ईश्वर आणि विश्वास
ईश्वर
(१९०८ च्या उत्सवांत दिलेल्या व्याख्यानाचा सारांश)
मानवोन्नतिशास्त्र (Anthropology) ज्यांनी पाहिले असेल, त्यांना ५००० वर्षांपूर्वीपासून आतापर्यंत धर्माची प्रगती कशी होत आली आहे, हे कळून येईल. एवढ्या काळात जड जगत् जशाचे तसेच राहिले आहे. जी माती पूर्वी तांबडी होती ती आताही तांबडीच आहे, जी काळी होती ती आता तशीच आहे. जो दगड पूर्वी जितका कठीण होता तो तितकाच आता आहे. मनुष्येतर प्राणीही बहुतेक त्याच स्थइतीत आहेत. पण मनुष्यप्राण्याने इतक्या अवधीत किती आघाडी मारिली आहे! भौतिक कला, मानसिक विद्या आणि आत्मिक उन्नती ही ह्या एका प्राण्याने किती तरी संपादिली आहेत पहा.
हे जे ऐश्वर्य आणि ही जी संपत्ती मनुष्याने मिळविली आहे त्या सर्वांत श्रेष्ठ दर्जाची संपत्ती म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराची गूढ शक्ती, की जिच्यामुळे अनंतकोटी ब्रह्मांड निर्माण होऊन चालली आहेत... त्याच्यासंबंधी मनुष्याने आपल्या ज्या कल्पना, भावना व सिद्धांत केले आहेत, ते होत. ईश्वर म्हटल्याबरोबर काय काय विचार, विकार, ईर्षा, इ. उदभवतात! ह्या संपत्तीशी दुस-या कशाचीही नुसती तुलना देखील करणे शोभत नाही.
हा जो आपल्याजवळ अपूर्व संपत्तीचा संचय आहे, तो जशाचा तसाच पूर्वीपासून मिळालेला आहे असे नाही. स्वत: ईश्वर जरी उत्क्रांतिनियमाच्या बाहेर आहे, तरी त्याने आपल्यासंबंधी ज्ञान मनुष्यास एकदम जाहीर केलेले नसून ते तो उत्क्रांतिनियमाप्रमाणे हळूहळूच देत आहे. पृथ्वीच्या नकाशाकडे पाहिले असता दिसून येईल की, भूमध्यरेखेपासून उत्तरेकडील ४० अक्षांशांच्या दरम्यान जे इजिप्त, अँसिरिया, बॅबिलोनिया, इराण, हिंदुस्थान, चीन, जपान, मेक्सिको आणि पेरू इ. प्राचीन देश आणि राष्ट्रे होऊन गेली, ह्यांतच मनुष्यजातीच्या हल्लीच्या सर्व सुधारणांची उत्पत्ती झाली आहे, असे उपलब्ध इतिहासावरून दिसून येते. ह्या चाळीस अक्षांशांच्या समशीतोष्ण कटिबंधात हे सर्व देश दिसून येते. ह्या चाळीस अक्षांशांच्या समशीतोष्ण कटिबंधात हे सर्व देश असल्यामुळे, युरोप व आफ्रिकेत गहू, आशियात तांदूळ आणि अमेरिकेत मका ही मनुष्याच्या सुस्थितीस आवश्यक धान्ये उत्पन्न होऊन त्यांच्याबरोबरच सुधारणांचीही लागवड होणे शक्य झाले. ह्यावरून इतरांबरोबरच ईश्वरासंबंधी ज्ञानालाही भौतिक साधनांची कशी आवश्यकता आहे, हे दिसून येईल. फार प्राचीन काळी अर्धवट रानटी माणसांच्या ज्या साध्याभोळ्या धर्मसमजुती आधुनिक शोधामुळे व शास्त्रीय उपकरणांच्या योगे आम्हांला माहीत होऊ लागल्या आहेत, त्यांच्याशी आमच्या स्वत:च्या सुसंस्कृत समजुती ताडून पाहता हा ईश्वरी ज्ञानाचा विकास होत असलेला दिसून येईल. मनुष्य मेला असता त्याच्या आत्म्याला बाहेर जाण्याला वाट करून देण्यास प्रेताच्या टाळूस वाटोळे भोक करण्याची चाल काही रानटी लोकांत असावी अशी काही प्रेतांच्या प्रस्तरभूत सांगाड्यावरून व इतर खुणांवरून अटकळ होते. मस्तकात प्राण नावाची कल्पना आपल्या योगशास्त्रातही आहे. “इस बंगलेकू नऊ दरवाजे दसवी खिडकी खोल” असा जो कबीरजींचा उल्लेख आहे, तोही ह्या मस्तकातील खिडकीसंबंधी होय. ह्यात रहस्य इतकेच की आत्मतत्त्व म्हणून काही आपल्यात आहे आणि बाहेरही आहे आणि त्याचा मिलाफ व्हावयाचा आहे ही जी धार्मिक कल्पना ती अनेक प्रकारच्या समजुतींच्या द्वारापूर्वीपासून सारखी परिणत होत आहे. तसेच आकाश, वायू, पर्जन्य, महासागर, सूर्य, इ. सृष्ट महाविभूती निरनिराळ्या दैवते मानून त्यांची पूजा करण्याची प्रवृत्ती जशी ग्रीक लोकांत आणि हिंदुस्थानात होती तशीच नव्या खंडातील मेक्सिको आणि पेरू देशांतही असलेली शोधकास आढळून आली, इतकेच नव्हे, तर मेक्सिकोच्या जुन्या देवळातील सूर्याच्या मूर्तीचे जे चित्रवर्णन केलेले आहे, ते तर मराठी जुन्या तिस-या पुस्तकातील सूर्याच्या चित्राची हुबेहूब आठवण करून देते. ही अनेक दैवते नाहीशी होऊन गेली, तिचाही प्रकार चहूंकडे सारखाच दिसून येतो.
