विठ्ठल रामजी शिंदे बी. ए., यांचें त्रोटक चरित्र
ज्यांचे लेख, व्याख्यानें व उपदेश ह्या संग्रहांत समाविष्ट केले आहेत, ते माझे मित्र, रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे, आजच्या काळचे एक तरुण कर्ते गृहस्थ आहेत. त्यांच्या हातून आजपर्यंत, जी लोकसेवा झाली आहे, व आज जी होत आहे, तिचेपेक्षां अधिक लाभदायक सेवा पुढें होणारच आहे; आणि ती करावयास त्यांस परमेश्वरानें दीर्घायु करावें, त्यांस नेहमी त्यानें साहाय्य करावें, अशी विनम्र भावें प्रार्थना करून त्यांच्या चरित्रांतील कांहीं विशेष गोष्टींचा येथें उल्लेख करितों.
पूर्व-वृत्तान्त.
आमच्या ह्या लहानशा चरित्रासाठीं रा. विठ्ठलरावांच्या पूर्वजांची सविस्तर हकीकत येथें देण्याची आवश्यकता नाहीं व ती उपलब्धही नाहीं. शिंदे हें नांव मराठ्यांचें असून विठ्ठलरावांच्या तीर्थरूपांचें नांव रामजी बसप्पा कसें? याचा उलगडा पुष्कळांस सहज होण्यासारखा नाहीं. जीं नांवें विशिष्ट धर्मवाचक असतात, त्यांचा स्वीकार तो धर्म मान्य नसणारे सहसा करीत नाहींत. बसप्पांचे वडील एका लढाईंत पडले व हे उघडे पडले. त्यावेळीं जमखिंडीच्या कानडी देसायांनीं बसप्पाला आपल्यापाशीं ठेविलें. त्यांचें मूळचें नांव काय होतें तें कळावयास मार्ग नाहीं. ह्या लहान मुलानें आपल्या लिंगाईत धर्माचा स्वीकार करावा असें देसायास वाटत होतें; परंतु बसप्पांस हा विचार बिलकूल पसंत पडला नाहीं. त्यांस मराठा म्हणवून घेणेंच पसंत पडलें. ह्यांनीं अल्प वयांत हा जो करारीपणा दाखविला, तो विठ्ठलरावांचे तीर्थरूपामध्यें पुष्कळ उतरला होता, व त्याचाच अंश रा. विठ्ठलरावांमध्यें आढळून येतो ! पुढें बसवंतअप्पांनीं बराच जमीनजुमला केला व सुखानें कालक्रमणा करूं लागले.
विठ्ठलरावांचे तीर्थरूप रामजी ह्यांच्या शिक्षणासंबंधानें जी माहिती आहे, तिच्यावरून जुन्या काळाच्या मानानें त्यांचें शिक्षण फार उत्तम रीतीनें झालें होतें, असें म्हणावयास हरकत नाहीं. त्यांना प्रथमतः संस्थानच्या स्टोअर्सच्या कामावर व नंतर पागेच्या कामावर नेमिलें. आजपर्यंत हा मान मराठा गड्यास मिळालेला नव्हता. तो रामजी बावांना देण्यांत आला, त्यावरून त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची जुन्या पद्धतीनें काम करण्याची रीत, त्यांचा करारीपणा, त्यांची तें काम करण्याची पात्रता, ह्यांविषयीं संस्थानच्या अधिपतींची चांगलीच खात्री झाली असावी असें उघड होतें. जमखिंडी येथें त्यावेळीं कोणाही मराठ्याकडे कारकुनी नसल्यामुळें, ह्यांचें व ह्यांच्या वरिष्ठांचें पटत नसे. त्यामुळें रामजीबावांनीं तीन वेळा राजीनामा दिला व तिन्ही प्रसंगीं त्यांस मागाहून बोलावण्यांत आलें. तिस-या प्रसंगीं, घरीं सोळा वर्षें बसल्यानंतर ते आपल्या कामावर रूजू झाले.
रा. विठ्ठलरावांचे धर्मपर लेख व व्याख्यानें ह्या पुस्तकांत संग्रहित केले आहेत. असे लेख लिहावयास व अशीं व्याख्यानें द्यावयास त्यांच्याठिकाणीं जी पात्रता आली, तिचा उगम त्यांच्या मातापितरांच्या धार्मिकतेंत झाला आहे, असें मला वाटतें. रामजी बावांचें धर्माकडे फार लक्ष असे. अगदी जुन्या वळणांतले ते, व त्या वळणास अनुसरून त्यांनीं धर्मग्रंथ वाचलेले, परंतु स्वतः तुकारामाच्या अभंगांचा संग्रह करणें, ते लिहून ठेवणें, त्यांचें मोठ्या भक्तिभावानें पारायण व निरूपण करणें, हा त्यांचा क्रम नित्य चालू असे. ते वारकरी संप्रदायापैकीं असत. जमखिंडीस तुकारामाच्या पुण्यतिथीनिमित्त जो सप्ताह बसत असे, त्यांत मुख्य भाग रामजी बावांचा असे. शिवाय साधु, संत, गोसावी, फकीर ह्यांस रामजी बावांच्या घरांत मज्जाव नसे. त्यांना जेवावयास, खावयास, गांवांत कोठेंही मिळालें नाहीं, तरी तें रामजीबावांकडे हटकून मिळावयाचें ! आणि ह्या पाहुणे मडळींत नीच मानिलेल्या जातींतीलही लोक असत, पण त्यांचाही आदरसत्कार रामजी बावांच्या घरीं इतर पाहुण्यांप्रमाणेंच होत असे. त्यांच्याशीं पंक्तिप्रपंच होत नसे. एवढेंच नव्हे, तर त्यांची पत्नी सौ. यमुनाबाई ह्याही, पतीस जें कार्य प्रिय, त्यांत पुढाकार घेऊन पाहुण्यांचा आदर-सत्कार करीत. विठ्ठलरावांच्या ठिकाणीं अत्यंजांविषयीं प्रेम उत्पन्न झालें व तें त्यांनी वाढीस लाविलें, ह्या गोष्टी ख-या आहेत; पण त्यांच्या घराण्यांत ही गोष्ट अपूर्व नाहीं; एवढेंच नव्हे तर, निराळ्या दृष्टीनें आईबापांकडूनच त्यांना ह्या बाबतींत पहिला धडा मिळाला, असें म्हणणें वस्तुस्थितीस धरून होईल असें मला वाटतें. सौ. यमुनाबाई ह्या अगदीं जुन्या वळणांतल्या. फार, श्रद्धाळु, अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या, आपल्या मधुर भाषणानें आपल्याकडे कोणाचेंही चित्ताकर्षण करून घेणा-या, आनंदी, पतिसेवा-परायण, अत्यंत दुःखाच्या प्रसंगींही धैर्यानें वागणा-या व आपल्या यातनांस, दुःखास विसरून वागणा-या होत्या. रामजी बावांनीं नोकरी सोडल्यानंतर सगळ्या घराण्याची इभ्रत ह्या शांत व प्रेमळ बाईनीं राखली ! रामजी बावांनीं आपले पैसे लोकांना उसने व कर्जाऊ देऊन घालविले, आणि वर, राजीनामा देण्यापूर्वी सरकारांत आपल्या नांवें असलेले पैसे परत न घेतां उपरणें झाडून ते मोकळे झाले ! अशा वेळीं आपली पूर्वींची इभ्रत, पूर्वींची स्थिति, ह्यांस अनुसरून संसार चालविणें हें यमुनाबांईस किती कष्टाचें कार्य झालें असलें पाहिजे, याची कल्पना वाचकांनींच करावी. पण, त्यांनीं आपली शिकस्त करून आपल्या पतीचा संसार चालविला. एक वेळच्या अन्नावर राहण्याची पाळी आली, तरी खेद न मानतां त्यांनीं आपल्या प्रेमानें सर्वांस जणूं काय भारून टाकिलें !
(* हा लहानसा चरित्रात्मक लेख रा. शिंदे ह्यांच्या एका मित्रानें लिहिला आहे.)
संपादक.
जन्म व शिक्षण.
अशा प्रकारची विपन्नावस्था येण्यापूर्वीं म्हणजे इ. स . १८७३ सालीं ता. २३ एप्रिल रोजीं जमखिंडी येथें रा. विठ्ठलराव यांचा जन्म झाला. त्यांच्या वयाचीं पहिलीं सहा वर्षें खाऊन पिऊन सुखांत गेलीं. नंतर कालचक्राचा फेरा आला ! तेव्हां लहानपणापासून हालामध्यें दिवस काढण्याची त्यांना संवयच जडली असल्यामुळें, आतां ते अडचणींस न जुमानतां आपला मार्ग पुढें काढीत जात असतात ! विठ्ठलरावांचें प्राथमिक शिक्षण व पुढें इंग्रजी शिक्षण जमखिंडीस झालें. प्राथमिक शिक्षण चालू असतांनाच, नोकरी नसलेल्या रामजी बावांनीं आपल्या स्वतःच्या मुलां-बाळांनीं भरलेल्या घरांत सहा महिन्यांची सून आणिली ! रामजीबावा हे जमखिंडी येथें मराठा जातीचे मुख्य पंच असल्यामुळें, विठ्ठलरावांचे हें लग्न कर्ज काढून त्यांना साजरें करावें लागलें, व त्याच कर्जाचा बोजा पुढें वाढून आपत्ति भोगाव्या लागल्या. विठ्ठलरावांचें शिक्षण आपल्या गांवीं ब-या रीतीनें झालें. त्यांची कुशाग्र बुद्धि, त्यांची शिकण्याची हौस व त्यांचें अभ्यासावरील लक्ष, ह्यांमुळें ते आपल्या शिक्षकांस फार प्रिय झाले; व अखेरीस आपल्या गांवांतील परशुराम भाऊ हायस्कुलांतून ते सन १८९१ सालीं प्रवेश परीक्षा पसार झाले. वरच्या इयत्तेंत असतांनाच मुलांच्या Debating Society सारख्या संस्था स्थापून तेथें ते पुढाकार घेत व त्याच वेळीं सगळ्या मुलांवर त्यांची छाप असे, असें दृष्टोत्पत्तीस आलें होतें. विठ्ठलरावांच्या शिक्षणाचा ग्रंथ येथेंच आटोपावयाचा; आणि त्यांच्यासारख्या विपन्नावस्थेंतील मुलाचें आणखी शिक्षण होणें ही कांहीं सहजसाध्य गोष्ट नव्हती. पण, त्यांचें पुढलें शिक्षण व्हावयास जमखिंडी संस्थान अप्रत्यक्षरीत्या कारण झालें आहे. म्हणजे शिक्षणासाठीं संस्थानानें मदत जरी केली नाहीं, तरी संस्थानाधिपतींच्या विलक्षण हुकुमामुळेंच विठ्ठलरावांनीं जमखिंडी सोडली.
प्रवेश परीक्षा झाल्यानंतर जेथें त्यांचें शिक्षण झालें, तेथेंच त्यांना शिक्षकाची जागा मिळाली. त्यामुळें त्यांच्या मातापित्यांना मोठा आनंद वाटला व आपल्या मुलाविषयीं त्यांना मोठा अभिमान वाटूं लागला; व शिक्षकांसही, आपल्या आवडत्या शिष्यानें आपल्याच शाळेमध्यें शिक्षक व्हावें ही गोष्ट, असाधारण वाटली. स्वतःविठ्ठलरावांना शिक्षकाचें काम मनापासून आवडतही असे, पण, असा हुशार मनुष्य शाळेंत राहण्यापेक्षां त्यानें स्कॉलरशिप घेऊन मुंबईंत व्हेटरनरी कॉलेजांत जाऊन अभ्यास करावा व नंतर त्यानें जनावरांचे डाक्टर बनावें, असें संस्थानिकांच्या मनानें घेतलें ! पण ही गोष्ट संस्थानिकांच्याच मनानें घेऊन होणारी नव्हती. सरकार स्कॉलरशिप द्यावयास तयार आहे तर, तीच स्कॉलरशिप पुण्यास आर्टस् कॉलेजांत अभ्यास करण्यासाठीं आपल्याला मिळावी, असा सरळ जबाब विठ्ठलरावांनीं दिला. हें कालचें पोर आपल्या इच्छेच्या आड जावयाची हिय्या करीत आहे असें पाहून, आपला असा अनादर झाला, अशी मनाची समजूत करून घेऊन विठ्ठलरावांस संस्थानिकांनीं नोकरीवरून दूर केलें, व त्याच रागांत त्यांच्या वडिलासही कामावरून दूर केलें; व ह्या गोष्टीमुळें विठ्ठलरावांच्या पुढच्या शिक्षणाचा मार्ग त्यांस मोकळा झाला ! विठ्ठलरावांच्या मनाला ही गोष्ट फार लागून राहिली. आपला कांहीं अपराध नसतां ह्या संस्थानिकांनीं आपला अनादर केला, म्हणून तेथें न राहण्याचा निश्चय करून त्यांनीं बेळगांवचा रस्ता धरला ! तेथें कांहीं दिवस हालांत काढून त्यांनीं अखेरीस पुणें गांठलें. पुण्यास आल्यावर प. वा. गंगाराम भाऊ म्हस्के ह्यांच्या सहाय्यानें त्यांस डेक्कन मराठा ऍसोसिएशनमधून थोडी मदत मिळूं लागली. ही मदत अर्थात् अपुरी होती. त्यामुळें आपल्या खर्चाच्या भरपाईसाठीं त्यांना शिकवण्या पत्कराव्या लागत आणि आपल्या घरची विपन्नावस्था त्यांच्या दृष्टीपुढें रात्रंदिवस असे. त्यामुळें कसरींत कसर काढून ते जेव्हां साधेल तेव्हां आपल्या घरच्या मंडळीचाही योगक्षेम चालवीत असत ! अशाप्रकारें हालअपेष्टा सहन करीत इंटरमिजिएटपर्यंत त्यांनीं गाडें ढकललें. पण पुढें परीक्षेस बसण्यासाठीं भरावयाची फीही मिळण्याची पंचाईत पुढें येऊन उभी राहिली ! आपल्या मराठेपणावर दोन चार दारीं उन्हातानांतून जाऊन त्यांनीं भिक्षा मागितली, व एका घरीं जातां मराठा म्हणवून घेऊन, हें असलें भिकारडें काम करण्याबद्दल त्यांनीं आपली चांगलीच संभावना करून घेतली !
इंटरमिजिएट परीक्षा पसार झाल्यावर विठ्ठलरावांस जरा बरे दिवस आले. श्री. सरकार सयाजीराव महाराज ह्यांनीं कृपावंत होऊन ह्यांच्या पुढल्या शिक्षणाचा भार आपल्यावर घेतला. त्यामुळें विठ्ठलरावांस आपल्या मातापितरांस शिकवणीचे पैसे घरीं पाठवून थोडें बहुत सहाय्य करतां येऊं लागलें व त्यानंतरच धर्मासंबंधानें विचार मनामध्यें जागृत होऊन ते पुण्याच्या समाजांत जाऊं लागले. प्रथम ते समाजामध्यें केवळ मौजेसाठीं, नंतर शिक्षणासाठीं व त्यानंतर समाजाशीं एकजीव होऊन जाऊं लागले. १८९८ त ते बी. ए. च्या परीक्षेंत उतरले. त्याच वर्षीं ते पुण्याच्या समाजाचे सभासद झाले. व पुढें ते एल. एल. बीचा अभ्यास मुंबईंत राहून करीत होते. रा. शिंदे वकील झाले असते, तर बडोदें संस्थानांत आज एखाद्या हुद्यावर असते. परंतु ईश्वरी नेमानेम कांहीं निराळा होता. प्रार्थना समाजांत ते जात असतांना त्यांच्या विचारांस निराळें वळण लागत होतें. त्यांच्या मनामध्यें अनेक विचार, अनेक योजना, अनेक कल्पना, अनेक शंका, प्रतिशंका येत होत्या. समाजसेवेसंबंधानें फार आस्थेनें त्यांचे विचार चालू होते. देशाची सेवा आपण करावयाची, तर ती कोणत्या बाजूनें करावी, ह्याविषयीं निश्चित विचार होतो न होतो, तों प्रार्थना-समाजांतील एक होतकरू गृहस्थ ऑक्सफर्ड येथें तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावयास जात असतां पोर्टसेड येथें मरण पावला; ह्या गोष्टीचा त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. त्यांनीं रा. रा. मोती बुलासा ह्यांच्या मागून विलायतेस जाण्याचा निश्चय केला; एल. एल. बीची परीक्षा बाजूस ठेविली व युनिटेरिअन् स्कॉलरशिप मिळावी म्हणून त्यांनीं अर्जही केला. पुण्याच्या समाजाच्या शिफारशीवरून कलकत्याच्या ब्राह्मसमाजकमिटीनें युनिटेरिअन् ऍसोशिएशनला शिफारस केली व त्यांची निवडणूकही झाली. नंतर त्यांच्या मित्रांनीं त्यांस सहाय्य केलें; वडिलांनीं त्यांस आशीर्वाद दिला; व त्यांच्या समाजबंधूंनीं त्यांचें अभीष्ट चिंतिलें. जाण्यापूर्वी गुरूवर्य डॉ. भांडारकरांनीं पुण्यास विशेष उपासना चालविली व त्यावेळीं अशाच कार्यासाठीं आपले एक तरूण सभासद जात असतां प्राणास मुकले, हें जाणून त्या प्रसंगाची आठवण ताजी असतांच हे दुसरे तरुण पुढें आले, ही ईश्वरी कृपा होय, हा विचार मनांत येऊन त्या दिवशीं गुरूवर्य अगदीं सद्गदित झाले आणि त्यांनीं विठ्ठलरावांस आशीर्वाद दिला. ता. २१ सप्टेंबर १९०१ रोजीं विलायतेस जाण्यासाठीं त्यांनीं आपल्या मातृभूमीची दोन वर्षांपुरती रजा घेतली.
विलायतेंतील कार्य.
विठ्ठलरावांनीं विलायतेस जाऊन जें कांहीं केलें, व आपल्या पुढील कार्याची तयारी त्यांनीं कशी केली, याची अल्पशी कल्पना करून देण्यापूर्वी त्यांनीं जो स्वार्थत्याग दाखविला, त्याच्यासंबंधानें दोन शब्द येथें लिहिणें अगत्याचें आहे.
आजकाल विलायतेस अभ्यासासाठीं जाणारांची संख्या कांहीं कमी नाहीं. विठ्ठलराव विलायतेस गेले, ह्यांत खरोखर कांहीं विशेष नव्हतें. परंतु गायकवाड सरकारांतून चांगली सुखाची नोकरी मिळत असतां तिचा त्याग करून, पुढील सबंध आयुष्यभर धर्मकार्यासाठीं अगदीं गरीबीमध्यें राहण्याचा निर्धार करून धर्मप्रचारक होण्यासाठीं परदेशीं जाणें, ही गोष्ट विशेष आहे. दुसरें असें कीं, ब्राह्मधर्माचा प्रसार करणा-या कित्येक प्रचारकांनीं सबंध आयुष्य अगदीं दारिद्र्यामध्यें घालविल्याचीं उदाहरणें डोळ्यांपुढें असतां, त्यांनीं प्रचारक होण्याचा निर्धार केला व युनिटेरिअन् ऍसोसिएशनच्या स्कॉलरशिपचा स्वीकार केला. त्यावेळींही कित्येकांनीं त्यांच्या संबंधानें नापसंतीचे उद्गार काढलेच ! त्यांच्या एका मित्रानें तर त्यांना सांगितलें कीं, “तूं विलायतेस जात आहेस, पण आजच कित्येक लोक तुजसंबंधानें भविष्य वर्तवूं लागले आहेत. तेव्हां तूं फार दक्षतेनें वागलें पाहिजेस.”
