जन आणि वन
जगाचे दोन भाग आहेत. एक जन, दुसरे वन. ह्यासच आधुनिक शास्त्रीय नावे द्यावयाची झाल्यास एकास नीती व दुस-यास निसर्ग असे म्हणता येईल. निसर्गात नीतीचा अत्यंताभाव आहे असे नाही. उलट स्वत: नीतीचा कोणताही प्रदेश निसर्गाच्या बाहेर आहे असेही नाही. निसर्गाच्या विराट मंडळात नीतीचा लहान गोल पोकळीतल्या परमाणूप्रमाणे तरंगत आहे! हाच विषय दुस-या बाजूने निराळा दिसतो. नीतीचे अधिष्ठान मन. निसर्घाचे मूळ प्रकृती. प्रकृतीत मन मुळीच मावण्यासारखे नाही. उलट प्रकृती किती जरी अनंत भासली तरी मन तिला क्षणार्धात गिळून बसते. पण गिळते म्हणून त्यास कळते थोडेच! मन आणि माया, नीती आणि निसर्ग अथवा जन आणि वन ह्या द्वंद्वांचे परस्पर नाते काय आहे, ते कोण सांगू शकेल? ह्या द्वंद्वांचे मूळ जी महावस्तू तिचे केवळ स्वरूप कोठे दिसेल! ‘नकळे महीमा वेद मौनावले जेथे पांगुळले मन पवन’ ते ह्याच ठिकाणी! महंतांनी जर प्रांजलपणे ही कबुली दिली आहे तर आमच्यासारख्या लहानांनी काय विचक्षणा करावी! असा प्रकार असून आम्ही प्रसंगी दुस-याचे शब्द उसने घेऊन ज्ञानाची कितीतरी प्रौढी मिरवितो! वासनेचा थोडा कोठे हिसका बसला की तीनदा उलथून पडतो, तरी पुनः उठल्यावर ‘अहं ब्रह्माSस्मि’ म्हणावयाला आहेच तयार!
प्रयत्नशाली जे महावीर आहेत ते जनात राहून सुधारणा साधोत. ज्ञानशाली जे महायोगी आहेत ते वनात राहून सत्य शोधोत. विषय हेच ज्यांचे सुख ते विषयाची खटपट करोत. वाद हेच ज्यांचे ज्ञान ते वादाची घटपट करोत. मध्यंतर आम्ही साधारण माणसे विश्रांतीसाठी व उपासनेसाठी काही काळ जनातून वनात जाऊ या!
पेनरिथपासून केसिकपर्यंत सरोवर प्रांतात जाण्यास सुमारे १८ मैल आगगाडीचा एक फाटा आहे. पेनरिथ सोडल्यापासून नीतीचा गोंधळ मागे दूरदूर राहू लागला आणि निसर्गाचा सोहळा पुढे जवळजवळ येऊ लागला. दोहोंबाजूस उंच उंच पर्वत हिरव्या गवताच्या झुली पांघरून हत्तीप्रमाणे तटस्थ उभे राहिलेले आणि गंभीर दिसू लागले. अस्तास जाणा-या सूर्याची शेवटची किरणे त्यांवर रेंगाळत होती. समुद्रावरील ताजा आणि मंद वारा आणि रानातील झाडपाल्याचा वास काळ्या प्रदेशातून नुकतेच बाहेर पडलेल्या प्रवाशांस सुखवू लागले. केसिक येथे पोहोचल्यावर सुधारणेची शेवटची खूण जी आगगाडी तिलाही निरोप दिला. माहेरी आल्यावर सासरच्या गड्यास निरोप देताना कितीसे वाईट वाटते हे प्रत्येक सासुरवासिणीस माहीत आहेच.