असो. ह्याप्रमाणे मनुष्यप्राणी ईश्वराची कोणत्या ना कोणत्या त-हेने तरी भावना केल्यावाचून राहिला नाही. इतकेच नव्हे, तर ईश्वरासंबंधी त्याची भावना उत्तरोत्तर शुद्धच होत गेली आहे व पुढे ह्याहूनही शुद्ध होत जाणार आहे. किंबहुना ईश्वराला भावणे हाच मनुष्यपणा आहे.
असन्नेव स भवति | असदब्रह्मेति वेद चेत् | अस्ति ब्रह्मेति चेद्वेद | (तैतिरीयोपनिषद २.६)
ब्रह्म नाही असे म्हणणारा स्वतः आपणच नाही असा होतो. ब्रह्माला आहे असे जाणण्यानेच जाणणा-या स्वतःला अस्तित्व येते. मननशील असणे हाच मनुष्याचा धर्म. तो नाहीसा झाला म्हणजे मनुष्याचा मनुष्यपणा नाहीसा होऊन तो नुसता प्राणीरूपाने उरतो. असा वरील श्रुतिवाक्याचा भाव आहे. तेव्हा ईश्वरासंबंधी काही तरी भावना मनुष्यमात्रामध्ये असलीच पाहिजे, ही गोष्ट निर्विवाद आहे.
मानवोन्नतिशास्त्र किंवा तुलनात्मक धर्मशास्त्र ह्यांचा उद्देश ईश्वर आहे की नाही हा प्रश्न ठरविण्याचा नाही, तर ईश्वरभावनेची शुद्धी कसकशी होत गेली हे दाखविण्याचा आहे. आणि ह्या शुद्धीची मुख्य दिशा ही आहे की, ईश्वर हा कोणी शरीरविशिष्ट व्यक्ती नसून सर्वव्यापी शुद्ध चैतन्य आहे, अशी मानवजातीची मती होत चालली आहे. म्हणजे थोडक्यात सांगावयाचे तर ईश्वर हा भोगायतन नसून केवळ गुणाश्रय आहे. मनुष्यही स्वत: गुणाश्रय आहे, परंतु त्याच्या गुणाला शरीराची अपेक्षा आहे तेव्हा ह्या त्याच्या दोषामुळे तो कितीही ज्ञानी झाला तरी तो आपल्या स्वतःचा देहभाव सूक्ष्म मानाने नकळत का होईना, ईश्वरावर आरोपितोच. तो देहभाव (Anthropomorphism) पूर्ण नाहीसा करून ईश्वर हा केवळ गुणाश्रय आहे, असे जाणणे ही त्याविषयी सम्यग्भावना होय. म्हणजे ईश्वर आमच्यासारखा सुखी किंवा दुःखी नसून केवळ सुखरूपच आहे, आमच्याप्रमाणे द्याळू किंवा निर्दय नसून दयेचा प्रेरक आहे, आमच्यासारखा प्रेमी किंवा द्वेषी नसून प्रेमाचा प्रवर्तक आहे, हे आम्ही उत्तरोत्तर अधिक जाणिले पाहिजे.
ह्या ठिकाणी असा एक आक्षेप येण्याचा फार संभव आहे की ईश्वर जर सर्व गुणांचा प्रवर्तक आहे, तर तो सदगुणांचा असावा तसाच दुर्गुणांचा असला पाहिजे. चांगल्या गुणाला मात्र ईश्वर कारण आणि वाईटाला मनुष्य कारण असे म्हणणे म्हणजेच ईश्वरावर ही मोठी मेहरबानीच करू पाहणे होय. ह्यावर थोडा विचार केल्यास कळून चुकेल की सदगुण आणि दुर्गुण ह्या दोन भिन्न परस्परविरोधी स्थिती मुळीच नाहीत. जे काय आहेत ते गुणच आहेत आणि ते सर्व मंगलच आहेत. उदारणार्थ, मनुष्य प्रेमामुळे दुस-यावर उपकार करतो व लोभामुळे दुस-याला अपकार करतो असे दिसते. पण प्रेम आणि लोभ हे परस्पर विरोधी पदार्थ नाहीत. तर उत्क्रांतीच्या निरनिराळ्या पायरीवरचे गुण असून दोन्ही सत्कार्याची साधनेच आहेत. प्राणिमात्रांनी आत्मसंरक्षण करावे, ह्यासाठी ईश्वर लोभाचा प्रवर्तक होतो; आत्मसंरक्षणाचे खालचे कार्य चांगले स्थापित झाल्यावर त्याहून उच्च दर्जाचे जे परहितपोषण-उत्क्रांतीचे कार्य त्यासाठी प्रेमाचा प्रवर्तक ईश्वरच होतो. आपण मात्र वरच्या पायरीवर पोहोचूनही वरच्या प्रेरणांना न जुमानता खालच्या प्रेरणांना वश झालो, तर आपल्याला दिलेल्या स्वतंत्रतेचा आपण दुरूपयोग केला असे होते. ईश्वर दुर्गुणांचा प्रवर्तक होत नाही. कारण दुर्गुण असा कोणताच नाही. ह्याचप्रमाणे शौर्य आणि भीती, सहिष्णुता आणि क्रोध, जितेंद्रियता आणि काम, ह्या सर्व गुणांचे प्रयोजन समजावे. हे भिन्नभिन्न दिसणारे गुण एकाच पायरीवरचे नव्हेत. उत्क्रांति-कार्यासाठी ह्यांची शुभ परंपरा सत्त्वाचा प्रवर्तक जो परमेश्वर त्यानेच लावून दिली आहे. आणि वाढीच्या मानाने प्राणिमात्रांना ईश्वराने अधिकार आणि स्वतंत्रता ही कशी दिली आहेत ह्याचा अनुभवही ज्याचा त्यालाच आहे. ह्यासंबंधी इतरांनी वाच्यता करण्याची जरूरी नाही आणि करून फळही नाही. एवंच ईश्वर सत्त्वाचा प्रवर्तक आहे ह्या श्रुतिवाक्याला बाध येत नाही.
विश्वास ईश्वर सत्त्वाचा प्रेरक आणि प्रवर्तक कसा आहे ह्याचा आपण इतका वेळ विचार केला. आता त्याच्या आमच्यामधील संबंध जो विश्वासाचा त्याकडे वळूं.
ईश्वराचा व आपला संबंध बुद्धीच्यापेक्षा विश्वासाच्याद्वारे अधिक जडतो. इतकेच नव्हे, तर बुद्धीच्यामुळे हा संबंध केव्हा केव्हा शिथिल होतो असे दिसून येते. बुद्धी आणि विश्वास ह्यांतील फरक थोडक्यात सांगावयाचा झाल्यास असे म्हणता येईल की, बुद्धी म्हणजे पुष्कळ प्रयत्नानंतर पुष्कळ सामग्रीच्या साहाय्याने अल्प ज्ञान करून देणारी शक्ती आणि विश्वास म्हणजे काहीच प्रयत्न न करता अल्पशा सामग्रीने पुष्कळसे ज्ञान करून देणारी शक्ती होय. अनेक शास्त्रांच्या पुष्कळ साधनांनी आणि मोठ्या अविश्रांत श्रमाने मनुष्याला बराच अनुभव आला आहे, तरी विश्वाचे ठोकळ आणि यथार्थ ज्ञान काय झाले हे पाहू गेले असता साधनांच्या मानाने सिद्धी फारच अल्प झालेली दिसून येईल. पण माणसामध्ये विश्वास म्हणून एक अधिक मोलाची आणि नवलाची शक्ती आहे. विश्वामध्ये सत्त्वाचा, शुभाचा आणि मांगल्याचा प्रसार करणारी ईश्वर ही शक्ती भरली आहे, हे ज्ञान प्राचीन काळापासून कमी