विलायतेस जाण्यासाठीं बोटीवर पाय ठेवल्यापासून ते परत स्वदेशीं येईतों त्यांनीं सुबोधपत्रिकेसाठीं जे लेख लिहिले आहेत त्यांत एक गोष्ट विशेष आहे. ती ही कीं, त्यांची असामान्य निरीक्षणशक्ति, (Power of observation.) या त्यांच्या ईश्वरदत्त देणगीमुळें त्यांच्या वर्णनात्मक लेखांमध्यें जी तडफ दिसते, जी संजीविनी दिसते, जें विलक्षण वर्णनसामर्थ्य आढळून येतें, तें इतरांच्या लेखांत निदान माझ्या तरी अनुभवास आलेलें नाहीं. त्यांनीं ‘जनांतून वनांत’ असा लिहिलेला लेख व वर्डस्वर्थ कवीसंबंधानें केलेलें वर्णन वाचून येथील कित्येक तरुण—अशा प्रकारचे लेख लिहिणारे, नास्तिकांमध्यें आस्तिक्यबुद्धि उदित करणारे, हताश झालेल्यांस जागे करणारे, तरुण गृहस्थ स्वदेशीं केव्हां येतात, याची मार्गप्रतीक्षा करीत होते ! कॉलेजांत अभ्यास करीत असतां विठ्ठलराव स्वस्थ बसले नाहींत. हिंदुस्थानचें दारिद्र्य व त्या दारिद्र्यामुळें दीन झालेले जे लोक त्यांना विलायतेंतील एका बाजूची सुखसोहळ्याची स्थिति पाहून ते भाळून गेले नाहींत ‘वेस्ट एन्ड’ चें वैभव सर्वच पहातात व हयाच्यायोगें पुष्कळांचे डोळे दिपून जातात. परंतु तेथें शिकत असतांना दारिद्र्याचा यथेच्छ अनुभव घेतलेल्या ह्या आमच्या मित्राचें ‘ ईस्ट एण्ड’ च्या बाजूकडील लोकांकडे लक्ष गेलें. लंडनच्या वैभवानें त्यांचे डोळे दिपून न जातां, शहराच्या दुस-या भागांत जें अठरा विस्वे दारिद्र्य मूर्तिमंत वसत आहे, त्यानें नाडलेल्यांच्या साहाय्यासाठीं तेथें कोणकोणते उद्योग होत असतात, याची त्यांनीं माहिती मिळविली; पॅरिस येथें गेले असतांना तेथील लोकांच्या मनोरंजनाच्या कल्पना किती चमत्कारिक झाल्या आहेत, याचा त्यांनीं अनुभव घेतला; नीतीच्या कल्पना किती शिथिल झाल्या आहेत हें त्यांनीं पाहिलें व धर्माचा पाया असल्यावांचून झालेली इमारत कशी भलतीकडेच झुकत चालाली आहे, याचा त्यांनीं अनुभव घेतला. ही सर्व त्यांच्या पुढील कामाची अप्रत्यक्ष तयारी होती.
ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजांतील शिक्षणक्रल पुरा झाल्यानंतर परत येण्याच्या सुमारास म्हणजे सन १९०३ च्या जुलै महिन्यांत ऍमस्टरडॅम येथें उदार धर्मवादी मंडळींची एक मोठी परिषद झाली. उदार धर्माची लाट इंग्लंडांत निरनिराळ्या स्वरूपानें पहावयास सांपडते. युनिटेरिअन् मंडळींत दिसून येणारें विचारौदार्य इतर पंथांच्या लोकांतही आढळून येतें. अशा सर्व उदार मतवादी मंडळींच्या परिषदेंत हिंदुस्थानाच्या वतीनें विठ्ठलरावांची नेमणूक झाली होती. त्या परिषदेंत त्यांनीं Liberal Religion in India ह्या विषयावर निबंध वाचला होता; त्यावरून तेथें जमलेल्या लोकांना हिंदुस्थानामध्यें उदार धर्माच्या चळवळींचें स्वरूप कोणत्या प्रकारचें आहे, त्याची चांगली कल्पना झाली. अशा प्रकारें आपल्या स्वतःचा फायदा करून घेऊन, निरनिराळ्या प्रकारचा अनुभव अनुभवून, धर्मप्रचारकाच्या कामासाठीं आपल्याला वाहून घेण्याच्या निश्चयानें, विठ्ठलराव ६ आक्टोबर १९०३ रोजीं स्वदेशीं परत आले.
येथील कामगिरी.
धर्मप्रचाराचें कार्य करण्याचा विठ्ठलरावांचा निश्चय आणि येथील प्रार्थनासमाजालाही आपल्या समाजाला एक धर्मप्रचारक असावा असें कित्येक दिवसांपासून वाटत होतें. अर्थात् शिंदे परत आल्यानंतर त्यांची धर्मप्रचारकाच्या जागीं योजना करण्यांत आली. ह्या कामास प्रारंभ केल्याबरोबर त्यांनीं हिंदुस्थानांत बराच प्रवास केला. ठिकठिकाणची स्थिति कोणत्या प्रकारची आहे, त्याचें अवलोकन केलें, व नंतर ते आपल्या कामास लागले. प्रार्थनासमाजाचे प्रचारक असतांना त्यांनीं जें कार्य केलें त्याचे दोन विभाग करितां येतील. एक धार्मिक व एक सामाजिक—धार्मिक. माझी स्वतःची समजूत अशी आहे कीं, आज रा. शिंदे हे जरी कित्येक कारणांमुळें प्रार्थनासमाजाचे प्रचारक नाहींत, तरी ते जें काम आज करीत आहेत, तें दिसावयास जरी सामाजिक ठरतें, तरी त्याचें वास्तविक स्वरूप सामाजिक—धार्मिक आहे. तें कसें त्याचा उल्लेख आतां पुढें होईलच.
धर्मप्रचारक असतांना मुंबईच्या प्रार्थनामंदिरांत त्यांस वारंवार धर्मपर व्याख्यानें द्यावीं लागत. त्यांपैकीं अलीकडील कांहींकांचा ह्या संग्रहामध्यें समावेश झाला आहे. त्यांत विशेष काय आहे त्याचें वर्णन येथें करण्याची आवश्यकता नाहीं. वाचकांनीं तीं मननपूर्वक वाचावीं म्हणजे त्यांतील विशेष प्रत्यक्ष अनुभवता येईल. प्रार्थनासमाजाचें सर्व कार्य आतां तरुण पिढीवर येऊन पडत आहे, त्यांच्यामध्यें अधिक जागृति व्हावी म्हणून त्यांनीं ‘Young Theists Union’ नामक संस्था स्थापिली. तरुणांस एकत्र करण्यास, त्यांच्या विचाराविषयीं सढळ चर्चा करावयास, उपासना करण्याची संवय लावावयास व उपदेश करण्याची तयारी करण्यास, त्याचप्रमाणें पवित्र, उदार धर्माचा एक प्रवर्तक ह्या नात्यानें आपल्यावर किती जबाबदारी आहे, त्याची जाणीव उत्पन्न करण्यास ही संस्था एक उत्तम साधन आहे. कित्येक वर्षे रा. शिंदे हेच त्या संस्थेचे प्रमुख होते.
टपालाच्याद्वारें धर्मप्रसाराचें कार्य.
विलायतेंत असतांना विठ्ठलरावांच्या हें लक्षांत आलें कीं, टपालखातें हें धर्मप्रसाराचें कार्य करण्याचें उत्तम साधन आपल्या देशींही होण्यासारखें आहे. तेथें हें काम स्त्रिया करितात. लहान मोठीं पुस्तकें एकत्र करून तीं जिज्ञासूंना वाचावयास द्यावयाचीं, त्यांच्या ज्या कांहीं अडचणी असतील त्या आपण सोडविण्याचा प्रयत्न करावयाचा, नाहींतर कोणा अधिकारी पुरुषाची गांठ घालून द्यावयाची, वर्तमानपत्रांमध्यें जाहिराती देववून आपलीं पुस्तकें लोकांच्या दृष्टीपुढें आणण्याचा निश्चयानें प्रयत्न करावयाचा. हा अत्यंत लाभदायक उद्योग टपालाच्या साहाय्यानें तेथें स्त्रिया करितात, हें पाहून विलायतेंत असतांना येथील भगिनींना अनावृत पत्र लिहून त्यांनीं हें काम आपल्यांकडे घ्यावें असें सुचविलें; पण, स्त्रियांपैकीं कोणी पुढें न आल्यामुळें रा. वासुदेवराव सुखटणकर यांनीं त्या कामास येथें मोठ्या उत्साहानें आरंभ केला. विलायतेंत पोष्टाच्याद्वारें शेंकडों लोकांना उदारधर्माची ओळख होते त्याप्रमाणें येथेंही होऊं लागली. रा. सुखटणकरांचा किती तरी वेळ शंकितांचें समाधान करण्यांत जाऊं लागला व त्यामुळें शेंकडो लोकांना उदारधर्माच्या चळवळीची व प्रार्थनासमाजासारख्या संस्थेची माहिती झाली. रा. सुखटणकर विलायतेस गेल्यावर विठ्ठलरावांनीं तें काम आपल्याकडे घेतलें. मिशनच्याद्वारें कांहीं लहान लहान पुस्तकें प्रसिद्ध केलीं व अल्प किंमतीस चांगलीं चांगलीं पुस्तकें विकून त्यांनीं उत्तम पुस्तकांचा प्रसार केला.
तरुण पिढीकडे त्यांचें साहजिक लक्ष असल्यामुळें, त्यांनी कांहीं काल तरुणास एकत्र करून कांहीं धर्मपर ग्रंथ वाचले व त्यांचें अवश्य तेथें स्पष्टीकरण केलें. परंतु हें कार्य फार दिवस टिकलें नाहीं.
धर्मपरिषद.
१८८८ सालीं राष्ट्रीय सभेच्या वेळीं अलाहाबाद येथें एकेश्वरी मताची बरीचशी मंडळी जमली असल्याचें आढळून आलें व त्याच वेळीं रा. ब. महादेव गोविंद रानडे ह्यांच्या आश्रयाखालीं एक परिषद् भरविण्यांत आली; व पुढें दर वर्षी अशीच परिषद् भरावी असें ठरलें. व त्याप्रमाणें अशी परिषद् भरत असे. परंतु मधून मधून तिचे संबंधानें थोडी शिथिलताही येत असे. प्रथमतः आर्यसमाजाची मंडळीही परिषदेंत सामील होत असे, परंतु नंतर ही परिषद् ब्राह्म व प्रार्थनासमाज—मतानुयायांची व त्यांचे हितचिंतक यांचीच झाली. १९०४ सालीं राष्ट्रीय सभेच्या वेळीं परिषदेची बैठक मुंबईस झाली व ती ब-याच मोठ्या प्रमाणावर झाली. तिचें बरेंचसें श्रेय रा. विठ्ठलराव यांस दिलें पाहिजे. ह्या प्रसंगीं प्रीतिभोजन झालें व त्या वेळीं गायकवाड सरकार श्री. सयाजीराव महाराज हजर होते. १९०४ सालापासून त्या धर्मपरिषदेस विशेष स्वरूप प्राप्त झालें. पुढें कित्येक वर्षेपर्यंत विठ्ठलराव ह्या परिषदेचे सेक्रेटरी असत व ज्या प्रांतांत परिषद् भरे, त्या प्रांतांतील एक गृहस्थ त्यांच्या जोडीला काम करावयास असे.
थीइस्टिक डिरेक्टरी.