स्टेशनावर आम्ही तिघे विद्यार्थी उतरलो. आम्ही येण्याची वेळ जरी कळविली नव्हती तरी आमचे प्रोफेसरसाहेब व आमच्या पूर्वीचे आलेले एक विद्यार्थी आम्हांस घरी नेण्याकरिता तेथे वाट पहात उभे होतेच. ऑक्सफर्ड विद्यालयात नेहमी विद्याव्यासंगात पाहिलेल्या प्रोफेसरसाहेबांची मूर्ती येथे किती निराळी दिसली! अंगात पहाडी सडा पोषाक, हातात रानटी काठी, खांद्यावरून आडवी जानव्यासारखी सोडलेली कातड्याच्या वादीस लटकलेली लहानशी दुर्बिणीची थैली, गालावर हासे, तोंडात माहितीचा पुरवठा (खिशातले गाईडबुक जणू पाठच केलेले) भाषणात विनोद, वतनात तत्परता, असे गुरूचे चालते बोलते चित्र पाहून आम्ही वाटेचे सर्व क्लेष केव्हाच विसरून गेलो. बॉरोडेल-दरीत लीथस कॉटेज हे आमचे ठिकाण येथून चार मैल होते. आमचे सर्व सामान घरी रवाना केल्यावर, डरवेंट वॉटर सरोवरावरून बोटीतून लिथस् कॉटेजला जाण्यास निघालो.
गाडीतून उतरल्याबरोबर बदललेल्या परिस्थितीत व बदललेल्या पेहरावात आपल्या गुरूस पाहून आम्ही आमचे श्रम विसरलो असे वर सांगितले, पण स्टेशनातून बाहेर येऊन सभोवती पाहतो तो गुरूंचा गुरू जो परमेश्वर त्यानेतर ह्या ठिकाणी आपला पेहराव अधिकच बदललेला पाहून आम्ही श्रमच काय पण स्वत:लाही हळूहळू विसरू लागलो. डरवेंट वॉटर सरोवर केसिक गावाला अगदी येऊन भिडले आहे. प्रोफेसर, सगळे विद्यार्थी आणि एक युनिटेरियन् आचार्य इतकेजण आम्ही एका क्रीडानौकेत बसून निघालो! सूर्यास्त होऊन गोड संधिप्रकाश पडला होता. अशा शांत समयी देव कसा दिसला! ज्याने जन निर्माण केले त्यानेच वनही केले आहे. जो समाजात वसत आहे, तोच सृष्टीतही वसत आहे. असे असता दर्शनात किती तरी हा फरक! तिकडे समाजात तो स्वरूपाने प्रकटतो. पण ते सत्त्वदर्शन कित्येकास होते? आणि ज्या थोड्यास होते ते तरी कितीदा होते? आणि जे होते ते तरी किती कष्टाने, किती अनुतापाने आणि किती आत्मदंडाने आणि इतक्याही सायासाने एकदा कृपा झाली तर ती टिकते किती वेळ! तुकोबा सांगतात की, ‘आठवचि पुरे| सुख अवघे मोहोरे’ पण ह्या आठवेच्या मार्गातच अगणित अडथळे घडलेलेही पुन्हा त्यांनीच वर्णिले आहे की, ‘कामक्रोध आड पडले पर्वत| राहिला अनंत पलीकडे’ तेव्हा जन म्हणजे अशा अडथळ्यांचा डोंगराळ प्रदेश ह्यात आधीच अदृश्य असे जे सत्त्वरूप त्याचे दर्शन होणे अति कठीण. पण येथे पहा, तोच देव कसा सुंदर रूपाने प्रकटला आहे. आठवण करण्याचेही श्रम नकोत. डोळे उघडले की पुरे, सुख अवघे मोहोरे! समाजात जो इतका दुर्लभ तो येथे किती तरी सुलभ झाला आहे. समाजात जो दुर्मिळ, त्याचा सृष्टीत हा कोण सुकाळ! शास्त्रकारास आणि स्मृतिकारास जो तेथे सहसा लाभत नाही, तो येथे पशुपक्षांस भेट देऊन रमवीत आहे! येथे येण्याचाच अवकाश की ताबडतोब भेट व लगेच सलगीदेखील! पश्चात्ताप नाही, प्रायश्चित्त नाही, इंद्रियदमन नको, देहदंडन नको, पापाची आठवणच नाही. मग क्षमेची गोष्ट कशाला! पुनर्जन्मच हा!!
