जलप्रवास
प्रयाण
आगबोट पर्शिया.
तरुण भार्या, तान्हें बालक, वृद्धही माता-पितरें । अनाथ भगिनी, बंधु धाकुटा, आश्रित बांधव सारे ॥ आलों टाकुनियां । पदरीं घेईं दयामाया ॥१॥
शनिवार ता. २१ सप्टेंबर १९०१ रोजीं सकाळचे १०॥ वाजतां रा. कोरगांवकरांचे घरांतून निघालों तेव्हांपासून वियोगाच्या तीव्र वेदनांस सुरूवात झाली. बॅलर्ड पियरवर माझ्या आधीं बरीच मित्रमंडळी जमली होती. गुरूजन आशीर्वाद देऊं लागले. मित्रमंडळ अभिष्टचिंतन करूं लागला. कांहीजण प्रवासांत उपयोगी अशा महत्त्वाच्या सूचना करूं लागले. अशी एकच गर्दी उडाल्यामुळें मी भांबावल्याप्रमाणें झालों होतों. अशा स्थितींत मीं कांहींचा मुळींच निरोप घेतला नसेल, कांहींस मीं उत्तरें दिलीं नसतील. त्या सर्वांची मी आतां प्रांजलपणें क्षमा मागत आहें. १२ वाजतां प्लेग-डॉक्टरची तपासणी सुरू झाली. १२॥ वाजतां मी सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन निघालों. दारावर आंत सोडतांना रखवालदारानें थोडासा दांडगाईचा प्रसंग आणिला, पण हिंदुस्थानांतील निदान २ वर्षेपर्यंत तरी ही अखेरची असल्यामुळें मीं ती कौतुकानें सहन केली । तपासणी एका मिनिटांतच आटोपली. एकदां आंत गेल्यावर जाणारांची आणि पोंचविण्यास आलेल्यांची नुसती
नजरानजरही होत नाहीं, म्हणून दोघांसही फार वाईट वाटतें. मी मचव्यांत बसल्यावर, मला न भेटलेल्या बाहेरच्या तिघां मित्रांकडून, पुनः भेटून जाण्याबद्दल ३ चिठ्या आल्या. पण इतक्यांत मचवा निघाल्यामुळें, माझा नाइलाज झाला. हळूहळू माझा मायदेश डोळ्यांदेखत अंतरूं लागला. परदेशगमनाचा विचार प्रथम आल्यापासून तों आतांपर्यंत मी सारखा धांदलींत असल्यामुळें, स्वीकृत गोष्टीचें पूर्ण स्वरूप डोळ्यांपुढें आलें नव्हतें; तें मी मचव्यांत स्थिरपणें बसल्यावर प्रत्यक्ष दिसूं लागल्यामुळें, ह्या पांच मिनिटांत मनाच्या ज्या कित्येक कधींच न अनुभविलेल्या भावना झाल्या, त्या लिहून व्यक्त करणें केवळ अशक्य आहे ! वियोग मूर्तिमंत पुढें उभा राहून माझ्या जिवलग माणसांचीं उदास व खेदमय दिसणारीं चित्रें मला एकामागून एक दाखवूं लागला. अशाच कष्टमय स्थितींत मला दोन वर्षें काढावीं लागतात कीं काय अशी धास्ती पडली. पण अखेरची मनाची भावना प्रार्थनामय झाली. विरहवेग कमी होऊं लागला. किंचित् शांत दृष्टीनें किनार्याकडे पाहूं लागलों, तों ह्या प्रवासाची मनांत प्रेरणा होण्यास जी पर्यायानें कारण झाली आहे, ती मुंबई युनिव्हर्सिटी जणूं काय हात वर करून आशीर्वाद देत आहे, असें दिसलें.
