समाजसेवेचीं मूलतत्त्वें
(सोमवार ता. ५ आगस्ट १९१२ रोजीं मुंबई येथील समाजसेवासंघा (Social Service League) मार्फत प्रार्थनासमाजाच्या दिवाणखान्यांत रे. डॉ. मॅकिकन यांच्या अध्यक्षतेखालीं झालेल्या व्याख्यानाचा सारांश.)
अध्यक्षसाहेब, भगिनींनो व बंधुजनहो,
प्रथम मराठीतच बोलण्याचा आग्रह धरल्याबद्दल मला आपली माफी मागितली पाहिजे. माझ्या आईच्या भाषेत, देशाच्या भाषेत बोलताना मला साहजिकच घरात असल्याप्रमाणे मोकळे वाटते. परंतु ह्यामुळे आपणांपैकी ज्यांची मराठी ही मायभाषा नसेल त्यांची गैरसोय होणार आहे. विशेषतः ह्या बाबतीत अध्यक्षांची मला माफी मागितली पाहिजे. तथापि अध्यक्षसाहेबांस मी मराठीत जोरदार शुद्ध भाषेत उपदेश करिताना ऐकले आहे. असो. इंग्रजीसारख्या जगन्मान्य भाषेचा प्रसार करणे हे जसे समाजसेवेचे एक अंग आहे, तसेच किंबहुना अधिकच देशी भाषेला उन्नत स्वरूप देणे हेही समाजसेवेचेच एक अंग आहे. शिवाय तरुणपणी परकी भाषेतून व्याख्यान ऐकताना विचारापेक्षा भाषेकडे अधिक लक्ष जाते. फ्रान्समध्ये असताना, फ्रेंच भाषेतील व्याख्यान अर्थ कळल्याशिवाय ऐकणे मला गोड वाटले. परकी भाषा गोड लागते म्हणून ती ऐकण्याची चटक लागते, ही चटक नको. भाषेपेक्षा विचाराकडे लक्ष पाहिजे.
आजचा विषय आपल्या राष्ट्रात नवीन आहे. इंग्रजी जाणणारांना तो थोडा फार अवगत आहे. परंतु निव्वळ मराठी जाणणारांना तो केवळ अपरिचित आहे. पाश्चात्य देशांतही हा विषय नवीन आहे. भूतदया, प्रेम ह्या कल्पना फार जुन्या आहेत. परंतु समाजसेवेची कल्पना नवीन आहे. आधुनिक दिशेने संघटित पायावर प्रयत्न करण्याची कल्पना नवीन आहे. आपल्याकडील सर्व चळवळी आपण नवीन उमेदवारासारख्या करतो. आपणांस त्याबद्दल उमेद असते. राजकीय चळवळीतसुद्धा नवशिकेपणा दिसतो. फुरसतीच्या वेळी कालक्षेपार्थ सार्वजनिक गोष्टीत मन घालणे वगैरे लक्षणे नवशिकेपणाचीच म्हटली पाहिजेत. नुकताच मी कर्नाटकात लोकांची मदत मागावयास गेलो होतो, त्यावेळी अपेक्षेप्रमाणे मला पैसे मिळू शकले नाहीत. कारण म्युनिसिपल निवडणुकीत मते मिळविण्यासाठी पुष्कळांनी दोन तीन हजारांपासून दहा दहा हजारांपर्यंत रुपये आगाऊ खर्च केले होते. व्यापार केला, उद्योग केला, पैसे मिळविले म्हणजे मग म्युनिसिपालिटीत जाण्याची अहमहमिका उत्पन्न होणे हे उमेदीचे लक्षण आहे. परुंतु मते मिळविण्याकरिता जो उत्साह व जो पैसा खर्च होतो, त्या मानाने निवडून आल्यावर उत्साहाने काम केल्याचा अनुभव क्वचितच येतो.