समाजात सुख आहे, ऐश्वर्य आहे, प्रीती आहे, प्रगती आहे, पण तेथे पुष्कळ अंशी ह्या गोष्टी असतात. आम्ही बसलो आहो ही नाव जर पुढे न्यावयाची झाली तर आधी वल्ह्यांनी पाणी मागे ढकलले पाहिजे. आणि हाच प्रकार सर्वदा नाही तरी पुष्कळदा समाजात चालला असतो. माझे धन ते दुस-याचे ऋण, माझा आराम तो दुस-याचे कष्ट, गर्दीतून माझे पाऊल पुढे पडावे म्हणून मी इतरांस मागे रेटीत असतो. असा प्रकार असल्यामुळे समाजात शुद्ध सुख मिळणे फार कठीण होते. तेथे इतर आत्म्यामध्ये परमात्म्याचे जे प्रतिबिंब दिसते ते स्थानमानाने थोडे बहुत अशुद्धच असते. पण सृष्टीतला प्रकार वेगळा. येथे आपण व परमात्मा ह्यांमध्ये इतर कोणी येत नाही म्हणून एथली सर्व सुखे निर्भेळ असतात, निश्चित असतात, निरालंब असतात!
असो. आम्ही पाळीपाळीने दोघे दोघे वल्हवीत, भोवतालची शोभा पहात, मधूनमधून विनोद करीत, प्रसंगानुसार ह्या प्रदेशाची प्रोफेसरांच्या तोंडून चटकदार माहिती ऐकत निघालो. ह्या विस्तीर्ण सरोवराचे पाणी इतके स्वच्छ आणि शांत होते की एक मोठा आरसाच पसरलेला! केसिक गाव लवकरच वळणात लपून गेल्यावर आसमंतात कोठेही जीवांची हालचाल दिसेना. आमच्या बोटीभोवती लाटांची काय ती थोडी हालचाल होती तेवढीच. सर्वत्र एकच निर्विकल्प समाधी लागली होती. एका बाजूस सुमारे एक हजार फुटांचा एकदम तुटलेला काळाकुट्ट कडा किना-यावर तोल सांभाळून तटस्थ उभा होता. दुस-या बाजूस हळूहळू उंच उंच होत जाणा-या पर्वतसपाटीवर दाट गवताचा हिरवा गालिचा पसरला होता. पुढे पुढे ह दोहोंकडचे डोंगर अगदीच जवळ येऊन सरोवरास कवटाळू लागले. अखेरीस सरोवर संपले व आम्ही दरवेंट नदीच्या पात्रात शिरून तसेच बॉरोडेल नावाच्या रमणीय दरीतून वर वर जाऊ लागलो. नागिणीसारखी नदी वरचेवर वळसे मारू लागली. येथे सौंदर्याची तर अगदी सीमा झाली आणि सृष्टिसुंदरीचा गर्व तिच्या पोटात मावेना असे उघड दिसू लागले. किना-यावरील झाडे, लता आणि पर्वत ह्यांच्या प्रतिबिंबाची तर काय बहार! कुलस्त्री एकांतात असताना आरशात आपले रूप पाहून आपल्यासच धन्य मानीत असलेली दिसल्यास कोणास बरे परमावधीची धन्यता वाटणार नाही! आमची नौका पुढे नेऊन ह्या तरूणीचा रसभंग करण्याचे आम्हांला जीवावर आले! आम्ही आता अगदी लीथस् कॉटेजच्याजवळ पोहोचलो. नौका एका झाडाच्या मुळाशी बांधून किना-यावर पाय ठेवितो तोच मिसेस कार्पेंटरबाईनी झोपडीच्या खिडकीतून बाहेर डोकाविले आणि आपला हातरूमाल हालवून मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले !