मार्सेय शहर.
मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड.
ता. ५ ऑक्टोबर रोजीं सकाळीं ६ वाजतां मार्सेय जवळची टेंकडी दिसूं लागली. आगबोट बंदरावर पोंचल्यावर कांहीं वेळानें न्याहारी आटपून आम्हीं 'पर्शिया' चा निरोप घेतला आणि ९॥ वाजतां युरोपच्या किनार्यावर पाय ठेविला. ज्यांच्या मार्फत आम्हीं तिकिट काढिलें होतें, त्या कुक कंपनीचे दुभाषे आमची वाट पाहत बंदरावर उभे होतेच. त्यांपैकीं एकानें आमचें सर्वही सामान आपल्या ताब्यांत घेतलें. हिंदुस्थानचे आम्ही पांच विद्यार्थी आणि एक व्यापारी एकत्र हातों व लंडनपर्यंत मिळूनच गेलों. आम्हां सर्वांला लंडनला लवकरच जावयाचें होतें म्हणून आम्हांस मार्सेय येथें १२ च तास रहावयास सांपडलें. पण तितक्याच वेळांत जेवण वगैरे लवकर आटोपून मार्सेयचा पहावेल तितका भाग पाहिला. आमच्या व्यापारी पारशी सोबत्यांस फ्रेंच भाषेंत थोडीशी जीभ हालवितां येत होती, त्याचा आम्हांस अतोनात फायदा झाला. त्याच्याशिवाय आम्ही सर्व कान असलेले बहिरे आणि तोंड असलेले मुके झालों होतों. वरील दुभाष्यानें मोठ्या आदबीनें आमची सर्व सोय करून 'हॉटेल डी जि नीव्ही' नामक खाणावळीच्या एजंटाशीं आमची गांठ घालून दिली. दोनप्रहरच्या फराळास बराच अवकाश होता. म्हणून आम्ही खाणावळींत विनाकारण खोलीचें भाडें भरीत न बसतां शहर पाहण्यास बाहेर पडलों. मार्सेय हें फ्रान्स देशांतील दुसर्या प्रतीचें शहर व पहिल्या प्रतीचें मोठें महत्त्वाचें बंदर आहे. आम्ही ज्या धक्यावर उतरलों, तो म्हणण्यासारखा सुंदर नव्हता व स्वच्छही नव्हता. फ्रेंच लोकांच्या नखर्याविषयीं व छानीविषयीं माझी जी कल्पना होती, तिच्यामुळें माझी सकृद्दर्शनीं थोडी निराशा झाली. पण जसजसा मी शहरांत शिरूं लागलों, तसतशी ही निराशा कमी होऊं लागली आणि कांहीं भागांतील रस्त्यांची शोभा व दुकानांचा थाट पाहून तर ती अजीबात नाहींशी झाली. आणि मुंबईचे उत्तम रस्तेही ग्राम्य वाटूं लागले. पण स्वच्छतेच्या मानानें पाहिल्यास मुंबईला तिच्या कांहीं गल्ल्यांची पावसाळ्यांतील मासलेवाईक स्थितीची आठवण झाल्याबरोबर हीदेखील तुलना करूं नये असें वाटलें. रस्ते बहुतेक फरसबंदीचे आहेत. कांहीं ठिकाणीं अगदीं एका नमुन्याच्या घरांची रांग लागते. विजेच्या ट्रॅमस्, घोड्यांच्या ट्रॅमस्, ऑम्नीबसेस आणि घोड्यांच्या व गाढवांच्या लहानमोठ्या गाड्या वगैरेंचा रस्त्यांतून एकच घोळका चाललेला असतो. अशा रस्त्यांतून आम्ही चाललों असतां रस्त्यांतील निदान अर्ध्या तरी लोकांचे डोळे आमच्याकडे लागले. कां ? तर मीं डोक्यावर आपला गुलाबी फेटाच घातला होता म्हणून. एके ठिकाणीं गाडी ठरविण्यास आम्ही एकदोन मिनिटें उभे राहिलों, तर आमचेमागें लहान मोठ्या स्त्री-पुरुषांची मोठी गर्दी जमली ! माझ्या एका डोक्याशिवाय आम्ही सहाहीजण जरी नखशिखान्त साहेब बनलों होतों, तरी हा प्रकार घडूं लागला. जर आम्हीं सर्व आमचे सगळे निरनिराळे देशी पेहराव करून बाहेर पडलों असतों, तर रस्त्यांत काय अनर्थ घडता कोण जाणे. तरी पण माझ्या एका फेट्यामुळें कांहीं कमी चळवळ उडाली नाहीं. बायका आपल्या लहान मुलांस कडेवर किंवा खांद्यावर घेऊन आम्हांकडे बोट दाखवूं लागल्या, तरुण मुली घरांत पळत जाऊन इतरांस बाहेर बोलावून आम्हांस पाहत उभ्या राहत. ह्या त्रासामुळें माझे सोबती थोडेसे कुरकुरूं लागले व मलाही अडचण वाटूं लागली. आगबोटीवरदेखील ह्यासंबंधीं बरीच चर्चा झाली. मार्सेय बंदरावर बोटींवरून उतरतांना, आमच्या बरोबर येणार्या एका सिव्हिलियनानें मजजवळ येऊन मोठ्या आस्थेनें विचारलें कीं, कायहो, हें तुमच्या डोक्यावरचें तुम्ही लंडनपर्यंत कायम ठेवणार कीं काय ? लंडनचीं मुलें वात्रट आहेत, तीं तुम्हांस त्रास देतील. माझ्या पोशाखाची तो विशेष कळकळ दाखवूं लागला, हें पाहून मीं त्यास विचारलें कीं, विलायतेस पोलीसची व्यवस्था चांगली आहेना ! ह्यानंतर विशेष बोलणें झालें नाहीं ! फ्रेंच लोक सर्वांपेक्षा अधिक उल्हासी व रंगेल आहेत; शहरांतील पुष्कळ लोक घरीं जेवणाची दगदग न करितां खाणावळींतच जेवतात, वगैरे गोष्टी मीं मागें एका प्रवासवर्णनांत वाचल्या होत्या. त्यांपैकीं एक प्रकार असा आढळून आला कीं, मुंबईंतल्या इराण्यांच्या दुकानाप्रमाणें येथें खाण्यापिण्याचीं आरामस्थानें गल्लोगल्ली पुष्कळ आहेत. दुकानासमोर रस्त्याच्या बाजूनें मोठें उघडें पटांगण असतें. त्यांत शेंकडों खुर्च्या व टेबलें मांडलेलीं असतात. येथें जेवणारांची गर्दी जमलेली असते. हीं ठिकाणें स्वच्छ, सुंदर व भपकेदार असतात. रस्त्यांतील गर्दीकडे पाहत व चकाट्या पिटीत, हे लोक उपहार करीत असतात. दुसरा एक चैनीचा प्रकार असा आढळला कीं, कांहीं ठिकाणीं रस्त्याच्या दोन्ही बाजूंस उंच व दाट झाडें लाविलीं आहेत. हीं झाडें वर एकांत एक इतकीं मिसळून गेलीं आहेत कीं, भर दोनप्रहरीं देखील ह्या रुंद रस्त्यांत गर्द छाया असते. अशा ठिकाणांस येथें बुलवर्ड असें म्हणतात. जागजागीं विश्रांति घेण्यास बाकें ठेविलीं आहेत. ह्या रस्त्यांतून गाड्याघोडीं जात नाहींत. त्यांच्याकरितां दोन्ही बाजूनें वाटा करून दिलेल्या आहेत. मधून रिकामटेकडे हिंडत असतात किंवा बसलेले असतात.
आम्ही 'नॉटर डेम् ड ला गार्ड' नांवाचें देऊळ पाहून परत खाणावळींत जेवणास गेलों व जेवण आटपल्यावर लगेच पॅलेस डिला शांप नांवाचा महाल पाहावयास गेलों. हा महाल एका लहानशा टेंकडीच्या बाजूवर बांधला आहे. त्याचे पहिले दोन मजले टेकडींतच कोरले आहेत व बाकीचे मजले त्यावर उभारले आहेत. ही एकंदर इमारत अर्धवर्तुळाकार आहे. हिच्यापुढें रस्त्यापर्यंत सारखें उतरतें पटांगण विस्तीर्ण पसरलें आहे. त्यावर रसरसीत गवताचे आणि नानाविध रंगाच्या कोमल वनस्पतींचे गालीचे अंथरले आहेत. दोहों बाजूंच्या गालीच्यांची शोभा पाहत पाहत आम्ही चढण चढून वर गेलों. तों एका बाजूस पोष्टाच्या पेटीसारखी एक पेटी ठेविलेली दिसली. आमच्यांतील एकानें तिच्या एका फटींतून आंत एक पैसा टाकिल्याबरोबर दुसर्या एका फटींतून मार्सेयच्या एका सुंदर इमारतीचा फोटो बाहेर पडला. ह्या इमारतीचा समोरचा तळमजला टेंकडीच्या खडकांत कोरून काढला असून, ह्या ठिकाणीं कोरींव लेणें फार पाहण्यासारखें आहे. येथें अर्धवट उजेड व अर्धवट अंधार आहे. पोखरून काढलेल्या भरभक्कम खांबाभोंवतीं आणि पुतळ्यांच्या आजूबाजूला खडकांतून झिरपणार्या झर्याचें पाणी खेळत आहे. शांत समयीं हें एकांतस्थळ पाहून असें वाटतें कीं, निसर्ग आणि मानवी कला ह्या जोडप्याचें हें जणूं क्रीडास्थानच असावें. महालाच्या ह्या मधल्या भागाच्या दोन्ही बाजूंस अर्ध वर्तुलाकार दोन दालनें आहेत. एका दालनांत अनेक प्रकारच्या जनावरांचीं व पक्षांचीं मृत शरीरें व इतर पदार्थ ह्यांचा मोठा संग्रह व्यवस्थेनें लावून ठेविला आहे. आणि दुसर्या दालनांत खालच्या मजल्यांत पुतळे व वरच्या मजल्यांत चित्रें ह्यांचा संग्रह ठेविला आहे. ह्यांपैकीं बहुतेक चित्रें आणि मूर्ति नग्न होत्या, त्यांत विशेषेंकरून कांहीं सुंदर तरुण स्त्रियांचीं चित्रें तर केवळ नग्न आणि नैसर्गिक स्थितींत इतकीं हुबेहूब दाखविलीं होतीं कीं, आम्हां पौरस्त्यांस तिकडे पाहिल्याबरोबर पराकाष्ठेची शरम वाटून, चित्रांतील सुंदरीचा जणूं अपमान केल्याप्रमाणें खेद वाटे. तसेंच ह्यावरून फ्रेंच लोकांच्या सौंदर्याभिरुचीचाही मासला कळतो. हीं चित्रें सुप्रसिद्ध व सुंसंस्कृत चितार्यांच्या मनांतून व हातांतून उतरलीं असल्यामुळें एकावर चित्त गुंतलें, तें तेथेंच गुरफटून राही. इतक्यांत सहज दुसरीकडे नजर गेल्याबरोबर तिकडेच लय लागे. हा देखावा पाहून आम्हांस असें वाटूं लागलें कीं, दैवी सौंदर्य आणि मानवी चातुर्य ह्या दोन्हींची आम्हांस ह्यापूर्वी नीटशी कल्पनादेखील नव्हती. काव्य, इतिहास, नाटक, पुराण, दंतकथा, प्रवासवर्णन, भूगोल, खगोल आणि दुसर्या अनेक शब्दसृष्टींचें प्रतिबिंब ह्या चित्तवेधक चित्रसृष्टींत परावृत्त झालें होतें. हाच मासला पुतळ्यांचाही. असो, अशा प्रकारचा हा संग्रह अफाट असून आम्हांला वेळ तर फारच थोडा होता. आणि शहरांत अशीं ठिकाणें आणखी किती होतीं कोण जाणे. अशा स्थितींत आमच्या मनाची किती ओढाताण झाली हें सांगतांच येत नाहीं.