राजकीय चळवळीतसुद्धा जर ही उमेदवारी, मग समाजसेवेत काय ? केवळ अनुकरण ! निराशेचे उद्गार काढण्याचा माझा हेतू नाही. हल्लीच्या लहानसहान प्रयत्नांचेही कौतुक केले पाहिजे. मूल प्रथम चालू लागले म्हणजे आई त्याला पाय पाय सोन्याचे पाय म्हणून त्याचे कौतुक करीत असते. आपले हल्लीचे पहिले धडेही सोन्याची पावले होत, तथापि हे विसरता कामा नये की ह्या सोन्याच्या पावलांना धडधाकट माणसाच्या चालीची कधीही सर येणार नाही.
समाजसेवा ही सामाजिक सुधारणेहून (Social Reform) थोडी भिन्न आहे. समाजसत्तावादाहूनही (Socialism) ती भिन्नच आहे. ही कल्पना, भावना नवीन असल्याचे आपणांस सांगितलेच आहे. ही भावना असली तरी आमच्या ह्या जरठ देशाला पाश्चात्यांपेक्षाही तिची अधिक जरुरी आहे. कारण आमच्या ह्या म्हाता-या देशाला तरुणांची व्यसने जडत चालली आहेत. एकपक्षी खेड्यापाड्यांतून दोन तीन हजार वर्षांच्या जुन्या, दुष्ट चालींचा रोग जडलाच आहे. व दुसरेपक्षी मुंबई, कलकत्त्यासारख्या शहरांत पाश्चात्य देशांतील संकटे व व्यसने भरपूर प्रमाणात दिसू लागली आहेत. मिळून आपल्याकडे दुहेरी संकटे आहेत. मद्यपानाचे संकट नवीन आहे. वेदात मद्यपान नाही असे माझे म्हणणे नाही. मी काही वेदाचा आग्रही, अभिमानी नाही. आगगाड्या, तारायंत्रांप्रमाणे दारूही वेदात आहे. आज आगगाडीत दारू-मक्तेदाराकडे नोकर असलेल्या एका माणसाची गाठ पडली; मद्यपाननिषेधाचा उपदेश करणा-याकडून मिळणे कठीण, अशी माहिती त्याच्याशी झालेल्या संभाषणात सहज मिळाली. तो स्वाभाविक अभिमानाने आपल्या व्यापाराचे वर्णन करीत होता. तो म्हणाला, “आमची मोठी कंपनी आहे. काही नाही तरी २० लाख रुपये भांडवल आमचे ह्या धंद्यात गुंतले आहे. ग्वाल्हेर, भोपाळ, हैदराबाद, कोल्हापूर, कुलाबा, रत्नागिरी, ठाणे वगैरे अनेक ठिकाणी आमचे हे भांडवल गुंतलेले आहे. आमच्या कंपनीत किती तरी मोठमोठ्या किताबांची मंडळी आहेत. इंग्लंडातदेखील त्यांचे वजन आहे.” अशा ह्या किताबाच्या, वजनदार, सुशिक्षित, सुधारलेल्या, मिळालेल्या पैशाचा अगदी नवीन पद्धतीने उपभोग घेण्याचे ज्ञान असलेल्या, अर्थ संपादनेच्छू मंडळीच्या हातांत हा व्यापार आहे तो कायदेशीर रीतीने होत असतो. ह्या बलाढ्य मंडळीपुढे मद्यपाननिषेधकांचा काय टिकाव लागणार ! अमेरिकेतील ट्रस्ट्रीप्रमाणे आमच्या इकडील हे मद्यपानाचे संकट अनिवार्य झाले आहे. जुनी संकटेही आहेतच. दोन-दोन हजार वर्षांचे संकटांचे मुरंबे आमच्या ह्या जुन्या देशात साठवून ठेविलेले आहेत. तेव्हा समाजसेवेची भावना नवीन असली तरी तिची जरुरी अत्यंत आहे.
आज व्यावहारिक बाजूपेक्षा उपत्तीच्या, मीमांसेच्या दृष्टीनेच मी ह्या विषयाचा विचार करणार आहे.
समाजसेवासंघ (Social Service League) काही आजच बंद होत नाही. तेव्हा व्यावहारिक बाजू सांगण्याचे पुढे प्रसंग येतीलच. प्रथम व्याख्या, नंतर व्याप्ती, नंतर विभाग पाहू. अगोदर सेवेचा विचार करू. सेवेमध्ये काय काय अंतर्भूत होते (१) प्रथम प्रेम, पण नुसते प्रेम म्हणजे सेवा नाही. प्रेम हजार मैलांवरूनही करता येते. सेवा होण्यास प्रेम असून शिवाय (२) प्रयत्नही पाहिजे. तथापि एवढ्यानेही बरोबर सेवा होत नाही. प्रेम व प्रयत्न असून शिवाय (३) प्रयत्नात सातत्यही पाहिजे. ही सेवा झाली. पण आपला आजचा विषय समाजसेवा अथवा सामाजिक सेवा हा आहे. भूतदयेची कामे करणे, पाणपोई ठेवणे, झाडे लावणे वगैरे व्यक्तिविषयक सेवेत येतात. वस्तुतः ती सेवेत येतच नाहीत. व्यक्तिविषयक सेवेपेक्षा सामाजिक सेवा भिन्न आहे. सामाजिक सेवा म्हणजे संघटनेने बद्ध झालेल्या समुदायाने समाजाची प्रेम, प्रयत्न व सातत्य ह्यांचे योगाने चालविलेली सेवा. म्हणजे सामाजिक सेवेला समुदाय पाहिजे, संघटना पाहिजे, आदर्श पाहिजे. एकंदरीत समाजसेवेला पाच अंगांची जरुरी आहे : (१) प्रेम, (२) प्रयत्न, (३) सातत्य, (४) समुदाय व (५) संघटना व शिवाय आदर्शही पाहिजे.
प्रथम प्रेम म्हणजे काय ? प्रेमाच्या कल्पनेचा ख्रिस्ती धर्मात चांगला विकास पहावयास सापडतो. आपल्याकडेही प्रेमाची कल्पना आहे, परंतु तिची उत्क्रांती चांगली झालेली नाही. निदान त्या उत्क्रांतीचा इतिहास तरी उपलब्ध नाही. केव्हा केव्हा आमची प्रेमाची कल्पना ‘अवघे देखे जन ब्रह्मरूप’ ह्या उच्च कोटीला पोहोचते. परंतु ह्या भावनेचा आपलेकडे व्यवस्थित विकास झालेला दिसत नाही. तेव्हा आपण ख्रिस्ती धर्मातील ह्या कल्पनेचा विकास पाहू. प्रथम पाचव्या शतकातील सेंट ऑगस्टिन ह्यांच्या प्रेमात वैराग्य कडकडीत दिसते. ईश्वरात पूर्ण लय व्हावा म्हणून बाह्य जगताविषयी वैराग्य. ह्यानंतरच्या सेंट बर्नार्ड ह्यांच्या प्रेमात वैराग्य नव्हते असे नाही. परंतु ख्रिस्तावरील प्रेम व पूज्यबुद्धी त्यात अधिक स्पष्ट दिसून येत होती. त्यानंतर प्रेमाची तिसरी अवस्था सेंट फ्रान्सिसमध्ये दिसून येते. सेंट फ्रान्सिस ह्यांनी दुःखरूपी लोखंडाला सुखरूपी सुवर्ण केले. गरीबांत जाऊन गरीब व्हावे, दीनांत दीन बनावे, व पाप्यांत जाऊन त्यांनी पाप का केले हे पहावे अशी त्यांची वृत्ती होती. ह्या तिन्ही पाय-यांपेक्षा प्रेमाचा पूर्ण विकास सांप्रतचे मुक्तिफौजेचे उत्पादक जनरल बूथ ह्यांचे ठायी दिसून येतो. त्यांचे अंगावर तुम्हांस फाटक्या छाट्या दिसावयाच्या नाहीत. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे वैराग्याचे बाह्य चिन्ह काहीच दिसावयाचे नाही. त्यांच्यामध्ये तुम्हांला अखंड धडपड, चळवळ, प्रवृत्ती दिसून येईल. सारांश, प्रेम म्हणजे उत्साह, उदासीनता नव्हे, प्रेम म्हणजे प्रवृत्ती, निवृत्ती नव्हे, प्रेम म्हणजे जीवन, जीवनाचा कंटाळा नव्हे, सेंट ऑगस्टिनमध्ये प्रेमाच्या भावनेचा उद्भव दिसतो. जनरल बूथ ह्यांचे ठायी तिचा पूर्ण विकास दिसतो. वैराग्याऐवजी म्हणजे जीवनाच्या कंटाळ्याऐवजी “तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हांसी” असे वाटले पाहिजे. प्रेमाच्या भावनेचा—मैत्रीच्या भावनेचा पूर्ण विकास आपल्याकडे आपणांस बुद्ध भगवानांचे ठायी झालेला दिसून येतो. त्यांनी जे मैत्रीचे जीवन स्वीकारले, ते असे की, ते पाहूनच लोकांनी बुद्धधर्मी व्हावे. प्रेम ही मनोवृत्ती स्वयंभू, अहेतुक आहे. प्रेम ही कामना आहे. आत्म्याचे प्रसरण आहे. निष्काम प्रेम हा शब्दच मला कळत नाही, माझे मगजात शिरत नाही. आपण प्रेम करतो ते आपण सुखी व्हावे म्हणून नव्हे, जग सुखी व्हावे म्हणूनही नव्हे, ते स्वयंभू आहे, निर्हेतुक आहे. मातीच्या देहामध्ये प्रेमाची लहर, आत्म्याची स्वतंत्रता, किंबहुना त्याचे अस्तित्वही दाखविते. बर्गसन् आपल्या “Matter and Memory” ह्या ग्रंथात मेमरी—स्मरणशक्तीवरून आत्म्याची उपपत्ती लावितात. प्रेमावरूनही आत्म्याची उपपत्ती लाविता येईल. प्रेम हे मातीचे कार्य नव्हे, जड जग, मृण्मय जग—ह्याचे उत्क्रमण किंवा विकसित स्वरूप हे नव्हे.—प्रेमाचा तरंग—लाट पाहिल्याबरोबर दुस-याच जगाचा—आत्मिक जगाचा—प्रत्यय वाटतो. त्याचेच हे स्वरूप.
अशा ह्या प्रेमास प्रयत्नांची व सातत्याची जोड मिळाली म्हणजे सेवा झाली व समुदायाने ती संघटनेने अंमलात आणण्यास सुरुवात केली म्हणजे ती समाजसेवा झाली. आपल्या समाजसेवेत ही सर्व मूलतत्त्वे आहेत की एकादे कमी अथवा कमजोर आहे ह्याचे नेहमी निरीक्षण ठेविले पाहिजे, उणीव दिसली की ती लगेच भरून काढिली पाहिजे.
ज्या सुधारलेल्या आहेत, सुशिक्षित आहेत, विशिष्ट उद्देशाने प्रेरित झाल्या आहेत अशा सद्यःकालीन शेकडो विभूती आहेत. त्यांच्या योग्यतेचे परिमाण (Quantity) घ्यावयाचे नाही. गुणदृष्ट्या विचार करावयाचा.
अशा विभूतींकरितासुद्धा समाजसेवेची जरुरी आहे. मात्र ती भिन्न प्रकारची पाहिजे. रानटी माणसांस नियमन, नियंत्रणा, प्रेमयुक्त नियंत्रणा पाहिजे व विभूतींस साह्य स्वातंत्र्य पाहिजे. कारण त्यांचे ठिकाणी साधनसंपत्ती भरपूर असते. त्यांस फक्त स्वातंत्र्याची हवा पाहिजे. रेशमाच्या किड्यांप्रमाणे त्यांस आपल्याभोवती स्वातंत्र्यरूपी कोश बनवू दिले पाहिजेत. रानटी लोकांस ह्याविरुद्ध नियंत्रणा पाहिजे. त्यांचे राज्य घ्यावे, त्यांजवर राज्य करावे, त्यांस सुधारणेच्या चक्रात आणावे, ही युद्धाची चांगली बाजू आहे. त्यांच्यातही साधनसंपत्ती बीजरूपाने असते. ती मारता कामा नये. साधकबाधक विचार करून त्यासही केव्हा केव्हा मोकळे सोडावे लागते.