याप्रमाणें मी १ वाजतां पर्शिया आगबोटीवर दाखल झालों. नंतर एका तासानें माझें सर्व सामान मला मिळालें. २॥ वाजतां आम्ही सर्व मिळून जेवणास बसलों. जेवण चाललें असतां आगबोट सुटून केव्हां चालू लागली होती हें कांहीं वेळ कळलेंच नाहीं. एंजीनची धडधड लांबनं किंचित् ऐकूं येत होती. ग्लासांतील पाणी देखील सहज दिसण्यासारखें हालत नव्हतें. ३ वाजतां जेवण आटपून घाईनें डेकवर येऊन पाहतों तों कुलाब्याचा दीपस्तंभही मागें राहिला होता. ३॥ वाजतां १० लाख वस्तीच्या मुंबई शहरास मला क्षितिजांत शोधून काढावें लागलें ! ४। वाजतां मुंबईजवळच्या डोंगरांचाही कोठें मागमूस लागेना !! सभोंवर क्षितिजाचें विशाळ वलय पसरलेलें, वरतीं ढग खालीं लाटा, ह्यांशिवाय आसमंतात् दृश्य पदार्थ काय तो आगबोटींतून निघणारा धुराचा लोट हाच होता. खरोखर हा देखावा साक्षात् दगडालाही कवित्वाची स्फूर्ति करणारा आहे ! बोटीच्या अगदीं पिछाडीच्या टोंकावर-म्हणजे मजकडून होईल तितकें करून माझ्या देशाजवळ-मी सुमारें एक तासभर हा देखावा पाहात चित्राप्रमाणें तटस्थ उभा होतों. बोट वेगानें चालली असतां पाणी दुभंगून तिच्या मागें कोनाकृति घार दिसत होती. बाजूनें पाण्याचे तुषार उडून त्यावर ऊन पडून त्यांतून इंद्रधनुष्य दिसे. संध्याकाळानंतर रात्रीं चांदणें पडलें आणि समुद्रानें आपला पेहेराव बदलला. दुसरे दिवशीं पहाटेस उठून पोशाक करून डेकच्या अगदीं आघाडीस गेलों. हा देखावा कालच्यापेक्षांही अधिक मोहक व प्रेरक होता. आकाश अगदीं निरभ्र असल्याकारणानें समुद्र त्याच्या रंगानें रंगला होता; आणि बोटींतून धूर निघालेला दिसत नसल्यामुळें, चहूंकडे ऐक्य नांदत होतें. अत्यंत पुरातन सागर महामुनि शांत व गंभीर रूप धारण करून 'एकमेवाद्वितीयम्' ह्या महामंत्राचा आपल्याशींच पाठ करीत संध्यावंदन करीत बसलेले दिसले. त्यांस पाहून प्रत्यक्ष पापमूर्तिचाही संत बनेल ह्यांत शंका नाहीं !!
पर्शिया आगबोट :- कॅलिडोनिया, अरेबिया यांप्रमाणेंच पर्शिया आगबोटही फार मोठी आहे. ही लांबीनें सुमारें एक फर्लांग म्हणजे १/८ मैल व रुंदीनें मध्यें २२ यार्ड आहे. उंचीनें ४।