रेरणेसरशी पॉल बेफाम झाला. आणि यहुदी कोतेपणाचा कोट फाडून, ग्रीक, रोमन, मॅसिडोनियन इ. लोकांत त्याने शुभवर्तमानाची दवंडी पिटविली. ह्या प्रकारे शुभवर्तमानाचा चोहोंकडे प्रसार झाला खरा, पण त्यासरसा त्याच्या शुद्ध साधेपणाला बराच बाध आला. ग्रीक, अलेक्झांड्रियन्, वगैरे लोक स्वभावत:च तत्त्वज्ञानपटू व तर्कप्रिय. येथील ब्राह्मणांनी ह्याच्या पूर्वीच अध्यात्मशास्त्रात पुष्कळ सिद्धांत व कोटिक्रम केले होते. ख्रिस्ताचे शुभवर्तमान व विचित्र चरित्र हे विषय पुढे आल्यावर ख्रिस्त नंतर पहिल्या तीस शतकांत त्याच्या जन्माविषयी व स्वरूपाविषयी नाना मते, नाना उपपत्त्या आणि तदनुसार परस्पर विरोधी पंथही उद्भवले. ग्रीक तत्त्वज्ञांनी ख्रिस्त म्हणजे शब्दब्रह्म (Logos) असे ठरविले. इतरांनी त्यावर आपला अवतारवाद लादला. शेवटी ह्या मतांची व पंथांची इतकी गर्दी व मारामारी झाली की, ख्रिस्ती धर्माच्या अभिषिक्त अधिका-यास धर्माचे मुख्य विधान कोणते, ते कायम कसे राखावे आणि त्याची अमलबजावणी कशी करावी ह्याची मोठी काळजी पडली. ह्याच संधीस कॉन्स्टॅटिनोपलचा रोमन बादशहा कॉनस्टॅन्टाइन हा राजकीय हेतूने ख्रिस्तीधर्माकडे वळला होता. त्याला ही ख्रिस्तीधर्माची डळमळणारी इमारत सावरावयाची होती. म्हणून त्याने इ. स. ३२५ साली नायसिया येथे मोठी धर्मपरिषद भरविली. तीत सर्व धर्माधिकारी विवादक जमले होते. त्यांनी अर्धा वाद, अर्धी जबरी करून शेवटी वरील कूटात्मक त्रयवाद (Trinity) स्थापला. पण एवढ्यानेच हा ख्रिस्ताच्या स्वरूपाविषयी वाद मिटला नाही. एरियस आणि त्याचे अनुयायी ख्रिस्ताचे मनुष्यत्व वेळोवेळी प्रतिपादू लागले. शेवटी रोमचा पहिला पोप लिओ दि ग्रेट ह्याने फर्माविले की, ख्रिस्त हा पूर्ण मनुष्यही आहे आणि पूर्ण देवही आहे. मेरीच्या पोटी जन्मला म्हणून मनुष्य, आणि मेरी ही कुमारी होती तिच्यात गर्भ देवापासून आला म्हणून तो देव, इ. ह्या अवधीत रोमच्या मठाचा अधिकार पूर्ण स्थापित झाला होता. पोपच्या हाती स्वर्गाच्या किल्ल्या आल्या होत्या. इतकेच नव्हे, तर युरोपच्या राजकीय गाद्यांचा मक्ताही त्याने आपलेच हाती घेतला होता. ह्या राजकीय व सामाजिक एकछत्री राज्याची पुढील एक हजार वर्षे युरोपच्या इतिहासात अंधरायुग ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. धर्माची मते, समाजाची कृत्रिम बंधने व व्यक्तीचे आचार ह्याचे जे एकदा कायमचे ठसे बनून गेले ते पुढील हजार वर्षांत कोणाच्यानेही पुसवले नाहीत.

