रा. गो. भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्यानें
(सु. प. १२-०२-१९११)
मधाबद्दल फुलाचे अधिक आभार मानावेत की मधमाशीचे, हे सांगणे एकवेळ सोपे जाईल, पण वरील सद्ग्रंथाचे उत्पादक व संपादक ह्यांच्याविषयी वाचकांची जी उपकृतबुद्धी होणार आहे तिचा निर्णय करणे मुळीच सोपे नाही. फुलातील मधुर द्रव्याची साठवणी केल्याशिवाय त्यास मुळी मधपणाच येत नाही हे जसे खरे आहे तसेच फुलावर लुब्ध होणे हा जो मधमाशीचा आद्यगुण तो तर फुलाशिवाय मुळीच शक्य नाही हेही खरे आहे. प्रस्तुत उत्पादकांनी स्वतः पहिल्या आवृत्तीच्या निवेदनपत्रिकेतच जरी म्हटले आहे, “ह्याविषयी सर्व श्रेय माझे मित्र रा. रा. द्वा. गो. वैद्य ह्यांचेकडे आहे” तरी ह्या पुस्तकाचे श्रेय कोणाकडे आहे, हे ठरविण्याची कठीणता कमी होत नाही. कारण यद्यपि रा. वैद्यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यात, सर्व तरुणांनी उदाहरण घेण्यासारखा उद्योग आणि उत्साह दाखविला आहे तरी दुसरेपक्षी ज्या गुणांमुळे ते ह्या परमपूज्य गुरुवर्यांचे अनन्य अनुगामी झाले आहेत ते लक्षात आणता त्यांना मिळालेल्या प्रस्तुत श्रेयाचे मूळस्थान पुनः गुरुवर्यच होतात.
आमचे मराठी वाङ्मय अद्यापि कंगाल स्थितीतच आहे, हे कोणी कितीही स्वाभिमानी असला तरी त्याला कबूल करावे लागेल. तशात धर्मपर पुस्तकांची—विशेषतः आधुनिक संस्कृतीला साजेल अशा ग्रंथांची—तर मोठीच उणीव आहे, इतकेच नव्हे तर अशा वाचनाची अद्यापि अभिरुचीदेखील आमच्या वाचकवर्गात उत्पन्न झाली आहे किंवा नाही ह्याबद्दल आजपर्यंत जबर शंकाच वाटत होती. पण थोड्याच काळात रा. वैद्यांना ह्या पुस्तकाची वाढविलेली दुसरी आवृत्ती काढण्याचा प्रसंग आला—नव्हे त्यांनी आणिला ह्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच.
प्रस्तुत पुस्तकाचे ‘धर्मपर लेख’, ‘व्याख्याने’ आणि ‘चरित्र’ असे तीन भाग होतात. पहिल्या म्हणजे लेखांच्या भागाचा काळ म्हणजे प्रार्थनासमाजाच्या जवळजवळ आरंभाचा काळ (१७७८-८२) होता. म्हणून अर्थातच हा (फूट नोट – सुबोध पत्रिका, १२-२-१९११) वादविवादात्मक झाला आहे. डॉ. भांडारकर समाजाचे सभासद होण्यापूर्वी समाजाच्या तत्त्वांची मांडणी व शब्दरचना जी कठोर आणि अपूर्ण होती तिला डॉक्टर साहेबांनी हल्लीचे सौम्य व पूर्ण स्वरूप दिले, इतकेच नव्हे, तर त्यांचा मराठी जाणणा-यांमध्ये अधिक विस्ताराने प्रसार केला. तो ज्या लेखांच्या द्वारे केला त्यांची ही मालिका होय. पूर्वीप्रमाणे हल्ली जरी समाजमताला बाहेरून उघडउघड विरोध येत नाही तरी ह्या भागाची उपयुक्तता कमी झाली आहे असे नाही. कारण समाजमतांची तपशीलवार माहिती करून घेऊ इच्छिणारांना ह्या भागापासून विशेष फायदा होण्यासारखा आहे, इतकेच नव्हे तर स्वतः गुरुवर्यांनीच सावधगिरीची सूचना केल्याप्रमाणे समाजाच्या निषेधक बाजूची पूर्ण जाणीव कायम ठेवण्यासाठी समाजाच्या सभासदांनाही हा भाग आवश्यक आहे.