५ मजली इमारतीइतकी भरेल. वजन ७,००० टनपर्यंत नेऊं शकते. हिजमध्यें ५३० प्रवाशांची सोय आहे. पण ह्या खेपेस प्रवासी फार थोडे म्हणजे केवळ ७५ च होते. हिचा वेग दर तासास सरासरीनें १५ मैल पडतो. पहिले दिवशीं ३१८, दुसरे दिवशीं ३५८, तिसरे दिवशीं ३५५ मैल ह्याप्रमाणें ही चालते. हिला दोन धुरांडीं आहेत. समुद्र खवळून केव्हां केव्हां तुषार आंत येतात, म्हणून आगबोटीच्या बाजूस पुष्कळ आणि मोठ्या अशा खिडक्यांची योजना करितां येत नाहीं. ह्यामुळें चोहींकडे वारा खेळावा, विशेषेंकरून खालच्या मजल्यांत हवा पोंचावी म्हणून अशी योजना केली असते कीं, मोठाले २।३ फूट रुंदीचे बंब खालपासून वरपर्यंत नेऊन त्यांची तोंडें पुष्कळशीं पसरट करून हवेंत निरनिराळ्या दिशेनें वळवून दिलेलीं असतात. तेणेंकरून वारा कसाही वाहत असला, तरी ह्यांच्या तोंडांत सांपडून खालीं उतरतो. असे बंब सुमारें ४० आहेत. प्रकाशासाठीं खालच्या मजल्यांत २४ तास एकसारखे विजेचे दिवे जळत असतात. बोटीला एकंदर पांच मजले आहेत. तळमजला पाण्याखालीं आहे. त्यामुळें त्यांत अंधार असतो. त्यांत जड सामान आणि माल भरलेला असतो. दुसर्या मजल्यास लोअर डेक म्हणतात. दुसर्या वर्गाचें ह्या डेकवरील मुंबईपासून लंडनपर्यंत एका जागेचें भाडें ५२२८८ रु. पडतें. पाण्यावरचा हा पहिलाच मजला असल्याकारणानें, प्रकाश आणि हवा येथें पुरेशीं नसतात. वरचेवर एखादी लाट खिडकीवरून जाते म्हणून ती नेहमीं जाड भिंगानें बंद ठेवावी लागते. तिसर्या मजल्यास मेनडेक म्हणतात. मी ह्यांत दुसर्या वर्गाचें तिकीट घेतलें आहे; त्यास लंडनपर्यंत ६०० रुपये भाडें पडलें. ह्यांतील खोलींत अधिक सोई असून, खिडकी नेहमीं उघडी ठेवितां आल्यामुळें, हवा व प्रकाश मुबलक असतात. शिवाय अंथरुणावर पडल्या ठिकाणाहूनच खिडकींतून समुद्राचा सर्व देखावा नजरेस पडतो. चवथ्या मजल्यास डेक किंवा अपर डेक म्हणतात. येथें दुसर्या वर्गाच्या जागा नाहींत. मंडळीस हिंडण्यास, फिरण्यास, आरामखुर्च्यांवर बसण्यास किंवा कांहीं खेळ खेळण्यास दोन्ही बाजूंस दोन ग्यालरीसारख्या ४० यार्ड लांब व ५।६ यार्ड रुंद अशा खुल्या जागा आहेत. मध्यें सुमारें १० यार्डांची चौरस धूम्रपानाची खोली आहे. पहिल्या वर्गांच्या मात्र ह्या मजल्यांतही खोल्या आहेत. एका प्रवाशास सबंध एक खोली मिळते. तिचें भाडें लंडनपर्यंत सुमारें ८२२ रुपये पडतें. पांचवा मजला उंच गोपुरासारखा आहे. येथें कोणी जात नाहींत. पण येथून सर्व क्षितिज नजरेस पडतें.