१६ व्या शतकात लूथर आणि कॅलव्हिन ह्या पराक्रमी पुरूषाचा उदय झाला. त्यांनी पोपचे प्रामाण्य, त्याच्या हस्तकांचा जुलूम, प्रायश्चित्ताचा बाजार वगैरे अनेक अधर्माविरूद्ध धर्मयुद्ध करून अर्ध्या अधिक युरोपचा उद्धार केला. पण लूथर अगर कॅलव्हिन हे काही पूर्ण सुधारक नव्हते. (कोणाही एका व्यक्तीस सुधारणेत पूर्ण यश मिळविणे फार कठीण आहे.) ह्या दोघांनी पोपचे प्रामाण्य हाणून पाडले, पण कॅथॉलिक मताने ४ थ्या ५ व्या शतकांत धर्ममताचे जे ठसे जुळवून ठेविले होते ते जसेच्या तसेच स्वीकारले, इतकेच नव्हे तर ह्या दोघांनी आपल्या नवीन अधिकारबळाने वरील मतांचे प्रामाण्य गाजविले. सुधारलेल्या धर्मात श्रुती शब्दश: प्रमाण झाल्या. इतकेच नव्हे तर त्या शब्दांचा अर्थही वरील मतास अनुसरूनच करणे भाग पडले. परंतु ह्या सुधारणेमुळे धर्मबाबतीत स्वतंत्र विचाराची जी एकदा लाट उसळली ती अशी मध्येच थांबविणे शक्य नव्हते. साधुसंतांच्या मूर्तीची पूजा बंद केली, प्रायश्चित्ते विकण्याची चाल बंद केली, बायबलाची सुधारून नवी आवृत्ती काढली तथापि काही विचारी माणसांचा उपदव्याप राहिला नाही. ख्रिस्त हा मनुष्य की देव, केवळ त्याच्यावर विश्वास ठेविल्याने मोक्ष मिळतो की सत्कर्म केल्याने मिळतो, मनुष्यप्राणी जन्मत:च पापी आहे काय, क्ही आत्म्यांस गती व काहीस अधोगती ही देवाने आधीच निवडानिवड केली आहे हे खरे काय, वगैरे जुन्या प्रश्नासंबंधी पुन: विचार सुरू झाला. पण लूथर आणि कॅलव्हिनने ह्या बाबतीत अगदी दुराग्रह धरला. इ. स. १५३९ साली कॅथराईन वीगल नावाच्या एका वृद्ध बाईस ह्यासंबंधी स्वतंत्र विचार केल्याबद्दल जिवंत जाळण्यात आले. सर्व्हिटस् नामक एका स्पॅनिश डॉक्टराने ‘ख्रिस्ती धर्माचा उद्धार’ ह्या नावाचा एक स्वतंत्र विचाराचा ग्रंथ लिहिला. म्हणून त्यास पाखंडी ठरवून कॅलव्हिन ह्या सुधारकाने इ. स. १५५३ त जिवंत जाळविले. सर्व्हिटस् हा पहिला नावाजलेला युनिटेरिअन होय.

पोलंड, ट्रान्सिल्व्हानिया व हंगेरी
हॅलॅमने म्हटले आहे की, सर्व्हिटसच्या राखेतून धर्मसहिष्णुतेचा पहिला अंकूर उगवला. सर्व्हिटसच्या मागे ब्लँड्राटा नावाच्या एका इटालियन वैद्याने युनिटेरिअन मताचा प्रसार पोलंड देशात चालविला. हा देश जरी कॅथॉलिक होता तरी त्यावेळी तेथे पहिला व दुसरा सेजिस्मंड असे युरोपातील तेवह्चे अत्यंत उदार मताचे राजे होते. त्यांनी धर्मबातीत पूर्ण स्वातंत्र्य राखिले होते. म्हणून ब्लँड्राटा ह्यास पोलंडात इ. स. १५६५ साली पहिला युनिटेरिअन समाज स्थापिता आला. लवकरच सर्व देशभर ह्याच्या शाखा निघाल्या. इतर ठिकाणचे युनिटेरिअन्सही तेथील छळाने गांजून येथे आश्रयासाठी जमू लागले. राको येथे सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचे कॉलेज काढले. शेजारच्या ट्रान्सिल्व्हानिया व हंगेरी ह्या देशांतही ह्या मताचा झपाट्याने प्रसार होऊन त्यात अनुक्रमे ४०० व ३७ समाजांची स्थापना झाली, आणि क्लॉसेनबर्ग येथे एक मोठे कॉलेज निघाले. पण ह्याचा हा उत्कर्ष फार वेळ टिकला नाही. ज्या दोन उदार राजांमुळे ह्यांना अवसर मिळाला होता ते दोघे १५७१,१५७२ साली वारले व त्याच्यामागे कॅथॉलिक कारकीर्द सुरू झाली. जुने दुर्धारक कॅथॉलिक्स नवे सुधारक म्हणविणारे पण तितकेच दुराग्रही व असहिष्णु लूथर व कॅलव्हिन ह्यांचे अनुयायी ह्या दोघांसही हे युनिटेरिअन उदार मत खपण्यासारखे नव्हते. म्हणून त्यांचा दोहोंकडूनही छळ होऊ लागला. इ. स.१६३८ साली पोलंडातील त्यांचे कॉलेज पाडून टाकले. अध्यापकांस हद्दपार केले आणि उपासनामंदिरे बंद करण्यात आली. १६६० त त्यांचा तेथे पूर्ण बीमोड झाला. त्यांची मते स्वीकारणा-यास अगर कोणा युनिटेरिअनास घरी आश्रय देणा-यासही देहांत शिक्षेचा हुकूम झाला. हंगेरीतील ३७ समाज नाहीसे झाले, ट्रान्सिल्व्हानियांतील ४०० पैकी १०० समाज कसे तरी जीव धरून राहिले. इ. स. १८५७ साली जेव्हा ऑस्ट्रियाने रोमशी स्नेह जोडला तेव्हा वरील १०० समाजांचा नाश करण्याचा शेवटचा प्रयत्न झाला होता. पण इंग्लंडातील युनिटेरिअनांच्या मदतीने ह्यांचा त्या संकटातून निभाव लागला व आतापर्यंत त्यांची हळूहळू वाढ होत आहे.

इंग्लंड
सोळाव्या शतकात इंग्लंडातही पुष्कळ युनिटेरिअनांची दुराग्रहास आहुती देण्यात आली. इ. स. १५५० साली जोन बौचर नामक एका बाणेदार बाईने ख्रिस्ताच्या अवताराविरूद्ध आपले मत प्रथिपादल्याबद्दल तिला जिवंत जाळले. स्मिथफिल्ड येथे ही चितेवर उभी असताना मरताना तरी तिने आपले मन बदलावे म्हणून एक पाद्रीसाहेब तिच्याजवळ उपदेश करण्यास गेले, पण बाईने ह्या भल्या गृहस्थास घरी जाऊन पुन: एकवार बायबल शांतपणे वाचण्यास सांगितले, व धैर्याने प्राण सोडला. इ. स. १६१२ त शेवटचे दोन बळी पडले. पण माणसाबरोबर मतांची राख झाली नाही. पोलंडातील युनिटेरिअन पुस्तके इंग्लंडात छापवून आणून त्यांचा प्रसार करण्यात आला. १७ व्या शतकात इंग्लंडात प्युरिटन मताचे जे मोठे वादळ झाले त्याच्या तळाशी युनिटेरिअन मताचा प्रवाह जोराने वाहत होता. व्यवस्थितपणे ह्या मताचा समाज जरी तेव्हा स्थापन झाला नव्हता तरी त्या काळचे मोठमोठे विवेचक मिल्टन, लॉक, न्यूटन प्रभृती ह्याच मताचे होते.

१६ व्या शतकातील मोठ्या सुधारणेत इंग्लंडात जरी प्रॉटेस्टंट धर्माची स्थापना झाली तरी लोकांस स्वतंत्र रीतीने विचार करण्यास व उपासना करण्यास सवड नव्हती. राजकीय व धार्मिक बाबती एकातएक अशा मिसळून गेल्या होत्या की सर्व लोकांस राष्ट्रीय धर्माने (Established Church) रेखन दिल्याप्रमाणेच आपले सर्व धर्माचरण राखणे भाग पडत होते. ह्यामुळे चिडून कित्येक लोकांनी आपापल्या स्वतंत्र शाखा काढून आपले व्यवहार व बंधने स्वतंत्र रीतीने पाळण्याचा प्रयत्न केला होता. ह्या लोकांस नॉनकन्फॉर्मिस्ट किंवा डिसेंटर्स असे म्हणतात. १६७९ तील राज्यक्रांतिनंतर ह्या सर्व लोकांस उपासनास्वातंत्र्य मिळाले (Act of Toleration). ह्यापैकी प्रेस्बिटर शाखेचे लोक जेव्हा आपल्यासाठी स्वतंत्र मंदिरे बांधू लागले तेव्हा त्यात उपदेश करणा-यांची मते अमक्याच प्रकारची असावीत अशी त्यांनी अट ठेविली नाही, त्यामुळे ह्या शाखेत युनिटेरिअन मताचा स्वतंत्र विचार झपाट्याने होऊ लागला. युनिटेरिअन हे पाखंडी नाव घेण्याची मात्र ह्या शाखेची छाती नव्हती व इच्छाही नव्हती तथापि नकळत त्यांची ह्या मताकडे प्रगती होत होती.