ही दोन्ही टोके अपवादक आहेत. बाकी मुख्य मोठे दोन वर्ग राहिले. एक बहुजनसमाज व पांढरपेशे. हे वर्ग ह्या दोन टोकांच्या अनुक्रमे जवळजवळ आहेत. तेव्हा बहुजनसमाजास नियंत्रणा अधिक हवी व पांढरपेशास स्वातंत्र्य अधिक हवे. समाजसेवेची व्याप्ती सर्व मनुष्यजातीएवढी आहे. भूतदयेचा व्याप फारच मोठा आहे. त्यात पशुपक्ष्यांचाही समावेश होतो. आपल्या आजच्या विषयास सर्व मनुष्यजातीइतके मर्यादित स्वरूप बस्स आहे. ह्यापेक्षा कमी व्याप्ती मात्र चालावयाची नाही. राष्ट्र, जात वगैरे काही एक तिच्या आड येता उपयोगाचे नाही. व्यावहारिक सोयीसाठी पाहिजे तर हिंदुस्थान, मुंबई, गिरगाव असे तिचे क्षेत्र मर्यादित करा. परंतु उपपत्तीच्या दृष्टीने ते क्षेत्र आकुंचित होता कामा नये. व्याप्तीस विघातक होत असेल, तर ती समाजसेवा नव्हे. इतरांच्या आड न येता प्रयत्न केला पाहिजे, आता एकाच संघाला हे सर्व करता येणार नाही हे उघड आहे. आता ह्या व्याप्तीचे मनुष्याप्राण्याचे विभाग करू—
(१) जवळ जवळ जनावरांप्रमाणें असलेलीं जंगली व रानटी माणसे, ह्यांस मनोवृत्ती आहे, मेंदू आहे, परंतु त्यांची उत्क्रांती झालेली नाहीं.
(२) साधारण सुधारलेल्या देशांतील बहुजनसमाज.
(३) पांढरपेशा वर्ग.
(४) विभूती - विभूती म्हणजे अकबर, ज्युलियस, प्रसिद्ध कवी गटे अशी मोठी माणसेच घ्यावयाची नाहीत, तर ज्यांच्यामध्ये काही विशेष गुण आहेत, ज्यांच्याकडून काहीतरी असाधारण कार्य घडत आहे त्या विभूतीच समजाव्या. वरिष्ठ जातीस अधिक स्वातंत्र्य हवे आहे. केव्हा केव्हा हे स्वातंत्र्य कायद्याने मागावे लागते. बहुजनसमाजास अथवा मागासलेल्या वर्गास नियंत्रणा अधिक पाहिजे आहे. उदाहरणार्थ, अशी नियंत्रणा नसल्यामुळेच खालील जातीत मद्याचा खप बेताल होऊ लागला आहे. मजुरी मिळू लागून पैशाचा पुरवठाही होत आहे. ह्या वर्गास पैसे जवळ झाल्यास त्यांचे काय करावे हे माहीत नसते. व्याजाचा विचार शिवलेलाच नसतो. खिशास पैशाचे ओझे होऊ लागले म्हणजे त्यांनी काय करावे ? अर्थात जवळच असलेल्या मद्याच्या पुरवठ्याकडे त्यांची नजर वळते. परळपासून माटुंगा रोडकडे जाण्याचा रस्ता आहे, त्याने मी जात होतो. त्या निर्जन भागाची शोभा पहात जाताना मला मध्यंतरी एकच घर दिसले. हे घर कसले होते ? दारूचा गुत्ता. गुत्त्यात विजेचे पंखे ठेवणे, गाणी म्हणण्याची व्यवस्था ठेवणे वगैरे सर्व चातुर्याच्या गोष्टी करावयाला सुधारलेले सुशिक्षित मक्तेदार विसरत नाहीत ! तेथे किती उपदेश