केबिन - एक एक खणाची एक खोली असते. तीस केबिन म्हणतात. लोअर डेकवर एका केबिनमध्यें तिघांची व मेनडेकवर एकींत चौघांची सोय केलेली असते. प्रत्येकाच्या जाग्यास बर्थ म्हणतात. त्यावर नंबर मांडलेला असतो. असे एकंदर ५३० नंबर आहेत. प्रत्येकाकरितां एक गादीवर चादर आंथरलेली, एक ब्ल्यांकेट, एक पासोडी, दोन मोठ्या व मऊ उशा आणि एक मोठा टॉवेल इतकें सामान भिंतीत अडकविलेल्या दोन गजांवर व्यवस्थेनें ठेवून एक अंथरूण बनवलेलें असतें. हीं दोन खालीं आणि दोन त्यावर असतात. भिंतींत एक शिसवीचें टेबल असतें; त्यांत एकावर एक असें चार खण असतात. समोर दुसरें एक टेबलासारखें असतें त्यावर एक मोठा गोल आरसा लटकलेला असतो. त्याचेखालीं एक फडताळ असतें; तें उघडल्याबरोबर तोंड धुण्याचें एक जाड चिनी भांडें बाहेर येतें. त्याचे मागेंच दोन पेल्यांतून दोन साबण ठेवलेले असतात. दोन्ही बाजूंस दोन स्वच्छ रूमाल टांगलेले असतात. तोंडधुणें आटपल्यावर फडताळ उचलून झांकल्याबरोबर त्यांतील पाणी खालीं जाऊन सर्व पूर्वींप्रमाणें पेटीसारखें दिसतें. आरशाच्या मागें एक कांचेचा तांब्या व दोन ग्लास पिण्याचें पाणी भरून ठेविलेले असतात; अशा पेट्या दोन असतात. बारीक सामान ठेवण्यास चार जाळ्या आणि कपडे ठेवण्यास १२ खुंट्या असतात. एक विजेची बत्ती असते, ती संध्याकाळीं आपोआप लागते. तिच्याखालीं एक बटण असतें. तें फिरविल्यास आपल्या मर्जी प्रमाणें ती विझवितां येते. शिवाय एक मेणबत्तीचें शेड असतें. वरतीं माळ्यावर चार लाइफ बेल्टस् असतात. २ इंच जाड व १ फूट लांब असे कॉर्कचे तुकडे दुहेरी एकत्र बांधून आपल्या पोटाभोंवतीं बांधण्यास एक पट्टा तयार असतो. अपघाताचे वेळीं हा पट्टा बांधून पाण्यांत पडल्यास मनुष्य बुडत नाहीं.
डायनिंग सलून - हा एक सुरेख दिवाणखाना आहे. त्यांत दोन्हीकडे चारचार खुर्च्या ठेविलेल्या अशीं पांच टेबलें एकापुढें एक मांडलीं आहेत. अशा पांच टेबलांच्या दोन्ही बाजूंस दोन रांगा असून मध्यें एक मोठें न्याहारीचें टेबल ठेविलेलें आहे. सकाळीं ६॥ वाजतां चहा, रोटी, लोणी, फळें इ. असतात. ८॥ स न्याहारी; १॥ ला मुख्य जेवण; ४॥ वाजतां फराळ; ६॥ ला चहा आणि रात्रीं ९॥ वाजतां फराळ, असा नेहमींचा क्रम असतो. ह्या सर्व प्रसंगीं सर्व मंडळी हॉलमध्यें जमते; आणि आपापल्या ओळखीप्रमाणें जागा पसंत करते. सकाळचा चहा व रात्रीचा फराळ सोडून बाकी सर्व प्रसंगीं जेवणास कोणते पदार्थ तयार केले आहेत त्यांची यादी कार्डावर छापून तीं कार्डे टेबलांवर मांडलेलीं असतात. प्रत्येक टेबलाजवळ एक स्टुअर्ड (वांकनीस) उभा असतो. क्रमानें सर्व पदार्थ आपलेकडे हा वांकनीस आणितो. आपल्यास लागेल तो लागेल तितका आपण घ्यावा. प्रत्येक वेळीं सात किंवा अधिक पदार्थ असतात. कलकत्त्याची कढी, फ्रान्सचे वाटाणे, यारमाउथचे मासे, इटलीची आमटी, सार्डिनियाचें अमुक आणि रंगूनचें तमुक, अशीं यादींतलीं चटकदार नांवें वाचून नवख्यांस मोठी मौज वाटते. तरी प्रत्यक्ष पदार्थ पाहीपर्यंत नुसत्या यादीवरून कांहीं कल्पना होत नाहीं. हा सर्व थाट आणि हे प्रकार पाहून नवीन मनुष्य सहजच वाजवीपेक्षां अधिक खातो आणि दोन दिवसांनीं ओकूं लागल्यावर म्हणतो कीं आपल्यास बोट लागली !