हिंदुस्थानांत सर्व प्रांतीं प्रार्थना व ब्राह्म समाजाची स्थापना झालेली आहे, व सर्वत्र ब्राह्मधर्माचे अनुयायी आहेत. परंतु हे जे निरनिराळे समाज सर्वत्र पसरले आहेत, त्यांच्यासंबंधानें माहिती देणारा एक लहानमोठा ग्रंथ नाहीं. ही उणीव लक्षांत घेऊन १९०५ सालीं बनारस येथें भरलेल्या परिषदेंत अशा प्रकारची डिरेक्टरी तयार करण्याचें काम रा. विठ्ठलराव यांचेवर सोंपविण्यांत आलें. ह्या कामास त्यांनीं जरी लागलाच प्रारंभ केला, तरी अनेक अडचणींमुळें हें पुस्तक आजवर बाहेर निघालें नाहीं. परंतु आतां थोड्याच दिवसांत तें प्रसिद्ध होईल. ह्यांतल्या पहिल्या भागांत ब्राह्म व प्रार्थना-समाजांशिवाय जगांतील निरनिराळ्या देशांत चालू असलेल्या उदार धर्मचळवळींसंबंधीं कांहीं लेख असून न्या. मू. सर नारायणराव चंदावरकर ह्यांनीं प्रस्तावना लिहिली आहे. दुस-या भागांत देशांतील सर्व समाजांसंबंधानें रा. विठ्ठलरावांनीं गोळा केलेली तपशीलवार माहिती संग्रहित करण्यांत आली आहे.
सामाजिक-धार्मिक कामगिरी.
लंडनहून परत आल्यावर श्री. गायकवाड सरकारांनीं आपल्या प्रांतांत अंत्यजांसाठीं स्थापलेल्या कांहीं शाळा पाहण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावरून विठ्ठलरावांनीं बडोद्यांतील चार शाळा तपासून आपलें मत महाराजांना कळविलें. नंतर अहमदनगर येथें पूर्वींपासून स्वोन्नतीसाठीं सोमवंशीयसमाज नांवाची संस्था जे प्रयत्न करीत होती, तिकडे यांचें लक्ष लागलें. पूर्वींपासून ह्या लोकांच्या अत्यंत हीन स्थितीसंबंधानें यांच्या ठिकाणीं उद्वेग उत्पन्न झालेला होताच. सहानुभूतीचें बाळकडू त्यांस त्यांच्या माता-पितरांनींच पाजिलें होतें. साधुसंत, फकीर यांस त्यांच्या घरांत मुक्तद्वार असे. अशा ह्या दीन लोकांसंबंधानें कांहीं तरी जागृति समाजांत राहण्यासाठीं येथील सोशल रिफार्म ऍसोसिएशनपुढें त्यांनीं १९०५ सालीं एक व्याख्यान दिलें. त्या व्याख्यानांत अत्यंजांसंबंधानें सविस्तर माहिती त्यांनीं दिली होती; व तेंच व्याख्यान इंडियन सोशल रिफॉर्मरमध्यें प्रसिद्ध करण्यापूर्वी कित्येक दिवस खानेसुमारीचे सरकारी रिपोर्ट व इतर रिपोर्ट यांचें परिशीलन करून अवश्य ती माहिती ते गोळा करीत होते. अखेरीस नीच मानिलेल्या लोकांच्या उन्नतीसाठीं उच्च वर्गांतील लोकांत विशेष जागृति झाल्यावांचून त्यांचेसंबंधानें होत असलेल्या अन्यायाची व्याप्ति किती मोठी आहे, हें लोकांच्या लक्षांत यावयाचें नाहीं, असें मनांत येऊन त्यांनीं ह्या चळवळीस हश्य स्वरूप आणण्याचा निश्चय केला व प्रार्थना-समाजाचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास ह्यांनीं १ हजार रुपयांची देणगी दिल्यानंतर रा. शिंदे यांनीं परळ येथें ना. सर नारायणराव चंदावरकर यांच्या हस्तें १८ आक्टोबर १९०६ रोजीं लहान प्रमाणावर अस्पृश्य वर्गासाठीं एक शाळा उघडली, व लवकरच न्या. मू. सर नारायणराव चंदावरकर ह्यांनीं अध्यक्षस्थान व शेठ दामोदरदास यांनीं उपाध्यक्षस्थान पत्करल्यावर, Mission to the Depressed Classes in India ही संस्था त्यांनीं स्थापन केली. अस्पृश्य-वर्गांच्या उन्नतीसंबंधाच्या चळवळीस रा. शिंदे ह्यांनीं प्रारंभ केला असें म्हणणें सर्वथैव अन्यथा होणार नाहीं. हा प्रश्न सार्वजनिक रीतीनें पुढें आणण्याचा मान जरी सामाजिक परिषदेस आहे, व प. वा. न्या. मू. रानडे यांचें ह्या विषयाकडे फार लक्ष असे हें जरी सर्वश्रुत आहे, तरी आज सगळ्या मुंबई इलाख्यांत व बाहेरही जी चळवळ सुरू झाली आहे व खुद्द अस्पृश्य वर्गामध्यें जी जागृति उत्पन्न झाली आहे, तीस प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीनें रा. शिंदे कारण झाले आहेत, असें म्हणणें हें वस्तुस्थितीस अगदीं धरून आहे, ‘बहिष्कृत भारत’ ह्या मराठी पुस्तकानें, Untouchable India ह्या इंग्रजी पुस्तकानें, व त्यांच्या नित्याच्या सफरी, हितचिंतकांशीं होणारीं संभाषणें, निरनिराळ्या ठिकाणचीं व्याख्यानें, वर्तमानपत्रांतील लेख, ह्यांनीं किती काम केलें आहे त्याची साक्ष मंडळीचें वाढतें काम, वाढता व्याप, वाढता खर्च व वाढती जबाबदारी, ह्यावरूनच होण्यासारखी आहे. त्यांच्या कामाचा विस्तार किती व कसकसा वाढला आहे, हें आक्टोबर महिन्यांत पुण्यास जी परिषद् भरली होती त्यावेळीं रा. शिंदे यांनीं जें प्रास्ताविक भाषण केलें, त्यांत त्यांनीं फार उत्तम रीतीनें सांगितलें आहे.