अधिक मानाने कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे अवगत झाले आहेच. थोडा कोठे एक विशेष प्रकारचा अंगस्पर्श होतो न होतो, तोच नूतन बालकाचा आईवर केवढा दृढ आणि कायमचा विश्वास बसतो! थोडी खुणेला खूण पटली की तरूणी आपल्या माहेराच सर्व वारसा सोडून देऊन परक्या तरूणावर आपल्या सर्व आयुष्याचा भार टाकते! ही विश्वासाची जादू होय. “आकारैरिंगितैर्गत्यागृह्यतेSन्तर्गतं मन:|” मनुष्याच्या आतला मतलब समजण्याला, आकार, हावभाव, बसणे, उठणे इ. वरून सहजच उपजणारा विश्वास हा कारण होतो. येथे तर्काची प्रमाणे पंगू पडतात आणि मनुष्याप्रमाणेच अखिल विश्वाचा मतलब समजण्यालाही बुद्धीच्या कृत्रिम खटपटीपेक्षा उपजत विश्वासच कामाला येतो. कारण “तुका म्हणे माझा स्वामी अबोलणा | पुरवू खुणे खुणा जाणतसे ||”
बुद्धी आणि विश्वास ह्यांमध्ये दुसरा एक विशेष फरक आहे तो असा. विश्वामध्ये सत्त्वाचा प्रवर्तक ईश्वर आहे असे केवळ अस्तित्वबोधक ज्ञान बुद्धीच्याहीद्वारे मिळू शकते. हल्लीच्या काळी शिक्षण आणि संसाराच्या इतर सोयी पुष्कळ सवंगल्या असल्यामुळे ब-याच सुशिक्षित लोकांना आपल्या बुद्धीची थोडीशी हालचाल करून, थोडेसे तुलनात्मक धर्मशास्त्राचे अवलोकन करून, ईश्वरासंबंधी वरील अस्तित्वबोधक ज्ञान मिळविता येते आहे. पण अशा सुशिक्षितांना त्यांच्या सुखवस्तू स्थितीत त्यांच्या ह्या सुलभ ज्ञानामुळे फारसा उपद्रव होत नाही, किंवा साहाय्यही पोहोचत नाही. नित्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक व्यवहारात सत्याचा आग्रह धरून रहावयाला त्यांचे हे आयते ज्ञान त्यांना भाग पाडीत नाही. किंवा भाग पडले असता त्यांना धीरही देत नाही, येथे विश्वासाचे काम आहे. ईश्वर सत्त्वप्रवर्तक आहे असे नुसते मत असून चालत नाही, तर तो सत्याचा आशि शुभाचा प्रवर्तक आहे. म्हणूनच मी सत्याचा आग्रह धरून राहिलो तर, माझे कितीही हाल झाले तरी हानी-माझी किंवा कोणाचीही-मुळीच होणार नाही, असा विश्वास पाहिजे आहे. अशा विश्वासामुळेच ईश्वराचा व आपला खरा आणि निकट संबंध जडतो, बुद्धीने जडत नाही.
माझ्या समाजबंधूंनो, मला आपल्यापुढे हाच मुद्दा विशेष कळकळीने सांगावयाचा आहे. ह्यात नवीन काही नाही आणि ते नको आहे. तुम्ही व मी प्रार्थनासमाजात आलो, येवढ्यावरूनच सर्व ईश्वरावर विश्वास ठेवणारे झालो असे होत नाही. ती गोष्ट आम्ही आमच्या नित्याच्या व्यवहारात कसे वागत असतो ह्यावर अवलंबून आहे. पुष्कळ वेळा तर असे घडते की आम्ही आपल्या व्यक्तीच्या वर्तनावर दुस-यांनी टीका करण्याची वाट देखील पाहत नाही. म्हणजे कोणीतरी समाजावर साधारण टीका केल्याबरोबर आमचा सर्व विश्वास विरघळून जाऊन आम्ही शुष्क होतो. परवाच पुणे येथील मराठा पत्रात एका सन्मान्य गृहस्थाचा एक सुंदर लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, प्रार्थना समाजात फारच थोड जीव उरला आहे आणि त्याचे लोकांवर तर मुळीच वजन नाही. गोष्ट खरी असेल. पण अशा टीकेचा आमच्या समजाबंधूंवर भलताच परिणाम होण्याचा संभव आहे म्हणून मला पुढील एक गोष्ट सांगावी असे वाटते.