मार्सेयमध्यें व पारीसमध्येंही एक चमत्कार दिसला. तो हा कीं, ४।५ ठिकाणीं बायकांच्या ओंठांवर मिशा दिसल्या ! एका वृद्ध बाईला तर अगदीं खास वस्तर्याची गरज लागत होती, असें दिसलें; कारण, तिच्या हनुवटीवर, गालांवर आणि ओठांवर करड्या रंगाचे राठ खुंट वाढले होते. एकदोन युवतींच्या ओंठावर कोवळ्या व निळसर केसांच्या दाट पण आंखूड मिशा पाहिल्या. ह्या नटव्या फ्रेंच बायकांनीं कसलीं तरी तेलें लावून आपले केस कृत्रिम रीतीनें वाढविले असल्यास न कळे ! जेवण वगैरे आटपून रात्रीं ८ वाजतां आम्ही स्टेशनावर गेलों. तेथें कुक कंपनीचा दुभाषा आमचें सर्व जड सामान घेऊन आमची वाट पाहत हजर होताच. आमच्यासाठीं एक रिझर्व्हड २ र्या वर्गाचें कंपार्टमेंट घेऊन त्यांत आमची सर्व सोय त्यानें लावून दिली; आणि आम्ही ८।४० ला पारीसला निघालों. थंडी फार पडली असल्यानें आम्ही दारें पक्कीं बंद करून जवळ असेल तितका गरम कपडा अंगावर घेऊन स्वस्थ गुरफटून निजलों. तों सकाळीं ६ वाजतां डीजॉन स्टेशनावर जागे झालों. गाडीचा वेग दर तासास ५०-६० मैलपर्यंत होता. डब्यांची रुंदी किंचित् जी. आय. पी. पेक्षां ज्यास्त असते. प्रत्येक डब्यांत लांबीच्या बाजूनें सुमारें ३ फूट रुंदीचा भाग ग्यालरीसारखा खुला असतो. ह्या ग्यालरींतून गाडीच्या एका टोंकापासून दुसर्या टोंकापर्यंत गाडी चालू असतांनादेखील जातां येतें. आगबोट बंदरावर पोंहोंचल्याबरोबर जरुरीच्या उतारूंस ताबडतोब नेण्यास पी. अँड. ओ. स्पेशल, तयार असते, ती मार्सेयहून जी लगेंच निघते ती कॅलेवरच थांबते. त्या गाडींत एक भोजनाचा स्वतंत्र हॉल आणि निजण्याच्याही खोल्या असतात. डी जॉन स्टेशनापासून तों पारीसपर्यंत, वाटेंत शेतें, कालवे, दर्या, बोगदे, गांवे इ. - चा सुंदर देखावा गाडींतून दिसला. पाऊस एकसारखा सपाटून पडत होता. फ्रेंच लोकांची सौंदर्याभिरुचि त्यांच्या शेतांतूनही दृष्टीस पडते. ह्यांचीं शेतें म्हणजे केवळ बागच ! कालव्याच्या कांठीं झाडें लागलीं होतीं, तीं जणूं कवाइतीलाच उभीं आहेत असें वाटे. जागोजाग खेडीं लागत, तीं खेडीं, नव्हत, चित्रेंच तीं ! फ्रान्सचीं शेतें सकाळच्या वेळीं गाडींतून धांवत असतांना प्रथमच पाहून एकाद्या नवख्यास, इतर ठिकाणीं राजा होण्यापेक्षां, फ्रान्समध्यें शेतकरी होणें बरें, असें वाटल्यास त्यांत नवल काय ?