पण ज्याला सर नारायणरावांनी “Invigorating tonic to the mind, sanctifying discipline of life” (मनाला हुरूप आणणारी पौष्टिक व जीवित शुद्ध करणारी प्रणाली) असे म्हटले आहे, तो भाग म्हणजे व्याख्यानांचाच होय. पहिल्या भागाप्रमाणे ह्यात तोडीस तोड आणि फेकीस फेक हा प्रकार नसल्यामुळे कित्येकांस हा तितका रुचण्याचा संभव नाही. पण वरवर वाचणा-यांच्या करमणुकीकरिता, किंवा कोटीक्रमाची जुळवाजुळव करणा-या वावदुकाकरिता हा भाग नाही. हा विध्यात्मक व पौष्टिक भाग आहे. धर्मपर व्याख्यानाचा अथवा उपदेशाचा उद्देश प्रतिपक्षाचा पाडाव करण्याचा किंवा एकाद्या सिद्धांताची प्रतिपत्ती करण्याचा नसतो. उपदेश हा ईश्वरोपासनेचा एक भाग आहे. ध्यान, भजन, प्रार्थना इत्यादीच्या द्वारा चित्त निर्मळ, निर्लेप आणि ग्रहणशील झाल्यावर अभ्यंतरी उमटणारी, ‘अबोलण्या’ ईश्वराकडून मिळालेली ती एक खूण आहे. हा बसल्या बैठकीला भरकन वाचून टाकण्याचा भाग नव्हे. थकल्या भागल्या वेळी एकच उपदेश वाचला की कार्यभाग होणार आहे. हा निराळाच छापून काढला असता तरी बरे झाले असते. तिसरा भाग चरित्राचा. तो ह्या दुस-या आवृत्तीचा एक विशेष असल्यामुळे हिला विशेष मोहकपणा आला आहे. डॉ. भांडारकरांसारख्या मोठ्या माणसांचे चरित्र म्हणजे एक राष्ट्रीय धनच. ते खरे पाहिले असता ह्याहून पुष्कळच मोठ्या प्रमाणावर संपादित झाले पाहिजे, ते योग्य वेळी होईलच. पण तूर्त हाती घेतलेल्या कार्याला अनुरूप असा लेख लिहून रा. वैद्यांनी वाचकाला डॉक्टरसाहेबांचे विस्तृत चरित्र जाणण्याबद्दल जो चटका लावून दिला आहे, तो वाखाणण्यासारख आहे. रानडे आणि भांडारकर ही दोन्ही नावे त्यांच्या प्रतिपक्ष्याच्याही तोंडी मिळूनच असावयाची. आधुनिक महाराष्ट्र मेरूची ही दोन अति उंच शिखरे. एक अनेक संस्था, चळवळी आणि प्रेरणांची बीजे पेरणारा मुत्सद्दी व दुसरा त्या सर्वांची शास्त्रोक्त उपपत्ती स्थापन करणारा मार्गदर्शक, एक प्रवर्तक, व दुसरा पंडित. पण दोघेही एकाच आधुनिक उदार धर्माच्या मंडपात बसून एकाच राष्ट्रयज्ञाची कामे चालविणारे, परस्परसहाय्यक अध्वर्यू. डॉ. भांडारकर हे केवळ शाळेतील व कॉलेजातीलच अध्यापक नाहीत, तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचेही अध्यापक आहेत हे ह्या अल्पशा चरित्रलेखात चांगले दाखविले आहे. विशेषेकरून पहिल्या १७ पानांत त्यांच्या कॉलेजातील अध्यापनाच्या माहितीचा जो साठा केला आहे तसाच पुढील त्यांच्या सुधारण्याच्याही अध्यापनाची माहिती देण्यात आली असती तर बरे झाले असते. पुढील ६० पानांत सामाजिक व धार्मिक मतांची लेखकाने चर्चा केली आहे, ती बहुतेक माहीत असलेली व पुढील भागात आलेलीच आहे. ह्यापेक्षा ह्या मतांच्या प्रसारार्थ डॉक्टरसाहेबांनी व त्यांच्या साथीदारांनी काय काय प्रयत्न केले व त्या कामी त्यांचेवर काय काय प्रसंग गुदरले ह्याचे अधिक दिग्दर्शन ह्याहून थोड्या पानांत केले असते तरी जास्त फायदेशीर झाले असते. अशा गोष्टी डॉक्टरसाहेबांच्या चरित्रात पुष्कळ मिळण्याचा संभव आहे व त्यांपैकी संमतिवयाचे बिल, त्यांच्या कन्येचा पुनर्विवाह वगैरे काही रा. वैद्यांनी दिल्याही आहेत. पण ज्या थोड्या कालावधीत आपला नित्याचा उद्योग सांभाळून ही दुसरी आवृत्ती इतक्या सुंदर रूपाने छापून काढिली तो विचार मनात घेता रा. वैद्यांनी केली आहे हीच कामगिरी मोठी भूषणावह आहे ह्यात संशय नाही. पण ह्याहून विस्तृत चरित्र डॉ. भांडारकरांच्या नावाल शोभण्यासारखे कालानुसार प्रसिद्ध करण्याचे धाडस व पात्रता रा. वैद्यांच्याच अंगी आहे असेही म्हटल्यावांचून राहवत नाहीं.