पण एका धीटास असे लाटेसरशी वाहत जाणे आवडेना. तो त्या काळचा प्रसिद्ध रसायनशास्त्री डॉ. जोसेफ प्रिस्टले हा होय. जी बुद्धी ऑक्सिजन व विद्युत ह्या तत्त्वांची पारख करण्यात तो नेहमी खर्चीत असे तीच आता चालू धर्मतत्त्वांची देखील पारख करण्यात घालण्याचे त्याने धाडस केले, इतकेच नव्हे तर त्याने युनिटेरिअन मतांचा राजरोसपणे पुकारा केला. बिचारी प्रेस्बिटर शाखा चपापून गेली. पण प्रिस्टलेचे तोंड काही केल्याने राहीना. शेवटी प्रेस्बिटर पंथाला आढळून आले की, आपण खरोखरीच युनिटेरिअन आहो. तरी उघडपण ते असे नाव घेईनात. पण जग त्यास ख-या नावाने ओळखू लागले. बाप्टिस्ट व कॉग्रिगेशनॅलिस्ट वगैरे जुन्या मतांच्या शाखा ज्या आतापर्यत त्यांच्याशी व्यवहार करीत होत्या त्यांनी आता व्यवहार बंद केला. हल्ली प्रेस्बिटरेअन लोकांस युनिटेरिअन म्हणवून घेण्याची फारशी लाज वाटत नाही.

ह्याचवेळी इंग्लंडात राष्ट्रीय चर्चमध्येच एक सुधारणेची चळवळ चालू होती. इतिहासात हिला ‘लॅटिट्युडिनेरिअनझम’ असे नाव आहे. ही चळवळ करणा-यास ख्रिस्ती धर्ममतातील पुष्कळ गोष्टी विकसित, मानवी-बुद्धीला अत्यंत अग्राह्य वाटू लागल्या होत्या. हे सर्वही सुधारक स्थापित धर्माचे लहान मोठे अधिकारी होते. त्यांनी शेवटी मतासंबंधी ज्या ३९ प्रतिज्ञा प्रत्येक उपदेशकास हल्ली घ्याव्या लागतात, त्या तशा असू नयेत अशाबद्दल पार्लमेंटकडे अर्ज केला. पण हा अर्ज मुळी स्वीकारूच नये, असे एकास तीन मतांनी पार्लमेंटात ठरले. ह्यानंतर वरील सुधारक मंडळी स्वस्थ बसली. कारण कोणतीही सुधारणा लोकांत राहून व लोकांस घेऊनच करावी असे त्यांचे म्हणणे पडले. पण त्यांपैकी एकाची मात्र अशी सुलभ आणि सोयीची समजूत पडली नाही. तो थिओफिल्स लिंडसे हा होता. त्याने आपले यॉर्कशायरमधले मिळकतीचे आचार्यपद सोडले आणि लंडन येथील एसेक्स स्ट्रीटमध्ये एक जुनी लिलाव करण्याची जागा उपदेश करण्यासाठी स्वत:च्या खर्चाने भाड्याने घेतली. ह्याप्रकारे सन १७७३ साली इंग्लंडातील प्रथम यूनिटेरिअन समाजाची उघडपणे स्थापना झाली. लिंडसेच्या सहकारी लँटिट्युडिनेरिअन सुधारक मंडळीने त्यास पंथ सोडून बाहेर पडून सुधारणा करू लागल्यामुळे सुधारणेस हरकत होणार असा दोष दिला होता. पण काळाने सत्य कोणत्या बाजूस होते हे दाखविले आहे. लिंडसेची सहकारी मंडळी कोण होती ह्याचा आता अगदी विसर पडला आहे. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष त्यांच्या सुधारणेची चळवळ ‘लँटिट्युडिनेरिअनझम’ ही काय होती हे पहाण्यासही आता मागील इतिहासाची पाने शोधावी लागत आहेत, त्यात मात्र तिचे नाव आढळते. उलटपक्षी लिंडसेच्या लिलावाच्या खोलीचे मोठे मंदिर बनले व त्यात थोड्याच काळात राजकीय सुधारक, बॅरिस्टर, शास्त्री व पार्लमेंटचे सभासद वगैरे बडी बडी मंडळी जमू लागली, तथापि सन १८१३ पर्यंत युनिटे रिअन्सविरूद्ध कडक प्रतिबंधक कायद्याची अमलबजावणी होत होतीच. इ. स. १७८६ साली कोणतीही मतासंबंधी अट न घालता धर्माचे स्वतंत्र शिक्षण देण्यासाठी व उपदेशक आणि प्रचारक तयार करण्यासाठी मँचेस्टर कॉलेजची स्थापना झाली. चोहींकडे देशभर समाज निघू लागले. सन १८२५ त इंग्लंडात व बाहेर युनिटेरिअन मतांचा प्रसार करण्यासाठी ब्रिटिश अँड फॉरेन् युनिटेरिअन असोसिएशन नावाची मंडळी स्थापण्यात आली.

अमेरिका
अमेरिका हा नवा देश असल्यामुळे व पारतंत्र्यास कंटाळून बाहेर पडलेल्या लोकांनी वसविलेला असल्यामुळे तेथे राष्ट्रीय स्थापित धर्माचे प्रस्थ माजलेले नाही. लोकसत्तात्मक पद्धतीवर लोकांनी आपापले धर्मसमाज चालविले आहेत. तथापि बहुसमाज अद्यापि वरून तरी जुन्या मताचाच आहे. सन १७८५ साली बॉस्टन येथील एका समाजाने उघडपणे युनिटेरिअन मत स्वीकारले. तेव्हापासून त्याचा तेथे हळूहळू प्रसार होऊ लागला. इकडे इंग्लंडात डॉ. प्रिस्टले ह्यांचा लोकांनी फार छळ मांडला. बर्मिंगहाम् येथील त्यांचे घर जाळले. लंडन येथील त्याला सुखाने राहू दिले नाही. म्हणून त्यास शेवटी त्रासून अमेरिकेत जावे लागले. तेथील लोकांनी त्यांचा बहुमान केला व त्याच्यामुळे तेथे उदारमत-प्रसारास अधिक मदत झाली. मॅसाचसेट्स प्रांती डॉ. चॅनिंगची व्याख्याने सुरू झाली. त्याच्या जोरदार प्रेरणेने त्या प्रांतातल्या सुमारे अर्ध्या समाजांनी हे उदार मत स्वीकारले. पुढे लाँगफेलो लोवेल वगैरे कवी, एमर्शनासारखे लेखक व थिऑडर पार्करसारखे उपदेशक ह्यांनी युनिटेरिअन मत देशभर पसरविले.

असो. एथवर युनिटेरिअन मताची प्रॉटेस्टंट सुधारणेच्या पूर्वीची पीठिका व नंतरचा त्या समाजाच्या १९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत त्रोटक इतिहासाचा थोडक्यात विचार केला. ह्यापुढे २० व्या शतकाच्या आरंभी ह्या समाजाची कशी स्थिती आहे व एकंदर जगाच्या धर्मप्रगतीत ह्याची पायरी कोणती आहे हे ठोकळ मानाने पाहू.

हल्लींची स्थिति
युनिटेरिअन समाजाच्या मतौदार्याची मजल हल्ली एकंदरीत कोठवर गेली आहे ह्याची थोडक्यात पण ठाम कल्पना मराठी वाचकांस करून देणे हे मोठे कठीण काम आहे. डॉ. प्रिस्टले व लिंडसे प्रभृती युनिटेरिअन्स व डॉ. मार्टिनो, रेव्ह. आर्मस्ट्राँग प्रभृती अलीकडचे युनिटेरिअन्स ह्यांच्यात महदंतर पडले आहे. जे अंतर आदिब्राह्मसमाज व हल्लीचा साधारण ब्राह्मसमाज ह्यांमध्ये आहे तेच १९ व्या शतकाच्या पूर्वीच्या व नंतरच्या युनिटेरिअन समाजात आढळते. प्रिस्टले इत्यादिकांना प्रचलित धर्माचे हटवाद व ख्रिस्ताचे देवत्व जरी मान्य नव्हते. तथापि ख्रिस्ती धर्म म्हणजे केवळ एक अप्रतिम ईश्वरी सत्य आहे आणि त्याची प्रतीती येशूने अनेक चमत्कार दाखवून मनुष्यास करून दिली असे त्यास वाटत होते. निस्पृह सुधारक थिओडर पार्कर ह्याचेदेखील मन श्रौत चमत्काराबद्दल साशंकच होते. पण हल्ली कोणताही युनिटेरियन केवळ बायबलावरच हात टेकून बसलेला आढळणार नाही. ह्यावरून ते बायबलचा अनादर करतात असे मुळीच नव्हे. तर मनुष्यकृत बायबलात ईश्वरी प्रेरणा किती आहे व मानवी उपाधी व अफरातफर किती आहे ह्याचा ते प्रांजलपणे, दक्षतेने व अत्यादरपूर्वक विचार करितात, इतकेच नव्हे तर धर्म ही बाब केवळ एकाद्या बाह्यप्रणित शब्दांसंबंधी मीमांसा, विचक्षणा अगर चिकित्सा करण्याची नव्हे किंवा केवळ मानसिक विश्वासाचीही नव्हे तर ती अंत:करणाच्या उच्च भावनांची व स्वभावाच्या वाढीची आहे अशी त्यांची दृढ समजूत होऊ लागली  आहे. किंबहुना युनिटेरिअन ह्या शब्दाचा व्यापक अर्थ घेतला तर हल्लीचा युनिटेरिअन समाज हा सुधारलेल्या पाश्चात्य जगाचे ‘प्रबुद्ध अंतर्याम’ (Enlightened conscience) होय असे म्हटल्यास अतिशयोक्ती मुळीच होणार नाही. हल्ली जे ह्या समाजाच्या रूपाने इतके धमौदार्य प्राप्त झाले आहे, ते युरोपात गेल्या शतकात मानवी विचाराची व शोधाची ज्ञानमार्गात जी अभूतपूर्व मजल पोहोचली तिचे प्रत्यक्ष फळ होय. ही विचारगती मुख्यत्वेकरून चार निरनिराळ्या दिशेने झपाट्याने झाली व अद्यापि चालली आहे ती अशी:

(१) पहिली चळवळ अनुभवजन्य शास्त्राची, हिचा आरंभ १९ व्या शतकापूर्वीच झाला होता. पण प्रथम जडशास्त्राच्या विशिष्ट शाखांत लहान मोठे प्रयोग करणे, अनुभव मिळविणे व त्यांचा केवळ भौतिक उन्नतीकडे उपयोग करणे ह्यांतच ही चळवळ खपली होती. पुढे १९ व्या शतकात शास्त्राने तात्त्विक दिशा घेतली आणि अनेक बाह्य प्रमाणांनी डार्विन व स्पेन्सर ह्यांनी उत्क्रांती तत्त्वांची अभेद्य स्थापना करून मोठा दिग्विजय संपादिला.

(२) ह्या अनुभवजन्य ज्ञानाबरोबरच अतींद्रिंय ज्ञानानेही जर्मनीत मोठी मजल मारिली. कँट, हेगल व त्यांच्या अनुयायांनी असा सिद्धांत स्थापिला की विश्वातील भौतिक, मानसिक व नैतिक चमत्कारांच्या तळाशी एकाच स्वयंसिद्ध शक्तीचे कार्य अबाधितपणे चालू आहे.

(३) शास्त्र व तत्वज्ञान ह्यांच्या अशा अभ्युदयामुळे ईश्वरप्रणित मानलेल्या धर्माची इमारत डळमळू लागली. ज्या शास्त्रीय पद्धतीने अनुभविक व तार्किक ज्ञानात इतके कार्य केले तिचा लवकरच धर्माच्या पवित्र व सोवळ्या प्रदेशातही प्रवेश झाला. इतर ठिकाणांपेक्षा जर्मन युनिव्हर्सिटीतील धर्मशास्त्राच्या अध्यापकांना अधिक मतस्वातंत्र्य होते, म्हणून ख्रिस्ती श्रुती जे जुना व नवा करार त्यांतील निरनिराळी प्रकरणे कोणी, कधी, कशा स्थितीत लिहिली, त्यांत ऐतिहासिक भाग किती, व निव्वळ कल्पित व भाविक भाग किती, जुन्या यहुदी धर्माचा परिणाम कोणता व लॅटिन आणि ग्रीक विचारांचा परिणाम कोणता वगैरे गोष्टींची स्ट्रॉस, बॉवर, प्लीडरर इत्यादिकांनी पूर्ण निःपक्षपाताने चिकित्सा केली.

(४) शेवटी अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे तुलनात्मक धर्मशास्त्राचा. युरोपात अनेक जुन्या व नव्या भाषांचा (विशेषेकरून संस्कृताचा) तुलनात्मक अभ्यास सुरू झाल्यापासून जगातील प्रमुख धर्मांच्या सर्व श्रुतिग्रंथांचे मूळ भाषेतून अध्ययन, संशोधन होऊ लागले. प्रो. मॅक्समूलरसारख्या पंडितांच्या विलक्षण उद्योगाने ब्राह्मण, बौद्ध, चिनी, पार्शी, महंमदी इ. पौरस्त्य धर्माच्या पवित्र ग्रंथांचे पाश्चात्य भाषांत भाषांतर झाले. इतकेच नव्हे तर ख्रिस्ती शकापूर्वी ३-४ हजार वर्षांपूर्वीं होऊन गेलेल्या असीरिअन, बाबिलोनियन व इजिप्सिअन् लोकांचे धार्मिक शिलालेख जमिनीतून उकरून काढून त्यांची मीमांसा केली! शिवाय नव्या जगात अगदी अलगपणे विकास पावणा-या मेक्सिको व पेरू ह्या देशांतील धर्माचेही परिशीलन केले. इतक्या विस्तृत प्रमाणांवरून धर्मशास्त्राच्या नवीन इमारतीचा पाया घातला. ह्याप्रकारे शास्त्र, तत्त्वज्ञान, मीमांसा व इतिहास ह्या चारी बाजूंनी हाच सिद्धांत स्थापित झाला आहे की, रानटी अवस्थेतील मानवी आत्म्यात प्रथम जागृती झाल्यापासून आतापर्यंत धर्मबुद्धीचा सारखा विकास होत आहे.

ह्या सर्व गोष्टी घडवून आणणारे युनिटेरिअन समाजाचेच सभासद होते असे नाही. पण युनिटेरिअन समाजाला आता जे स्वरूप आले आहे ते ह्या चारी प्रयत्नांचे प्रत्यक्ष कार्य होय. धर्मबाबतीत उपासना मंदिरातील गीते, प्रार्थना, उपदेश ह्यांची जितकी आवश्यकता आहे तितकीच आवश्यकता वरील चारी प्रयत्नांची आहे अशी त्यांची समजूत असल्याचे त्यांच्या कृतीवरूनही दिसून येते. ह्यामुळे त्यांच्यावर पुष्कळ वेळा असा आक्षेप घेण्यात येतो की, ते केवळ बुद्धिवादी आहेत आणि त्यांच्यात भक्ती कमी आहे. भक्तीसंबंधी आक्षेप बहुतांशी त्या त्या आक्षेपकाच्या भक्तीच्या कल्पनेवर अवलंबून आहे. विश्वात मनुष्यशक्तीहून अनंतपटीने मोठी शक्ती जी नांदत आहे तिजसंबंधी आदर, प्रेम, विनम्र भाव इ. गुण इतरांपेक्षा युनिटेरिअनांमध्ये कमी आहेत असे म्हणता येत नाही. बुद्धिवादाविषयी म्हटले असता ह्यांचा कटाक्ष विशेषेकरून निषेधार्थी आहे. बुद्धीला अग्राह्य वाटणा-या व आत्म्याच्या बुद्धीला केवळ अनावश्यक अशा गोष्टीत जेथे जुने लोक आग्रह धरितात तेथे युनिटेरिअन उदासीन असतात, आणि ज्या गोष्टीत स्वत: जुन्या लोकांचाही खरोखर विश्वास नसता केवळ परंपरागत म्हणून चालू आहेत त्यांचा ते उघडपणे निषेध करतात. वरवर पाहणारास असे दिसते की, साधारण युनिटेरिअन मनुष्य धर्मसमजुतीत निषेधदृष्ट्या बुद्धिवादाचा जितका उपयोग करतो तितका विधिदृष्ट्या करीत नाही आणि काही अंशी हे खरेही आहे. पण ह्याचे कारण त्याच्या बुद्धीची शक्ती निषेधात कुशळ व विधीत पंगू आहे म्हणून नव्हे, तर मागे गेलेल्यांनी बुद्धिवादाचा अतिरेक केल्यामुळे त्यांचे हटवाद जसे आता भोवत आहेत तसेच आताच्यांनी जर आता वाटणा-या शुद्ध बुद्धीच्या सिद्धांताबद्दल आग्रह धरला तर लवकरच त्यांचे हटवाद बनून पुढे येणारास ते जाचतील, इतकेच नव्हे तर आताच्या समाजातही  दुही व भेद माजतील ही गोष्ट ते पक्की जाणून आहेत. म्हणून ते ईश्वराचे गुण, त्याचे व्यापार, त्याचे केवळ स्वरूप, मानवी आत्म्याची मागील व पुढील स्थिती इ. अनाकलनीय गोष्टीसंबंधाने आपले अगदी ठाम मत बनविण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. पण एवढ्यावरूनच जाणिवेला अगदी गुंडाळून ठेवून नुसते हरी हरी म्हणून धर्मसाधन करीत आहेत, असे नव्हे तर मानवी अंतरात्म्यात निरंतर शोधाचा शोष लागला आहे, वेळोवेळी नीतीचा उद्धार होत आहे, बाह्यसृष्टीच्या सौंदर्याची अंतरात रसिकता वाटत आहे, आत्मा आत्म्याशी अधिकाधिक बिलगत आहे, आशा वाढत आहे, मानवी प्रयत्नास अधिक हुरूप येत आहे वगैरे हे जे अंत:चमत्कार त्यांच्या पायावर इंग्लंडात डॉ. मार्टिनो ह्या अध्यर्यूने व त्याच्या युनिटेरिअन अनुयायांनी आस्तिक्यबुद्धीची इमारत रचली आहे. तसेच बाह्यसृष्टीतही अनादी नियमांचे अव्यभिचरित साम्राज्य आणि जीवांच्या व समाजांच्या घटनांचा सतत विकास ह्या गोष्टी ज्या स्पेन्सरसाहेबांनी स्थापल्या त्याचेच युनिटेरिअन अनुयायी मि. सॅव्हेज व जॉन मिस्क ह्यांनी ह्या तत्त्वावर आस्तिक्य मत स्थापिले. (स्पेन्सरचे नाव चहूंकडे बहुतकरून उत्क्रांतिवादापेक्षा अज्ञेयवादाबद्दलच प्रसिद्ध झाले आहे. आणि त्याच्या नावावर कित्येक लोक नास्तिकात तृप्ती पावून उत्साहहीन झाले आहेत. मि. सॅव्हेज ह्यांनी जेव्हा आपला ‘उत्क्रांति धर्म’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला तेव्हा ह्याच स्पेन्सरसाहेबांनी त्यांचे अत्यंत अभिनंदन केले.) ह्याप्रकारे युनिटेरिअन तत्त्वज्ञानातच काय तो बुद्धिवाद आहे असे नाही. तर बहुतेक व्यासपीठातूनही आधुनिक शास्त्राचे व तत्त्वज्ञानाचे शोध आणि राजकीय व सामाजिक उदार घडामोडीविषयी चर्चा व अभिनंदन करण्यात येते. ह्याप्रमाणे युनिटेरिअन बुद्धिवाद निषेधात्मक आहे व विद्यात्मकही आहे. विचाराचा हटवाद व कृतीचे ढोंग आणि अंधपरंपरा ह्यांवर तो आपले निषेधास्त्र चालवितो आणि विचाराची अश्रद्धा, मनाचे औदासीन्य व कृतीचा निरूत्साह ह्यांवर तो आपले विध्यस्त्र सोडतो! विचाराचे पूर्ण स्वातंत्र्य आणि उपासनेचा सोहळा ह्या दोहोंचे दुर्लभ सख्य युनिटेरिअन देवळांतून नित्य घडत असलेले पाहूनही युनिटेरिअन लोकांत भक्ती नाही असे कोण म्हणत असतील तर असोत !

शेवटी ह्यांच्या नावसंबंधी थोडा उलगडा करणे इष्ट आहे. कित्येकांस आपल्यास युनिटेरिअन ख्रिश्चन म्हणून घेणे आवडते, कित्येकांस युनिटेरिअन हेच नाव बस्स आहे. काहींची ही दोन्ही नावे आपल्या मताला अगदी थोटी आहेत अशी कुरकुर आहे. पण कोणाचा कोणत्याही नावात आग्रह नाही. ज्यांना ख्रिश्चन म्हणून घ्यावे असे वाटते त्यांचे म्हणणे एवढेच आहे की, ख्रिस्तीधर्माशी आपला जो ऐतिहासिक संबंध आहे तो हे नाव टाकल्याने तुटल्यासारखा होईल. त्यांना ‘युनिटेरिअन्’ एवढेच म्हणून घ्यावेसे वाटते, त्यांच्या मनात ख्रिस्ती हा जगातील अनेक धर्मशिक्षकांत अगदी वरिष्ठ शिक्षक होय असे ते मानतात व उपासनेत बहुतेक प्रसंगी बायबलाचाच उपयोग करितात. तथापि ह्यांची प्रवृत्ती श्रौत धर्मातून उत्तरोत्तर नैसर्गिक धर्माकडे झपाट्याने होत आहे. आणि तुलनात्मक धर्माध्ययनामुळे युरोपात इतर धर्मग्रंथांचा जसजसा जास्त प्रसार होईल तसतसे इतर धर्मविभूतींचे व धर्मविचारांचे साधारण लोकांनाही अधिक महत्त्व समजून येईल. आणि ते समजून घेण्याची सर्व समाजाची इच्छा आहे इतकेंच नव्हे तर प्रयत्नही चालू आहेत.