केला, पिकेटिंग केले, तरी काय होणार ? ह्या कामास नियंत्रणाच पाहिजे. ती ज्यांचे हाती आहे त्यांनी तिचा उपयोग करून पहावा. तिच्या अभावी आज आपण निदान प्रॉव्हिडेंट सोसायटीज तरी काढल्या पाहिजेत. मुळाशी उपचार केले पाहिजेत. नुसत्या हस्तपत्रकांचा काय उपयोग होणार ? गुत्त्यात सुंदर गाणी ऐकू येत आहेत, तोपर्यंत वेदापासून तो केसरीपर्यंतचे उतारे एकत्र करून नुसती हस्तपत्रके वाटून काय होणार ? करिता ज्यांचे हाती सत्ता आहे त्यांच्याशी सहकार्य झाले पाहिजे. राज्यकर्ते व धर्मार्थ समाजसेवा करणारे ह्यांच्यात सख्य पाहिजे, नाहीतर तंटे होतील. नवीन संकटे उत्पन्न होतील. तथापि हे सर्व करीत बसणे हे त्यांचे काम नाही. त्यांनी काय काय करावे ? त्यांच्या नियंत्रणशक्तीचा फायदा घेतला पाहिजे. त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. त्यांनीही विश्वास ठेवण्यात मागेपुढे पाहू नये. ते येथीलच मीठ खातात. तेव्हा त्यांजवरही जबाबदारी आहेच. ह्या समाजसेवेच्या कल्पना ज्या दिशेकडू येत आहेत, तिकडूनच सिव्हिल सर्व्हंट येतात की नाही ? तेव्हा संगनमत होण्यास अडचण पडणार नाही.
पांढरपेशा वर्गास फक्त अधिक स्वातंत्र्य पाहिजे. नवीन विचार पाहिजेत. नवीन आदर्श पाहिजेत. त्यांस सामाजिक सुधारणा पाहिजे. ती आपणांस परिचितच आहे. तेव्हा अधिक सांगावयास नको.
अशा त-हेच्या विषयासंबंधाने आपन नवीन नवीन माहिती जमविली पाहिजे. दुस-या देशातील चळवळींचा व अडचणींचा इतिहास समजून घेतला पाहिजे. पण आधी मीमांसा व नंतर माहिती.
समाजसेवेचे महत्त्व समजण्यास नुसत्या अशा व्याख्यानांचा फारसा उपयोग नाही, व्यक्तीचे दर्शन झाले पाहिजे. संस्थेचे कामच पाहिले पाहिजे. ह्या विषयावर इंग्रजीत पुष्कळ पुस्तके आहेत, ती वाचल्यास पुष्कळ फायदा होईल. पाश्चात्यांकडेही ही चळवळ नवीन असल्याचे सांगितलेच. इंग्लंडातील पहिली “धर्मोदायाची संघटना करणारी संस्था” सन १८६९ त स्थापन झाली. अमेरिकेत पहिली संस्था १८९८ त निघाली. आता त्याचे काम झपाट्याने चालले आहे. १९०७ मध्ये प्रथम एका गावी एका शाळेत ह्या विषयाचे खास शिक्षण देण्यास सुरुवात झाली. १९१० मध्ये अमेरिकेतील जवळजवळ बहुतेक शाळांत ह्या विषयाच्या शिक्षणाची सोय करण्यात आली. आपल्याकडे आज शाळा न निघाल्या, तरी तुम्ही निदान त्यावरील पुस्तके वाचा. निदान त्यांचे मथळे वाचा. सामान्य ज्ञानाचा आता थोडा वीट येऊन विशेष ज्ञानाकडे, विशिष्ट विषयांच्या ज्ञानाकडे आपण वळलें पाहिजे.