उपसंहार.
अशा प्रकारचें काम एक स्वतः मागासलेल्या जातींतील गरीब तरुण करूं शकतो, याचें रहस्य कशांत आहे, याचा विचार आमच्या राष्ट्रांतील तरुणांनीं अवश्य करण्यासारखा आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या कामावरून असें दिसतें कीं, त्यांचा धाडसी स्वभाव, त्यांची कल्पकता व त्यांचें कर्तृत्त्व हे गुण फार वरच्या दर्जाचे आहेत. अनेक कारणांमुळें प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक असें जरी त्यांस आज म्हणवून घेतां येत नाहीं, तरी हीन मानिलेले लोक हे आपले बंधु आहेत, ही भावना अंतःकरणांत दृढ करून घेऊन, ते जें काम करीत आहेत, त्याचा पाया धर्म हाच आहे. त्यांच्या शाळांतून धर्मशिक्षण देण्यांत येतें. भजन होतें, उपासना होतात व सद्धर्माची गोडी लावण्यासाठीं अनेक प्रकारें प्रयत्न होत असतात. त्यांच्या कर्तृत्वशक्तींत असा गुण आहे कीं, त्यांची कल्पकता व त्यांचें योजनाचातुर्य ह्यांमुळें त्यांची छाप कर्त्या माणसांवर सहज पडते ! त्यांचीं मातापितरें जुन्या वळणांतलीं, साधुसंत व फकीर यांच्याकडील त्यांचा ओढा जुन्या रीतीचा होता, तरी तींच आपल्या चिरंजिवाचे पहिले सहाय्यक बनले, त्यांच्या दोघी बहिणींनीं व पत्नीनेंही ह्याच कार्यासाठीं आपल्याला वाहून घेतलें. त्यांचें तीर्थरूप अखेरपर्यंत त्यांस सहाय्य करीत होते व ह्या कामांत गढून गेलेले असतांनाच १९१० सालीं प्रिय पत्नीचा वियोग झाल्यानंतर कांहीं महिन्यांनीं त्यांचें देहावसान झालें. आतां गेल्या आक्टोबर महिन्यांत पुढील कार्यक्षेत्र बरेंच वाढविल्याचें जाहीर करण्यांत आलें. आतां त्यांनीं ह्या आपल्या कार्यास शेठ रतन टाटा, ना. फाजलभाई करिमभाई, शेठ नरोत्तम मुरारजी, ना. सर चिनूभाई माधवलाल, एस.एन.पंडित, एच.ए. वाडीया वगैरे निरनिराळ्या जातींच्या प्रमुख गृहस्थांच्या सहानुभूतीची भर पांडली आहे; व परवां होळकर सरकारांनीं कृपावंत होऊन संस्थेस २० हजारांची देणगी परलोकवासी महाराणी पु. श्लो. अहल्याबाई होळकरांच्या नांवानें देण्याचें अभिवचन दिलें आहे. सालिना २६ हजार रुपयांचा खर्च सोसून १५ शाखा आतां ही मंडळी चालवीत आहे.
शेवटीं आज हे माझे मित्र जें काम करीत आहेत, त्याचें बरेंचसें श्रेय श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांस देणें रास्त आहे. म्हणून मी त्यांचे कृतज्ञबुद्धीनें अत्यंत नम्रतापूर्वक आभार मानतों. एका अगदीं गरिबींत असलेल्या तरुणास विद्यार्थीवेतन देऊन त्यांनीं शिकविलें, पुढें त्यानें परीक्षा पास झाल्यावर आपल्या संस्थानांत नोकरी करावी असें ठरलेलें असतांना, त्यास प्रार्थनासमाजाचा प्रचारक होतां यावें म्हणून ती अट महाराजांनीं काढून घेतलीः विलायतेस जातांना मदत केली व येतांना भाड्याची व्यवस्था केली ! पुढें आपल्या संस्थानांतील शाळा पहावयास महाराजांनींच आमंत्रण दिलें ! तेंव्हां आज आपल्या देशाला हें व अशीं दुसरीं कामें करण्यासाठीं जरी आणखी पुष्कळसे शिंदे हवे आहेत, तरी महाराजसाहेबांच्या कृपेमुळें हे जे तरुण कर्तृत्ववान् व योजक प्रचारक आज लाभले आहेत, त्यांस परमेश्वरानें दीर्घायु करावें, त्यांस पुष्कळ सहाय्यक मिळावेत, व अस्पृश्य लोकांस हीनावस्थेप्रत पोहोंचविल्याचा उच्च लोकांना लागलेला डाग, त्यांच्या हातून साफ धुऊन जावा, व त्यांची कर्तृत्वशक्ति दिवसेंदिवस वाढतच जावी, अशी परमेश्वरापाशीं प्रार्थना करून हा चरित्रात्मक त्रोटक लेख येथेंच संपवितों.
मुंबई, ता. २० डिसेंबर १९१२.