एकदा एका मोठ्या आगबोटीवरील एक उतारू फार आजारी पडला. तो जगण्याची आशा बहुतेक नाहीशी झाली. शेवटी आगबोटीवरील डॉक्टरांनी रोग्याला नीट तपासून आपली खात्री करून घेतली, आणि स्ट्यूअर्डस लोकांना एकीकडे बोलावून सांगितले की, रोग्यात आता जीव फारच थोडा उरला आहे. तो १० वाजण्याच्या आत खात्रीने मरणार. त्यानंतर त्यास समुद्रात टाकून द्यावे. १० वाजता सांगितल्याप्रमाणे स्ट्यूअर्डस येऊन रोग्यास उचलून नेऊ लागले, रोगी त्यास तसे करू देईना, स्ट्यूअर्डसनी डॉक्टरचे मत कळविले तरी रोगी आपण मेलो आहे हे कबूल करीना. स्ट्यूअर्डसनी त्याला दरडावून विचारले, काय डॉक्टरापेक्षा तुला अधिक कळते काय? एकाद्या विद्वान टीकाकाराने टीका केली, व आमच्यामध्ये जीव आहे की नाही हे विद्वानांपेक्षा आपणांस जास्त समजते. अशावेळी विद्वानांच्या म्हणण्याकडे किंबहुना लोकांच्या दटावणीकडे लक्ष न पोहोचविता आम्ही जिवंत आहो हा विश्वास जतन केला पाहिजे व लोकांनी ढकलून दिले तरी आपण आपल्या नावेतून समुद्रात पडू नये.
ही समाजावरील टीकेची गोष्ट झाली. व्यक्तिविषयक वर्तनावरील टीका झाली तरी आपला विश्वासच जसा कामाला येतो; तसे दुसरे काही येत नाही. पण काही झाले तरी असे दुस-याच्या टीकेचे प्रसंग कमीच येतात. पुष्कळ वेळा आम्हांला स्वत:चीच टीका आणि भीती ह्या नडतात आणि नागवितात. समाजात यावे किंवा न यावे हे ठरविण्याला ईश्वरावरील विश्वासाची इतकी जरूरी भासत नाही. पण वरील आत्मटीका व आत्मभीती ह्यांचे निवारण, सत्त्वप्रवर्तक ईश्वर आपल्या जवळ आहे असा विश्वास आपल्यात अष्टौप्रहर जागत असल्याशिवाय होणे शक्य नाही. एकाद्या कामाचा आरंभ करतेवेळी हा विश्वास असतो, पण अर्ध्या वाटेवर गेलो असता धीर सुटतो, दिशा धुंद होतात.
पॅरीस शहरात सुमारे २०० फूट व्यासाचे एक विशाल चक्र बारीक तारांच्या उंच खांबावर उभे केले आहे. १०-५ माणसे सुखाने बसतील अशा खोल्यासारख्या १००-१५० पेट्या त्या चक्रात बसविल्या आहेत. प्रेक्षक लोक ह्या खोल्यांतून बसले असता हळूहळू ते चक्र फिरत असते. ह्या ठिकाणी फ्रेंच कारागिरांच्या यंत्रकुशलतेची व योजनेची कमाल झाली आहे. मी ह्या एका खोलीत बसून जसजसा हळूहळू वर जाऊ लागलो तसतसा माझा धीर सुटू लागला. किती दिवस तरी ह्या चक्राचा खेळ चालला होता, हे मला माहीत असूनही माझ्याच वेळी ते मोडणार अशी पोरकट भीती मला वाटू लागली. ही भीती केवळ संस्कारजन्य होती. पण तिच्यामुळे त्रास झाला तो काही कमी नव्हता. २०० फूट उंच वर हवेत जेव्हा आमची खोली गेली तेव्हा तर अवस्था फारच कठीण झाली. ह्या चक्राची एक फेरी कशी तरी झाली. पण एफेला टॉवर नावाचा जो ८०० फूट (सर्व जगात उंच) लोखंडी मनोरा आहे, त्याच्या अर्ध्यावर तर चढवेचना. प्रार्थनासमाजाला जो मनोरा चढावयाचा आहे त्याची उंची अनंत आहे, त्यातील सभासदांचा धीर पदोपदी सुटण्याचा संभव आहे. अशा वेळी विश्वासाचे बळ पाहिजे. संस्कारामुळे जी भीती वाटते ती घालवावयाची असल्यास विश्वासाचीच सवय केली पाहिजे.
आत्मोन्नतीचे आणि देशोन्नतीचे पुष्कळ चढाव समाजाला चढावयाचे आहेत. सभासदांचा व्यक्तिश: विश्वास उत्तरोत्तर वाढत जावो आणि ईशभक्ती व लोकसेवा त्यांच्याकडून अधिकाधिक घडो, ही जगच्चालकाजवळ प्रार्थना आहे.